समस्यांवर विज्ञानमान्य उपाय.

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
4 Oct 2020 - 11:42 am
गाभा: 

घाटपांडे सरांच्या फलज्योतिषविषयक धाग्यावर बराच काथ्याकूट झाला.फलज्योतिष हे थोतांड वगैरे नेहमीचेच मुद्दे आणि शाब्दिक गुद्देही काहीजणांना मिळाले.पण चर्चा ज्या लोकांसंबंधी आहे त्यांना केंद्रस्थानी ठेवून अशा विषयावर चर्चा व्हायला हवी.वैयक्तिक माझा फलज्योतिषावर थोडा विश्वास आहे.पण फलज्योतिषावर विश्वास आहे म्हणजे विज्ञानमान्य उपाय अमान्यच आहेत असे समजण्याचे कारण नाही.शेवटी काय तर समस्या सुटणे किंवा निदान तिचे स्वरुप सौम्य होणे किंवा दाहकता कमी होणे यासाठीच जातक फलज्योतिषाकडे जात असतो.फलज्योतिष हे थोतांड आहे हे छाती पिटून वारंवार सांगूनही लोक तिकडे जातच असतील तर दोष फलज्योतिषात नव्हे तर लोकांच्या समस्या सोडवण्यात विज्ञानमान्य मार्ग कमी पडत आहेत असाच त्याचा अर्थ होत नाही का? हे अन्य मार्ग कोणते? ते समस्यानिवारणात/सौम्य करण्यात का कमी पडत आहेत हे पाहिले पाहिजे.त्यासाठीच हा धाग्याचा खटाटोप.

आता आधी आपण पाहूया की फलज्योतिषाकडे नक्की कोण जातं? का जातं?

(इथे फलज्योतिषी म्हणजे जन्मवेळ+जन्मठिकाण+जन्मतारीख या तिन्हींचा उपयोग करुन पत्रिकेवरुन भाकित करणारे आणि त्यानुसार विशिष्ट पुजा,दान,होम असे भिती/किळस न वाटणारे/शारीरिक इजा न करणारे धार्मिक उपाय सुचवणारे फलज्योतिषी असा अर्थ आहे.

चेटूक/करणी काढणारे तांत्रिक बाबा सदर धाग्यात अपेक्षित नाहीत हे आधीच स्पष्ट करतो.)

तर बघूया की फलज्योतिषाकडे नक्की कोण जातं? का जातं?

१) आर्थिक स्थिती बेताची: राहत्या ठिकाणी ठिकठाक जीवनशैली जगून चार पैसे गाठीला बांधणे हे किमान जीवनसुद्धा जगणे अवघड जात असलेले लोक.यात झोपडपट्टीत राहणार्‍या व्यक्तीपासून राहत्या शहरात घर विकत घेणे परवडत नसल्याने भाड्याने राहणार्‍या लोकांपर्यंत सगळे आले.यांच्या आर्थिक समस्या या किमान गरजा भागवताना अोढाताण होणे या प्रकारातल्या असतात.

२) विवाहाला खूप विलंब होणे: यात कोणत्याही आर्थिक स्तरातील व्यक्ती असू शकते.यात स्त्री-पुरुष कोणीही असू शकतो. स्वत: अशी व्यक्ती किंवा तिचे पालक/नातलग.

३) आर्थिक परिस्थिती चांगली असणारे पण आता आहे त्याहून वरच्या आर्थिक स्तरात जाऊ इच्छिणारे.

४) नोकरी किंवा व्यवसायात मोठा आर्थिक फटका बसलेले.

५) दीर्घकाळ आजार/शारीरिक दुखणे असल्याने विलंबाला वैतागलेले लोक

६) व्यंग असणारी संतती असल्याने तिच्या पुढील आयुष्याबद्दल चिंता असणारे लोक.

७) जातकाच्या ऐपतीच्या तुलनेत महाग म्हणता येईल अशा वस्तूची खरेदी किंवा विक्री किंवा वाहन खरेदी.

८) हरवलेली/घर सोडून गेलेली व्यक्ती परत कधी येईल?

९) नोकरीच्या ठिकाणी बालंट येणे किंवा गैरव्यवहारात अडकणे/अडकवले जाणे.

१०) राहते घर लाभत नसल्याचा संशय असणारे.

११) एखादा कुटूंबीय जुगार/दारु यांचा टोकाचा व्यसनी बनल्याने आर्थिक स्थिती खालावलेले लोक.
------------------------------------------------
आता हे सगळे प्रकार किंवा समस्या वास्तवात सारांशाने कशा प्रकारचे आहेत ते पहा.(क्रमानुसार मांडलेले नाहीत)

१) चांगला बाजारभाव असणारे कोणतेही कौशल्य अंगी नसणे.
२) शिक्षणात बोर्‍या वाजणे+स्ट्रीट स्मार्टनेस नसणे.
३) मुळातच संयम नसणे.मला हवे तसेच सगळे घडले पाहिजे , मी नेहमी फायद्यातच असलो पाहिजे ही अवास्तव अपेक्षा करणे.
४) प्रयत्न चुकीच्या दिशेने करणे.
५) अवास्तव अपेक्षा करणे.
६) आहे ती परिस्थिती चांगली असूनही त्यात समाधानी नसणारे.काहीना काही खुपणारे.
७) सामाजिक गैरसमज किंवा समाजाची भिती.
८) संशयी किंवा उगाचच अतिरेकी चिंता करणारे.
९) आपली आर्थिक/बौद्धिक कुवत न पाहता जोखीम स्विकारणे.
१०) मनुष्यस्वभाव अोळखण्यात कमी पडणे.
-------------------------------------------------
वरील कारणे पाहता समस्या निर्माण होण्यात सर्वाधिक वाटा हा मन प्रसन्न नसणे , अवास्तव अपेक्षा , तुलना करणे , संयमाचा अभाव या मानसिक गोष्टींशी असे दिसून येईल.

त्यानंतर इंटेलेक्चुअल लेवल बेताची असण्याचा आहे.

आणि तिसरे म्हणजे समाजाचे गैरसमज.
-----------------------------------------------
आता उपाय पाहू.

१) मन प्रसन्न नसणे यावर विज्ञानमान्य उपाय दोन आहेत.

अ) मनातला कोलाहल दूर करणारे अल्पमोली उपाय म्हणजे अवास्तव अपेक्षा म्हणजे काय? ते अवास्तव का आहेत? त्यापासून नुकसान कसे होते? अवास्तव विचारांपासून दूर कसे रहावे हे सांगणारी पुस्तके/व्हिडिओ/अॉडीयो/मोफतचे किंवा अल्पमोली सेमिनार/वेबिनार इ.
ब) समस्या जटील असेल तर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेणे.
पण यात अजून काही समस्या आहेत.

A) मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेणे हे काही ठिकाणी खर्चिक असू शकते.तितके पैसे समस्याग्रस्त व्यक्तीकडे नसूही शकतात.सर्वांना परवडणार्‍या दरात ही सेवा उपलब्ध व्हायला हवी.
B) मानसोपचारतज्ज्ञांच्या सेवा सर्वदूर उपलब्ध नाहीत.खेड्यात अभावच आहे.
C) मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणे म्हणजे वेड लागलेले असणे हा समाजातील काहीजणांचा गैरसमज असणे.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजप्रबोधन गरजेचे आहे.पण हे अल्पकाळात होणारे नाही.

२) बेताची असणारी इंटेलेक्चुअल लेवल/आकलनक्षमता वाढवता येणे शक्य होते का? आलीच तर कितपत? ज्यांची इंटेलेक्चुअल लेवल मुळातच चांगली आहे त्यांच्याशी स्पर्धा अटळ आहे.भारतासारख्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त असणार्‍या देशात असेच लोक निवडले जाण्याची शक्यता अधिक नाही का? स्वस्तात अरबी घोडा मिळत असतील तर कोणी गाढव किंवा खेचर का निवडेल? गाढव/खेचराचे परिवर्तन दमदार, शर्यतीच्या अरबी घोड्यात करायचेच झाल्यास ते कितपत शक्य व्हावे?

३) सामाजिक प्रबोधन हा जनसमुदायावर केला जाणारा आणि दीर्घकालाने किंवा दीर्घप्रयत्नानेच फलद्रुप होणारा उपाय आहे.
-------------------------------------------------

आपल्याला काय वाटतं? समस्या निवारण , अवास्तव अपेक्षा, संयमाचा अभाव , बौद्धिक पातळी कमी असणे यावर अजून काय काय विज्ञानमान्य उपाय करता येतील? ते कितपत शक्य किंवा अवघड वाटताहेत? ते कुठे कमी पडत आहेत? यात दोष कोणाचे? चर्चा व्हावी.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

4 Oct 2020 - 12:11 pm | मराठी_माणूस

वरच्या यादीत अजुन एक , सत्तेचे लालसा असलेले काही राजकारणी.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Oct 2020 - 2:05 pm | प्रकाश घाटपांडे

आपल्या हातात नसणार्‍या अशा पराधीन गोष्टींचा जेव्हा आपल्यावर परिणाम होतो तेव्हा माणूस एक्स फॅक्टर या विषयी विचार करतो. या एक्स फॅक्टर मुळेही लोक ज्योतिषाकडे जातात. त्याच एक्स फॅक्टर साठी लोक भावनिक व बौद्धिक व्यवस्थापनाकडे जातील तर त्यांचा प्रश्न काही अंशी सुटतो . पण मानवी मन गूढतेवर विश्वास ठेवण्यास अनुकूल असते.
उपायातील मुद्दा क्र३ मधे लोक प्रथम तात्कालीन वा वेदनाशमनाकडे जाणे स्वाभाविक आहे. त्यामुळे दीर्घकालीन टप्प्याचा माणुस नंतर विचार करतो.

शा वि कु's picture

4 Oct 2020 - 3:26 pm | शा वि कु

फलज्योतिषावर विश्वास आहे म्हणजे विज्ञानमान्य उपाय अमान्यच आहेत असे समजण्याचे कारण नाही.शेवटी काय तर समस्या सुटणे किंवा निदान तिचे स्वरुप सौम्य होणे किंवा दाहकता कमी होणे यासाठीच जातक फलज्योतिषाकडे जात असतो.फलज्योतिष हे थोतांड आहे हे छाती पिटून वारंवार सांगूनही लोक तिकडे जातच असतील तर दोष फलज्योतिषात नव्हे तर लोकांच्या समस्या सोडवण्यात विज्ञानमान्य मार्ग कमी पडत आहेत असाच त्याचा अर्थ होत नाही का?

विज्ञानमार्ग कमी पडणारच. विज्ञानमार्गावर बहुदा सिद्ध असिद्ध करण्याच्या जबाबदाऱ्या असतात. अकौंटेबिलिटी असते. असे ज्योतिषशास्त्रात पाहायला मिळत नाही.

तुम्ही जो तांत्रिक बाबा/चेटूक वाले आणि "खरेखुरे धार्मिक सल्ला देणारे" असा फरक करताय, तो मला फसवा वाटतो.
समजा एक व्यक्ती 'अबक' हा 'क्ष' शास्त्रावर आधारित सर्वमान्य ग्रंथाला ग्राह्य धरूनच सल्ला देतो. तो क्ष ग्रंथाबाहेरचे काही सांगत नाही, त्याबाबतीत तो विश्वासार्ह्य आहे.
तर उलटा 'यरल' व्यक्ती कोणताही ग्रंथफींत बघत नाही. तो नक्की काय बघतो कुणाला माहित नाही आणि त्याने नक्की काय बघितले यात कोणाला रस सुद्धा नाही.

जर अबक आणि यरल दोघेही आपण दिलेल्या सल्ल्यांसाठी कोणत्याही प्रकारची अकौंटेबिलिटी घेणारच नाहीयेत तर जातकाने तरी तरी का फरक करावा या दोघांमध्ये ? मग अबकला डावलून यरलकडे जाण्यात तरी काय वाईट? (हा. जर अबक दाखवू शकतो की त्याचा सक्सेस रेट जास्त आहे तर ठीकच. पण बहुदा हे सक्सेस रेट दाखवणे हे काही तटस्थपणे झाले नसते.)

तुम्ही चेटूक आणि करणी वाल्याना का बाद केलंय नाही समजलं. त्यांच्या कडून पण समस्या दूर होईल असा (खोटा) विश्वास मिळतोच की.

उपयोजक's picture

4 Oct 2020 - 3:48 pm | उपयोजक

तुम्ही चेटूक आणि करणी वाल्याना का बाद केलंय नाही समजलं. त्यांच्या कडून पण समस्या दूर होईल असा (खोटा) विश्वास मिळतोच की.

घाटपांडे सरांचा धागा फलज्योतिषविषयक होता.त्या धाग्यात जो मुद्दा मिसला तो या धाग्यात घेतला आहे.हा एक मुद्दा.शिवाय अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यानुसार जादुटोणा वगैरे अघोरी प्रकारांना बंदी आहे.चेटूक ,करणी यावरचे उपाय म्हणून अघोरी प्रकार केले जाऊ शकतात. अशा लोकांकडे जाणारे बहुतांश(सगळेच नव्हे) लोक हे अडाणी किंवा अल्पशिक्षित असतात. फलज्योतिषाला कायद्याने मनाई नाहीये.

एकदा तो संपला की प्रष्ण स्वच्छ दिसतो आणि तर्कशुद्ध उपाय योजना करता येते. इथे विज्ञानाचा संबंध नसून मानसशास्त्राचा आहे.

तुमचे सर्व ११ प्रष्ण केवळ वैचारिक क्लॅरिटीनं सुटतील. कळायला लागल्यापासून मी कोणत्याही देवाला कधीही हात जोडले नाहीत किंवा कुणा ज्योतिषाला कधी हात दाखवला नाही, कारण .....

१. काल्पनिक गोष्टीपुढे हात जोडून उपयोग नाही
२. व्रत-वैकल्य, यज्ञ-याग हे सगळे त्याचेच उप-प्रकार (अमक्या देवाला प्रसन्न करायला तमक्या एजंटला मधे घालणं हा वेडगळपणा आहे) आणि
३. कोणत्याही ज्योतिषापेक्षा आपला आयक्यू नक्कीच चांगला आहे

इतकं लक्षात आलं की झालं.

कंजूस's picture

4 Oct 2020 - 4:16 pm | कंजूस

मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेणे हे काही ठिकाणी खर्चिक असू शकते.

मुळात मानसोपचारतज्ज्ञांनाही धंधा करणे खर्चिक असू शकते. कारण इतर जेधरल प्रक्टिशनर दवाखाना उघडून बसतात आणि पेशंट्सची गर्दी असते तसे ते करू शकतील का? कुठल्या दुसऱ्या डॉक्टरच्या नर्सींग होमात आठवड्यात तीन दिवस भाड्याने रुम घ्यावी लागते चार तास. भाडे भरायचे, कोणी पेशंट 'रिफर' केला तर त्याचे कमिशन द्यायचे. कसं परवडणार?

चौकटराजा's picture

4 Oct 2020 - 7:50 pm | चौकटराजा

सत्य शोधायचे तर बर्याच वेळा प्रस्थापित प्रमेय धुत्कारावे लागते . वैज्ञानिक ता म्हणजे काय ते त्यावेळी कळते. माझ्या आईने मला लहानपणीच ही बंडखोरी कशी असते याचे दर्शन घडवून दिले त्यामुळे मी सहसा एकदम कोणावर पूर्ण विश्वास ठेवत नाही पण विश्वासाखेरीज जीवन पुढे सरकत नाही हे सत्य देखील विसरत नाही.

आपल्या भोवती घडणारी प्रत्येक घटना ही अत्यन्त गुन्तागुन्तीच्या प्रेरणांचा एक परिणाम असतो .त्यामुळे मी पैसे दिले की सिनेमाचे तिकिट मिळेलच इतके आयुष्य सोपे नाही की त्याचे शास्त्र बनवावे. खेळ हाउस्फुल्ल झाला ही शक्यता आपल्या लिनियर लॉजिक मधे धरलेली नसते.

अनेक माणसांच्या चरित्रांचा अभ्यास केल्यावर असेल कळले की त्यांनी घटना घडण्यासाठी प्रयत्नही केले व त्यांच्या हातात नसलेले अनेक घटक त्यांच्या मदतीला धावून आले. लेडी लोक फेव्हर द ब्रेव्ह असे काही झाले त्यांच्या आयुष्यात .आपल्या हातात नसलेल्या घटकांचा समुच्यय परिमाण म्हणजे नशीब असे मी मानतो .

आपला हात वा पत्रिका जे माणसे दाखवतात ते एक हताश तरी असतात वा लालची व महत्वाकांक्षी .त्यांना साधकबाधक चिंतनाचे वावडे असते. निरनिराळे प्रयोग करून पुन्हा पुन्हा प्रमेय बरोबर आहे वा फक्त काहीसेच बरोबर आले हे पाहायची मानसिक पात्रता वा तयारी नसणे हे एक व्यवच्छेदक लक्षण अशांचे असतेच ! यात वकील मंडळी आली तर समजू शकतो पण विज्ञानाचे विद्यार्थी देखील असतात हे विशेष .असे असायचे कारण म्हणजे समूहात जशी आपली वर्तणूक काही सिद्ध करायची जबाबदारी टाकणारी व स्वीकारणारी आपल्याला ठेवावी लागते तशी ती ना ठेवण्याचे स्वात्रंत्र्य आपल्याला असते वा लहानपनापासून कोवळ्या वयात झालेल्या संस्कारामुळे आपण आउट ऑफ द बॉक्स असा विचार करायला धजतच नाही !

पत्रिका पाहाण्या चा हट्ट धरल्याने उत्तम स्थळे धुडकावून सामान्य वकूबाच्या जीवनसाथीदाराबरोबर संसार करण्याचा व मग पस्तावण्याचा प्रकार होऊन शकतो .आपण हे विसरतो की जगाची लोकसंख्या किती व किती जण ती ना पहाता अनुरूपता पहातात व सुखी होतात .

उपयोजक's picture

4 Oct 2020 - 9:48 pm | उपयोजक

भारतातल्या बहुतांश पालकांच्या अपेक्षा असतात की आपल्या मुलाचे साधारण वयाच्या २७ पर्यंत लग्न आणि तिशीपर्यंत एखादं अपत्य व्हावं. या अपेक्षेत गैर काही नाहीये.पण समजा एखाद्यानं जिद्दीनं काही व्यवसाय करायचा ठरवला आणि यात अडथळे येत चाळीशी किंवा अगदी बेचाळीस/त्रेचाळीस वय झालं आणि मग तो स्थिर झाला आणि मग त्याला वाटलं की आता आपण लग्न करायला हरकत नाही. तर अशा मध्यमवयात विवाह केल्याने जास्तीतजास्त काय नुकसान होऊ शकते? किंवा कोणत्या अडचणींना सामोरे जायला लागू शकते? आर्थिक ,सामाजिक अडचणी किंवा अपत्यप्राप्ती इत्यादी?

हे यासाठी विचारतो आहे की या एकाच गोष्टीमुळे बर्‍याच समस्या निर्माण होत आहेत.म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे २७ पर्यंत नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता आणि तिशीपर्यंत एखादं अपत्य हे झाडून सर्वांच्या बाबत होणे शक्य नाही.ज्यांना हे साध्य करणं अवघड जातं तेच लोक फलज्योतिषाकडे जातात.जितका हा संघर्ष जास्त तितकी चिंता जास्त आणि साहजिकच फलज्योतिषाकडच्या फेर्‍याही जास्त.

लग्नाचे वाढलेले वय यात अति वाटावा असा धोका खरंच नसेल तर हे लग्नाचे वाढते वय सर्वांनीच मनापासून स्विकारले तर फलज्योतिषाकडे जाणे कमी होऊ शकेल.पण विज्ञान याबाबत अनुकूल नाही.विज्ञान म्हणतं संतती होण्याची शक्यता ही तरुण वयातच सर्वाधिक असते.जितका विलंब तितका शरीराला त्रास जास्त.विशेषत: जन्म देणार्‍या स्त्रीला. शिवाय त्यामुळे होणारा मानसिक आणि सामाजिक त्रासही सोबत आलाच.
मग अशा स्थितीत घरच्यांना 'थांबा अजून.मला स्थिर होऊ द्या.' हे कोणत्या तोंडाने सांगणार? पालकांचे म्हणणे चूक कसे? ते घाई करत असतील तर ती चूक कशी? दुसरीकडे अस्थिर आर्थिक परिस्थिती असणार्‍या मुलाला फक्त वय लहान आहे या बेसवर कोणता बाप आपली मुलगी देईल?

एकंदरीत साधारण तिशीपर्यंत लग्न आणि अपत्य होणे योग्य आहे हे स्वत: विज्ञानच सांगत नाहीये का

मग हे सगळं तिशीच्या आत साध्य करण्यासाठी भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या अस्थिर देशात अनेक उपायांसोबतच फलज्योतिषाकडे जाणे सहज शक्य आहे. ते कसे थांबवणार? यावर उपाय काय?

संजय क्षीरसागर's picture

4 Oct 2020 - 10:41 pm | संजय क्षीरसागर

तिशीच्या आत (किंवा केंव्हाही) लग्न करायला ज्योतिषी लागत नाही, स्वतःची समज आणि प्रयत्न लागतात. ज्योतिषी आणि राजकारणी सारखेच असतात ते फक्त "अच्छे दिन आनेवाले है" हे एकच गाजर दाखवून लोकांना भुलवतात.

उपयोजक's picture

4 Oct 2020 - 11:56 pm | उपयोजक

तिशीच्या आत (किंवा केंव्हाही) लग्न करायला ज्योतिषी लागत नाही, स्वतःची समज आणि प्रयत्न लागतात

भन्नाट! विवाहास विलंब ही मी सामाजिक/समाजावर अवलंबून असलेली समस्या समजत होतो.कारण विवाहातला जोडीदार हा तुम्हाला समाजातूनच मिळणार असतो.तो शून्य अपेक्षा असणारा असणार नाही.त्याच्याही काही अपेक्षा,हट्ट असणार आहेत असेच मी समजत होतो.पण आता 'तुम्ही' म्हणता म्हणजे तसं नसणारंच.
भारतातल्या झाडून सगळ्या वधूवरसूचक मंडळांना तुमचा हा सल्ला पाठवावा असे सुचवतो.ते लोक अॉलरेडी प्रयत्न करुन करुन दमलेत.आता आशा तुमच्यावरच!

करतो का ? आपल्या अनुरुप जोडीदार कोण शोधतं ?

अमक्या साली तुमच्या पत्रिकेत विवाहयोग आहे या गाजरा पलिकडे ज्योतिषी काय देतो ?

आनमान धक्यानं त्यानी सांगितलेल्या वर्षी स्थळ आलं तरी शेवटी निवड कोण करतं ?

तुम्ही एक काय ते नक्की ठरवा म्हणजे विषय संपेल : तुमचा भरवसा स्वतःवर आहे की ज्योतिषावर ? व्यक्तीशः तुम्ही लग्न कसं जमवलं ? स्वतःच्या प्रयत्नांनी का ज्योतिषावर भरोसा ठेवून आलं ते स्थळ स्वीकारलं ?

उपयोजक's picture

5 Oct 2020 - 1:16 am | उपयोजक

मागच्या धाग्यात जे लिहिलंत तेच इथे परत लिहिताय. 'फलज्योतिष थोतांड आहे आणि ज्योतिषी लुबाडतात' या दोन मुद्द्यांशिवाय ; जे मागच्या धाग्यात आले आहेत आणि फलज्योतिष विषयावरच्या प्रत्येक धाग्यात तुम्ही लिहिले आहेत ते वगळून काही लिहू शकता का?
मुद्दा फलज्योतिषी कसे गंडवतात याचे रसभरीत वर्णन करणे हा नाहीये.जातक ज्या पेचात अडकून तिकडे जातो तो कसा सोडवायचा हा आहे.केवळ त्याबद्दलच बोललेले बरे.ज्योतिषी फसवतात वगैरे मुद्दा चावून चोथा झाला आहे.फलज्योतिषी फसवतात हे वारंवार लिहिण्याने नवीन काय गवसणार आहे का?

सगळ्या समस्यांचं मूळ वैचारिक गोंधळ हे आहे

तुमच्या सगळ्या मुद्यांचं निराकरण एकाच प्रतिसादात केलं आहे. पुन्हा पुन्हा तोच मुद्दा हे तुम्ही कुठून काढलं ?

डॅनी ओशन's picture

5 Oct 2020 - 10:24 am | डॅनी ओशन

उपयोजक, तुम्ही अजून जाप नाही केला ? तरीच तुम्हाला इतके प्रश्न सतावत आहेत. जाप करा आणि गोंधळ मिटवा.

उपयोजक's picture

5 Oct 2020 - 10:30 am | उपयोजक

लग्गेच बसतो जपाला!! ;)

साहना's picture

6 Oct 2020 - 12:51 am | साहना

> र अशा मध्यमवयात विवाह केल्याने जास्तीतजास्त काय नुकसान होऊ शकते? किंवा कोणत्या अडचणींना सामोरे जायला लागू शकते? आर्थिक ,सामाजिक अडचणी किंवा अपत्यप्राप्ती इत्यादी?

पुरुषांना काही विशेष फरक पडत नाही. स्त्रियांनी ३५ आधी अपत्य प्राप्ती तरी करून घ्यावी नाही तर आपले बीज फ्रीझ तरी करून घ्यावे. नाहीतर डाउन सिन्ड्रोम ची मुले होण्याची शक्यता वाढते.

भारतांत ४० वर्षीय पुरुषाला २५ वर्षीय नववधू मिळणे थोडे कठीण होत जाते.

ह्याव्यतिरिक्त मुले निर्माण करणे ह्यांत काहीही थोर काम नाही. Anti Natalist ह्या विषयावर वाचावे.

उपयोजक's picture

6 Oct 2020 - 3:01 pm | उपयोजक

धन्यवाद!

म्हणजे भारतीय परंपरेनुसार जितकी घाई होते ती पुरुषांसाठी साधारण अडतीस-चाळीसपर्यंत टाळणे शक्य होऊ शकते तर. प्रबोधन व्हायला हवे.

व्यक्ती जेव्हा हतबल होतो
1)स्किल आहे हुशार आहे पण संधी मिळत नाही.किंवा संधी मिळते पण त्या व्यक्ती ला डावल्याने माणूस हतबल होतो
2) सर्व व्यवस्थित चालले ल असते पण एकामागून एक संकटाची मालिका सुरू होते.
अपघात होणे ,आजारी पडणे,गृह कलह,फसवणूक अशा प्रकारची संकट तेव्हा ती व्यक्ती हतबल होते
3). काही प्रबळ लोक जेव्हा एकाध्य व्यक्ती ला त्रास देतात सरकारी यंत्रणा पण त्याची मदत करू इच्छित नाही तेव्हा ती व्यक्ती हतबल होते.
हतबल झालेल्या व्यक्ती ला कोणताच आधार मिळत नाही किंवा ह्या जगातील कोणतीच व्यक्ती त्याची मदत करेल असे वाटत नाही तेव्हा तो गूढ आणि सर्व श्रेष्ठ अशा शक्ती वर विश्वास ठेवतो.
ती कल्पनिक गूढ शक्ती त्याला संकटं मधून सोडवेल किंवा ज्या व्यक्ती त्रास देतात त्यांना शिक्षा करेल अशा शक्ती वर विश्वास ठेवतात.
आणि त्याच शक्ती वर न्याय देण्याची जबाबदारी टाकतात.
मनाच्या अशा अवस्थेत त्या व्यक्ती ला गूढ शक्ती ची कल्पना त्याला हवी हवी शी वाटते तेव्हाच व्यक्ती त्यांच्या आहारी जातो.
असे प्रसंग अनेक व्यक्ती च्या आयुष्यात येतात की सर्व मार्ग बंद झालेले असतात.

व्यक्ती जेव्हा हतबल होतो
1)स्किल आहे हुशार आहे पण संधी मिळत नाही.किंवा संधी मिळते पण त्या व्यक्ती ला डावल्याने माणूस हतबल होतो
2) सर्व व्यवस्थित चालले ल असते पण एकामागून एक संकटाची मालिका सुरू होते.
अपघात होणे ,आजारी पडणे,गृह कलह,फसवणूक अशा प्रकारची संकट तेव्हा ती व्यक्ती हतबल होते
3). काही प्रबळ लोक जेव्हा एकाध्य व्यक्ती ला त्रास देतात सरकारी यंत्रणा पण त्याची मदत करू इच्छित नाही तेव्हा ती व्यक्ती हतबल होते.
हतबल झालेल्या व्यक्ती ला कोणताच आधार मिळत नाही किंवा ह्या जगातील कोणतीच व्यक्ती त्याची मदत करेल असे वाटत नाही तेव्हा तो गूढ आणि सर्व श्रेष्ठ अशा शक्ती वर विश्वास ठेवतो.
ती कल्पनिक गूढ शक्ती त्याला संकटं मधून सोडवेल किंवा ज्या व्यक्ती त्रास देतात त्यांना शिक्षा करेल अशा शक्ती वर विश्वास ठेवतात.
आणि त्याच शक्ती वर न्याय देण्याची जबाबदारी टाकतात.
मनाच्या अशा अवस्थेत त्या व्यक्ती ला गूढ शक्ती ची कल्पना त्याला हवी हवी शी वाटते तेव्हाच व्यक्ती त्यांच्या आहारी जातो.
असे प्रसंग अनेक व्यक्ती च्या आयुष्यात येतात की सर्व मार्ग बंद झालेले असतात.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Oct 2020 - 10:20 am | प्रकाश घाटपांडे

मनाच्या अशा अवस्थेत रॅशनल विचार सुचत नाहीत. आदरवाईज रॅशनल व्यक्ती सुद्धा हताश होतात.

चौकटराजा's picture

5 Oct 2020 - 10:01 pm | चौकटराजा

आपली ताकद मानसिक , शारिरीक बौद्धिक यांचा समुच्च्यय परिणाम म्हणजे आपले कर्म जे आपल्या हातात असते. पण याच क्षमता जगात आपण सोडून इतर यच्चयावत प्राणीमात्रात देखील असतात त्यांच्या सर्वान्च्या या क्षमता त्यानी कशा वापरावयाच्या हे तुम्ही ठरवू शकत नाही त्याला म्हणायचे दैव ! व जगातील कोणतीही घटना, प्रमोशन, विवाह, अपघात , फसवणूक , प्रगति या एकाच माणसाच्या कर्माप्रमाणे काही घडत नाहीत. त्याला आपलाही काही भार लागतो काही इतरांचाही. जसे क्रिकेट मधे सिक्स मारताना फक्त गोलन्दाज व फलन्दाज यान्चीच वर्तणूक निर्णायक ठरेल पण धावा काढताता फलन्दाज, अकरा फिल्डर व गोलन्दाज यान्चा त्यात एकत्रित सहभाग असेल. आपल्या आयुष्यात आपण 'एकला चलो रे " हे धोरण जितके अधिक राबवू तितका दैवाचा भाग त्यातून कमी होत जातो. ( सिक्सर मारणे सारखे ). अर्थात प्रत्यक्श आयुष्य जगताना " अवलम्बून" रहाणे हे अपरिहार्य असते. सबब दैवातून कुणाची सुटका नाही. तरीही " जो दुसर्यावरी विसम्बला त्याचा कार्य भाग बुडाला" हे वादातीत आहे ! काही वेळा माणूस " रन आउट " होतो त्यामुळेच !

उपयोजक's picture

6 Oct 2020 - 3:06 pm | उपयोजक

मस्त! मार्मिक प्रतिसाद. _/\_

निस्सीम तालेब हे गणित तद्न्य आहेत आणि त्यांनी ह्या विषयावर काही लेखन केले आहे आणि मी सुद्धा त्यांच्या मताशी थोडेफार सहमत आहे ! जिज्ञासू ह्यांनी त्यांचे इंग्रजी भाषेंतील लिखाण पाहावे.

कुठलीही गोष्ट जर हजारो वर्षांपासून लोक करत आले आहेत तर उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार कदाचित ती गोष्ट मानवी हितासाठी गरजेची आहे, हि गरज अनेक वेळा "higher order" असेल त्यामुळे आम्हाला ती गरज स्पष्ट दिसत नाही.

मनाला जेंव्हा प्रचंड त्राण किंवा भविष्याची चिंता होऊन उद्वेग होतो तेंव्हा कुणी तरी खांद्यावर हात ठेवून "लढ" म्हणण्याची आवश्यकता असते. इथे विज्ञान काहीही नसले तरी अनेक वेळा कुणालातरी आपल्या समस्या सांगून मन मोकळे केले कि मनावरचा ताण कमी होतो. निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि एकूणच माणूस जास्त कार्यक्षम बनतो. इथे सुद्धा अति तेथे माती ह्या न्यायाने प्रत्येक गोष्ट ज्योतिष प्रमाणे करायला गेल्यास हाती कटोरा येण्याचीच श्यक्यता जास्त आहे.

उपयोजक's picture

6 Oct 2020 - 3:09 pm | उपयोजक

आता निस्सीम तालेब यांची पुस्तके शोधणे आले.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Oct 2020 - 6:48 pm | प्रकाश घाटपांडे

अनेक सूज्ञ ज्योतिषी जातकाला फार ज्योतिषावर अवलंबून राहू नका असेच सांगतात. बाकी सफल ज्योतिषात मानसशास्त्र आहेच

गामा पैलवान's picture

6 Oct 2020 - 1:51 am | गामा पैलवान

उपयोजक,

माझा सवाल थोडा वेगळा आहे. विज्ञानमान्य म्हणजे नेमकं काय?

विज्ञान कशासही मान्यता देत नसतं. मान्यता देतो तो माणूस. माझ्या मते मान्यता देणे वा न देणे ही मानवी क्रिया असून तिचा विज्ञानाशी कसलाही संबंध नाही.

आ.न.,
-गा.पै.

सोत्रि's picture

6 Oct 2020 - 5:52 am | सोत्रि

सहमत!

भौतिक जगतातील कार्यकारण संबंध उलगडून दाखवणे आणि गणिती सुत्रांनी त्यांची सिद्धता करणे इतकेच विज्ञानाचे काम.

- (अधिभौतिकाच्या पलीकडले काहीतरी शोधणारा) सोकाजी

गवि's picture

6 Oct 2020 - 6:11 am | गवि

+१०१

प्रकाश घाटपांडे's picture

6 Oct 2020 - 10:28 am | प्रकाश घाटपांडे

अशी पाटी असलेले गुत्ते असतात की! ज्ञात विज्ञानाला मान्य नसलेल्या गोष्टी आजूबाजूला असतात हे विज्ञानाला मान्य आहे. :)

उपयोजक's picture

6 Oct 2020 - 3:14 pm | उपयोजक

विज्ञानमान्य म्हणजे विज्ञानाचे निकष लावून मान्य केलेले. या अर्थाने. बर्‍याचशा शहाण्या सुबुद्ध माणसांनी या निकषांना मान्यता दिली आहे.

गामा पैलवान's picture

6 Oct 2020 - 6:16 pm | गामा पैलवान

उपयोजक,

विज्ञानाचे नेमके निकष काय असावेत यावर मतमतांतरे आहेत. मर्यादानिश्चिती हे आधुनिक विज्ञानातील एक विवादास्पद कूट आहे. मर्यादानिश्चिती विषयी इथे माहिती सापडेल : https://en.wikipedia.org/wiki/Demarcation_problem

हा मुद्दा पूर्वी एके ठिकाणी चर्चेस आला होता. तेव्हा aschig यांना असंच उत्तर दिलेलं होतं. त्याचा दुवा : https://www.maayboli.com/node/34587?page=3#comment-2078389

जमल्यास पूर्ण चर्चा वाचून पहा म्हणून सुचवेन. किमान aschig यांचे युक्तिवाद तरी पहाच. ते एक शास्त्रज्ञ आहेत (संदर्भ : https://www.maayboli.com/node/50017).

आ.न.,
-गा.पै.

उपयोजक's picture

6 Oct 2020 - 6:39 pm | उपयोजक

एखाद्या गोष्टीबाबत
१.अचूक मोजता येणे
२.वारंवार मोजता येणे
३.वैश्विक असणे
या तीनही अटी पूर्ण झाल्या की ती १००% वैज्ञानिक आहे असे सिद्ध होते.

गामा पैलवान's picture

7 Oct 2020 - 2:37 am | गामा पैलवान

उपयोजक,

या स्थूल अटी आहेत. आज सूक्ष्म जगताकडून या अटी पाळल्या जात नाहीत. उदाहरण देतो.

१. अचूक मोजता येणे : तुम्ही इलेक्ट्रॉन चं नाव ऐकलं असेल. याचं वस्तुमान मोजता येतं. ते स्थिर वस्तुमान म्हणून निर्देशित केलं जातं. पण व्यवहारात इलेक्ट्रॉन स्थिर कधीच नसतो. मग 'इलेक्ट्रॉनचं वस्तुमान मोजणे' ही कविकल्पनाच नव्हे काय?

२. वारंवार मोजता येणे : एखादा बॉम्ब फुटला तर अगदी जसाच्या तसा स्फोट परत कधीच होणार नसतो. प्रत्येक स्फोट वेगळा आहे. मग वारंवारतेच नियम कसा लावणार?

३. वैश्विक असणे : माणूस पृथ्वीच्या बाहेर गेलेला नाहीये. फार काय आपल्या पृथ्वीच्या आतही तो २० किमीपेक्षा खोल गेलेला नाहीये. मग हा निकष कितपत ग्राह्य धरायचा?

त्यामुळे हे विज्ञानाचे निकष नसून वैज्ञानिक प्रक्रियेचे निकष आहेत, असं मी म्हणेन.

आ.न.,
-गा.पै.

जीवनात घडणाऱ्या प्रतेक प्रसंगाचे उत्तर विज्ञान कडे नाही.

जीवनात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचे उत्तर विज्ञान कडे आजतरीनाही.

असा बदल सुचवतो!

- (जीवनातली उत्तरे शोधणारा) सोकाजी

चौकटराजा's picture

6 Oct 2020 - 6:24 pm | चौकटराजा

विज्ञानाच्या काही कसोट्या स्थूलमानाने आहेत. जितके अधिकाअधिक स्पष्ट पुरावे सापडत जातील ,घटक सापडत जातील तसे विज्ञानातील प्रमेय अधिकाधिक विश्वासार्ह होत जातात . सबब विज्ञान हे प्रवाही आहे !
पण विश्व हे फार विशाल व त्यामुळे त्याचे एकच एक प्रमेय माण्डण्याच्या बाहेरचे आहे ! कितीही युगे गेली तरी त्याचे पुरते कोडे माणसाला काही सुटणार नाही !

आयुष्यातील समस्या सोडविण्यासाठी खालील काही चा सन्दर्भ घेणे इष्ट
१. केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे
२. प्रयत्नाना नशिबाची जोड वेळोवेळी मिळेलच असे नाही. पण नशीब आपण होऊन जागचे हालत नाही हे त्रिवार सत्य !
३ .अति तेथे माती
४. बुडत्याचा पाय खोलात
५, प्रत्येक बाबतीत कुठे थांबावे हे समजले पाहिजे .

सतिश गावडे's picture

6 Oct 2020 - 7:12 pm | सतिश गावडे

प्रयत्नाना नशिबाची जोड वेळोवेळी मिळेलच असे नाही. पण नशीब आपण होऊन जागचे हालत नाही हे त्रिवार सत्य !

"ज्याच्या नशिबात असेल त्याला नशिब स्वस्थ बसूच देणार नाही आणि ज्याच्या नशिबात नसेल त्याला नशिब हलायची ईच्छाच होऊ देणार नाही" हा व्यत्यास कसा वाटतो? 😉

चौकटराजा's picture

6 Oct 2020 - 9:50 pm | चौकटराजा

अत्यन्त व्यापक वैश्विक अर्थाने " हम सब रंगमंचकी कठपुतलिया है ... जिसकी डोर उपरवाले के हाथमे है...... हा हा हा हा हेच खरे आहे. पण सन्कुचित वर्तुळामधे माझे वाक्य खरे ठरते . सर्वच जर कठपुतळीया आहेत तर सद्सद्विवेकाला अर्थच उरणार नाही. ठराविक वर्तुळात सद्स्द्विवेक हीच तर सर्वात मोठी ताकद ठरते !

Rajesh188's picture

6 Oct 2020 - 11:22 pm | Rajesh188

1)प्रवासात बस मध्ये ,ट्रेन मध्ये बसायला जागा मिळत नाही.
विज्ञान कडे काही उपाय आहे.
२) शेजारीण आवडते पण बोलत नाही.
विज्ञान कडे काही उपाय आहे
3)किती तरी वर्ष नोकरी करतोय पण पगार वाढ हवी तेवढी होत नाही पण नालायक लोक चे पगार वाढत आहेत
विज्ञान कडे काही उपाय आहे.
४) नाते वाईक ,मित्र मंडळी प्रामाणिक नाहीत.
विज्ञान कडे काही उपाय आहे.
5)बँकेत पैसे ठेवायचे आहेत पण व्याज दर नाही
विज्ञान कडे काही उपाय आहे.
असल्या प्रकारच्या लोकांच्या समस्या असतात ह्या समस्या ना विज्ञान काही उत्तर देवू शकत नाही.
६)मी सर्व नियम पाळले ,सर्व काळजी घेतली पण मला covid झाला आणि समोरचा सर्व नियम पायदळी तुडवून सुद्धा त्याला covid झाला नाही
ह्यात विज्ञान काय सांगणार.

चौकटराजा's picture

7 Oct 2020 - 8:34 am | चौकटराजा

अलिकडे मनोविज्ञान ही फार महत्वाचे शास्त्र होउ पहात आहे ! त्याचेच पुराणे नाव अध्यात्म . लोक गुरू ,अनुग्रह , कृपा, जप ,देव ,धर्म ,सम्प्रदाय याचाच अर्थ अध्यात्म असा घेतात . मर्यादित अर्थाने या सर्वान्चा मनोवैज्ञानिक उपयोग जरूर होतो. पण याशिवाय ही अध्यात्मिक होता येते असा माझा अनुभव आहे !

उदा. जे बदलणे अशक्य नाही पण अवघड आहे अशा गोष्टीचा नाद सोडून देणे . हे अध्यात्म कळण्यासाठी कोणत्याही गुरूची गरज नाही.
बसमधे जागा मिळाली नाही नो प्रोब्लेम बाहेरचे सुन्दर जग दिसेल तसे पहा वेळ कसा गेला हे कळणार नाही. उदा. पुणे मुम्बई प्रवासात लोनावळा येथे पासवाले तुम्हाला जागा देत नाहीत अशावेळी बोरघाटाचा आनन्द घेत जाणे याला म्हणतात अध्यात्म !