दिवाळी अंक २०२० - आवाहन

यंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'!. प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.

लेखन देण्याची मुदत : २५ ऑक्टोबर, २०२०.

दिवाळी अंक २०२० - आवाहन

भाजे लेणी

Primary tabs

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
17 Oct 2020 - 11:13 am

सकाळी उठून दोन्ही मुली ऑफिसला जाण्याच्या आधी डबे तयार केले. शिल्लक राहिलेली भाजी पोळी बांधून घेतली. मोठीला रेल्वे स्टेशनला सोडले. आता दिवसभर विशेष असे काही काम नव्हते. नवऱ्यानेही सुटी घेतली होती.
कुठेतरी फिरायला जायचे मनात होते. गाडी लोणावळ्याच्या दिशेने वळवली. वाटेत वरद विनायकाचे दर्शन घेऊया असे वाटल्याने महडला गाडी थांबवली. अजिबात गर्दी नव्हती. पटकन दर्शन झाले.दहा-पंधरा मिनिट सभामंडपात बसलो. मन अतिशय प्रसन्न झाले.

मंदिराच्या रस्त्यावर दुतर्फ़ा पूजेचे सामान, खेळणी वगैरेची दुकाने लागलेली होती. खाण्यापिण्याच्या स्टॉलवरून कांदाभजीचा वास दरवळत होता. एक प्लेट गरमागरम भजी खाल्ली व पुढे निघालो.

तेथून निघून लोणावळ्याला पोहचलो पण थांबायची इच्छा झाली नाही. पुण्याकडे जाणाऱ्या जुन्या महामार्गाने निघालो. मळवली स्टेशन जवळून उजवीकडे वळण घेतले आणि जवळच असणाऱ्या भाजे लेणीच्या पायथ्याशी पोहचलो. गाडी पार्क केली,चहा घेतला व भाजे लेणीच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. पायऱ्यांचे बांधकाम दगडी असून अतिशय सुस्तीतीत आहे. पायऱ्या सुरु होतात तेथेच तिकीट दर दर्शविणारा फलक आहे.

जसजसे वर चढत जावे तसा आजूबाजूचा सुंदर परिसर नजरेस पडत जातो. डिसेंबरचा महिना असल्याने ऊन जास्त जाणवत नव्हते व वातावरणही ढगाळच असल्याने पायऱ्या चढताना विशेष त्रास जाणवला नाही.

वर पोहचल्यावर तिकीट घेतले व लेणी परिसरात प्रवेश केला . येथे लेणीबद्दलची संक्षिप्त माहिती देणारा फलक आहे.

लेणी बघायला सुरुवात केली. समोरच भव्य चैत्यगृह व त्यातील स्तूप आहे. चैत्यगृहाची पिंपळपाणाच्या आकाराची कमान. चैत्यगृहाचे कलते अष्टकोनी खांब, मधोमध असणारा स्तूप व छतावरील लाकडी तुळा विशेष लक्ष वेधून घेतात.

बाजूला भिक्षूंना राहण्यासाठीअनेक विहार आहेत. चैत्यगृहाला लागून असलेले विहार दुमजली आहेत. विहारांमध्ये बसण्या, झोपण्यासाठी व्यवस्था आढळते.काही विहारांमध्ये कोरीव कामही आढळते.

एका विहारातून दिसणारे विहंगम दृश्य

वरच्या मजल्यावर जाण्यासाठीच्या पायऱ्या

थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे टाके आहेत व त्यापुढे गेल्यावर बौद्ध भिक्षूंच्या स्मरणार्थ कोरलेले स्तूपांचे एक संकुलच आहे.

त्यापुढे लागते ते सूर्यलेणे. व्हरांडा त्यामागे दालन व खोल्या आहेत. दरवाजा बंद असल्याने फक्त व्हरांड्यातच जाता आले. येथे काही पौराणिक प्रसंगांचे कोरीव काम बघावयास मिळते.

बाजूला असणारा लोहगड व विसापूर किल्ल्याचा परिसर डोळ्यांचे पारणे फेडतो. दोन तास आरामात फिरून लेणी परिसर पहिला. परिसराची निगा खूपच चांगली ठेवल्याचे दिसते.
लेणी बघून झाल्यावर बाहेर पायऱ्यांच्या बाजूने असलेल्या कट्ट्यावरच बसून घरून आणलेली भाजी-पोळी खाल्ली व थोडा आराम केला.

प्रवासखर्च वगळता दोघांत मिळून एक चहा व एक कांदा भजी इतक्या अल्प खर्चात आज लग्नाचा बत्तीसावा वाढदिवस साजरा झाला होता आणि एक सुखद अविस्मरणीय आठवण उराशी घेऊन मी परतीचा प्रवास सुरु केला.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Oct 2020 - 12:19 pm | कंजूस

लिहा असं मी प्रचेतसला ( वल्ली) सांगणार होतोच. कारण अगोदरचा दहा वर्षांपूर्वीचा आहे. ते काम करून टाकलेत.
उत्तम. फोटो दिसताहेत. छान.
आणखी काही प्रवासवर्णनं असल्यास अवश्य लिहा.

गोरगावलेकर's picture

17 Oct 2020 - 4:51 pm | गोरगावलेकर

"आणखी काही प्रवासवर्णनं असल्यास अवश्य लिहा."
गेल्या काही वर्षात देशांतर्गत भटकंती तर बऱ्यापैकी झाली आहे. बघूया जमले तर

सुरेख! फोटोही सुन्दर आलेत..
बाकी तज्ञ मंडळी अजून माहिती देतीलच.

तुम्हाला विवाहाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

प्रचेतस's picture

17 Oct 2020 - 2:42 pm | प्रचेतस

सुरेख लिहिलंय.
फोटोही छान आलेत एकदम.

दरवाजा बंद असल्याने फक्त व्हरांड्यातच जाता आले, येथे काही पौराणिक प्रसंगांचे कोरीव काम बघावयास मिळते.

येथील दरवाजाची चावी तिथले केयरटेकर श्री. वाघमारे यांच्याकडे असते. तिकिटखिडकीपाशी अथवा वरच्या गेटवरील रखवालदारांस विचारल्यास ते कुलूप उघडून देतात किंवा चावीच देतात :)

आतमध्ये विहारांची रचना आणि बाह्य भिंतीवरील मूर्तीसारखी काही शिल्पे आहेत.

व्हरांड्यातील बाह्यभिंतीवर अर्धकोरीव स्तंभावर अर्धे शरीर सिंहाचे व अर्धे मानवाचे असे असलेले सेंटॉर आहेत तर तर खालच्या बाजूस आडव्या पट्टीवर पंख असलेले घोडे आणि बैल आहेत. हे पेगॅसस आहेत. ग्रीक मिथकांतील हे काल्पनिक प्राणी.

हे त्या विहाराच्या अंतर्भागातील फोटो

a

a

गोरगावलेकर's picture

17 Oct 2020 - 4:52 pm | गोरगावलेकर

चौकसपणा नेहमीच कमी पडतो आमचा. बाकी लेणी बघावी ती आपल्याच नजरेने . माहितीबद्दल धन्यवाद .

महासंग्राम's picture

17 Oct 2020 - 3:17 pm | महासंग्राम

हे पेगॅसस आहेत. ग्रीक मिथकांतील हे काल्पनिक प्राणी.

एक कुतुहूल आहे ग्रीक देश म्हणा किंवा मिथकं म्हणा हे भारतापासून खूप दूर आहेत. हे विहार बांधणार्यांना याची माहिती कशी मिळाली असेल ?

अलेक्झांडरच्या स्वारीनंतर ग्रीक लोक (यवन) भारतात यायला लागले. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी मेगॅस्थेनीस हा ग्रीक वकील होता. नंतर सेल्युकस निकेटर आला. सातवाहनांच्या काळात तर भारत-ग्रीक व्यापार भरभराटीला आला होता. ग्रीकांनी भारताच्या वायव्य भागात (राजस्थान वगैरे) राज्ये स्थापन केली. त्यांनाच इंडो ग्रीक राज्ये अथवा बॅक्ट्रियन राज्ये म्हणतात. कित्येक ग्रीक इथल्या संस्कृतीत मिसळून गेले, कित्येकांनी बौद्ध धर्म धारण केले.
ग्रीकांबरोबरच त्यांची संस्कृतीही इकडे यायला लागली. भाजे लेणीतील सेंटॉर, पॅगेसस, कार्ले लेणीतील स्फिंक्स, नाशिक लेणीतील स्फिन्क्स, ग्रिफिन, अथेना ही त्याचीच उदाहरणे.

महासंग्राम's picture

17 Oct 2020 - 4:07 pm | महासंग्राम

अपरिचित माहिती बद्दल धन्यवाद मालक

चौथा कोनाडा's picture

17 Oct 2020 - 4:03 pm | चौथा कोनाडा

सुरेख ! फोटोही सुंदर !
कोविडकाळात घरबसल्या मस्त सहल झाली !

गोरगावलेकर's picture

17 Oct 2020 - 4:53 pm | गोरगावलेकर

धन्यवाद खेडूत, महासंग्राम आणि चौथा कोनाडा

कंजूस's picture

17 Oct 2020 - 7:28 pm | कंजूस

हे पाहायचं आहे. तिथे आहे एक खांब.

गोरगावलेकर's picture

18 Oct 2020 - 4:12 pm | गोरगावलेकर

एका नवीन ठिकाणाची माहिती मिळाली . खालील लिंकवर याबद्दल माहिती वाचावयास मिळाली.

हेलिओडोरसचा शिलालेख

दुर्गविहारी's picture

18 Oct 2020 - 10:51 pm | दुर्गविहारी

खुप छान .