सारखं छातीत दुखतंय

Shantanu Abhyankar's picture
Shantanu Abhyankar in जनातलं, मनातलं
8 Jun 2021 - 10:42 am

सारखं छातीत दुखतंय
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

बऱ्याच बायकांना सारखं ‘छातीत’, म्हणजे स्तनाच्या गाठीत, दुखत असतं. बरं दुखतंय म्हटलं आणि विशेषतः छातीत दुखतंय म्हटलं की बहुतेक बायकांना एकच आजार आठवतो, कॅन्सर!! मग त्या सैरभैर होतात. कुठेही खुट्ट वाजलं की छातीत धस्स होण्याची सवय असतेच काहींना. महत्वाचा मुद्दा एवढाच की, दुखणारी गाठ सहसा (९५% वेळा) कॅन्सरची नसते कारण कॅन्सरची गाठ सहसा दुखत नाही!!
अशाच एक बाई रात्रभर नवऱ्याला त्रास द्यायच्या. बाहेर काही वाजलं, कुत्रं जरा भुंकलं, वाऱ्यानी पत्रा जरी वाजला, तरी त्यांचं आपलं एकच टुमणं; ‘अहो ऐकलंत का, बाहेर काहीतरी आवाज येतोय. जाऊन बघा बरं. चोरा चिलटाचं लई भ्या सांगतात आजकाल!’ रात्र रात्र खेटे घालून नवरा वैतागला. म्हणाला, ‘अगं चोर काय वाजत गाजत येणारेत व्हय? येडी कुठची.’
यावर परिस्थिती आणखी चिघळली. आता त्या बाई, ‘बराच वेळ झाला, कुठेही खुट्ट सुद्धा वाजलं नाही,’ म्हणून नवऱ्याला उठवतात.
तेंव्हा ‘कॅन्सरची गाठ सहसा दुखत नाही’ हे वाचून, ‘सध्या काहीच दुखत खुपत नाहीये, सबब कॅन्सर असणार’, असा निष्कर्ष मात्र कृपया काढू नका!
स्तनात वेदना उद्भवण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यातील बहुतेक किरकोळ, साधीशी आहेत.
पाळीच्या चक्रातील संप्रेरकांतील (हॉर्मोनस्) असंतुलन हे एक कॉमन कारण आहे. हा त्रासही चक्रीय असतो आणि दोन्ही बाजूला होतो. पाळीच्या आधी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन वाढतात, यामुळे स्तन फुगतात, आणि दुखतात. दोन बोटांनी चाचपून पहिलं की बारीक बारीक, गाठी गाठी लागतात. काखेजवळच्या भागात आणि कधीकधी काखेत वेदना जाणवतात. पाळी येताच हा त्रास बंद होतो. सह्य असेल तर हा त्रास म्हणजे कोणताही मोठा आजार मानला जात नाही. एका नैसर्गिक क्रियेची व्यक्तीगणिक बदलणारी ठेवण, एवढाच त्याचा अर्थ. त्यात काळजी करण्यासारखं काही नाही.
गरोदरपणाच्या सुरवातीलाही हा प्रकार आढळतो. सुरवातीला तीन महीने स्तन हुळहुळे झाल्याचं बऱ्याच पेशंट सांगतात. यालाही काही उपचार लागत नाही. लागलेच तर दारू, सिगरेट, कॉफी, बंद; मीठ कमी आणि लागली तर एखादी वेदनाशामक गोळी; एवढेच उपचार पुरतात. आपल्याकडे तसंही बायका दारू-सिगरेटच्या फंदात विशेष नसतात.
काहींना गर्भनिरोधक गोळ्यांनी किंवा वयस्कर स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या इसट्रोजेनच्या गोळ्यांनी त्रास होतो. मानसिक आजारासाठीची काही औषधे (क्लोरप्रोमॅझीन), हृदयविकारावरील काही औषधेही (मूत्र-विरेचक, मिथीलडोपा अथवा डिजिटॅलीस) स्तनशूल निर्माण करतात. ह्या गोळ्यांचं स्वरूप बदललं की त्रास थांबतो.
कधीतरी पूर्वीच्या शस्त्रक्रियांचे व्रण दुखत रहातात. कधी स्तनाच्या गाठीला कळत नकळत मार लागतो आणि जागा दुखायला लागते; सुजते, लाल होते, काळीनिळी होते. टेबलाचा कोपरा किंवा लहान मुलाचा धक्का लागलेला असतो. कधी मोठ्या मुलाचाही लागलेला असतो! इतरत्र मुका मार लागल्यावर जे उपचार केले जातात तेच इथेही लागू पडतात.
योग्य मापाची अंतरवस्त्रे नसतील तरीही कधी स्तनाची गाठ दुखू शकते. विशेषतः व्यायाम करताना, सतत काम करताना, जर योग्य मापाचे कपडे नसतील तर स्तनांना आधार देणाऱ्या लीगामेंट्सवर ताण येतो आणि वेदना होतात.
काही स्त्रियांच्या मध्ये स्तनाचा आकार अव्वाच्यासव्वा वाढतो आणि स्तनांबरोबर मान, खांदे वगैरेही ह्या भाराने भरून येतात.
कधी कधी फासळ्या, तिथले स्नायू वगैरेत काही सूज असते, इजा असते आणि वेदना मात्र स्तनात आहे असा समज झालेला असतो. नीट शारीरिक तपासणी केली की हा फरक स्पष्ट होतो आणि योग्य ते उपचार करता येतात. फासळ्यांत मऊ (कूर्चा, Cartilage) आणि कडक (हाड) असे भाग असतात. वयात येताना यांच्या सीमारेषेवर सूज येते. यातही बरेचदा स्तन दुखतोय असा गैरसमज होऊ शकतो.
कधी कधी स्तनांत हाताला टमटमीत गाठ लागते. एखादा पाण्यानी टम्म फुगलेला फुगा असावा, अशी. असल्या गाठी कसल्या आहेत याचा शोध घेण्यासाठी सोनोग्राफी, मॅमोग्राफी (स्तनाचा एक्सरे) आणि गाठीतील पाणी काढून तपासले जाते. बरेचदा पाणी काढून भागते. निदनही होते आणि उपचारही. वेगळं काही करावंच लागत नाही.
इतक्या सगळ्या साध्यासुध्या गाठींची माहिती वाचल्यावर तुमच्या मनात आपोआपच प्रश्न आला असेल, ‘मग कॅन्सरची शंका कधी घ्यायची?’
दुखणारी गाठ सहसा (९५% वेळा) कॅन्सरची नसते कारण कॅन्सरची गाठ सहसा दुखत नाही!! कॅन्सरची गाठ चांगली कडक लागते, बटाट्यासारखी. पण बटाट्यासारखी गोलमटोल आणि एकसंघ जाणवण्याऐवजी वेडीवाकडी, कडा अस्पष्ट असलेली आणि पसरट लागते. पातळ गोधडीखाली आल्याची फणी चाचपावी, अशी. गाठीवरील त्वचा बरेचदा आक्रसलेली आढळते. या बरोबर काखेतही हाताला गाठी जाणवतात किंवा तपासणीत आढळतात. ही सारी कॅन्सरची दुष्चिन्हे
अर्थात वेदना असो वा नसो प्रत्येक गाठ नीट तपासून मगच काय तो निष्कर्ष काढला पाहिजे.
पूर्वप्रसिद्धी
लोकमत
सखी पुरवणी
८ जून २०२१

आरोग्यआरोग्य

प्रतिक्रिया

त्यात न अडकता वेळीच योग्य कृती काय असावी हे माहीत असणे तितकेच आवश्यक ठरते, म्हणूनच आपण थोड्याच शब्दात महत्वाचा असा जो तपशील लिहला आहे त्यासाठी आपले अत्यन्त आभार.

तनमयी's picture

8 Jun 2021 - 3:13 pm | तनमयी

प्रतिसाद मोबाइलवरुन लिहताना जर मोबाइल मधील स्मायली टंकली तर फक्त टायटलच प्रकाशित होते... अर्थात इतरही कारणे आहेत पण सर्वप्रथम अँड्राइडमधील स्मायली वापरणे टाळावे.

तनमयी's picture

8 Jun 2021 - 3:13 pm | तनमयी
तनमयी's picture

8 Jun 2021 - 3:13 pm | तनमयी
तनमयी's picture

8 Jun 2021 - 3:14 pm | तनमयी

कधी मोठ्या मुलाचाही लागलेला असतो

तनमयी's picture

8 Jun 2021 - 3:16 pm | तनमयी

खी खी

तनमयी's picture

8 Jun 2021 - 3:21 pm | तनमयी

बहिणीला केमो दिली होती
खुप त्रास झाला होता

चौथा कोनाडा's picture

8 Jun 2021 - 5:43 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण धागा !

पाषाणभेद's picture

10 Jun 2021 - 10:25 am | पाषाणभेद

लेख लिहील्याबद्दल धन्यवाद.

एक निरीक्षण आहे की वर्तमान पत्रात आरोग्य किंवा आजारावर जे लेख येतात त्यात आजाराचे स्वरूप, लक्षणे अन उपचार या विषयी भाष्य असते.
पण तो आजार होऊच नये यावर फारसे काही लिहीले जात नाही. असल्यास त्रोटक स्वरूपात असते.

तुषार काळभोर's picture

14 Jun 2021 - 6:32 am | तुषार काळभोर

मार्गदर्शक आणि सुगम लेख.