काल मी लिहिलेल्या लेखात अतिरेकी कसा बनतो याची प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न केला होता. माणसाच्या विचारसरणीत द्वेष, तिरस्कार, भिती आणि क्रौर्य भरले की अतिरेकी बनविणे सोपे असते. धर्माच्या नावावर ते सहज आणि सोपे असतेच. त्यात संधीसाधू लोक अश्या तरुणांचा पद्धतशीर वापर करून घेत असतात. या माझ्या विधानाला कोणताही समाज, धर्म, वंश अपवाद राहू शकत नाही. यात मुस्लिम अतिरेकी, हिंदू यात तमिळ, पंजाबी, सध्याच्या बॉम्ब स्फोटात सहभागी असलेले सर्वच अतिरेकी येतात. मला या लोकाबद्दल तिरस्कार वाटण्यापे़क्षा यांच्याबद्दल सहानुभुतीच वाटते. अर्थातच वेळप्रसंग पाहून त्यांना हवे तसे शासनही करावयाला हवे याबद्दल दुमत नाही / नसावे. माझा मुख्य मुद्दा अतिरेकी ही जर प्रक्रिया असेल तर, प्रक्रियेला गांधीवादाने शह देता येईल का असा आहे. यात या लेखात मला समजलेली गांधीवाद यावर लिहिण्याचे धाटत आहे.
बर्याच वेळी लोकांचे आकलन, माहिती आणि सारासार विचार करण्याची एकसाची अशी पद्धत असते. याला छेद देण्याचे कार्य या लेखमालेने व्हावे असे मला वाटते. अजून एका मुद्याचा विचार करायला हवा की अतिरेक्यांवर कायमस्वरुपी हिंसेने विजय मिळेल का? खरेतर हिंसा असो अथवा अहिंसा यांना नियम आणि आवश्यकता मात्र एकाच प्रकाराचीच असते. कधी ती पूर्ण विरुद्ध असते इतकाच तो फरक.हिंसक अथवा अहिंसक लढ्याला दिर्घकालीनची पूर्वतयारी करावी लागते, या लढ्यासाठी चांगल्या नेत्याची गरज दोन्ही बाजूला असते, दोन्हीकडे तत्त्वासाठी प्राणाचे बलिदान करणारे कार्यकर्ते लागतात, नेत्याला सर्वसाधारण माणसाच्या वर्तन आणि विचाराच्या पद्धतीचे योग्य अथवा पराकोटीच्या क्षमतेचे ज्ञान असावेच लागते.
यात दोघातील मुख्य फरक म्हणजे, हिंसक लढ्याला एक विशिष्ठ असा समयबिंदु निर्माण करावा लागतो, विरुद्ध प़क्षाचे मनोबल हताहत करावे लागते, द्वेष, हिंसा आणि तिरस्कार कायमच फुलवावा लागतो, त्याला दिव्य अशा स्वप्नांची भुरळ घालावी लागते, तर अहिंसक लढ्यात नेत्याला आपल्या वर्तनावरच ल़क्ष ठेवावे लागते, आदर्शावर कायम राहावे लागते इत्यादी इत्यादी. ( याचा उहापोह पुढे येईलच. ),
या दोन्ही प्रक्रियेला काही बलस्थाने आहेत तर काही अंगभूत मर्यादाही आहेत.
आपल्या सर्वाच्या सुदैवाने आपल्यात गांधी नावाचा हाडामासाचा माणुस झाला आणि कदाचित आपल्या भावी पिढ्या यावर विश्वासही ठेवणार नाही. ( आईनस्टाईनेचे असे वक्तव्य आहे.)
तर मला समजलेला गांधीवाद खालीलप्रमाणे आहे.
1.साध्य साधन शुचिता : आपल्याला जे काही साध्य करावयाचे आहे त्यात कोणतेही साधन वापरायला गांधीवादात अनुमती नाही. साध्य आणि साधन या दोन्हीवर गांधीवाद कमालीचा काटेकोर असतो. ( स्वातंत्र्य चळवळीत गांधीनी ते वेळोवेळी सिद्ध केले आहेच).
2.प्रचार आणि प्रसाराचे पूर्ण वापर करणे, कोणतीही गुप्तता न पाळणे: गांधी अफ्रिकेतून भारतात १९१७ च्या सूमारास येण्यापूर्वीच त्यांनी १०००० पत्रिका छापून त्याकाळच्या भारतातील सर्व वर्तमानपत्रांच्या संपादकाना, सामाजिक कार्यकर्त्यांना पाठविल्या होत्या. त्यामूळे गांधी येण्यापूर्वीच त्यांच्या बर्यापैकी कामाची प्रसिद्धी केली होती.( वर्तमानपत्राचा, पुस्तकाचा प्रचंड उपयोग आपल्या लढ्यासाठी गांधीनी केला होता.)
3.कोणत्याही चळवळीत सर्वांचा सक्रिय सहभाग घेणे. कोणतेही आंदोलन हे जन आंदोलन ठेवणे आणि यात सर्व म्हणजे स्त्री, पूरुष, मुले, गरिब, श्रीमंत, सर्व धर्माचे लोक यांचा सहभाग मिळविणे.
4.समोरच्या व्यक्तिच्या मताबद्दल आदर ठेवणे आणि आपले मतही योग्य ती कारणमिमांसा देत व्यक्त करत जाणे. ( अपवाद सुभाषचंद्रबोसाच्या बाबतीत).
5.कोठे आपल्याकडून चुक होत असेल किंवा उत्साही कार्यकर्त्याकडुन चुक होत असेल तर ती मान्य करणे आणि वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास असे भरकटलेले आंदोलन विनाअट मागे घेणे. ( चौरीचौराचा लढा).
6.उदारमतवाद विकसित करणे, सर्वधर्म समभाव. (एकाने डोळे फोडले म्हणुन दुसऱ्याचे डोळे फोडले तर सारे जगच आंधळे होईल. धर्म अंतिम सत्याकडे जाण्याचा मार्ग आहे ते अंतिम सत्य नव्हे अश्या शिकवणीचे आचरण आणि सिद्ध करणे.)
7. समोरच्या व्यक्तिने चूक केली असेल आणि त्यात योग्य ते मतपरिवर्तन झाले असेल तर ते मान्य करणे आणि त्याला आपल्या विचारधारेत सहभागी करून घेणे.
मला समजलेला गांधीवाद मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
गांधीवादाचा गाभा हा माणसाला केंद्रबिंदू ठेवणारा आहे. जगाच्या आजच्या हिंसक, चिथावणीखोर कामावर या विचारसरणीने ताबा मिळवता येऊ शकतो अथवा शांतताप्रेमी लोकांना योग्य असे बल ही विचारसरणी देउ शकते असे माझे ठाम मत आहे. स्वातंत्याच्या वेळी स्वातंत्र्य, समता आणि बंधूता हे त्याचे ध्येय होते. आजच्या काळात त्याहीपे़क्षाही जास्त या वादाने / विचारसरणीने साध्य होऊ शकते असे मला वाटते. गांधीवाद हा आचरण्यास जरी कठिण असला तर त्याचे बक्षिस मात्र मोठे असते.
पूढच्या भागात ही तत्वे कशी कार्यान्वित आणावी, आणता येईल यावर विवेचन असेल. अतिरेक्यांच्या विचारसरणीतला द्वेष आणि क्रुरता कशी कमी करता येईल असा पूढच्या लेखाचा गाभा असेल.
प्रतिक्रिया
30 Nov 2008 - 11:23 pm | लिखाळ
नमस्कार,
आपले दोनही लेख वाचले. दुसर्या भागामध्ये आपण आपणाला अभिप्रेत गांधीवाद मांडला आहे. (गांधींनी आपली तत्वे आचरणात कशी आणली यावर तज्ञ उहापोह करतीलच. उदा. प्रसिद्धी वगैरे..)
मला मलेरिया झाला तर मी काय करीन? असा प्रश्न मी स्वतःला विचारला आणि त्याची काही उत्तरे मिळाली. दहशतवादाने आणि भ्रष्टाचाराने गांजलेल्या देशाच्या परिस्थितीशी या उत्तरांचा काही मेळ बसतो असे वाटले.
उपाय १. मी ताबोडतोब औषधे घेऊन मलेरिया बरा करण्याचा प्रयत्न करीन.
उपाय २. मलेरिया बरा झाला की माझी प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करीन जेणेकरुन मला स्वतःला पुन्हा मलेरिया होणार नाही. आणि मच्छरदाणी लाऊन झोपेन जेणे करुन एखादा चुकार डास आलाच तर तो मला चावणार नाही.
उपाय ३. मलेरियाचे डास होऊच नयेत म्हणून आसपासच्या परिसारात पाणी साठणार नाही याची काळजी घेईन.
मनुष्याचे मत परिवर्तन करुन अतिरेकी मनोवृत्ती होऊच नये याची काळजी घेणे बहुधा उपाय तीन मध्ये बसत असावे. पण सुरुवात स्वतः औषध घेऊनच करायला लागणार आहे. अवांतर : पण पोलीसदलाला निधीवाटपात जास्त वाटा देणे या व्यतिरिक्त काही ठोस उपाय आपले नेतृत्व शोधणार का? हे जाणून घ्यायला मी सध्या उत्सुक आहे.
माझा अजून एक मुद्दा असा, की चूक करणारा माणूस आहे, त्याच्या विवेकावर भरवंसा ठेऊन त्याला आधी चार वेळा क्षमा करणे, त्याचे मत परिवर्तन करणे या बद्दल महाभारतकाळापासून उहापोह होत असताना, बुद्धाने या तत्वावर अजून प्रकाश पाडलेला असताना, अनेक संतांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणातून अधुनिक काळातही याची उदाहरणे तयार करुन ठेवलेली असताना या तत्वाला गांधीवाद म्हणण्याचे काही विशेष कारण आहे का? अशी उत्सुकता आहे. की तो अहिंसावाद आणि गांधीवाद यात काही मुलभूत फरक आहेत? यावर कृपया प्रकाश टाकावा ही विनंती.
-- लिखाळ.
1 Dec 2008 - 10:33 pm | कलंत्री
लिखाळ साहेब,
आपण प्रश्न आणि त्याबाबतची उत्तरे देऊन माझे काम सोपेच केले आहे. कदाचित मला समजलेला गांधीवादापेक्षा आपल्याला समजलेला गांधीवाद / अध्यात्मवाद हा जास्त परिपक्व आहे. ( प्रथम रोगाला आटोक्यात आणणे आणि नंतर त्यावर परत कधी होउ नये अशी योजना करणे.).
कोठेतरी अन्यत्र उत्तर दिल्याप्रमाणे गांधीवाद हा आपला वैदिक संस्कृतीचा परिपाक आहे. त्याला कोणतेही शब्द दिले तर मला ते मान्य आहे.
पुनश्च धन्यवाद.
द्वारकानाथ
1 Dec 2008 - 10:42 pm | लिखाळ
आपले साधे सरळ उत्तर वाचून आनंद झाला. परिपक्व कोण आहे ते त्यातच समजले.
आपण मांडलेली चर्चा, मते आणि प्रतिसाद वाचून मला म्हणावेसे वाटते की,
राजाने (शासनकर्त्याने) तत्वज्ञ असावे पण तत्वज्ञाने राजा होऊ नये.
उत्तम शासनकर्ता आपल्या पदरी तत्वज्ञ बाळगतो म्हणजे तो शासन योग्य तर्हेने करु शकतो. चाणक्य आणि चंद्रगुप्त ही जोडी विचार करण्यासारखी आहे.
-- लिखाळ.
30 Nov 2008 - 11:41 pm | सर्वसाक्षी
<या लोकाबद्दल तिरस्कार वाटण्यापे़क्षा यांच्याबद्दल सहानुभुतीच वाटते. >
सहानुभुती कशाबद्दल?
त्यांना सहानुभुतीची अजिबात पडलेली नाही, ते त्यांच्या ध्येयासाठी मरायला खुषीने तयार आहेत.
<अर्थातच वेळप्रसंग पाहून त्यांना हवे तसे शासनही करावयाला हवे याबद्दल दुमत नाही / नसावे>
अरे वा! म्हणजे आपल्याला योग्य वेळ सापडेपर्यंत ते अतिरेकी वाट्पाहत उभे राहतील वा आपण पुकारा करताच 'हजर गुरूजी' म्हणुन शिक्षा स्विकारायला पुढे हजर होतील अशी आपली अपेक्षा आहे का?
<यात दोघातील मुख्य फरक म्हणजे, हिंसक लढ्याला एक विशिष्ठ असा समयबिंदु निर्माण करावा लागतो, विरुद्ध प़क्षाचे मनोबल हताहत करावे लागते, द्वेष, हिंसा आणि तिरस्कार कायमच फुलवावा लागतो, त्याला दिव्य अशा स्वप्नांची भुरळ घालावी लागते, तर अहिंसक लढ्यात नेत्याला आपल्या वर्तनावरच ल़क्ष ठेवावे लागते, आदर्शावर कायम राहावे लागते इत्यादी इत्यादी. >
द्वारकानाथजी,
आपल्या गांधीग्रस्त विचारसरणीमुळे आपल्याला सशस्त्र क्रांती आणि हिंसक लढा यातला फरक समजला नसावा वा तो मान्य करायची आपली मानसिकता नसावी.
माझ्या माहितीप्रमाणे क्रांतिपर्वातील तमाम हुतात्म्यांनी देशावर प्रेम केले व शत्रूचा तिरस्कार केला मात्र द्वेष कुणाचा केला नाही. मात्र गांधींनी सातत्याने सर्व हुतात्म्यांचा व क्रांतिकारकांचा सतत द्वेष व उपहास केला आहे.
क्रांतिपर्वातील हुतात्म्यांनी स्वतः स्वप्ने पाहिली नाहीत वा इतरांना त्यांची भुरळ घालायचा प्रयत्न कधीही केलेला नाही. त्यांचे एकमेव स्वप्न होते 'स्वतंत्र हिंदुस्थानचे'. मात्र उद्याच्या पिढीला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आज आपण बलिदान द्यायचे आहे याचे पूर्ण भान त्यांना होते. नुसत्या घोषणा देउन शत्रू आपल्याला स्वातंत्र्य देइल अशी स्वप्ने गांधींनीच भाबड्या जनतेला दाखवली.
<कोठे आपल्याकडून चुक होत असेल किंवा उत्साही कार्यकर्त्याकडुन चुक होत असेल तर ती मान्य करणे आणि वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास असे भरकटलेले आंदोलन विनाअट मागे घेण>
जर चौरीचौरा येथील जाळ्पोळ व हिंसेमुळे गांधींनी आंदोलन मागे घेतले तर ४२ चे ही घ्यायला हवे होते. ते का नाही घेतले?
<समोरच्या व्यक्तिच्या मताबद्दल आदर ठेवणे आणि आपले मतही योग्य ती कारणमिमांसा देत व्यक्त करत जाणे. ( अपवाद सुभाषचंद्रबोसाच्या बाबतीत).>
मग हुतात्मा भगतसिंग व तमाम हिंसप्रसे च्या सदस्याचे तसेच अन्य क्रांतिकारकांचे काय?
गांधींना हिंसा मान्य नव्हती म्हणजे क्रांतिकारकांनी क्रूर इंग्रजांची केलेली ह्त्या त्यांना मान्य नव्हती. इंग्रजांनी कितीही हींसा केली तरी गांधींना त्याचे सोयर सुतक नव्हते.
जालियनवाला बाग हत्याकांडापासून ते इंग्रज सरकारचे युद्धमित्र अमेरिकेने जपानवर अणूबाँब टाकुन केलेल्या नृशंस हत्याकांडापर्यंत गांधींनी एकदाही एकाही कृत्याविरुद्ध जुलमी इंग्रज सरकारविरुद्ध प्रखर आंदोलन वा आमरण उपोषण केले नाही. असे का?
हुतात्मा भगतसिंग व साथिदारांनी कै. लालाजिंच्या मृत्युचा प्रतिशोध व त्याहीपेक्षा हिंदुस्थानात षंढ राहत नसून इथली अस्मिता मेली नाही यहे दाखवुन देण्यासाठी स्कॉट हत्येचा बेत आखला व त्यात साँडर्स मारला गेला. या बाबतीत ज्यांनी हिंसा केली त्यांना फाशी झालीच पाहिजे अशी भूमिका गांधीनी घेतली. मग फाशी ही हिंसा नाही? तिला विरोध का नाही केला? लालाजींचा मृत्यु कसा झाला? ते नि:शस्त्र आंदोलन करीत असताना स्कॉट व त्याच्या पोलिसांनी त्यांना अत्यंत क्रूरपणे बेदम मारहाण केली व त्यात तो नेता हौतात्म्य पावला. ही तर उघड पणे पोलिसांनी केलेली हिंसा होती. मग हुतात्मा भगतसिंग व साथीदारांना फाशी देण्याआधी सरकारने स्कॉट व अन्य सहभागी पोलिसांना फासावर लटकावावे अशी मागणी गांधींनी का बरे केली नाही?
इथे सरळ सरळ दिसुन आले की गांधींना नेतृत्वात स्पर्धा सहन होत नव्हती. देशाचे स्वातंत्र्य नंतर आधी माझे महात्म्य!
1 Dec 2008 - 1:26 am | इनोबा म्हणे
माझ्या माहितीप्रमाणे क्रांतिपर्वातील तमाम हुतात्म्यांनी देशावर प्रेम केले व शत्रूचा तिरस्कार केला मात्र द्वेष कुणाचा केला नाही. मात्र गांधींनी सातत्याने सर्व हुतात्म्यांचा व क्रांतिकारकांचा सतत द्वेष व उपहास केला आहे.
सहमत आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
1 Dec 2008 - 10:41 pm | कलंत्री
सर्वसाक्षी,
सर्वसाधारण माझा या लेखमालेमागचा हेतु हा गांधीवादाने अतिरेकीलोकांचा (त्यातही पाकपुरस्कृत अतिरेकीलोकांचा पाडाव कसा करावा) असा आहे. आपण गांधी याव्यक्तिबद्दल जे काही लिहित आहात / लिहिले आहे त्याला साधार असा पुरावा असेलच. आवश्यकता असल्यास आपण त्यावर वेगळी चर्चा करु या. गांधीवाद ते सध्याचा अतिरेकीसाठी काही प्रतिसाद अनुत्तरित असेल तर नंतर परत वाचुन यथायोग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतोच.
सस्नेह,
द्वारकानाथ
1 Dec 2008 - 10:54 pm | सर्वसाक्षी
द्वारकानाथजी
मी या प्रश्नांच्या उत्तरांची अनेक वर्षे वाट पाहतो आहे, आशा आहे एक ना एक दिवस आपण उत्तर द्याल!
1 Dec 2008 - 11:32 pm | कलंत्री
सर्वसाक्षी,
माझे लेखनकौशल्य आणि विचारप्रक्रिया बेताचीच आहे. आपण कधीतरी भेटू आणि मी प्रामाणिकपणे मला जे जे वाटते ते सांगेन.
जमलेतर येत्या मिपाच्या कट्टयाला या. तेंव्हा आपण चर्चा करु या.
द्वारकानाथ कलंत्री
2 Dec 2008 - 12:00 am | सर्वसाक्षी
तत्वे वेगळी आणि मैत्री वेगळी. मी हौतात्म्य पत्करलेल्या प्रत्येक हुतात्म्याच्या वतीने आपल्याला काही प्रश्न केले आहेत, जमल्यास उत्तर द्या. पण इथे चारचौघात द्या - जसा मूळ लेख दिला आहेत तसे. प्रत्यक्ष भेटु तेव्हा मौजेच्या गप्पा मारु, ख्याली खुशाली विचारु पण इथले मामले इथेच!
2 Dec 2008 - 7:04 am | कलंत्री
सर्वसाक्षी.
आपला वाद-संवाद स्वातंत्र्य प्राप्तीचा लढा आणि सध्याच्या अतिरेकी या दोन धाग्यावर झालेला स्मरतो.
आपल्याला या संदर्भात काही प्रश्न आणि जे हौतात्म्यबद्दल असतील तर ते कृपया एकदा प्रश्न स्वरुपात परत एकदा टाका ही विनंती. मी त्याला माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
द्वारकानाथ
3 Dec 2008 - 12:04 pm | रम्या
माझ्या एका मित्राने, विद्याधरने सांगितलेला हा किस्सा. त्याचं एका गांधीवादी मित्राशी वाद सुरू होता. विद्याधारच्या म्हणण्यानुसार गांधीवादाचा काही उपयोग नाही, तर त्यांच्या मित्रानुसार गांधीवाद रोजच्या जीवनात उपयोगी आहे. वाद वाढत गेला. मग विद्याधरने अगदी अचानाक त्याच्या स्वभावाला साजेशी कॄती केली. मित्राच्या कानाखाली खाड्करून सणसणीत आवाज काढला!! मित्र गांगरून गेला, आणि दुसर्याक्षणी सावरून विद्याधरच्या अंगावर धावून गेला! गांधीवाद गेला चुलीत! दोन क्षणापुर्वी गांधीवादाच्या गप्पा हाणणारा स्वत:च्या कानाच्या खाली जाळ निघाल्यावर अचानक जहाल बनला. वास्तविक त्याने आपला दुसरा गाल जवळ करायला पाहिजे होता. मघाशी गांघीवादाला पुरक अशा गप्पा मारणारा 'कारणाशिवाय मला का मारलं? फक्त तोंडाने चर्चा करता आली नसती का' असे म्हणत आपल्या जहालपणाचे समर्थन करू लागला!
हे असं आपल्या खोलीत बसून चर्चा करणं सोपं आहे. ज्यांनी आपल्या आप्तांना या हल्ल्यात गमावलंय त्यांना विचारा ते सांगतील बरोबर गांधीवाद्याने कुणाचं कसं निर्मूलन होईल ते!
मुंबईतील या अशा परिस्थितीत गांधीगिरीची चर्चा म्हणजे फक्त आपली विचार शक्ती विशाल असल्याचं दर्शविण्यासाठीचा अट्टाहास आहे.
गांधींच्या पुढेमागे फिरणार्या तथाकथीत गांधीवाद्यांनी गांधीवधानंतर नथुराम गोडसेंला मारहाण केली. कसला कप्पाळ गांधीवाद घेऊन बसला राव!
दहशतवाद्यांना सरळ ठोका! ज्यांना जिवंत पकडलं आहे त्यांच्या कडून त्यांच्या म्होरक्याची माहीती घ्या आणि मग म्होरक्याला आणि त्याला दोघांनाही ठोका! याला म्हणायचं निर्मूलन.
आम्ही येथे पडीक असतो!
1 Dec 2008 - 1:11 am | विसोबा खेचर
कलंत्रीसाहेब,
एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या..
परवा मुंबईत अतिरेक्यांनी जो अंधाधुंद गोळीबार केला, ताज व ओबेरॉय मध्ये लोकांना ओलीस ठेवले, ग्रेनेड फेकले, अश्या परिस्थितीत गांधीवादाच्या संदर्भात काय करायला हवं होतं? दहशतवाद्यांच्या मतपरिवर्तनाची वाट पाहायला हवी होती की कंमांडोजना बोलवायला हवं होतं?
एवढ्या साध्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या.. मग पुढे बोलू...
तात्या.
1 Dec 2008 - 6:36 am | स्वप्निल..
अतिशय योग्य प्रश्न..सहमत !
बघु काय उत्तर मिळते ते..
स्वप्निल
1 Dec 2008 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुंबईत अतिरेक्यांनी जो अंधाधुंद गोळीबार केला, ताज व ओबेरॉय मध्ये लोकांना ओलीस ठेवले, ग्रेनेड फेकले, अश्या परिस्थितीत गांधीवादाच्या संदर्भात काय करायला हवं होतं? दहशतवाद्यांच्या मतपरिवर्तनाची वाट पाहायला हवी होती की कंमांडोजना बोलवायला हवं होतं?
करेक्ट, अगोदर याचे उत्तर द्या ! मग स्वतंत्र गांधीवादावर भली बुरी चर्चा करु.
बाकी कराल काळात गांधीजींच्या विचारांवर आपले प्रेम आणि त्या विचारांना रेटतांना पाहून आपले कौतुक वाटतं बरं का ! :)
1 Dec 2008 - 10:27 pm | कलंत्री
यात फारसे विचार करण्यासारखे काहीही नाही. एकीकडे सुसज्ज अतिरेकी आहेत, दुसरीकडे त्यांच्या ताब्यात निशस्त्र असे ओलिस आहे, असे निरपराध लोकांच्या रक्षणासाठी केलेली हिंसा ही त्यामानाने क्षुल्लक असलेली हिंसा आहे आणि ती सर्वच बाजूने क्षम्य आणि धर्म स्विकृत आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक निष्पाप आणि मुले, स्त्रीया आणि बेसावध अशा लोकांचा बळी घेतला आहे. अशा वेळेस शस्त्राचाच वापर करणे योग्य ठरेल. दुबळ्यांच्या स्वरक्षणासाठी केलेली हिंसा क्षम्यच ठरेल.
भारतीयांनी याबाबत अनेक प्रयोग केलेले आहेच. उदा. दिलीप राजाने गाईचे रक्षण करण्यासाठी आपला प्राण घेण्यासाठी सिंहाला विनवले होते. परशुरामाने जुलमी क्षत्रीयाचे निर्दालन केले होते. याबाबत विनोबा अशा अनेक आपणा भारतीयाच्या अहिंसेच्या बाबतीतले अनेक टप्प्याच्या प्रयोग वर्णन केले आहे.
आता त्यात अजून एक शक्यता आहे, प्रत्यक्ष कारवाईत काही अतिरेकी शरण आले तर त्यांना न मारता त्यांना कायद्याच्या कक्षेत आणून त्यांना योग्य ते शासन करावयालाच हवे. ते शरण आले असतांनाही त्यांची हिंसा करणे ( चकमक /पारध) करणे हे चूकीचेच ठरेल.
हे सर्व गांधीवादालाही मान्य आहे.
1 Dec 2008 - 11:04 pm | सर्वसाक्षी
देहांत प्रायशित्त हे एकच शासन!
अतिरेकी शरण येतात ते हतबल झाल्यामुळे, त्यांना त्यांनी केलेल्या क्रूर कृत्यांचा पश्चात्ताप झाला म्हणुन नाही.
एखाद्याने अनेक माणसे मारली व मग तो साळ्सूदपणे शरणागतीची भाषा बोलु लागला व आपण त्यांना क्षमा करु लागलो तर पुन्हा पारतंत्र्य यायला वेळ लागणार नाही. हे शरण आले तरी देहांत शासन ही एकच शिक्षा.
मात्र हे धोक्याचे आहे. कारण अनेक दयाळु महात्मे त्यांच्या फाशीच्या माफीसाठी साकडे घालणार, झालच तर त्यांचे साथिदार अशा अभयारण्यात मनसोक्त धुडगुस घालुन कुणाला ओलीस धरुन त्यांना सोडवणारच.
यापेक्षा दिसले की ठोका हेच उत्तम
एक नम्र विनंती - इथे मिपावर बोलताय ते ठिक आहे, कृपया हे असले काही या हल्यात जे शहिद झाले त्यांच्या नातेवाइकांपुढे बोलु नका. आमच्या माणसांनी हे ऐकण्यासाठीच बलिदान केले का या धक्क्याने ते उध्वस्त होतील.
1 Dec 2008 - 1:48 am | अभिजीत
>> गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय?
- नाही
- अभिजीत
1 Dec 2008 - 3:41 am | विकास
सर्व प्रथम खालील आपले मुद्दे (त्यावर विचारलेले प्रश्न माझे आहेत), हे सामान्यांना लागू होतात का सरकार आणि कायदासुव्यवस्था (ज्यात पोलीस, एनएसजी, सैन्यदल सर्वच येतात) त्यांना पण लागू होतात?
1.साध्य साधन शुचिता : आपल्याला जे काही साध्य करावयाचे आहे त्यात कोणतेही साधन वापरायला गांधीवादात अनुमती नाही. साध्य आणि साधन या दोन्हीवर गांधीवाद कमालीचा काटेकोर असतो. ( स्वातंत्र्य चळवळीत गांधीनी ते वेळोवेळी सिद्ध केले आहेच).
जेंव्हा अतिरेकी हल्ला होईल तेंव्हा गांधीवादाप्रमाणे साधन कुठले वापरावे आणि साध्य काय असावे?
2.प्रचार आणि प्रसाराचे पूर्ण वापर करणे, कोणतीही गुप्तता न पाळणे: गांधी अफ्रिकेतून भारतात १९१७ च्या सूमारास येण्यापूर्वीच त्यांनी १०००० पत्रिका छापून त्याकाळच्या भारतातील सर्व वर्तमानपत्रांच्या संपादकाना, सामाजिक कार्यकर्त्यांना पाठविल्या होत्या. त्यामूळे गांधी येण्यापूर्वीच त्यांच्या बर्यापैकी कामाची प्रसिद्धी केली होती.( वर्तमानपत्राचा, पुस्तकाचा प्रचंड उपयोग आपल्या लढ्यासाठी गांधीनी केला होता.)
आज असे गांधीवाद्यांना करायला कोणी थांबवले आहे? बर गुप्तचर खात्यानेपण गुप्तता पाळू नये असे आपले म्हणणे आहे का गुप्तचर खातेच नसावे? सरकार अल्पसंख्यांकांसाठी अनेक कार्यक्रम राबवत आहे, सच्चर अहवालासारखे अहवाल अमलात आणत आहे त्याला प्रसिद्धी देत आहे.
3.कोणत्याही चळवळीत सर्वांचा सक्रिय सहभाग घेणे. कोणतेही आंदोलन हे जन आंदोलन ठेवणे आणि यात सर्व म्हणजे स्त्री, पूरुष, मुले, गरिब, श्रीमंत, सर्व धर्माचे लोक यांचा सहभाग मिळविणे.
वरील विधान फारच "जनरल" आहे. त्यात अमान्य होण्यासारखे काहीच नाही, पण आत्ता कुठली चळवळ केली तर अतिरेक्याचे निर्मुलन होईल असे आपले म्हणणे आहे?
4.समोरच्या व्यक्तिच्या मताबद्दल आदर ठेवणे आणि आपले मतही योग्य ती कारणमिमांसा देत व्यक्त करत जाणे. ( अपवाद सुभाषचंद्रबोसाच्या बाबतीत).
परत तेच. वरील विधान फारच "जनरल" आहे. त्यात अमान्य होण्यासारखे काहीच नाही, पण आत्ता या संदर्भात काय केले तर अतिरेक्याचे निर्मुलन होईल असे आपले म्हणणे आहे?
5.कोठे आपल्याकडून चुक होत असेल किंवा उत्साही कार्यकर्त्याकडुन चुक होत असेल तर ती मान्य करणे आणि वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास असे भरकटलेले आंदोलन विनाअट मागे घेणे. ( चौरीचौराचा लढा).
हा मुद्दा आत्ता तरी असंबंध वाटतो कारण आत्ता आंदोलन चालूच नाही. किमान मला माहीत नाही.
6.उदारमतवाद विकसित करणे, सर्वधर्म समभाव. (एकाने डोळे फोडले म्हणुन दुसऱ्याचे डोळे फोडले तर सारे जगच आंधळे होईल. धर्म अंतिम सत्याकडे जाण्याचा मार्ग आहे ते अंतिम सत्य नव्हे अश्या शिकवणीचे आचरण आणि सिद्ध करणे.)
सर्वधर्म समभाव हा दोन्ही हाताने वाजणार्या टाळीसारखा हवा या बाबत काही दुमत आहे का? तसेच जेंव्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न येतो, तेंव्हा समान कायदा हवा हे मान्य होते का?
7. समोरच्या व्यक्तिने चूक केली असेल आणि त्यात योग्य ते मतपरिवर्तन झाले असेल तर ते मान्य करणे आणि त्याला आपल्या विचारधारेत सहभागी करून घेणे.
आपले मतपरीवर्तन झाले की आम्ही आपल्याला आमच्या विचारधारेत आनंदाने सहभागी करून घेऊ! :-) आमची दारे आणि हृदये सताड उघडी आहेत ;)
बाकी आता एक प्रश्न गांधीवाद्यांना - इतरांनी काय करावे हे सांगत बसण्यापेक्षा स्वतः गांधीवादी या संदर्भात काहीच का करत नाहीत? आणि करत असले तर त्याचा आजतागायत उपयोग झालेला का दिसत नाही?
तुम्हाला माहीत असेलच, पण गांधीजींनी आपण वर सांगितलेली तत्वे इतरांना सांगत बसण्याचे काम केले नाही तर "आधी केले मग सांगितले". गांधीजींचे विचार म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी ते वापरले गेले त्या संदर्भातील आचाराबद्दल मला आक्षेप असेलही, त्यांचे काही विचार पटतही नाहीत पण त्यांच्या प्रामाणिक इच्छेने आणि हट्टाने ते इतरांना नावे ठेवत बसण्यापेक्षा काम करायला लागले आणि मरे पर्यंत अथक काम करत राहीले. सावरकरांच्या उक्तीप्रमाणेच "आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुमच्यावीना ("विरोधाल तर मोडून" फक्त नाही)" असे गांधीजी वागले आणि काँग्रेस आणि त्यातील बरेचसे नेतृत्व मुकाट्याने त्यांच्या मागे गेले.
पण त्यांच्याच बरोबरीच्या त्यांच्या पाठीराख्यांनी त्यांच्या जाण्यानंतर फक्त सतत गांधीवादाच जप केला पण अन्यायाच्या विरुद्ध, देशासाठी म्हणून गांधीवादाचा गांधीजींसारखा कधीच उपयोग केला नाही...
म्हणून गांधीवाद आणि त्यातील आपण सांगता ही तत्वे - "शब्द बापुडे केवळ वारा" अशीच होऊन गेली.
1 Dec 2008 - 10:48 pm | कलंत्री
विकासजी,
१. गांधीवादाने अतिरेकीलोकांचा कसा पाडाव / निर्मूलन करता येईल असा विचार आहे. याबाबतची तत्वे सध्यातरी आपल्यासाठीच आहेत. पोलिसदल किंवा तत्सम संघटनेला त्यांचीत्याची तत्वे असतात.
२. गांधीवाद आज का उपयुक्त नाही असा जर मुद्दा मांडला तर याचे उत्तर हे गांधीना मानणार्यांचे अपयश आहे. जुन्या इतिहासावर आजचे गांधीवादी जगत आहे.
द्वारकानाथ
1 Dec 2008 - 11:00 pm | लिखाळ
>>२. गांधीवाद आज का उपयुक्त नाही असा जर मुद्दा मांडला तर याचे उत्तर हे गांधीना मानणार्यांचे अपयश आहे. जुन्या इतिहासावर आजचे गांधीवादी जगत आहे. <<
म्हणजे गांधीवाद काही झाले तरी चुकीचा ठरू द्यायचा नाही असे आहे का? त्या पेक्षा गांधींची मते अधीक काही वेगळी मते असे करुन काळाच्या कसोटीवर उतरणारी विचारधारा तयार करता येईल का? आदर्श तत्वज्ञान सर्वंकश असावे ना !
म्हणूनच माणसाला आदर्श मानायच्या ऐवजी विचारांची कास धरत असावेत. पण इथे गांधीवाद = गांधी असे समिकरण असल्याने गांधी विरोधी आणि गांधी भक्त दोघेही गांधींच्या वागण्याबद्दल बोलत असतात.
गांधींना जे तत्त्वज्ञान अभिप्रेत होते ते त्यांना सुद्धा पूर्णपणे आचरणात आणता आले नसेल अशी शक्यता आहेच ना. म्हणूनच मी पहिल्या प्रतिसादात या तत्वाच्या जूनेपणाबद्ल बोललो होतो. म्हणजे ते कुणा एकाचे राहत नाही. आणि ते प्रवाही, लवचीक सुद्धा बनु शकते.
-- लिखाळ.
1 Dec 2008 - 11:27 pm | कलंत्री
आजच माझी एका मित्राशी चर्चा झाली त्यात मी अतिरेक, भारतपाक विभाजन, धर्म अणि अतिरेक, अतिरेकी कसे बनतात यावर माझी मिमांसा सांगितली. त्याचबरोबर गांधीच्या विचारधारेने परंतु त्यात योग्य ते कालोचित बदल करुन आजच्या स्थितीवर कसा बदल करु शकतो हे सांगितले. चर्चेच्या ओघात त्याने असे सांगितले की तुमचे म्हणणे बहुअंशी मान्य आहे. फक्त तुम्ही याला वेगळे नाव द्या. गांधी म्हटले की आमचे टाळके सरकते, संताप येतो इत्यादी इत्यादी.
आपल्याला शांती, प्रेम आणि माणूसकीचा लढा जर वेगळ्यानावाने सिद्ध होत असेल तर माझी गांधी / गांधीवाद या नावा बाबत बिल्कुल आग्रह नाही.
शेवटी एका राजकारणी माणसाने सांगितल्या प्रमाणे मार्जार काळी आहे का लाल आहे हे महत्त्वाचे नाही, पण ती तिच्यासमोरच उंदिर खाते की नाही हे महत्वाचे आहे.
2 Dec 2008 - 8:32 pm | लिखाळ
>> गांधीच्या विचारधारेने परंतु त्यात योग्य ते कालोचित बदल करुन आजच्या स्थितीवर कसा बदल करु शकतो हे सांगितले. <<
वास्तविक गांधींच्या विचारधारेत बदल केले तर कालोचित ठरतीलही पण मूळ अहिंसेच्या तत्वज्ञानाबद्दल बोलत असू तर बदल करण्या आधी हिंसा-अहिंसा विवेकाचा अभ्यास आणि उहापोह करायला हवा. कदाचित तो करताना जाणवेल की याबद्दल पूर्वसुरींनी बरेच काही मांडलेले आहे आणि कदाचित गांधींनी जे शिकवले ते अविवेकी आहे असेही असु शकेल.
>> फक्त तुम्ही याला वेगळे नाव द्या. गांधी म्हटले की आमचे टाळके सरकते, संताप येतो इत्यादी इत्यादी.<<
माझे टाळके सटकत नाही. बहुधा ते नसेलच. पण गांधींनी अहिंसेचे तत्व अनुसरले तर त्या तत्त्वाचा अभ्यास व्हावा. गांधीनी ते अनुसरताना स्वतःच्या फायद्यासाठी काही बदल केले असू शकतील. मला त्यात रस नाही. गांधी बदाम खात असत आणि त्यामुळे प्रकृती चांगली राहत असे असे गृहित धरता बदामाच्या औषधी गुणांवर चर्चा करताना मला बदामाचा राग येत नाही. (गांधीवर राग असला तरी बदामावर-शेळीच्या दुधावर-सुती कापडावर राग नाही.)
तत्व जरी सर्वसमावेशक असले तरी ते प्रत्यक्षात अनुसरताना व्यक्तीसाठी आणि समाजासाठी वेगळे आडाखे असतात असे आपल्याला वाटते का? (माझ्या कडे अजून उत्तर नाही. मी विचार करतो आहे.)
तसेच अहिंसेचे तत्व नक्की काय आहे आणि त्याचे प्रत्यक्षात अनुसरण कधी-कसे करावे या बाबतची आपली मते पुढच्या लेखांत वाचायला आवडतील.
-- लिखाळ.
1 Dec 2008 - 5:51 am | प्राजु
आणि अतिरेकी...
हे म्हणजे परस्पर विरोधी शब्द आहेत. कसं शक्य आहे हे??
गांधीवादामुळे भारतीय नागरीक जास्तीत जास्त दुबळा होतो आहे हे मात्र १००% खरं आहे. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणे.. म्हणजे आज ओबेरॉय आणि ताज मध्ये धुडगुस घातलाय ना तर आपणहून त्यांना आता आपल्या स्वतःच्या घराची दारं उघडून आमच्या घरात हैदोस घाला असं सांगणं आहे.
नाही पटला तुमचा लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Dec 2008 - 6:40 am | स्वप्निल..
हे सध्याच्या स्थितीत एकदम अयोग्य..तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे..
तुमचा लेख नाही पटत..
स्वप्निल
1 Dec 2008 - 6:56 am | चतुरंग
अहिंसेचे तत्त्वज्ञान हे मूलगामी आहे ह्यात वाद नाही. वर लिखाळ म्हणतात त्याप्रमाणे हे तत्त्वज्ञान आपल्या संतांनी हे बर्याच आधी सांगितले आहे. त्याचा अधुनिक युगात पुनर्वापर गांधींनी केला हे खरे आहे तरीही आपण त्याचे श्रेय त्यांना देऊयात. कारण त्यांनी केलेला वापरही पुष्कळवेळा परिणामकारक होता आणि तोही जमणे येरागबाळ्याचे काम नाही! आपण गांधींपासून थोडं मागे जाऊया.
संत तुकारामांनी 'भले तरी देऊ गांडीची लंगोटी | नाठाळाचे काठी हाणू माथा ||' असं का बरं म्हटलं असेल हो? विठ्ठलभक्तीत रममाण झालेल्या ह्या साक्षात्कारी संताने तर पराकोटीचे अहिंसक असायला हवे होते. नव्हे तसे ते होतेच. पण नाठाळाला काठी हाणण्यात हिंसा नाही तर त्या नाठाळाकडून अधिक हिंसा होऊ नये ह्याचा तो बंदोबस्त आहे, अद्दल घडल्याने त्याचे मतपरिवर्तन आहे! जी हिंसा ही विनाकारण आणि अधिक होणार्या हिंसेला टाळते ती हिंसा नसते.
महाभारतात कृष्णाने अनेक वेळा खोटेपणा केला आहे. खोटे बोलावे लागले तरी अंतिम सत्य हे सर्वांच्या भल्याचे असले तर ते खोटे हे खोटे नसते ती कपटनीती असते आणि नाठाळांना सरळ करण्यासाठी ती आवश्यक असते!
शिवाजी महाराजांचे उदाहरण पाहूयात. काय दिसते? महाराजांनी न्याय करताना सतत हिंसा/अहिंसा हा तराजू तोललेला आहे. उदा. 'खंडोजी खोपडेचे हात-पाय कलम करा' हे फर्मान अचानक झालेले नाही; समज देणे, सज्जड दम देणे आणि तरिही फरक पडला नाही तर शिक्षा असाच मार्ग त्यांनी नेहेमी अवलंबला.
सुरत लुटली त्यावेळी त्यांनी सुरतेच्या बाहेर तळ ठोकला, आपले संपर्काचे खासे लोक सुरतेत पाठवून तिथल्या धनिकांना, व्यापार्यांना खंडणीचे पैसे आपणहून आणून देण्याची संधी त्यांनी दिली. त्याला न जुमानता मग्रूर उत्तरे देऊन सुरतेच्या व्यापार्यांनी आपला नाश ओढवून घेतला. त्यातही शहर लुटताना बायका, मुले, वृद्ध ह्यांना त्रास देऊ नका, हल्ला झाला तरच प्रतिकार करा, अनायासे धन मिळाले तर त्रास नको अशा स्पष्ट सूचना होत्या.
अफ़जलखान स्वारीच्यावेळी तर ह्या धोरणांची आणि डावपेचांची कमाल मर्यादा आहे! संपूर्ण देशावर (महाराष्ट्रात) वाटेलशी देवळे फ़ोडत आणि गावे लुटत येणार्या खानाच्या हालचाली ते पहात होते. त्यांना काय कमी यातना झाल्या असतील? आमनेसामने लढलो तर चिरडले जाऊ हे नक्की होते. असे अत्याचार करणार्या खानाला त्यांनी काय नजराणा आणि फुलांचा गालिचा घालून आवतण द्यायला हवे होते का? तर हो! तेच त्यांनी केले फक्त त्यासाठी प्रतापगडावर या आणि तिथे आमचे स्वागत घ्या असा कावा केला! पंताजी गोपिनाथा करवी त्याला झुलवत ठेवले, अतिआत्मविश्वासाने बेसावध केले आणि शेवटी कपटाने त्याचा घात केला आणि ठार केले! दुर्जनांचा नाश ही अहिंसाच आहे!
प्रत्येक गोष्टीचा वापर करण्यासाठी ठराविक वातावरण आवश्यक असते. समोरच्या व्यक्तीची/समूहाची मानसिकता त्या उपायाला साजेशी आहे की नाही, नसली तर काय काय उपाय योजावे लागतील हे फार धोरणाने ठरवावे लागते. समज देऊन, निषेधाचे खलिते पाठवून, आंतरराष्ट्रीय समुदायाकडे (यूनो) सज्जड पुरावे देऊन, दिल्ली-लाहोर मैत्री बससेवा सुरु करुन, खेळाचे सामने भरवून, एकमेकांकडे शिष्ठ्मंडळे पाठवून (ह्यातले आपण काहीही करायचे बाकी ठेवलेले नाही!) परिस्थितीत काडीची सुधारणा दिसत नसेल उलट दिवसागणिक ती अधिकाधिक बिघडत असेल तर उपायांमधे बदल करायला हवा की नाही?
जखमेला झालेल्या गँगरीनने पाय कुजायला लागला आणि संपूर्ण रक्तात विष भिनून जीवच गमावण्याची पाळी आली तर डॉक्टरांना पाय कलम करावाच लागतो तिथे अहिंसेचे भाबडे शव्द उपयोगी पडत नाहीत, शस्त्रक्रियाच करावी लागते!
तसेच दहशतवाद्यांचा खातमा हा ए.के.४७ घेऊनच करावा लागतो. सणसणीत हाग्या मार देऊन एकदा त्यांना चड्डीत रहायला शिकवले की मग एका हातात ए.के.४७ आणि दुसर्या हातात गुलाबाचे फूल असे त्यांचे स्वागत जरुर करा नक्की निमूट येतात की नाही ते बघा!
ज्याच्या एका हातात शस्त्र सज्ज आहे त्याच्याच तोंडातली अहिंसेची भाषा ऐकली जाते हा आजचा भीषण विरोधाभास आहे पण तेच कटू सत्यही आहे हे आपण विसरता कामा नये!
चतुरंग
1 Dec 2008 - 11:54 am | रम्या
--
1 Dec 2008 - 10:24 pm | llपुण्याचे पेशवेll
दुर्बळाच्या क्षमेस विचारतो कोण? शमा करणे हा तर शूराचा , सबळाचा धर्म आहे. आतापर्यंत आपण दुर्बळच सिद्ध झालो आहोत्(दुर्दैवाने तसे नसूनही). तस्मात, आता सबळ आहो हे सिध्द करून मग करूया सर्वाना माफ. :)
पुण्याचे पेशवे
1 Dec 2008 - 10:53 pm | कलंत्री
आपल्या प्रत्येक शब्दाशी सहमत.
माझ्या माहितीप्रमाणे आपण पाकिस्तानापेक्षा जास्त सबळ आहोत आणि हजारोवर्षाच्या इतिहासात फक्त ५०/६० वर्षच आपण विभाजित आहोत. त्यामूळेच त्यांच्यासाठी मला हा मार्ग भावतो.
बाकी माझे विचार प्रतिसादाद्वारे / लेखाद्वारे स्पष्ट होत जातील अशी अपेक्षा आहे.
1 Dec 2008 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
आम्हि अतुरतेनी ज्या विनोदि लेख भाग २ ची वाट बघत होतो तो एकदाचा आला ! आनंद मनी मावेना बघा आमचा.
थोडे स्पष्ट बोलतो, वाईट वाटून घेउ नये, पण आजाकल हि एक नविन पद्धत रुढ होत चालली आहे प्रसिद्धि मिळवण्याची, जेव्हा समाज एका विशिष्ठ दिशेने विचार करत असेल तेव्हा आपण मुद्दाम त्याच्या विरुद्ध मत आक्रमक पणे मांडायचे, पार धुराळा उडवुन टाकायचा ! ह्याने होते काय कि अत्यंत कमी कष्टात भरपुर प्रसिद्धि मिळते आणी मग आपण किती विद्वान आहोत असा आव हि आणता येतो, मग आमचे विचार तुम्हाला पचणारे नाहित कारण तुम्हि कायम सवंग विचार करणारे असे विरोधकांना सांगितले कि झाले !! माझी तुम्हा सारख्या लोकांना एक नम्र विनंती कायमच असते कि हे जे उपदेशाचे डोस आम्हाला देताय ना ह्यातली २ वाक्ये जास्ती नाहि फक्त २ वाक्ये एखाद्या मशिदी समोर उभा राहुन बोलुन बघा म्हणजे तुमच्य सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्षणात मिळतील. आणी काठि घेउन पदयात्रा काढण्याचे नाहि तर भवानी बाहेर काढुन जय भवानी म्हणण्याचे दिवस आहेत हे लक्षात येइल.
भारतमातेचे वस्त्रहरण करत आहेत हे चांडाळ आणी तुम्ही गांधीवादाच्या कसल्या गोष्टी करता ? विशीष्ठ विचारसरणी हि त्या त्या काळापुरती योग्य असेल सुद्धा पण म्हणजे ती सर्वकालीन उपाय आहे असे न्हवे ! आणी वाईट नका वाटुन घेउ पण गांधीवाद लोकांना कळावा त्यांच्यात रुजावा ह्या साठी जेव्हडे प्रयत्न झाले त्याच्या १ पट प्रयत्न न करता सुद्धा सावरकरवादी संख्येने जास्ती आहेत. आणी ते कायम जास्तच राहणार.
आपला नम्र
चर आणी खा
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
1 Dec 2008 - 6:43 pm | सर्वसाक्षी
राजकुमार,
द्वारकानाथजींचे विचार न पटणारे आहेत हे खरे पण ते लिहितात ते सवंग प्रसिद्धीसाठी नाही. ते गांधींचे परमभक्त आहेत आणि साहजिकच ते सदासर्वदा गांधींचे गोडवे गात असतात, गांधीवादाचा पुरस्कार करीत असतात.
माझे आणि त्यांचे स्वातंत्र्यसंग्रामा विषयी पराकोटीचे मतभेद असले तरीही व्यक्तिशः आम्ही स्नेही आहोत. किंबहुना गांधी व क्रांती या वादातूनच आमची ओळख झाली.
द्वारकानाथजी हे एक सज्जन गृहस्थ आहेत, मराठीचे प्रेमी व खंदे पुरस्कर्ते आहेत. हे सदगृहस्थ हे लेखन प्रसिद्धीसाठी करीत नाहीत, कृपया गैरसमज नको.
1 Dec 2008 - 7:48 pm | परिकथेतील राजकुमार
माफी असावी, पण काय आहे ना ह्या आजकालच्या गर्दि मध्ये आपला कोण आणी मुखवटा घातलेला कोण हे कळणे अवघड झाले आहे.
मी लिहिले होते कि = > "मग आपण किती विद्वान आहोत असा आव हि आणता येतो, मग आमचे विचार तुम्हाला पचणारे नाहित कारण तुम्हि कायम सवंग विचार करणारे असे विरोधकांना सांगितले कि झाले !!""
सवंग विचार हा शब्द मी अशा विचारांचा विरोध करणार्यांसाठि वापरला होता, लेखकासाठि नाहि. पण तरिही माझ्या शब्दाने कोणी दुखावले असल्यास मी माफी मागतो __/\__
काय आहे ना सतत संयम पाळा किंवा प्रतिकार करताना सुद्धा शस्त्राचा वापर नको वगैरे सतत हिंदुना जी शिकवण दिली जाते ना त्यांमुळे मग डोके फिरते . हि शिकवण फक्त हिंदुनाच का ? हिंदु धर्म हा कधिच आक्रमक न्हवता आणी आत्तासुद्धा नाहिये ! गांधीवाद हा सर्वांनसाठि असेल तर ह्याची शिकवण किंवा हा गांधीवाद आचरणात आणावा असे प्रयत्न प्रस्तुत लेखकांनी कधि कुठल्या इतर धर्मीय भागात, त्यांच्या संकेत स्थळावर जाउन केले आहेत का ? असल्यास माहिति द्यावी. ज्या देशात राहतात त्याच देशाचा कायदा मान्य न करणार्यांविषयी आम्हाला आदर नाही, आणी शेजारिल राष्ट्राविषयी असेल तर फक्त संताप आहे. दुसर्याच्या घरात उजेड पडावा म्हणुन आपले घर जाळायला आमच्या बाप जाद्यांनी निदान आम्हाला तरी शिकवले नाहिये !!
चु.द्या.घ्या.वी.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
1 Dec 2008 - 10:10 pm | सर्वसाक्षी
माफीची गरज नव्हती, पण सत्य काय ते सांगावेसे वाटले. आपण म्हणता त्याप्रमाणे फुकट उपदेश देणार्यांचा व विशेषतः हिंदुनाच प्रत्येक बाबतीत दोषी ठरवुन मानवता महानता वगैरेचा पाढा वाचुन स्वतःला झटपट प्रसिद्धी मिळविणार्यांची कमी नाही, उलट सुळसुळाट्च आहे. आपल्याला जे वाट्ले तेच मलाही वाटले असते, अनेकांना वाटलेही असेल. मात्र लेखक मला परिचित असल्याने मी आपल्या निदर्शनास खरे काय ते आणून दिले.
आपला प्रांजळपणा कौतुकास्पद आहे.
धन्यवाद
1 Dec 2008 - 10:15 pm | विसोबा खेचर
द्वारकानाथजी हे एक सज्जन गृहस्थ आहेत, मराठीचे प्रेमी व खंदे पुरस्कर्ते आहेत. हे सदगृहस्थ हे लेखन प्रसिद्धीसाठी करीत नाहीत, कृपया गैरसमज नको.
पूर्ण सहमत आहे..! द्वारकानाथजी हा एक अत्यंत सभ्य, सुसंस्कृत गृहस्थ आहे असा माझाही अनुभव आहे. सवंग प्रसिद्धीकरता काही लेखन करणारा हा माणूस खचितच नव्हे..!
तात्या.
1 Dec 2008 - 10:58 pm | कलंत्री
राजकूमार, सर्वसाक्षी आणि तात्या,
आपला विश्वासास पात्र राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन. सध्या ज्या ज्या क्षेत्रात आपण विचार करतो ते ते क्षेत्र आपल्या प्रामाणिकपणाची आणि चाकोरीसोडून वर्तनाची अपेक्षा करत आहे. उदा. मराठी, भारत-पाक, भ्रुणहत्या. करु तितके कमी.
असाच आशिर्वाद असुद्या.
द्वारकानाथ
1 Dec 2008 - 12:26 pm | वेताळ
अतिरेक्यांसमोर लढताना गांधीगिरी उपयोगी ठरणार नाही.
वेताळ
1 Dec 2008 - 3:40 pm | राघव
माझे उत्तर "नाही" असे आहे.
राज्यकर्त्याने अहिंसेची कास धरून उपयोग नाही. ज्या राज्यकर्त्यास असे असावे असे वाटत असेल त्याने सरळ जागा सोडावी अन् काशीयात्रेला निघून जावे. राज्यकर्त्याने अघोरी असू नये पण अहिंसक देखील असू नये. जर तुम्हाला रक्तपात बघण्याची ऍलर्जी असेल तर तुम्ही राज्यकर्ते होऊ शकत नाही.
मी गांधींपेक्षा शिवरायांस जास्त मोठा व्यक्ती मानतो, त्यांना पूजतो. माझी अशी श्रद्धा आहे की जर त्यांना अहिंसेचा मार्ग योग्य वाटला असता तर त्यांनी तो नक्कीच स्वीकारला असता. पण तसे झालेले नाही. म्हणून राज्यकर्त्याने या मार्गावर जावे असे मला वाटत नाही.
माझ्यमते गांधीवादाचा थोडाफार उपयोग चांगला माणूस घडवण्यास होऊ शकेल, ज्याला भरपूर वेळ लागेल. असे होऊ नये की तोवर आपला संपूर्ण देश अतिरेक्यांनी बळकावलेला असेल. जर तुम्ही अतिरेक्यांस अहिंसा शिकवायला जाणार असाल तर स्वतःची ** फोडून घ्याल, बाकी हाती काहीही येणार नाही.
(तारतम्य बाळगण्यावर विश्वास असणारा) मुमुक्षु
1 Dec 2008 - 3:56 pm | शेखर
गांधीवादाचाच आणी गांधीवाद्यांचा अतिरेक होत आहे. त्याचेच दमन (गांधीवादी शब्द) केले पाहिजे.
शेखर
1 Dec 2008 - 4:01 pm | अवलिया
आपण ताजमधे गेला होता का हो गुलाबाचे फुल घेवुन ते अतिरेकी लपले होते तेव्हा?
चांगली संधी होती.
अरेरे आपण वाया घालवलीत.असो
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
1 Dec 2008 - 11:04 pm | कलंत्री
मी सुद्धा सुन्न आणि हतबद्ध झालो होतो. दुसरे अनेक निष्पाप लोक त्यांच्या अटकेत असताना त्यांचा पाडाव करणे हेच आपल्या लोकांचे कर्तव्य होते आणि त्यांनी ते केलेच.
आता प्रश्न असा आहे की आजच्या अतिरेक्यांचा हातात ज्या बंदुका आहेत तेथे गुलाबाची फुले कशी येतील? यावर विचारमग्न आहे. उपाय सापडला तर सांगतोच.
पुष्पराजाचा प्रेमी.
1 Dec 2008 - 4:02 pm | आम्हाघरीधन
मी गांधींपेक्षा शिवरायांस जास्त मोठा व्यक्ती मानतो, त्यांना पूजतो. माझी अशी श्रद्धा आहे की जर त्यांना अहिंसेचा मार्ग योग्य वाटला असता तर त्यांनी तो नक्कीच स्वीकारला असता. पण तसे झालेले नाही. म्हणून राज्यकर्त्याने या मार्गावर जावे असे मला वाटत नाही.
हिन्सेला हिन्सेनेच उत्तर द्यावे लागते. समोरचा व्यक्ति बन्दूक हातात घेवुन उभा असेल तर तुम्हालाहि बन्दूकच घ्यावी लागेल. पुळ्चट अहिन्सेच्या भाषा चालणार नाहीत.
छ. शिवराय यान्नि घालुन दिलेल्या आदर्शाला त्यान्चे चाहते विसरलेत हेच खरे.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
1 Dec 2008 - 4:12 pm | पुष्कर
समोरच्याचं मतपरिवर्तन होण्यासाठी स्वत:च्या लोकांचे प्राण खर्ची घालणं म्हणजे स्वहिंसाच नव्हे काय?
1 Dec 2008 - 4:33 pm | अप्पासाहेब
गांधींची काही तत्वे निश्चितच चांगली आहेत, पण त्यांनी अहिंसेचा चुकीचा अर्थ लावला आणि देशाची बर्बादी झाली. कारणा वाचुन हिंसा करणे चुकच पण स्वसंक्षणार्थ सुध्दा हिंसा करायची नाही ह्या भ्याड पळपुटे पणा झाला.
ज्या राम नामाची धुन गांधी सतत गात असत त्या श्री रामाने सुध्दा रावणासहित अनेक राक्षसांचा वध केला होता.
गांधींचे अहिंसेचे तत्व आजच्या परिस्थीतीत पुर्ण निरुपयोगी आहे.
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
1 Dec 2008 - 8:11 pm | गणा मास्तर
लेख वाचला. गांधीजींची विचारसारणी त्यांच्या काळाला सुसंगत असेलही कदाचित पण आजच्या परिस्थितीत कितपत उपयोगी ठरेल याची शंका वाटते.
जमावाची विशेषतः धार्मिक अथवा भाषिक जवामाची मानसिकता वेगळी असते. त्यातच धर्मासाठी वेडे झालेल्या लोकांचे विचार टोकाचे असतात आणि सतत त्याच त्या वातावरणात राहुन आणि त्याच त्या पदध्तीने विचार करुन एका चौकटीत बांधलेले असतात. माणुस एकटा असताना वेगळाअ विचार करतो आणि जमावात असताना वेगळा.
मी कदाचित रजा मागताना माझ्या साहेबाला घाबरेन पण तेच एखाद्या आंदोलनात दगड्फेक करताना घाबरणार नाही, कारण तिथे जमावाचे , विचारांचे सुरक्षा कवच असेल.
तेच जर मी चुकुन दोन चार पोलिसांच्या तावडीत एकटा सापडलो तर मला भिती वाटेल.
आत्ता या ईस्लामी दहशतवादाला तोंड देण्यासाठी या अतिरेक्यांना एकएकटे पाडुन वेगळा विचार करायला भाग पाडायची गरज आहे. पण त्यासाठी त्यांच्या तळावर थेट हल्ले चढवावे लागतील. प्रियजनांचा मृत्यू किती यातनाकारक असतो हे त्यांना अनुभवानेच कळेल.
जाता जाता अब्राहम लिंकनचे एक वाक्य " As our case is new we must think new ".
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
1 Dec 2008 - 10:37 pm | केदार
कलंत्री साहेब आपले लिखान जरी मनापासून असले तरी ते पटन्यासारखे नाही.
गांधीवाद ( हा शब्द पण मला खटकतो), गांधी निती म्हणू हव तर ही बंगालच्या दंगलीतच संपली. तेव्हा बंगाल मध्ये जे काही झाले तेव्हां गांधीजीनी काय केले? तो ही अतिरेकच होता. गांधी स्वत त्यांचा नितीचे अतिरेकी होते. त्यामूळे त्यांना भगतसिंग, नेताजी, सावरकर ह्यांचे विचार मान्य न्हवते. वर कोणी तरी "सशस्त्र क्रांती आणि हिंसक लढा यातला फरक समजला नसावा वा तो मान्य करायची आपली मानसिकता नसावी" हे वाक्य लिहीले आहे ते वाक्य आपल्याला लागू होन्यापेक्षा गांधीनांच जास्त लागु होते. गांधीनिती दहशतवादा समोर कुचकामी आहे. आजचे प्रश्न वेगळे त्यामूळे उत्तरही वेगळे असायला हवेत.
मला या लोकाबद्दल तिरस्कार वाटण्यापे़क्षा यांच्याबद्दल सहानुभुतीच वाटते >> सिरियसली त्यांचा मेंदूत गडबड आहे असे पकडले तरी सहानूभूती का? असे लिहीनारे व बोलनारे आजकाल फार भेटतात. पण ह्यांचाबद्दल सहानूभूती आपल्याला का वाटते ते आपण लिहावे. हे वाक्य आपली मनोभूमीका पुर्णपणे स्पष्ट करत नाही. मला जर असा दंगा करनारा माणूस प्रवासात भेटला तर नंतर त्यालाच माझी भिती वाटते. ( मी अहिंसा प्रेमी असुनही. ) अहिंसाचा पुरस्कार करायला मनगट बळकट असावे लागते. ते आपले व आपल्या समाजाचे नाही ही वस्तूस्तिथी आपण नाकारत आहात.
समोरच्या व्यक्तिच्या मताबद्दल आदर ठेवणे आणि आपले मतही योग्य ती कारणमिमांसा देत व्यक्त करत जाणे >>>> अहो ति लोक देशाचे तूकडे करु पाहात आहेत. त्यांचा मता बद्दल काय आदर ठेवनार? बेसीक मध्येच राडा वाटतोय मला. इंदीरा गांधीनी आदर ठेवून त्यांना खलिस्थान वेगळा दिला असता का? वा त्यांचा मताचा आदर ठेवून काश्मीर वेगळा द्यावा का? उद्या लोक महाराष्ट्र वेगळा मागतील देनार का?
अजुनही मुद्दे लिहायचा विचार केला पण इतिहास असे सांगतो की गांधीवाद्यांना दुसर्यांचे मुद्दे मान्य नसतात. स्वत: गांधी देखील इतरांचे म्हणने मान्य करायचे नाहीत. ते देखील स्वतचा मताबद्दल अतिरेकीच होते.
मी गांधीचा डोळस विरोधक आहे. त्यामुळे ही पोस्ट त्यांचा द्वेशातून नाही ह्याची खात्री बाळगा.
1 Dec 2008 - 11:13 pm | कलंत्री
मला या लोकाबद्दल तिरस्कार वाटण्यापे़क्षा यांच्याबद्दल सहानुभुतीच वाटते >> सिरियसली त्यांचा मेंदूत गडबड आहे असे पकडले तरी सहानूभूती का?
कारण त्यांचा हेतु कधीही साध्य होणार नाही, त्यांची कृती ही भावनेच्या आधारे असते आणि अशा कृत्यामूळे ते असा रस्ता चालतात की कधीतरी मरणे ( आपल्या सैन्याचा हातातून अथवा त्यांच्याच लोकातील मतभेदामूळे मारले जाणे) हे अनिवार्य ठरते.
दुसरा मुद्दा आपल्या तत्वज्ञाना प्रमाणे मनुष्यजन्म दुर्लभ आहे. मनुष्ययोनीत येऊन अनेक चांगल्या गोष्टी करावयाला हव्या त्या सोडून अश्या मार्गाला ही मुले लागतात म्हणून. उद्या एखादा पाकिस्तानी सैनिक आपल्या युद्धात मारला गेला तर वाईट वाटणार नाही, पण अतिरेकी म्हणून कोणीही तरुण मेला तर मला सहानूभुतीच वाटेल.
1 Dec 2008 - 11:19 pm | दवबिन्दु
दहशतवाद्यांच्या मतपरिवर्तनाची वाट पाहायला हवी होती की कंमांडोजना बोलवायला हवं होतं?
एवढ्या साध्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या.. मग पुढे बोलू...
प्रुथ्वीराजे चव्हाण ह्यानी मोहमद घोरीला १७ वेलेला क्शमा केली. त्याचा नतीजा काय झाला सगले जाणतात.
1 Dec 2008 - 11:47 pm | कलंत्री
अतिरेक्याच्या हातात बंदुक आणि गोळी असेल तर त्याला गोळीच घालायला हवी, पण तो अतिरेकी बनत असेल, बंदुकीने त्याला हवे असलेले साध्य होईल असे वाटत असेल तर त्यची विचारप्रक्रिया वेळीच खंडीत करण्यासाठी चा माझा अट्टाहास आहे.
अहिंसा परमो धर्म हे महाविराचेही ५००० वर्षा पूर्वीचे वाक्यआहे हे मात्र विसरु नका.
1 Dec 2008 - 11:27 pm | केदार
अशी सहानूभूती तूम्ही किती जणांबरोबर बाळगनार. मागचे सोडून द्या गेल्या एका वर्षात किती तरी आम जनता मेलीये त्यांचामूळे. मग त्यांच चूकतं, त्यांना समजावून घ्या, संधी द्या असे म्हणल्यामुळे त्यांचच फावतं असे नाही का वाटत तूम्हाला. त्या कॅम्पांमध्ये त्यांना निरपराध लोकांवर हल्ला करन्याचेच तत्वज्ञान शिकवीले जाते. मग असे किती लोक बळी द्यायची तूमची तयारी आहे. त्या बळी गेलेल्यांबद्दल तूम्हाला काय वाटते? की फक्त झाले ते चूक झाले, असे व्हायला नको होते हे तूमचे उत्तर असनार आहे.
मनुष्ययोनीत येऊन अनेक चांगल्या गोष्टी करावयाला हव्या >> कंलत्री साहेब, अहो हे तत्वज्ञान आहे, वास्तव नाही. तूम्ही, आम्ही जरी चांगल्या गोष्टी नेहमी करत असलो तरी सर्वच् जनांनी तसेच करायला पाहीजे ही अपेक्षा चूकीची नाही का? आणी हे झालं तूमच आणी माझही तत्वज्ञान. त्यांचे तत्वज्ञान त्यांना हल्ला करायला शिकवतयं आणि ति लोक ते पाळत आहे. , हे रिलेटिव्ह आहे साहेब. ह्यात माझेच बरोबर तूमचे चूक हा मुद्द लावता येत नाही. ह्यावर उपाय एकच. तो म्हणजे जड से उखाडने का. इंदिरा गांधी नी त्यांना समजून घेतल असत तर काय झाल असत ह्याचे उत्तर तूम्ही काही दिले नाही.
कारण त्यांचा हेतु कधीही साध्य होणार नाही >> हे परत गांधी बोलत आहेत. १९३५ च्या भाषनात त्यांनी सशस्त्र क्रांती बद्दल बोलताना हेच सांगतीले, १९२३ला देखील भगतसिंगांची केस लढवनार्या जिन्हांना त्यांनी हेच सांगीतले.
अहो हेतू साध्य झालाय ऑलरेडी. तूम्ही दुर्लक्ष करत्याय त्यांचा साध्याकडे ही बाब अलहिदा. आता भारताच्या इकॉनॉमीची वाट लागताना तूम्हाला दिसत नाहीये का? भारतात प्रवास करु नका असे सर्व देशांनी पत्रक काढलयं त्याने टुरिझम व बिझनेसची वाट लागनार आहे. ह्या हल्ल्यामूळे दुरगामी परिनाम होणार आहेत.
1 Dec 2008 - 11:42 pm | कलंत्री
या हल्ल्याने मी सुद्धा सुन्न झालो होतो. कारण, हा हल्ला वेगळ्या पद्धतीचा होता आणि या हल्ल्याने आपले अपरिमित असे नुकसान झाले आहे. लता आणि अमिताभ यांच्या प्रतिक्रिया या सर्वसामान्याचे प्रतिनिधिक स्वरुप आहे. या हल्ल्याचे परिणाम दुरगामी असणार आहेत.
परंतु मी सुद्धा तर हे सर्व एकदा संपवण्याच्याच गोष्टी करत आहे. कृपया माझी लेखमाला संपु द्या. आवडले तर घ्या आणि चुकिचे वाटले तर टिका करा.
इंदिराजी बद्दल मलाही कौतुकच वाटते. आजच प्रियांकाची मुलाखत वाचली,' माझी आजी आज असती तर अशी हिम्मत अतिरेक्यांची झाली नसती.' मलाही असेच वाटते.
2 Dec 2008 - 8:16 am | विकास
इंदिराजी बद्दल मलाही कौतुकच वाटते. आजच प्रियांकाची मुलाखत वाचली,' माझी आजी आज असती तर अशी हिम्मत अतिरेक्यांची झाली नसती.' मलाही असेच वाटते.
तुम्ही गांधीवाद म्हणालात तेंव्हा मला महात्मा गांधी वाटले होते. पण इंदिरा गांधी म्हणत असलात तर मग गांधीवाद हे वेगळेच प्रकरण आहे :-)
2 Dec 2008 - 12:03 am | केदार
अहो तूम्ही लेखमाला लिहा की माझी ना नाही, शिवाय मी टिकाही करत नाही. फक्त माझे मत मांडतोय.
2 Dec 2008 - 12:08 am | सर्वसाक्षी
करता आले व तेही चार बोधाच्या गोष्टी सांगुन तर उत्तमच आहे. पण होउ घातलेल्या व प्रशिक्षार्थी अतिरेक्यांना भेटणार कसे व कुठे ? हे लोक काही 'भोसला मिलिटरी स्कूल' सारख्या पाट्या लावुन व वर्तमानपत्रात जाहिराती देउन भरती करत नसावेत. की यांचा उगम शोधताना आणखी काही हिंदुस्थानी शिपायांनी हौतात्म्य पत्करावे अशी अपली अपेक्षा आहे?
बरे त्यांचे अड्डे सापडलेच तर प्रचारक म्हणुन कोण जाणार? गांधीच्या तसबीरी व्यासपिठावर लावणार्यांपैकी कोण़ तयार होतोय का पाहा.
2 Dec 2008 - 12:30 am | धनंजय
गांधीवादाची काही तत्त्वे मांडल्याबद्दल धन्यवाद.
गांधीवादातली काही मते अव्यवहार्य असतात, असे माझे मत असले, तरीही ती सर्व मते मला टाकाऊ वाटत नाहीत. वाचक इतक्या हिरिरीने विरोध करत असताना माझा याविषयी "अमुक पटते, पण तमुक नाही"="बुद्धिभेद" देणे मला इष्ट वाटत नाही.
समाजमन आज कळवळत आहे आणि प्रक्षुब्धही आहे. या परिस्थितीत ही लेखमाला टाकण्याबद्दल अभिनंदन.
2 Dec 2008 - 2:21 pm | ब्रिटिश
गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय?
लक्स चा साबन वापरून संडास साफ व्हईल काय ?
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
2 Dec 2008 - 4:17 pm | तात्या विंचू
काँग्रेसचा पर्यायाने गांधींचा हात फक्त आशिर्वाद द्यायला,लोकांना अभिवादन करायला,बाकीच्यांना मागे ओढायलाच फक्त वर होतो...कोणी आपली कळ काढली तर चार कानाखाली वाजवायला कधीच वर होत नाही.....
3 Dec 2008 - 12:48 pm | JAGOMOHANPYARE
गांधीवादामुळे स्वतः गांधीजींचेच निर्मूलन झाले..... ते त्याना थांबवता आले नाही..... तिथे अतिरेक्यापासून तुमचे आमचे निर्मूलन कसे थांबणार .. ? गांधीजींचे विचार हे पोलिओच्या ड्रॉप सारखे आहेत... लहान पोराना २ /२ थेम्ब द्या उपयोग होईल. मदरश्यात लहान पोराना शिकवा म्हणांव माणुस हा एकच मजहब जगात आहे, उगाच जिहादच्या नावाने गहजब माजवु नये , तिथे गांधीजीचा फोटो लावा, पुतळा उभारा , होईल उपयोग ! ... पण एकदा पोलिओ झाला की मग सर्जरीला पर्याय नाही. मोठा होऊन अतिरेकी होऊन आला समोर बंदूक घेऊन की त्याला काय 'वैष्णव जन तो... ' म्हणत आरती करायला हवी काय ?
लक्स साबणाने संडास साफ होत नाही.... बरोबर आहे... साधा कॉमन सेन्स... गांधीबाबानी सेफ्टी संडास कधी वापरला नाही ... टोपलयान्चा संडास वापरणार्याला हा सेन्स कुठून येणार ! :)