वेळणेश्वर २०२०

Primary tabs

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
6 Oct 2020 - 12:49 am

गेल्या काही महिन्यांपासून घरात बसून खुपच कंटाळा आलेला होता. मुलीचेही ऑफिसचे काम घरूनच सुरु आहे. अशातच १ तारखेला माझ्या लग्न झालेल्या मोठ्या मुलीचा ठाण्याहून फोन आला. आम्हा दोघांना तीन दिवसांची सुट्टी आहे. कुठे फिरायला जायला मिळेल का. तुम्ही आणि आणखी कोणी येत असेल तर जाऊ सगळे मिळून. आमच्या शेजाऱ्यांना व मैत्रिणीला विचारले तर तेही लगेच तयार झाले. १० मोठे व एक छोटी मुलगी अशी अकरा जणांची टीम तयार झाली.

मुंबईच्या जवळची ठिकाणे शोधली तर खूप हॉटेलचे अव्वाच्या सव्वा दर मिळाले. जाण्याचे मन होईना. मग थोडे लांबच्या ठिकाणांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पूर्वी एकदा वेळणेश्वरला गेलो होतो. खूप आवडले होते. पर्यटन मंडळाच्या साईटवर जाऊन बघितले आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सलग तीन दिवसांची सुटी, संध्याकाळचे सहा वाजलेले आणि अजूनही दुसऱ्या दिवशीचे बुकिंग उपलबध होते. ए सी रूम चा दर रु.२०००/- अधिक जीएसटी दिसत होता. लगेच दोन मुक्कामासाठी ५ खोल्यांच्या बुकिंगचा फॉर्म भरला आणि आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. MTDC ने चक्क २०% "बल्क डिस्काउंट" म्हणून घसघशीत सूट दिली.

घरच्याच दोन गाड्या असल्याने प्रवासाची काळजी नव्हती. पटापट बॅगा भरायला घेतल्या. तरी सर्व आवरत आवरत रात्रीचे १२ वाजले. प्रवास लांबचा होता त्यामुळे सकाळी लवकरच निघायचे ठरले. मुलगी, तिच्या सासूबाई व नवरा सकाळी साडेचारलाच घरातून बाहेर पडले व सकाळी सहाच्या आधीच नवी मुंबईत दाखल झाले.
एका गाडीत सात व एका गाडीत चार माणसे व सगळ्याचे सामान भरून बरोबर सहाला प्रवास सुरु झाला. कर्नाळा, पेण , नागोठणे मागे टाकून एका पंपावर गाड्यांमध्ये इंधन भरले. थोडे फोटो काढले व पुढे निघालो. महाडच्या अलीकडे डोंगरात गांधारपाले लेणींचे दर्शन झाले. गाडीतून उतरून फोटो काढले व पुढे निघालो.

रस्त्याची अवस्था खूपच खराब तरीही साडे नऊला महाडपर्यंत पोहोचलो. येथे विसावा हॉटेलला आपल्या संस्थळाचा मान ठेवत 'मिसळपाव'चा नाश्ता केला. परत प्रवास सुरु झाला.

आमची एक गाडी पुढे निघून गेली होती त्यांनी दुसऱ्या एका ढाब्यावर नाश्टा केला. खूप छान जागा होती. बऱ्याच प्रकारची फुले, भाजीपाला होता आणि मागे हिरवेगार डोंगर असा रम्य परिसर.

गाडीतून उतरल्यावर आम्ही सामान काढायचेही विसरून गेलो इतके विलोभनीय दृष्य समोर दिसत होते. रिसॉर्टची जागा अतिशय मोक्याच्या जागी निवडली आहे. उंचावर असल्याने दूरपर्यंचा समुद्र व गर्द झाडी डोळ्यांना सुखावते.

कोव्हिडच्या दृष्टिकोनातून सर्वांचे तापमान मोजल्या गेले, हात निर्जंतुक केले मास्क वापरायच्या सूचना दिल्या व आमचे मास्क लावलेले फोटोही घेतले. रिसेप्शन काउंटरला आमची आल्याची नोंद झाली. सगळ्या खोल्या निर्जंतुक केल्या आहेत हेही सांगितले.
प्रत्येक खोली म्हणजे एक स्वतंत्र बंगलाच आहे. खूपच प्रशस्थ व नीटनेटकी खोली, व मोठी बाल्कनीही आहे. गेल्या ६-७ महिन्यानंतर येथे राहायला आलेलो आम्हीच पहिले. उपहारगृहवाले पण आमचीच वाट पाहत होते. खेडपासूनच जेवणाच्या ऑर्डर साठी त्यांचे फोन सुरु होते. आल्यावर बघू असे आम्ही त्यांना सांगितले होते. पोहचल्यावर त्यांना काय जेवण लागेल ते सांगितले. आमचाही धंदा बंदच आहे, आज जास्त रूम बुक झाल्यामुळे आम्हाला बोलावून घेण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

ताजेतवाने होऊन जेवायला आलो. कोंकणी पद्धतीनेच साधे पण चांगले जेवण मिळाले. चार वाजून गेले. आता समुद्र खुणावत होता. आराम करायला वेळ नव्हता. पटकन कपडे बदलले आणि पोहचलो बिचवर . जसे आज संपूर्ण रिसॉर्ट आमच्या मालकीचे होते तसेच सगळा समुद्र किनाराही आमचाच होता. दोन तास सगळे पाण्यात मनसोक्त डुंबलो.

आता मात्र काही जण समुद्र दर्शनासाठी आलेले दिसत होते. जेवण उशिरा झाले होते तरी किनाऱ्यालगतच छोटेसे हॉटेल होते तेथे कांदाभजी, चहा घेतला व रिसॉर्टला परत आलो. येतायेताच रात्रीच्या जेवणाची ऑर्डर दिली व रूमवर गेलो.
एकदिड तासाने सर्व जेवायला जमलो. जेवण आटोपून बाहेरच गप्पा मारत बसलो. पाऊस सुरु झाला म्हणून रूमवर जाऊन झोपेच्या अधीन झालो.
सकाळी लवकरच जाग आली. आमचे बाकी सहकारी अजून झोपेतच होते व लवकर उठणारही नव्हते. बाहेर येऊनआम्ही दोघे मात्र पक्षी आणि लाटांचा आवाज ऐकत बसलो. थोडं आजूबाजूला फिरूनही आलो.

पोहे,उपमा, ब्रेड ऑम्लेट असा ज्याला हवे तसा नाश्टा केला. वेळणेश्वरचे शिव मंदिर बंदच आहे. हेदवीचे दशभुजा मंदिर बघायचे ठरवले. रिसॉर्टमध्ये चौकशी केली असता मंदिर बंदच असावे असे मोघम उत्तर मिळाले.
तरीही इतक्या दूर आलो आहोत तेव्हा जाऊन तर येऊ असे म्हणून आम्ही निघालो. पायऱ्या चढून मंदिराजवळ आलो. मंदिर खरोखरच बंद होते पण हटकणारेही कोणीच नव्हते. गजांच्या बंद दरवाजातून गणेश दर्शन झाले जे इतरवेळी धक्काबुक्की करूनही सहज शक्य होत नाही. दीपमाळ व मंदिर खूप छान आहे आणि त्याहूनही सुंदर येथील परिसर आहे.

येथून १० किमीवरच जयगड किल्ला आहे तो पाहून येऊया असा विचार केला. आमच्या रिसॉर्टला फोन करून दुपारच्या जेवणासाठी येणार नाही म्हणून सांगितले. व पुढे निघालो. वाटेल एका पुलावरून खूप छान देखावा दिसत होता. खाडी, नारळांच्या बागा व दूरवर जिंदालचे चे विद्युत केंद्र दिसत होते.

थोडे पुढे गेल्यावर जयगडला जाण्यासाठी तवसाळ -जयगड असा फेरी बोटने प्रवास करायचा होता. १५-२० मिनिटातच बोट आली. आमच्या दोन्ही गाड्याही वर चढवल्या कारण उतरल्यानंतर परत १०-१५ मिनिट लांब जायचे होते. बहुतेकांना फेरी बोटीचा हा एक नवीनच अनुभव होता.

दोन बुरुजांच्या मध्ये जयगड किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. प्रवेश दारात सैनिकांना बसण्यासाठीच्या देवड्या आहेत. किल्ल्याला भक्कम तटबंदी असून तीन बाजूने समुद्र आहे. तटबंदीवरूनच आतील बाजूने किल्ल्यास फेरी मारता येते. आतमध्ये कोकणी घरासारखे दिसणारे गणेश मंदिर आहे. बाहेर दीपमाळ आहे. एक तीनमजली पडका वाडा आहे. याला छतही नाही. हा कान्होजी आंग्रेचा वाडा आहे असे सांगतात. तटबंदीच्या एका कोपऱ्यात निमुळती होत जाणारी रचना आहे ते दीपगृह होते असे सांगण्यात आले. मंदिराच्या बाजूलाच भलीमोठी चौकोनी विहीर आहे. पाणी किंवा धान्य साठवण्यासाठी हीचा उपयोग होत असावा.

किल्ला पाहून परत जेट्टीला येऊन रिसॉरसाठी निघालो. भूक चांगलीच लागली होती. हेदवीच्या आधी एक ढाबा लागला. जेवणाची ऑर्डर दिली. गिर्हाईक नसल्याने जेवण बनवून ठेवत नाहीत. ऑर्डर दिल्यावर बनवायला घेतले. वेळ लागणार होता. मी त्यांच्या परसबागेत शिरले. हॉटेलसाठी लागणारा भाजीपाला जसे काकडी, पडवळ , कारले इ. येथेच उगवल्या जाते. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडेही लावली आहेत. जमिनीलगत बुंध्याशी लागलेले नारळही येथे पाहायला मिळाले. मला भलीमोठी अळूची पाने दिसली. मला मिळतील का विचारल्यावर पटकन ८-१० कापून दिली. मी गवती चहा, त्याचे कंद व फुल झाडांची काही रोपेही घेतली. जेवण बनवायला वेळ घेतला पण MTDC पेक्षा खूप चांगले जेवण मिळाले.
जेवणाचे बिल येथे दाखवायची गरज नाही. पण आडबाजूला असलेल्या या छोट्याशा हॉटेलचे बिल मराठीत आणि तेही सुवाच्च अक्षरात बघून खूप चांगले वाटले.

रिसॉर्टला पोहचायला पाच वाजले. पटकन कपडे बदलले आणि बिचवर पळालो . आजही बराच वेळ पाण्यात घालवला. परत कालच्यासारखा चहा,नाश्ता घेतला आणि परत आलो. आज सगळे खूप थकलेले होते. पाऊसही सुरु झाला होता. जेवण केले. उद्या सकाळी लवकरच परतीचा प्रवास सुरु करायचा होता म्हणू रात्रीच जेवणाचे वगैरे सर्व बिल चुकते करून ठेवले.
सकाळी आठलाच बाहेर पडलो. यावेळी चिपळूण मार्गे प्रवास न करता गुहागर मार्गे समुद्राच्या काठाने प्रवास करायचे ठरवले. गुहागरला बस डेपोजवळ व्याडेश्वर मंदिर लागले तेही बंदच होते. बाजूच्याच हॉटेलमध्ये नाश्ता केला . येथील थालीपीठ सगळ्यांनाच आवडले.

दापोलीला जाण्यासाठी वाटेत दाभोळ-धोपावे फेरी बोटीने जावे लागणार होते. दाभोळ जेट्टीच्या आधीच अंजनवेल येथे गोपाळगड आणि दीपगृह असल्याचं समजले होते म्हणून तिकडे वळलो.
दाभोळ प्रकल्पाहुन पुढे अंजनवेल गावातून गोपाळगड जवळ आलो. रस्ता खूपच तीव्र चढावाचा होता. एका वळणावर तर गाडी आता मागे जाते कि काय इतकी भीती वाटली.
किल्ल्याजवळ कोणीच नव्हतं. कम्पाउंडचा दरवाजा ढकलून आत पाय टाकला तर डोक्यापेक्षाही उंच तण माजलेले. काहीच दिसले नाही. किल्याच्या तटबंदीला बाहेरून वळसा घालून समुद्राच्या बाजूकडे जाऊन आलो. कोपऱ्यावरचा बुरुज तेव्हडा सुस्थितीत दिसला.

पुढे दीपगृहाजवळ पोहचलो. कंपाउंडच्या दरवाज्यावरच पाटी होती "पर्यटकांसाठीची वेळ दुपारी ३ ते ५". अजून तर अकराच वाजले होते. दरवाजा ढकलून कार्यालयात पोहचलो. तेथील माणसानेही परवानगी नाही हेच सांगितले. तरीही साहेबाना विचारतो असे म्हटला. साहेब कार्यालयासमोरच असलेल्या घरात होते. त्यांनी कुठून आलात, किती लोक आहेत वगैरे चौकशी केली व त्याच्या अधिकारात वर जायची परवानगी दिली.
जिना व शिड्या चचढून आम्ही वर पोहचलो आणि काय सांगू सभोवतालचं दृश्य पाहून सगळे हरखून गेले. दिपगृहाच्या बाजूने असलेल्या छोट्याशा गॅलरीतून संपूर्ण गोलाकार फिरून भरपूर फोटो काढले.

दीपगृहाचा बाजूलाच टाळकेश्वर शिव मंदिर आहे. तेथे थोडे थांबून दापोली जाण्यासाठी जेट्टीला पोहचलो.

फेरीबोट येण्यासाठी थोडा अवधी होता. तेव्हड्या वेळात आजूबाजूला थोडंसं भटकून आले. लहान मुलं भोवरा खेळत होती. खूप छान वाटत होते त्यांचा खेळ बघून.

बोट आलीच थोड्या वेळात . गाड्या दाभोळ-धोपावे फेरीबोटीत घालून पलीकडे पोहचलो.
दापोलीला पोहचून जेवण केले व आतल्याच कुठल्यातरी मार्गे महाडला पोहोचलो . थोडासा महाड गावातून प्रवास झाला व थेट महाड शहराच्या बाहेर पडून गोवा-मुंबई हायवेला लागलो. तेथून मात्र सुसाट निघून रात्री आठला नवी मुंबई गाठली.

आज तेथून आणलेल्या अळूच्या पानांच्या वड्याही बनवून झाल्या.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

6 Oct 2020 - 3:16 am | टवाळ कार्टा

भारी जागा आहे

गोरगावलेकर's picture

6 Oct 2020 - 8:05 am | गोरगावलेकर

पहिल्या लेखाला पहिला प्रतिसाद

गवि's picture

6 Oct 2020 - 7:23 am | गवि

उत्कृष्ट...

सगळाच आवडता आणि ओळखीचा परिसर. शिवाय गेले काही महिने सुरु असलेल्या टाळेबंदी वातावरणात हा भटकंती धागा फारच ताजेतवाने करणारा वाटला. धन्यवाद..

जयगडावरचं हे मंदिर फार आवडतं. जनरली तिथे कोणी नसतं. शांत निवांत...

A

गोरगावलेकर's picture

6 Oct 2020 - 8:08 am | गोरगावलेकर

पूर्वी एका धाग्यावर कोंकण भटकंतीबद्दल आपण दिलेली सविस्तर माहिती वाचली होती. त्याचीही खूप मदत होते.

कंजूस's picture

6 Oct 2020 - 7:29 am | कंजूस

सुंदर.
----------
कोस्टल रोड इथूनच होणार तेव्हा खाडीफेरी बंद होतील बहुतेक.
--------------;
एमटीडीसीने डिस्काउंट देणे हेच आश्चर्य आहे. रुमचे भाडे वेगळे,जेवणाचे वेगळे असे इतर कोकणचे हॉटेल/रिजॉटवाले करतात का?

गोरगावलेकर's picture

6 Oct 2020 - 8:12 am | गोरगावलेकर

एमटीडीसीने डिस्काउंट देणे हेच आश्चर्य आहे. खरंय. पूर्वी एकदा यांच्या मित्राच्या नावाने पानशेतसाठी खोल्या बुक केल्या होत्या . सरकारी नोकर असल्याचे ओळखपत्र असल्याने १०% सूट मिळाली होती.

प्रचेतस's picture

6 Oct 2020 - 9:27 am | प्रचेतस

सहसा ऑफ सीजनला एमटीडीसी डिस्काउंट देतेच. अगदी महाबळेश्वरला देखील तो मिळतो.

गोरगावलेकर's picture

6 Oct 2020 - 9:53 am | गोरगावलेकर

आपण म्हणता ते बरोबरच असावे. तरीही विकांतला सलग तीन दिवसांची सुटी असताना डिस्काउंट मिळाला हे विशेष

गोरगावलेकर's picture

6 Oct 2020 - 5:49 pm | गोरगावलेकर

महाबळेश्वर आणि भीमाशंकर सोडून एमटीडीसी ची सर्व रिसॉर्ट सुरु झाली आहेत

प्रचेतस's picture

6 Oct 2020 - 9:26 am | प्रचेतस

वर्णन आणि छायाचित्रे खूपच सुरेख.
हा परिसर माझ्याही आवडीचा आहे. वेळणेश्वराचं मंदिर, तिथला स्वच्छ किनारा फारच आवडीचा.
बाकी तुम्ही भाग्यवान आहात, चक्क समुद्री गरुड दिसला. जयगडच्या किल्ल्यात अवशेष बरेच दिसताहेत.

गोरगावलेकर's picture

6 Oct 2020 - 9:54 am | गोरगावलेकर

हा समुद्री गरुड आहे हे माहित नव्हते . धन्यवाद माहितीबद्दल .

महासंग्राम's picture

6 Oct 2020 - 10:14 am | महासंग्राम

जयगड किल्ला म्हणजे शनिवारवाडा आहे तिथे एक मंदिर सोडल्यास फक्त बुरुज उरलेत आणि एकी इंग्रजकालीन पडक घर.
बुरुजावरून आजूबाजूचा समुद्र मस्त दिसतो.

गोरगावलेकर's picture

6 Oct 2020 - 1:24 pm | गोरगावलेकर

शनिवारवाडा खूप वर्षांपूर्वी पहिला आहे आता आठवतही नाही . बाकी जयगडचा परिसर खूपच छान आहे त्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीहून नुसतं फिरायलाही मजा येते

नित्य परिचित ठिकाणां जवळच्या काही अपरिचित स्थळांची ओळख करून देणारे हे प्रवास वर्णन आवडले 👍
फोटोही सुंदर आणि वर्णनही छान केले आहे तसेच इतर पर्यटकांची गर्दी नसल्याने तुमच्या ग्रुपला मनोसोक्त धमाल करता आली हे फार महत्वाचे!
जयगड किल्ला आणि टाळकेश्वर दीपगृह विशेष आवडले. दीपगृहाची स्पेसिफिकेशन्स दर्शवणाऱ्या बोर्डावरील माहिती रोचक आहे. फार लांबचा प्रवास नसल्याने ह्या दोन्ही ठिकाणांना (बाकीची आधी पहिली आहेत) लवकरच भेट देण्याचे ठरवून टाकले आहे.
धन्यवाद.

गोरगावलेकर's picture

6 Oct 2020 - 1:14 pm | गोरगावलेकर

दोन्ही ठिकाणे खप छान आहेत. जरूर जा

कंजूस's picture

6 Oct 2020 - 11:17 am | कंजूस

स्वत:चे वाहन नसल्याने मला काही जागा पटापट बघता येत नाहीत. एसटीवर अवलंबून राहावे लागते. महाराष्ट्रात काय ते डेपो, काय त्या बसेस!!! सगळा उत्साहच मावळतो. कोकण बाद केलाय केव्हाच.

कर्नाटकच आवडतो. प्रवासाचा त्रास नाही, जेवणाची/ राहाण्याची अडचण नाही. स्वस्त अन मस्त.

गोरगावलेकर's picture

6 Oct 2020 - 1:20 pm | गोरगावलेकर

आमच्याच गृप मध्ये दोन गाड्या आणि चार चालक असल्याने लांबचा प्रवास करून तीन दिवसात इतकी ठिकाणे पाहणे सहज शक्य झाले. बाकी कोकण एकदा बघायलाच हवे. आणि एकदा पाहिल्यावर परत परत पाहायची इच्छा होते.

चौकटराजा's picture

7 Oct 2020 - 9:04 am | चौकटराजा

एकूणात महाराष्ट्रा पेक्षा कर्नाटक सर्वार्थाने उत्तम पर्यटन प्रदेश आहे ! माथेरान ला रहाण्यापेक्षा पॅरिस मध्ये राहणे स्वस्त आहे ! हिंदुपूर ते लेपाक्षी हे अंतर १३ किमी आहे त्याला मला फक्त १० रु. द्यावे लागले . होस्पेट ते हंपी ११ किमी भाडे १३ रु.

कर्नाटक टुरिझम विभागाबद्दल अत्यंत सहमत. त्यांची सेवा, अगत्य आणि एकूण चोख व्यवस्था पाहून अगदी भारावले जायला होते. सरकारी खाते आहे असे वाटत नाही (म्हणजे कार्यालय लुक फील तसा असला तरी सोयी आणि वागणूक उत्तम)

चलत मुसाफिर's picture

6 Oct 2020 - 3:34 pm | चलत मुसाफिर

प्रवासवर्णन आवडले.

दापोलीवरून तुम्ही घेतलेला 'आतला कुठलातरी' रस्ता म्हणजे बहुधा मंडणगड, आंबेत मार्गे महाडकडे येतो तो असावा.

गोरगावलेकर's picture

6 Oct 2020 - 5:37 pm | गोरगावलेकर

मंडणगड रोडच असावा पण आंबेत मार्गे नाही आलो. मधेच उजवीकडे वळण घेतले

प्रसाद_१९८२'s picture

7 Oct 2020 - 9:30 am | प्रसाद_१९८२

थेट महाड बाझारपेठ मधे गेलात म्हणजे, हा खालचा रस्ता घेतला असावा दापोलीवरुन
-

गोरगावलेकर's picture

7 Oct 2020 - 1:02 pm | गोरगावलेकर

मला सांगता येत नव्हते पण आमच्या ह्यांच्या मदतीने मला नकाशा मिळाला तो देत आहे. रस्ता छोटा आहे पण जास्त वर्दळ नाही आणि खड्डेही नाहीत.

सौंदाळा's picture

6 Oct 2020 - 4:14 pm | सौंदाळा

मस्त फोटो आणि वर्णन
हेदवीला ब्राह्मणघळ पाहिली का?
जयगड वरुन थोड पुढे मालगुन्ड आहे, केशवसुतांचे जन्मस्थान

गोरगावलेकर's picture

6 Oct 2020 - 5:40 pm | गोरगावलेकर

वेळ कमी पडला. गणपतीपुळेला गेले होते तेव्हा मालगुन्डला जाऊन आले आहे २२-२३ वर्षांपूर्वी

प्रसाद_१९८२'s picture

7 Oct 2020 - 9:32 am | प्रसाद_१९८२

व भटकंती.

श्वेता२४'s picture

7 Oct 2020 - 11:15 am | श्वेता२४

तुम्ही केलेले वर्णन वाचुन आता जावेच म्हणते

गोरगावलेकर's picture

7 Oct 2020 - 1:07 pm | गोरगावलेकर

धन्यवाद चौकटराजा, प्रसाद_१९८२, सौंदाळा, श्वेता२४

मालविका's picture

8 Oct 2020 - 4:37 pm | मालविका

छान वर्णन!वेळणेश्वर आमचं गाव आहेच सुंदर . जयगड किल्ल्याजवळ कऱ्हाटेश्वर देऊळ आहे . अत्यंत शांत आणि रमणीय परिसर आहे . तिथे देखील लाईटहाऊस आहे . हेदवी ला बामणघळ देखील अप्रतिम आहे अनुभव आहे . वेळणेश्वर जवळचे इतर बीच देखील बघण्यासारखे आहेत .

गोरगावलेकर's picture

8 Oct 2020 - 9:12 pm | गोरगावलेकर

खरंच खूप छान आहे तुमचे गांव आणि परिसरही. परत कधी काळी जाणे झाले तर तुम्ही सांगितलेली ठिकाणे निश्चितच पाहीन.