दिवाळी अंक २०२१ : मालमत्ता

सरिता बांदेकर's picture
सरिता बांदेकर in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

“आई,आपल्या नवीन फ्लॅटचं पझेशन मिळणार आहे पुढच्या महिन्यात. मग इंटिरियरचं काम चालू होईल.”
समर उत्साहात मेघाला सांगत होता.
“अरे इंटिरियर करणार म्हणजे? हे सामान? याचं काय करायचं?” मेघाला प्रश्न पडला.
“अगं, मी ठरवलंय हे घर तसंच भाड्याने द्यायचं. म्हणजे ते फर्निचर हलवाहलवी नको. शिवाय तिकडच्या रूममध्ये ही कपाटं बसणार नाहीत.” समर म्हणाला.
“अरे, पण आमचं कपाट न्यावं लागणार. आणि ती लाकडी नक्षीकाम केलेली संदूक.. त्यात आमची सगळी मालमत्ता आहे.” मेघाला आपल्या सामानाची चिंता होती.
“अगं आई,तू ते सर्व बॉक्समध्ये भर. आपण ते नवीन कपाटात ठेवू या. पण संदूक कशी न्यायची? त्या संदुकीसाठी आता जागा शोधावी लागेल.” समर म्हणाला.
“ते काही नाही. तू त्या इंटीरियर करणाऱ्याला सांग संदुकीसाठी जागा करायला.”मेघा म्हणाली.
समरनी डेकोरेटरला संदुकीचा फोटो आणि डायमेन्शन पाठवले. संदुकीचा फोटो बघून डेकोरेटर खूश झाला.
तो लगेच समरच्या घरी आला. ती संदूक बघून तो एवढा खूश झाला की समरला म्हणाला,
“समर, तुम्ही मला ही संदूक द्या. मी तुम्ही सांगाल ती किंमत द्यायला तयार आहे.”
“अहो, तुम्ही काय बोलताय? ही संदूक द्यायची नाहीय. यांत आमची सर्व मालमत्ता आहे. आयुष्यभराची कमाई. ही संदूक नाही देऊ शकत नाही.”मेघा म्हणाली.
अशी बरीच चर्चा झाली, पण मेघा ती संदूक विकायला तयार होईना. शेवटी ती संदूक नवीन घरी न्यायचं ठरलं. पण एक अट होती - संदूक मेघाच्या रूममध्ये ठेवायची, पण त्या आधी त्यात ठेवलेली मालमत्ता काय आहे ते समरला आणि मालविकाला मेघाने सांगायचं. नाहीतर ती संदूक त्या डेकोरेटरला विकायची.
मेघाला विचार करायला वेळ पाहिजे होता. समर म्हणाला, ”चालेल आई, तुला पाहिजे तेवढा वेळ घे. मी ताईला सगळं सांगून ठेवतो. एखाद्या रविवारी आपण बघू या त्यात काय आहे.”
मेघाला आता मान्य करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. मेघाने हे सर्व उल्हासला सांगितलं. मेघा आणि उल्हासने जिवापाड जपलेलं गुपित आता उघड होणार होतं.

मालविकाला जेव्हा कळलं मम्मी आणि पप्पांची ती संदूक आता उघडली जाणार, तेव्हा ती खूश झाली. तिने सांगितलं ,”अरे समर, रविवारीच कशाला तू कधीही बोलाव. मलाही बघायचं आहे त्या संदुकीत असं कडीकुलपात ठेवण्यासारखं काय जडजवाहीर आहे. मी सुट्टी नसली तरी सुट्टी घेऊन येईन.”
मेघा आणि उल्हास शांत होते. खरं तर त्यांच्याकडे लपवण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांना वाटत होतं, आपल्याला ज्या गोष्टी अमूल्य वाटतात, त्या मुलांना वाटतीलच असं नाही. त्यामुळे त्यांनी त्या संदुकीला कुलूप लावलं होतं.

सगळ्यांच्या समोर संदूक उघडली. त्यातून जे निघालं ते बघितल्यावर समर आणि मालविका पोट धरून हसायला लागले.
“यासाठी तुम्ही कुलुप लावलंय?” समर आणि मालविका एकसाथ ओरडले.
त्या संदुकीत कागदांचे गठ्ठे होते. काही कागद मखमली कापडात ठेवले होते.
“पप्पा, आधी मला सांगा, अशा किती प्रॅापर्टी तुम्ही घेतल्यात? हे प्रॅापर्टीचेच पेपर आहेत ना? मग त्यात लपवण्यासारखं काय आहे?”असं बोलत समरने एक गठ्ठा हातात घेतला.
पण त्यातले कागद चाळताना त्याचा वासलेला आ बघून मालविकाने तो गठ्ठा आपल्या हातात घेतला.
ते कुठच्या प्रॅापर्टीचे वगैरे पेपर नव्हते. कसलीतरी हस्तलिखितं होती. काही देवनागरीत होती, काही इंग्लिशमध्ये, तर काही दुसऱ्या भाषेत होती.
“मम्मी, पप्पा काय आहे हे?”मालविकाला पडलेला प्रश्न समरनेच विचारून टाकला.
“अरे, तुमचं कसं सोशल मीडियावर फ्रेंड सर्कल असतं, तसं पूर्वी आमचे पेन फ्रेंड असायचे. त्यांच्याबद्दलची माहिती कधी जाहिरातीमधून किंवा रेडिओवर मिळायची. मग आम्ही एकमेकांना पत्र पाठवायचो. त्याला पेन फ्रेंड असं म्हटलं जायचं. मग ते आपल्या देशांतील किंवा दुसऱ्या देशांतीलसुद्धा असायचे. तोच पत्रव्यवहार आम्ही जपून ठेवलाय.” उल्हासनी सांगितलं.
“अय्या, मग हे मखमली कापडात काय आहे? पप्पांच्या मैत्रिणींची आणि आईच्या मित्राची पत्रं?” मालविकाने वात्रटपणे विचारलं.
मालविकाचा प्रश्न ऐकून उल्हासनी मेघाकडे बघितलं, ती छान लाजली होती.
“आयला, मम्मी लाजतेय म्हणजे तिच्या मित्राची पत्र असणार नक्कीच. मम्मी, तू या वयात पण काय सुरेख लाजतेयस. नाहीतर सिम्मी“ आता समर बोलला, पण आपण काय बोलून गेलो हे लक्षात आल्यावर त्याने जीभ चावली. उल्हासचं लक्ष मेघाकडे होतं आणि मालविकाला विक्कीची आठवण आली, त्यामुळे समर काय बोलून गेला हे कुणाच्याच लक्षात आलं नाही.
“हे बघा, वात्रटपणा करू नका. पण ही हस्तलिखित पत्रं आहेत. शिवाय तुम्ही हल्ली सेल्फी घेता, तशी आम्ही सेलिब्रिटींची सही घ्यायचो. कधीकधी एखादा खूश असेल तर संदेशही लिहायचे. तुम्हाला माहीत नाही, पण त्यात आपुलकी होती.” उल्हास शांतपणे बोलत होता.
“म्हणजे पप्पा, तुमच्या दोघांची प्रेमपत्रं नाहीत यांत?” मालविकाने विचारलं.
“अरे, आमचीसुद्धा पत्रं आहेत. पण ही बाकीचीसुद्धा खूप अनमोल आहेत. तुम्हाला याचं महत्त्व कळण्याइतपत समज आली की तुम्हाला आम्ही हे सगळं दाखवणार होतो.” मेघा म्हणाली.
“मेघा मुंबईमध्ये टेलिफोन एक्स्चेंजमध्ये कामाला होती आणि मी दिल्लीला एका इम्पोर्ट-एक्स्पोर्ट फर्ममध्ये. कामाच्या निमित्ताने फोनवर बोलताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग दोघांनी एकत्र येण्यासाठी हिने टेलिफोनमधली नोकरी सोडली आणि मी त्या फर्ममधली. मग मी बँकेत आणि हिने स्टेट गव्हर्नमेंटमघ्ये नोकरी स्वीकारली. पण टेलिफोनमधली नोकरी सोडल्यावर एकमेकांचा संपर्क तुटला. मग आम्ही रोज लांबलचक पत्र लिहायचो. तेव्हापासून आम्ही एकमेकांना काही सांगायचं असलं तर पत्रं लिहितो. त्यातली महत्त्वाची पत्रं यांत आहेत.”उल्हासनी सांगितलं.
“आयला,जबरदस्त प्रेमकहाणी आहे तुमची. आम्हाला नव्हतं माहीत यातलं काही.” समर म्हणाला.
“अरे, तुलाच काय, कुणालाच माहीत नाही आमची भेट कशी झाली. आम्ही सगळ्यांना भासवलं ॲरेंज मॅरेज आहे. नाहीतर आम्हाला परवानगी नसती मिळाली. आमचा अगदी रितसर कांदेपोह्याचा कार्यक्रम झाला होता. मी गाणं म्हणून दाखवलं आणि तुझी आजी खूश झाली.” मेघा हसत हसत म्हणाली.
“आणि म्हणून आम्ही हा पत्रव्यवहार असा संदुकीत बंद करून ठेवला.” उल्हास म्हणाला.
समर आणि मालविकाला वाटत होतं, आपणच आपलं प्रेमप्रकरण लपवून ठेवलंय, पण इकडे तर बेटेसे बाप सवाई होता.
“आणि समर, तुझं ते कॅटबरी प्रकरण मला माहित आहे.” उल्हासने सांगताच समर गोरामोरा झाला.
“पण तुम्ही दोघांनी हा पत्रव्यवहार आमच्या सगळ्यांपासून कसा काय लपवून ठेवलात? आम्ही तुम्हाला कधीच बघितलं नाही एकमेकांना पत्र देताना.” मालविका म्हणाली.
यावर मेघा लाजून आतल्या खोलीत जायला निघाली. ”मी जरा कॅाफीचं बघते” मेघा म्हणाली.
पण तिला समरने थांबवलं. ”मम्मी, तू थांब. तू आत जातेयस म्हणजे नक्कीच काहीतरी जबरदस्त स्टोरी असणार.”
“अरे समर, जाऊ दे तिला कॅाफी करायला. मी सांगतो तिने काय वेंधळेपणा केला होता त्याची गंमत.” उल्हास म्हणाला, पण त्याला मेघा डोळ्यानी खूण करत होती नको नको म्हणून.
“मी एकदा हिच्यासाठी साडी आणली आणि त्यात पत्र ठेवलं होतं. हिने ती साडी उघडून न बघता आजीला दिली घडी मोडायला. आणि आजीला ती चिठ्ठी मिळाली. मी घरी आलो, तर आजी नवीन साडी नेसून बसली होती आणि मला बघितल्यावर तोंडाला पदर लावून खुदूखुदू हसायला लागली. मला काहीच कळलं नाही. हिच्याकडे बघितलं तर ही खांदे उडवून आत गेली. आता कुणाला विचारणार माझ्या पत्राबद्दल ?आजी हसत होती. आजोबा मला बघितलं की पांडुरंग पांडुरंग म्हणत होते. हिलासुद्धा काही कळत नव्हतं काय चालू आहे. असं जवळजवळ तीन-चार दिवस झालं, मग शेवटी अण्णांनी आजीला सांगितलं देऊन टाक त्याचं पत्र .तेव्हा कुठे ते हसणे थांबलं. पण ही कितीतरी दिवस दोघांच्या समोर जायला टाळत होती.”
“म्हणजे पप्पा, आजोबांनी ते पत्र वाचलं होतं का?”मालविकानी विचारलं.
“नाही. नव्हतं वाचलं. पण आम्ही तुमच्या पिढी एव्हढे बिनधास्त नव्हतो.” उल्हासने मालविकाच्या डोक्यात टपली मारली.
“हाँ, तुम्ही काही मला वेंधळी म्हणताय. मला काय माहीत तुम्ही त्यात पत्र ठेवलं आहे ते. पण तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त गोंधळ घालून ठेवला होता. स्वत:चा मोजा अण्णांना द्याल हे मला कुठे माहीत होतं?” कॉफी देता देतां मेघा कृतककोपाने म्हणाली.
“मम्मी, नीट सांग काय ते. असं अर्धवट नको.” समर म्हणाला.
“अरे, मी यांचे ॲाफिसला जायचे कपडे, मोजे सगळे रात्रीच काढून ठेवायचे. त्या दिवशी अण्णांचे फिरायला जायचे मोजे ओले झाले. मग काय, यांनी कपाटातले मोजे द्यायचे तर मी ठेवलेले मोजे दिले. आळशीपणा नुसता. अण्णांनी मोजे घातले आणि त्यांना त्यात एक कागद सापडला. मग त्यांनी जोरात हाक मारली आणि विचारलं, उल्हास, कुठचा मोजा दिलायस तू मला? यात काहीतरी आहे. यांनी बघितलं तर एक कागद होता. अण्णांनी तो कागद यांच्या हातातून घेतला आणि मोठ्याने वाचला ‘आय लव्ह यू’ अरे हे काय आहे? उल्हास, तू तुझा मोजा दिलास का मला? आणि त्यांनी आजीला हाक मारली. कुठचेही कपडे हातात घेतलेस की तपासत जा. आणि ते हसत हसत फिरायला निघून गेले.” मेघा म्हणाली.
“पण आई, मग त्यानंतर तुमचा हा पत्रव्यवहार थांबला की नाही?” समर विचारत होता.
“नाही, आमचा पत्रव्यवहार अजून सुरळीत चालू आहे. फक्त आता तो सॉफ्ट कॉपीमध्ये असतो.” उल्हास हसत म्हणाला.
“ते सगळं ठीक आहे. पण आता तुमच्या पेन फ्रेंडबद्दल सांगा. खूपच इंटरेस्टिंग आहे सगळं. मी याच्यावर एक पिक्चर काढतो. पप्पा, तुम्ही फायनान्स कराल ना?” समर म्हणाला.
मेघाने त्याच्यापाठीत धपाटा घातला.
“अरे समर, हे असं थोडक्यात सांगून तुम्हाला काहीच कळणार नाही. मला हे पेन फ्रेंडबद्दल कसं, कुणाकडून आणि कधी कळलं हे फार इंटरेस्टिंग आहे.मी सांगेन तुम्हाला सगळं नंतर. आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा - यातल्या प्रत्येक कागदाला महत्त्व आहे. प्रत्येकाची स्वत:ची अशी ओळख आहे. त्यामुळे ते सर्व कागद अमूल्य आहेत. ही पत्रं अमूल्य आहेतच, तसंच मला स्वाक्षरी गोळा करायला आवडायचं. ती स्वाक्षरी घेतानाचा प्रसंगसुद्धा तितकाच इंटरेंस्टिंग आहे.” उल्हास म्हणाला.
“पप्पा, पण तुम्ही या स्वाक्षरी कुठे घ्यायचात? असंच रस्त्यावर कुणी भेटायचं का सहज?”
“नाही. तुला माहीतच आहे, मी नेहमी लेक्चर ऐकायला जातो किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाला जातो. तिकडे साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या घ्यायचो. मी क्वचितच नाटक-सिनेमावाल्यांची स्वाक्षरी घेतली. एकदा घेतली होती श्री राम नगरकर यांची. पण ते जोरात हसले आणि म्हणाले ‘या बेण्याला माझी सही पाहिजे आहे.’ मग त्यांनी मला सांगितलं, गड्या, नटांची कसली स्वाक्षरी घेतोस! आम्ही दुसऱ्यांनी लिहिलेली वाक्यं बोलतो, दिग्दर्शक सांगतो तसं करतो. मग तेव्हापासून मी साहित्यिकांचीच स्वाक्षरी घेतो. तेच सर्व अमूल्य कागद या गठ्ठ्यात आहेत.” उल्हास म्हणाला.
“समर, मालविका, यातला एक एक कागद महत्त्वाचा आहे. प्रत्येक कागदाच्या संदर्भात एक एक अमूल्य आठवण आहे. ही आमची आयुष्यभराची कमाई आहे. पण हे सगळं जतन करायला शिकवलं एडविनाने.”मेघा म्हणाली.
“आता ही एडविना कोण?” समर आणि मालविका एका सुरात ओरडले.
“एडविना मेरी लुईस, ब्रिटिश आहे ती. तुझ्या पप्पांची मैत्रीण.” मेघा म्हणाली.
पप्पांची मैत्रीण म्हटल्यावर समर आणि मालविकाचा आ वासला. उल्हासने दोघांच्या टपलीत मारली आणि सांगितलं, ”आ बंद करा. आणि का, माझी मैत्रीण असू शकत नाही?”
“पण पप्पा, तुमची मैत्रीण आणि तीसुद्धा ब्रिटिश आणि मम्मी एवढी शांतपणे सांगतेय. ये बात कुछ हजम नही हुई.” मालविकाने सरळ सरळ विचारलं.
“अगं, त्या एडविनामुळेच तर आम्ही एकत्र आलो. मग मी शांतपणेच बोलणार ना तिच्याबद्दल.” मेघा म्हणाली.
“मग पप्पा, तुम्ही सांगाच त्या एडविनाबद्दल आम्हा दोघांना.” समर म्हणाला.
“अरे तुम्हाला सांगायला आवडेल मला. पण ही सगळी डाउन मेमरि लेन जर्नी अशी सांगता नाही येणार. मी असं करतो, मी ते सगळं लिहून काढतो, मग तुम्ही ते वाचा. खूप मोठी स्टोरी आहे ती.” उल्हासने मुलांना सांगितलं.

एडविना मेरी लुईस हिची आठवण झाली की उल्हास खूश व्हायचा. आता तर काय, मुलं मोठी झाली होती. त्यामुळे उल्हास आणि मेघाच्या आयुष्याचा तो सुवर्णकाळ मुलांना कळायला काहीच हरकत नव्हती.
उल्हासने ठरवलं, आपण यांना एडविनाबद्दल सांगायला लागलो की मुलं आपल्याला मध्ये मध्ये ते जाऊ देत, पटापट सांगा वगैरे करत अडवत राहणार.. त्यापेक्षा आपण हे सगळं लिहून काढू या आणि मुलांना वाचायला देऊ या. म्हणजे आपल्यालाहीत्या गोड आठवणी परत जिवंत करता येतील.
“मेघा, मी जरा आलोच.” असं म्हणत उल्हासने पैशांचे पाकीट खिशात घातलं.
“अहो, कुठे निघालाय तुम्ही एवढ्या उन्हाचे? आता पोळ्या झाल्या की घेतेच वाढायला.” मेघा म्हणाली.
“अगं, एडविनाबद्दल मुलांना सांगायचं तर लॅपटॉप नको. मला फूलस्केप लागतील, ते घेऊन येतो पटकन. आणि एडविनाबद्दलचं ते हस्तलिखित आपल्या मालमत्तेत भरच टाकेल.”
उल्हास बोलत असताना मालविका तिकडे आली होती. तिनेहि उल्हासला सांगितलं, ”होय पप्पा, तुमचं बरोबर आहे. तुम्ही ते सगळं लिहून काढा, म्हणजे या बाकीच्या या सगळ्या कागदांबरोबरीने त्यालाहि महत्त्व येईल.”
उल्हासने आपला मोर्चा वजनावर फूलस्केप पेपर विकणाऱ्या दुकानाकडे वळवला आणि २०-२५ पेनहि घेतली.
कागद आणि पेन तर घरात आले, आता फक्त लिखाणाचा मुहूर्त करायचा होता. कॉम्प्युटर आल्यापासून लिहायची सवय मोडली होती. अक्षरही चांगलं जमलं पाहिजे, नाहीतर मुलं वाचायला कंटाळतील, म्हणून पहिले १०-१२ कागद अक्षराची चाचपणी करण्यासाठी वापरले.
शेवटी एकदाचा मुहूर्त मिळाला. लिखाणाला सुरुवात झाली.............

एडविना मेरी लुईस

आमचे अण्णा म्हणजे एक अजब रसायन होते. त्यांचे आम्हा मुलांशी एकदम खेळीमेळीचे संबंध होते. माझी १०वीची परीक्षा पार पडल्यावर मला त्यांनी सांगितलं, “आता तू कॉलेजला जाणार. तिथे मित्र-मैत्रिणींबरोबर मजा करताना मी दिलेला पॅाकेटमनी पुरणार नाही, तेव्हा सुट्टीत नुसती मजा करण्यापेक्षा पार्ट टाईम काम करून पैसे मिळवायचे.”
मलाहि गंमत वाटली. स्वत: कमावलेले पैसे... हा विचारच मला सुखावून गेला. पण मी जाहिराती बघायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं की १८ वर्षं पूर्ण झाल्याशिवाय नोकरी मिळणं कठीण आहे.
अण्णांना विचारलं, तर ते म्हणाले, ”मिळेल काहीतरी काम तुला. शोधत राहा. पेपर वाचत जा रोजचा.”
मग पेपर वाचत राहिलो. एक दिवस मला मिळू शकेल अशी नोकरीची जाहिरात बघितली.
मग अण्णांना विचारलं, ”मी बघू का जाऊन? पण माझ्याकडे तर फाईल वगैरे काहीच नाहीय.”
अण्णांनी एक फाईल माझ्या पुढ्यात टाकली. फाईलमध्ये माझे पहिलीपासूनचे सगळे रिझल्ट आणि स्पर्धा परीक्षेतली आणि क्रीडाक्षेत्रातली सगळी सर्टिफिकेट होती. फाईल तशी जाडजूड होती.
“ही घेऊन जा. त्यांना सांग, दहावीची परीक्षा दिली आहे. डिस्टिंक्शन तर सहज मिळेल. पण या जॅाबसाठी लागणारी जरुरी सर्टिफिकेट आहेत यांत. बघ मिळते का नोकरी. तुझ्या कॉन्फिडन्सची परीक्षा आहे असं समज.”
अण्णांनी असं सांगितल्यावर धीर आला. बघू या तर जाऊन, एक अनुभव तरी मिळेल.

जाहिरातीत सांगितलेल्या वेळेत दिलेल्या पत्त्यावर हजर झालो. ब्रिटिश एम्बसीची प्रशस्त बिल्डिंग. स्वच्छ परिसर. छानपैकी फूलझाडं, लॉन अगदी चित्रातल्यासारखं सगळं होतं. माझ्या बुटाची माती लागून फरशी घाण होईल, म्हणून मी जरा कानकोंडा झालो. मी तर धुवट पँट, शर्ट घातला होता. इस्त्री घरीच केली होती, त्यामुळे ती कडक नव्हती. शिवाय इथपर्यंत बसने प्रवास केल्यामुळे शर्टला डाग होतेच.
बाकीचे जे उमेदवार आले होते, ते अगदी टाय वगैरे लावून आले होते. कदाचित ब्रिटिश एम्बसीमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा, म्हणून चांगलीच काळजी घेतली होती. कपडे कडक इस्त्रीचे होते. नशीब, मी चप्पलऐवजी शूज घातले होते, पण ते शूज फॉर्मल नव्हते, तर साधे कॅनव्हासचे होते.
एक जण एम.ए. हिंदी होता. दुसरा हिस्टरीमध्ये पीएच.डी. करणार होता. सगळे वेल एज्युकेटेड होते. तरी मी तसाच चिकाटीने बसून राहिलो होतो.
माझा नंबर आला. मी दारावर टकटक करून मे आय कम इन् विचारून आत प्रवेश केला. आत एक गोरी मेम बसली होती. मला घाम फुटला, आता ही काय बोलणार ते आपल्याला कळेल का?
मला बघितल्यावर ती विचारात पडली. माझं नांव वगैरे विचारून झाल्यावर तिने मला माझं शिक्षण किती विचारलं. मी पण शांतपणे १०वीची परीक्षा दिलीय आणि रिझल्टची वाट बघतोय म्हणून सांगितलं.
“तू गरीब आहेस का? भारतात तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च आई/वडील करतात. मग तुला नोकरी कशाला पाहिजे?”
“माझ्या वडिलांनी सांगितलं, शिक्षणाचा खर्च मी करीन, पण तुझ्या मैत्रिणींसाठी करावा लागणाऱ्या खर्चासाठी तुला कमाई करावी लागेल. म्हणून मी नोकरी शोधतोय.” माझं वाक्य पूर्ण झाल्यावर ती जी हसायला लागली, ती पाच मिनिटं हसतच होती.
“पण तुला मैत्रीण आहे का?” मॅडमनी विचारलं.
“अजून तरी नाहीय. पण कधी तरी मिळेलच ना, त्यासाठी हे प्लॅनिंग आहे.”मी सांगितलं.
“बरं बरं, आता सांग तुला माहित आहे का हा जॅाब नक्की कसला आहे?”
“होय, एका मुलीला हिंदी भाषा शिकवायची आहे. आणि माझं सगळ्या भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. ग्रामर व्यवस्थित आलं की भाषा समजायला सोपी जाते.” मी एका दमात सांगितलं.
“पण कॅालेज सुरू झालं की तू कसं मॅनेज करणार?” मॅडमनी मला विचारलं.
“मी कॅामर्स घेणार आहे, त्यामुळे मी वेळ काढू शकतो. आणि वीक एंडला जास्त वेळ देऊ शकतो.”
“ठीक आहे. मी कळवते तुला काय ते.”
घरी आल्यावर अण्णांनी विचारलं, ”काय चिरंजीव, इंटरव्ह्यू कसा झाला?”
“माझा इंटरव्ह्यू चांगला झाला, पण माहीत नाही त्यांना काय वाटलं.” मी एकदम बिनधास्त होतो. मला काय जॉब मिळाला तरी आनंद आणि नाही मिळाला तरी आनंदच. अजून मला इंटरव्ह्यूचं टेन्शन घ्यायचं असतं वगैरे काही कळत नव्हतं.
थोड्या दिवसांनी माझ्या नावाने एक लिफाफा आला, मला पहिला जॅाब मिळाला होता. पगार होता पन्नास रुपये फक्त. आणि जॉब देणारी होती ’एडविना मेरी लुईस’. एडविना मॅडमच्या मुलीला हिंदी शिकवण्यासाठी माझी नेमणूक झाली होती.

माझ्या नोकरीचा पहिला दिवस. एडविना मॅडमनी माझ्याकडून काय शिकवणं अपेक्षित आहे ते सांगितलं. त्यांची मुलगी सेंट्रल स्कूलला जाते, तिला हिंदी शिकवायचं, शिवाय इतर विषयात तिला काही अडलं, तर ते समजावून सांगायचं.
माझी नोकरी सुरू झाली. माझी आणि एडविना मॅडमची भेट क्वचित व्हायची.बघता बघता दोन वर्ष झाली.
आता माझं बारावीचं वर्ष असल्यामुळे मलाही इकडे तिकडे बघायला वेळ नव्हता. मी एफवायला असताना एक दिवस मॅडमनी मला सांगितलं, त्यांची बदली झालीय. त्या आता जपानला जाणार होत्या. त्यांची मुलगी हॅास्टेलमध्ये राहून वर्ष पूर्ण करणार होती. त्यासाठी त्यांना माझी मदत पाहिजे होती.
“उल्हास, तू मला मदत करू शकशील. तू सोफीला आठवड्यातून एकदा भेटायचं आणि मला पत्र लिहून कळवायचं. सोफी लहान आहे तिला नीट काही सांगता येणार नाही, पण तू मला तिच्या प्रोग्रेसबद्दल नीट सांगू शकशील.” मॅडमनी मला सांगितलं. पण या कामासाठी मी माझ्या आईवडिलांची परवानगी घ्यावी, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत.
अण्णानी जरा आढेवेढे घेतले. एका बारा वर्षाच्या मुलीची जबाबदारी घेण्यासारखंच ते होतं. शेवटी एडविना येऊन अण्णांना भेटली. तिने अण्णांना समजावलं, ”सोफीची काळजी तिचे गार्डियन घेतीलच. पण तिच्याबद्दलची माहिती मिळावी यासाठी मला कुणीतरी प्रामाणिक व्यक्ती पाहिजे, जी न चुकता मला पत्र पाठवेल. आणि मला त्या कामासाठी उल्हास अगदी योग्य वाटतोय. त्याचं भाषेवरचं प्रभुत्व आणि मुद्देसूद मांडणी यामुळे मी त्याला ही विनंती करतेय. आणि फक्त चार महिन्यांचाच प्रश्न आहे.”
अण्णा आणि एडविनाची ती पहिलीच भेट होती. तीन वर्षं मी सोफीला शिकवत होतो, पण कधी त्यांच्या भेटीचा योग आला नव्हता. शेवटी अण्णांनी मला पत्र लिहायची परवानगी दिली.

मी दर शनिवारी सोफीला आठवडा कसा गेला विचारायचो. रविवारी सगळं सविस्तर लिहायचं आणि सोमवारी सकाळी ते पत्र जाऊन पोस्टात टाकायचं, असं चालू होतं. सोफीबद्दल लिहिता लिहिता मी इतरही काही लिहायचो. ते इतरहि एडविनाला आवडायला लागलं. चार महिन्यांनी सोफी आपल्या आईकडे जपानला गेली. ती पोहोचल्याचं पत्र आलं. पण ते शेवटचं पत्र नव्हतं. नंतर पण दर आठवड्याला माझा आणि एडविनाचा पत्रव्यवहार चालू होता. तिने मला सांगितलं की आता आपण एम्प्लॉयर-एम्प्लॉयी नाही, तर पेन फ्रेंड म्हणून एकमेकांना पत्र पाठवू या. तिच्या सेक्रेटरीलाही पेन फ्रेंड पाहिजे होता. आणि तिची सेक्रेटरी होती जॅपनीज.
तर अशा तऱ्हेने हा पेन फ्रेंडचा प्रवास सुरू झाला. एडविनामुळे मला जॅपनीज, स्वीडिश, अमेरिकन असे वेगवेगळ्या देशांतील पेन फ्रेंड मिळाले. काही पुरुष, तर काही स्त्रिया.
पण एडविनाचा आमच्या दोघांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला?
आज आम्ही दोघं एकत्र आहोत ते तिच्याचमुळे.
मी ग्रॅज्युएट व्हायच्याआधीच नोकरी शोधत होतो. शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली आणि मला एका इंम्पोर्ट-एक्स्पोर्ट फर्ममधून इंटरव्ह्यूसाठी बोलावलं. मी फाईल तयार केली. एडविनाने मला सोफीला शिकवल्याबद्दल एक्स्पीरिअन्स सर्टिफिकेट आणि कॅरॅक्टर सर्टिफिकेट दिलम होतं, तेसुद्धा फाईलमध्ये होतं.
इंटरव्ह्यू तर एकदम जबरदस्त होता.
समोर दोन जण होते. आळीपाळीने प्रश्न विचारत होते.
“या तुमच्या शिकवणीच्या सर्टिफिकेटवरून तर वाटतंय तुम्ही टीचर व्हायला पाहिजे. मग तुम्ही इकडे का आलाय?”
“मी स्टूडंट असताना ती शिकवणी घेत होतो. पण ग्रॅज्युएशननंतर शिकण्यासाठी इंम्पोर्ट-एक्स्पोर्ट हा विषय चांगला वाटला.” मी सांगितलं.
“म्हणजे ट्यूशन तुम्ही तुमच्या फीसाठी घेत होतात का?”
“नाही. माझे वडील माझी फी भरत होते. पण त्यांनी सांगितलं, मैत्रिणींसाठी खर्च करायला माझे पैसे मला कमवावे लागतील.” मी शांतपणे सांगितलं.
“मग किती मैत्रिणी आहेत तुम्हाला?”
“एकही नाही. पण ते सगळे पैसे मी वडिलांच्या ॲडव्हाइसप्रमाणे गुंतवले आहेत. मैत्रीण मिळाली की भरपूर खर्च करणार.” मीही न घाबरतां उत्तरं देत होतो.
“बरं. पण मग मैत्रिणी मिळाल्या की कामावर परिणाम तर होणार नाही?”
“नाही. माझ्या करिअरच्या आड येणाऱ्या मुलीबरोबर मी मैत्री करणार नाही.” मी जोशात सांगितलं.
त्यांनी मला सांगितलं, ”ठीक आहे. या तुम्ही आता. आम्ही कळवतो तुम्हाला.”
घरी आल्यावर अण्णांना सगळा वृत्तान्त सांगितला, तेव्हा त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.
पण एक महिन्याने माझ्या नावाने एक लिफाफा आला. माझं सिलेक्शन झालं होतं. पण मी इंटरव्ह्यू दिलेल्या पोस्टवर नाही, तर एक ट्रेनी म्हणून तीन महिन्यांसाठी माझी नेमणूक झाली होती. पण तीन महिन्यानंतर मला परमनंट केलं आणि मी लवकरच मॅनेजरच्या पोस्टपर्यंत मजल मारली.
तेव्हा बाहेरगावी किंवा दुसऱ्या देशात सहज फोन करता येत नसे. तो ॲापरेटरकडे बुक करावा लागायचा. आणि एक्स्पोर्ट-इम्पोर्ट म्हणजे दुसऱ्या देशात फोन मलाच करावे लागायचे. त्या दिवशी माझी सेक्रेटरी आली नव्हती. मग मी एक्स्चेंजमध्ये कॅाल बुकिंगसाठी फोन लावला आणि एक मंजूळ आवाज कानावर पडला. तो आवाज ऐकताच माझ्या डोक्यात घंटी वाजली आणि हृदयात व्हायोलिन. मी तो आवाज विसरू शकत नव्हतो. मग मी रोज वेगवेगळ्या वेळी बुकिंगसाठी फोन करायचो आणि नंतर बुकिंग कॅन्सल करायचो. पण माझ्या कानावर तो आवाज पडत नव्हता. मधून मधून एडविना विचारायची’ काय मैत्रीण मिळाली का?’ पण माझं आपलं मिळेल मिळेल. आता प्रश्न होता तो त्या गोड आवाजाच्या मुलीच्या भेटीचा. शेवटी तीन महिन्यांनी परत एकदा तो आवाज कानावर पडला. मी एवढा खूष झालो की चुकून फोन डिस्कनेक्टच करणार होतो.पण आवरलं स्वत:ला.आणि विचारलं,”मॅडम तुमचं नांव कळेल का?”
समोरून काहीच आवाज नाही मला वाटलं फोन कट् झाला.पण एक आवाज आला,”हॅलो सर,तुम्हाला आमच्या ॲापरेटरचं नांव कशासाठी पाहिजे आहे?”
“काही नाही मॅडम,मी एक्सपोर्ट हाऊसमधून बोलतोय आणि आम्हाला नेहमी इंटरनॅशनल कॅाल करावे लागतात.आणि बहुतेक वेळा आम्हाला पटकन कॅाल लावून मिळतो.म्हणून आम्ही ॲापरेटरची नावं लिहून ठेवणार आहोत. मग सगळ्यांना थँक्यू नोट पाठवणार.”मी घाई घाईत जे सुचलं ते सांगितलं.
त्या बाईंनी फोन परत त्या मंजूळ आवाजाच्या बाईकडे/ मुलीकडे दिला.
“हं घ्या माझं नाव लिहून- ढमाली पंजाबराव वाघ.”
“ओके. मिस् का मिसेस लिहायचं नोटवर?” माझ्या आगाऊपणाला फोन कटचं उत्तर मिळालं. मला जरा हायसं वाटलं. ज्याअर्थी फोन कट झाला, त्याअर्थी नक्कीच मिस् असणार. घरी येताना मी मिठाई घेऊन आलो. अण्णा आणि आईला जरा आश्चर्य वाटलं.
“ चिरंजीव, मैत्रिणीचा होकार मिळाला वाटतं?”अण्णांनी विचारलं.
“नाही आज नाव कळलंय. ढमाली वाघ.” माझ्या उत्तरावर आई आणि अण्णांना हसू आवरेना.
“बरं बरं, आपण लग्नानंतर छान सुरेख नाव ठेवू या.” आई म्हणाली.
मी थोड्या दिवसांनी परत फोन लावून ढमाली आहे का विचारलं. कुणीतरी हसत हसत फोन डिस्कनेक्ट केला.
मग मी ठरवलं, एडविनाला लिहितो तसं पत्र लिहायचं. मग ढमाली वाघ असं नाव लिहून इंटरनॅशनल बुकिंग सेक्शन असा नाव-पत्ता लिहिला आणि दिलं पाठवून. त्यात माझ्याबद्दल पूर्ण माहिती लिहिली. पत्राला काहीच रिस्पॅान्स नाही. पण मी चिकाटी सोडली नाही. माझ्याबद्दल सांगून झालं होतं. मग मी एडविना, सोफी, स्यू की, ॲलन जॅक, डेव्हिड ज्यो या सगळ्या माझ्या पेन फ्रेंड्सबद्दल लिहायला लागलो. कसं कोण जाणे, पण आठवड्याला एक पत्र जात असताना शेवटी तीन महिन्यांनी मला उत्तर आलं.
एडविना अध्याय चालूच होता, पण आता सुरू झाला माया अध्याय.
होय, त्या गोड आवाजाच्या मुलीचं नांव होतं माया जोशी.
मग सुरू झाला एक नवीन सिलसिला..

माया जोशी

माया जोशी, तिला भेटू शकत नव्हतो, कारण दोघांमध्ये ११०० कि.मी. अंतर होतं. मी दिल्लीला होतो आणि माया मुंबईला.
आता आमचा पत्रव्यवहार जवळजवळ रोज एक पत्र असा होत होता. एकमेकांना पत्र लिहिल्याशिवाय करमत नव्हतं.
आता मलाच काहीतरी मार्ग काढायला लागणार होता. पण अजूनही दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली, आणाभाका का काय त्या दिल्या नव्हत्या. मध्ये मध्ये आई विचारायची, ”उल्हास, त्या ढमाली प्रकरणात काही प्रगती आहे का? मुली बघाव्या म्हणत होतो आम्ही. तिकडे मुंबई-पुण्याकडचीच बघायला लागणार.”
पण मी बघू या बघू या म्हणून वेळ मारून नेत होतो.
पण आता माया जोशीला विचारायलाच पाहिजे या विचाराने मुंबईचं तिकीट काढलं आणि थेट मुंबईला धडकलो.
आता खरी प्रेमाची परीक्षा सुरू होणार होती.
माया जोशी..
आता सुरू झाला माया जोशी अध्याय..

मी मुंबईला येऊन थडकलो खरा, पण एक अडचण होती. दोघांनी एकमेकांना ओळखायचं कसं? त्या वेळी फोटो वगैरे पाठवायचा प्रश्न नव्हता. माया मला पेन फ्रेंड समजत होती. तिच्या मनात माझ्यासाठी प्रेम आहे का, माहीत नव्हतं. ते माहित करून घेण्यासाठी एकमेकांना भेटायचं मीच ठरवलं होतं.
मी तिच्या ऑफिस बिल्डिंगपाशी आलो आणि सिक्युरिटीला तिचं नाव सांगून बोलवायला सांगितलं. ती तिच्या मैत्रिणीबरोबर आली. यातली नेमकी माया कुठची, त्याचा काहीच अंदाज येईना. पण बोलल्यावर आवाजावरून ओळखता येईल, म्हणून मी फक्त माझं नाव सांगितलं आणि दोघींच्या चेहऱ्यावरचे भाव शोधत राहिलो. मायाला वाटलं नव्हतं मी असा अचानक तिच्यासमोर येऊन उभा ठाकेन.
“माया, तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकाल का? मी दोन दिवसांसाठी आलोय.” मी दोघींच्या चेहऱ्याकडे बघत विचारलं. दोघी एकमेकींकडे बघत होत्या. शेवटी मायाच्या मैत्रिणीला माझी दया आली.
“माया, तू हाफ डे घे आणि उद्याची सी.एल. टाक.” मग माझ्याकडे वळून तिने स्वत:ची ओळख करून दिली.
“नमस्कार, मी रेखा. मायाची मैत्रीण. कोण आलंय जरा काळजी वाटली, म्हणून मी सोबत आले. तुम्ही चहा घेणार का? माया १ वाजता येईल हाफ डे घेऊन. तोपर्यंत तुम्ही तुमची कामं उरकून घ्या.”
“नमस्कार, मी उल्हास महाशब्दे, दिल्लीला असतो. कामासाठी मुंबईला आलो होतो, म्हटल यांना भेटून बघू या, यांना वेळ आहे का मला मुंबई दाखवायला.” मी भरभर बोलत होतो.
त्या बाईंनी ओळखलं की मी जरा नर्व्हस आहे. त्या परत गेल्या. मीही मायाचा निरोप घेऊन निघालो, पण कुठे फिरायचं किंवा कुठे थांबायचं कळत नव्हतं. अजून दोन तास काढायचे होते. मायाबरोबर चहा घ्यायचा, म्हणून मी सकाळपासून चहासुद्धा घेतला नव्हता, म्हणून हॉटेल शोधत होतो. मग कुणी तरी सांगितलं - जवळच हाय कोर्ट आहे, त्याच्या कँटीनमध्ये जा.
चहा घेता घेता विचार करत होतो.. आपलं काय होईल? माझी उंची सहा फूट दोन इंच आणि माया असेल जेमतेम चार फूट दहा/अकरा इंच. मी गोरापान, ती सावळी पण नाकीडोळी नीटस. मी तसा अजागळच. पण माया टापटिप दिसत होती. हलकीशी लिपस्टिक लावली होती. मॅचिंग कूंकू, बांगड्या, एका हातात नाजूकसं घड्याळ. मला हसू आलं. त्या एवढ्या कमी वेळात मी काय काय बघितलं होतं आणि नोंद घेतली होती. मग मनात आलं - मायानेसुद्धा आपलं निरीक्षण केलं असेल ना? बापरे, मग काय प्रतिक्रिया असेल तिची? नवरा म्हणून चालेल का आपला पेन फ्रेंड म्हणूनच राहू या म्हणेल.. विचाराने मला घाम फुटला. पंख्याखाली बसूनहि घाम फुटलेला बघून वेटरने विचारलं, “साहेब काही हवंय का?”
“नको काही नको. बील किती झालं माझं?”
“साहेब, तुम्ही काउंटरवर जा, मी सांगतो.”
“निळा शर्ट तीन रुपये.” वेटर जोरात ओरडला आणि त्याने खांद्यावरचा टॉवेल झटकला.
मी बाहेर पडलो आणि गेटवर उभा राहून माणसं बघत राहिलो. सगळी अपटूडेट कपडे घातलेली, हातात ॲटॅची घेतलेली होती, ते वकील होते आणि साध्या कपड्यात अशील होते.
एकदाचा एक वाजला. माया ऑफिसमघून बाहेर पडली. लंच टाईम असल्यामुळे सर्व रेस्टॅारंटमध्ये गर्दी असणार, म्हणून मग सीटीओजवळचा फेमस वडापाव खाल्ला आणि टॅक्सी करून ब्रेबॅार्न स्टेडियमजवळचं के रुस्तुमचं कॅाफी आइसक्रीम खाऊन समुद्रावर जाऊन बसलो. के रुस्तुमचं कॉफी आइसक्रीमही मायानेच सुचवलं होतं.
खाली कट्ट्याचा चटका आणि वरती तळपता सूर्य. व्वा! काय पण माहोल होता. ते ऊन जाणवलंच नाही.

तसेच गप्पा मारत बसून राहिलो. रात्री ट्रेनमध्ये बसून लिहिलेलं पत्र मायाला दिलं. त्या पत्रातच मी तिला लग्नाबद्दल विचारलं होतं. खरं म्हणजे पत्र लिहायची सवय लागल्यापासून काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर ते लिहून दिलं तर बरं पडतं, हे माझ्या लक्षात आलं होतं.
दुपार सरल्यावर मायाने मला सांगितलं, ”उल्हास, मला नेहमीची ट्रेन पकडली पाहिजे. माझे डॅडी असतात त्याच ट्रेनमध्ये. आपण उद्या सकाळी भेटू परत. माझी ट्रेन सकाळी ९.१५ला येते. तुम्ही स्टेशनजवळ येऊ नका. कुणी बघितलं तर प्रॅाब्लेम होईल.”
“बरं. मी सिग्नलजवळ थांबेन. तुला सहज दिसेल अशा ठिकाणी. कुठे जायचं ते तू ठरव. मला मुंबईबद्दल फारसं माहित नाही.” मी तिला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी भेटल्यावर ती पुढे चालत होती आणि एका बस स्टॅापवर उभी राहिली. आम्ही बसमध्ये बसून सिद्धिविनायक मंदिराजवळ उतरलो.
“तुमच्या पत्रातल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, म्हणून मी तुम्हाला इकडे आणलंय.” मायाने मला बसमधून उतरल्यावर सांगितलं.
माझ्या हृदयाची धडधड आता मला स्पष्ट ऐकू येत होती.
मायाने मला देवळात होकार दिला, पण तिच्या म्हणण्याप्रमाणे खूप अडचणी होत्या. त्या अडचणींवर मी मार्ग शोधावा अशी तिची इच्छा होती.
तिच्या वडिलांची इच्छा होती की जावई बँकेत नोकरी करणारा हवा. त्याचं स्वत:चं घर हवं आणि एकुलता एक नको. या सगळ्यात फक्त एकच जमेची बाजू होती - मला दोन भावंडं होती. पण बँकेतली नोकरी, ती मिळवावी लागणार होती. आणि घर ते घेता आलं असतं, पण त्यांना मुलीला मुंबईच्या बाहेर पाठवायचं नव्हतं - म्हणजे मुंबईत घर घ्यायचं. मी फार काही बोललो नाही. माझ्याहि ट्रेनची वेळ झाली होती. मग एकमेकांचा निरोप घेतला. आता सर्व मार्गी लागेपर्यंत पत्रांचाच आधार होता. स्टुडिओत जाऊन फोटो काढून घ्यावा असं मनात आलं होतं, पण मन आवरलं. फोटोमुळे सिक्रेट उघड व्हायची शक्यता होती.
दिल्लीला पोहोचल्यावर आईने विचारलं, ”काम झालं ना तुझं? मग एव्हढा टेन्शनमध्ये का दिसतोयस?”
“काही नाही गं. माझी कदाचित मुंबईत ट्रान्स्फर होईल, त्याचंच जरा टेन्शन आलंय.” मी तिला जवळजवळ सगळं सांगितलं.
“अरे, त्यात काय एवढं, मुंबई छानच आहे. मला तर दिल्लीपेक्षा मुंबईच आवडते. होईल सगळं व्यवस्थित.” आईने मला आश्वस्त केलं.

मी ट्रेनमध्येच एडविनाला सगळं सविस्तर पत्र लिहिलं होतं. मैत्रीण मिळालीय, पण पुढची वाट कठीण आहे.
एडविनाचा एक पेन फ्रेंड स्टंडर्ड चार्टर बँकेत होता मुंबईत. तिने त्याला माझा पत्ता दिला. त्याचम पत्र आलं, 'तू वॅाक् ईन् इंटरव्ह्यूला ये. पण पोस्ट मोठी नाहीय. ट्रेनी टेलर म्हणजे ट्रेनी कॅशियरसाठी लोक घेतात आमच्याकडे.'
मी परत मुंबई गाठली. या वेळी इंटरव्ह्यू सिरियसली दिला. त्यांनी सांगितलं, टेंपररी पोस्ट आहे. मी म्हटलं, विचार करतो. मग बराच विचार केला आणि ठरवलं - मुंबईत धडकू या, पुढे बघू. दुसरी नोकरीहि शोधत राहू या. माझी आणि मायाची प्रत्यक्ष भेट होऊन आता सात-आठ महिने झाले होते. त्यानंतर दोघांच्याही पत्रात लग्नाचा विषय नव्हता आणि मीही बँकेच्या इंटरव्ह्यूबद्दल काही बोललो नव्हतो. इंटरव्ह्यूच्या दिवशी मी तिला भेटलो नाही, पण तिच्या ऑफिसच्या बाहेर थांबलो होतो. ऑफिस सुटताना नजरेस पडेल म्हणून. पण ती दिसली नाही. मला वाटलं, कदाचित लवकर गेली असेल. मी तिला इंटरव्ह्यूबद्दल सांगितलं नव्हतं. खरं तर मी ठरवलं होतं, बँकेत इंटर्नशिप संपून परमनंट झालो तरच तिला सांगायचं की मी मुंबईत आलोय.
इंटर्नशिप सहा महिने लांबली. सहा महिन्यांनी मला त्यांनी एम्प्लॉयीचा दर्जा दिला. मी टेलरच्या केबिनमधून बाहेर आलो. तशी पोस्ट क्लार्कचीच होती, पण कॅशची जोखीम नव्हती. आता मी बँकेच्या परिक्षा देऊ शकलो असतो.

मी रोज विदेश संचार निगमच्या बिल्डिंगखाली उभा राहून मायाला बघायचा प्रयत्न करायचो, पण ती नजरेस पडत नव्हती. माझ्या प्रपोजलला उत्तर दिल्यानंतर आमच्यात लग्नाबद्दल बोलणं झालं नव्हतं. तिने सांगितल्याप्रमाणे जर तिच्या वडिलांच्या अटी मी पूर्ण केल्या, तर ती लग्नाला तयार होती.
शेवटी मी तिला पत्रातून कळवलं - मी विदेश संचार निगमच्या समोर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत कामाला आहे. तिचं जे उत्तर आलं, ते वाचल्यावर मी डोक्याला हात लावला. तिने तो टेलिफोन ॲापरेटरचा जॅाब सोडला होता. पण मी तर तिला ऑफिसच्या पत्त्यावर पत्र पाठवत होतो, मग ती पत्र तिला कशी मिळत होती?
माया जोशी माझ्यापेक्षा हुशार निघाली. तिने पोस्टमनला पटवून ठेवलम होतं आणि तो ती पत्रं तिला नवीन ऑफिसच्या पत्त्यावर पाठवत होता. हे सगळं यासाठी - दिल्लीच्या लोकांबद्दलचा असलेला गैरसमज.

तिची मैत्रीण रेखा, तिने तिला सांगितलं की "अगं, तो दिल्लीवाला इकडे येऊन थडकलाय. त्याला तू नोकरी बदलतेयस ते सांगू नकोस. उगाच कुणाला कळलं आणि त्याने राडा केला, तर तुझ्या लग्नाच्या वेळी प्रॅाब्लेम होईल." म्हणून तिने मला अंधारात ठेवलं होतं. मी रेखाला गाठून मायाचा पत्ता घेतला. पत्ता म्हणजे ऑफिसचा पत्ता.

खरं म्हणजे मला मायाच्या घरचा पत्ता पाहिजे होता. मी तिच्या घरी जाऊन तिला मागणी घालणार होतो.
इकडे मला आमच्या बॅंकेतल्या एका वयस्कर शिपायची मदत झाली..
सावंतना सगळे मामा म्हणायचे. तर मामांच्या लक्षात आलं की मी जरा टेन्शनमध्ये आहे. त्यांनी विचारलं, तेव्हा मी सांगितले - "मामा तुमच्या ओळखीचं कुणी आहे का सचिवालयात?”
“काय मुलीची माहिती काढायची आहे वाटतं?” मामांनी सरळ विषयाला हात घातला.
“होय मामा, आईच्या मैत्रिणीची मुलगी आहे. पण आईला तिचा मुंबईचा पत्ता माहित नाही.” मी असं म्हटल्यावर मामा म्हणाले, ”आहेत आमचे गाववाले सचिवालयात. तुम्ही मुलीचं नाव आणि ती कशी दिसते ते सांगा. मी चौकशी करून सांगतो.”
मी मामांना मायाचं पूर्ण नाव आणि वर्णन दिलं. पण पंधरा-वीस दिवस काहीच कळलं. पण एक दिवस सकाळी बघितलं तर एक चिठ्ठी माझी वाट बघत होती. तो दिवस होता मंगळवारचा. सिद्धिविनायक पावला होता. मी लगेच लंच टाईममध्ये मायाच्या वडिलांना पत्र लिहिलं आणि मायाला मागणी घातली. पण मी मागणी घातल्याचं पत्र पाठवलंय हे मायाला अजिबात सांगितलं नाही. पंधरा दिवसांनी तिचं पत्र आलं, त्यात तिने मला भेटायचं आहे असं कळवलं.
“तुम्हाला माझ्या घरचा पत्ता कसा मिळाला? खरं म्हणजे रेखाने सांगितल्याप्रमाणे मी नंतर तुमच्याबरोबर पत्र व्यवहार करायलाच नको होता.” भेटल्या भेटल्या तिचं पहिलं वाक्य हेच होतं.
“अहो, पण मी चुकीचं काय केलंय? तुमच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे मुंबईत नोकरी शोधली, तीसुद्धा बँकेत. एक छोटंसं ५०० फुटांचं घर बुक केलंय, ते वर्षभरात मिळेलच. मी कुठे फसवलंय तुम्हाला? मी रितसर मागणी घातलीय. माझ्याबरोबर पळून यायला नाही सांगत आहे.” एवढं बोलून मी तिकडून तरातरा निघून गेलो. हॉटेलचं बील तिला भरावं लागेल हा विचारसुद्धा डोक्यात आला नाही. बाहेर पडताना मनाशी पक्की गाठ मांडली - इथून पुढे माया जोशी हा अध्याय संपला. पत्रव्यवहारहि करायचा नाही.
मी पत्रं पाठवायचं बंद केलं, पण मायाचं पत्र आलं.
‘एक दिवस घरी आले तर घरातलं वातवरण तंग होतं. घरात मोकळं वातावरण असलं तरी काही बाबतीत मोकळीक नाहीय. डॅडींना कळत नाहीय तुम्हाला माझ्याबद्दल एवढी माहिती कशी. त्यांच्या उलटतपासणीमुळे मी घाबरले आणि तुम्हाला जाब विचारला. मला क्षमा करा.’
मी पत्राला काहीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी एक दिवस ती बॅंकेत हजर झाली.
“तुम्ही इकडे कशाला आला आहात? मी दिल्लीचा भामटा आहे. इतकी वर्षं आपला पत्रव्यवहार चालू आहे, पण मी कधी गैरफायदा घेतलाय का तुमचा? प्लीज तुम्ही निघून जा इथून आणि परत भेटायचा प्रयत्न करू नका मला.” मी जरा रागातच बोललो. माया न बोलता निघून गेली.
एक दिवस एक गृहस्थ मला भेटायला आले. ते माया जोशीचे वडील होते. आता काय करावं असा विचार करत होतो, पण त्यांना व्यवस्थित जी माहिती पाहिजे होती ती दिली. त्यांनी विचारलं,
“मुलगी बघायचा कार्यक्रम कधी करायचा?”
“माझे आई-वडील मुलगी बघायला मुंबईला येऊ शकणार नाहीत.” मी जरा टाळायचा प्रयत्न केला.
“ठीक आहे. मग आमच्या प्रथेप्रमाणे आम्ही येतो मुलगी घेऊन दाखवायला. तुमचंही तिकीट मीच काढतो.” जोशी काका म्हणाले.
“पण काका, मला सुट्टी मिळेल - न मिळेल..“ मी जरा भाव खाण्याच्या मूडमध्येच होतो.
“अहो महाशब्दे, तुमचं पत्र येऊन खूप दिवस झालेत. मला माहित आहे. पण एका मुलीच्या बापाला समजून घ्या. मी तुमची माहिती काढत होतो. दिल्लीतली ओळख निघायला जरा वेळ लागला. शेवटी तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती मिळाली. मी बघतो तिकीटाचं. तुम्हाला सुट्टी नाही मिळाली तर कॅन्सल करू.” ते बोलत असताना त्यांचा सच्चेपणा जाणवत होता. मी नुसती मान डोलावली.
शेवटी माया, तिचे मम्मी-डॅडी आणि मी एक फर्स्ट क्लास कूपेतून निघालो. थोड्या गप्पा झाल्यावर मी माझा आवडता उद्योग सुरू केला. एडविनाला ही डेव्हलपमेंट कळवायची राहून गेली. माया नजरेने गयावया करत होती, पण मी दुर्लक्ष करत होतो.

मुलगी पसंत पडली आणि घरच्यांनी साखरपुडा उरकायचा ठरवला. लग्न मुहूर्त काढून करायचं. मी आई, अण्णांना सांगितलम होतं ऑफिसमधल्या एका कलिगने स्थळ सुचवलं होतं. मायाच्या मम्मी-डॅडींनी सांगितलं मी पत्र पाठवून मागणी घातलीय. अण्णांच्या लक्षात आलं, काहीतरी गडबड आहे.. पण मुलगी आणि घरचे लोक आवडल्यामुळे कुणी जास्त खोलात गेलं नाही. साखरपुडा लगेच झाला, पण लग्नाचा मुहूर्त सहा महिन्यानंतरचा होता. आम्ही भेटत कमी होतो, पण पत्र जास्त लिहीत होतो. बाकीचे पेन फ्रेंडही विचारत होते पत्र का येत नाहीयत. सगळ्यांना लग्नाची पत्रिका पाठवली. सगळे खूश झाले.

एडविना लग्नाला आली नाही, पण तिने ब्रिटिश एम्बसीमधून विक्रीला काढलेली लाकडी संदूक भेट म्हणून पाठवली. ती संदूक एक फार जुनी अँटिक संदूक होती. तिच्यातच आम्ही आमची जमा केलेली महत्त्वाची पत्रं ठेवली.
तुम्हाला वाटेल आता लग्न झालं, मग कसला पत्रव्यवहार होणार. पण आमचा पत्रव्यवहार कधी थांबलाच नाही.
माया जोशीची मेघा उल्हास महाशब्दे झाली. आई म्हणाली, "सगळं मागे टाकून सासरी कोरी पाटी घेऊन यायचं", म्हणून माया जोशीची झाली मेघा महाशब्दे आणि सुरू झाला..

मेघा महाशब्दे अध्याय..

माझं आणि मायाचं लग्न सुरळीत पार पडलं. कुणालाही कळलं नव्हतं आम्ही जवळजवळ पाच वर्षं एकमेकांना पत्र पाठवत होतो. लग्नाला आलेले पाहुणे गेले आणि घर निवांत झालं होतं. अचानक आम्ही जेवायला बसलो असताना आईने अचानक विचारलं, ”अरे उल्हास, सहज आठवलं.. आता त्या ढमालीचं पुढे काय झालं ते तू सांगितलंस नाहीस. ती लग्नाला आली होती का?”
ढमाली नाव ऐकल्यावर मेघाला ठसका लागला. मेघाला ठसका लागलेला बघून अण्णा आईला म्हणाले, ”तुला कळतच नाही केव्हा काय बोलायचं.”
पण मेघा रुसून बसली आणि तिचा रुसवा काढताना माझ्या नाकी नऊ आले. पाच वर्षं पत्रव्यवहार केला, पण एकमेकांचा स्वभाव कळलाच नाही. मी विचारी आणि माया शीघ्रकोपी. आमच्या दोघांच्या आवडीनिवडीसुद्धा खूपच वेगळ्या होत्या. खाण्यपिण्याच्या सवयीही एकदम विरुद्ध. कसं होणार होतं कुणास ठाऊक. आमची भांडणं, वादावादी सगळं पत्रातूनच व्हायचं. सगळ्यांना वाटायचं, किती आदर्श जोडपं आहे.. कधी वादावादी नाही, आदळआपट नाही.
पुष्कळ वेळा मी शांत असायचो, पण मेघा मात्र लगेच चिडायची. खरं काय ते कळल्यावर मग 'आय लव्ह तू'च्या चिठ्या मिळायच्या. हे नेहमीचंच झालं होतं. कधीकधी तर कोशिंबीरऐवजी सॅलड असायचं. सॅलड बघितलं की अण्णा सांगायचे, ”उल्हास, तू आधी सॅलड घे. मग मला दे.”
अण्णांनी एक-दोन वेळा सॅलड डेकोरेशन बघितलं होतं. त्यातही 'आय लव्ह यू'चं कार्वींग असायचं. नशीब, त्यांना अजून हे कळलं नव्हतं, हे सर्व उगीचच रागावल्यावर केलेली सारवासारव आहे. मेघाने जेवण केलं असेल त्या दिवशी मी अर्धपोटीच असायचो. मला सवय होती मस्त तूप किंवा लोणी लावलेले गलेलठ्ठ पराठे खायची आणि बाईसाहेब बनवायच्या त्यांच्यासारखे नाजूक नाजूक फुलके, तेही कोरडे. ना लोणी, ना तेल. मग आई काहीतरी लाडू वगैरे द्यायची. तरी पोटभरीची जाणीव व्हायची नाही. मग अण्णांनी रोज ब्रेड आणायला सुरुवात केली. इतका पत्रव्यवहार केला, पण खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल बोलणं झालं नव्हतं. मग आईने मेघाला हळूहळू पराठे करायला शिकवलं. भाज्यांचंही तेच. तिकडे दिल्लीला मिळणाऱ्या भाज्या वेगळ्या होत्या. तिकडे पडवळ, दोडकं, दुधी मिळायचं नाही आणि या मेघाच्या आवडत्या भाज्या. हळूहळू एकमेकांच्या आवडीनिवडी समजत होत्या.

अशीच दोन वर्ष गेली. चिठ्या लिहायची सवय गेली नव्हती.
एक दिवस माझ्या डब्यात नेहमीप्रमाणेच एक चिठ्ठी होती. मी चिठ्ठी खिशात ठेवली आणि विसरून गेलो, कारण त्या दिवशी काम जास्त होतं.
घरी आल्यावर मेघाने माझा चेहरा बघितला आणि तिच्या लक्षात आलं - यांनी चिठ्ठी वाचली नाहीय. आई,अण्णा खूश होते. मेघा आत निघून गेली. मला कळत नव्हतं काय झालंय.
“तुम्ही चिठ्ठी वाचली?” मेघाने विचारलं.
“कुठची चिठ्ठी?”माझ्या प्रश्नावर मेघाने उत्तर दिलं नाही.
जेवणं शांततेत पार पडली. आई मध्येच खुदकन हसत होती आणि अण्णा तिला “तुला हसायला काय झालंय?” म्हणून लटकं रागवत होते.
मी बॅगमधून डबा बाहेर काढला, तेव्हा कुठे मला त्या चिठ्ठीची आठवण झाली. मी चिठ्ठी उघडून वाचली आणि उडालोच.
मेघाने त्या चिठ्ठीतून गोड बातमी दिली होती. आणि मला वाटलं होतं की नेहमीप्रमाणे आय लव्ह यू असेल.
मग काय! मेघाची नाराजी घालवता घालवता माझ्या नाकी नऊ आले. त्यात आईला सुनेचा खूपच कळवळा आला, कारण अण्णांनीही असंच केलं होतं. शेवटी एक सिल्क साडी आणि सोन्याची चेन यांनी काम केलं होतं. मग ती चिठ्ठी एका वेल्वेटच्या कपड्यात ठेवली आणि तो कपडा त्या संदुकीत बंदिस्त झाला. मग नऊ महिन्यात आलेले सगळे अनुभव मेघा मला चिठ्ठी लिहून कळवत होती. मी त्या चिठ्या जपून ठेवत होतो.
आणि मालविका या जगात आली.
समरच्या वेळी मेघाने चिठ्ठी लिहिली नाही. मी घरी आल्यावर सांगितलं. पण दोन्ही वेळी तोच आनंद होता.
आता मुलं मोठी होत होती. त्यांना नकळत चिठ्ठ्या लिहाव्या लागत होत्या. मग काय, कधी मॅडम चिडचिड करायच्या काय अक्षर काढता तुम्ही, मला कळतच नाहीय काय लिहिलंय. बरं, कॉम्प्युटरवर टाइप केलं, तर मराठी फॅाण्ट नव्हते, त्यामुळे तीच अडचण होती. पण नंतर मराठी फॉण्ट आल्यावर सगळं सोप्पं झालं.
तर अशी ही आमची अमूल्य पत्रं आहेत. त्याचं दुसऱ्या कुणाला मोल नसलं, तरी आम्हाला आहे. म्हणून याला आम्ही मालमत्ता म्हणतो.

हे सगळं लिहून काढल्यावर उल्हासने ते बाड मालविका आणि समरला वाचायला दिलं.

समर आणि मालविकाने सगळी स्टोरी वाचल्यावर त्यांची प्रतिक्रिया म्हणजे
“वॅाव, पप्पा, तुम्ही एकदा आवाज ऐकून ठरवलं आपल्याला या मुलीशी लग्न करायचंय.”
“आता ती एडविना कुठे असते?” मालविका विचारत होती.
“एडविना रिटायर झाली. नंतर आता ती स्कॅाटलंडला राहते. आता पत्रव्यवहार म्हणजे ईमेल चालू असतात आमचे.” उल्हास म्हणाला.
मालविका म्हणाली, ”मला युरोप बघायचा आहेच. आपण एक काम करू या - येत्या सप्टेंबरमध्ये जाऊ या. मी स्पॅान्सर करते सर्व. त्या एडविनाला भेटायलाच पाहिजे. तिने त्या दहावीची परीक्षा दिलेल्या चुणचुणीत मुलाचे गुण ओळखले, म्हणून यापुढच्या घटना घडल्या. मी तिला प्रत्यक्ष भेटून धन्यवाद देणार.”
“मीसुद्धा. काही तरी वेगळं लक्षात राहिल असं प्लॅन करू या आणि सोफीलाहि बोलवायला विसरू या नको.”
समर म्हणाला.
“अरे, एडविनाने ही संदूक भेट म्हणून दिली नसती, तर हे सगळं तुम्हाला कळलंच नसतं. तेव्हा या संदुकीसाठीसुद्धा एडविनाचे आभार मानले पाहिजेत.” मेघा म्हणाली.
“आणि समर, फक्त माझ्या आगमनाची चाहूल लागल्यावरचं पत्र आहे, तुझ्या आगमनासाठी काही स्पेशल तयारी नव्हती.” मालविका समरला चिडवत म्हणाली.
“तसंच काही नाही हं माले, तुझ्या पप्पांचा फक्त काळ्यावर पांढऱ्याचा विश्वास होता ,त्यामुळे त्यांनी मला सांगितलं तू जे काही सांगितलंस ते मला कळलंच नाही.” मेघा म्हणाली.
“काळ्यावर पांढरं म्हणजे काय?” मालविका आणि समरला हे असले भारी शब्दप्रयोग पटकन कळायचे नाहीत, म्हणून दोघांनीही एका सुरात विचारलं.
“अरे काळ्यावर पांढरं म्हणजे लिखित. कोणतीही गोष्ट तोंडाने सांगितली की विसरायला होतं, म्हणून लिहून ठेवायची, म्हणजे ती घटना लक्षात राहते. म्हणून त्यांनी माझ्याकडून त्या बातमीसाठी पत्र लिहून घेतलं होतं. म्हणजे दोन्ही गोड बातम्यांबद्दलची पत्रं आहेत.” मेघा म्हणाली.
“अच्छा, बघितलंस, आपल्याला पप्पा सांगायचे ऑफिसचम काम करतोय, पण ते मम्मीला प्रेमपत्र लिहीत असायचे.” समर वात्रटपणे म्हणाला.
“गाढवा, मी नेहमीच पत्र लिहीत नसायचो, कधीकधी खरंच ऑफिसचं काम करत असायचो.” उल्हास म्हणाला.
“ते सर्व ठीक आहे. मी ठरवलंय, मी ही संदूक आहे ना, त्यावर ग्लास टॅाप लावणार आणि आपल्या नवीन घरात दिवाणखान्यात सेंट्रल टेबल म्हणून ठेवणार, जेणेकरुन येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला मी अभिमानाने सांगू शकेन ही आमची वडिलोपार्जित मालमत्ता आहे.” समरने डिक्लेअर केलं.
“पण पप्पा, मी तुम्हाला एक खातरीने सांगते, तुमच्या प्रॅापर्टीज्, बँक बॅलन्स आणि मम्मीचे दागदागिने यांच्यावरून माझ्यात आणि समरमध्ये कधीच भांडण होणार नाही. पण.. पण.. या संदुकीच्या मालकीवरून आमचं भांडण होणारच नाही याची गॅरंटी आमच्या दोघांपैकी कुणीच देऊ शकणार नाही. काय समर, मी बरोबर बोलतेय ना?” मालविकाच्या या बोलण्यावर समरने मान डोलावली.
“आता या संदुकीला कुलूप लावायचं नाही. आमची प्रेमपत्रंसुद्धा यांत बंदिस्त होतील यापुढे.” समर म्हणाला.
“येस् येस्, आम्हालाही काळ्यावर पांढऱ्याचं महत्त्व कळलंय आता.” मालविका म्हणाली.
आता नवीन घरी काय नेणार काय नाही याच्यावरून वादावादी तर होणार आहे, पण मम्मी-पप्पांची मालमत्ता मात्र प्रत्येक ठिकाणी मुलांच्या बरोबरच राहणार, याची खातरी झाली.

सरिता सुभाष बांदेकर.

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

3 Nov 2021 - 9:45 am | जेम्स वांड

हलकेफुलके लेखन अन शब्दांचे महत्व, आईवडीलकालीन सोशलमीडिया कसा चालत असे ते वाचूनही मौज वाटली मस्त.

सरिता बांदेकर's picture

7 Nov 2021 - 5:31 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद. आणि उशीरबद्दल माफ करा. दिवाळीत फटाक्यांची भीती वाटते त्यामुळे जरा मूड नसतो.
तरूण मुलांना पण कळावं मोबाईल वगैरे नसले तरी रोमांटीक होता येतं म्हणून हा प्रयत्न.पण त्यामुळे कथा जरा मोठी झालीय.

मुक्त विहारि's picture

8 Nov 2021 - 8:56 am | मुक्त विहारि

You have got a mail

हा सिनेमा आठवला

सरिता बांदेकर's picture

8 Nov 2021 - 9:45 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

Bhakti's picture

9 Nov 2021 - 7:31 am | Bhakti

वॅाव, किती गोड !!
माझे आई बाबा पण कधी कधी असेच जुने किस्से, दस्तावेज दाखवतात,जाम भारी वाटतं.अजूनही बरेच गोष्टी सांगितल्या नाहीत :)
प्रत्येक पिढीचा वेगळाच aura असतो.;)

मुक्त विहारि's picture

9 Nov 2021 - 10:08 am | मुक्त विहारि

ढग ते क्लाऊड

श्वेता व्यास's picture

11 Nov 2021 - 10:25 am | श्वेता व्यास

खुसखुशीत प्रसंगांनी खुलवलेली कथा आवडली.

सरिता बांदेकर's picture

12 Nov 2021 - 8:40 am | सरिता बांदेकर

धन्यवाद,
भक्ती,मुवि,श्वेता खूप खूप धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2021 - 12:25 pm | चौथा कोनाडा

खुप छान !
कथा सुंदर फुलवली आहेएकेक प्रसंग डोळ्यापुढे उभे राहतात, तो काळ उभा राहतो.

पुलेप्र.

सरिता बांदेकर's picture

13 Nov 2021 - 10:19 am | सरिता बांदेकर

धन्यवाद चौ.को.

छान गोष्ट.. असेच काही सुरू करावे का या विचारला सुखी

सरिता बांदेकर's picture

16 Nov 2021 - 10:36 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

17 Nov 2021 - 5:52 am | सुधीर कांदळकर

छान जमला आहे. खरेच एरवी सामाय वाटणार्‍या अनेक वस्तूंशी आपले आठवणींशी निगडित असे भावनिक नाते जडते आणि त्या वस्तूंना आपल्यासाठी मोजता न येणारे मोल प्राप्त होते.
आमच्या चि.ने शाळेत हस्तकला विषयात बनविलेल्या काही अप्रतिम वस्तू, इंग्लंडहून आणलेल्या चकचकीत चंदेरी मुलाम्याच्या रंगीत गोट्या, स्पर्धेतले चषक अशा अनेक वस्तू घरे बदलतांना जपून ठेवलेल्या आहेत. सामाजिक स्तरावर अनेक वास्तूंना ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे त्या सांस्कृतिक ठेवा म्हणून जपल्या जातात तसे काहीसे आपण वैयक्तिक स्तरावर करतो.

एक छान भिडणारा लेख अवाडला. धन्यवाद.

छान. पण थोडे लांबल्यामुळे मधेमधे रटाळ होऊन कंटाळा येतोय.

छान. पण थोडे लांबल्यामुळे मधेमधे रटाळ होऊन कंटाळा येतोय.थोडे लेखन shortच करा नेहमी तुम्ही.

सरिता बांदेकर's picture

29 Aug 2022 - 4:54 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद.
तुमच्या सूचनेची नोंद घेतली.

सरिता बांदेकर's picture

17 Nov 2021 - 7:50 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

27 Aug 2022 - 10:17 am | कर्नलतपस्वी

पूर्वी पत्रव्यवहार एकमेव साधन होते. बाकीच्या नातेवाईकांकडून आलेली पत्रे एका तारेत आडकवली जायची पण वडिलांनी आईला लिहीलेली पत्रे मात्र ती कुकंवामेणाच्या पेटीत ठेवायची.
पुढे आमचा पत्रव्यवहार पर्स मधे बंद असायचा.
आता भ्रमणध्वनीवर व ढगात बंदिस्त आसतो.
मस्त कथा.

सरिता बांदेकर's picture

29 Aug 2022 - 4:58 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद.
माझ्या माहेरी आहे ती तार अजून.
जूनी बीलं आणि नोंदी पटकन मिळतात त्यात.
आणि आमची लिहीलेली पत्र कधी कधी उपद्व्यापी मुलीच्या हातात लागली कि तारांबळ उडायची.