परग्रहावरील बेट: भाग १ – पूर्वतयारी

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
31 Dec 2020 - 11:57 pm

"पण तू तर नेहमी म्हणायचीस कि तिकडे जायचं तर सातआठ महिने आधी प्लॅन करावं लागेल..."

(पर आप तो हमेशा महंगीवाली टिकिया... काय कधी आठवेल सांगता येत नाही!)

"जर विमानाची तिकिटं आणि हॉटेल्स त्याच किमतीत चार आठवडे आधी मिळत असतील तर..." हसू दाबत मी उत्तर देऊन टाकलं. पण नवरा एवढ्या सहज ऐकणार नव्हताच.

दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. जुलै महिन्यात युरोपात हवामान छान असतं (किंवा तशी शक्यता जास्त असते!) त्यामुळे दोघांनीही जुलैत एक आठवडा सुट्टी घेऊन इटलीला डोलोमाइट्स पर्वतांत ट्रेकिंगला जायचं ठरलं होतं. जर्मनीहून ट्रेन किंवा विमानाची तिकिटं उपलब्ध होती. पण चार आठवडे आधीच्या शनिवारी लक्षात आलं कि राहायची सोय होणं कठिण आहे. बजेट वाढवणं किंवा आडवळणाच्या ठिकाणी राहणं हेच पर्याय होतं. रविवारी काय ते बुकिंग करून टाकायचं, असं आम्ही ठरवलं. पण शनिवारी रात्री माझ्या डोक्यात एक भन्नाट विचार आला. पटकन स्कायस्कॅनरवर पाहिलं तर विमानाची तिकिटं बजेटमध्ये होती. अर्थात नवर्‍याला पटवणं भाग होतं. त्यासाठी नेटवर थोडी माहिती, विदा वगैरे (होय, विदाच!) गोळा करून ठेवला.

रविवारी सकाळी ट्रिपचा विषय निघाल्यावर बजेट वाढतंय तर डोलोमाइट्सला पुन्हा कधीतरी जायच का, असा खडा टाकला. नवरा मला ओळखून आहे. लगेच प्रतिप्रश्न आलाच.
"फ्लाइट्स शोधल्यास?"
- "हो."
"बजेट वाढणार म्हणजे नॉर्वे?"
- "नाही. आइसलँड"

.

मी टिंबक्टू म्हणाले असते तरी त्याला एवढा धक्का बसला नसता. आइसलँडला जायचा विषय त्याने गेल्या काही वर्षांत अनेकदा काढला होता. पण तिथली महागाई, हवामान, जर्मनीहून अंतर, सार्वजनिक वाहतूकीची वानवा, रिंगरोडसाठी लागणारा वेळ अशी अनेक कारणं मी दिली होती. शिवाय गेल्या आठदहा वर्षांत वाढलेल्या पर्यटनामुळे आइसलँडला जायचं तर सातआठ महिने आधी ट्रिप प्लॅन करून हॉटेल्स वगैरे बुक करावी लागतील, हे मीच त्याला सांगत आले होते. आता तर चार महिनेही नव्हते.

सुरुवातीचा धक्का ओसरल्यावर प्रश्न सुरू झाले. बजेट तर डोलोमाइट्सचंही वाढणार होतं. तिथेही चारचाकी लागणार होती, लोकल बसने काम होणार नव्हतं. हवामान दोन्हीकडे बेभरवशी. राहता राहिला प्रश्न आधीपासून बुकिंग्स करण्याचा तर जुलैच्या सुरुवातीला शोल्डर सीझन असतो. युरोपातल्या बहुतेक देशांच्या उन्हाळी सुट्ट्या त्यानंतर सुरू होतात. त्यामुळे युरोपातले प्रवासी तसे कमी असणार. मुख्य म्हणजे गेल्या दोनतीन वर्षांत एकंदरच पर्यटकांची संख्या कमी होऊ लागली आहे. (म्हटलं ना, विदा शोधला होता ;)) आइसलँडची पहिलीच सहल आणि तिकडे बघण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळे पाचसहा दिवस राहायची सोय जिथे होईल त्या भागात फिरायचा पर्याय होता.

नवर्‍याच्या मनात तरीही शंका होत्याच. मग म्हटलं Machbarkeitsanalyse (जर्मनमध्ये व्यवहार्यता तपासणे) करू. पाचसहा दिवसांच्या सहलीसाठी कुठे जाता येईल याची मला थोडीफार कल्पना होती. मी दोन तासांत हॉटेल्स वगैरे उपलब्ध आहेत का हे शोधायचं. आणि नवर्‍याने त्याला कोणती ठिकाणे बघायची आहेत ते आणि चारचाकीचं भाडं वगैरे बघायचं. सहल प्लॅन करणं शक्य आहे असं वाटलं तर आणखी दोन तासांत सहलीचा कच्चा आराखडा बनवून निर्णय घ्यायचा. हे सगळं सव्यापसव्य होऊन आइसलॅंडचा दक्षिण आणि पश्चिम किनारा पाहायचं ठरलं. शनिवार, १३ जुलै २०१९ पासून सुट्टीवर जायचं ठरलं होतं. पण विमानाच्या वेळा पाहून ११ जुलैला संध्याकाळी निघून १८ जुलैला परत यायचं नक्की केलं. लगेच विमानाचं आरक्षण केलं आणि गाडीही बुक केली.

प्रवासाची रूपरेषा

आइसलँड हा उत्तर युरोपातील एक प्रचंड बेटावर वसलेला देश आहे. २०१० साली एका आइसलँडिक ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर युरोपातील विमानवाहतूक ठप्प झाली आणि हा देश प्रसिद्ध झाला. अवघ्या साडेतीन लाख लोकसंख्येतील बरेच लोक राजधानी रिक्याविकला (Reykjavík) राहतात. उर्वरित लोकसंख्या लहानसहान गावांमध्ये विखुरलेली आहे. त्यामुळे रिक्याविक सोडल्यास सार्वजनिक वाहतूक जवळजवळ नाहीच. राहण्याखाण्याच्या सोयीही मर्यादित आणि अर्थातच महाग आहेत. या वस्त्यांना जोडणारा Route 1 किंवा Ring Road हा बेटाला रिंगण घालणारा मुख्य रस्ता. कँपर व्हॅनने पूर्ण रिंग रोड फिरून त्याच्या जवळपासची आकर्षणे बघणं हे इथे येणार्‍या अनेक पर्यटकांचं स्वप्न असतं.

फिरण्यासाठी चारचाकी भाड्याने घेणे अथवा एखाद्या टूर कंपनीचा आधार घेणे भाग आहे. अनेक टूर कंपन्या स्वतंत्र किंवा मोठ्या ग्रुपबरोबर टूर आखून देतात. त्यांचा खर्च पाहता चारचाकी भाड्याने घेऊन स्वतः फिरणं उत्तम. बजेट आणि आवडीनुसार हॉटेल्स, होम स्टे किंवा कँपिंगसाठी जागा बुक करून प्लॅन आखण्यासाठी जालावर खूप माहिती उपलब्ध आहे. परंतु आइसलॅंडचं बर्फाळ हवामान, वादळी वारे लक्षात घेता हिवाळ्याचे साताठ महिने स्वतः गाडी न चालविणे श्रेयस्कर. प्रचंड वेगाने वाहणारे वारे, रस्त्यावर काळा बर्फ यांमुळे होणारे अपघात युट्युबवर पाहायला मिळतील. इतर देशांत बर्फात गाडी चालवायचा अनुभव आइसलँडमध्ये कुचकामी ठरू शकतो. उन्हाळ्यात त्यामानाने टूर्सवर अवलंबून न राहता स्वतंत्र फिरणे शक्य आहे. पण तेव्हाही (विशेषतः पूर्व आणि उत्तरेला) रोज हवामानाचा आढावा घेणे गरजेचे आहे.

एकूण ६ पूर्ण दिवस आमच्या हातात होते. ११ जुलैला केफ्लाविक (Keflavik) विमानतळावर मध्यरात्री उतरल्यावर तिथेच जवळपास एक रात्र राहून दुसर्‍या दिवशी सकाळी निघायचं ठरलं. शेवटचा दिवस रिक्याविकसाठी राखून ठेवला. म्हणजे परतीच्या विमानाआधी लांबचा प्रवास टळला असता. उरलेल्या पाच दिवसांत आइसलँडचा दक्षिण किनारा बघायचं ठरलं. रिक्याविकपासून जवळ असल्याने इथे सगळ्यांत जास्त पर्यटक येतात. त्यामुळे गर्दी होत असली तरी सोयीसुविधाही जास्त आहेत. बहुतेक टूर्स इथली मुख्य पर्यटनस्थळं दोन दिवसांत बघतात. त्याऐवजी शक्यतो गर्दी टाळून आडबाजूच्या इतरही जागा बघायच्या होत्या, एकदोन छोटे ट्रेक करायचे होते.

आपल्याला हवी ती जागा अचानक फुल झाली आहे किंवा इंटरनेटवर उपलब्ध असली तरी प्रत्यक्षात तसं नाही, बघण्यासारखं खूप काही आहे आणि वेळ कमी आहे मग पश्चिमेला फुल्ली मारू, एखादी ऑफरोड टूर करू अशी अनेक वळणं घेत एकदाचा फक्त दक्षिण किनार्‍याचा प्लॅन ठरला.

.

११ जुलै २०१९: दुपारी जर्मनीहून निघून आइसलँडिक वेळेनुसार मध्यरात्री केफ्लाविक विमानतळावर आगमन. भाड्याने ठरवलेली गाडी घेऊन विमानतळाजवळच्या गावात एक रात्र वास्तव्य.
१२ जुलै: सुमारे ३५० किमी (६ तास) प्रवास करून दक्षिण किनार्‍याच्या टोकाला असलेल्या एका राष्ट्रीय उद्यानाजवळ Svínafell ला दोन रात्री वास्तव्य. या प्रवासात अनेक प्रसिद्ध स्थळं लागणार होती. त्यातली एकदोन पाहायची आणि शक्यतो संध्याकाळी लवकर पोहोचून आराम करायचा.
१३ जुलै: Jökulsárlón ला बोट ट्रिप आणि डायमंड बीच बघणे. दुपारी परत येऊन Vatnajökull राष्ट्रीय उद्यानातील Svartifoss धबधबा पाहणे.
१४ जुलै: सुमारे २५० किमी उलट्या प्रवासात दक्षिण किनारा पाहत हेट्लाला (Hella) येणे. इथे दोन रात्री वास्तव्य.
१५ जुलै: एका टूर कंपनीबरोबर सुपर जीपने (ऑफ रोडिंगसाठी सुधारित गाडी) Landmannalaugar ची सहल.
१६ जुलै: हेट्लाहून निघून आइसलँडच्या प्रसिद्ध सुवर्ण वर्तुळावरील (Golden Circle) स्थळे पाहून रिक्याविकला आगमन.
१७ जुलै: रिक्याविक स्थलदर्शन आणि गाडी परत देऊन मध्यरात्रीच्या विमानाने आइसलँडचा निरोप घेणे.

.

इतर तयारी
सहल नक्की ठरल्यावर मुख्य प्रश्न आला तो कपड्यांचा. थंडी, पावसाची शक्यता (आणि धबधबे) लक्षात घेता जल-आणि वायुरोधक कपडे आणि ट्रेक शूज आवश्यक होते. ट्रेकिंगच्या जुन्या पँट तिथल्या थंडीत उपयोगी नव्हत्या. मग जाड अस्तर असलेल्या जलरोधक पॅंंट्सची खरेदी झाली. नवर्‍याकडे पावसासाठी आणि थंडीसाठी वेगवेगळी जॅकेट्स होती. ती एकावर एक घालून फिरण्यासारखे नसल्याने नवीन जॅकेट घेतलं. माझं एक जुनंपुराणं जॅकेट त्यावेळी (उन्हाळा असल्यामुळे) बाजारात उपलब्ध जॅकेट्सपेक्षा खूप चांगलं होतं. तसंही तिकडे बाहेर राख, माती, धबधबे यांतच फिरायचं होतं. माझे ट्रेक शूज, जॅकेट, पँट्स आणि पाठीवरची सॅक सगळंच राखाडी रंगाचं होतं. ते तिथल्या राख आणि ज्वालामुखींच्या पार्श्वभूमीवर फोटोंमधे camouflage वाटतं. त्यामुळे फोटो छान दिसायचं वगैरे असेल त्यांनी बाह्यावतार आणि रंगसंगतीकडे लक्ष द्यावं.

इतर सहलींना आम्ही फारसा खाऊ वगैरे नेत नाही. पण या सहलीत प्रवासात अधेमधे काही मिळणार नव्हतं. Svínafell ला जवळचं दुकान्/पेट्रोल पंप/खानावळ पाच किमीवर होती. सकाळची न्याहारीही दोनच ठिकाणी मिळणार होती. मग बिस्किटे, म्युसली बार, बनपाव असा कोरडा खाऊ आणि थोडी कॉफीपूड, साखर बरोबर घेतली.

विमान आइसलँडच्या दिशेने उडालं तेव्हा सूर्य अस्ताला जात होता. ज्वालामुखी आणि हिमनद्यांच्या देशात तो क्षितिजापाशी रेंगाळत आमच्यासोबत राहणार होता.

.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

MipaPremiYogesh's picture

1 Jan 2021 - 12:47 am | MipaPremiYogesh

वाह मस्त माहिती.. मला पण जायचंय बघू कधी जमतंय..ही।लेख मला उपयोगी पडेल

पुभाप्र

दुर्गविहारी's picture

1 Jan 2021 - 7:03 pm | दुर्गविहारी

नवीन मालिकेच्या लिखाणासाठी शुभेच्छा ! मि.पा.वरच बहुधा आईसलँडची मालिका झालेली आहे तरी पुन्हा एकदा वाचायला निश्चित आवडेल.

सौंदाळा's picture

1 Jan 2021 - 7:46 pm | सौंदाळा

झक्कास, नवीन प्रवासवर्णन
पुभाप्र
भरपूर डिटेलवारी भाग आणि फोटो टाका

प्रचेतस's picture

1 Jan 2021 - 7:49 pm | प्रचेतस

जबरदस्त सुरुवात.

एकदम तपशीलवार लेखनाने वाचायला मजा येते आहे. लवकर येउद्यात पुढचा भाग.

गोरगावलेकर's picture

2 Jan 2021 - 9:11 am | गोरगावलेकर

येऊ द्या पुढचे भाग लवकर लवकर

आंबट चिंच's picture

2 Jan 2021 - 9:25 am | आंबट चिंच

मस्त फोटो. फक्त तो धबधब्याचा अजुन जवळुन काढला असेल तर टाका पुढच्या भागात. म्हणजे पार त्यामध्ये भिजण्यासाठी किती जवळ जाता येते.

टर्मीनेटर's picture

2 Jan 2021 - 10:05 am | टर्मीनेटर

वाह!
हटके ठिकाणाची सविस्तर ओळख वाचण्याची उत्सुकता वाढली आहे.
भरपूर फोटोंसाहित पुढचे भाग लवकर येउद्यात.

निशाचर's picture

2 Jan 2021 - 4:23 pm | निशाचर

@MipaPremiYogesh, दुर्गविहारी, सौदाळा, प्रचेतस, गोरगावलेकर, आंबट चिंच, टर्मीनेटर,
प्रतिसादासाठी आभार!

@MipaPremiYogesh, शक्य झाल्यास अवश्य जा. लिखाणाचा उपयोग झाला तर आनंदच वाटेल.

@दुर्गविहारी, त्या मालिकेचे एकदोन भाग वाचल्याचं आठवतंय. पण बहुतेक फोटो नव्हते त्यामुळे पुढे वाचली नसावी.

@आंबट चिंच, धबधब्यात भिजायला परवानगी आहे की नाही ते आठवत नाही. पण पाण्यात न जाताही तुषारांनी भिजायला होतं. तसंही हिम वितळून वाहणारं पाणी खूप थंड असतं.

@सौंदाळा, तुमचं नाव लिहिताना मासे आठवल्याने मी अनुस्वार खाल्ला बहुतेक :)

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2021 - 7:06 pm | टवाळ कार्टा

भारी...

निशाचर's picture

5 Jan 2021 - 4:14 am | निशाचर

धन्यवाद!

पुढचा भाग एकदोन दिवसांत टाकेन.

निशाचर's picture

15 Jan 2021 - 4:29 am | निशाचर

पुढील भाग काही कारणामुळे दोनतीन आठवड्यांनंतर टाकू शकेन. त्याबद्दल क्षमस्व!
सर्व वाचकांचे आभार!

मुक्त विहारि's picture

15 Jan 2021 - 7:30 am | मुक्त विहारि

वाचत आहे