चादर ट्रेक - ३

जगप्रवासी's picture
जगप्रवासी in भटकंती
30 Jul 2021 - 3:07 pm

चादर ट्रेक २

कामाच्या ताणामुळे पुढील भाग देण्यासाठी खूप उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.

वैद्यकीय तपासणीसाठी आम्ही चालतच त्यांच्या ठरविलेल्या ठिकाणी पोहोचलो. चालता चालता गेल्या ६-८ महिन्यांचा काळ सर-सर डोळ्यासमोरून जात होता. ज्या परीक्षेसाठी आम्ही सगळे बरीच तय्यारी करत होतो कोणी सायकलिंग करून, कोणी व्यायाम योगा करून, कोणी नुसतेच जॉगिंग करून आपआपली शारीरिक क्षमता वाढवीत होते केवळ चादर ट्रेकसाठीच, त्याचीच आज परीक्षा होती. काही जण उड्या मारून अंगात गरमी तयार करत होते जेणेकरून रक्तातील ऑक्सिजन लेव्हल वाढेल. ज्यांची लेवल कमी येत होती ते निराश होत होते पण तिथले डॉक्टर त्यांचा उत्साह वाढवायला हिटर जवळ बसायला सांगत होते, पाणी प्यायला सांगत होते, हाताचे तळवे एकमेकांवर घासायला सांगत होते जेणेकरून परत लेव्हल चेक करताना ती व्यवस्थित येईल. बरेच जण त्यात पास झाले. मिपाकरांचे सायकलिंगचे फायदे वाचून सायकलिंग करून स्टॅमिना वाढवला होता पण रक्तदाब अजूनही थोडं जास्त होत आणि त्याचंच मला टेंशन येत होते. आणि शेवटी तेच झालं डॉक्टरांनी सांगितले की तुमचा रक्तदाब थोडासा जास्त आहे. हे ऐकून फक्त रडायचा बाकी होतो, चादरच स्वप्न अर्धवट राहत की काय असं वाटून गेलं. पण डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आणि सांगितलं की या गोळ्या दोन वेळा खा बाकी उत्तम आहे, काही होणार नाही. हे ऐकल्याबरोबर नाचायलाच लागलो. आमच्या पैकी सगळे उत्तीर्ण देखील झाले. अजून एक टप्पा पार पडला.

1
चादर ट्रेकचे ऑफिस

2
शारीरिक तपासणीत पास झाल्यानंतरचा जल्लोष

3

येथे देखील लडाखी लोकांचा प्रेमळपणा, आपुलकीचे बोलणे अनुभवले 'जुले' करीत आम्ही बाजार भटकंतीला निघालो. बाजारात स्थानिक लोक प्रेमाने विचारपूस करत होते आणि चादरसाठी आलोय हे ऐकल्यावर सल्ला देत होते की भरपूर पाणी प्या, खुश रहा, टेन्शन घेऊ नका. आरामात होईल. थंडीचा जोर वाढतच होता मग काय एक छानशी गरमागरम कॉफी घेतली. आत्ता उद्याचा विचार होता, आपल्या स्वप्नवत मोहिमेचा तोच विचार मनात घोळवत हॉटेल वर आलो. ग्रुपची एक छोटेखानी सभा झाली, उद्या घ्यावयाची काळजी, उद्या घ्यावयाचे सामान याविषयी चर्चा झाली त्याप्रमाणे प्रत्येकाने आपली बॅग आधीच भरून ठेवली, रात्रीचे जेवण घेऊन आम्ही झोपी गेलो पण झोप येतच नव्हती. ते ही बरोबरच होतं की एक स्वप्न पूर्ण होणार होतं. बाहेर तापमान -२५.

4
बर्फवृष्टी झाल्याने काचेवर अशी नक्षी तयार झाली होती

काहीजण रोज हॉटेलच्या रूम मध्ये हिटर लावून झोपायचा प्रयत्न करत होते, त्यांना सांगितलं कि तसे करू नका. आपल्या शरीराला त्या थंडीची सवय होऊ द्या. पण जिथे त्यांच्या मनानेच कच खाल्ली तिथे शरीर तरी कुठे साथ देणार. दंगल चित्रपटात जसं आमिर बोलतो तसं पहिली लढाई मनात जिंकावी लागते. नेमकी तीच लढाई अविनाश आणि गुरू हरले. याच्या नेमकं विरुद्ध शार्दूल मनाने कणखर राहिला आणि त्याने चादर ट्रेक याच आत्मविश्वासावर पूर्ण केला. गुरु आणि अविनाशसाठी विमानाची तिकिटे काढून त्यांना मुंबईला रवाना केले.

दिवस चौथा चादर ( गोठलेली झंस्कार नदी )
‘In to the Himalayas, I go to lose my mind…and find a soul’ याचा विचार करतच दिवस उजाडला. दिवस होता बऱ्याच वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नपूर्तीचा, आत्ता आम्ही बऱ्यापैकी लडाखच्या वातावरणाला सरावलेलो होतो. सकाळचा नाश्ता उरकून आम्ही मिनी बसने चादर च्या दिशेने निघालो, आम्हांबरोबर आणखी काही लोक आम्हाला मिळाले. साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासा नंतर आमची मार्गदर्शक आणि पोर्टर ची टीम देखील आम्हाला मिळाली, ओळख झाली त्यांच्या म्होरक्या बरोबर 'लोबझॅग' अत्यंत मनमिळावू मितभाषी गृहस्थ. एका चेकपॉईंटवर सगळ्या माणसांची आणि सामानाची नोंद झाली, आणि पुढे मार्गस्थ झालो.

6

संगम ( येथे सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम आहे ) मार्गावरून आम्ही झंस्कार खोऱ्यात प्रवेश केला, एखाद्या स्वप्नात प्रवेश केल्यागत आमची अवस्था होती, मती गोठली होती. अगदी बाहेरच्या तापमानाप्रमाणे केवळ आणि केवळ सौंदर्याची उधळण बर्फाच्छादित रस्ते, शिखरे, गोठलेली नदी, नदीचे खोरे. ते आठवून आत्ता लिहिताना देखील काटा येतो अंगावर. आम्ही आमच्या सुरुवातीच्या स्थळी पोहचलो, गमबूट घालून आम्ही तय्यार होतोच आमची मार्गदर्शक टीम देखील तितकीच तत्पर त्यांच्या स्लेज गाड्या सामान वाहून नेण्यासाठी तय्यार केल्या येथे गोठलेल्या नदीवरून ते स्लेज ने सामान वाहून नेतात परंतु जेथे नदीचा गोठलेला प्रवाह तुटतो तेथे हि मंडळी त्याची सॅक करतात आणि वाहून नेतात. अत्यंत कष्टाचे काम. या सामानात आपले तंबू, जेवणाचे सामान इत्यादी सगळेच असते. तिथे चादर ट्रेकला जाणाऱ्यांसाठी सरकारने ठेवलेला मिलिटरी कॅम्प होता. तिथल्या काही सैनिकांसोबत गप्पा मारल्या, त्यांनी जपून राहायला, स्वतःची काळजी घ्यायला सांगितली. आणि शेवटी निघताना ते म्हणाले काळजी करू नका, काही त्रास झाला आणि अडचण आलीच तर आम्ही आहोतच. आपल्या सैनिकांवर असलेल्या प्रेमापोटी आधीच त्यांच्याबद्दल आदर होता आणि आता या आश्वासक वाक्यांमुळे तो अजूनच वाढला. झंस्कार नदीच्या गोठलेल्या प्रवाहावर वाकून नतमस्तक झालो, तिच्याकडे सांभाळून घेण्यासाठी आशीर्वाद मागितले. 'बकुला' कॅम्पवरून आमचे मार्गक्रमण सुरु झाले स्वप्नात प्रवेश झाला महान फलंदाज सचिन तेंडुलकर म्हणतोच ' स्वप्न पहा, स्वप्नाचा पाठलाग करा ती खरी होतातच' अशीच काहीशी आमची अवस्था होती चादर वरील पहिल्या पावला सोबत.

7
चादरच पहिलं दर्शन

8

येथे आमची चालण्याची कसोटी होती, गोठलेल्या नदीवरून म्हणजे बर्फावरून चालताना तुम्हाला कायम 'पेंग्विन वॉक' करावा लागतो नाहीतर कपाळमोक्ष अथवा हाथ-पाय गळ्यात येण्याची शक्यता. सरावाने ते चालणे जमलं. पांढऱ्या-निळ्या-करड्या छटांचा सानिध्यात आम्ही 'हेमिस नॅशनल पार्क' मध्ये होतो, चादर हा देखील त्याचाच भाग. या भागात ' हिमालयीन बिबट्याचे' अस्तित्व आहे. वाटेत आमचे गरमा-गरम मॅग्गीचे जेवण झाले, खरंच सुख होत ते. भर दुपारी देखील थंडी वाजत होती. बर्फात वाहत्या गरम पाण्याच्या झरा! आहे ना आश्चर्य! हो, वाटेत आम्हाला एक गरम पाण्याचा झरा लागला, तो चक्क मानससरोवरापासून येतो अशी स्थानिकांची धारणा आहे. ते पाणी पवित्र मानले जाते, त्या पापण्याची चव चाखून थोडावेळ टाईमपास केला.

12
गरम पाण्याचा झरा

दरमजल करत आमच्या ' शिंगरा कोमा' या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो. आमच्या पोर्टर टीम ने आधीच आमचे तंबू उभारले होते, थंडीचा दणका होताच तापमान -३२ डिग्री. अश्या थंडीत तुम्ही तुमच्या सॅकची चैन देखील काढू शकत नाही बाकीच्या गोष्टी दूरच. सॅक मधून एखादी वस्तू काढावयाची असेल तर मोठे संकट. आत्ता हे संकट चादर वर कायम असणार होते, सॅक तर खोलावीच लागते. या अश्या जीवघेण्या थंडीत (हो खरंच जीवघेण्या गेल्यावर्षी चादर ट्रेक वर ३ लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले )चादर ट्रेक वर तुम्ही शारीरिक दृष्ट्या कितीही सक्षम असा तुम्हाला मानसिक दृष्ट्यादेखील अत्यंत सक्षम राहावेच लागते नाहीतर तुमची विकेट ठरलेली, येथे आत्मविश्वास गमावून चालतच नाही. आमच्या समोर तर भगवा फडकविण्याचे ध्येय होते मग आत्मविश्वास तेथून येतोच येतो.

9

10
मी आणि लोबझॅग

11

ध्याकाळी आमच्या साहाय्यकांनी आमच्यासाठी 'गरमागरम भजी' समोर आणली, रात्री गरमा-गरम पोळी- भाजी, भात-वरण वरून स्वीट डिश खीर. हे सगळं म्हणजे 'सोने पे सुहागा'. या स्थानिक लडाखी लोकांविषयी सांगावयाचे झाले तर अत्यंत प्रेमळ-मनमिळावू माणसे सदोदित आनंदी राहणारी, मदतीस तत्पर, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सदैव हसरी (लडाख मध्ये ८० % लोकांना रोजगार नाही , हिवाळा ५-६ महिने त्यामुळे घरातून बाहेर पडू शकत नाही उन्हाळ्यात थोडी फार शेती होते आणि काही माणसे चादर ट्रेक वर मदतनीस म्हणून येतात तोच त्यांचा काय तो रोजगार ) एवढे असून सुद्धा अगदी तुमच्या स्लिपींग बॅग ची चैन देखील हसत हसत लावतील त्यांनीच आमच्या स्लिपींग बॅगच्या चैन लावल्या आणि निद्राधीन झालो. अहो निद्राधीन झालो म्हणजे केवळ स्लीपिंग बॅग मध्ये गेलो. थंडीने हाड देखील गोठून थिजलेली केवळ मनाला आधार देत रात्रीचे तास मोजत होतो. बाहेरील तापमान -३६ डिग्री.

दिवस पाचवाचादर ( गोठलेली झंस्कार नदी, टीब्ब केव्ह )

रात्रभराच्या बर्फवृष्टीने तंबूत आत देखील बर्फ झाले होते, थंडीने कहर केला होता त्यात सकाळी तंबूच्या बाहेर येणे म्हणजे आगीतून फोफाट्यात जाणे पण करणे भाग होते. येथे तुम्ही परसाकडे जाताना पाणी वापरू शकतच नाही (हे सांगणे भाग आहे पाणी जर वापरले तर काय होते याचा अनुभव आलाय). सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम कांजी आणि छोले पुरी म्हणजे स्वप्नातील स्वर्गसुख. चादर वरील दुसऱ्या दिवसाची मार्गक्रमणा सुरुवात झाली 'जुले' ने. आमची आजची मजल होती टीब्ब केव्ह पर्यंत. चालताना बऱ्याचदा पाय घसरत होते. काही ठिकाणी पायाखाली चादरची नक्षी इतकी सुंदर होती की आपण एखाद्या मोझॅक वरून चालत असल्यासारखे वाटत होते. एकदा तर एका नक्षी खाली दुसरी नक्षी तयार झालेली दिसली आणि त्याखाली पाण्याचा प्रवाही वाहता झरा.

13

वाटेत निसर्गरूपी चित्रकाराने सजविलेली अत्यंत सुंदर चित्रे न्याहाळत मार्गक्रमणा चालू होती. या सुंदर चित्रात गोठलेल्या नदीबरोबर गोठलेले धबधबे देखील होते कधी ते चित्र एखाद्या लावण्यवती प्रमाणे वाटते तर कधी रुक्ष पुरुषा प्रमाणे हीच तर मजा आहे 'चादर ट्रेक' ची साधारण ६-७ तास 'पेंग्विन वॉक' करत आम्ही टीब्ब केव्ह पाशी पोहचलो. येथे झंस्कारच्या प्रवाहामुळे गुहा निर्माण झाल्यात त्याच ह्या 'टीब्ब केव्ह'. फार पूर्वी हिवाळ्यात याच मार्गावरून झंस्कार ते लेह दळणवळण व्हायचे तेव्हा येथे प्रवासी या नैसर्गिक गुहेत राहत असत, असो आज आमचा मुक्काम मात्र येथेच परंतु तंबूत होता. संध्याकाळी पुन्हा स्वादिष्ट आदरातिथ्याचा अनुभव अनुभव घेता घेता आर्मी ऑफिसर आम्हाला भेटावयास आले त्यांच्या म्हणण्यानुसार पुढे चादर तुटलेली असल्या कारणमुळे आम्हाला पुढे जाता येणार नव्हते. आम्ही देखील आर्मी चा शब्द प्रमाण मानला आणि पुढच्या योजना आखत थंडीत रात्र ढकलली. बाहेरील तापमान -३६ डिग्री.

15

16

17

क्रमशः

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

31 Jul 2021 - 9:38 am | प्रचेतस

आहा....!
भन्नाट एकदम.

Bhakti's picture

31 Jul 2021 - 1:11 pm | Bhakti

भारीच आहे.
नावच भारी आहे चादर ट्रेक! अलादीनच्या जादूई कालीनवर चालल्यासारख वाटल असेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Oct 2021 - 8:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

हिमालयातील ट्रेक मस्तच असतात. पण फार मोठि सुट्टी काढावी लागते आणि वर तापमान एव्हढे कमी म्हणजे आफतच.
असो, पुलेशु.

कुमार१'s picture

9 Oct 2021 - 12:32 pm | कुमार१

भारीच आहे.

गॉडजिला's picture

9 Oct 2021 - 3:51 pm | गॉडजिला

Nitin Palkar's picture

16 Oct 2021 - 7:27 pm | Nitin Palkar

तिन्ही भाग एकत्रच वाचले. खूप छान लिहिलंय.