कोरोनाचा नवा प्रकार

kool.amol's picture
kool.amol in काथ्याकूट
29 Dec 2020 - 11:00 am
गाभा: 

कोरोनाची लस इंग्लंडमध्ये उपलब्ध झाली आहे. गेले वर्षभर सुरू असलेले निर्बंध हळूहळू शिथिल होत असतानाच एक बातमी आली की इंग्लडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. सोबतच इतरही त्रोटक माहिती आली आणि स्वाभाविकच जगभरात परत एकदा भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक प्रश्न पुन्हा एकदा सगळ्या जगासमोर आ वासून उभे आहेत. हा नवा प्रकार किती भयानक आहे? कुठून आला? ह्याचा संसर्ग किती धोकादायक आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देखील सध्या त्रोटक स्वरूपातच मिळत आहेत. ही उत्तरं जाणून घेण्यासाठी काही संशोधन अहवाल उपलब्ध झाले आहेत. ह्या विषयातील तज्ञ देखील योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. ह्या नव्या प्रकारच्या विषाणूचा हा प्रवेश किती काळ चालेल हे येणारा काळच सांगेल. पण सध्या ह्या प्रकाराविषयी कुठलीही टोकाची प्रतिक्रिया देणं योग्य नाही. जाणून घेऊया हा नेमका प्रकार आहे तरी काय…

कोरोना विषाणू, त्याचा जगभर झालेला प्रादुर्भाव जगाने वर्षभर अनुभवला. अशा परिस्थितीला सामोरे जावं लागेल ह्याची कल्पना जगातल्या कुठल्याही देशाला नव्हती त्यामुळे सर्वात आधी परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं हाच सर्व देशांचा प्राधान्यक्रम होता. ह्याच्याच जोडीला परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून काही उपाय योजना देखील सर्वत्र झाल्या. इंग्लंडमध्ये देखील अशा काही उपाययोजना करण्यात आल्या. त्यापैकीच एक म्हणजे तिथल्या सरकारने एका संशोधन संस्थेची स्थापना केली. ही संस्था म्हणजे Covid19 Genomics UK(COG UK) consortium! ह्या संस्थेचा एकच उद्देश म्हणजे देशभरातून येणाऱ्या रुग्णांच्या कोविड विषाणूंच्या चाचण्या करणे आणि ह्या विषाणू मध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणे, त्यावर नजर ठेवणे, इत्यादी. ह्या संस्थेसोबत इतरही अनेक संस्था काम करतात. साधारणपणे 5-10% रुग्णांचे नमुने Random basis वर जनुकीय पृथकरण करण्यासाठी वापरले जातात. त्याचबरोबर रुग्णांची वाढणारी किंवा घटणारी संख्या हे देखील पाहिले जाते.

हे सगळे चालू असताना ह्या वर्षातल्या 50 व्या आठवड्यात( त्यांची सांख्यिकी पध्दत) दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये एकदमच 400 रुग्णांची नोंद झाली. कोरोना रुग्णांची वाढ एका विशिष्ट पातळीवर स्थिरावली असताना किंबहुना त्यात हलकीशी घट होत असताना ही वाढ नजरेत भरावी अशीच होती. 41 व्या आठवड्यात फक्त 100 रुग्णांची नोंद झाली होती. साहजिकच ह्याच कारण काय ह्याचा शोध सुरू झाला. COG ने केव्हाच काम सुरू केलं होतं. त्यांना आढळलं की ह्या 400 पैकी 50% पेक्षा जास्त रुग्णांमध्ये आढळणारा कोरोना हा नेहमीचा नाही हा थोडा वेगळा आहे. वेगळा म्हणजे नेमका कुठला? ह्या विषाणूमध्ये होणारे बदल हा काही नवा विषय नाही. ते होतच असतात, पण ते टिकत देखील नाहीत. पण हा प्रकार वेगळा होता. अशीच एक केस 20 सप्टेंबर 2020 रोजी आली होती आणि त्याच्याशी ह्या नव्या केसेस साधर्म्य दाखवत होत्या. नोव्हेंबर पासून ह्या प्रकारच्या कोरोनामुळे संसर्ग वाढला होता. पण डिसेंबरमध्ये ही वाढ धडकी भरवणारी होती. दुसरं महत्वाचं निरीक्षण म्हणजे आधी हा प्रकार एकाच जागी वाढत होता म्हणजे दक्षिण पूर्व इंग्लंड त्यातही kent ह्या भागात त्यांचं प्रमाण जास्त होतं पण आता इतर भागात देखील हे रुग्ण आढळून येत होते आणि ही बाब जास्त चिंतेची होती. सप्टेंबरमध्येच ह्या प्रकारावर संशोधन सुरू झालं होतं आणि त्याचं बारसं देखील नुकतंच झालं ते म्हणजे SARS-CoV-2 VUI 202012/01! आता ह्या लांबलचक नावाचा अर्थ काय? कोविड विषाणू हा सार्सच्या जातकुळीतला त्यामुळे त्यांच मूळ हे नावाच्या सुरुवातीला आहे. VUI चा अर्थ आहे Variant Under Investigation तर पुढील आकडे हे वर्ष आणि महिना दाखवतात तर 01 चा अर्थ होतो की ह्या प्रकारातला पहिला.

आजघडीला हा प्रकार डेन्मार्क, नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया इथे खात्रीशीर रित्या सापडला आहे. बेल्जियम आणि दक्षिण आफ्रिका इथे सापडल्याच्या बातम्या आहेत पण त्याची अधिकृत माहिती सध्या तरी मला उपलब्ध झालेली नाही. इतक्या निरीक्षणांवर इंग्लंडने तातडीने हालचाल सुरू केली आहे. निर्बंध कडक केले आहेत. इतर देश देखील परत एकदा सावध झाले आहेत. आता बघू की इतका काय बदल झाला आहे ह्या नव्या प्रकारामध्ये..

प्रत्येक विषाणूची संसर्ग करण्याची स्वतःची एक पद्धत असते. मुळात मानवी पेशी म्हणजे ” आठशे खिडक्या, नऊशे दारं” असा प्रकार असतो. ह्या पेशीत शिरण्याचे असंख्य मार्ग असतात. विविध औषधांचे रेणू, पाणी, मीठ जिवाणू आणि विषाणू हे सतत दार खिडक्यांमधून येत जात असतात. पण त्याचं दार किंवा खिडकी ही निश्चित असते. त्यातूनच हे ये जा करत असतात. कोरोनाची ही खिडकी म्हणजे ACE 2 हे प्रथिन आहे. कोरोनाच्या पेशीवर( विषाणूची पेशी नसते पण समजून घेण्यासाठी तात्पुरतं गृहीत धरू) किंवा रचनेवर बाहेरच्या बाजूला काही प्रथिनं असतात. ही प्रथिनं एखादं जहाज बंदरावर उभं करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या anchor किंवा आकड्यासारखी असतात. अगदी तशीच नाही पण काम मात्र तेच करतात. ह्यांना Receptor Binding Protein किंवा Spike Protein असं म्हणतात. ACE ह्या आपल्या पेशीवरील प्रथिनांशी त्या संधान बांधून त्यातून आपला जनुकीय घटक ( कोरोनाच्या बाबतीत RNA) आत सोडल्या जातो. होतं काय की कोरोनामध्ये किंवा कोणत्याही विषाणूंमध्ये ह्यापैकी कुठल्याही घटकात किंवा एकापेक्षा अनेक घटकात सतत बदल होत असतात. हे बदल कधी उपयोगाचे तर बरेचदा निरुपयोगी असतात. कधी कधी बदल तर होतात पण त्यांचे दृश्य परिणाम काहीही नसतात अशा बदलांना silent mutation म्हणलं जातं. वरीलपैकी सर्व बदल कोरोनामध्ये होत आहेत, पूर्वी देखील झाले आहेत. मग ह्याचाच का एवढा बागुलबुवा निर्माण झाला आहे?

ह्या प्रकारात आढळलेले बदल हे वर नमूद केलेल्या spike protein मध्ये आहेत. म्हणजे ह्या विषाणूच्या आपल्या पेशीवरील खिडकीला किंवा दाराला जाऊन धडक मारण्याच्या क्षमतेत बदल झाले आहेत. इतरही अनेक बदल आढळले आहेत पण ते फारसे महत्वाचे नाहीत ( सध्या तरी असंच वाटतंय). मूळ वूहान विषाणूच्या तुलनेत तब्बल 29 जनुकीय बदल ह्या नव्या प्रकारात सापडले आहेत. त्यामुळे झालंय काय की हा विषाणू आता जास्त क्षमतेने आपल्या पेशीत घुसखोरी करू शकतो आणि ह्या क्षमतेत तब्बल 70 % पर्यंत इतकी वाढ झाली आहे असा अभ्यास सांगतो. कमी वेळेत वाढलेल्या केसेस हेच दाखवतात असा एक कयास आहे. पण काही तज्ञ अशीही शंका व्यक्त करत आहेत की ही वाढ सध्या सुरू असणाऱ्या ख्रिसमस च्या सुट्ट्यांमध्ये होणाऱ्या प्रवासामुळे असू शकते का? ही शक्यता देखील पडताळून पाहिली जात आहे.

दुसरी महत्वाची भिती म्हणजे नवा विषाणू रोगाची तीव्र लक्षणे निर्माण करतो का? प्रश्न स्वाभाविक आहे. ह्यासाठी अभ्यास करण्यात आला. एकाच भागातल्या 2 रुग्णाचे नमुने ह्यासाठी तपासण्यात आले. एका रुग्णाला नव्या कोरोनाचा तर दुसऱ्याला पूर्वीच्या विषाणूचा संसर्ग झाला होता. दोघांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंच्या जनुकीय घटकांच्या किती प्रती निर्माण झाल्या आहेत हे त्यात पडताळण्यात आलं. पण अशा प्रयोगांना असंख्य मर्यादा असतात त्यामुळे ह्यातले निष्कर्ष किंवा निरीक्षणं फारसे ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे रोगांच्या लक्षणात असणारा फरक हीच एक महत्वाची बाजू गृहीत धरली जाते. सध्या तरी ह्यात विशेष फरक आढळलेला नाही. पण नव्या विषाणूचा संसर्ग झालेला वयोगट हा 60च्या आतला होता.

सध्या आलेली लस ही त्यावर परिणाम दाखवेल की नाही हे सध्या सांगणं कठीण आहे. कारण लशी देखील वेगवेगळ्या आहेत. त्यावर देखील संशोधन सुरू आहे.

थोडक्यात सांगायचं तर नवीन प्रकार असला तरी त्यातले बदल हे धोकादायक आहेत असं म्हणण्यासाठी आपल्याकडे सध्या काहीही ठोस पुरावे नाहीत. काही दिवसांपूर्वी सिंगापूर मध्ये असाच एक प्रकार आढळला होता पण नंतर त्याचा प्रादुर्भाव कमी झाला आणि आता तर तो नगण्य आहे. नवा प्रकार प्राण्यातून आलेला नाही इतकं मात्र नक्की सांगता येईल. ह्याचा उगम प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या शरीरात दीर्घकाळ राहिल्यामुळे झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत असे बदल ह्यापूर्वी देखील इतर विषाणूंमध्ये आढळले आहेत. ह्यापूर्वी सापडलेल्या कोरोनाच्या एका प्रकारात संसर्ग करण्याची क्षमता वाढली होती पण प्रत्यक्ष रुग्णांना लक्षणात वाढ झाली असं काही आढळलं नव्हतं. ह्या बदलांमुळे विषाणूच्या पेशीत शिरण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे इतकंच म्हणता येईल. हे बदल किती काळ टिकतील आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात ह्यावर येणाऱ्या काळातच प्रकाश पडेल. त्यामुळे गेल्या वर्षभरात आपण शिकलेल्या धड्याची ही परीक्षा आहे असं म्हणता येईल आणि त्यात आपण नक्कीच उत्तीर्ण होऊ ह्यात शंका घेण्याचं कारण नाही. काळजी मात्र नक्कीच घ्यावी लागणार आहे!

प्रतिक्रिया

१५५ वाचने झाल्यावर देखील एकही प्रतिसाद नाही याचा अर्थ एकच आता काय होईल ते जाईल आता या जैविक संकटामुळे आपले नेहमीचे जीवन बदलणे नाही असा सूर लोक काढू लागलेत ! ज्या अर्थी १९१८ साली काहीही वैद्यकीय प्रगती नसताना त्यातून तावून सुलाखून काही जगले म्हणून तर आजची ही लोकासंख्या जगापुढे आ वासून उभी आहे ना ? तार्किक अर्थ असा काढला जाऊ शकतो की जगातील ७० टकके लोक कोणत्याही प्रकारच्या विषाणूला पुरून उरण्याची क्षमता बाळगून असतातच ! ज्यांच्या नशिबी दुर्दैवाने गलथानपणा व अक्षम प्रतिकार यंत्रणा यांचा संकर वाट्याला येतो ते मृत्यू साठी " पात्र" होतात !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Dec 2020 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखातील माहिती चांगलीच आहे, पण लोकांना आता करोनाच्या माहितीपेक्षा उपायांंची माहिती हवी आहे असे वाटते. करोनाचे आता कोणतेही नवे व्हर्जन आले तरी सध्या उपलब्ध लशी त्याचा सामना करू शकतील का, इतकीच उत्सुकता उरली आहे. आता यापुढे आणखी कोणत्याही देशातून आणि ग्रहावरुन नवा करोना आला तरी आता लोक 'खिशातला' मास्क काढून नाकावर ओढून घेतील इतकी जागरूकता लोकांमधे आलेली आहे. आता, लोकांमधे कमालीची 'बेफिकिरी'वाढली आहे तरी रुग्ण संख्या तितक्या वेगात वाढलेली नाही. ब्रिटानियाचा करोना संसर्ग झपाट्याने होतो असे ऐकून असलो तरी तो 'झपाटा' अजून दिसलेला नाही. त्यामुळे विविध स्मुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे बहरलेली दिसत आहेत.

'माहितीपूर्ण' लेखन आहे, अजून लिहीते राहा. असे प्रोत्साहनपर दोन शब्द लिहीणारच होतो. :)

-दिलीप बिरुटे

विषाणू स्वतः मध्ये बदल करतो हे संशोधक लोकांना माहीतच आहे.
किती दिवसांनी असे बदल घडून येतात ह्याची पण माहिती असेलच.
मग जागतिक हवाई वाहतूक चालू करण्याची घाई करण्यात काही अर्थ नव्हता.
आणि चालू च करायची होती तर strict नियम बनवायला पाहिजे होते आणि त्याची तंतोतंत अमलबजानी करायला हवी होती.
एवढे सर्व रामायण घडून गेले तरी ब्रिटन वरून आलेल्या लोकांना बाकी लोकांपासून वेगळे ठेवले गेले नाही.
त्यांना घरी जावू दिले.
त्या मुळे भारतात पण नवीन corona चे रुग्ण सापडले आहेत.
निष्काळजी पना करायचा आणि आणि संकट ओढवून घ्यायचे असेच प्रकार चालू आहेत.
व्हायरस हळू हळू कमजोर होवून रोग निर्माण करण्याची ताकत गमावून बसतो असाच इतिहास आहे.
शरीर त्या व्हायरस बरोबर आणि व्हायरस मानवी शरीरावर जुळवून घेतो असेच जुन्या साथी दर्शवत आहेत.

आनन्दा's picture

30 Dec 2020 - 10:18 am | आनन्दा

मुळात हा सगळा बागुलबुवा लोकांनी नववर्षच्या वेळी बेताल वागू नये खणून उभा केलेला आहे असे माझे मत आहे.
नवीन वर्षात हे सगळे आपोआप शांत होईल.. असो.

Bhakti's picture

30 Dec 2020 - 1:34 pm | Bhakti

आणखिन किती mutation होणार?पण काही अती mutation नंतर infectivity कमी होऊ शकते
https://jvi.asm.org/content/80/1/20?fbclid=IwAR2JYO91S4EumYIfa1RG1IcelTC...

प्रसाद_१९८२'s picture

30 Dec 2020 - 8:38 pm | प्रसाद_१९८२