गणराया निघालाच आहे , तर गौरीचे आगमन आता थोड्याच दिवसात होणार आहे.
आमच्या घरी, गोव्यात गौराईला नेवरी करायची पद्धत आहे. इतर वेळी सुद्धा, मोदकांबरोबर बहिण म्हणून 'नेवरी' करतातच. पण पाच सवाष्ण स्त्रियांना, नेवरी ओटीत द्यावी लागते.
आता, जुनी प्रथा आहे. पदार्थ बनवण्याची आवड आणि उत्साह असल्याने तर त्या( प्रथेच्या) निमित्ताने आनंद म्हणून केली जाते व सर्वांनाच खाउ घालतो.
हि सगळ्याच घराची पद्ध्त नाही. गौरी बसल्या की, पाच ते दहा गोडाचे पदार्थ असतातच. पण हा मुख्य पदार्थ. तर नमनालाच घडीभर तेल झालेय.
मी, माझी आई जशी करते तसेच लिहिले आहे.
रेसीपी काही नवीनच नाही. मोदकाचीच आहे पण आकार वेगळा .. बस्स इतकेच.
पण एखाद्या नवशिक्याला प्रयत्न करायचा असेल तर हि पाककृती उपयोगी ठरेल. कारण, बर्याच वेळा तांदूळ कुठला घ्यावा, पीठी कशी करावी ते उकड कशी करावी, मुरड काय असते हे सर्व ह्या कृतीतून कळेल.
८-१० मध्यम आकाराच्या नेवरीसाठी:
तांदूळ-पीठी: १ वाटी अंबेमोहोर तांदूळ धूवून, पंख्याखाली वाळवून घ्यावा.
सारणः १ चमचा घरगुती तूप, १ वाटी ओलं खोबरं, अर्धा वाटी गूळ, भाजलेली खसखस , चवीला मीठ, वेलची-जायफळ पूड, काजू-बदाम काप आवडीप्रमाणे
उकडः १ वाटी तांदूळ पीठी, १ वाटी पाणी, चवीला मीठ, १ चमचा तेल.
क्रमवार पाककृती:
तांदूळ पीठी कशी करावी:
वाळवळेला तांदूळ अतिशय बारीक घरीच मिक्सरवर किंवा खास चक्कीवाल्याला सांगून बारीक दळून घ्यावा. मग तो चाळून घ्यावा.
उकड कशी करावी:
१ वाटी पाणी भांड्यात उकळायला लागले की, मीठ व तेल घालावे. आता ताजी दळलेली पीठी घ्यावी. भरभर उकळत्या पाण्यात एकत्र करावी. चमच्याने सारखं फिरवत बसावं, नाहितर गुठळ्या होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. नंतर ३-५ मिनिटे , आच कमी करून झाकण ठेवावे.
गॅसवरून उतरवली की, लगेच परातीत काढून, हाताला जरासाच पाणी लावून मस्त मळून घ्यावी. मळणे हि एक कला आहे व टिप आहे. जितकी मळाल , तितकी मउसूत उकड.
सारण कसे करावे: तूप वितळले की, गुळ घालून जरासा परतला की, त्यातच खसखस, खोबर, मीठ घालून घ्यावे. खोबर्यातील पाणी जरावे आटले की उतरावे व वेलची पूड, सुका मेवा घालून घ्यावे.
आता खरी मज्जा नेवरी करण्याची.
नेवरीचा आकार , हा करंजी सारखाच असतो. त्यामुळे, पारी वळली की ती करंजी सारखे भरून घ्यावी. आणि तिला कडेने मुरड घालावी.
मुरड कशी घालावी इथे बघा,
१०-१२ मिनिटे, हळदीच्या पानातच वाफवावी. हिच खरी मजा व टिप्स. गरम गरम , तूपाबरोबर वाढावी.
वाढणी/प्रमाण:
८-१० नेवर्या
अधिक टिपा:
उकड मस्त असेल तर काहीच प्रॉबलेम नाही.
तांदूळ , आंबेमोहोर नसेल तर, अर्धा बासम्ती आणि सुरती कोलम घ्यावा. तो ही नसेल तर, अर्धा बासमती आणि अर्धा सोनमसूरी घ्यावा.
अतिशय जुना हि नको वा नवीन तांदूळ नको.
हिच उकड, वापरून मोदक छान होतात.
पिवळट तांदूळ = खुप जुना
एकदम नवीन तांदूळ - चमकदार पांढरा दाणा.
माहितीचा स्रोत:
आई, https://youtu.be/JykVrfb4ygw
प्रतिक्रिया
22 Aug 2020 - 12:35 am | श्वेता२४
मोदक व नेवर्या सुबक दिसत आहेत
22 Aug 2020 - 3:02 am | देवीका
धन्यवाद!
22 Aug 2020 - 8:51 am | गणेशा
मस्त,
हा पदार्थ माहित होता, नाव मात्र आज कळाले..
अश्याच वेगवेगळ्या पाककृती येऊद्या अजुन..
22 Aug 2020 - 8:08 pm | मृगतृष्णा
खूप छान , फोटो पाहूनच खावेसे वाटले मोदक आणि नेवर्या
23 Aug 2020 - 11:57 am | तुषार काळभोर
मुरड अतिशय सुबक घातली आहे. पण आम्हाला मात्र मनाला मुरड घालावी लागेल. आमच्याकडे तळून करतात हे सगळे पदार्थ. उकडीचे मोदक गौरवकडे जाऊन खावे लागतात.
कालच ऑफिसात एकाने करंज्या आणल्या होत्या. त्याचं गाव गोवा कर्नाटक सीमेवर आहे. तळून केलेल्या, पण सारण ओलं खोबरं , तीळ अन गुळाच.
24 Aug 2020 - 1:58 am | देवीका
तळणीचे मोदक इथे आहे, हि मैद्याशिवाय कृती आहे.
23 Aug 2020 - 12:28 pm | राघव
वाह! आज अगदी अत्याचार होतोय.. किती वेळा तोंपासु म्हणणार! :-)
नेवरी - मला मुरड कनोली हा शब्द माहित होता. नेवरी प्रथमच समजला.
24 Aug 2020 - 1:58 am | देवीका
तळणीचे मोदक इथे आहे, हि मैद्याशिवाय कृती आहे.