हंपी एक अनुभव - भाग १

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in भटकंती
3 Aug 2021 - 12:24 am

गेले अनेक दिवस... दिवस का गेलं वर्षभर हंपीला जावं असं मनात होतं. पण 2020 आलं आणि सगळ्यांचं आयुष्य आणि भविष्यातली स्वप्न बदलून गेलं. दिवाळीपर्यंत पुढचा काही... विशेषतः आपल्या स्वप्नांचा काही विचार करण्याची हिंमत देखील नव्हती. पण मग हळूहळू आयुष्य काहीसं पूर्व पदावर येतं आहे असं वाटायला लागलं आणि मग पूर्वी बघितलेली स्वप्न परत डोकं वर काढायला लागली.... मला पुन्हा एकदा हंपीची स्वप्न पडायला लागली. अर्थात इतक्या लांब स्वतः ड्राईव्ह करून जायचं म्हंटल्यावर नीट विचार करून योग्य नियोजन करणं अत्यंत आवश्यक होतं. विशेषतः सध्याच्या परिस्थितीमध्ये स्वच्छता राखणे (Sanitization) हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता. त्यामुळे दोन आठवडे सतत हंपीचा अभ्यास करतानाच तिथे राहण्यासाठी योग्य अशा जागा शोधत होते; त्यामध्ये स्वच्छता हा महत्वाचा मुद्दा होता माझा.

हंपीचा अभ्यास करताना खरंच खूप मजा आली. केवळ गूगल वरची माहितीच नाही तर youtube वरचे अनेक विडिओ पाहिले हंपी संदर्भातले. ऐतिहासिक वस्तू आणि शिल्पकला यांनी श्रीमंत असलेले हंपी मला अजूनच जास्त खुणावायला लागले.

कर्नाटकातले हम्पी म्हणजे मुबाईहून जवळ जवळ चौदा तासांचा प्रवास. हा प्रवास करोना नंतरच्या परिस्थितीत स्वतःच्या गाडीने करायचा म्हणजे सर्व काळजी नीट घेणं आवश्यक होतं. साधारण सातशे पन्नास किलोमीटर आहे मुंबई-हंपी अंतर. म्हणजे चौदा तास तर नक्की. मग ठरवलं मुंबई ते बेळगाव असा प्रवास करायचा आणि मग बेळगाव ते हंपी. त्याप्रमाणे तयारी केली. शक्यतोवर घरगुती राहण्याची सोय (होम स्टे) सारखं काही असल्यास पाहायचं. एकतर ते स्वस्त असतं आणि कमी लोक अशा ठिकाणी जात असल्याने सध्यासाठी योग्य असेल. मग बेळगावमध्ये home stay असं गूगल मित्रावर शोधलं आणि अनेक पर्याय मिळाले. अगदी मोठासा बंगला आणि त्यातल्या एक किंवा दोन खोल्या राहण्यासाठी देणारे पर्याय देखील होते. त्यातल्याच एका घरातली खोली फोनवरून राखून ठेवली आणि एक दिवस भल्या पाहाटे निघाले.

मुद्दाम ठरवून मुंबई-पुणे महामार्गावर थांबले नाही. पुण्याच्या पुढे महाबळेश्वरला जाण्याचे जे वळण आहे त्याअगोदर एक लहानसा मॉल आहे. तिथे पोहोचायला मला साधारण साडेचार तास लागले. तिथे थांबून व्यवस्थित खाऊन घेतले. मॉल मधील स्वच्छतागृह खरंच चांगले असल्याने काहीच प्रश्न उदभवला नाही. तिथून निघाल्यावर मात्र कुठेही न थांबता थेट बेळगाव गाठले. मुंबई-बेळगाव चारशे चौर्याऐंशी किलोमीटर्स आहे. म्हणजे साधारण आठ तास. मी मधला थांबण्याचा वेळ धरून देखील सात तासात पोहोचले. एकतर पुण्याच्या पुढचा रस्ता चौपदरी आणि अत्यंत सुंदर आहे; आणि मला कुठेही फार वाहतूक जाणवली नाही. बेळगावात पोहोचले आणि खोली ताब्यात घेऊन मस्त ताणून दिली. संध्याकाळी उठून थोडी चालून आले आणि त्याचवेळी एका उडपी हॉटेलमध्ये मस्त डोसा, इडली आणि तिथली खास बनवलेली कॉफी घेतली. सकाळी सहा पर्यंत निघण्याचा विचार होता. मात्र घरमालकांनी मला सांगितलं की इथून तुम्ही फार तर चार तासात हंपीला पोहोचाल. का घाई करता. आठ पर्यंत निघालात तरी अगदी वेळेत पोहोचाल. तसही हंपी सोबतच तुम्ही पहिल्यांदा जिथे उतरणार आहात त्या सानापूरला देखील निसर्ग सुंदर आहे. मालकांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी काहीशी आरामातच निघाले. पोहोचण्याची घाई नव्हती. त्यामुळे आजूबाजूचा निसर्ग पाहात अगदी निवांतपणे गाडी चालवत होते. प्रशस्त रस्ते आणि अजिबात नसलेली वाहातुक यामुळे गाडी चालवणे म्हणजे सुख वाटत होतं.

आजूबाजूच्या निसर्गात मी इतकी अडकत गेले की काही वेळानंतर माझ्या लक्षात आलं की गुगुल बाईने मला जो रस्ता सांगितला आहे तो गावांमधून जातो आहे.... म्हणजे नक्की मी रस्ता चुकले आहे. कारण बेळगाव सोडताना मला घरमालक म्हणाले होते; सुंदर हमरस्ता आहे. तुम्हाला कुठेही काहीही अडचण येणार नाही. लहान-लहान गावं लागायला लागल्यावर मी थोडी गडबडले आणि एक दोन ठिकाणी गाडी थांबवून रस्ता विचारला. प्रत्येकजण सरळ पुढे जाण्याबद्दल सांगत होतं. त्यामुळे रस्ता चुकले नसून कोणतं तरी वेगळं वळण घेतलं गेल्याचं माझ्या लक्षात आलं. 'जोपर्यंत अंधार होत नाही आणि गाडीमधलं पेट्रोल लाल कात्यापर्यंत येत नाही तोपर्यंत घाबरण्याची गरज नसते'; हे माझ्या भावाचं तत्व मनात ठेऊन पुढे जात होते. मनात भिती नसल्याने उलट आजूबाजूला लागणारी शेतं आणि पवनचक्क्या पाहात आणि या अफाट पसरलेल्या निसर्गाचा मनमुराद अनुभव घेत मी पुढे जात होते. साधारण एकच्या सुमारास मला सानापूर पंधरा मिनिटांवर दिसायला लागलं आणि मी जिथे माझी खोली राखून ठेवली होती तिथे फोन केला. ज्याने फोन उचलला त्याने लगेच मला लोकेशन पाठवलं आणि मग मात्र त्या लोकेशनच्या अनुषंगाने गाडी हाकत मी निघाले. आता आजूबाजूची हिरवाई संपून मोठे मोठे दगड दिसायला लागले होते. पण खरं सांगू.... त्या उंच अजस्त्र दगडांमध्ये देखील एक वेगळंच सौंदर्य होतं. डिसेंबर महिना असल्याने फार उकडत नव्हतं. मग गाडीच्या काचा खाली करत दर पाच मिनिटांनी थांबून फोटो काढत मी पुढे सरकत होते.

चुकलेल्या रस्त्यावरील दगडांचे वैभव.

दूरवर पसरलेली हिरवाई.

नक्की कोणता रस्ता घेऊ हा प्रश्न पडला होता मला

चारिकडे पसरलेला निसर्ग.

हरवलेल्या रस्त्यावर सापडलेली पवनचक्की.

वळणावरचे झाड वाकडे

डोळ्यांना सुखावणारी शेतं आणि त्यात विहारणारे स्वच्छंद पक्षी.

सानापूर जवळ आलं आणि मी परत एकदा त्याच मुलाला फोन लावला.
"Madam, keep driving and come straight. I Am standing on the road." त्याने मला म्हंटलं आणि त्याच्याशी हे बोलेपर्यंत मला तो दिसला देखील. एक पोरगेलासा लाल टीशर्ट घातलेला काळा पण हसऱ्या चेहेऱ्याचा तरुण होता. गाडीतून हात बाहेर करून मी त्याचं लक्ष वेधलं आणि त्याने खूण केल्याप्रमाणे गाडी आत वळवली.

मी गाडीतून उतरले आणि................. माझ्या समोर स्वर्ग होता जणू!!! समोर पाच सुंदर झोपड्या होत्या. मध्ये थोडं अंतर ठेऊन एक मोठा आणि खुला हॉल होता. जिथे खाण्यासाठी बसण्याची सोय होती. संपूर्ण बांधकाम बांबू आणि नारळाच्या सुकलेल्या झावळ्यांनी केलेलं होतं. पण त्यात जे सौंदर्य होतं ते तुम्हाला कोणत्याही पंच तारांकित हॉटेलमध्ये दिसणार नाही. आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांच्या खळगीतलं सानापूर हे अगदीच लहानसं आणि गोंडस गाव. त्यात हे असं गावातल्या घरात राहिल्यासारखा अनुभव. अजून काय हवं हो?

फक्त पाच खोल्या (झोपड्या) आलेलं हॉटेल!

निसर्गाच्या सानिध्यातला होम स्टे.

स्वच्छ नीटनेटकी आणि आवश्यक सुविधा असलेली खोली.

रेस्टॉरंट!!

अत्यंत नेटकी, स्वच्छ आणि आवश्यक एवढी प्रशस्त खोली आणि अत्यंत स्वच्छ आणि गरजेच्या सगळ्या सोयी असणारं स्नानगृह. अजून काय हवं असतं? प्रवासाने काहीशी दमले होते आणि भूक देखील लागली होती. पटकन फ्रेश होऊन बाहेर आले आणि समोरच्या हॉलमध्ये गेले. सुंदर बैठकी केलेल्या होत्या. एका टेबलावर साधारण आठजण सहज बसू शकतील अशी दहा-बारा टेबलं होती. बसायला साध्याशा गाद्या. एका टेबलाजवळ बसत मी चौकशी केली काय मिळेल खायला? मला वाटलं होतं साधंसं गाव आणि त्यात हे असलं साधं राहण्याची सोय असलेलं ठिकाण; म्हणजे टिपिकल काहीतरी चायनीज आणि पंजाबी जेवणाचे प्रकार असतील. मनाची तशी तयारी देखील मी केली होती. पण आश्चर्य म्हणजे तिथे सगळं काही मिळत होतं. अगदी कॉन्टिनेनटल पासून ते पिझा-पास्ता... सिझलर्स, पंजाबी आणि डाएट फूड देखील. मेन्यूकार्ड बघून जितकं आश्चर्य वाटलं तितकीच मजा देखील वाटली.

जेवताना थोडी माहिती घेत होते आजूबाजूला काही प्रेक्षणीय आहे का. त्यावेळच्या गप्पांमध्ये कळलं की हा 'होम स्टे' तीन तरुणांनी मिळून सुरू केला आहे. हंपी मधील हिप्पी आयलंड खूपच प्रसिद्ध होतं.... अनेक कारणांनी. परंतु कर्नाटक सरकारने ते बंद करून टाकलं.... त्याच त्या 'अनेक कारणां'साठी. ही मुलं तिथे काम करायची. अचानक हातातलं काम गेलं आणि त्याचवेळी करोना माहामारी सुरू झाली. पुढचं भविष्य एकदम अंधःकारमय वाटायला लागलं. त्यातल्या एकाची ही थोडीफार जमीन होती. तिघांनी हिम्मत करून आजवर जमवलेले आणि थोडे उसने पैसे घेत हे 'होम स्टे' स्वतःच्या हातानी बनवलं. नुकतीच सुरवात केली होती त्यांनी. त्यांच्या हिमतीच मला खरंच खूप कौतुक वाटलं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलं अजिबात शाळेत गेली नव्हती; आणि तरीही भारतीय भाषांसोबत फक्त इंग्रजीच नाही तर फ्रेंच, इटालियन आणि अशा अनेक भाषा असख्लीत बोलत होती. 'हिप्पी आयलंड' की देन है! म्हणाले.

सकाळपासून गाडी चालवून तशी दमले होते. त्यामुळे थोडावेळ आराम करायचा ठरवलं. उद्यापासून हंपी बघायला सुरवात करणार होते. पण आजचा दिवस तसा मोकळा होता. बेळगावच्या घरमालकांनी सांगितलेलं आठवत होतं. त्यामुळे माझ्या खोलीकडे जायच्या अगोदर त्या मुलांकडून माहिती घेतली की या सुंदर पण इटुकल्या गावात काही बघण्यासारखं आहे का? त्यांनी सांगितलेलं समजून घेतलं आणि आराम करायला खोलीत गेले.

दोन तासांनी गाडी घेऊन मी निघाले. 'होम स्टे' च्या पुढे गावातून अगदी पाच मिनिटं पुढे गेले आणि एक उजवीकडचं वळण घेतलं. थोडेसे उतार-चढाव आणि लहानसा रस्ता कापत पुढे गेले. एक लहानसं वळण पार केलं आणि माझ्या समोर निसर्गाचा एक अप्रतिम तुकडा पसरला होता. एका नदीचं पात्र... मस्त मोठंसं समोर होतं. आत दूर दोन टोपलीच्या होड्या होत्या. असेच एकटे दुकटे प्रवासी त्या होड्यांमधून नदीमध्ये फिरत होते. एक अजून होडी दिसत होती किनाऱ्यावर. मला गाडीतून उतरताना बघून होडीचा मालक आला विचारायला. पण उतरत्या संध्याकाळी वाहत्या वाऱ्यावर किनाऱ्याजवळ बसून राहावंसं वाटत होतं. आत्ता नको म्हणून त्याला नकार देऊन मी तशीच बसले किनाऱ्यावर. क्षणभर मनात आलं छानशी गाणी लावावीत... पण मग स्वतःला थांबवलं. निसर्ग भरभरून गप्पा मारत होता.... त्याच्या गप्पा ऐकण्यात जास्त सुख होतं.

अंधार व्हायला लागला आणि मी परत फिरले. परत माझ्या 'होम स्टे' वर आले आणि छानसं साधं खाणं मागवलं. दुपारी माझ्याशी गप्पा मारणारा मुलगा आला आणि म्हणाला;"मॅडम, आपको बिअर मंगता तो है। और भी कूच भी मिलेगा।" त्याचं बोलणं ऐकून हसले आणि म्हणाले तुझ्या या छानशा गावाच्या निसर्गाची नशा मला पुरेशी आहे... त्याहून जास्त नशा नाही लागणार मला. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. काहीच नाही घेणार मी हे समजल्यावर. हसत सलाम ठोकत म्हणाला;"मॅडम, आप पहिला है जो कूच भी नही चाहीये बोला। नहीतो इधर आते ही पहिला वोही पुच्छते है।" मी हसले आणि जेवण आटोपून झोपायला गेले.

दुसऱ्या दिवशी सानापूरचा निसर्ग अजून जवळून पाहावा म्हणून निघाले. कालच्या ज्या वळणावर उजवीकडे वळले होते त्याच वळणावर डावीकडे वळण घेतलं आणि परत एकदा तीच ती नदी समोर होती. थोडं खडकांवर बसले... थोडी इथे तिथे फिरले आणि परत एकदा तीच ती टोपलीची होडी दिसली. मग होडीवाल्याला हात करून त्याच्या होडीत बसले. होडीत त्याच्याशी गप्पा मारायला लागले; तो म्हणाला या करोनाने आमचं कंबरडचं मोडून टाकलं आहे. आमच्याकडे एकपण पेशंट नाही. पण तरीही करोना मात्र आहे. आमचा मूळ व्यवसाय इथे येणाऱ्या देशी-परदेशी लोकांना फिरवणं हाच आहे. पण यावर्षी कोणीही आलं नाही. त्यामुळे खूप त्रास आहे. अशाच गप्पा होत होत्या आणि त्यांनी संगीतलं इथे एक पाचशे वर्ष जुनं माकडाचं मंदिर आहे. मी म्हंटलं अरे मारुती मंदिर म्हणायचं आहे न तुला. तर तो म्हणाला नाही... माकड मंदिरच आहे ते. बरंच उंच आहे. सातशे पायऱ्या असतील. इथे येणारे लोक तिथे नक्की जातात. माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. कसं जाता येईल याची चौकशी करायला लागले तर म्हणाला तिथे सध्या बिबट्या फिरतो आहे. त्यामुळे बंद केलं आहे मंदिर. 'बिबट्या फिरतो आहे'; ही माहिती त्याने इतक्या सहज दिली जणूकाही बरेच कुत्रे आहेत... म्हणून जाऊ नका असं म्हणतो आहे.
त्याच्या माहितीला गावातल्या इतरांकडून देखील दुजोरा मिळाला म्हणून मग इच्छेविरुद्ध मी मंदिर बघण्याचा कार्यक्रम रद्द केला; आणि तो दिवस सानापूरच्या निसर्गात मनमुराद भटकण्यात घालवला.

सानापूर मधील निसर्गरम्य नदी किनारा.

टोपलीची बोट.

बोटीतील अनुभव.

सानापूर मधील शेतं.

तिसऱ्या दिवशी मी हंपीला जायला निघाले. खरंतर मी हंपीमध्ये एक उत्तम पंच तारांकित हॉटेल ठरवलं होतं. पण माझ्या सानापूरच्या भटकंतीमध्ये मला कळलं की सानापूर ते हंपी जेमतेम अर्ध्या तासाचं अंतर आहे. मग हंपीमध्ये राहण्याचा विचार बदलून मी सानापूर ते हंपी प्रवास करायचा ठरवलं. गुगलच्या मदतीने एक रजिस्टर्ड गाईड शोधून त्याच्याशी बोलणं केलं आणि हंपीच्या पहिल्या वळणावर भेटायचं ठरवून माझ्या स्वप्नांच्या दिशेने निघाले.....

क्रमशः

प्रतिक्रिया

कंजूस's picture

3 Aug 2021 - 3:21 am | कंजूस

नक्की काही वेगळं वाचायला मिळणार. उत्सुकता वाढली आहे.
धाडसाचा कित्ता इतर गिरवतील.
परदेशी भाषा बोलणारे इकडचे स्थानिक हा अनुभव ओर्छा ( ओरछा) इथेही येतो.

गूगलरस्ताशोध हा एक मजेदार विषय आहे. जाणकार आणि अनुभवी याबद्दल धागा काढतीलच.

बेळगाव - धारवाड - हुब्बळी आणि नंतर हुब्बळी - लखुंडी - कोप्पळ होस्पेट- बेल्लरी असा मुख्य राज्यरस्ता ( मेन डिस्ट्रिक्ट रोड) आहे . ट्राफिक नसतेच.

प्रवासासाठी सोबत एक जण असणे ठीक असते पण ग्रूप झाला की निर्णयाचे तीन तेरा होतात, ठिकाणाची दादर चौपाटी होते. ( हे माझे मत.)

बेळगाव - धारवाड - हुब्बळी आणि नंतर हुब्बळी - लखुंडी - कोप्पळ होस्पेट- बेल्लरी असा मुख्य राज्यरस्ता ( मेन डिस्ट्रिक्ट रोड) आहे . ट्राफिक नसतेच.

आमची हंपी ट्रिप ह्याच रस्त्याने झाली होती. गदगच्या अलीकडे एका पेट्रोल पंपावर रात्री दोन अडीच तास मस्त ताणून दिली होती.

प्रचेतस's picture

3 Aug 2021 - 12:39 pm | प्रचेतस

मस्त सुरुवात. तपशीलांमुळे वाचायला मजा आली. हंपीबद्द्ल जितकं वाचावं तितकं कमीच.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात.

टर्मीनेटर's picture

3 Aug 2021 - 2:09 pm | टर्मीनेटर

फायनली ही मालिका लिहायला घेतल्या बद्दल तुझे मनःपूर्वक आभार!
सुरुवात झकास झाली आहे, पुढचे भागही (भरपूर फोटोसहित) लवकर येउदेत.

सौंदाळा's picture

3 Aug 2021 - 2:29 pm | सौंदाळा

मस्तच सुरुवात आणि फोटो
७ तासात ४८४ किमी!!! - __/\__
सोनापुर होम स्टे खुपच आवडला. नदीकाठ आणि टोपलीची बोट पण सुंदरच
हंपीच्या मिपावर ३, ४ लेखमाला आहेत (जयंत कुलकर्णी, वल्ली, कंजुस ....) पण प्रत्येक वेळी वाचायला तितकीच मज्जा येते त्यामुळे हातचे काहीही राखुन न ठेवता भरपूर फोटोज आणि पुढील भाग येऊ देत.

कंजूस's picture

3 Aug 2021 - 3:50 pm | कंजूस

फारसं लिहिता नाही आलं मला तेव्हा . भटकंती रेल्वे आणि एसटीने करत असल्याने वाटेवरची ठिकाणं हुकतात.
त्यामुळे या लेखांची वाट पाहतोय.

ही ट्रिप केव्हा झाली?

बाकी एक बदल म्हणजे सहल आयोजक आता बदामि हम्पी सहली देऊ लागले आहेत. ज्यांना आयोजन करता येत नाही त्यांची सोय झाली.

अनिंद्य's picture

3 Aug 2021 - 5:39 pm | अनिंद्य

सुरुवात छान झाली आहे, हंपीबद्दल कितीही अनुभव वाचले तरी थोडेच. हंपी इज लभ :-)

कर्नाटकात रस्ते चांगलेच आहेत, आणि त्या बशीसारख्या होड्या कन्नड स्पेशालिटी जणू.

पु भा प्र

प्रचेतस's picture

3 Aug 2021 - 6:37 pm | प्रचेतस

त्या कॉरॅकल्सचे वर्णन कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरला भेट दिलेल्या पोर्तुगीज प्रवासी दुमिंगो पाईशच्या वृत्तांतात देखील आले आहे.

पाईश म्हणतो-

टोकऱ्यांसारख्या गोल आकाराच्या नावांतून नदी ओलांडून लोक या शहरात येतात. या नावा आतून वेताच्या व बाहेरून चामडे मढवलेल्या असतात. पंधरा वीस माणसांची वाहतूक त्या एका वेळेला करू शकतात. गरज भासल्यास त्यातून घोडे आणि बैलही नेता येतात. पण बहुतेकदा हे प्राणी पोहत पलीकडे जातात. विशिष्ट वल्ह्यांनी या नावा वलव्हल्या जातात. इतर नावांप्रमाणे या गोलाकार नावा सरळ नाहीत तर वर्तुळाकार फिरत जातात, या राज्यात जेथे जेथे नदी ओलांडावी लागते तेथे याच नावा वापरल्या जातात, दुसऱ्या प्रकारच्या नावा येथे नाहीत.

टर्मीनेटर's picture

3 Aug 2021 - 6:59 pm | टर्मीनेटर

कुरवपूरला पण कृष्णा नदी ओलांडण्यासाठी अशा गोलाकार टोपलीच्या नावा आहेत. तिथे त्यांना 'बुट्टी' म्हणतात.

आणि पात्र फार खोल नाही तिथे.

प्रचेतस's picture

3 Aug 2021 - 8:22 pm | प्रचेतस

खोल नाही पण वेड्यावाकड्या पडलेल्या खडकांमुळे अत्यंत धोकादायक आहे. पात्रात अगदी खोल कपारी आहे, एक पाऊल गुडघ्याइतकाच बुडावं तर पुढचं पाऊल एकदम सातआठ फूट खोल जाईल असं आहे. पुरंदरदास मंडपाच्या इथे बऱ्यापैकी सपाट आहे मात्र तिथं पाण्याला वेग फार असतो.

प्रचेतस's picture

3 Aug 2021 - 8:23 pm | प्रचेतस

भारी आहे फोटो :) हल्लीच्या काळात कॉरॅकल्सला खालच्या बाजूला चामडे न वापरता प्लास्टिक वापरतात.

गोरगावलेकर's picture

3 Aug 2021 - 6:51 pm | गोरगावलेकर

प्रवास वर्णन, फोटो दोन्हीही आवडले

श्रीरंग_जोशी's picture

4 Aug 2021 - 12:37 am | श्रीरंग_जोशी

प्रवासवर्णन मालिकेची सुरुवात उत्तम झाली आहे.
पुढील भागांत फोटो थोडे मोठे टाकावेत ही सुचवणी.
पुभाप्र.

चौथा कोनाडा's picture

7 Aug 2021 - 5:49 pm | चौथा कोनाडा

नितांत सुंदर आणि चित्रदर्शी लेखन !
💖
फोटो मोठे टाकल्यास आणखी मस्त वाटेल तुमच्या चष्म्यातून पाहिलेली हम्पी !
(साधारण टर्मीनेटर यांनी बुट्टीतला प्रचि टाकलाय त्या मापाचा टाका !)

ज्योति अळवणी's picture

7 Aug 2021 - 7:39 pm | ज्योति अळवणी

तुमच्या सगळ्यांच्या कौतुकाने खूप बरं वाटलं. लेखनाला हुरूप देणारं कौतुक माझ्यासारख्या नवोदित लेखिकेला मोठा आधार आहे

फोटो मोठे टाकल्यास आणखी मस्त वाटेल तुमच्या चष्म्यातून पाहिलेली हम्पी ! >>>>> + १
तसेच होम स्टे चे details पण दिलेत तर बाकीच्यांनां कधीतरी फायदा होइल..

उज्वलभविष्य's picture

23 Aug 2021 - 10:38 pm | उज्वलभविष्य

ज्योती ताई, मस्त वर्णन आहे ट्रीप च आणि मुख्य म्हणजे ही सोलो ट्रीप दिसतेय तेव्हा मला तर कौतुक वाटतय तुमच।

ज्योति अळवणी's picture

30 Aug 2021 - 11:15 pm | ज्योति अळवणी

सोलो ट्रिपच होती. मजा आली

विलासराव's picture

16 Sep 2021 - 11:21 am | विलासराव

अलभ्य लाभ.
तुमची ट्रिप छानच झालेली दिसतेय.
मीही परवापासून प्लॅन बनवायला सुरवात केलीय.

मला वेळेच काही बंधन नाही.
साधारण प्रायमरी आराखडा असा आहे.
बिलकुल भ्यास न करता.

पुणे चंदगड बेळगांव बदामी हंपी म्हैसूर कनूर तिथून कोस्टल एरियातून उडपी गोवा दापोली महाबळेश्वर आणी घरी.
मध्येच आवडतील ते बदल.
कमीतकमी बजेटची रहायची सुविधा हवी.
काही माहिती असेल आपल्याला आणी इतरही मीपकारांना कुपया मदत करावी.

जायचे नक्की आहे कारने.
डेट ठरणे प्रोसेस मधे आहे.
तिघे चौघे मित्र आहोत.

इतकं उलट सुलट फिरण्याचं कारण काय? नकाशा पाहा.

विलासराव's picture

16 Sep 2021 - 5:52 pm | विलासराव

यातील पुण्यात मी रहातो म्हणून सुरवात इथून. चंदगड बेळगांवला मित्र आहेत तिकडे जायचेच आहे.

पुढे उडीपी, गोवा, रत्नागिरी, दापोली, चिपळूण येथे मित्र आहेत. सर्व मित्रांकडे मुक्काम आहे.

मग बाकी ऑन दी वे जसे सुचेल तसे.

चौथा कोनाडा's picture

16 Sep 2021 - 12:53 pm | चौथा कोनाडा

विलासराव, बर्‍याच दिवसांनी आपणांस मिपावर पाहून आनंद झाला.
आपल्या सहलीच्या नियोजनाला आणि अर्थातच सहलीला हार्दिक शुभेच्छा !
भटकंती वृतांत टाकतालच !

विलासराव's picture

16 Sep 2021 - 2:35 pm | विलासराव

पण वाचनमात्र रहाणे पसंत करतो.
वृत्तांत वगैरे नाही टाकणार.
पण कोणी फोनवर माहिती विचारली किंवा एखादा कट्टा असेल तर तोंडी शेअर करेल.
लिहायचा जाम कंटाळा आहे मला.