ज्ञात अज्ञात पंढरपूर, चंद्रभागा मंदिर. (भाग १.)
ज्ञात अज्ञात पंढरपूर, समस्त कलगीवाले थोरली तालिम (भाग २.)
ज्ञात अज्ञात पंढरपूर, रोकडोबा वेस/ हरिदास वेस. (भाग ३)
ज्ञात अज्ञात पंढरपूर, सरकार वाडा/ वासकर वाडा. (भाग ४)
ज्ञात अज्ञात पंढरपूर ५ श्री विष्णुपद मंदिर
आजपासुन मार्गशीर्ष मास सुरु होतो.
पंढरपूरचे भाषेत हा विष्णुपदाचा महिना. त्या निमित्त मी यापूर्वी लिहिलेला विष्णुपद माहात्म्य हा लेख पुन्हा पोस्ट करीत आहे.
चराचरनिर्मितीच्या आधी निर्माण केलेल्या अन् भगवंताच्या सुदर्शनावरी वसविलेल्या भुवैकुंठ पंढरपूर नगरीच्या अग्नेयेला साधारण १.५ किमी अंतरावर असणाऱ्या गोपाळपूर जवळ नदिपात्रात पुष्पावती आणि चंद्रभागा नदिच्या संगमस्थानी हे पुरातन मंदिर आहे.
७ फूट उंचीचे जोत्यावर १२ फूट उंचीचे ३१ x ३१ फूट आकारमानाचे, तसेच १६ दगडी खांबांवरचे २४ कमानी वर हे दगडी मंदिर उभारले आहे. पैकी दोन खांबावर उठावाचे विष्णु अन श्रीकृष्ण प्रतिमाही कोरल्या आहेत. जवळच एक लहानश्या देवळीवजा भिंतीत संगमरवरी विष्णुविग्रहही उभा आहे. किंबहुना हा नव्याने केलेला असावा
त्याचे एके बाजूला मोठा दगडी सप असून त्याचे बाजूस पुरातन मारूतीही अुभा आहे. याच सपावर पंढरपूरातील जुने नेते वै. वा बबनराव बडवे यांचे समाधीस्थळ आहे. येथे आलेले भक्तगण या सपाचा वापर भोजनासाठी वा विसाव्यासाठीही करतात. जवळच नदिपात्रात कळ लावण्याच्या स्वभावामुळे क्वचितच ज्यांची पूजा केली जाते त्या नारदमुनींचे मंदिरही आहे. कारण त्यांचे मुखी पुंडलिककिर्ती ऐकून त्याचे भेटीसाठी गोपांसह येणाऱ्या देवाला पुढे राहून तेच मार्ग दाखवित होते.
मग सकळ गोप गोपी गोधनें |
संगे घेऊनी गोवर्धनें |
नाना देश दुर्गमस्थाने |
वने उपवने लंघिती ||
मार्गी गीत हास्य विनोद |
गोवळ करिती नाना छंद |
श्रीकृष्णगुणानुवाद |
गात नारद पुढे चालें ||
पंढरीत आल्यावर ते या स्थानी क्षेत्रमुनी पुंडलिकरायाचे संमतीने निवासाला राहिले. त्यामुळे त्यांचे ही इथे मंदिर आहे.
इथे असणाऱ्या नदी संगमास्थळी असणारा संगम दैत्य ओळखून त्या भगवंताने पुढीलप्रमाणे नाश केला.
संगम दैत्य शिलातली |
गुप्त जाणोनि वनमाळी |
वरि उभा राहोनी ते वेळी |
केला तली शतचूर्ण ||
तै श्रीकृष्णाची समपदे |
तैसीच गोपाळाची पदे |
अद्यापी दिसती विसींदे |
मोक्षपदे देकिल्या||
याप्रमाणे कृष्णाची पदे असणाऱ्या या मध्यवर्ती स्थानी सर्वत्र असणाऱ्या मुर्तीप्रमाणे इथे मात्र मुर्ती नसून भगवंताच्या पायाच्या चिखलात रूतलेल्या पदचिन्हांची पुजा करण्यात येते. भगवान कृष्णाची या ठिकाणी समचरण आणि देहुडा चरण दोन्हि पदचिन्हे असून तेथेच लोण्याची वाटी, मुरली ठेवल्याच्या खुणा तसेच गाईंच्या खुराच्याही खुणा या पदचिन्हांशेजारी पुजेत आहेत. त्याचे ८ कोनी दगडी कठडा केलेला असून पाणी वाहून जाणेसाठी मोरीही आहे.
एवढेच नाही तर सोबतच्या गोपालांची ही पदे इथे उमटलेली आहेत.
पुराणकथे नुसार पवित्र शरिर प्राप्त केलेल्या गयासुराने देवेच्छेप्रमाणे आपले शरिरावर यज्ञ करणेसाठी जागा करून दिली. त्यासाठी दिव्य शरिर भूमीवर पाडले त्यावर ब्रह्म्याने यज्ञ केला पण वारंवार हलणाऱ्या गयासूराला स्थिर करताना विष्णुभगवंताने अनेक यत्न केले तरी तो हले अन् भूमंडळ गदगदे. शेवटी भगवंताने आपले उजवे पाऊल त्याचे मस्तकावर ठेवले. ती झाली गया. तरी हा असूर हलला अन् महाविष्णूने त्याचे कमरेवर शिला रोवून त्यावर आपली दोन्ही पाऊली ठेवल्याने गयासूर स्थिर झाला ती दोन्ही पाऊले म्हणजे पंढरीतील विष्णूपद स्थान होय. मात्र पिडेने त्रस्त असूनही देवसेवा केल्याने गयासूराच्या विनंतीप्रमाणे सकल देवांना अन् सरितांना या ठिकाणी येवून त्याचे शरिरी रहिवास करावा लागला ज्यामुले हे स्थान हिंदुस्थानात सर्व तीर्थे क्षेत्रे देवस्थळांहून परमपवित्र आहे. ज्याप्रमाणे विष्णुपद आहे तत्दवत देवांची ब्रह्मपद, रूद्रपद, इंद्रपद, कार्तिकपद, चंद्रपद, सुर्यपद, आहवनीयपद, गार्हपत्यपद, दक्षिणाग्निपद, सभ्यपद, अवसथ्यपद, गणेशपद, क्रौंचपद, अगस्तिपद, कश्यपपद, कण्वपद, दधिचीपद अन् मनंगजपद ही १८ पदे आहेत. भगवंतानी कृष्णरूपातील केलेल्या काल्याचे वेळीच्या खुणा म्हणून वेणू अन् लोन्याची काल्याची वाटी तसेच गोपदचिन्हे इथे आहेत. तर गोपाळरूपाने आलेल्या इतर देवांची पदचिन्हेही इथे आहेत. तीच मुख्य पदचिन्हा भोवती बांधकाम करतेवेळी मालारूपात गोवण्यात आली आहेत.
हिंदु संस्कृतीत जेवढे महत्व गयेला तेवढेच किंबहुना त्याहुन थोडे जास्त या स्थानाला आहे. कारण गयेला भगवंताचे एकाच पायाची खुण आहे. कारण तिथे एकच पाय देवाने टेकविला आहे. इथे मात्र देहुडा चरण आणि दोन्ही पायाच्या समभुज अशा खुणा आहेत. तसेच अन्य १८ देवपदे ही यास्थळी आहेत. त्यामुळे इथे पूर्वजांचे मोक्षप्राप्तीसाठी अस्थिविसर्जन, पिंडप्रदान अन् श्राद्धादि कर्मेहि केली जातात. तसेच संगमस्थान असल्याने नारायण नागबळी सारखी धर्मकृत्येही करण्यात येतात. इथे पिंडदान केले असता सप्तगोत्राचा अन् त्यातील १०१ कुलांचा उद्धार होतो.
कृष्णावतारात भगवंताने आपल्या गोप गोपिका सवंगड्यांसह रम्य क्रिडा करून
तव धावोनी आले गोवळ |
म्हणती खवळला जठरानल |
कृष्णा भूक लागली प्रबल |
भुकेचि वेळ न सोसवे ||
एक विस्तिर्ण पाहोनी शिळा |
सभोवतां गोपपाळां |
मध्यें शोभे घनसावळां |
गोपाळकाला मांडला ||
शिदोऱ्या सोडोनी खडकांवरी |
एकीकडे गोपहरि |
एकिकडे बैसल्या व्रजनारी |
परि सन्मुख हरि सकलाही ||
गडी म्हणती यदुपती |
तुम्ही आम्ही करूं अंथी पांथी |
जें जें ज्या रूचती |
तें तें अर्पिती कृष्णमुखी ||
याप्रमाणे जिथे काला केला ते हे स्थान. या काल्याची महती मोठी कारण
गगनभरे सुरश्रेणी |
बैसोनिया विमानी |
काला पाहती नयनी |
दिव्य सुमनी वर्षती ||
म्हणती धन्य धन्य गोवळजन |
धन्य धन्य वृक्ष पाषाण |
धन्य धन्य ते स्थान |
जग्जीवन जेथ क्रिडे||
असा येथला महिमा अनेक संतांबरोबरच संत प्रल्हाद महाराज बडवे यांनीहि वर्णिला आहे.
तसेच भगवंताने येथे वेणु नाद केल्याने याला वेणुक्षेत्र असेहि म्हणतात.
पुरातन काली असलेल्या पदचिन्हांसाठी संत धामणगांवकर ( म्हणजे बहुधा बोधले महाराज असावेत) यांनी सन १६४० मधे येथे पार बांधला. त्यानंतर सन १७८५ मधे चिंतो नागेश बडवे यांनी सांप्रत असणारे सुंदर दगडी मंदिर बांधले आहे. प्रतिवर्षी नदिला येणाऱ्या पूराचा महापूराचा विचार करून मंदिराचे बांधकाम अति दणकट असे करण्यात आले आहे.
श्रीपूरचे आगाशे हे प्रतिमास अमावस्येला पंढरपूरला दर्शनाला येत असत. एका मार्गशीर्ष अमावस्येला देवाचा रथ मंदिराकडे वाजत आलेला पाहिल्यावर त्यांनी याबाबत चौकशी करून विष्णुपद दर्शन केले. आणि त्यांनी नदिपात्रात जाण्यासाठी चा बळकट असा दगडीपूल आणि फरसबंदी रस्ता, घाट यांची बांधणी केली. त्यामुळे भक्तांची नदिपात्रात चालणेची वणवण संपली.
आळंदीला माऊलींनी समाधी घेतली त्याला भगवंत उपस्थित होते. आपल्याला आता भक्तभेटी नाही या विचाराने भगवान उदास झाले त्यामुळे आळंदिहून आल्यावर त्यांनी पंढरी एेवजी इथेच कित्येक दिवस वास्तव्य केले. म्हणून समस्त गावकरी मार्गशीर्ष महिन्यात नित्य तर सकल वारकरी त्यांचे सवडीने इथे देवदर्शनार्थ येतात.
साक्षात भगवंताने इथे गोपी अन् गोप जनांसह काला केला जो देवांनाही दुर्लभ होतो प्रसाद भक्षणार्थ त्यांनी मत्स्यरूपे धारण करूनही कृष्णाने त्यांचे वर कृपा केवी नाही अन् त्यांना प्रसाद प्राप्त होवू दिला नाही. भक्तांना मात्र प्रसाद दिला नित्य मिळण्याचा भरवसाही दिला त्याचे स्मरण म्हणून प्रासादिक सहभोजनही होते. येथे भोजन केले असता अनेक संवत्सरे दुष्टान्न भक्षण केले तरी त्याचा दोष नष्ट होतो. अन्न दान करून भोजन केल्यास भगवान विष्णु संतोषतात. इथे विष्णुपदवर देवाला दुग्धाभिषेकाने पुजनाचे महत्व अदिक आहे. शिवाय प्रसाद भोजनात दही पोहे खाण्याला विशेष प्राधान्य आहे. या देवस्थानाचे सणसोहोळे अति उत्साहात अन् मोठ्या वैभवात बडवे मंडळींनी कित्येक शतके सेवाभावी वृत्तीने संपन्न केले आहेत.
मार्गशीर्ष मास समाप्तीला देवाला पुन्हा वाजत गाजत मोठ्या थाटात रथातून मिरवत मंदिरात आणले जाते.
©आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर
प्रतिक्रिया
15 Dec 2020 - 3:56 pm | Ashutosh badave
आता फोटो टाकायला जमले
16 Dec 2020 - 12:12 pm | चौथा कोनाडा
+१
17 Dec 2020 - 2:07 pm | Ashutosh badave
धन्यवाद
15 Dec 2020 - 8:11 pm | कंजूस
पंढरपुरविषयी आणखी माहितीही लिहा. जुन्या पंढरपुरातले रुक्मिणी मंदिर, पूर्वी भाविक नावेतून येत त्याविषयी.
17 Dec 2020 - 2:08 pm | Ashutosh badave
धन्यवाद
माझे फेसबुकवर ज्ञात अज्ञात पंढरपूर वर ३० लेख आहेत
21 Dec 2020 - 5:14 am | परिंदा
आपण फेसबुकवर लिहिलेल्या "ज्ञात अज्ञात पंढरपूर" लेखांना हॅशटॅग दिल्यास ते लेख सहज शोधता येतील.
16 Dec 2020 - 12:16 am | दुर्गविहारी
वा ! सुंदर !! स्थानिक व्यक्ती जितकी बारकाईने माहिती देते ती इतरांना असणे शक्य नाही.
आणखी अशीच माहिती येऊ देत.
17 Dec 2020 - 2:08 pm | Ashutosh badave
धन्यवाद
16 Dec 2020 - 11:06 am | चौथा कोनाडा
वाह, क्या बात हैं !
सर्वांग सुंदर लेख !
विष्णुपद मंदिराला भेट देण्याची अनुभुती आली !
17 Dec 2020 - 2:06 pm | Ashutosh badave
धन्यवाद
17 Dec 2020 - 2:08 pm | Ashutosh badave
धन्यवाद
16 Dec 2020 - 4:03 pm | सिरुसेरि
माहितीपुर्ण लेखन . गोपाळपुर , वेळापुर या पंढरपुरच्या अलीकडे , पलीकडे असलेल्या ठिकाणांबद्दल नेहमीच ऐकले आहे .
17 Dec 2020 - 2:06 pm | Ashutosh badave
धन्यवाद