रविन्द्र केळेकर यांना ज्ञानपीठ

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in काथ्याकूट
24 Nov 2008 - 12:12 pm
गाभा: 

कोकणी साहित्यिक रविन्द्र केळेकर यांना वाङमय क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ जाहिर झाला आहे.
लोकसत्ताच्या आजच्या अंकातला हा एक लेख.

केळेकरांना कोकणीसाठी मिळाला तरी त्यांचे लेखण मराठीत ही होत असते.
त्यांच्या साहित्याचा हा अल्प आढावा.
केळेकरांच्या साहित्याविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल.

आणि केळेकरांच्या ह्या मताविषयी साधकबाधक चर्चा व्हावी असे वाटते.

"हिंदी आणि बंगाली भाषिक हे इतर भाषांमधलं काही वाचायला इच्छुक नसतात. आजवर मराठीला केवळ तीन आणि गुजरातीला केवळ दोन ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत"

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

24 Nov 2008 - 1:08 pm | विसोबा खेचर

समस्त मिपा परिवारातर्फे केळेकर साहेबांचे हार्दिक अभिनंदन..!

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Nov 2008 - 2:28 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. केळेकरांचे अभिनंदन. कोंकणी - मराठी वाद बाजूला ठेवून महाराष्ट्र सरकारने व जनतेने त्यांचे कौतुक करावे, सत्कार करावा असे मनापासून वाटते.

``हिंदी आणि बंगाली भाषिक हे इतर भाषांमधलं काही वाचायला इच्छुक नसतात. आजवर मराठीला केवळ तीन आणि गुजरातीला केवळ दोन ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत"

मला व्यक्तिशः त्यांचे हे मत पटते. आज माझ्या सारख्या सामान्य, हौशी आणि फारशी साहित्यजाण नसलेल्या मराठी वाचकाला हरिवंशराय बच्चन, निराला, भारतेन्दु हरिश्चन्द्र वगैरे हिंदी साहित्यिक नावाने का होईना पण ठाउक आहेत. इतकेच नव्हे तर फणिश्वर नाथ 'रेणु' (तीसरी कसमचे लेखक, या गोष्टीतल्या गावरान सुमधुर हिंदी / भोजपुरी बोलीभाषेने खरंच वेड लावले होते तेव्हा) सारखा साहित्यिक पण माहित आहे आणि थोडाफार वाचला आहे (एके काळी). शाळेत हिंदी हा कंपल्सरी विषय असल्याने हिंदी साहित्य आणि त्यातील युगे वगैरे कानावरून तरी गेले आहे. हेच माझ्या सारख्या एखाद्या हिंदी भाषिक वाचकाच्या बाबतीत कितपत खरे ठरेल? किती हिंदी भाषिक सामान्य वाचकांना कुसुमाग्रज, पुलं, तेंडुलकर, जीए, कारंथ, बेंद्रे वगैरे दिग्गज नुसते नावाने ऐकून तरी माहित असतिल? नक्कीच कमी असेल प्रमाण. राष्ट्रभाषा झाल्याने हिंदीचा प्रसार वाढला. पण हिंदी भाषिक अगदीच गरज पडल्याशिवाय दुसरी भाषा शिकत नाहीत. इतर भाषांमधील किती साहित्य हिंदी मधे अनुवादित होत असेल त्या विषयीही मला शंकाच आहे.

बंगाल्यांविषयी तर काय बोलणार? जसं पुलंनी 'पुणेकरांच्या' बाबतीत 'कशाचा ना कशाचा तरी जाज्ज्वल्य अभिमान' हे एक व्यवच्छेदक लक्षण सांगितले आहे तसेच बांग्ला भाषा, साहित्य, रोबिंद्रशोंगित आणि संस्कृति याबद्दल ज्वलंत अभिमान नसेल तर बहुतेक वरून देव पण क्यू.सी. पास करून या लोकांना खाली जन्म घ्यायला पाठवत नसेल. आणि हे प. बंगाल, बांग्लादेश, त्रिपुरा वगैरे इशान्येकडिल राज्यातील बंगबंधु सगळ्यांनाच लागू होते. दुर्दैवाने ते त्यातच इतके गुरफटले जातात की बाकिच्या भाषांकडे त्यांचे लक्षच जात नाही. थोड्या फार फरकाने दक्षिणेतही हीच परिस्थिती आहे.

असो. माहितगार लोकांची मते ऐकायला आवडतील.

बिपिन कार्यकर्ते

विकास's picture

24 Nov 2008 - 5:38 pm | विकास

श्री. केळकरांचे मनापासून अभिनंदन! ही बातमी ऐकून आनंद झाला!

श्री. केळेकरांचे अभिनंदन. कोंकणी - मराठी वाद बाजूला ठेवून महाराष्ट्र सरकारने व जनतेने त्यांचे कौतुक करावे, सत्कार करावा असे मनापासून वाटते.

एकदम सहमत! त्यात वृत्तपत्रांनीदेखील प्रमुख वाटा उचलावा ही अपेक्षा!

सुनील's picture

24 Nov 2008 - 6:30 pm | सुनील

केळेकर (खरे म्हणजे केळेकार) यांचे अभिनंदन.

बा भ बोरकर आणि सुभाष भेंडे यांनी कोंकणी आणि मराठीतही बर्‍यापैकी लेखन केले आहे. केळेकरांनी मात्र मराठीत फार लिहिलेले नाही. (उदय भेंब्रे तर फक्त कोंकणीतच लिहितात, तो सोडा!).

मला केळेकर या पुरस्कारासाठी योग्य नाहीत असे म्हणायचे नाही परंतु या निमित्ताने कोंकणी भाषेचे एक दुखणे समोर आणायचे आहे. ते आहे लिपीचे!

शासन पुरस्कृत कोंकणीची अधिकृत लिपी आहे देवनागरी. साहजिकच फक्त देवनागरी कोंकणीत लिहिलेल्या साहित्याचाच पुरस्कारासाठी विचार केला जातो. कोंकणी देवनागरीखेरीज रोमन, कन्नड आणी मल्याळी लिपीतही लिहिली जाते. त्यातही साहित्यनिर्मिती होते, परंतु त्या लिप्या (कोंकणीसाठी) अधिकृत नसल्यामुळे त्यांतील साहित्य पुरस्कारासाठी विचारात घेतले जात नाही.

कोंकणीसाठी एक सर्वमान्य अशी लिपी होईल काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिरत भिरभि-या's picture

24 Nov 2008 - 6:43 pm | अभिरत भिरभि-या

>> कोंकणीसाठी एक सर्वमान्य अशी लिपी होईल काय?

फारच अवघड आहे.

देवनागरी व रोमी कोकणी असे दोन्ही समर्थक आपापल्या मुद्द्यांवर ठाम असल्याने मला हा तिढा सुटेल असे वाटत नाही.

कोकणीची प्रकृती बघता देवनागरी लिपी कोकणी साठी योग्य असे देवनागरीवाल्यांचे म्हणणे; आणि रोमी कोकणीला परंपरा आहे हा रोमीवाल्यांचा मुख्य दावा.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Nov 2008 - 7:00 pm | बिपिन कार्यकर्ते

आणि मला वाटतं की मूळात कोंकणी मराठी वाद किंवा लिपिचा वाद काय, धार्मिक निकषांवर विभागले गेले आहेत. हा मूळ तिढा सुटणं तर महाकर्मकठिण. या सगळ्या वादात गोव्यातल्या चर्चची भूमिका वादातीत नक्कीच नव्हे. अर्थात मी स्वतः कोकणी नाही किंवा मला फारशी येत / कळत नाही. माझे मत हे चुकिचे किंवा अपुर्‍या माहितीवर असू शकेल.

बिपिन कार्यकर्ते

विकास's picture

24 Nov 2008 - 7:23 pm | विकास

केळेकारांचे लेखन कुठल्या लिपीत प्रसिद्ध झाले आहे? देवनागिरी की रोमन? तोच प्रश्न विद्यमान कोकणी साहीत्यिकांसंदर्भात, त्याचे लेखन कुठल्या लिपीत प्रसिद्ध होते?

सुनील's picture

24 Nov 2008 - 7:50 pm | सुनील

अर्थातच देवनागरी. हीच कोंकणीची अधिकृत लिपी असल्यामुळे फक्त देवनागरी कोंकणी साहित्यच ग्राह्य धरले जाते. रोमन खेरीज मंगळूरी भाषक कन्नड लिपी वापरतात. (कोंकणी भाषकांची संख्या गोव्यापेक्षाही कर्नाटकात अधिक आहे). थोडेफार लेखन मल्याळी लिपीतही केले जाते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

24 Nov 2008 - 8:22 pm | विकास

अर्थातच देवनागरी. हीच कोंकणीची अधिकृत लिपी असल्यामुळे फक्त देवनागरी कोंकणी साहित्यच ग्राह्य धरले जाते. रोमन खेरीज मंगळूरी भाषक कन्नड लिपी वापरतात. (कोंकणी भाषकांची संख्या गोव्यापेक्षाही कर्नाटकात अधिक आहे). थोडेफार लेखन मल्याळी लिपीतही केले जाते.

सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद. कन्नड लिपीचे वापर करणारे कोकणी मित्र असल्याने त्याची चांगली माहीती आहेच + मल्याळीबद्दल ऐकून आहे. कोकणी ही बहुतांशी भौगोलीक रीत्या (जर भारताचा पूर्व-पश्चिम असा विचार केल्यास) पश्चिम किनार्‍यावरची भाषा आहे तर स्थानीक दृष्ट्या ती आपण वर उल्लेखलेल्या स्थानीक लिपीत लिहीली गेली आहे.

ज्या (स्थानीक) लिप्यांमधे ती साहजीक लिहीली जाते त्यात साहीत्य निर्माण होत आहे असा याचा अर्थ होतो. कोकणी ही सरकारी भाषा ८०च्या दशकात राजीव गांधींच्या काळात झाली. पण कोंकणी साहीत्य मात्र जुने आहे...जर रोमन या परकीय भाषेत, जरी ती सरकारी नसली तरी, साहीत्य जर निर्माण होत नसेल तर याचा सरळ अर्थ इतकाच की ती ओढून ताणून आणलेली लिपी आहे.

मला इतिहास ठाऊक नाही मात्र समजून घेयला आवडेलः पोर्तुगिज वर्चस्व असलेल्या तत्कालीन गोव्यात, पोर्तुगिज रोमन कोकणी (किमान ख्रिस्ती समुदायात) वापरायचे का पोर्तुगिज हीच भाषा लादली गेली होती? तसे असल्यास त्यांना तेथून घालवल्यावर रोमन मधे कोकणी आणण्याचा हट्ट हा खोडसाळपणाहून अधीक उद्देशाने कोणी तरी तयार करून तेथे हिंदू-ख्रिश्चन असा भेद तयार करायला त्याचा वापर केला असे वाटते का?

सुनील's picture

24 Nov 2008 - 8:58 pm | सुनील

चर्चा थोडी अवांतराकडे झुकते आहे. पण असो.

पोर्तुगिज वर्चस्व असलेल्या तत्कालीन गोव्यात, पोर्तुगिज रोमन कोकणी (किमान ख्रिस्ती समुदायात) वापरायचे का पोर्तुगिज हीच भाषा लादली गेली होती? तसे असल्यास त्यांना तेथून घालवल्यावर रोमन मधे कोकणी आणण्याचा हट्ट हा खोडसाळपणाहून अधीक उद्देशाने कोणी तरी तयार करून तेथे हिंदू-ख्रिश्चन असा भेद तयार करायला त्याचा वापर केला असे वाटते का?

भाषा आणि लिपीला वेठीस धरून झालेले राजकारण तूर्तास बाजूला ठेऊन वस्तुस्थिती काय होती/आहे ते पाहू.

सुरुवातीच्या काळात पोर्तुगीजांनी पोर्तुगीज भाषेची सक्ती केली हे खरे. परंतु नंतर ती सक्ती बरीचशी शिथिल झाली. कोंकणी भाषेत काही साहित्य निर्मिती होऊ लागली. अर्थातच रोमन लिपीत. कारणे दोन -

१) रोमन ही सत्ताधार्‍यांची लिपी होती.
२) अधिक महत्त्वाचे, हिंदू लिहिण्यासाठी कोंकणी ऐवजी मराठीचा (देवनागरी) वापर करणे पसंत करीत. कोंकणी बोलीत पण मराठीत लिहित, कोंकणीत नव्हे.

देवनागरी कोंकणीचा इतिहास सुरू होतो तो गेल्या शतकात. वामन रघुनाथ वर्दे-वालावलीकार (ज्यांना शणै गोंयबाब असे ओळखले जाते) यांनी देवनागरी कोंकणीचा पुरस्कार केला (खरे म्हणजे, हिंदूंना मराठीऐवजी कोंकणीत लिहायला प्रवृत्त्त केले). परंतु, आजही फारच थोडे हिंदू कोंकणीत लिहितात (लोकसंख्येच्या मानाने).

थोडक्यात, रोमी कोंकणीची परंपरा देवनागरी कोंकणीहून अधिक जुनी आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिरत भिरभि-या's picture

24 Nov 2008 - 10:10 pm | अभिरत भिरभि-या

परंतु, आजही फारच थोडे हिंदू कोंकणीत लिहितात (लोकसंख्येच्या मानाने).

गोव्यात कोकणीपेक्षा मराठी वृत्तपत्रे जास्त खपतात.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Nov 2008 - 7:18 pm | बिपिन कार्यकर्ते

केळेकरांची ओळख करून देणारा हा लेख आत्ताच बघितला.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3749014.cms

बिपिन कार्यकर्ते

अभिरत भिरभि-या's picture

24 Nov 2008 - 7:32 pm | अभिरत भिरभि-या

केळेकरांची ओळख करुन देणारा हा आणखी एक अग्रलेख !

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Nov 2008 - 8:14 pm | बिपिन कार्यकर्ते

केळेकरांची आणि त्यांच्या साहित्याची आटोपशीर पण पूर्ण ओळख करून दिली आहे.

संकुचितपणा सोडून व्यापक स्तरावर सकस समाजमन घडविण्याची प्रक्रिया त्यांच्या लिखाणातून सुरू व्हावी.

बिपिन कार्यकर्ते

अभिरत भिरभि-या's picture

24 Nov 2008 - 8:19 pm | अभिरत भिरभि-या

आधीचा दुवा ठी़क दिसत नसल्याने हा थेट दुवा
http://www.dainikgomantak.com/Gomantak/11242008/NT000996CA.htm

कलंत्री's picture

24 Nov 2008 - 8:28 pm | कलंत्री

मराठीतील साहित्याची ओळख इतर भाषकांना व्हावी याची जबाबदारी मराठीतील अग्रगण्य साहित्यीकांचीच आहे. जी.ए., पुल किंवा आताच्या पिढीच्या ख्यातनाम लोकांच्या बद्दल ( लेखनाबद्दल) इतर भाषेत अनुवाद झाले पाहिजे.

असे कार्य काकासाहेब कालेलकरांनी गुजराती भाषेत केले होते याचे स्मरण करायला हवे.

कोकणी, पंजाबी, मराठी असा वाद न करता योग्य माणसाला जर असे पारितोषिक मिळत असेल तर आनंदच मानायला हवा.

पंजाबी वाहिनीवर मी एका पंजाबी ज्ञानपीठ लेखकाच्या कथेवर आधारित मालिका बघीतली आणि तिचे सर्व भाग मी आवर्जुन पाहत असे याची आठवण झाली.

सुनील's picture

25 Nov 2008 - 1:59 pm | सुनील

मराठीतील साहित्याची ओळख इतर भाषकांना व्हावी याची जबाबदारी मराठीतील अग्रगण्य साहित्यीकांचीच आहे

हे कसे काय बॉ? आम्ही हिंदी, बंगाली वा कन्नड भाषांतील उत्तम साहित्य मराठीतून वाचले. त्याचे भाषांतर कोणी हिंदी, बंगाली वा कन्नड भाषकाने केले नव्हते, तर त्या त्या भाषा जाणणार्‍या मराठी लेखकाने केले होते. मग मराठीतील उत्तम साहित्य अन्य भाषांत अनुवाद करण्याची प्रथमिक जबाबदारी कोणाची?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मुक्तसुनीत's picture

24 Nov 2008 - 8:42 pm | मुक्तसुनीत

श्री. केळकरांचे मनापासून अभिनंदन! ही बातमी ऐकून आनंद झाला!

या बातमीद्वारे त्यांच्या कामाची ओळख करून दिल्याबद्दल अभिरत , बिपिन आणि इतरांचे आभार !