नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

गावाच्या गोष्टी : लायब्रेरी

Primary tabs

साहना's picture
साहना in काथ्याकूट
23 Feb 2021 - 1:52 pm
गाभा: 

इंग्लंड साठी ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज चे जे महत्व आहे ते आमच्या गावाच्या साठी लायब्रेरीचे. ग्रामीण वाचनालय म्हणून भली मोठी पाटी लावली असली तर गावाचे लोक ह्याला वाचनालय सोडून सर्व काही म्हणत. लायबेरी, लिब्रेरी आणि बरेच काही. सुनीताबाई ह्या आमच्या लायबेरियन. प्रत्येकाला लायब्रेरीरीयन म्हणजे गॅझेटेड ऑफिसर बरे का म्हणून ठणकून सांगत असत. आमच्या गावाचे हे वाचनालय बरेच जुने होते, म्हणजे माझ्या पणजोबांनी सुद्धा तिचा लाभ घेतला होता. ह्या वाचनालयांत एकूण ६ कपाटे होती आणि त्यातील सर्व पुस्तके आमच्या घरातील सर्व लोकांनी आणि शानू गुराख्याने वाचली असावीत असे म्हटले तर वावगे ठरू नये.

जगाच्या पाठीवर मी खूप भ्रमंती केली आहे पण अनेक लोकांनी रॉबिन्सन क्रुसो, किंवा टॉम सोयर ह्या कथा वाचल्या नाहीत हे ऐकून मला आश्चर्य वाटते. मार्क ट्वेन आपल्या कॅलिफोर्नियातील ट्रकि गावांत राहत असत. मी मुद्दाम हुन गेले आहे पण त्यांची विशेष अशी छाप ह्या गावावर राहिली नाही. लहान असताना मिसिसिपी रिव्हर ची वर्णने मी वाचली होती आणि शानू गुराख्याला विचारले कि आमच्या ह्या ओहोळा पेक्षा किती मोठी असेल ? त्याकाळी सर्वांत मोठी नदी पहिली होती ती मांडवी नदी (पणजीच्या जवळ हि थोडी जास्तच रुंद आहे). त्याच्या मते ती आमच्या ओहोळाच्या किमान १०० पट मोठी असावी. त्याने मांडवी वगैरे पाहिली नव्हती.

आमच्या लायबेरीत सर्व नेहमीची मराठी पुस्तके होतीच (गोट्या, चिंगी, फास्टर फेणे वगैरे) पण इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे होती. मग जयंत नारळीकर ह्यांची छान पुस्तके होती. जूल्स ची पृथ्वीच्या गर्भात प्रवास, असिमोव ची पुस्तके होती (मराठी भाषांतर). रॉबिन्सन क्रुसो, टारझन, मोबी डिक, सिंदबाद, आलीस इन वंडरलँड, ड्रॅक्युला, फ्रँकेन्स्टन आणि बरीच काही. स्पॅनिश आणि फ्रेंच पुस्तकांचे अनुवाद सुद्धा होते "डॉन कीहोते" (मराठी लेखकाने ह्याला क्विझॉट केले होते). माझ्या स्पॅनिश मित्रांना मला डॉन कीहोते वाचून ठाऊक आहे ह्याचे भयंकर आश्चर्य आणि त्याचा उच्चार क्विझॉट नसून कीहोते आहे हे ऐकून मी चाट.

बरे फक्त पुस्तके असे ह्यांना संबोधणे चुकीचे ठरेल. हि पुस्तके म्हणजे एक वाण होते. बहुतेक पुस्तकांचे बायंडिंग सुटून, पाने जीर्ण झाली होती. मी कुठलेही पुस्तक घरी आणले तर आजी "मी वाचले तेंव्हा चांगले होते" असे म्हणून कौतुकाने आणि आपुलकीने गम वगैरे लावून पुस्तकाची बांधणी पुन्हा ठीक करत असे. गांवातील अनेक पिढ्या ह्या कथांवर वाढल्या होत्या. माझे तीर्थरूप आणि मातोश्री ह्यांनी काही पुस्तके मूळ इंग्रजी भाषेंत सुद्धा वाचली होती त्यामुळे मराठी भाषांतरकाराने काही मूर्खपणा केला असेल तर ती मला सांगायची.

हिंदी पुस्तके ह्या लोकप्रियतेला अपवाद होती. हिंदी पुस्तके सरकारने फुकट पाठवली असली तरी लोकांना आवड नव्हती त्यामुळे ह्या कपाटाला मी सोडून कोणीच गिर्हाईक नसायचे. आचार्य चतुरसेन, बाबू देवकी नंदन खत्री, त्यांचे सुपुत्र दुसरे खत्री, महादेवी वर्मा, अशी पुस्तके होतीच पण त्याशिवाय अग्निपुत्र अभय, शाकाल, अदृश्य कंकाल असली थोडीशी चावट प्रकारची पुस्तके सुद्धा होती. हिंदी भाषेवर माझे खूपच प्रभुत्व लहानपणापासून होते त्यामुळे मी अधाश्याप्रमाणे हि पुस्तके वाचून काढली.

पण लायबेरीचे सर्वांत चांगले सेक्शन म्हणजे मॅगझीन. अर्थांत एका खोलीच्या लायबरीच्या एका टेबलाला मी सेक्शन म्हणत आहे हे चाणाक्ष वाचकांनी ताडले असेल. इथे सर्व वृत्तपत्रे आणि मॅगझिन्स सुनीताबाई व्यवस्थित मांडून ठेवत असत. मग सकाळ झाली कि बाजारांतील सर्व मंडळी इथे येऊन बातम्या वाचून चर्चा करत. लायबेरींत शांतता ठेवायची असते हे वाक्य फक्त भिंतीवर लिहिलेले असायचे, पुणेकर मंडळी सिग्नल आणि नो एंट्रीला जितके महत्व देतात तितकेच महत्व गावकरी ह्या पाटीला द्यायचे. सुनीताबाई सुद्धा हिरीरीने सर्व गप्पांत भाग घ्यायच्या. बदल्यांत खानावळीचा कामत त्यांना सकाळी फुकट चहा आणि संध्याकाळी चहा आणि बटाटावडा पाठवायचा.

माझ्या घरी असंख्य पेपर येत असल्याने पेपरचे मला अप्रूप नव्हते. अप्रूप होते ते फिल्मफेर फेमिना इत्यादी मासिकांचे. आधी असली मासिके येत नसत पण सुनीताबाईनी चार्ज घेतल्यापासून फ्रॉन्टलयीन आणि आणखीन एक मॅगझीन बंद करून हि दोन सुरु केली. गांवातील एका रिटायर्ड शिक्षकांनी स्वखर्चाने चंपक आणि चांदोबा ठेवले होते. चंपक ह्या पुस्तकाविषयी मला विलक्षण संताप होता. कागदाची नासाडी असेच मला वाटायचे. ह्या उलट चांदोबा. तिळ्या बहिणी, अस्वल्या मांत्रिक, अपूर्व अश्या अजब कथा ह्यांत येत असत. माझ्यासाठी ह्या कथा म्हणजे कधी कधी सुपारी खाणार्या माणसाने एकदां LSD वगैरे घ्यावी तसे होते. पोरे बहुतेक करून स्पोर्ट्सस्टार कि अश्या काही मासिकांच्या मागे असत. त्याचा सेंटरफॉल्ड चोरायचा त्यांचा धंदा. विस्डम नावाचे इंग्रजी मासिक साधे सोपे होते. त्याच्या आवरणावर नेहमीच एका लहान मुलाचा फोटो असायचा हि परंपरा आज सुद्धा चालू आहे. ह्यांतील कथा, विनोद साधे सोपे असायचे.

लायब्रेरीत एक ऍटलास होता. होता म्हणजे असावा, कारण हि फक्त रुमर होती, कस्तुरीम्रुगाच्या कस्तुरी प्रमाणे किंवा नागमणी प्रमाणे कारण ऍटलास मध्ये जगांतील सर्व नकाशे असतात असे फक्त ऐकून ठाऊक होते आणि हे पुस्तक प्रचंड महाग असायचे त्यामुळे कुणीच त्याला कपाटातून बाहेर काढत नसत. मला अप्रूप अश्याचेच कि कसे बरे सर्व रस्त्यांचे नकाशे एका पुस्तकांत मावत असतील ? आणि असे पुस्तक मुळी छापावेच का ? कारण हे पुस्तक बरोबर घेऊन प्रवास करणे कठीण नाही का होणार ? ह्या प्रश्नाची उत्तरे माझ्यापुरती अनुत्तरित राहिली कारण मी आजपर्यंत ऍटलास पाहिलेला नाही. सरळ टेरासर्वर ह्या संकेतस्थळाशी संपर्क आला. गुगल मॅपच्या साधारण ५ वर्षे आधी हि मंडळी जगाचे सॅटेलाईट मॅप देत असत.

लायब्ररीरीतील सर्वांत प्रसिद्ध पुस्तक म्हणजे चिमणराव, चिमणरावांचे चर्र्हाट. आमचा शिक्षकांच्या मते ह्या पुस्तकासाठी अक्षरशः मारामारी व्हायची. आणि का ते मी समाज शकते. मी चिमणराव इतक्या वेळा वाचला आहे कि चिमणराव, गुंड्याभाऊ, काऊताई, मोरू, मैना सर्व काही घरचीच मंडळी वाटतात. लायबेरींत पु ल देशपांडे ह्यांचे एकही पुस्तक नव्हते, स्वामी, मृत्युन्जय अशी पुस्तके सुद्धा नव्हती. कारण लायबेरी जुनी होती. सरकारी कृपेने येणारी बहुतेक पुस्तके भिकार असायची पण गांवातील लोकांनी दान म्हणून दिलेली पुस्तके आणि सुनीताबाईनचा शिस्तबद्ध स्वभाव ह्यामुळे लायबेरी व्यवस्थित चालत होती.

सुनीताबाई अत्यंत शिस्तबद्ध होत्या. खरेतर सर्व पुस्तके त्यांनी कुठेही कोंबली असती तरी त्यांना कुणी काही म्हटले नसते. पण त्या काटेकोर पणे पुस्तकें मांडून ठेवत. वर्क एथिक म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकावे. मग एक दिवस त्यांनी मला लायब्ररी हे एक शास्त्र आहे, त्याचा इतिहास काय, पुस्तकांची वर्गवारी कशी असते इत्यादी इत्यंभूत माहिती दिली. मग त्यांचे एक छोटे कपाट होते ते नेहमी चावीबंद असायचे. एक दिवस सुनीता बाईनी मला ते उघडून दिले. हे सौभाग्य माझ्या ओळखीतील कुणालाच भेटले नव्हते. ह्या कपाटांत मग काही विशेष पुस्तके होती. "वयांत येताना" वगैरे कुणा डॉक्टर प्रभूंची. ह्या ज्ञानाचा मला नक्कीच फायदा झाला.

लायब्रेरीच्या काही गोष्टी विलक्षण आणि आठवणीत राहणाऱ्या होत्या. इथे द्वितीय महायुद्ध ह्या विषयावर प्रचंड साहित्य होते. कदाचित ६० च्या दशकांत भारतीयांत ह्या विषयाची जास्त उत्सुकता असावी आणि त्याकाळची हि पुस्तके ह्या लायब्रेरीत पोचली असावीत. पण त्याशिवार क्रीडा ह्या विषयावर भयंकर साहित्य होते. फक्त सुनील गावस्कर चे सनी डेझ नाही तर आणखी बरीच काही होती. टेनिस चा इतिहास, ऑलिम्पिक, पोहणे, सर्कस वगैरे विषयावर. कविता हा विषय शून्य प्रमाणात होता. भयकथा नव्हत्याच पण गुन्हा ह्या विषयावर प्रचंड साहित्य होते. कदाचित काही मोठ्या लायब्रेरी बंद पडल्या आणि त्यातील एक सेक्शन मधील कपाट इथे पाठवून दिले असावे असे माझे वडील म्हणत.

इंग्रजी पुस्तके कमीच होती पण मी सर्वप्रथम वाचलेले पुस्तक म्हणजे टू सिटीस हे चार्ल्स डिकन्स ह्यांचे पुस्तक. मग जेन ऑस्टिन ह्यांचे इमा वाचले. पण आवडली ती मात्र ऑस्कर वाईल्ड आणि हेन्री ह्यांची पुस्तके.

मी अनेक लायब्रेरी पहिल्या आहेत. मडगाव ची गोमंत विद्या निकेतनची, पणजीची सेंट्रल, पुण्यातील भांडारकर संस्थेची, IIT मुंबईची, लंडन पब्लिक, न्यूयॉर्क पब्लिक इत्यादी. ह्यांच्या कडे पहिले असता त्या भागांतील समाजावर त्या वाचनालयाचा आणि वाचनसंस्कृतीचा किती मोठा प्रभाव पडला आहे हे लक्षांत यते. आणि वाचनालय म्हणजे फक्त पुस्तक वाचण्याचे स्थान आहे असे नाही. गांवातील लोक हि गरज ओळखतात आणि ती भागवण्यासाठी एकत्र येऊन हि संस्था निर्माण करतात. विद्यापीठाप्रमाणे हि संस्था बंद असत नाही तर ती सर्वाना खुली. इथे विचारांचे आदान प्रदान अगदी उस्फुर्त आणि मुक्त असते. "नरसिंव्ह राव गेट्स करार करून देश विकायला निघालेत" म्हणून ठणकावून सांगणारा काशिनाथ न्हावीही इथे असतो आणि "टीव्ही ने संस्कृती कशी खराब झाली हे सांगणारे सदानंद मास्तर हि असतात", गृहशोभिकेतून रेसिपी शोधणारी नीता ताई असते आणि पेपर मधील शब्दकोडे सोडवणारा गोपाळ दादा. (गोपाळ दादा आधी कोडे निर्मात्याचे नाव बघत, ब्राह्मण असेल म्हणजे जोशी, देशपांडे वगैरे तरच सोडवत, आणि दुसरे काही आडनाव दिसले तर मग "ह्यांना कसचे येते कोडे डिसाईन करायला?" म्हणून सोडून देत. ह्यांची बायको लग्नाच्या दुसऱ्याच आठवड्यांत एका बस चालकाबरोबर पळून गेली होती हे नंतर समजले.)

अमेरिकेत रॉकफेलर हे सर्वांत श्रीमंत व्यक्ती होते. त्यांनी अमेरिकेत लायब्रेरीचे जाळे विणले, असे म्हटले जाते कि त्याचा संपुन अमेरिकन समाजावर प्रचंड प्रभाव पडला, आमच्या गावांतील लायबेरी पाहून मला तरी त्यांत आश्चर्य वाटत नाही.

मग काळ बदलला. सरकारने "सुधारणा" म्हणून लाकडी कपाटे नेवून कांच नसलेली गोदरेज ची कपाटे पाठवली. खिडकीत बसून रोमियो ची वाट पाहणारी ज्युलिएट अचानक हिजाब घालून आंत लपावी तसे झाले. नवीन पुस्तके म्हणून भिकार दर्जाची नेशनल बुक ट्रस्ट इत्यादींची पुस्तके आली. पाने ३० पण कथा २ ओळींची असला दळिद्री प्रकार होता. मग नेहरू ह्यांचे चरित्र, काँग्रेसी सत्तेच्या लढ्याचा इतिहास, कुणा दोन पैश्यांच्या राजकीय नेत्याचे चरित्र, तथाकथित विद्रोही साहित्य, छुपे कम्युनिस्ट लोकांचे साहित्य (रशियन पुस्तकांचे भाषांतर) वगैरे पुस्तके वाढली. सुनीता बाई रिटायर झाल्या. नवीन कोण तरुण आला त्याला इंग्रजी वाचता सुद्धा येते कि ह्याची शंका होती. एका रेड्याने लायब्रेरीत शिरून धिंगाणा घालावा तशी लायब्रेरीची अवस्था होत गेली. लायब्रेरीत गोळा होऊन गप्पा मरणाऱ्यांच्या वयोवृद्ध कंपूवर यमदेवाने जमावबंदी आणली. इंडियन एक्सप्रेस ची पाने टाइम्स ऑफ इंडिया मध्ये सापडली जाऊ लागली तर द हिंदू कचऱ्याच्या पेटीत, आणि त्याची गच्छंती होऊन मग मिड डे येऊ लागला. त्यातील किंगफिशर गुड्स टाईम्स चा टुडेज मॉडेल चा फोटो पाहण्यासाठी जास्त गर्दी होऊ लागली. काही मंडळी मग लायबेरीच्या बाहेर सिगारेट फुंकू लागल्या. काशिनाथ न्हावी मरून त्याच्या दुकानात कर्नाटकातून कोणी खान येऊन धंदा करू लागला.

एकेकाळी वाचनाव्यतिरिक्त अनेक गोष्टी होत असणारी हि संस्था, गांवातील काव्य शास्त्र विनोदाचे स्थान, आमच्या गावाचे केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्ड, राजीव गांधी मुत्रालया प्रमाणे टाळण्याची जागा बनून राहिली आणि लोक आता ह्याला सरकारी वाचनालय म्हणतात. सरकारी नोकरीचा प्रोग्रॅम. सध्या इथे नक्की कोण जातो हेच ठाऊक नाही.

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

23 Feb 2021 - 10:27 pm | मास्टरमाईन्ड

हा फारसा नाही आवडला

गोपाळ दादा आधी कोडे निर्मात्याचे नाव बघत, ब्राह्मण असेल म्हणजे जोशी, देशपांडे वगैरे तरच सोडवत, आणि दुसरे काही आडनाव दिसले तर मग "ह्यांना कसचे येते कोडे डिसाईन करायला?" म्हणून सोडून देत.

हे
आणि

राजीव गांधी मुत्रालया प्रमाणे

हे मजेशीर वाटलं.

मुत्रालयाला पण नांव देतात?

ह्या वाचनालयाच्या बाजूला एक सार्वजनिक मुत्रालय होते. खरे तर ती फक्त भिंत असावी. त्याच्या समोरील भिंतीवर फक्त पोस्टर्स असत आणि त्याच्या मागे पुरुष मंडळी कारभार उरकरत. इतर दुकानाच्या जवळ बांधल्याने ह्याची घाण सर्व बाजारांत पसरत. कुणी तरी त्याला गांधीगृह नाव ठेवले होते आणि काळाच्या ओघांत ते राजीव गांधी झाले. त्याला सर्व लोक राजीव गांधी भिंत म्हणूनच संबोधित.

> गोपाळ दादा आधी कोडे निर्मात्याचे नाव बघत, ब्राह्मण असेल म्हणजे जोशी, देशपांडे वगैरे तरच सोडवत, आणि दुसरे काही आडनाव दिसले तर मग "ह्यांना कसचे येते कोडे डिसाईन करायला?" म्हणून सोडून देत.

धन्यवाद. आपली टीका बरोबर आहे. प्रकाशित केल्यानंतर एडिट करता येत नाही त्यामुळे मी काढून टाकू शकत नाही. हा सत्य विनोद होता त्यामुळे मी लिहिला पण कदाचित लोकांच्या भावना वगैरे दुखावतील हे लक्षांत नाही घेतले.

सौंदाळा's picture

23 Feb 2021 - 10:55 pm | सौंदाळा

हेच म्हणतो,
आधीच्या भागांच्या तुलनेत हा लेख तेवढा आवडला नाही. कदाचित व्यक्तिचित्र नसल्याने असेल.

मला तरी आवडला. प्रारएक भाग विनोदी असलाच पाहिजे असे नाही.

तुमच्या लेखनातून एका गावाचे स्थित्यंतर दिसत आहे. वाचायला मजा येत आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Feb 2021 - 9:06 am | ज्ञानोबाचे पैजार

स्थित्यंतर छान टिपले आहे
पैजारबुवा,

आवडला. लहानपणी वाचनाचा प्रचंड आधाशीपणा होता. अर्थात त्यावेळी टीव्ही वगैरे प्रकार नव्हतेच किंवा दूरदर्शन 1 आणि 2 होते. मी वाचलेले बहुतांशी साहित्य fantasy प्रकारातले म्हणता येईल. पण मराठीत हे साहित्य फार कमी होते (भारा भागवत हे एक प्रमुख नाव). त्यामुळे जोपर्यंत इंग्रजी साहित्य वाचण्यापर्यंत त्याचे ज्ञान कमावले नाही तोपर्यंत quality वाचनाचा प्रॉब्लेम च होता. इंग्रजी ने मात्र एक नवीनच विश्व खुले झाले जिथे ना विषयांचा तोटा होता, ना पुस्तकांचा.

मराठी भाषेंतील रम्यकथांचे विश्व फारच सुमार दर्जाचे आहे. नाथमाधवांचे वीरधवल हे विशेष पुस्तक समजले जाते पण वाचले तेंव्हा तितके खास वाटले नाही. त्यामानाने हिंदी साहित्यांत सुद्धा जबरदस्त रम्यकथा आहेत. आचार्य चतुरसेन शास्त्री टोळकेन पेक्षा कमी आहेत असे म्हणू शकणार नाहीत. बाबू देवकीनंदन खत्री तर एकदम जबरदस्त.

कंजूस's picture

24 Feb 2021 - 9:47 am | कंजूस

विनोद प्रत्येक ड्रावरात आहे.

लिहीत राहा.

योगी९००'s picture

24 Feb 2021 - 6:30 pm | योगी९००

लेख आणि लायब्ररीचे वर्णन आवडले. चिमणरावांचे चर्हाट हे माझे पण आवडते पुस्तक आहे.

तुषार काळभोर's picture

24 Feb 2021 - 10:39 pm | तुषार काळभोर

ह्या एका प्रकाराचं मला लहानपणापासून लई अप्रूप. सदस्यत्वाची लई हौस.

कधीच पूर्ण नाही झाली. :(

बबन ताम्बे's picture

25 Feb 2021 - 8:51 am | बबन ताम्बे

आमच्या गावातील लायब्ररी मला आठवते. ग्रामपंचायत चालवत होती. अगदी माफक फी होती. लहानांसाठी रामायण, महाभारत, चांदोबा, फास्टर फेणे, एकलव्य, किशोर , खूप काही वाचायला होते. गुलबकावली, सिंदबाद वगैरे वाचल्याचे आठवते.
वाचनावर त्यावेळची पिढी पोसली म्हणायला हरकत नाही.

आपला लेख खूप आवडला.

चौथा कोनाडा's picture

25 Feb 2021 - 5:33 pm | चौथा कोनाडा

छान लेख ! शिस्तबद्ध सुनीताबाईंचे व्यक्तिचित्र आवडले !

माझ्या गावच्या ग्रंथालयाची आठवण झाली. हे नगर वाचनालाय नदीकिनारी उंच घाटावर बांधलेले होते.
वाचनालयाच्या बाल्कनीतून नदीचा निसर्गरम्य परिसर दिसायचा. वार्‍याच्या सुखद झुळुका यायच्या. वाचून झाले इथं येऊन बसणे आणी परिसर न्याहाळणे म्हणजे परमसुख असायचे. शाळेत असताना आठवी, नववी, दहावी अशी तिन्ही वर्षे पडि़क असायचो. मित्रांना कुठेही सापडलो नाही तर ते मला वाचनालयात शोधायला यायचे.

या वाचनालयाने मला आयुष्यात बरेच काही दिले !

सिरुसेरि's picture

25 Feb 2021 - 11:45 pm | सिरुसेरि

छान लेख . अशी लायब्ररी गावामधे असणे हि गावासाठी मानाची आणी प्रगतीची संधी आहे .