.

ज्ञात अज्ञात पंढरपूर ७ व्यास तीर्थ आणि व्यास नारायण मंदिर, पंढरपूर

Primary tabs

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in भटकंती
8 Jan 2021 - 10:36 am

ज्ञात अज्ञात पंढरपूर ७व्यास मंदिर

व्यास तीर्थ आणि व्यास नारायण मंदिर, पंढरपूर

आधुनिक जगतातील सर्वांत प्राचीन ज्ञानसंपदेचे साधन म्हणजे हिंदुंचे वेद होय. ते अपौरूषेय आहेत. तसेच ते मौखिक पद्धतीने शतकानुशतके जतन केले आहेत अगदी उकार, वेलांटी, अनुस्वार, काना, मात्राचेच नव्हे तर स्वराघाताताही कोणताहि बदले होवू न देता. हे या जगतातीतल आधुनिक विद्वानही आश्चर्य मानतात. अगदी चमत्कारच मानतात. त्यासाठी मौखिक अध्ययन पद्धतीचे तोंड भरून गुगान गातात. मुळात एकच असणाऱ्या अपौरुषेय वेदांचे संरक्षणार्थ ऋग, यजु: साम, अन् अथर्व अशा चार विभागात त्याची योजना करणाऱ्या तसेच आपल्या ग्रंथलेखनकामी साक्षात गणरायाला पाचारून त्यालाच लेखणी बद्ध करायला लावून महाभारतासारख्या ऐतिहासिक आणि अलौकिक ग्रंथाची निर्मीती करणाऱ्या, १८ पुराणे निर्माण करूनही असंतुष्ट राहिल्याने आत्मसंतोषासाठी कृष्ण चरित्र सांगणाऱ्या भागवत महापुराणाची निर्मिती करणाऱ्या व्यासांचे मंदिर अखिल भारतवर्षात क्वचितच अन्यत्र असेल. जसे पंढरीत आहे. हो मी खरं सांगतोय आपल्या पंढरपूरात महर्षि व्यासांचे मंदिर आहे. विश्वास वाटत नाही ना? मग प्रत्यक्ष येवून पहाच.

गावाचे उत्तर भागात, अंबाबाई पटांगणाचे पलिकडे आणि रामबाग समोरचे भागात नदी काठाजवळ हे पुरातन मंदिर आहे. साधारणत: १०० x ९० फुट असा याचा विस्तार असून दगडी बांधणीचे छोटेखानी असे हे मंदिर आहे. पश्चिमेकडील आकर्षक प्रवेशद्वाराने आत जाता मधे पुर्वाभिमुख असा सुमारे २० x १५ फूट लांब रूंद अन् ९ फूट उंचीचा दगडी मंडप दिसतो त्यामागे अंदाजे १० x १० चा गाभारा तोही दगडी, वर लहानसेच पण दगडी शिखर असलेले असे याचे स्वरूप. याला पूर्वेलाही एक प्रवेशव्दार आहे. जे नदीकिनारी उघडते पण त्याचा वापर क्वचितच होतो. मधल्या प्राकारात बाहेर मोकळी जागा सोडून चारी बाजूनी जुन्या काळी साध्या मराठमोळ्या पद्धतीचे लाकडी खांडा दांड्याचे आच्छादनाचे पडव्या होत्या ज्या आज दिसत नाहीत. काळाच्या ओघात त्या पडून गेल्या. केवळ चारी बाजूच्या बाहेरच्या दगडी भिंती अस्तित्वात आहेत. जणू एखादा छोटी कोटच वाटाव्या अशा या भिंती आहेत. जवळच उत्तर अंगाला एक दास मारूती आहे. ज्याला लहानशी विटांची घुमटी आहे. गाभाऱ्यात सिंहासनावर लहानशी सुमारे २|| फुटी पद्मासनात बसलेली व्यासांची मुर्ती असून त्यांनी उजव्या हाती पोथी आणि दुसऱ्या हाती जपमाला धारण केलेली आहे. मंदिर किती प्राचिन आहे याबद्दल फारसे सांगता येत नाही मात्र आताचे मंदिर हे ज्योतिपंत महाभागवत नावाचे भक्तांने बांधले हे निश्चितपणे सांगता येते. या ज्योतिपंतांनी व्यासांची अनन्यसाधारण भक्ति केली व्यासमुनिंची सबंध हिंदुस्तानात मंदिरे बांधली. तेही एक दोन नव्हे, थोडी थोडकी १० -२० नव्हे तर १०८ व्यास मंदिरे त्यांनी बांधली. पंढरपूरातील हे त्यातलेच एक व्यास मंदिर. व्यासांनीही आपल्या भक्ताच्या भक्तीप्रेमापोटी त्याला काशी विश्वेश्वराचे स्थानी भागवत एेकून संतोषून आपले दर्शन दिले होते. त्यानंतर ज्योतिपंतांनी तीर्थभ्रमण केले. त्यात पंढरीत आल्यावर इथले स्थान महात्म्य जाणून हे देवालय उभारले. कारण महर्षी व्यासांनी चंद्रभागा तटी राहून अनेक वर्षे तप केले. त्यांना पांडुरंगाचे दर्शन झाले. हे स्थान अति पवित्र आहे हे जाणून व्यास इथेच राहते झाले. या मंदिराचे समोरचे चंद्रभागेच्या पात्रात व्यासतीर्थ म्हणतात. इथे तप केल्याने व्यासांना व्यासपण प्राप्त झाले होते. त्यामुळेच यास्थानी व्यासतीर्थाजवळ हे मंदिर उभारले. दुर्दैवाने या ज्योतिपंता बद्दल विशेष माहिती मिळत नाही. त्यांचे आई वडिल कोण? ते कोठले? त्यांचे अन्य चरित्र काय? त्यांनी बांधलेली मंदिरे कोटे कोटे आहेत? आता त्यांची स्तिथी काय? एवढे धनार्जन त्यानी कसे प्राप्त केले? की त्यांना कोणा धनिकांनी अर्थ सहाय्य केले? असल्यात ते दानशूर कोण? त्यांचा वंश विद्यमान आहे का? याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही. किती दुर्दैव ना हे? असा संत महात्मा जर पाश्चात्य देशी परदेशी जन्मला असता तर शेक्सपियरसारके त्याचे घर, दार, वापरत्या वस्तू अगदी गावही परक्यांनी संरक्षिले असते. पण या बाबतीत आपल्याकडे सगळाच अंधार.

व्यासांच्या महत्तम कार्यामुळे त्यांना नारायणाचे नामाभिधान प्राप्त झाले. त्यांना साक्षात नारायणच मानून पुज्य केले गेले. त्यामुळेच हे मंदिर निर्मीले गेले आणि नावही "व्यास नारायण मंदिर" हेच ठेवले गेले. व्यास हे तसे तपाचरण करत फिरणारे भटके. त्यामुळेच बहुदा पूर्वी येथे फिरत्या गोसावी, बैराग्यांची वस्ती असायची. त्याचे नियम धर्म ते तिथे चालवायचे. फिरस्त्ये बैरागी गोसावी ही धर्माचरणाने नियमाचे पालन करत. त्यांचे वापरासाठी म्हणून पाणी हवे म्हणून चांगले दगडी बांधीव आडाचीही तिथे व्यवस्था आहे. आज नदी शेजारी असून हा आड निर्जल झाला आहे.

यास्थानी भगवान व्यासांचे पूजन करून दर्शन घेतले असता ज्ञान प्राप्ती होते. येथे कार्तिक पौर्णिमेला मोठा अुत्सव होत असे तसेच दशाहारातही भाविकांची मोठी गर्दी असे. आषाढ पौर्णिमा म्हणजे तर व्यास पूजेचा, गुरू पुजेचा दिवस व्यास तर सगळ्यांचे गुरू "व्यासोच्छीष्ट जग त्रय" या उक्ती ने त्यांचे कार्य कळते. त्यामुळे त्यादिवशी येथे विशेषत्वाने व्यासपुजन होई. शिवाय पौष महिन्याचे प्रत्येक रविवारी पंढरी नगरी बरोबरच पंचक्रोशीतील माता भगिनी व्यास दर्शनाला येथे आवर्जुन येतात. कधीकाळी इथे भागवताबरोबरच इतर पुराण कथांचे हि कथन चालायचे याचे स्मरण पंढरीतील लोकांकडून एेकायला मिळते.

आळंदींचे दत्तावतारी श्रेष्ट यति, ज्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिरातील वार्षिकोत्सव तसेच नित्योपचार यांची घडी बसविली, तसेच १२५ वर्षांपूर्वी आळंदीत जीवंत समाधी घेतली, त्या नृसिंह सरस्वति यांनी येथे १२ वर्षे राहून तपाचरण केले आहे. त्यांचे वास्तव्याचे तळघर आजही अस्तित्वात असून तेथे चौरंगावर स्वामींचे प्रकाशचित्र मांडून त्यासमोर त्यांचे प्रसाद पादुकांचे ही पूजन होते. स्वामींचे विदर्भ खानदेशातील भक्त आजही या तपस्थळीचे दर्शनाला येतात.

कधी काळी आस्थेवाईक पद्धतीने याची व्यवस्था ठेवली असेल आज मात्र या महान महर्षीचे मंदिराची, तपस्थळीची आणि लोक मनाचीही पडझड झाली आहे. तिही इतकी की पंढरपूरकरांना आपल्या गांवी इतका महान ठेवा आहे हे ही माहित नाही. इथल्या राजकीय लोकांना माहितेय ती केवळ व्यासनारायण नावाने असलेली सभोवतालची झोपडपट्टी. निदान त्या गरिबांनी तरी देवाचे अस्तित्व नावाने तरी का होईना टिकविले आहे. या दिन झोपडपट्टीवासी गरिबांची शाळकरी , होतकरू मुले अभ्यासाला या मंदिराचे निरव शाततेत बसतात. पंढरीतील वेद अभ्यासक पाठांतरासाठीही यास्थळी अवश्य बसत असत. याबाबत मुळचे पंढरीचे पुत्र असणारे अन् आता बहुअंशी विदेशात राहुन हिंदुधर्म पताका फडकाविणारे विद्वत् वर्य वेदाचार्य संदिपशास्त्री कापसे यांच्या आठवणी अजूही ताज्या आहेत. वेळीच या मंदिराकडे योग्य तऱ्हेने पुरेसे लक्ष दिले नाही तर काळाच्या पोटात हे ही मंदिर गडप होईल अन् पंढरी क्षेत्राचा अलौकिक असा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा नष्ट होईल. व्यासांचे स्मारक नष्ट होईल. नृसिंह सरस्वतिंचे स्मारक संपुष्टात येईल. पण देव करो अन् हि आशंका खोटी ठरो हिच त्या व्यास नारायणाचे चरणी अन् ज्याची भक्ती व्यासांनी केली त्या परमात्मा श्री कृष्णचरणी विनवणी!

©आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

8 Jan 2021 - 5:51 pm | चौथा कोनाडा

व्यास मंदिराची अतिशय रोचक माहिती !
ज्योतिपंत महाभागवत आणि त्यांनी बांधलेली व्यास मंदिरे या बद्दल प्रथमच वाचण्यात आले.
पंढरपुर दर्शन सहलीत अशी ठिकाणे दाखवतात का ?

Ashutosh badave's picture

10 Jan 2021 - 9:51 am | Ashutosh badave

अशी सहल होत नाही

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2021 - 5:49 pm | चौथा कोनाडा

पुण्यामध्ये विविध हेरिटेज वॉक होत असतात, तसेच पंढरपुरला देखील केले तर अशी माहिती वारकरी, पर्यटक यांच्या पर्यंत पोहचू शकेल.
पंढरपुर पर्यटन / यात्रा या दृष्टीने भविष्यातील रोजगार आणि विकास या साठी हे फायद्याचे असेल.

परिंदा's picture

10 Jan 2021 - 3:06 pm | परिंदा

आपण लिहित असलेल्या या प्रत्येक ज्ञात-अज्ञात स्थळाचे गुगल लोकेशन लेखात दिले तर बरे होईल.

Pradip kale's picture

14 Jan 2021 - 8:38 pm | Pradip kale

धन्यवाद तुम्हाला, एवढे दिवस पंढरपुराजवळ असुनही या स्थानाची माहीती नव्हती. आता मात्र आवर्जून भेट देतो.

कोण's picture

14 Jan 2021 - 9:22 pm | कोण

अनुक्रमणिका असल्यास खूप मदत होईल.