नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

गावाच्या कथा : महाकंजूष डोंगरे आजोबा.

Primary tabs

साहना's picture
साहना in काथ्याकूट
19 Feb 2021 - 1:18 pm
गाभा: 

प्रत्येक गावांत लोकांचे काही तरी स्टीरीओटाईप असतातच. कंजूष पणा हा त्यातीलच एक. काही लोक महाकंजुस असतात त्यातीलच एक आपले डोंगरे आजोबा होते. ह्यांचा संपूर्ण परिवारच विचित्र होता. डोंगरे आजोबांची एक सायीकल होती जी त्यांना म्हणे हुंड्यात मिळाली होती. डोंगरे आजोबानी कधीही त्याचे ब्रेक्स वापरले नाहीत कारण वापरल्याने ते झिजले असते. ह्यांचा कंजूषपणा इतका सुप्रसिद्ध होता लोक ह्यांच्या नावांवर अनेक विनोद खपवायचे. आणि ह्यांची एकूण पर्सनॅलिटी अशी होती कि ते खपून सुद्धा जायचे.

एकदा काही कोर्ट कचेरीचा मामला होता. माझ्या वडिलांनी पुढाकार घेतला होता. काही हजार पानाचे झेरॉक्स मारून धावपळ करून सबमिट करायचे होते. त्यामुळे डोंगरे आजोबांचे काम सुद्धा माझ्या वडिलांनी केले आणि व्यवस्थित हिशोब दिला. साधारण ८०० रुपये खर्च झाला असेल. डोंगरे आजोबानी मग रिसिटस आपल्या गृहमंत्रालय म्हणजे डोंगरे आजीकडे दिला. ह्यांचा परिवार मातृसत्ताक होता. ती मग आपल्या पतींना आंत घेऊन गेली. वडिलांना वाटले ह्यांना ८०० रुपये जास्त वाटले असावेत. पण हिशोब बरोबर चोख होता. त्याशिवाय वडिलांनी आपले वाहन आणि वेळ वाया घातला होता ते वगैरे फ्री होते.

मग डोंगरे आजोबा बाहेर आले. त्यांनी कचाकचा ८०० रुपये वडिलांच्या हाती दिले. मग थोडा घुटमळत, त्यांनी "नाही हो आमची हि म्हणाली कि तुम्ही एव्हडे कष्ट घेतले आहेत. त्यामुळे काही तरी दिलेच पाहिजे. म्हणून वरून त्यांनी ५ रुपये काढून वरून वडिलांच्या हाती दिले." मी फिदीफिदी हसले. वडिलांची विनोदबुद्धी तल्लख. "अहो डोंगरे आजोबा, अश्या पद्धतीने आपले पैसे उधळणार काय ? शेजार धर्मच आहे आपला. कशाला उगाच आणि ते सुद्धा अक्खे ५ रुपये उधळायचे ? मी एक काम करतो तुम्हाला इतके मनाला लागेलच तर तुमच्या बागेंतील काही जास्वंदीची फुले घेऊन जातो.". (त्या काळी एक साधी टॉफी ५० पैश्याना मिळायची तर कोक ची छोटी बॉटल २००ml ५ रुपये होती)

वडिलांचे हे बोलणे ऐकून डोंगरे आजी मोठ्याने म्हनालया. "पहिले ? मी सांगितलेच होते तुम्हाला ५ रुपये जास्त होतील म्हणून." मग आम्ही तेथून काढता पाय घेतला.

ह्यांच्या घरी चहा मिळणे म्हणजे साक्षांत मोहिनीच्या हातून अमृत पिणे होय. चहांत ते अत्यंत कमी साखर घालत. आणि साखर डब्यातून काढताना एखाद दुसरा कण पडला ओट्यावर तर मग तो बोटाने अलगद वेचून पुन्हा डब्यांत जायचा. बरे चहाचा कप तर साक्षांत विश्वकर्माने बनवला होता. कारण तिचे अमेरिकेत मोठ्ठे कोफी मग असतात ना तसा तो स्टील चा मग. त्यांत चहा मिळेल असे पाहून बहुतेक पाहुणे "अहो नको हो इतका चहा, खूप मोठा कप आहे" असे म्हणत. पण प्रत्यक्षांत तो एक फाल्स मग होता. म्हणजे बाहेरून मोठा वाटला तरी त्यांचे बूड खूपच जाड होते त्यामुळे आंतील भाग फारच कमी वोल्युम चा होता. "अर्धा कप चहा पुरे" म्हणणारा पाहुणा मग बर्या पैकी पश्चात्तापग्रस्त व्हायचा.

जगाच्या तुलनेत हि मंडळी सुमारे १० वर्षे मागे चालायची. सर्वत्र रंगीत टीव्ही होता तेंव्हा ह्यांनी कृष्णधवल टीव्ही घेतला. म्हणजे कुणी तरी त्यांना दिला. मग रंग पाहिजे म्हणून ह्यांनी त्याला बाहेरून लाल रंगाचे ट्रान्स्परन्ट कागद लावले.त्यातून म्हणे एक रंग जास्त वाढतो.

ह्यांच्या घराचा कुत्रा, खरे तर त्या कुत्र्याने मागील जन्मांत काही महा पाप केले असावे म्हणून ह्यांच्या घरी पोचला. त्याने बिचार्याने काहीही नॉन वेग प्रकार पहिलाच नव्हता. हाडे वगैरे काहीच नाही. त्या कुत्र्याची गत अशी होती कि वाड्यावरील इतर कुत्र्यांनी त्याला वाळीत टाकला होता. आमच्या घराजवळ आला तेव्हा मुध्दाम हुन मी त्याला काही चिकन ची हाडे दिली तेंव्हा तो बिचारा आनंदाने नाचू लागला. शेवटी प्लास्टिक खाऊन मेला बिचारा. डोंगरे आजोबा पेपर आमच्या घरी येऊन वाचत. त्यांच्या मते पेपर वाले लबाड होते. विकत घेताना एक रुपये पण रद्दी ला काहीही भाव देत नाहीत. (मी अतिशयोक्ती करत नाही). मी वडिलांना अनेकदा सांगून पहिले कि ह्यांच्याकडून महिन्याला पेपर चे भाडे घेतले पाहिजे पण त्यांनी ऐकले नाही.

माणसाने काटकसरी असणे कधीही चांगलेच पण ५ पैश्यासाठी ५० रुपयांचे नुकसान करून घेणे म्हणजे मूर्खपणा हे ह्यांना समजत नसे. बागेची देखरेख करायला गडी नको म्हणून कंबरेचे दुखणे असून सुद्धा ते मारून काम करत. त्यांचा मुलगाल गोविंद आणि मुलगी विद्या दोघेही तसेच एक नंबरचे कंजूष. बस चे पैसे नको म्हणून पाच किलोमीटर चालत जात. मग कुणी फुकट लिफ्ट देतो का म्हणून पाहत. एकदा गोविंदाला हायवे वर ट्रक ने लिफ्ट दिली आणि मग निर्जन ठिकाणी थांबवून लुटले. ह्याच्या खिशांत फक्त एक रुपया. तो सुद्धा देवाला द्यायला (काही तरी मोठ्ठा नवस केला असेल). मग त्या चोराने फक्त एक रुपया खिशांत ठेवून तू तालुक्याच्या गावी गेलाच कसा म्हणून बडवले. कुठेही पाहण्यात न येणारे अल्युमिनियम चे वीस पैसे, पांच पैसे ह्यांच्या घरांत असत. देवालयाची डबी उघडून हिशोब करताना वडील मग हि नाणी मोजून डोंगरे परिवार देवळांत कितीदा आला ह्याचा हिशोब मांडता येत असे म्हणत. मग हीच नाणी घेऊन त्याच्या घरी जाऊन रुपये घेत असत.

ह्यांची सायकल दशको दशके चालत असे. त्याचे टायर झरू नयेत म्हणून फक्त गरज असेल तेंव्हाच डोंगरे आजोबा चालवायचे. घंटा कधीही वाजवायची नाही कारण जास्त बजावल्याने ती खराब होते. आमचा शानू गुराखी म्हणायचा कि हिरो सायकल कंपनीने (कंपनीचे नाव आठवत नाही, हिरो नव्हती) बातमी ऐकली कि डोंगरे आजोबानी त्यांची सायकल ५० वर्षे चालवली तर ते तातडीची मिटिंग बोलावून त्याची सखोल चौकशी करून तो मॉडेलच बंद करतील कारण सर्वच भारतीय अशी सायकल वापरू लागले तर कंपनी बंद पडेल.

डोंगरे आजोबा ३ दा वारले. दुसर्या वेळेला तर चक्क डॉक्टर ने येऊन मृत्य झाल्याची घोषणा केली होती. पण काही वेळाने हालचाल झाली. तिसऱ्या वेळेला लोकांनी जास्त काळ वाट पहिली नाही. लवकरच अंत्यविधी उरकला. डोंगरे आजोबांचे सर्व दात पडले होते. दांत बसवायला खर्च येतो म्हणून ते आपले द्रव्य आहारच करत.

ह्यांच्या कंजूष पणाचा एक फायदा होता. जगांत कुठेच न मिळणाऱ्या गोष्टी मी ह्यांच्या घरांत पहिल्या. मर्फी नावाचा रेडिओ. कोकमाच्या बियापासून करणारे सुमारे अर्धा शतक जुने तेल भिंडडेल (हे मेणा प्रमाणे असते). मग ह्यांच्या घरांत एक अत्यंत जुनी फेणीची बाटली होती. म्हणजे त्या प्रकारच्या काचेची बाटली पोर्तुगीजांनी सुद्धा पहिली नसेल असे वडील म्हणत. आणि अननसाचा हलवा. हा कितीही काळ टिकतो म्हणून एका बरणीत घालून त्यांनी तो माळ्यावर गुप्त ठिकाणी ठेवला होता. आमच्या वडिलांच्या मते ते लहान असताना सुद्धा त्या बरणीत तो हलवा होता. मला कधी खोकला वगैरे आला तर डोंगरे आजी. 'बाळ, घरी ये मी तुला चमचा भर चांगला अननसाचा हलवा देते, ठीक होईल तुझा खोकला" असे म्हणत असे. त्या भयानेच माझा खोकला दूर होत असे. कधी कधी खरोखरच जाऊन ह्यांच्या हातून काही ग्राम तरी हलवा सुटेल का अशी परीक्षा घ्यावी असा विचार होता पण विषाची परीक्षा घेऊ नये म्हणून आईने मला बजावले.

गाडी चालवायला पाहिजे ( मी परवाना वगैरे च्या नादात कधीच पडले नाही, आणि वया प्रमाणे परवाना मिळाला हि नसता) तर गाढू धुवायला सुद्धा पाहिजे हा वडिलांचा नियम त्यामुळे मी कधी कधी गाडी धूत असे. एकदा गोविंद असाच चालला होता. त्याने मी गाडी धुताना पहिले. (तो माझ्या पेक्षा किमान २० वर्षे मोठा होता). "अग ह्या गाडीची किंमत साधारण किती असेल ? " त्याने मला विचारले. मी सुद्धा खोचक पणे "गोविंद दादा, कार हे प्रकरण खूपच महाग असते बरे का, ह्या गाडीला किमान हजार रुपये पडतील" असे म्हटले. हजार रुपये ऐकूनच ह्याला भोवळ वगैरे येईल अशी माझी अपेक्षा पण ह्याने माझ्यावरच बार उलटवला. "मला ९०० रुपयांत विकतील का तुझे बाबा?' त्याने विचारले आणि मी सुद्धा "विचारून पाहायला काय हरकत आहे ? " म्हणून वेळ मारून नेली.

तर आमची बंदूक होती आणि वापर सुद्धा भरपूर होता. त्यामुळे घरांत काडतुसे असायची. पण ती महाग असल्याने आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही कधीच कुणाला लोडेड शॉटगन देत नसू. पण डोंगरे आजोबा महा कंजूस असल्याने ते कधीही काडतुसे विकत घेणार नाहीत हे ठाऊक होते त्यामुळे फक्त माकडांना "दाखवायला" म्हणून ते कधी कधी रिकामी बंदूक घेऊन जात. आपली सायकल प्रेमाने वापरणारे आजोबा बंदूक किम १०% प्रेमाने वापरतील अशी अपेक्षा होती. पण ह्यांनी किंवा गोविंद ने त्यावर प्रयोग केले असावेत. त्याच्या नळीतून ह्यांनी काय घातले ठाऊक नाही पण बंदुकीचे रायफलींग खराब झाले आणि ट्रिगर सुद्धा मोडला. मग आम्हाला खर्च आला तो वेगळा.

२०१२ साली डोंगरे आजोबाना कुणी तरी लक्स साबण दिला. (हे घरी राख लावून अंघोळ करायचे). तर त्या दिवशी ह्यांनी बाजारांत जाऊन "हल्ली वास येणारा साबण येऊ लागलाय म्हणे गावांत" असे चार चौघांना म्हटले. (डोंगरे परिवाराच्या घरी टीव्ही फक्त बातम्यांसाठी लावला जायचा, त्याशिवाय आणखीन काहीही ते पाहत नसत).

डोंगरे आजोबाना कुणी तरी एक जुना टेप रिकोर्डर दिला होता. काही सणावाराच्या दिवशी तो ते बाहेर काढून त्यांच्या कडे असणारी गणेश आरत्यांची एकमेव कॅसेट लावत. कॅसेट हा प्रकार नामशेष झाला तरी ह्यांचा तो टेप रिकोर्डर आणि ती टेप ह्यांच्या प्रमाणेच एक्सपायरी होऊन सुद्धा चालू होता. मग मी त्यांच्या घरी गेले असताना माझ्या कडे जुना आयपॉड (मिनी) होता तो दाखवला. ह्यांच्यांत साधारण ५० हजार गाणी आहेत असे मी त्यांना सांगितले. ते थक्क झाले त्यांचा विश्वासच बसेना. मग मी त्यांच्या कानाला लावून एक ५० गाणी ऐकवली. त्यांनी आपला जाड भिंगाचा चष्मां लावून खूप निरीक्षण केले आणि मग "फटावले हो मला, किती खोटारडे माणूस आहेत ? माझ्या एव्हड्या मोठ्या टेप मध्ये दहाच गाणी कशी बरे ? " त्यांच्या मते त्यांच्या टेप च्या साईझ च्या नुसार किमंत लक्षभर गाणी तरी असायला हवी होती.

चाणाक्ष वाचकांनी चष्मा हा शब्द वाचला असेल. दात न बसणवणारा म्हातारा चषमा घेतो ? तर नाही. ह्यांच्या घरांत एकच चष्मा होता आणि दोन्ही नवरा बायको आळी पाळीने तोच वापरात. आता तुम्ही म्हणाल कि एकाच चषमा दुसऱ्याला कसा बरे लागेल ? तर हा चष्मा दोघांनाही लागत नव्हता कारण तो होता आणखीन कुणाचा. उगाच चष्मा लावला म्हणून चालत नाही तो योग्य नंबर चा घ्यावा लागतो वगैरे खूप लोकांनी सांगून पहिले पण जोडपे बधले नाही. वाचता आले तर पुरेसे आहे इतकेच काय ते म्हणायचे.

कंजूष पणा इतका प्रचंड कि मुलगी लग्नाची झाली तर खर्च होतो म्हणून कुणी विशेष कार्यक्रम ना करता घेऊन जातो काय म्हणून पाहायचे. मग एक विधुराशी लग्न करून दिले. इतके गुप्तपणे कि लग्न झाल्यावर लोकांना सांगितले.

सर्व पैसे मंडळी बँकेत ठेवायची आणि एकूण बँक व्यवहारा बाबत प्रचंड गुप्तता. गांवातील पुरोहिताने तोंड लपवत लावणीला जाणे त्या प्रकारे गोविंद बँकेत जायचा. खोटे बोलत नाही. पासबुक अपडेट करून घ्यायचा. कुणीही बँक व्यवहारा बाबत काहीही प्रश्न केला तर हा पोबारा करायचा अगदी बँक कर्मचारी सुद्धा आपले पैसे चोरायला बसले आहेत अशी ह्याची समजूत. त्यामुळे फिक्स्ड डिपॉजिट वगैरे काही असते हे ठाऊकच नव्हते सर्व पैसा सेविंग्स मध्ये पडून होता.

बँक मॅनेजर विनोदाने म्हणायचा कि हि मंडळी पैसा बँकेत ठेवतात म्हणून टाटा वगैरेंना लोन मिळते. कारण ह्यांनी कधीही बँकेतून चार पैसे काढले नसावेत. मॅनेजरने एकदा त्यांना FD करा म्हणून सांगायचा प्रयत्न केला पण मॅनेजर काही तरी ठगू पाहतोय अश्या पद्धतीने त्यांनी तो विषय टाळला.

एक दिवस माझ्या वडिलांनी काही कारणासाठी लोन काढले होते. हे ह्यांच्या कानावर गेले तर डोंगरे आजी आईला सांत्वन देऊ लागल्या. आईला समजेना झाले काय.आई तिच्यावर भडकली. मग डोंगरे आजीनी आपल्या खास कपाटांतील एक अत्यंत जुने श्यामची आई पुस्तक मला दिले. "बाय वाच हो, आणि वडिलांना सांग, कर्जाच्या भानगडीत पडू नका" मी कपाळावर हात मारला.

डोंगरे आजोबांचा एक किस्सा म्हणून सांगितला जातो पण हाच किस्सा मी इतरांच्या नावाने ऐकला आहे त्यामुळे खरा नसावा. तर डोंगरे आजोबा एक दिवस बराच वेळ चालून रात्री देवळांत पूजेला गेले. अर्ध्या वाटेवर त्यांना आठवण झाली कि त्यांच्या खोलीतील तेलाचा दिवा पेटत आहे. मग तेल वाया जाऊ नये म्हणून डोंगरे आजोबा लवकर घरी आले. डोंगरे आजी थोड्या चकित झाल्या. "अहो तुम्ही एव्हड्या लवकर का आलात ?" तर मग आजोबानी कारण सांगितले. त्यावर डोंगरे आजीनी कपाळावर हात मारला "फुटके माझे नशीब म्हणून असला नवरा मिळाला. अहो तेल वाचवायचा नादांत सायकल चे टायर नाही काहो झिजले जास्त ?" त्यावर डोंगरे आजोबा सुद्धा. "खुळा समजतेस कि काय मला, मी सायकल तिथेच देवळाजवळ सोडून आलोय आता पळत जाईन, आणि हे बघ चप्पल सुद्धा झिजू नये म्हणून हातांत घेऊन आलोय"

तर असे हे कंजूष डोंगरे आजोबा आणि त्यांचे कुटुंब.

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

19 Feb 2021 - 2:38 pm | मास्टरमाईन्ड

हसून हसून माझ्या पोटात दुखलं !!
एकदम जब्री.

ह्यांच्या घराचा कुत्रा, खरे तर त्या कुत्र्याने मागील जन्मांत काही महा पाप केले असावे म्हणून ह्यांच्या घरी पोचला. त्याने बिचार्याने काहीही नॉन वेग प्रकार पहिलाच नव्हता. हाडे वगैरे काहीच नाही. त्या कुत्र्याची गत अशी होती कि वाड्यावरील इतर कुत्र्यांनी त्याला वाळीत टाकला होता. आमच्या घराजवळ आला तेव्हा मुध्दाम हुन मी त्याला काही चिकन ची हाडे दिली तेंव्हा तो बिचारा आनंदाने नाचू लागला.

अक्षरशः लोळलो हसून.

सौंदाळा's picture

19 Feb 2021 - 2:48 pm | सौंदाळा

सहीच
सारे प्रवासी घडीचे मधील वामनदाजी आणि वयनीबाय यांची जागोजागी आठवण झाली.

1. कंजूष

2. उधळे

तारतम्य राखून, खर्च करणारे फार कमी...

आता, उधळे कमी झाले, पण कंजूष मात्र भरपूर असतात.... नांव मात्र एकाचेच होते ...

सविता००१'s picture

19 Feb 2021 - 4:38 pm | सविता००१

कसली कसली माणसे आहेत तुमच्या पोतडीत- हसून हसून पुरेवाट

तुषार काळभोर's picture

19 Feb 2021 - 5:03 pm | तुषार काळभोर

आमच्या ऑफिसात काही आहेत.
(जनरलायझेशन नाही. पण बहुतेक दाक्षिणात्य काटकसरी कंजुष असतात, असे निरीक्षण आहे.)

एकदा मेन्टेनन्स म्यानेजर माझ्याकडे आला. (त्यावेळी माझा पगार हातात एकवीस हजार यायचे, तर त्याचं प्याकेज वीस+ लाख होतं). म्हणाला, एका इटलीच्या सप्लायरला मेल पाठवलाय, पण अजून रिप्लाय नाही आला. मी जर एसेमेस केला तर माझ्या पगारातून पैसे कट होतील का?
मला माहिती होतं की एका इंटरनॅशनल एसेमेसचे पाच रुपये कंपनी कट करणार नाही. कारण कंपनी मासिक भाड्याच्या वर तीनशे रुपये बिल मान्य करायची. मी म्हणालो, एचारला विचारावं लागेल. बहुतेक कट होतील.
त्याच्या चेहर्‍यावर दोन तोळ्याची अंगठी हरवल्याचे भाव.
मग मी माझा मोबाईल अनलॉक करून त्याच्या समोर ठेवला आणि म्हणालो कॉल कर किंवा मेसेज कर.

अजूनही घरी असताना जर काही मेजर प्रॉब्लेम असेल आणि अर्जंट सपोर्ट साठी युरोपात कॉल करायचा असेल तर, मी विचार न करता मोबाईल वरून कॉल करतो. वैयक्तिक पाच-पन्नास रुपये खर्च होतात, पण कंपनीचे हजारो-लाखो रुपये आणि माझी स्वतःची (नंतरची) डोकेदुखी वाचते!

मुक्त विहारि's picture

19 Feb 2021 - 5:39 pm | मुक्त विहारि

कंपनी नौकरी देते

2-3% कंपनीच्या कामासाठी खर्च झाले तर, काय हरकत आहे?

माझा एक बाॅस होता, तो म्हणायचा, 5-10% छोड देने का. हर एक पैसे का हिसाब, नहीं मिल सकता. उपरवाला, बाद में देता है.

अद्याप तरी मला, 2-3% कंपनीच्या कामासाठी खर्च केल्याचा पश्र्चात्ताप होत नाही .... देवाने सगळी कसर भरून काढली ...

40-50,000/- पगार घेणारा, पाच रुपयांची रिक्षा केली तर, बिल लावणारे, बघीतले आहेत.

तुषार काळभोर's picture

19 Feb 2021 - 7:06 pm | तुषार काळभोर

सहमत!

कंजूस's picture

20 Feb 2021 - 4:56 am | कंजूस

मी तुमचा शेजारी नाही. वाचलो.

सिरुसेरि's picture

20 Feb 2021 - 8:17 am | सिरुसेरि

मस्त विनोदी आठवणी .

आमच्या माहितीतील एक सद्गृहस्थ रेल्वेत नोकरीला होते. घराला कधी रंग लावला नाही किंवा कोणतीही छान छोकी केली नाही. घरात मोजकेच फर्निचर मोजकेच कपडे आणि मोजकाच आहार.

त्यांना एक छंद होता तो म्हणजे बाजारातून शेअर्स विकत घेणे तेवढे सोडले तर त्यांनी कधी खर्च केलेला पाहिला नाही.

त्यांचे निधन झाले तेंव्हा त्यांच्या मुलाला हे समभाग आपल्या नावावर करून घेण्या साठी अक्षरशः कर्ज काढावे लागले.
कारण या सदगृहस्थाकडे सव्वा दोन कोटी रुपयाच्या आसपास समभाग होते आणि ते आपल्या नावावर करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क ७ का ८ लाख रुपये मुलाला भरायचे होते त्यासाठी त्याला तात्पुरते कर्ज काढावे लागले.

मुक्त विहारि's picture

20 Feb 2021 - 12:09 pm | मुक्त विहारि

सव्वा दोन कोटी, मुलाच्या दृष्टीने वाईट सौदा नाही....

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात, मुलगा धडाडीचा असेल तर, पैसा साठवू नये आणि मुलगा उधळ्या असेल तरीही पैसा साठवू नये.

कानडाऊ योगेशु's picture

20 Feb 2021 - 2:27 pm | कानडाऊ योगेशु

एक दोहा आहे.
पूत सपूत तो का धन संचय
पूत कपूत तो का धन संचय!

सुबोध खरे's picture

20 Feb 2021 - 12:32 pm | सुबोध खरे

मुलाच्या दृष्टीने वाईट सौदा नाही

पण मुलाचे बालपण हलाखीत गेले आणि मध्यवयात घबाड मिळाले.

काय चांगले काय वाईट ठरवणे कठीण आहे.

मुक्त विहारि's picture

20 Feb 2021 - 5:11 pm | मुक्त विहारि

कधीच न मिळण्यापेक्षा, मध्यम वयात मिळालेले काय वाईट?

योगी९००'s picture

20 Feb 2021 - 7:44 pm | योगी९००

हहपुवा...

अतिशयोक्ती आहे का ही? इतके कोणी कंजूष असू शकते का? पण वाचून मजा आली.

माणूस जर खरंच इतका कंजूष असेल तर घरी कुत्रा का पाळेल?

शेवटचा किस्सा अतियशयोक्ती होता पण बाकी सर्व खरे आहे. हि मंडळी इतकी कंजूष होती कि श्राद्धाला कावळ्याला घालताना सुद्धा चार कण शिताचे ठेवायची आणि पिंड सुद्धा लिंबा एवढा. त्याशिवाय पिंड घराच्या बाहेर ना ठेवता खूप दूर जाऊन ठेवायचे कारण एकदा खाऊन कावळ्याला परत यायची सवय झाली तर ?

कुत्रा ह्यांनी मुद्दाम ठेवला नव्हता, कुत्र्याने काही तरी पाप केले म्हणून बिचार्याने ह्यांना मालक मानले असावे. आजूबाजूला जवळ शेजारी नसल्याने कुत्र्याकडे काही उपाय नसावा.

आणि ह्यांचाच आणखीन एक किस्सा सांगायला विसरले. गणेश चतुर्थीला हि मंडळी गांवातील मूर्तिकाराकडून सर्वांत स्वस्त मूर्ती आणायची. रंग लावायची सुद्धा गरज नाही असे सांगून स्वस्तांत आणायची. मग एक दिवस ह्याच्या जावयाने त्यांना शहरांतून खूप छान मूर्ती आणून दिली. त्याचे विसर्जन ज्यांना करणे शक्य नाही झाले. मग त्यांनी प्रतीकात्मक विसर्जन करून मूर्ती तशीच ठेवली आणि दर वर्षी तोच गणपती बसवायचे.

चाणाक्ष वाचकांनी चष्मा हा शब्द वाचला असेल. दात न बसणवणारा म्हातारा चषमा घेतो ? तर नाही. ह्यांच्या घरांत एकच चष्मा होता आणि दोन्ही नवरा बायको आळी पाळीने तोच वापरात. आता तुम्ही म्हणाल कि एकाच चषमा दुसऱ्याला कसा बरे लागेल ? तर हा चष्मा दोघांनाही लागत नव्हता कारण तो होता आणखीन कुणाचा.

हसून हसून पोट दुखायला लागले..

काय काय लोकं असतात..

आमचे वडील विनोदाने म्हणायचे कि डोंगरेआजीची दातांची कवळी नव्हती नाहीतर दोघं नवरा बायकोनी एकच वापरली असती.

तेजस आठवले's picture

21 Feb 2021 - 9:51 am | तेजस आठवले

मस्तच हो साहनाताई. हसून हसून मुरकुंडी वळली. रविवार सकाळची सुरुवात चांगली झाली.
१. लहानपणी भिकाजीराव करोडपती नावाची मालिका येत असे. सुधीर जोशींनी त्यात अप्रतिम काम केले होते. त्यांच्या चेहेऱ्यावरचे भाव पहा. एपिसोडस तुनळी वर उपलब्ध आहेत. एका एपिसोड मध्ये ते पाहुण्यांना सरबत पाजतात ते ग्लास पाहून नॅनोटेक्नॉलॉजीचा पाया कोणी घातला होता ते समजते.
२. डोंगरे आजोबांसारख्या लोकांमुळे कंटाळून शेवटी टोपीकरांनी हिंदुस्थान सोडला आणि ते चालते झाले असे अंतू बरवा हेगिष्ट्यांना सांगत होते. अहो टोपीकरांना लुटण्यासारखे काही ठेवलंनीतच नाही.
३. दाक्षिणात्य कंजूसपणाबद्दल : आम्रविकेत डॉलर वाचवण्यासाठी कांदे बटाटे ह्याच भाज्या खाऊन राहणे. दहीभात खा खा खाणे. त्याच्या वासाने देशी आणि गोर्यांची डोकी फिरवणे. नेटफ्लिक्सचे कनेक्शन दर तीन महिन्यांनी बंद करून नवीन इमेल आयडी वापरून जिवंत ठेवणे जेणेकरून दर कमी पडेल. एकाच कार्डावरून खरेदी/विमान बुकिंग करणे आणि जमा झालेले लॉयल्टी पॉईंट्स वाटून घेणे. सतत प्रत्येकाला कुठेना कुठे तरी रेफेर (अगदी नवीन वीज कनेक्शन ते बँकेत अकाउंट काढणे) करणे आणि त्याचा फायदा वसूल करणे. टॉवेल हे वस्त्र न धुता आठवडा न आठवडा वापरणे. माझा एक कलीग डोक्यावरून अंघोळ करीत नसे. त्याचे डोके सदैव हिमवर्षाव आल्यासारखे कोंड्याने भरलेले असे. ह्याचाच कंपू कार्यालयातल्या छोट्या पॅन्ट्रीत दहीभातात हात बुचकळून बुचकळून खात असे. त्यामुळे गोरे पॅन्ट्रीत येणेच बंद झाले. ह्यांचे नेटवर्क तर इतके जबरदस्त असते की प्रवासात इतर मद्राश्यांच्या घरी मुक्काम ठोकून राहण्या खाण्याचा खर्च वाचवतात. घरे तर अस्वच्छ असतातच. अमेरिकेतले अपार्टमेंट्स पण घाण करून ठेवलेले असतात. झुरळे वाढवून ठेवतात, त्यामुळे गोरे लोक अपार्टमेंट मध्ये घर घेणे बंद करतात आणि मॅनेजमेंट सर्वच देशी लोकांना वाढीव भाडेदर लावतात हळूहळू. करियरवर परिणाम होऊ नये आणि पैसे वाचावेत म्हणून ३ महिन्यांच्या तान्ह्या जुळ्या मुलांना चेन्नईमध्ये आजी आजोबांकडे पुढची ३ वर्ष ठेवलेली माझीच क्लायंट मॅनेजर होती. अठरा अठरा तास काम करणे ह्याचे एका मर्यादेपर्यंत कौतुक होऊ शकते पण त्यामुळे बाकीच्या देशी आणि गोऱ्या लोकांवर पण प्रचंड ताण येतो, कारण अपेक्षा वाढतात. असो, विषय न संपणारा आहे., इथेच थांबतो.

एकदा आमच्या अपार्टमेंट मध्ये कुणा वृद्ध झोडप्याच्या किचन मध्ये आग लागली आणि त्यांनी घाबरून अग्निशमन दलाला बोलावले. आग विशेष नसली तरी प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी सर्वाना बाहेर काढले २५० लोकांची कपॅसिटी असलेल्या त्या कॉम्प्लेक्स मधून एकूण ८०० लोक बाहेर आले. बहुतेक लोक तुलुगू. काही अपार्टमेंट मध्ये चक्क १५ लोक राहत होते. फायर मार्शल जे जबरदस्त फाईन ठोकली. मग कंपनीने ऑडिट केले तर काही अपार्टमेंट मध्ये इतके ढेकूण झाले होते कि त्यांनी सर्व भाडेकरूंना बाहेर काढून चांगला एक आठवडा पेस्ट कंट्रोल केला.

सहमत.. दाक्षिणात्य लोकं इतकी काटकसर आणि चिंदीपणा करतात कि ते डोक्यात जाते

मी हिंजवडी मध्ये कामाला असताना बऱ्याच PG मध्ये डोकावले आहे. कधी स्वतः साठी तर कधी मित्रांसाठी रूम शोधण्यासाठी.. पण प्रत्येक स्वस्त PG मध्ये मला सर्व दाक्षिणात्य लोकच भरलेले दिसले. एका रूम मध्ये 4-5 जण.. प्रत्येकाला एक खाट आणि एक कपाट.. एका 2 BHK room मध्ये जवळपास 25-30 जणांची राहण्याची सोय.. आणि तरीही त्या रूम हॉउसफ़ुल्ल असायच्या.

ऑफिस मध्ये एक कलीग होता दक्षिणेकडचा. तो जवळ आला कि वास सहन होत नसे. डोक्यावर लावलेल्या एका विशिष्ठ तेलामुळे..

शक्यतो त्यांच्यासोबत इतर कोणी जेवायला जात नसे.. तसे ते देखील कधी इतरांच्यात mix होत नसत. त्यांचा स्वतःचा एक विशिष्ठ असा कंपू असे.. त्यांच्या कंपूत इतर लोकांना आणि हिंदी भाषिक लोकांना कधीच स्थान नसे. प्रत्येक ठिकाणी ते आपले भाषाबंधू किंवा भगिनी शोधून काढून त्यांच्याशीच सलगी करत.

असो. जेनेरलायझेशन करणे चुकीची आहे. कारण मला भेटलेल्या पैकी काही दाक्षिणात्य लोकं खूप च स्मार्ट, सर्वसमावेशक आणि हुशार होते..

पण जास्त करून वर सांगितल्यासारखेच चिंधी होते..

कानडाऊ योगेशु's picture

21 Feb 2021 - 2:45 pm | कानडाऊ योगेशु

बेंगलोरमधल्या मारथाहल्ली हा भाग मिनि हैद्राबाद म्हणुन ओळखला जातो कारण तिथे बहुसंख्य तेलुगु भाषिक राहतात. सर्वच पीजी तेलुगु भाषिकांनी भरलेले आहेत.एका पीजीमध्ये तर मला तुम्हाला तेलुगु येत नाही म्हणुन आश्चर्य व्यक्त केले गेले होते. एक कन्नड भाषिकाला तिथल्या एका दुकानात काही वस्तु घेताना दुकानदार तेलुगुत बोलला व ह्याने कानडीत उत्तर दिले.त्यावर दुकानदाराने प्रतिप्रश्न केला कि तुला तेल्लुगु येत नाही का? हा भडकला. कर्नाटकात राहुन तुला कन्नड मध्ये उत्तर देता येत नाही का असे विचारले. मारामारीच होणार होती पण इतरांनी मध्यस्थी करुन परिस्थिती सांभाळली.
मी बेंगलोरमध्ये जेव्हा पीजी मध्ये राहिलो आहे तेव्हा आजुबाजुला तेलुगु भाषिकच जास्त होते. कधी कधी तमिळ ही असत. पण एकदा का ह्यांच्या कंपुत शिरकाव केला कि गोष्टी सोप्या होतात. मराठी भाषिक मात्र एक्मेकांत अंतर राखुनच राहत असत.हा आपल्यात असलेला एक मोठा दुर्गुण आहे असे मला जाणवले.

बाप्पू's picture

21 Feb 2021 - 3:40 pm | बाप्पू

इतर भाषिक लोकं ( तामिळ, तेलगू ) ज्या पद्धतीने आपल्या मातृभाषेसाठी आग्रही असतात त्या पद्धतीने मराठी लोकं नसतात एव्हढेच बोलून हा विषय थांबवतो..

कारण आस्तिक - नास्तिक, भक्त -चमचे, गांधी -नेहरू -RSS इ प्रमाणे मराठी - अमराठी हा विषय अंत्यन्त स्फोटक आहे. आणि सहना जी यांचा हा मजेशीर धागा दुसरीकडे भरकटवण्याचे पाप मला माझ्या माथी नाही मारायचे...

कंजूस's picture

21 Feb 2021 - 11:35 pm | कंजूस

तमिळ, तेलगू लोकांना ठराविक विषयांना वाचा फोडायला आवडते आणि ते विषय सर्वच मराठी लोकांना विशेष वाटत नाहीत. त्यांचे विषय १) साला बायकोचा भाऊ, २)साडू किती पैसेवाला आहे. ३) सिनेमातली नटी आणि इतर गमती.

काही भागातल्या मराठी लोकांत असे विषय सांगता येतील. उदाहरणार्थ १) सोन्याचा / जमिनीचा भाव २) हुंडा किती दिला, ३) गव्हाचा/डाळीचा भाव काय आणि यंदा काय भावाचे किती भरले.

बबन ताम्बे's picture

21 Feb 2021 - 3:50 pm | बबन ताम्बे

आमच्या ऑफिसमध्ये पण एक सहकारी होता,त्याच्या कंजूषपणाची आम्ही तोंडावर टर उडवायचो.
तो कम्पनीच्या शर्ट पॅन्टला (युनिफॉर्मला) कधीच इस्त्री करत नसे.
नवीन कपडे ठराविक काळानेच घेत असे. भले मग ते फाटायला आले असतील.केस कितीही वाढले तरी ठराविक काळानेच कापायचे असा दण्डक होता.
त्याच्या जायच्या यायच्या रस्त्यावर संध्याकाळी कुणी गाडीवरून सोड म्हटले तर ठराविक स्टॉपलाच सोडेल म्हणायचा. तिथून पुढे तुझे तू कसेही जा असे स्पष्ट सांगायचा.
दाराची बेल बंद ठेवायचा. वीज बिल कमी यावे म्हणून.
कुणी नवीन घर घेतले की काय राव, वास्तुशांती घालून आमची शांती करणार की नाही म्हणायचा. पण स्वतः घर घेतले तेव्हा गुपचूप गृह प्रवेश केला.
:-)

कंजूस's picture

21 Feb 2021 - 11:27 pm | कंजूस

वास्तू आपोआपच शांत बसली असणार ना!

पिनाक's picture

22 Feb 2021 - 11:49 pm | पिनाक

फार हसलो..

ह्यांच्या घराचा कुत्रा, खरे तर त्या कुत्र्याने मागील जन्मांत काही महा पाप केले असावे म्हणून ह्यांच्या घरी पोचला. त्याने बिचार्याने काहीही नॉन वेग प्रकार पहिलाच नव्हता. हाडे वगैरे काहीच नाही. त्या कुत्र्याची गत अशी होती कि वाड्यावरील इतर कुत्र्यांनी त्याला वाळीत टाकला होता.

'बाळ, घरी ये मी तुला चमचा भर चांगला अननसाचा हलवा देते, ठीक होईल तुझा खोकला" असे म्हणत असे. त्या भयानेच माझा खोकला दूर होत असे.