मसुर पुलाव
साहित्य (चार जणांसाठी) :-
दोन वाट्या बासमती तांदुळ
अर्धी वाटी अख्खा मसुर
एक मोठ्या आकाराचा कांदा
एक मोठ्या आकाराचा बटाटा
एक मध्यम आकाराचा टोमॅटो
अर्धी वाटी फ्लॅावर
अर्धी वाटी गाजर
चार हिरव्या मिरच्या
दोन टेबलस्पुन साजुक तुप
दोन तमालपत्राची पाने
तीन दालचीनीचे तुकडे
एक मोठी (मसाल्याची) वेलची
एक चक्रीफुल
आठ-दहा लवंगा
एक टिस्पुन गरम मसाला
एक टिस्पुन धने व बडीशोप पुड
एक टिस्पुन आले लसुण पेस्ट
एक टिस्पुन हिरव्या मिरचीचा ठेचा
आठ-दहा कडीपत्त्याची पाने
दहा-बारा काजु
चवीपुरते मीठ
नॅानस्टीक कुकर अथवा पॅन मधे मध्यम आचेवर साजुक तुप तापवून त्यात अर्ध्या रिंग्जच्या आकारात कापलेला कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतल्यावर त्यात लवंगा, वेलची, तमालपत्र, दालचीनी, कडीपत्ता, उभी चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या आणि काजु घालुन चार-पाच मिनीटे परतावे.
कांद्याचा रंग गोल्डन ब्राउन झाल्यावर त्यात आधी रिंग्जच्या आकारात कापून पुन्हा चार भागात कापलेला टोमॅटो, आले लसुण पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि तीन ते चार तास भिजवून ठेवलेला अख्खा मसुर घालुन दोनेक मिनीटे सतत ढवळावे.
त्यानंतर थोड्या मोठ्या फोडी कापलेला बटाटा, फ्लॅावर, गाजर, गरम मसाला आणि धने-बडीशोप पुड घालुन दोन-तीन मिनीटे परतल्यावर त्यात चार वाट्या पाणी आणि आवडीनुसार मीठ घालावे.
मिश्रणाला चांगली उकळी फुटल्यावर त्यात धुतलेला बासमती तांदुळ घालुन गॅसची आच मोठी करून मिनीटभर ढवळावे.
पाच मिनीटे मोठ्या आचेवर (न ढवळतां) शिजवल्यावर पुन्हा गॅसची आच मध्यम करावी. दम लावण्यासाठी चांगल्या जाड ताटाच्या सपाट बाजुला वर्तमान पत्राचा कागद पाणी लाऊन व्यवस्थीत चीकटवुन झाकण म्हणुन कुकर/पॅनवर ठेउन त्यावर लोखंडी खलबत्ता, वरवंटा पैकी काही नसल्यास सरळ दोन-तीन दगड वजन म्हणुन ठेवावे. (आमच्याकडे बिना शिट्टीचा नॅानस्टीक कुकर असल्याने कागद आणि वजन वापरावे लागले नाही)
बारा ते पंधरा मिनीटांनी गॅस बंद करून पुढे पाच-सात मिनीटे वाफ मुरू द्यावी.
तयार झालेला स्वादिष्ट मसुर पुलाव भाजलेले उडदाचे पापड आणि स्लाईस्ड कांदा टोमॅटो बरोबर सर्व्ह करावा. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरचीची दह्यातली कोशिंबीर पापडांच्या जोडीला असल्यास सोने पे सुहागा!
शेजारी भोचक असतील तर पुलाव तयार होत असताना पसरलेल्या सुगंधामुळे तुमच्या घरात काय शिजतय याची विचारणा करायला नक्की येणार ह्याची खात्री बाळगा.
प्रतिक्रिया
29 Jul 2021 - 4:38 pm | वामन देशमुख
सुगंध दरवळला आहे पुलावाचा!
29 Jul 2021 - 4:50 pm | टर्मीनेटर
धन्यवाद 😀
परवा लिहिलेल्या लेखात घाऊक प्रमाणात तयार केलेल्या मसूर पुलावचा उल्लेख केला होता.
खरंतर मी हा पदार्थ २६ तारखेला पहिल्यांदाच खाल्ला आणि फार आवडला. आचारी तो बनवत असताना व्हिडिओ चित्रित केला होता त्याचा उपयोग करुन काल रात्री घरी स्वतः करुन बघितला.
मस्तच झाला होता, घरच्या सगळ्यांना आवडला!
29 Jul 2021 - 4:56 pm | गॉडजिला
तो पा सू
29 Jul 2021 - 5:07 pm | टर्मीनेटर
😋
29 Jul 2021 - 5:28 pm | सरिता बांदेकर
मस्त आहे रेसीपी. माझी आवडती रेसीपी आहे ही.
फक्त मी ती बिर्याणी टाईप बनवते.आयत्या वेळेला कुणी आलं की नवीन पदार्थ म्हणून लोकं खूष होतात.
रेसीपी फोटोसकट टाकल्या बद्दल धन्यवाद. मी सांगताना नेहमीच गडबड करते त्यामुळे सगळे वैतागतात आता ही रेसीपी देईन.
29 Jul 2021 - 8:51 pm | टर्मीनेटर
अरे वाह!
आता मी बिर्याणी टाईप बनवून बघतो.
29 Jul 2021 - 5:47 pm | कंजूस
पाकृ आवडली.
________________________________
पण मसूर पुलाव देण्याचं सुचवलं कुणी?
29 Jul 2021 - 9:40 pm | टर्मीनेटर
एका गुजराती मित्राच्या (बुऱ्हाणपूरला माहेर असलेल्या) बायकोने सुचवले!
29 Jul 2021 - 5:51 pm | सौंदाळा
पुलावाची शीते मोकळी आहेत आणि मसुर, भाज्यांचा पण शिजुन गाळ झाला नाही - एकदम परफेक्ट, तोंपासु
साधारण आपण नेहमी करतो तसाच पुलाव आहे पण मसुराची हटके चव नक्कीच येणार.
इनोव्हेशन आवडले. नक्की करुन बघेन
बेळ्गावच्या नातेवाईकांकडुन मसुर आणि नागोठण्याच्या नातेवईकांकडुन कडवे वाल दरवर्षी मागवतो. यावेळी वाल आले नाहीत पण मसुर मात्र पोहोचले.
मसुराची उसळ, मसुराची आमटी आणि आंबोळ्या खायला एकदम मज्जा येते. पुलाव पण चविष्ट होइल.
29 Jul 2021 - 9:42 pm | टर्मीनेटर
+१
हो ती येतेच!
29 Jul 2021 - 6:53 pm | प्रचेतस
कहर दिसतोय पुलाव. मसूर आवडत नाही तसा मात्र ह्या पुलावात नक्कीच भन्नाट लागत असणार.
29 Jul 2021 - 9:48 pm | टर्मीनेटर
हो, मलाही मसुराची उसळ घातलेली मिसळ आवडली नव्हती, बायकोच्या माहेरी आमटी पण तुरीची न करता मसुराची करतात ती पण मला विशेष नाही आवडत पण हा पुलाव मात्र पहिल्या फटक्यात आवडला!
29 Jul 2021 - 7:39 pm | चामुंडराय
मसूर पुलाव भारीच !!
पुलावाचा शेवटचा फोटो एकदम कातिल.
अगदी तों पा सु
29 Jul 2021 - 9:52 pm | टर्मीनेटर
@ चामुंडराय
फोट प्रमाणेच पुलावाची चवही कातिल होती 😀
29 Jul 2021 - 11:45 pm | चामुंडराय
अर्थात असणारच !
परंतु सध्याच्या तंत्रज्ञानामुळे फक्त चक्षुसौख्याचा लाभ घेता येतो, जेव्हा जिव्हासौख्य तंत्रज्ञान देखील उपलब्ध होईल तेव्हा अप्रतिम चवीचा अभिप्राय देणे शक्य होईल.
29 Jul 2021 - 11:58 pm | टर्मीनेटर
करेक्टो! 👍
29 Jul 2021 - 8:18 pm | मदनबाण
आहाहा... लयं भारी ! च्यामारी उपवासात असताना असं काही पाहणं देखील लईच त्रासदायक होतं बघा !
आजच घरी म्हणालो होतो... पुलाव खायची फार इच्छा होत आहे. मधल्या काळात इथे कोणी तरी तवा पुलाव दिला होता, तो पाहुन मी घरी स्वतःच्या हाताने बनलेला पुलाव सगळ्यांना शॉलिट्ट आवडला व्हता ! :) [ कोणाला तो धागा माहित असेल तर नक्की तो परत वर आणाच... ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front
29 Jul 2021 - 9:53 pm | टर्मीनेटर
चातुर्मास पाळता का?
30 Jul 2021 - 7:33 am | मदनबाण
नाही, म्हणजे कांदा लसुण खाणे शक्यतो टाळतो.मी पहिल्यांदाच केवळ तरल पदार्थांवर [ मुख्यत्वे पाणी आणि ताक ]राहुन उपवास केला असुन डॉ. जमनादास यांचा व्हिडियो पाहुन मी हे करायचे ठरवले ! यावर इथे व्यक्त झालो आहे. मागच्या शनिवारी याला सुरुवात केली आज ७ वा दिवस आहे. [ घरचे आग्रह करत आहेत की आता हा आत्मनिग्रह थांबवावा. :) ]
पहिले २ दिवस कठीण असतात... त्यानंतर तुम्हाला स्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळते हा मुख्य अनुभव. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism
30 Jul 2021 - 1:07 pm | ज्ञानोबाचे पैजार
खरंतर घाउक प्रमाणात केलेला मसुर पुलाव बघायला आलो होतो.
पण हा सुध्दा आवडला. काय कातिल फोटो आहेत...
पैजारबुवा,
1 Aug 2021 - 10:56 pm | जागु
मस्तच
2 Aug 2021 - 10:07 am | king_of_net
मस्तच!!
3 Aug 2021 - 1:50 pm | टर्मीनेटर
प्रतिसादासाठी आभार _/\_