सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्या खोर्यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दर्यांनी नटलेला आहे.
सावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत असे. महाडात उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांत जात असे. ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवर व घाटमाथ्यावर अनेक किल्ले बांधण्यात आले. कांगोरी उर्फ मंगळगड हा किल्ला जावळीच्या खोर्यातील भोप घाट, वरंध घाट व अस्वल खिंड यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला. कोकणात उतरणाऱ्या वाटेवरील रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला टेहळणीसाठी एक महत्वाचा किल्ला होता.
खालील फोटोमध्ये रायगडाच्या प्रभावळीमधील किल्ल्यांचे स्थान दाखवले आहे. मंगळगड आणि कावळा थोडे दूर असल्याने त्यांच्या दिशा दाखवल्या आहेत.
रायगडाच्या घेर्यातील गड
कांगोरीगड चंद्रराव मोर्यांनी जावळीच्या खोर्यात बांधला. त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहाळणीसाठी केला गेला. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर ८ जानेवारी १६५८ रोजी कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजीसारखा कसलेला योध्दा मिळाला. कांगोरीगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘मंगळगड’’ ठेवले. स्वराज्यांची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतिकदखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले.रायगडाच्या वेढ्यातून राजाराम महाराज निसटून वासोट्यामार्गे पन्हाळगडावर गेले. त्यांचा एकनिष्ठ सेवक गिरजोजी यादव रायगडाहून सोने व मौल्यवान वस्तु वेढ्यातून सहीसलामत बाहेर काढून मंगळगडाच्या आश्रयाला आले व तेथून चीजवस्तु काढून पन्हाळ्याला नेल्या. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला.त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी ‘मंगळगड’ जिंकून घेतला. इ.स. १७७४ च्या एप्रिलमध्ये रायगडाच्या शिंबदीने कांगोरीवर स्वारी केली, याचे कारण बिरवाडी येथील निम्मा अंमल 'रायगडचा' व निम्मा कांगोरीचा असा होता.तर्फ बिरवाडीचा अंमल पेशव्यांनी जप्त केल्याने कांगोरकर रागावले आणि त्यांनी दंगे करुन रायगड परिसरात उपद्रव देण्यास सुरवात केली. कांगोरीकरांशी दोन तीन चकमकी झाल्यानंतर हा दंगा मिटला.
इ.स. १७७५ -७६ मध्ये येथे चोरट्यांचा उपद्रव झाल्यानंतर त्याचा बंदोबस्त रायगडाच्या शिंबदीने केला. इ.स. १७७९ मध्ये श्यामलने म्हणजे जंजिर्याच्या सिद्दीने रायगड परिसरात दंगे आरंभले तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्याचे काम रघुनाथ सदाशिव याने केले.त्यावेळी मंग़ळगड उर्फ कांगोरी गडावरील शिंबदी मदतीला आली.
इ.स. १७७८-७९ मध्ये रायगड सुभ्यातील २४४ गावे होती. ती पेशव्यांनी जप्त करुन तात्पुरते परत घेतले.त्यापैकी तर्फ बिरवाडीची ६ गावे पंतप्रतिनिधींच्या ताब्यात असून ती कांगोरी संरजामास लावून दिली.
इ.स. १७८१-८२ मध्ये मंगळगडकर यांच्याशी बिरवाडीकडील वसुलीवरुन पुन्हा वाद आणि चकमक झाली.
इ.स. १० फेब्रुवारी १८११ मध्ये सातारा छत्रपती प्रतापसिंह यांचा भाउ चतुरसिंह यांनी पेशव्यांविरुध्द उठाव केल्याने पेशव्यांचा ( दुसर्या बाजीराव ) सेनापती त्रंबक डेंगळे यांनी त्याला मालेगाव येथे अटक केली.चतुरसिंह १८१२ मध्ये कांगोरी किल्ल्यावर कैद होता.कैदेत असताना १५ एप्रिल १८१८ रोजी त्याचा मृत्यु झाला.
इ.स.१८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन हे इंग्रज अधिकारी हैदराबादहून पुण्यास येत असताना वाटेत उरूळी येथे अटक करुन मंगळगडावर कैदेत ठेवले होते. पुढे बापु गोखले यांच्या हुकुमावरुन त्यांना वासोटा किल्ल्यावर नेउन ठेवण्यात आले.पुढे वासोटा ईंग्रजांनी घेतला तेव्हा त्यांची सुटका झाली.
मे १८१८ मध्ये इंग्रजांनी रायगडला वेढा दिला असता मंगळगडावरून एक तुकडी रायगडाच्या संरक्षणासाठी आली असता बिरवाडीजवळ तिची इंग्रज सैन्याबरोबर लढाई झाल्याचा उल्लेख आढळतो. इ.स. १८१८ मध्ये रायगडच्या पराभवानंतर कर्नल प्रोर्थर या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला ताब्यात घेतला.
मंगळगडावर येण्यासाठी निरनिराळे मार्ग
या गडावर जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. चंद्रगड पाहून तेथून महादेव मुर्ह्यामार्गे अंदाजे सहातासांच्या पाय प्रवासानंतर मंगळगडाला पोहोचता येते. या पायी मार्गावर दोनदा डोंगर चढून उतरावा लागतो.
पिंपळवाडीच्या वाटेवरुन दिसणारा मंगळगड
१) मुंबईवरुन जायचे असेल तर ठाण्याहून रात्री सुटणार्या पिंपळवाडी बसने दुधाणेवाडी/कांगोरीगड या बस थांब्यावर उतरावे. बस थांब्यावरच कांगोरी सिध्देश्वराचे मंदिर आहे. मंदिराला लागूनच टेकडी आहे. मंदिरामागून शेताच्या बांधावरुन जाणारी वाट आपल्याला टेकडीच्या माथ्यावर अर्धा/पाऊण तासात घेऊन जाते. (टेकडीवर जाताना जेथे वाटेला २ फाटे फुटतात तेथे उजव्याबाजूची वाट पकडून टेकडीच्या माथ्यावर जावे. (डाव्या बाजूला जाणारी वाट मोठी (ठळक) आहे. परंतू ती डाव्या हाताला दूर दिसणार्या घराकडे जाते.) टेकडीच्या माथ्यावर विस्तिर्ण पठार आहे. हा झाला पहिला टप्पा. इथून डाव्या हाताला गडावर कांगोरी देवीचे मंदीर व समोर पश्चिम टोकावरील बुरुज दिसतो. त्या बुरुजाकडे तोंड करुन सरळ चढत जाणार्या वाटेने चालत गेल्यावर मध्ये छोटासा दगडांचा टप्पा(रॉक पॅच) पार करावा लागतो. तो चढून गेल्यावर आपण दुसर्या टप्प्यावर येतो. इथून डावीकडे जाणारी वाट आपल्याला गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाते. या टप्प्यावर उभा चढ चढावा लागतो.
२) दुधाणेवाडीतील कांगोरीसिध्देश्वराच्या मंदिरा समोरुन एक वाट पायर्या पायर्यांनी बनवलेल्या शेतातून टेकडीवर जाते. टेकडीच्या माथ्यावर कमी वेळात या वाटेने जाता येते. परंतु या या वाटेने टेकडीवर जाताना उभा चढ चढावा लागतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच खुप दमछाक होते या वाटेचा उपयोग टेकडी उतरताना करावा.
अर्थात या मार्गे जायचे असल्यास काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ठाणे सीबीसी ते गोठावली ही एसटी रात्री १२.३०ची आहे. ही एकच गाडी असल्याने बुकिंग करणं गरजेचं आहे. ही सकाळी ५.३०ला गोगावले वाडीत उतरवते जेथून ट्रेक चालू होतो. परतीच्या प्रवासासाठी १०.३० - महाड, १२.३० - बिरवाडी (शाळेची गाडी, रविवारी सुट्टी), २.३० - महाड, शेवटची. वाहने खूप कमी आहेत या गावात. रिक्षा वैगरे नाहीच.
वरंधा घाटातून दिसणारा कांगोरी
३) भोर-महाड मार्गावर वरंधा घाट आहे. वरंधा घाटाच्या कोकणातील पठारावर माझेरी गाव आहे. या माझेरीतूनही डोंगरदर्या, ओढे नाले ओलांडीत सहासात तासांच्या जंगलातील पायपिटी नंतर मंगळगड गाठता येतो.
वडघर गावातून होणारे मंगळगडाचे दर्शन
४ ) चौथा रस्ता हा पोलादपूर या तालुक्याच्या ठिकाणापासून अंदाजे २४ किलोमीटर अंतर असलेल्या सडे या गावातून आहे. सडे गावाच्या पुढे वडघर गावातूनसुद्धा मंगळगडावर जाण्यास दोन रस्ते आहेत. पोलादपुरातीलाच ढवळे या गावातून कांगोरीगडावर जाण्यासाठी ६ तास लागतात. गोठवली इथून येणारी वाट आणि सडे इथून येणारी वाट ह्या दोन्ही वाटा एका खिंडीत मिळतात.आणि दीड तासाने पिंपळवाडीतून येणारी वाटही तिला मिळते.
असे असले तरी, प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्यासाठी शेवटी एकच वाट आहे आणि ती ओळखणे सोपे आहे. मान उंच करून पहिले तर माणसाच्या आकाराचे नवरा-नवरीचे दोन सुळके दिसतात. गडावर जाण्याची एकमेव वाट ह्या सुळक्यांच्या खालूनच जाते. हे सुळके नजरेच्या टप्प्यात ठेवले तर साहसवीरांसाठी कुठूनही गडावर चढाई करता येईल. पिंपळवाडीतून जाणारी गडावर जाणारी वाट ही प्रसिद्ध मळवाट आहे आणि आता तिकडून गडावर जाण्यासाठी अर्धा रस्तासुद्धा बांधला आहे परंतु साहसाची आवड असणाऱ्या तरुणांनी सडे या गावातून चढण्यास हरकत नाही.सरासरी २ तासांत चढाई पूर्ण होते.
अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे किल्ला आडवाटेला असल्यामुळे, वेळेत पूर्ण करून परत येण्यासाठी स्वतःचे वाहन गरजेचे आहे.
पिंपळवाडी गावातील गोगावलेवाडी येथुन एक कच्चा रस्ता किल्ल्याखालील टेकडीवर असलेल्या विस्तीर्ण पठारावर जातो. या टेकडीमुळे गोगावले वाडीतुन किल्लादर्शन होत नाही.
पिंपळवाडीतून दिसणारी सह्याद्री रांग आणि त्यातील घाटवाटा
बिरवाडीच्या फाट्यावरून रुपावली १० किमी आहे. रुपावलीहुन पिंपळवाडी अथवा गोगावलेवाडीस जावे. हे अंतर साधारण ५ किमी आहे. पिंपळवाडीमध्ये डावीकडे कांगोरी सिद्धेश्वराचे मोठे मंदिर आहे मागे शाळेचे मोठे पटांगण आहे समोरच पत्र्याची शेड घातलेली आहे. या ठिकाणी राहण्याची सोय होऊ शकते.
पिंपळवाडीतील कांगोरीनाथाचे मंदिर मागे शाळा
पायथ्याच्या कांगोरीनाथ मंदिरातील देवता
गोगावलेवाडीत असलेल्या सिध्देश्वर मंदिराच्या मागील बाजूस विरगळ व प्राचीन मुर्ती पहायला मिळतात.
गोगावलेवाडीत गाडी लावून गडाकडे जायला दोन वाट आहेत. पहिली अगदी मंदिराच्या समोरून जाणारी पायवाट आणि दुसरी थोडे पुढे जाऊन उजवीकडे असणारी गाडीवाट.
पहिल्या वाटेने छातीवर येणार चढ असून हि वाट दमछाक करणारी आहे. दुसरी वाट गाडीवाट म्हणले असले तरी कच्ची सडक असून ठिकठिकाणी गाडी जाण्यास अवघड आहे. फक्त ह्या वाटेचा फायदा असा कि हि वाट मोठी असून, कमी चढणीची आहे.
जीपसारखे वाहन थोड्या प्रयत्नांनी ह्या रस्ताने जाऊ शकते. चालत साधारण ४०- ४५ मिनिटात आपण हा रस्ता पार करून आपण एका पठारापाशी येतो. येथे गाडीवाट संपते.
टेकडीवर जाताना जेथे वाटेला २ फाटे फुटतात तेथे उजव्याबाजूची वाट पकडून टेकडीच्या माथ्यावर जावे. (डाव्या बाजूला जाणारी वाट मोठी (ठळक) आहे. परंतू ती डाव्या हाताला दूर दिसणार्या घराकडे जाते.) ठळक खुण म्हणजे या वाटेवर हा लाकडी पुल दिसतो. या पुलावरुन पलीकडे जायचे आहे.
वाडीतून टेकडीच्या पठारावर जाण्यास अर्धा तास लागतो. हा रस्ता पठारावर जेथे संपतो त्या ठिकाणी किल्ला असलेल्या डोंगराची सोंड उतरली आहे. कच्चा रस्ता बांधताना हि सोंड काही प्रमाणात तोडली असल्याने सोंडेवर चढणारी वाट लगेच लक्षात येत नाही.
कांगोरी उर्फ मंगळगडाचा नकाशा
या सोंडेवरून चढायला सुरवात केल्यावर समोरील डोंगरावर डाव्या बाजुला कांगोरी देवीचे मंदीर व समोर टोकावरील बुरुज दिसतो. या बुरुजाच्या दिशेने चढत गेल्यावर वाटेत छोटासा दगडांचा टप्पा पार करत आपण बुरुजाखालील कातळ टप्प्यावर पोहोचतो.
प्रवेशद्वार अगदीच भग्नावस्थेत असल्याने ओळखू येत नाही परंतु शेजारील विटांचे गोलाकार बांधकाम बघून प्रवेशद्वाराची कल्पना आपण करू शकतो.
महाद्वार
या टप्प्यावर चढताना एका ठिकाणी कातळात कोरलेल्या चार-पाच पायऱ्या दिसुन येतात. हा चढ चढुन आपण बुरुजाखालील टप्प्यावर येतो. येथुन डावीकडे जाणारी वाट आपल्याला उभा चढ चढत गडाच्या दरवाजात घेऊन जाते. या वाटेवर मोठया प्रमाणात झाडे असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही. वाटेवर काही ठिकाणी तुटलेले लोखंडी कठडे दिसतात. बुरुजाखालुन अर्ध्या तासात उध्वस्त पुर्वाभिमुख दरवाजाच्या अवशेषातुन आपला गडात प्रवेश होतो. गड समुद्रसपाटीपासून २४६५ फुट उंचावर असुन गडाचा परीसर ९ एकरमध्ये पुर्व-पश्चिम पसरला आहे. दरवाजाच्या खालील बाजूस दहाबारा पायऱ्या बांधलेल्या असुन दरवाजा शेजारील बुरुज व तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहेत. गडाचा विस्तार बऱ्यापैकी असुन डावीकडे गडाची माची तर उजवीकडे बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर जाण्याआधी माचीचा भाग फिरून घ्यावा.मंगळगडाची पूर्वपश्चिम लांबी १४८५ फूट व दक्षिण-उत्तर रुंदी २६४ फूट आहे
माचीच्या उंच भागात कांगोरी देवीचे मंदीर असुन या मंदिराकडे जाताना वाटेच्या उजव्या बाजुला पायऱ्या असलेले खडकात खोदलेले टाके पहायला मिळते.
कांगोरी मंदिरासमोर असलेले टाके
या टाक्याच्या पुढे वाटेवरच दुसरे टाके असुन या टाक्याजवळ किल्ल्यावरील झीज झालेल्या अनेक मुर्त्या ठेवल्या आहेत. कांगोरी देवीचे मंदीर उंचवट्यावर असल्याने १२ पायऱ्या चढल्यावर गोलाकार कमानीतुन आपला मंदिरात प्रवेश होतो.
मंदिराची गर्भगृह व सभामंडप अशी रचना असुन सभामंडपावरील छत कोसळलेले आहे. गाभाऱ्यात काळभैरव व कांगोरीदेवीच्या मुर्तीबरोबर अजुन दोन दगडी मूर्त्या असुन गाभाऱ्याबाहेर काही भग्न दगडी मुर्ती ठेवल्या आहेत. कांगोरीनाथाचे मंदिर कधीकाळी चांगले प्रशस्त असावे, त्याच्या बाहेरील बांधकामावरून हे लगेच लक्षात येते. आत गाभाऱ्यात कांगोरीनाथाची शस्त्रधारी मूर्ती आणि शेजारी मातृदेवता आहे . कांगोरीनाथ हे येथील पंचक्रोशीचे दैवत, त्यामुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांचा राबता येथे असतो. मंदिराबाहेर शंकराचे स्थान म्हणून शिवपिंड आहे, शैवपंथाची खूण त्रिशूळ आणि डमरू आहे. तसेच जुन्या मूर्तीही आहेत.
.
डावीकडील वरच्या कोपऱ्यापासून clockwise
१. कांगोरीनाथाची मूर्ती
२. मातृदेवता
३. मंदिराबाहेरील आयुधधारी मूर्ती नि मातृदेवता
४. शिवपिंड
मंदीरासमोर लहानशी दीपमाळ आहे. मंदिरात दरवर्षी यात्रा भरत असल्याने गावकऱ्यानी मंदिरात स्वयंपाकाची भांडी ठेवली आहेत. गडावर रहायचे झाल्यास पावसाळा सोडुन येथे रहाता येईल.
मंदिरामागे असलेली छोटी माची तटबंदीने बांधुन काढली असुन या तटबंदीत मंदिराशेजारी दोन्ही बाजुला दोन बुरुज व टोकाला अर्धगोलाकार बुरुज पहायला मिळतो.
मंदिरामागुन खाली उतरणारी पायवाट थेट माचीच्या टोकाशी असलेल्या या बुरुजावरील ध्वजस्तंभापर्यंत जाते. माचीच्या या टोकावरुन जावळीच्या खोऱ्यातील दूरवरच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. या उंचीवर येवून कांगोरीदेवीचे दर्शन घेणे अतिशय कष्टप्रद असल्याने भक्तांनी खाली दुधाणेवाडीत या मुर्तीचे प्रतिरुप स्थापन करुन आपली सोय करुन घेतली आहे. गडावर वर्षातून एका देवीचा उत्सवही साजरा करतात.
माचीवरून कांगोरीनाथ नि मागे बालेकिल्ला
माचीचा हा भाग पाहुन झाल्यावर मुख्य दरवाजाकडे येऊन उजवीकडील वाटेने माचीपासून उंचावलेल्या बालेकिल्ल्याकडे निघावे.
बालेकिल्ल्याची सुरुवातीची वाट अत्यंत निमुळती असुन एकावेळी एकच माणूस जाऊ शकतो. दरवाजा जवळून उजवीकडे गडावर वाट कशी जाते ते पिवळ्या रेषेत दाखवलं आहे. सुरवातीनंतर वाट वर वळते आणि सरळ गडावर जाते. तर एकवाट उजवीकडे जाते आणि पुढे डावीकडे वळते तेथे पाण्याचा दोन टाक्या आहेत. त्यातील एक खांब टाकी आहे त्यातील पाणी आम्ही पिण्यास वापरले. टाक्या जेथे आहे तेथे २ बाणाचे चिन्ह जुळताना फोटोत दाखवले आहे.
या वाटेने पाच मिनिटात घसाऱ्याच्या वाटेने आपण बालेकिल्ल्याखाली असलेल्या सर्वात मोठया टाक्यापाशी येऊन पोहोचतो. येथुन वर जाणारी वाट बालेकिल्ल्याच्या टोकावर जाते तर उजवीकडील वाट बालेकिल्ल्याला वळसा मारत उत्तर दिशेला बालेकिल्ल्याच्या पोटात असलेल्या पाण्याच्या टाक्याकडे जाते.
येथे खडकात खोदलेली दोन खांबटाकी असुन यातील एका टाक्यांत वर्षभर पिण्यायोग्य पाणी असते. खांबटाकी पाहुन आल्या वाटेने पुन्हा आधीच्या टाक्याकडे यावे व तेथुन थोडासा चढ चढून बालेकिल्ल्याकडे जावे. बालेकिल्ल्यावर चढून गेल्यावर दोन वास्तुंचे अवशेष दिसतात. चौथऱ्याच्या अलीकडे एक उंचवटा असुन या उंचवट्यावर दोन घडीव शिवलिंग आहेत. शिवलिंगापासून काही अंतरावर भग्न झालेला नंदी पहायला मिळतो. या नंदीला लागुन एक मुर्ती ठेवलेली आहे.
यात एक वाड्याचा चौथरा असुन दुसऱ्या वास्तुच्या पडक्या भिंती शिल्लक आहेत.
वाड्याचा चौथरा
वाड्याच्या मागेच अर्धवट पडझड झालेले बांधकाम आढळते.काही लोकांच्या मते हे दारुकोठार असावे तर काहींना वाटते कि हा कैदखाना असावा. यापासून थोडे खालच्या बाजूस उतरून गेले कि आपण चढून येताना जो कडा दिसतो त्याच्या टोकाशी आपण जाऊन पोचतो.
या भिंती आठ ते दहा फुट असून त्यात एक खिडकी असलेली दिसते. येथुन थोडे खालच्या बाजूस उतरून गेल्यावर आपण चढून येताना दिसत असलेल्या बुरुजाच्या टोकाशी जाऊन पोहचतो. हा बुरुज २०-२५ फुट उंच बांधकाम करून बांधला आहे. या बुरूजाच्या खाली दोन लहान सुळके असुन स्थानिक लोक त्यांना नवरानवरीचे सुळके म्हणतात.
मंगळगडावरुन दिसणारा पायथाचा गोगावलेवाडीचा परिसर आणि वाटेत लागणारे पठार
ईथून दूरवर दिसणारे वरंध घाटाचे पहाड, खाली पसरलेले कोकण, त्यात दिसणाऱ्या छोटुकल्या वाड्या वस्त्या, उतरत्या छपराची घरे असा मस्त नजारा दिसतो.
दक्षीणबाजुला दिसणारा प्रतापगड
ईशान्येला दिसणारा तोरणा किंवा प्रचंडगड
पुर्वेला असणारे रायरेश्वर व कोल्हेश्वर पठार
गडावरुन मकरंदगड, प्रतापगड, रायगड, लिंगाणा हे किल्ले व रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरचे पठार पहायला मिळते. पायथ्यापासुन गडावर येण्यास २ तास तर संपुर्ण गड फिरण्यास १ तास पुरेसा होतो. बालेकिल्ला उतरुन माचीवर आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.
( टिपः- सर्व फोटो आंतरजालावरुन घेतले आहेत. )
मंगळगडाची व्हिडीओतून सैर
माझे सर्व लिखाण तुम्ही एकत्रित वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची
संदर्भग्रंथः-
१) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) रायगड जिल्हा गॅझेटीयर
४) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
५) निलेश भिंगे यांचा ब्लॉग
६) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७) www.durgbharari.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
26 Nov 2020 - 6:08 pm | डीप डाईव्हर
चांगला लेख 👍
27 Nov 2020 - 12:24 pm | प्रचेतस
व्वा...!
तपशीलवार लेखनाने सकस झालेला लेख. खूप आवडला.