सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा/कॉलेजातील चांगल्या शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे.जसे इतर सरकारी नोकरदार तसे सरकारी शाळेतील शिक्षकसुद्धा शासनाचे सेवक आहेत.
पण थांबा.या सोबतच एक मोठा फरकसुद्धा आहे.सरकारी शिक्षणसंस्था वगळता बाकीच्या सरकारी आस्थापनांमधील कर्मचार्यांचा पर्फॉर्मन्स हा तो कर्मचारी जनतेतल्या ज्या व्यक्तीसाठी किंवा जनसमुहासाठी किंवा गाव/शहर/महापालिका यांच्यासाठी काम करत आहे तो करताना कामात दिरंगाई किंवा कुचराई झाल्यास ते लोक किंवा चांगले जनप्रतिनिधी पाठपुरावा करुन काम करवून घेतात.त्या काम होण्यावरच सदर लोकांच्या जीवनातील काही भाग अवलंबून असतो.
शिक्षकांचं काम मात्र ज्यांच्याशी ते सर्वाधिक संबंधित असतं/असायला हवं ते विद्यार्थी 'चांगल्या प्रकारे ज्ञानदान न करणार्या किंवा अक्षम शिक्षकांबद्दल' कुठेही तक्रार करु शकत नाहीत.किंवा केली तरी त्याची फारशी दखल सदर शिक्षकाने घेतली नाही तर त्याबद्दलची तक्रारही विद्यार्थी कुठेही करु शकत नाही. किंवा रागारागाने तो शिक्षक डुख धरण्याची शक्यतासुद्धा असते. सदर विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाचे पालक इतके जागरुक किंवा शिकलेले नसतात की ते अशा अक्षम शिक्षकांबद्दल तक्रार करु शकतील. वाड्या - वस्त्यांवरील लोकांना तर शाळेत जाऊन का शिकायचं असतं हे ही माहित नसतं.
अशाच कामचुकार शिक्षकांच्या वृत्तीवर कोरडे अोढणारा 'निशाणी डावा अंगठा' हा सिनेमासुद्धा आला होता. तो सिनेमा प्रदर्शित होऊ नये म्हणून बर्याच ठिकाणी शिक्षकांनी आंदोलनेही केली होती.
अशा काही अक्षम किंवा पाट्या टाकणार्या शिक्षकांमुळे विद्यार्थीवर्गाचं अपरिमित नुकसान होतं.शालेय शिक्षणाचाच पाया कच्चा राहिल्याने त्याचे परिणामही भोगावे लागतात.भारतात विज्ञान संशोधकांचं कमालीचं कमी असणारं प्रमाण , चौथीतल्या मुलाला स्वत:चं नावही अचूक लिहिता न येणं , दहावीपर्यंत पोहचलेला(की ढकललेला?) विद्यार्थी एखाद्या विषयावर स्वत:हून ८-१० अोळींत मते मांडू शकत नसेल तर यात त्याला शिकवणार्या शिक्षकांचा काहीच दोष नसावा?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात किती भारतीयांना भारतात राहूनच विज्ञानातील नोबेल मिळाले आहे हे पहावे.
यावर कळस म्हणजे अशा शिक्षकांना मिळणारे गलेलठ्ठ पगार. शासन हे पगार देतं तो पैसा मुळात जनतेचाच असतो.विविध करांपोटी जो पैसा जमा होतो त्यातूनच ही तरतूद होत असते. लोकांच्या कष्टाचा पैसा अशा काही अक्षम लोकांवर(यांना शिक्षक का म्हणावं?) वारेमाप उधळला जात असेल तर त्याला कुठेतरी पायबंद हवा. विद्यार्थ्याला कितपत ज्ञान झालं याची चाचणी सुयोग्य अशासकीय संस्थांकडून करुन घेऊन त्या प्रमाणातच सदर शिक्षकाला पगार का देण्यात येऊ नये?
दरवेळी शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावली जातात त्यामुळे शिकवण्यावर परिणाम होतो हे सांगितले जाते.पण अनुदान द्या, सातवा वेतना आयोग लागू करा यासाठी जशी जीवतोड आंदोलने केली जातात तशी ज्ञानदानात अडथळे आणणारी अशैक्षणिक कामे शासनाने लावू नयेत यासाठी तितक्याच तडफेने आंदोलने होतात का?
शाळकरी विद्यार्थी शिक्षणाच्या दर्जाबद्दल दाद मागत नाही याचा गैरफायदा अजून किती दिवस घेतला जाणार आहे आणि जनतेची आर्थिक लूट कधीपर्यंत अशीच चालणार आहे?
अनुदान मिळालं, आयोग लागू झाला की चांदीच चांदी यावर डोळा ठेवून D.Ed /B.Ed ला घेतले जाणारे प्रवेश ढिगभर अक्षम अभियंत्यांपेक्षा वेगळे नाहीत.पण अक्षम अभियंता स्वत:च्या अक्षमपणाची फळे लाईनवरच काम करत बसून वैयक्तिक स्तरावर भोगतो तरी. पण अक्षम शिक्षकाच्या ताब्यात शेकडो विद्यार्थी देऊन एका दमात शेकडो विद्यार्थ्यांची वाट लावली जाते. पैसे देऊन लागणारा अक्षम मास्तर किंवा पुढे कधीतरी लठ्ठ पगार मिळेल या आमिषापोटी विनाअनुदानित शाळेत तुटपंज्या पगारावर शिकवणारे मास्तर मनापासून , विद्यार्थ्याला ज्ञान मिळावे या उद्देशाला बांधील असतील का?
भ्रष्ट राजकारण्यांसाठी अशा भविष्यकालीन लठ्ठ पगाराच्या आमिषापोटी शिक्षक बनलेले लोक गळाला लागलेला मासे असतात. हमखास मिळणारी एकगठ्ठा मते असतात.
या सर्वात नुकसान होतंय ते विद्यार्थ्यांचं.जो निकृष्ट शालेय शिक्षणाबद्दल कुठेही दाद मागू शकत नाही.
शिक्षण या विषयाबद्दल हा सुरेख व्हिडिओ पाहण्यात आला. आपणही पहावा.
प्रतिक्रिया
15 Sep 2020 - 6:41 am | साहना
छान प्रश्न आहे !
उत्तर सुद्धा सोपे आहे. कुठल्याही क्षेत्रांत जो पैसे मोजतो त्यालाच सर्व भाव देतात. जो पर्यंत पैसे विद्यार्थी देत नाही तो पर्यंत शाळा आणि शिक्षण विद्यार्थी केंद्रित कधीहि असणार नाहीत. कोचिंग क्लासेस चे उदाहरण चांगले आहे. इथे विद्यार्थी पैसे मोजत असल्याने विद्यार्थ्यांना काय पाहिजे तेच ज्ञान शिक्षक देतात आणि सर्वांचा फायदा होतो. त्याशिवाय कोचिंग हे सरकारी शिक्षणापेक्षा कित्येक पटीने किफायतशीर आहे.
जो पर्यंत शाळांवर आणि शिक्षणावर सरकारी बाबुंचा वाचक असेल तो पर्यंत सर्व शिक्षण व्यवस्था बाबू मंडळींच्याच तालावर फेर धरून नाचेल आणि आणि विद्यार्थ्यांचा काही फायदा झाला तर तो निव्वळ योगायोग म्हणूनच.
15 Sep 2020 - 10:19 am | Bhakti
कोचिंग उत्तर आहे.पण सर्वांसाठी नक्कीच नाही.त्यापेक्षा सरकरी/निमसरकारी शिक्षकांना सतत अपडेट राहण्यासाठी उपाय योजना पाहिजे.त्यांची वेळोवेळी तपासणी घेऊन ,सुधारणेला वाव द्यावा.समतोल पाहिजे, आपल्याकडे नियमांचा बागुलबुवा फक्त कागदावरच आहे.पालन कोणीच करत नाही.
28 Sep 2020 - 10:19 am | अनुप ढेरे
सहमत आहे.
15 Sep 2020 - 10:20 am | Bhakti
This video my day!
15 Sep 2020 - 11:44 am | कानडाऊ योगेशु
जिल्हाधिकार्यापासुन ते ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत तसेच सर्व मंत्री संत्र्यांच्या मुलांना सरकारी शाळेतुनच शिक्षण घेण्याची जबरदस्ती केली तर परिस्थितीत प्रचंड फरक पडु शकेल. पण ये तो न होने के बराबर है. त्यामुळे आपल्यापुरती सोय पाहावी असे म्हणुन गप्प बसतो.
15 Sep 2020 - 3:56 pm | मराठी_माणूस
दुसरी बाजू
https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-teachers-day-abn-97-...
https://mumbaimirror.indiatimes.com/coronavirus/news/as-salaries-dry-up-...
18 Sep 2020 - 12:50 pm | उपयोजक
दुसरी बाजू विदारक असली तरी मूळ प्रश्न शिल्लक राहतोच. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षक कधी मिळणार? चांगल्याप्रकारे शिकवता न येणार्या , पोटार्थी शिक्षकाला लठ्ठ पगार देऊन विद्यार्थ्याला काय फायदा? शिक्षकाला आर्थिकदृष्ट्या स्थिर केले की तो विद्यार्थ्याकडे लक्ष देईल, त्याला समजेल अशा पद्धतीने शिकवेल, रागाच्या भरात मारहाण करणारच नाही असे काही नाही. उलट विद्यार्थी शिकला नाही तरी आपल्या पगारावर परीणाम होत नसल्याने तो शिक्षक अजून उद्धट बनेल.
शिवाय लिंकमधल्या शाळा/महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करण्याचा निर्णय या ऐच्छिक असणार ना? पुढे कधीतरी अनुदान मिळेल नि मलाही लठ्ठ पगार मिळेल हाच उद्देश ासेल ना जॉईन होताना?
15 Sep 2020 - 6:18 pm | प्रसाद गोडबोले
विद्यार्थीकेंद्रीत शिक्षक मोठ्या प्रमाणावर कधी मिळणार?
>>>
शिक्षकांची पदे MPSC/ UPSC मधुन भरायला सुरुवात करा . शिक्षकांच्या तशाच श्रेणी तयार करा , क्लास १ क्लास २ क्लास ३ क्लास ४ वगैरे. सरकारी सेवेत पदोन्नत्ती साठी जसे कठोर निकष असतात तसेच शिक्षकांनाही लावा . अन त्यांना त्याच वेतनश्रेणी नुसार पगार द्या . शिक्षकी पेशाला तेवढाच सन्मान द्या जेवढा नायब तहसीलदार . पी.एस.आय. , किंव्वा कलेक्टर पदाला आहे.
ह्या माझ्या किमान अपेक्षा आहेत , येवढ्या पुर्ण झाल्यास मी स्वतः शिक्षक व्हायला तयार असेन ! इतरांच्या अजुन वाढीव अपेक्षा असतील तर त्याचे स्वागतच आहे !!
29 Sep 2020 - 1:27 pm | राजाभाउ
+१ परफेक्ट
30 Sep 2020 - 11:34 am | सुबोध खरे
हे सर्व आपण शिक्षकाच्या दृष्टीने लिहिले आहे. शिक्षकाला मान पैसा इ. कसा मिळेल. पण हि केवळ एकच बाजू झाली.
उत्तम शिक्षक होण्यासाठी शिकवणे हि कला फार महत्त्वाची आहे आणि हीअतिशय हुशार आणि तळमळीचा माणूस असेल तरी त्याला उत्तम शिकवता येईलच असे नाही.
शिकवणे आणि शिकणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध असेलच असे नाही.
माझ्या वैद्यकीय महाविद्यालयात (ए एफ एम सी) वैद्यकीय प्रशिक्षण विभाग ( Department of medical education) म्हणून आहे. जेथे आपल्याला उत्तम शिक्षक होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
एवढे झाल्यावर प्रत्यक्ष एक छोटे २० मिनिटांचे लेक्चर ५ प्राध्यापक आणि डीन याना द्यावे लागते. या वर ते ठरवतात कि आपण वैद्यकीय प्रशिक्षक होण्याच्या लायकीचे आहात काय?
कारण अतिशय उच्च शिक्षित आणि उत्तम असलेला वैद्यकीय/ शल्यक्रिया तज्ज्ञ उत्तम शिक्षक असेलच असे नाही.
या उलट एखादा एस एस सी, डी एड झालेला प्राथमिक शिक्षक हा अतिशय उत्तम शिक्षक असू शकतो.
अर्थात अशी निवड सर्व राज्यभर लागू करणे हि आदर्श स्थिती झाली आणि ती प्रत्यक्षात येणे शक्य नाही हे हि मला माहिती आहे.
15 Sep 2020 - 9:23 pm | शेर भाई
जेव्हा सर्वत्र Digital India चा बोलबाला सुरु झाला होता तेव्हाची गोष्ट आहे. शिक्षण क्षेत्रात तेव्हा E – Learning प्रसवण जोरात चालू होत. या योजने अंतर्गत आम्ही शहरात आणि मुंबई जवळच्या गावात आम्ही एका E – Learning Solution चे वितरण करत होतो, तेव्हाची गोष्ट..............
१. पुर्व मुंबईतील उपनगरातील एका प्रतिथयश शाळेत आम्ही आमच E – Learning Solution दिल. त्या प्रतिथयश शाळेत Product Training चा वेळेस फक्त एकच शिक्षक हजर होता, नंतर एका आठवड्याच्या आत तिथल्या शिक्षकांनी आम्हाला आमच्या Solution ची आतडी काढून पाठवून दिली.
२. पालघरच्या पाड्यावरील पत्र्याच्या शेड मध्ये भरणाऱ्या शाळेतील शिक्षकांनी मात्र Product Training च्या वेळेस पुर्ण हजेरी लावली. आमच्या Solution मध्ये असलेल्या Internet Connectivity चा पर्याय त्यांनी व्यवस्थित समजून घेतला. नंतर प्रत्येक शिक्षकाने आपल्या स्वतःच्या Mobile साठी DATA Packs विकत घेऊन विद्यार्थ्यांना Internet मार्फत Online Video च्या माध्यमातून शिकवायला सुरुवात केली.
18 Sep 2020 - 12:35 pm | उपयोजक
साहना आणि अन्य सर्वांचे आभार _/\_
28 Sep 2020 - 9:40 am | मराठी_माणूस
https://www.loksatta.com/mumbai-news/my-family-my-responsibility-campaig...
27 Oct 2020 - 11:11 am | मराठी_माणूस
ह्या कामाचा शिक्षणाशी संबंध आहे का ?
https://www.loksatta.com/mumbai-news/latur-task-of-filling-the-bundle-te...