आज जवळपास ३ वर्षाने मिपा वर आलो.. खुप मोठा ब्रेक झाला. असो..
लागणारे घटक:
- १/२ किलो कोळंबी (सोललेली आणि मधला धागा काढलेली)
- 1 टीस्पून. हळद
- 2 टीस्पून. तिखट
- 1 टेस्पून. आलं लसूण पेस्ट
- 100-150 मिली मोहरी तेल
- 1 टेस्पून. मोहरी
- २ टीस्पून. हिंग
- पाऊण कप लसणीचे मध्यम आकाराचे तुकडे
- अर्धा कप आल्याचे मध्यम आकाराचे तुकडे
- 3 टेस्पून. लोणचं मसाला
- चवीनुसार मीठ
- लिंबाचा रस किंवा व्हाईट व्हिनेगर चवीनुसार
पाककृती:
चला सुरु करू.. कोळंबीला हळद, मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट लावून किमान अर्धा तास मुरवत ठेवा. मोहरीचं तेल तापवून त्यात मुरलेली कोळंबी माध्यम आचेवर तळून घ्या. कोळंबी थोडी डार्क ब्राउन तळावीत, जेणेकरून कोळंबी क्रिस्पी होतील आणि लोणचं टिकाऊ होईल.
तळणीच्या राहिलेल्या तेलात मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्या.
आता थोडा ब्रेक.. पुढचं काम तळलेली कोळंबी आणि फोडणी पूर्ण थंड झाली की....
एका भांड्यात तळलेली कोळंबी, आल्या-लसणाचे तुकडे, तिखट, मीठ आणि लोणचं मसाला प्रेमाने एकजीव करा. थोडक्यात कोळंबीला मसाजच करा.. आता त्यावर फोडणीचे तेल, मोहरी घालून, मस्त लिंबू पिळा. लोणचं एकजीव करून काचेच्या सुक्या जार/बरणीत काढून घ्या..
पोळी, भाकरी किंवा डाळ-भात, सोलकडी-भातासोबत लोणचं म्हणजे स्वर्गसुख.. हे लोणचं किती दिवस टिकू शकेल नाही माहित, कारण आमच्याकडे आठवड्यात बरणी रिकामी झाली.. हां, दिलेल्या जिन्नसांत फोटो मधील बरण्या भरतील इतकं झालं लोणचं..
अतिरिक्त टिप्सः
- शक्यतो लहान कोळंबी घ्यावीत, चवीला जास्त चांगली लागतात
- आम्ही इथे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला वापरलाय
या लॉकडाऊनच्या काळात आणि खासकरून मागील एक महिन्यात विडिओग्राफी वर काम चालू केलं.. त्यामुळे यावेळी फोटोसोबत पाकृ चा विडिओ बनवायचा प्रयत्न केलाय. पहिलाच प्रयत्न आहे.. तो प्रयत्न इथे चिकटवतोय.. काही सूचना असतील तर त्यांचं मनापासून स्वागत..
प्रतिक्रिया
6 Oct 2020 - 2:27 pm | महासंग्राम
फोटो भारी आलाय
6 Oct 2020 - 4:27 pm | नीलस्वप्निल
कोळंबी जीव कि प्राण.... :)
10 Oct 2020 - 8:03 am | मी_देव
धन्यवाद महासंग्राम..
नीलस्वप्निल, :)
10 Oct 2020 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लंबर एक.... तपशीलवार कृती. फ़ोटो कातील.
मिपावर येत राहा, लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
21 Oct 2020 - 8:06 am | मी_देव
धन्यवाद दिलीपजी.
11 Oct 2020 - 1:08 pm | तुषार काळभोर
कोळंबी आवडत नाही. पण फोटो कातील आहे.. हे लोणचं आवडेल आयतं खायला.
21 Oct 2020 - 8:14 am | मी_देव
म्हणजे आयत्या मिळालेल्या लोणच्यातून कोळंबी बाजुला काढून नुसतं लोणचं खाणार तर.. ;)
धन्यवाद. फोटो आवडला
21 Oct 2020 - 3:01 pm | तुषार काळभोर
आयतं मिळालं तर कोळंबी पण चालेल.
21 Oct 2020 - 10:33 am | प्रसाद_१९८२
कोळंबीचे लोणचे, व्हिडीओ देखील छान आहे.
--
चाखण्यासाठी छान पर्याय आहे.
21 Oct 2020 - 2:37 pm | मी_देव
धन्यवाद प्रसाद :)
22 Oct 2020 - 4:52 pm | विजुभाऊ
कोळंबी साफ कशी करायची हे कोणी सांगेल का. विशेषतः त्यातली ती कसलीशी रेशा कशी काढायची ते
28 Oct 2020 - 5:06 pm | मीअपर्णा
विजुभाऊ, माझ्याघरी जर वेळ पडलीच तर नवरा यु ट्युबवर पाहून करतो. मुंबईत आमची एक "आशाताई" नावाची कोळीणताई होती. होती म्हणजे आहे. तिला देव दिर्घायुष्य देवो. ती साफ करून द्यायची थोडं उशीरा जावं लागायचं. ती चांगलं शिकवू शकेल.
शुभेच्छा.
ही रेसिपी आवडली म्हणूनच प्रतिक्रिया देतेय. मस्त फोटो. नक्की करून पाहणार. :)