ज्ञात अज्ञात पंढरपूर ४
सरकार वाडा/ वासकर वाडा
अनादी काळापासून भक्तीची पेठ म्हणून सर्वप्रसिद्ध असणाऱ्या पंढरी नगरीत अनेक मान्यवर येवून गेले. काहीनी केवळ दर्शन पूजादी धर्मकृत्ये केली, काहिंनी काही काळ निवास केला काहींनीं कायमचे वास्तव्य केले. यात संत, महात्म्ये, विद्वत्जन , राजे महाराजे, रंक, राव, साधू, भक्त, अभक्त, हौशे, गवशे, नवशे सारेच होते. तसा स्थान महिमा असल्यामुळे पेशवाईमधे पंढरपूरामधे सर्वच सरदारांचा राबता असल्याने त्यांनी पंढरपूरात आपल्या निवासासाठी मोठ मोठे वाडे बांधलेले दिसून येतात. त्यात सर्वात प्रमुख म्हणजे स्वत: छत्रपती आणि पेशवे. त्यांनी पंढरीत चंद्रभागा तटावर इथे आल्यावर निवासासाठी अन् त्या काळातल्या कारभारासाठी म्हणून मोठा टोलेजंग वाडा बांधला तोच हा सरकार वाडा. आजचा वासकर वाडा.
खाशांच्या निवासासाठी आणि कारभारासाठी म्हणजे हत्ती, घोडे, बैल बारदाना, घोडागाडी, बैलगाडी, रथ, पालख्या, मेणा याचे साठी म्हणून हा औरस चौरस प्रशस्त भला मोठा असा सुमारे ४०० x ४०० फुटाचा दगड विटांचे बांधकामाचा वाडा बांधण्यात आला. तो गावाचे दक्षिण पूर्व बाजून. विचार करून एके अंगाला हा वाडा बांधल्याचे आपल्या लक्षात येते. कारण एवढ्या मोठ्या सरंजामाला मुबलक पाणी हवे शिवाय हत्ती, घोडे, उंट, बैल आणि खाश्यांच्या वास्तव्यामुळे गावाला त्रास नको ही विचारसरणी इथे दिसते. एके काळी इथे हत्ती होते, घोडे होते, बैल होते, गाई होत्या, उंटही असतील सांडणी पाठविण्यासाठीचे. त्यामुळे मुबलक जागा हवीच प्रत्येकाची व्यवस्थाही स्वतंत्र हवी. त्यामुळेच आजही श्रीविठोबाचे रथासाठी वाड्यात स्वतंत्र जागा आहे.
वाड्याचे पुर्वेला सरकाराला साजेसे सुमारे ३० फुट उंचीचे वीटकामाची सुबक नक्षीकाम केलेले मराठमोळे रांगडे प्रवेशद्वार. त्याच्या वर उजवे बाजूला मराठेशाहीचा दरारा सांगणारा परमपवित्र असा भल्या मोठ्या लाकडी सोटावर फडकणारा भगवा ध्वज. तो अडकविण्यासाठीची तगडी व्यवस्था आजही या वाड्यावर हा ध्वज फडकत आहे. एवढा मोठा धर्मध्वज म्हणजे वाड्याचे वैभवच आहे. केवळ वाड्याचे नाही तर पंडरीचे मराठेशाहीचे वैभव आहे समस्त वारकऱ्यांचे वैभव आहे. त्या भव्य दरवाजाचाच फोटो सोबत दिसतो आहे. याला मोठे म्हणजे सुमारे १० फूट लांबीचे आणि २० फूट उंचीचे भव्य लाकडी प्रवेशद्वार. द्वार बंद केल्यास जाणे येणेसाठी बारिक ४ फूटी खिंड. याला मोठाला अडसळ वा अडणा. या द्वाराचे चौकटीचे वरचे अंगाला लाकडी चौकटीवर कोेरीव गणेशपट्टी दिसतेय. त्यावरचे चौकटीत मध्यवर्ती स्थानी जुन्या मराठी शैलीत श्री विठोबाचे रेखिव चित्र आहे. त्याचे दोन्ही बाजुला बैठे स्वरूपात गरूड हनुमंत दिसतात. कालौघात त्याचे रंग उडून गेलेत. जे वै. दादा वासकरांना पुन्हा पहिल्या मराठी बाजातच चितारायची इच्छा होती पण त्यापूर्वीच त्यांचे देहावसान झाले नाहितर त्यांनी ते निश्चितपणे केले असते. कारण याच दाराची लाकडे उन्हापावसाने खराब झाल्याने त्यांनी भलामोठा खर्च करून दुरूस्ती केली होती. तसेच या दाराला लाकडाचे आयुष्य वाढावे म्हणून वेळोवेळी काव अन् तेल हि दिले गेलेय. या दाराला एका वेळी तेल द्यायला सुमारे २ डबे तेल लागते. पंढरीतील साऱ्या लोकांना या वाड्याचे पश्चिम बाजूचे दगडी कमानीचे दाराने जाणे येणे असल्याने हे दार तुरळकांनाच महितेय. हि पश्चिमेकडील कमानची चांगली झुलणारा हत्ती सहज आत प्रवेश करेल एवढी मोठी आहे. मात्र याला दरवाजा नाही. पण पुर्वी काही व्यवस्था असावी कारण कमानीचे अातील बाजूला तशा खूणा दिसतात.
या दोन्ही दारांच्या मधे मोकळे पटांगण ज्याला सर्व बाजूंनी दगडी भिंतीने बंदिस्त केले आहे. आत पुन्हा जोत्यावरची उभारणी असलेला आतला वाडा. त्यात जायलाही मोठे लाकडी प्रवेशद्वार ज्याला दोन्ही बाजूने प्रशस्त देवड्या. आतल्या वाड्यातही मोठे मोकळे अंगण, गाईचा गोठा. समोर दोन ओढीचे लाकडी कडीपाटाची सरकार कचेरी जिथे पूर्वी मुख्य कारभारी बसून कारभार करीत असत. त्याचे दोन्ही बाजूला काही खणांची बांधकामे असे हे वाड्याचे चौसोपी स्वरूप.
आजही वारकरी सांप्रदायीक वासकर फडाचा कारभार, मान्यवरांच्या भेटी गाटी याच ठिकाणी वासकरांचे गादीचे या कचेरीतून होतात. त्या भागाला आजही हि कचेरीच म्हणतात. पूर्वी तिथे फड चाले तो बोरू चालविणाऱ्या कारकूनांचा अन् आजही फड चालतो तो टाळ वाजविणाऱ्या वारकऱ्यांचा. त्यावेळी हिंदुस्थानेच राजकारण इथून चाले तर आज हिंदुस्थानचे अध्यात्मकारण इथून चालते. त्यावेळी मराठमोळ्या शाही सरदारांची वर्दळ इथे असे आज मराठमोळ्या वारकरी महाराजांची वर्दळ असते. त्यावेळी हिंदुस्थानावर आपला राजकीय अंमल ठेवणारे या वाड्यात वावरत होते आजही हिंदुस्थानावर आपला अध्यात्मिक ठसा ठेवणारे वावरताना दिसतात.
या वाड्याच्या इतिहासात सरदार दरकदारांबरोबरच बडवे कुळातील प्रल्हाद महाराज यांचे वंशातील रामचंद्र प्रल्हाद, अनंत रामाजी या संत कवींचा सहवास लाभलाय कारण पूज्य मल्लाप्पा महाराज अन् प्रल्हाद महाराज बडवे यांचा स्नेह जिव्हाळा होता तो त्यांचे दोन्ही वंशात आजही चालतोय. तसेच आळंदिचे आरफळकर हैबतबाबांपासून शिरडीचे साईबाबा पर्यंतचे संत साधुंचा स्पर्श झालाय तसा केंद्रीय मंत्री अन् महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदराव पवारांपासून आर आर पाटीलांपर्यंत अनेक मंत्री येथे येवून गेलेत. तसेच रा स्व संघाचे सर्वेसर्वा सरसंघचालक मोहनजी भागवत इथे काही काळ वास्तव्यही करून गेलेत.
पेशवाईत वैभवात असणारा हा वाडा १८१८ ला आष्टीच्या लढाईत मराठी सत्तेच्या पाडावानंतर मात्र केवळ सरकारी वास्तू बनला. मराठा सत्तेच्या पाडावानंतर इंग्रजी सत्ता आली त्यांनी येथे पंडरपूरची मामलेदार कचेरी चालविली. किती तरी वर्षे तालुक्याचा कारभार इथुन चालला. ब्रिटिशाविरूद्धचे १८५७ चे समरात पंढरी नगरीतल्या अन् जवळपासच्या राष्ट्रभक्तांनी जोर केला अन् इथल्या मामलेदाराचाच मागच्या बोळात खून पडला. इंग्रजांनी त्याचे हल्लेखोर धरून काही साताऱ्याला पाठविले तर काहिंना या वाड्याचे लिंबाला फाशी दिल्याचे सांगितले जाते. तो लिंब १० - १२ वर्षापूर्वीपर्यंत अस्तित्वात होता.
खून झाल्यामुळे लोकात या वाड्याविषयी भुतसंचाराच्या गप्पांना उत आला. परिणामत: असेल किंवा कार्यविस्तारासाठी असेल पण सरकारकडून नवीन कचेरीची उभारणी करण्यात आली आणि सगळा शासकीय कारभार तिकडे हलला. आता या वाड्याचे काय करावे म्हणून तो हस्तांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या पण भुताच्या गोष्टीमुळे कोणीही खरेदीला धजेना.
त्या दरम्यान महान वारकरी प्रभुती वै. मल्लाप्पा वासकरांचे वंशांतील एकनाथ अप्पा वासकर महाराजांना पंढरपूरात प्रति महिना यावे लागत असल्याने राहणेसाठी तसेच मोठ्या संख्येने येणाऱ्या त्यांचे फडावरिल वारकरी शिष्यांचे परिवारासहचे भजन पूजनासाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. त्यांनी हि जागा सरकारकडून खरेदिली. लोकांनी भुताखेताबद्दल त्यांना सांगता ते म्हणाले आम्हाला भजन पूजन करणाऱ्याना कसले आलेय भुताचे भेव. या पंढरीच्या मोठ्या भुताने त्याआधीच आम्हाला झपाटलेय. त्यापायीच आम्ही वारंवार पंढरी वारी करतो. त्यापुढे हि बारिक सारिक भुते आम्हाला काय करतात. ती भुतेच आमच्या कीर्तन अन् हरिभजनाने पळून जातील. आणि ते खरेच घडले. त्यानंतर इथे कुणाला बाधा झाल्याचे वा भूत दर्शनाचे कथन कोणी केलेच नाही.
जुन्या काळी वाड्याचे प्रवेशद्वारावर मराठा सत्तेचे राजचिन्ह असणारा सोनकावेत बुडविलेला भला मोठा भगवा कायम फडकत असे जो विधिवत दसऱ्याला बदलला जाई. हि सांस्कृतिक परंपरा आजहि वासकर महारांजांकडून सांभाळली जातेय. सोबतच्या प्रकाशचित्रात डावे अंगाला भगवा दिसतोय तो तोच. पाहणाराला आणि वाचणाराला खोटे वाटेल, दिसताना तो लहान दिसतोय पण तो ७२ इंच पन्ह्याचे १५ मीटर कापडाचा आहे. त्याला पारंपारिक पद्धतीने रंगविणयासाठी कावही चांगली अर्धी ठिकं लागते.
या वाड्याचे पटांगणात पूज्य एकनाथ अप्पा वासकारांची समाधी बांधलेली असून एक छोटेखानी हनुमान मंदिर ही दादा महाराजांनी बांधलेले आहे. समोरच्या भव्य पटांगणात सूर पाट्या, कबड्डी, हुतूत, हॉकी फुटबॉल बरोबरच भाऊ वासकर बरोबर क्रिकेटचाही डाव अनेकवेळा रंगत असे जे खेळण्यात माझे अनेक वर्षे गेली आहेत. याशिवाय वासकरशिष्य असणाऱ्या हेरवाडच्या वै. वा रामभाऊ जोंधळेकडून पट्टा, विटा, भाला सारख्या मर्दानी खेळाचे पहिले हात अन् चौकही मी खेळलो आहे. सोबत
हा वाडा वासकरांकडे आल्यापासून इथल्या भजन पूजनात कधीही खंड पडलेला नाही. वासकरांच्या कित्तेक पिढ्या तिथे आनंदाने नांदताहेत. वाड्याचा मराठी पणा टिकवून त्याचे संरक्षण करताहेत एवढेच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकांना विठ्ठलभक्तीची ओढ निर्माण करण्याचे कार्य करताहेत. हे त्याचे कार्य अभिनंदनीय आणि आचरणीय आहे.
पंढरीत आलेल्या अनेक महापुरापैकी १९५६ चा महापूर मोठा होता त्यावेळीही या वाड्याचे जोत्याखालीच पाणी होते. त्यानंतरही अनेक महापूर आले मात्र या वाड्याला कोणताही धोका झालेला नाही.
एकूणच मराठा इतिहासातील महत्वाच्या घडामोडींचा साक्षी आणि वारकरी संस्कृतीचा संवर्धक असा हा वाडा यापुढेही भक्तीची पेठ फलविणारा म्हणून अध्यात्मकार्यी तत्पर राहो.
© आशुतोष अनिलराव बडवे पाटील पंढरपूर.
प्रतिक्रिया
26 Dec 2020 - 5:50 pm | दुर्गविहारी
खुप छान माहिती ! मात्र फोटो टाकायचे विसरलात वाटते.
29 Dec 2020 - 10:32 am | जगप्रवासी
छान चालली आहे लेखमालिका. तुमच्या लेखनाने फोटोंची उत्सुकता वाढली आहे, लवकर टाका
29 Dec 2020 - 11:27 am | रंगीला रतन
छान वर्णनाने वाडा डोळ्यांपुढे उभा केलात.
29 Dec 2020 - 11:44 am | सिरुसेरि
+१. छान लेखन आणी ऐतिहासिक माहिती .
29 Dec 2020 - 5:14 pm | चौथा कोनाडा
सुंदर आहे लेखमालिका.
नवनविन ऐतिहासिक माहिती समजली
नुसत्या वर्णनाने वाडा डोळ्यांपुढे उभा राहिला.
( फोटो असतेतर दुधातसाखर योग आला असता )
पुलेशु !
3 Jan 2021 - 11:32 am | Ashutosh badave