दौलतगड उर्फ दासगावचा किल्ला

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
25 Sep 2020 - 11:54 am

सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे.
इतिहासकाळी महाड, खेड, गोवळकोट, चिपळूण ही नामांकित बंदरे होती. अरब, रूमशान, ग्रीस इथपासूनचा माल चौल, दाभोळ आणि नालासोपारा अश्या मोठ्या बंदरात यायचा. या मोठ्या बंदरातून मग तो माल छोट्या गलबतामधून महाडसारख्या आतल्या बंदरात आणला जायचा. सावित्री नदीच्या मार्गाने महाड परिसरात मालाची आवक-जावक होत असे. पण कालांतराने खाड्या ओहरल्या आणि नद्यांची पात्र अरुंद होऊन महाड बंदरावरून होणारी वाहतून बंद झाली. इतिहासकाळात या सावित्री नदीच्या तीरावरून होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दासगावचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगडाची निर्मिती झाली असावी. सावित्री नदीचा हा मार्ग गाळाने भरून गेल्याने महिकावंती बंदर आणि दासगाव बंदर या बंदरांचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत.यातील दासगाव बंदराचे रक्षण करण्यासाठी दौलतगड या किल्ल्यांची उभारणी केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केल्याने रायगडाच्या प्रभावळीत असलेल्या या किल्ल्याला राजधानीच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्व प्राप्त झाले.

   
या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. यातील दौलतगड किल्ल्याची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे सांगणे जरी कठीण असले तरी रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला खाडीमार्गावरील टेहळणीचा एक महत्वाचा किल्ला होता.रायगड किल्ला कितीही बळकट असला तरी फिरंगे, पोर्तुगीज, सिद्धी यांच्यामार्फत रायगडाला सागरी आक्रमणाची भीती ही होतीच. त्यामुळे शिवकाळात सावित्री नदीच्या बाणकोट खाडी किनाऱ्यावर पहारे देण्यासाठी दौलतगडाचा उत्तम उपयोग होत असावा. सागरी मार्गाने होणाऱ्या हालचालींचा प्रथम अहवाल दौलतगडाला मिळत असेल आणि तिथून पुढे तो सोनगड आणि चांभारगड या महाड परिसरातील इतर किल्ल्यावरून रायगडाला पोहोचत असण्याची शक्यता आहे.  इ.स.१७५६ मध्ये तुळाजी आंग्रे यांच्या विरुध्द नानासाहेब पेशवे यांनी काढलेल्या मोहीमेत इंग्रजांनी केलेल्या मदतीसाठी दासगाव व कोमाल हि गावे तसेच बाणकोट किल्ला त्यांना देण्यात आला.इ.स. १७७१ मध्ये बाणकोटच्या इंग्रज रेसिडेंटने किल्ल्यावर डागडूजी करून इथे बंगला बांधला आणि किल्ल्याचे नाव दासगाव फोर्ट असे ठेवले. पुढे १७७५ च्या सुमारास मराठ्यांनी किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यातून परत घेतला आणि पुढे सन १७८४ पर्यंत तो त्यांच्याकडेच राहीला.आज मात्र स्थानिकांना हा किल्ला दौलतगड म्हणुन परीचीत आहे व वर्षातुन फक्त एकदाच झेंडा लावण्यासाठी शिवजयंतीला आम्ही किल्ल्यावर जातो असे ते अभिमानाने सांगतात. महाड तालुक्यात असलेल्या दौलतगडला भेट देण्यासाठी आपल्याला मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे पुढे ८ कि.मी.वर असलेले दासगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. महाडकडून माणगावला जाताना महामार्गाला लागुन असलेली दासगावची खिंड व सावित्री नदी यांना लागुन असलेल्या टेकडीवजा डोंगरावर दौलतगडचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची २५५ फुट आहे. दासगावची खिंड पार केल्यावर लगेचच एक लहान रस्ता उजवीकडे दासगावात जातो. 

 
दुर्गभ्रमंती करणार्‍यांनासुध्दा फार माहिती नसणारा हा किल्ला बघायचा असेल तर आधी दासगाव गाठायला हवे. मुंबई गोवा महामार्गावर मुंबईहून १६२ किलोमीटरवर दासगाव आहे. (महाडच्या अलिकडे ११ किलोमीटर). कोकणात जाणार्‍या सर्व एसटी बसेस दासगावला थांबतात. याच गावात दासगावचा किल्ला आहे. दासगाव हे कोकण रेल्वेवरचे स्टेशन असल्याने ईथे रेल्वेनेसुध्दा जाउ शकतो. कोकण रेल्वेने वीर स्थानकावर उतरावे. वीरहून रेल्वे स्टेशन ते दासगाव अंतर ५ किलोमीटर आहे. सहा आसनी रिक्षा आणि एसटीने दासगावला पोहोचता येते.

     
दासगावचा "दौलतगड" मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला अगदी खेटूनच उभा आहे. मुंबईहून महाडला जाताना मुंबई गोवा महामार्गावर दासगावची खिंड लागते . त्या खिंडीतल्या उजव्या बाजूच्या (सावित्री नदी आणि कोकण रेल्वेचा ट्रॅक असलेली बाजू) डोंगरावर दासगावचा किल्ला आहे. उलट बाजूने म्हणजे महाडकडून जायचे असल्यास माणगावकडून महाडकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर (महाड गावापासून साधारण ७ किमी) महामार्गावरच दासगावची खिंड लागते. दासगावच्या खिंडीच्या पुढे एक छोटा रस्ता उजव्या बाजूला दासगाव गावात जातो .

 
या रस्त्याने खिंडीपर्यंत परत चालत जायला ५ मिनिटे लागतात.खिंड ओलांडली की लगेच उजव्याबाजूला सिमेंटची एक पायवाट खिंडीला लागून असणाऱ्या डोंगरावर चढताना दिसते. या सिमेंटच्या पायवाटेने साधारण ५ मिनिटे चढून जाताच आपण रायगड जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणाऱ्या "आदर्श केंद्रशाळा, दासगाव" या शाळेच्या प्रांगणात येऊन पोहोचतो. दासगावची "आदर्श केंद्रशाळा" ही किल्ल्याच्या डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. शाळेचा स्वच्छ परिसर, सुंदर कौलारू इमारत, आजूबाजूला असणारी हिरवीगार झाडी आणि शाळेच्या मागेच उभ्या असलेल्या हिरव्यागार डोंगराचे लाभलेले सानिध्य यामुळे हा सर्व परिसर कमालीचा सुंदर दिसतो आणि नकळतच आपल्याला पुन्हा एकदा शाळेत जावे असे वाटायला लागते. पण आपल्याला मात्र किल्ला पहायचा असल्याने शाळेच्या मागच्या बाजूला असणाऱ्या फाटकातून बाहेर पडायचे आणि डोंगर चढणीला लागायचे.
 
मी किल्ला बघायला गेलो होतो, तेव्हा शाळेची मधली सुट्टी झाली होती.कंटाळलेली पोर बाहेर मनसोक्त धुडघुस घालत होती. मी त्यातल्या एकाला किल्ल्यावर जाण्याची वाट विचारली, तो एकाला चौघे उत्साही वीर मला वाट दाखवायला आले. शाळेच्या मुख्य दरवाजाने आत पटांगणात शिरून दुसऱ्या बाजुस असलेल्या लहान दरवाजाने बाहेर पडायचे व शाळेच्या इमारतीला वळसा घालुन आपण ज्या दरवाजाने आत शिरलो त्या बाजूस यायचे. येथुन समोरच डोंगरावर गेलेल्या पायवाटेने डोंगर चढायला सुरुवात करायची.
ही पायवाट शाळेच्या वरच्या बाजुने डोंगर उजव्या बाजूला आणि शाळा खाली डाव्या बाजूला ठेवत पुढे जाते. यातली डाव्याबाजूची पायवाट पाण्याच्या टाक्याकडे, सरळ वर चढत जाणारी पायवाट किल्ल्याच्या माथ्याकडे तर उजवीकडे जाणारी पायवाट डोंगराला वळसा (ट्राव्हर्स) मारून किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे जाते. यात सगळ्यात आधी आपण डाव्याबाजूची पायवाट पकडायची आणि मोजून फक्त दोनच मिनिटात दगडात खोदलेल्या पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचायचे.

पावसाळ्यात हे दगडात खोदलेले पाण्याचे टाके नितळ पाण्याने तुडुंब भरून वाहत असते. या टाक्यातले थंडगार पाणी पिऊन तृप्त व्हायचे आणि उरलेल्या गडभटकंतीसाठी निघायचे.मात्र गडाच्या परिसरात पाळीव जनावरांचा मुक्त वावर असल्याने पावसाळा सोडून इतरवेळी ते पिण्यायोग्य असण्याची शक्यता कमी. आता टाक्यापासून पुन्हा तीन वाटांच्या जंक्शनला परत येऊन गडमाथ्यावर जाणारी मधली पायवाट धरायची. पण गडावर जाणाऱ्या या पायवाटेवर प्रचंड झाडी माजलेली असल्याने पावसाळ्यात या वाटेने गडमाथा गाठणे थोडे अवघड काम आहे. त्यामुळे निराश न होता पायवाटांच्या जंक्शनवरून उजवीकडे डोंगराला वळसा (ट्राव्हर्स) मारून दक्षिण टोकाकडे जाणाऱ्या तिसऱ्या पायवाटेचा पर्याय समोर ठेवायचा. थोडक्यात काय तर गडाच्या मागच्या बाजूने देखील गडमाथा गाठता येऊ शकतो. टाके पाहुन परत चराकडे यावे व चर पार करून डावीकडील वाट धरावी.

या वाटेने २ मिनिटे चालल्यावर कातळात खोदलेले मध्यम आकाराचे टाके लागते. टाक्यात उतरण्यासाठी २-४ पायऱ्या कोरल्या आहेत. या टाक्याची दुर्गप्रेमींनी अलीकडेच सफाई केली असल्याने पिण्यायोग्य पाणी आहे पण काही स्थानिक सध्या याचा वापर कपडे धुण्यासाठी करत आहेत.
 
हे टाके पाहुन परत चराच्या वाटेवर यावे.
 उजवीकडे जात असलेली उरलेली तिसरी वाट आपल्याला डोंगराला वळसा मारत दासगावच्या विरुध्द दिशेला असलेल्या किल्ल्याच्या दक्षिण टोकावर घेऊन जाते. या टोकावरून वर चढत ५ मिनिटात आपण गडमाथ्यावरील ध्वजस्तंभाजवळ पोहोचतो.

किल्ल्यावर फारसे कोणी जात नसल्याने वाटा मोडलेल्या असुन त्यावर मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे त्यामुळे या झाडीतुन वाट काढत अवशेष पहाण्यापेक्षा शोधावे लागतात. ब्रिटीश गॅझेटीयरनुसार एका दगडाला शेंदुर लाउन गडावर आसरा देवीची स्थापना केली होती. आज मात्र देवीचा हा दगड पहाण्यास मिळत नाही.

 ध्वजस्तंभ,बुरुज,तटबंदी, तलाव सहज दिसत असले तरी उर्वरीत अवशेष मात्र सावधपणे शोधावे लागतात.

 गडमाथ्यावर पोहचताच सुंदर निसर्गाविष्कार आपल्या डोळ्या समोर उलगडायला लागतो.

सावित्री आणि काळ नद्यांच्या संगम, बारमाही वाहणाऱ्या सावित्री नदीचे विस्तीर्ण पात्र, त्यात तयार झालेली अनेक छोटी छोटी बेटे, बेटांच्या सुपीक जमिनीवर डोलणारी हिरवागार शेती, नदीकाठाने वसलेली छोटी गावे, या सगळ्यातून वाट काढत जाणारी कोकण रेल्वे आणि नदीचे पात्र ओलांडणारा रेल्वेचा देखणा पूल. अगदी एखाद्या निसर्गचित्रात शोभून दिसावं असं कमालीच सुंदर दृश्य.


आपण या टोकाशी उभे असतानाच नेमकी निळ्या रंगाची रेल्वे डौलाने शिट्टी वाजवत आली तर हा कॅनव्हास पुर्ण होतो. हा अनुभव मला घ्यायला मिळाला, तुम्हीही घ्या. गडाची उंची अवघी ४५० फुट असली तर ईथले सौदंर्य नक्कीच खेचून आणणारे आहे.
बहुदा किल्ल्यावरून दिसणाऱ्या या दृश्याच्या प्रेमात पडूनच ब्रिटीशकाळात जेव्हा हा किल्ला इंग्रजांकडे गेला तेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांना या किल्ल्यावर बंगले बांधण्याचा मोह झाला असावा.
 पायवाटेने आपण किल्ल्याच्या पिछाडीला जाईपर्यंत वरील वर्णन केलेले सुंदर निसर्गचित्र कायम आपल्या डोळ्यासमोर दिसत राहते आणि साधारण १० मिनिटात आपण किल्ल्याच्या पिछाडीला येऊन पोहोचतो. येथेच खाली दासगावची भोईआळी नावाची एक वस्ती आपल्याला दिसते. किल्ल्यावर येणारी दुसरी पायवाट या भोईआळीतून किल्ल्याच्या माथ्यावर जाते. आपण याच पायवाटेने किल्ल्याचा उरलेला १० मिनिटांचा चढ चढून गडमाथा जवळ करायचा.

गडमाथा आटोपशीर असला तरी सध्या किल्ल्यावर वावर कमी असल्याने प्रचंड झाडी माजलेली आहे.
 

 
या झाडीतच आपल्याला इंग्रज अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या विश्रामगृहाच्या बांधकामाची जोती, तटबंदीचे तुरळक अवशेष आणि दोन उध्वस्त बुरुज असे थोडकेच दुर्गाअवशेष अगदी मह्तप्रयासाने सापडतात आणि येथेच आपली साधारण ४५ मिनिटांची गडफेरी पूर्ण होते.

दासगावचा किल्ला पहाण्यासाठी फार वेळ लागत नसल्याने या भागातील ईतर दुर्गभ्रंमतीला जोडून हा गड बघता येईल. सोनगड, पन्हाळघर या किल्ल्यांच्या मोहीमेत दासगावचा किल्ला पाहून होईल. वेळ आणि ईच्छा असेल तर दासगावजवळ सव आणि कोंदीवटी गावात असणार्‍या गरम पाण्याच्या झर्‍याला भेट देता येईल. तर असा हा दासगावचा दौलतगड, अगदी तुरळक ऐतिहासिक अवशेष असले तरी किल्ल्यावरून दिसणाऱ्या अप्रतिम निसर्गदृशासाठी नक्की भेट द्यावा असा.

माझे सर्व लिखाण तुम्ही येथे एकत्र वाचु शकता.
भटकंती सह्याद्रीची

संदर्भः-
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर-
२) किल्ल्यांच्या दंतकथा- महेश तेंडुलकर
३) www.durgbharari.com   हि वेबसाईट
४) www.trekshitiz.com   हि वेबसाईट
५) रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव- श्री. सचिन जोशी
६) दुर्गवास्तू- श्री. आनंद पाळंदे

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Sep 2020 - 4:33 pm | प्रचेतस

एका अपरिचित किल्ल्याची ओळख आवडली. मी या किल्ल्याचे नाव दासगावचा किल्ला म्हणूनच ऐकले होते.

रूमशान

रुमशान म्हणजे रोम आणि सीरिया. रूमशानातील वस्तूंचा व्यापार हा त्या काळी प्रसिद्ध असलेल्या कॉन्स्टंटिनोपल अर्थात इस्तंबूलमार्गे होत असे. म्हणूनच काही जण रुमशानलाच इस्तंबूल असेही मानतात जे ही चुकीचे नाही.

दुर्गविहारी's picture

2 Oct 2020 - 11:47 am | दुर्गविहारी

बरोबर माहितीसाठी धन्यवाद!

कंजूस's picture

27 Sep 2020 - 6:58 am | कंजूस

छोटासा डोंगर, बाजुला वळण घेत जाणारी नदी आणि रस्ता तसेच रेल्वे, छोटेसे गाव. अगदी छान जागा आहे हे निश्चित.

मला वाटतं या इथे असलेल्या बंदरातून लाकूड आणि तांदुळ पाठवत असतील. इराणमधून चुना आणि फरशा आणत असतील. पूर्वी मोठी जहाजे नसावीत. बांबू आणि वेत बांधलेले धौ ( हेच नाव आहे ना?) कमी खोल पाण्यातून जाऊ शकत होते. आता नदीत गाळ फारच झाला असेल.

गामा पैलवान's picture

1 Oct 2020 - 8:03 pm | गामा पैलवान

कंजूसकाका,

एरव्ही नयनरम्य प्रांत आहे. पण पावसाळ्यात सावित्री नदी भयंकर उग्र रूप धारण करते. शिवाय सोबत काळ नदीही मिळालेली असते. ती सुद्धा नावाप्रमाणे अक्षरश: काळ आहे. दोघी मिळून जो काही धुमाकूळ घालतात त्याला अवघ्या कोकणात तोड नाही.

तुम्हांस कदाचित आठवंत असेल, या परिसरात एक अप्रिय दुर्घटना घडली होती. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरचा पूल ऐन पावसाळ्यात रात्री वाहतूक भरात असतांना चक्क वाहून गेला होता. तेव्हा सात खाजगी वाहनं व दोन एसटी पाण्यांत पडल्या. त्यांतली एक एसटी थेट ५०० मीटरवर सापडली. इतका प्रचंड विसर्ग असतो.

आ.न.,
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

2 Oct 2020 - 11:47 am | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांना आणि वाचकांना धन्यवाद!