अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग ४

Primary tabs

नयना माबदी's picture
नयना माबदी in भटकंती
22 Oct 2020 - 6:09 pm

26 जुन 2012

आज सकाळी आरामात 8 वाजता उठलो. आश्चर्याची गोष्ट अशी की अंग जराही दुखत नव्हते. रात्री आम्ही एवढे थकलेलो होतो की वाटल उद्या काही खर नाही आपल पण आम्ही सर्वजण एकदम ठिक होतो. चहा-नाश्ता करुन आम्ही 10 वाजता जम्मु कटराकडे प्रस्थान केले. काश्मीरमधे निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. मुघल बादशहा जहांगीरने फारसी भाषेत म्हटले होते, ‘गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त’म्हणजे पृथ्वीवर कुठेही स्वर्ग असेल तर ते इथे आहे, ते येथे आहे आणि फक्त येथे आहे.याची प्रचीती आम्हाला पावलोपावली येत होती.बसच्या खिडकीतुन जिथपर्यंत नजर जात होती एकापेक्षा एक सुंदर नजारे दिसत होते. इथल्या सुंदर टेकड्या, उंच डोंगररांगा यांदरम्यान वाहणा-या नद्या व झरे, झुडूपांनी भरलेले जंगल, फुलांनी वेढलेल्या पायवाटा,जणू आपण एखाद्या स्वप्नातील जागेत आहोत असे आपल्याला भासते. भारताच्या नकाशामध्ये जम्मु-काश्मीर हा मुकुटाप्रमाणे आहे जो प्रत्येक हंगामात आपला रंग बदलतो.
प्रवासात टिपलेले काही क्षण

अडीच तासांनी आम्ही श्रीनगर मधे पोहोचलो डल सरोवराच्या किनारी. आम्ही येथे मुघल गार्डन पाहण्यासाठी व डलमधे बोटिंग करण्यासाठी थांबलो. श्रीनगर जम्मू आणि काश्मीर राज्याची उन्हाळी राजधानी आहे. श्रीनगरमध्ये त्यांच्यावर तरंगणारी सुंदर सरोवरे आणि हाउसबोट्स पाहणे मनमोहक आहे. सुकामेवा आणि पारंपारिक काश्मिरी हस्तकला इथली काही प्रमुख आकर्षणे आहेत.डल सरोवर आणि नागिन सरोवर येथील प्रसिद्ध सरोवरे आहेत. श्रीनगरमधील सर्वात महत्वाचे स्थान म्हणजे डल सरोवर. श्रीधारा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या या सरोवरातील चमकणारे पाणी हे पाहण्यासारखे आहे.

श्रीनगरमधे दिसणारी शिकारा म्हणजे डल सरोवराचे सर्वाधिक आकर्षण.सांस्कृतिक प्रतीक म्हणून मान्यता प्राप्त,शिकारा ही एक नाव आहे. सरोवराचा आनंद लुटण्यासाठी, आपण शिकारा (वेनिसमधील गोंडोलासारखी दिसणारी अरुंद लाकडी नौका) नावेंमध्ये फिरायला जाउ शकतो.शिकाराचा उपयोग स्थानिक रहिवासी वाहतुकीसाठी करतात. शिकारामार्गे सरोवराच्या एका टोकापासून दुस-या बाजूला वस्तूंची वाहतूक केली जाते. येथील सरोवरातील बाजारपेठ खरेदीसाठी मुख्य आकर्षण आहे आणि तलावाच्या मध्यभागी बरीच दुकाने आहेत. हाताने तयार केलेले कानातले, लाकडी कलाकृती आणि केशर येथे मिळतात. आपण काश्मीरी वेषभुषा करुन शिकारामधे आपले फोटोही काढु शकतो.

डल सरोवराचे दुसरे आकर्षण म्हणजे हाउसबोट. हाउसबोट या स्थिर बोटी आहेत. जे सरोवराला भेट देणा-या पर्यटकांसाठी निवास म्हणून वापरल्या जातात.डल सरोवरावर हाऊस बोट ही संकल्पना ही ब्रिटीशांची होती, ज्याने पर्यटनाला चालना दिली.हाऊसबोट्स डल सरोवराचे विहंगम दृश्य तसेच सरोवराजवळील पर्वतांचे विहंगम दृश्य दर्शवितात. पर्यटन विभागाने वर्गीकृत केलेले हे हाऊसबोट्स एका साध्या खोलीच्या प्रकरणांपासून ते प्रशस्त लक्झरी स्वीट्सपर्यंतचे असू शकतात. त्यांचे आतील भाग काश्मिरी क्रिस्टल झूमर, कार्पेट्स आणि फर्निचरसह सुंदर सजावट केलेले असतात.हाऊसबोटमध्ये राहण्याचा आनंद काही वेगळाच आहे.

हाउसबोटमधे राह्ण्याइतका वेळ आमच्याकडे नव्हता तर आम्ही शिकारा बोटीतुन डल सरोवरात फ़ेरफ़टका मारुन आलो.
(शिकारातुन सफारी)

शिकारातुन फिरुन आल्यावर आम्ही डल सरोवराजवळ असलेल्या निशांत गार्डनमधे गेलो. मुघल राजवटीत, मोघलांनी फारसी वास्तुकलेमध्ये ब-याच प्रकारच्या बागांची निर्मिती करण्यास सुरवात केली आणि या बागांच्या संयोजनाला मुघल गार्डन असे म्हणतात.श्रीनगरमधील मुघल गार्डनमध्ये निशांत बाग, शालीमार बाग, चश्मे शाही, परी महल, अचबल आणि वेरीनाग गार्डनचा समावेश आहे.
निशांत बाग डल सरोवरच्या काठावर वसलेले आहे. जबरवान पर्वत त्याच्या पार्श्वभूमीवर आहे.नूरजहांचा मोठा भाऊ आसिफ खान यांनी 1633 मध्ये बागेची रचना केली.निशात बाग म्हणजे आनंदाची बाग. या बागेत दुर्मिळ प्रजातीची फुलझाडे, चिनार वृक्ष आणि सरुची झाडे देखील आढळतात. हा मुघल गार्डन, या प्रकारातील सर्वात मोठा टेरेस गार्डन आहे. येथे स्थित सुंदर झरे, मोठे लॉन आणि सुंदर फुलांमुळे ही बाग बरीच प्रसिद्ध आहे.
येथील सर्वच बागा खुप सुंदर आहेत, आम्ही फक्त हिच पाहीली. खरच अशी बाग मी याआधी पाहिलीच नव्ह्ती. फुलांची इतकी विविधता तेथे होती. तुम्ही खाली दिलेल्या चित्रांमधे पाहु शकता. भरपुर फोटोग्राफी करुन आम्ही बागेतुन बाहेर आलो. येताना आम्ही काही फुलांच्या बिया घेतल्या घरी येउन लावण्यासाठी पण काय माहीत इथे मुंबईला आणुन लावल्यावर त्यातुन रोप आलेच नाही, असो.

(जबरवान पर्वत)

बाहेर येउन डलच्या किनारी आम्ही फालुदा खाल्ला व पुढे मार्गस्थ झालो. डल सरोवर आणि बागेत फिरुन येईपर्यंत आम्हाला 4 वाजले होते. रात्री 9 च्या सुमारास एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलो. रोटी, डाल फ्राय, आलु-गोभी ची भाजी, जिरा राइस अशा मस्त गरमा गरम जेवणावर ताव मारला. उत्तर भारतात आपल्याला सर्व ठिकाणी असेच जेवण मिळ्ते. जेऊन निघालो ते मग थेट कुठेही न थांबता रात्री 1 वाजता आम्ही कटराला पोहोचलो.
हॉटेलवर चेक-इन केल. रुमवर जाताच हात-पाय धुऊन सरळ ताणुन दिली. खुप प्रवास झाला होता आज.

27 जुन 2012
आज आम्ही आरामात 11 वाजता उठलो. आम्ही दुपारी 3 वाजता वैष्णोदेवी ट्रेक करणार होतो.
कटरा हे जम्मू-काश्मीर राज्यातील त्रिकुटा पर्वतच्या पायथ्याशी असलेल्या रियासी जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. वैष्णो देवीला भेट देणा-या यात्रेकरूंसाठी कटरा बेस कॅम्प म्हणून ओळखले जाते.येथे भरपूर हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रेस्टॉरंट्स, ढाबे, फास्ट-फूड जॉइंट्स उपलब्ध आहेत जे सर्व प्रकारच्या बजेटमध्ये फिट आहेत. दरवर्षी लाखो भाविक या तीर्थस्थळी भेट देतात.

वैष्णोदेवी मंदिराबद्द्ल..
वैष्णो देवी मंदिर, हिंदू मान्यतेनुसार शक्तीला समर्पित असे सर्वात पवित्र हिंदू मंदिर आहे , जे जम्मू आणि काश्मीर, राज्यातील त्रिकुट पर्वतावर वसलेले आहे.
हे उत्तर भारतातील एक अत्यंत पवित्र स्थान आहे. या धार्मिक स्थळाची आराध्य देवी, वैष्णो देवी यांना सामान्यत: माता राणी आणि वैष्णवी म्हणूनही ओळखले जाते.
माता वैष्णो देवीबद्दल अनेक कथा आहेत. एका प्रसिद्ध प्राचीन श्रद्धेनुसार, माता वैष्णो यांचे परम भक्त श्रीधर यांच्या भक्तीमुळे माता प्रसन्न झाली,आणि जगासमोर आपल्या अस्तित्वाचा पुरावा दिला.

हि कथा खालीलप्रमाणे आहे.
श्रीधर पंडित माता वैष्णो देवीचे उत्कट भक्त होते. ते सध्याच्या कटरा शहरापासून 2 किमी अंतरावर हंसली गावात राहत होते.एकदा माता वैष्णोने त्याला एका मोहक लहान मुलीच्या रुपात दर्शन दिले व श्रीधर पंडितला 'भंडारा' (भिक्षू आणि भक्तांसाठी मेजवानी) आयोजित करण्यास सांगितले. पंडितांनी खेड्यातून आणि जवळपासच्या ठिकाणाहून लोकांना बोलवायला सुरुवात केली.
त्यांनी 'भैरव नाथ' नावाच्या एका स्वार्थी राक्षसालाही आमंत्रित केले.
भैरव नाथ यांनी श्रीधर पंडित यांना विचारले की ते हे सर्व आयोजन कसे करणार आहेत आणि त्यांनी श्रीधरला अपयश आल्यास झालेल्या दुष्परिणामांची आठवण पण करून दिली. श्रीधर पंडित काळजीत बुडाले तेव्हा दैवी मुलगी हजर झाली आणि निराश होऊ नको मी सर्व व्यवस्था केली आहे. तुझ्या लहान झोपडीमधे 360 हून अधिक भाविकांना भोजनासाठी बसता येईल असे आश्वासन दिले.
यानंतर बरेच गावकरी श्रीधरच्या घरी आले आणि जेवणासाठी जमले.मग कन्या रूपी मां वैष्णो देवीने एका विचित्र पात्रातून सर्वांना भोजन देण्यास सुरवात केली.
भोजन देताना कन्या रूपी मां वैष्णो भैरवनाथ जवळ गेली असता त्याने सांगितले की मी खीर-पुरीऐवजी मांस खाईन आणि मद्यपान करीन.तेव्हा कन्या रूपी माता वैष्णोने त्याला समजावून सांगितले की हे ब्राह्मणांचे भोजन आहे, मांसाहार इथे नाही केला जात. पण भैरवनाथांनी मुद्दाम हा मुद्दा मांडला.भैरव नाथ यांनी कबूल केले की या मुलीकडे अलौकिक शक्ती आहेत आणि त्यांनी माताची पुढील परीक्षा घेण्यासाठी तिचा पाठलाग केला. माताने वायुरुप धारण केले आणि त्रिकुट पर्वताकडे गेली. भैरवनाथही त्यांच्या मागे गेले.

बाणगंगा
असे मानले जाते की आपल्या माताचे रक्षण करण्यासाठी पवनपुत्र हनुमान देखील होते. हनुमानजीला जेव्हा तहान लागली तेव्हा त्यांच्या आग्रहाने आईने धनुषाने डोंगरावर बाण सोडला एक प्रवाह निर्माण केला आणि त्या पाण्यात आपले केस धुतले.आज हा पवित्र प्रवाह बाणगंगा म्हणून ओळखला जातो.

चरण पादुका
याच ठिकाणी माता वैष्णो दोन क्षण थांबली आणि भैरवनाथ किती दूर आहे याचा अंदाज लावला. या ठिकाणी मातेच्या पायाचे ठसे अजूनही अस्तित्वात आहेत.असे म्हटले जाते की जो कोणी माता वैष्णोच्या पायांना स्पर्श करून प्रवासाला सुरुवात करतो त्याचा प्रवास यशस्वी ठरतो.

अर्द्धकुमारी
चरण पादुकाहुन पुढे जाउन माताने एका गुहेत प्रवेश केला आणि नऊ महिने ध्यान केले.आज जिथे माताने ध्यान केले त्या गुहेस अर्द्धकुमारी किंवा आदिकुमारी किंवा गर्भजून म्हणून ओळखले जाते. भैरवनाथही तिथेपर्यंत आले. मग एका साधुने भैरवनाथला सांगितले की तुम्ही जिला साधारण मुलगी मानता ती अदिशक्ति जगदंबा आहे, म्हणून त्या महाशक्तिचा पाठलाग करणे सोडून द्या.
भैरवनाथांनी साधुचे ऐकले नाही. त्यानंतर माता गुहेच्या दुस-या बाजूने बाहेर निघुन गेली. भैरवनाथ हि माताच्या मागे गेले.

भवन
भैरवनाथला थांबवण्यासाठी पवनपुत्र हनुमान मधे आले आणि त्या दोघांमधे युद्ध झाले. मातेने भैरवनाथला इशारा दिला आणि परत जाण्यास सांगितले , तरीही तो ऎकत नव्हता तेव्हा माता वैष्णवींने महाकालीचे रूप धारण केले आणि भैरवनाथांचा वध केला. जिथे माता वैष्णो देवीने जिद्दी भैरवनाथची हत्या केली ती जागा पवित्र गुहा किंवा भवन म्हणून प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी माता महाकाली (डावीकडील) माता महासरस्वती (उजवीकडे),आणि माता महालक्ष्मी (मध्यम) पिंडी म्हणून गुहेत बसल्या आहेत. या तिघांच्या एकत्रित स्वरूपाला माता वैष्णो देवीचे रूप म्हणतात.

भैरव घाटी
माताने भैरवनाथच्या मस्तकाचे शिरच्छेद केले आणि ते भवनपासून 8 किमी अंतरावर त्रिकुट पर्वताच्या भैरव खो-यात पडले. ते ठिकाण भैरोनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की त्यांच्या वधानंतर भैरवनाथांनी आपल्या चुकांबद्दल पश्चात्ताप केला आणि माताकडे क्षमा मागितली.
माता वैष्णो देवीला ठाऊक होते की तिच्यावर हल्ला करण्यामागील भैरवनाथचा मुख्य हेतू मोक्षप्राप्ती करणे होता. माताने भैरवनाथाला पुनर्जन्माच्या चक्रातून केवळ स्वातंत्र्यच दिले नाही, तर त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले की जोपर्यंत माझ्या दर्शनानंतर भक्त तुमचे दर्शन करणार नाहीत तोपर्यंत माझे दर्शन पूर्ण मानले जाणार नाही.
त्याच श्रद्धेनुसार आजही, माता वैष्णो देवीच्या दर्शनानंतर भक्त भैरवनाथांच्या दर्शनासाठी सुमारे तीन किलोमीटर अंतरावर चढून जातात.

या दरम्यान, पंडित श्रीधर अधीर झाले. ते त्रिकुट डोंगराच्या दिशेने गेले त्याच दिशेने जे त्यांनी स्वप्नात पाहिले होते. अखेर ते गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ पोचले. त्यांनी अनेक पद्धतींनी देवीच्या पिंडीचे पुजन केले . त्यांच्या पूजेमुळे देवी प्रसन्न झाली. तिने त्याला दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला. तेव्हापासून श्रीधर आणि त्याचे वंशज माता वैष्णो देवीची पुजा करत आहेत.
अशी हि माता वैष्णोची कथा आहे.

आम्ही दुपारी 3 वाजता यात्रा सुरु केली. आमच्या हॉटेलसमोरच यात्रा नोंदणी केंद्र होते. तेथे आम्ही सर्वांनी आमची नोंदणी केली व पावती घेउन निघालो.ही पावती घेतल्यानंतरच आपण कटरा ते माँ वैष्णोच्या दरबारासाठी चढाई सुरू करू शकता. ही पावती घेतल्यानंतर तीन तासांच्या आत तुम्हाला 'बाण गंगा' चेकपॉईंटमध्ये प्रवेश करावा लागेल आणि तेथे सामान तपासल्यानंतरच तुम्ही यात्रा सुरू करू शकता.

(दर्शनी दरवाजा - मागे चेकपोस्ट)

जर तुम्ही पावती घेतल्यानंतर 6 तासांच्या आत चेकपोस्टवर एन्ट्री न घेतल्यास तुमची पावती रद्द होईल. आम्ही चेकपोस्टवर पोहोचलो येथे स्त्री व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा होत्या. आमची नोंदणी पावती येथे तपासली, सर्व सामानांची येथे तपासणी केली. मग आम्ही पुढे निघालो.

(यात्रेच्या मार्गाची प्रतिकृती)

चेकपोस्टनंतर पहिला टप्पा आहे बाणगंगा.येथे या नदीत भक्तगण स्नान करुन पुढील यात्रा प्रारंभ करतात. आम्ही बाणगंगेचे दर्शन करुन पुढे निघालो. बाणगंगेनंतर आम्ही चरण पादुका येथे आलो.

येथे मंदीर आहे, जिथे माताचे चरण आहेत, त्यांचे दर्शन करुन जय माता दी चा जयघोष करत आम्ही निघालो.

(यात्रेचा मार्ग)

यात्रा सुरु केल्यानंतर सुमारे 3 तासांनी आम्ही अर्द्धकुमारी येथे पोहोचलो. येथे गर्भजुन गुफा आहे. असे मानले जाते की मातेने या गुफेत नऊ महिने
तपश्चर्या केली, आपण हे समजू शकतो की मूल जन्मापूर्वी 9 महिने आईच्या पोटातच राहतो म्हणूनच या गुफेला गर्भजुन म्हणतात.

(अर्द्धकुमारी मंदीर)

गुफेचा आकार मातेच्या गर्भाच्या आकारासारखाच आहे.या छोट्या गुफेतून सर्वात मोठ्या आकाराचा माणूसही सहज बाहेर पडतो.आपल्याला त्या गुफेच्या आत जाउन यायच असत त्यासाठी आपल्याला इथे आपली नोंदणी पावती दाखवुन या दर्शनासाठी एक पावती घ्यावी लागते. आपल्याला एक ग्रुप नंबर दिला जातो आणि एका ग्रुपमधे 50 लोक असतात. एका वेळेला 5 ग्रुपला आत सोडतात. आत जाउन हि प्रत्यक्ष गुफेत जायला दीड ते दोन तास लागतात. प्रत्येकाला हि गुफा पार करायला 1 ते 1.5 मिनिटांचा वेळ लागतो, त्यामुळे इथे खुप रांग होती. आम्ही हे दर्शन न करताच पुढे निघालो. संपूर्ण प्रवासात ठिकठिकाणी खाण्यापिण्याची सोय आहे. आम्ही अशाच एका भोजनालयात भोजन केले. इथे आपल्याला इडली-सांभार , राजमा-भात , कढी-भात , चहा, कॉफी, बिस्किटे अशा काही गोष्टीच मिळतात. पण इतक्या उंचावर आणि थंडीत त्या गरमागरम जेवणाची चव औरच.अर्द्धकुमारी पासुन भवन 7 कि.मी लांब आहे. जेवण करुन निघालो तेवढ्यात पाउस सुरु झाला. हा पाउस आमचा पिच्छा काही सोडत नव्हता. मग तिथेच शेडखाली थोडा वेळ थांबुन राहिलो. पाउस कमी झाल्यावर पुन्हा चालायला सुरुवात केली. अर्द्धकुमारी पासुन भवनपर्यंत कठीण चढाई आहे, आम्ही माताराणीचा जप करत शेवटी रात्री 1 वाजता भवन जवळ पोहोचलो.

(भवन परिसर - हा आम्ही 2017 मधे घेतलेला फोटो आहे)

आपल्याला येथे क्लॉक रूम मधे आपल सामान (मोबाइल ,पर्स, कमरेचा पट्टा, शुज) जमा कराव लागत. भवन जवळ्च माताला भेट चढवण्यासाठी आपण चढावा घेउ शकतो. श्राइन बोर्डतर्फे हे दुकान आहे. येथे आपल्याला 21 रुपयांपासुन 101 रुपयांपर्यंत चढावा घेता येतो. आम्ही क्लॉक रूम मधे सामान ठेउन व चढावा घेउन दर्शनासाठी रांगेत जाउन उभे राहिलो, येथे पुन्हा एकदा आपली पावती तपासली जाते मगच आपल्याला आत सोडतात. प्राचीन मुळ गुफ़ा जि आहे ती आजकाल वर्षातील बराच काळ बंद ठेवली जाते कारण ही गुफ़ा खूपच लहान आहे. एकेका माणसाला ती पार करुन जायला कित्येक मिनिटे लागतात.प्राचीन मूळ गुफा कमी गर्दीच्या दिवसांवर किंवा पारंपारिक उत्सव किंवा धार्मिक प्रसंगी उघडली जाते. या गुहेतून माता राणीला भेट देणे हा एक पूर्णपणे वेगळा अनुभव आहे.
(प्राचीन मूळ गुफा - जालावरुन साभार)

त्यामुळे अधिक प्रवाश्यांना दर्शन सुविधा देण्यासाठी दोन नवीन टनेल (बोगदा) मार्ग वापरले जातात. प्रवेशासाठी एक बोगदा वापरला जातो जो थेट माताराणीच्या पिंडींजवळ जातो. दुसरा बोगदा दर्शनानंतर बाहेर पडण्यासाठी वापरला जातो.

(नवीन मार्ग -जालावरुन साभार )

आम्ही गेलो तेव्हा खुप गर्दी असल्यांमुळे आम्हाला ही नव्या मार्गाने जावे लागले. आम्ही प्राचीन गुफेच्या जागेवरुन पुढे एका कॉरिडॉर मधे पोहोचलो, ज्याच्या छतावर अनेक घंटा लटकलेल्या दिसतात.काही अंतर चालल्यानंतर, आम्ही एका खुल्या जागी पोहोचलो जिथे मातेच्या वाहनाचा सिंहाचा पुतळा ठेवलेला आहे आणि मातेचा संपूर्ण पुतळा ठेवलेला आहे. इथुन बोगद्याचे प्रवेशद्वार आहे. बोगद्याच्या शेवटी संगमरवरी दगडाचा उंच व्यासपीठ आहे ज्यावर माता राणी नैसर्गिक खडकांच्या पिंडींच्या स्वरुपात विराजमान आहे. गुफेत चित्रे किंवा मूर्ती वगैरे नाहीत. आत गेल्यावर तिथे बसलेले भटजी आपल्याला तिलक लावतात व आपल्याला पिंडींची माहिती देतात.
(वैष्णोदेवी पिंडी दर्शन - जालावरुन साभार)

गर्दी खुप असल्यामुळे आपल्याला आत जास्त वेळ थांबता येत नाही. माताचे दर्शन होताच डोळ्यातुन अश्रु वाहु लागले. 2012 नंतर आता 2020 पर्यँत आम्ही प्रत्येक वर्षी वैष्णोदेवीला जातोय, आताही जेव्हा मातेचे दर्शन करतो तेव्हा डोळ्यातुन अश्रु येतात, मग हि तर पहिलीच वेळ होती मातेच्या सामोरी जाण्याची. असे म्हणतात की माता ज्यांना बोलावाते तेच लोक मातेच्या दर्शनासाठी येउ शकतात आणि आम्ही ते भाग्यशाली होतो. मनोमन मातेचे धन्यवाद मानले. माताराणीकडे प्रार्थना केली" हे भगवती माते तु असेच आमच्यावर तुझे कृपाछत्र ठेव. तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहुदे. पुन्हा पुन्हा तुझ्या दर्शनाला आम्हाला बोलाव. जय माता दी !" दर्शन करुन बाहेर आलो व क्लॉक रूम कडे सामान घ्यायला निघालो. दर्शनाला येतानाच आप्ल्याला चढावामधे असलेला नारळ जमा करुन त्याबदल्यात प्रसादीचा कुपन देतात. आम्ही तो कुपन देउन अर्धा नारळ घेतला. प्रत्येकाला प्रसादी मधे खडीसाखर व एक सिक्का देतात ज्यावर पिंडी कोरलेली असते व वर्ष हि लिहलेले असते.

(माझ्याजवळ आता २०१३ आणि २०१८ चे सिक्के आहेत)

क्लॉक रूम मधुन सामान घेउन आम्ही आता पुढे भैरवनाथ दर्शनासाठी निघालो.
भवनपासुन भैरवनाथ मंदीर 1.5 कि.मी अंतरावर आहे. त्यासाठी आपल्याला कठीण चढाई करावी लागते. आम्ही 2 वाजता भैरवबाबांची यात्रा सुरु केली. आता पाय खुप दुखु लागले म्हणुन आम्ही हळुहळु चालत होतो. रात्री 3.30 वाजता आम्ही भैरवनाथ दर्शन केले.
(भैरवनाथ मंदीर - जालावरुन साभार)

भैरवनाथहुन खाली पाहिले असता भवन चा वाघाच्या आकाराचा सुंदर नजारा दिसतो.

थोडा वेळ तेथे बसुन आम्ही मग कटरा कडे प्रस्थान केले. एवढी पायपीट करुन आता आम्ही खुपच थकलो होतो. माता राणीचा जप करत हळुहळु उतरायला लागलो.

(खाली उतरत असताना झालेले कटरा शहराचे विहंगम दर्शन)

सकाळी 9.30-10 पर्यंत खाली कटराला आलो. हॉटेल रुमवर जाताच कपडे बदलुन व हातपाय धुउन सरळ झोपुन गेलो. याप्रकारे आमचे वैष्णोदेवी दर्शन झाले.

जय माता दी

क्रमशः

प्रतिक्रिया

कंजूस's picture

22 Oct 2020 - 8:21 pm | कंजूस

सहा वर्षं जाता म्हणजे कमाल आहे!
लेख आवडला. रात्री जाण्याचे कारण त्रास कमी होतो का? त्यावेळी गर्दी कमी असते?

नयना माबदी's picture

23 Oct 2020 - 10:06 am | नयना माबदी

धन्यवाद. २०१२ ते २०२० च्या दरम्यान ७ वेळा दर्शन करुन आलो. आम्ही २०१२ मधे जुन महीन्यात गेलो होतो तेव्हा कटरामधे थोडी गरमी असते. उन्हाचा त्रास होउ नये म्हणुन ते काका बोलले आपण रात्रीची यात्रा करु. २०१२ व २०१३ या दोन्ही वर्षी आम्ही आसेच गेलो, कारण दोन्ही वर्षी आम्ही अमरनाथ यात्रा करुन गेलो होतो. त्यानंतर आम्ही नेहमी हिवाळ्यामधे गेलो तर सकाळीच यात्रा सुरु करुन रात्री परत आलो.

कंजूस's picture

22 Oct 2020 - 8:22 pm | कंजूस

सहा वर्षं जाता म्हणजे कमाल आहे!
लेख आवडला. रात्री जाण्याचे कारण त्रास कमी होतो का? त्यावेळी गर्दी कमी असते?

गोरगावलेकर's picture

22 Oct 2020 - 9:41 pm | गोरगावलेकर

या सगळ्या गोष्टी २१ वर्षांपूर्वी अनुभवल्या आहेत त्यामुळे जास्तच भावल्या . श्रीनगर व्यतिरिक्त पहलगाम, गुलमर्ग पाहून झाले आहे. सहल सुरु असतानाच कारगिल युद्ध सुरु झाल्याने कार्यक्रमात थोडा बदल करावा लागला होता.
श्रीनगर येथे नागिन लेकला ४ रात्री हाऊस बोटीत मुक्काम होता व हाऊस बोट सरोवराच्या पैलतीरावर होती. त्यामुळे रोज विनाशुल्क दोन वेळा शिकाऱ्यातुन भटकायला मिळत होते.
त्यावेळी माझ्याकडे कोडॅकचा रोल भरून फोटो काढायचा कॅमेरा होता. आतासारखी क्लीक,क्लीक,क्लीक करायची चैन नव्हती. संपूर्ण सहलीसाठी अगदी एकच रोल काटकसरीने पुरवून पुरवून वापरला होता.
यानंतरही २०११ ला वैष्णो देवीला जाणे झाले. यावेळी मात्र कटरा ते सांझीछत हेलिकॉप्टर ने जाणे येणे केले होते.

नयना माबदी's picture

23 Oct 2020 - 10:12 am | नयना माबदी

धन्यवाद. आम्ही २०१८ मधे गुलमर्ग ला गेलो होतो व तेव्हाच डलच्या हाउसबोट मधे १ दिवसाचा मुक्काम केला होता. आम्ही नोव्हेंबर महीन्यात गेलेलो. जबरदस्त थंडी होती, खुप हालत खराब झाली होती हाउसबोट मधे. बर झाल फ्क्त एक दिवसाचा मुक्काम होता.