माझी पहिलीच पाककृती लिहीत असल्याने गोडाने सुरुवात करावी म्हणलं .. आणि आमच्यासारखे गोड घाशे मंडळी असतीलच इथेही .
तर आमच्या लहानपणी लग्न सोहळ्यामध्ये 2-3 दिवसाच्या समारंभात एकदा तरी अननसाचा शिरा हा उत्तम आणि बनविताना त्याच्या घमघमाटाने कधी एकदा ताव मारतो आहे अशी इच्छा निर्माण करणारा गोडाचा पदार्थ असायचा .
तर त्याची माझ्या करण्याच्या पध्दतीने कृती अशी -
पाककृती-
वेळ - 20- 25 मिनिटे
कच्चा माल -
-तूप ( घरचे साजूक तूप असल्यास उत्तम)
-जाड रवा
- साखर
- पाणी
-अननस ( छोटे छोटे तुकडे)
- ड्रायफ्रूट- आपल्या आवडीनुसार ( बदाम, काजू, बेदाणे)
- पिवळा खाण्याचा रंग
- पाईनआयपल एस्सेन्स
- मीठ
कृती -
- एका कढईत 2 मोठे चमचे तूप घ्यावे
- तूप थोडे गरम झाल्यानंतर त्यात 1 1/2 वाटी जाड रवा घालून बारीक गॅसवर एकसारखा भाजून घ्यावा
- तोपर्यंत दुसऱ्या गॅस वर 4 वाट्या पाणी गरम करत ठेवावे
- भाजलेल्या रव्याचा छान वास येऊ लागला आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ते पाणी रवा भाजलेल्या कढईमध्ये सावकाश ओतावे
- यानंतर लागलीच त्यात चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग , 2 थेंब पाइनआयपाल एस्सेन्स , चिमूटभर मीठ , ड्रायफ्रूटस चे तुकडे आणि साधारण 1 वाटी अननसाचे छोटे तुकडे हे सर्व जिन्नस मिसळून घ्यावे
- यानंतर 1 1/४ ( सव्वा वाटी - आवडीनुसार प्रमाण बदलू शकता) वाटी साखर मिसळून छान परतून घ्यावे आणि झाकण ठेवून 5 मिनिटे छान शिजवुन घ्यावे.
- वरून 2 चमचे तूप सोडावे.
- सुंदर पिवळा रंग, तुपाची चमक आणि चव , छान अननसाचा गंध असलेला असा अननसाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे .
टिप- ही पाककृती प्रत्यक्ष अननस उपलब्ध नसेल परंतु एस्सेन्स असेल तरी करून पाहू शकतो.
नक्की ही पाककृती तयार करून पाहा . आवडल्यास किंवा न आवडल्यास नक्की कळवा.
प्रतिक्रिया
18 Aug 2020 - 8:50 pm | गणेशा
मस्त आहे पाककृती..
शिरा आवडतो मला.. लालसर झालेला जास्त.
अननस शिरा पहिल्यांदा पाहिला.. नक्कीच करणार...
18 Aug 2020 - 9:10 pm | मृगतृष्णा
धन्यवाद !! शिरा जरूर करून पाहा ..
18 Aug 2020 - 9:21 pm | तुषार काळभोर
शिऱ्यात शिरा, अननसाचा शिरा.
बाहेर नक जाऊ, घरातच फिरा..
:D
18 Aug 2020 - 9:46 pm | मृगतृष्णा
हा हा !! कोरोना काळात अगदी साजेसा उखाणा होऊ शकतो :) , धन्यवाद !!
18 Aug 2020 - 10:02 pm | Bhakti
अननस इसेन्स वापरण्याची कल्पना छान आहे.
शिरा आमच्याकडे कायम असतो.उन्हाळयात आंबे होते तेव्हा आंब्याचा शिरा खुपदा केला.एकदम भारी !!अननस इसेन्स बघते आता.
18 Aug 2020 - 10:31 pm | मृगतृष्णा
मला हि प्रचंड आवडतो आंब्याचा शिरा ... हा घ्या माझ्या पद्धतीचा ..
19 Aug 2020 - 6:40 am | तुषार काळभोर
आय डोन्ट सी आंबा. आय डोन्ट सी शिरा अल्सो.
आय सी ओन्ली शेगडीचा बंद नॉब !
19 Aug 2020 - 10:00 am | Bhakti
हा हा..आय अल्सो..कोणताच शिरा नाही दिसला. :)
21 Aug 2020 - 7:18 am | तुषार काळभोर
आय सी शिरा, आय सी आंबा अल्सो!
बट,
दिसत नव्हतं ते बरं होतं. आता आंब्याचा शिरा कसा करायचा भाद्रपदात?
19 Aug 2020 - 12:19 am | मोगरा
सुरेख., करून पहावाच लागेल.
19 Aug 2020 - 4:20 am | चौकस२१२
पाईनआयपल एस्सेन्स !
चांगला पिकलेला अननस गोड ( तुरट) असताना इसेन्स कशाला?
19 Aug 2020 - 11:32 am | गणेशा
आणखीन एक,
शिरा मला खुप आवडतो,
पण कधी रात्रीचे शिळे रस्स्याचे कालवण किंवा लोखंडी तव्यावर गवार किंवा इतर काही भाज्या यांचा घट्ट काळा रस्सा (तिखट) करून त्याबरोबर शिरा खातात का?
मी कायम, रस्सा आणि शिरा एकत्र खातो, खुप आवडतो..
असे कोणी खात नसेल असे वाटते मला.. कारण मी कोणालाच असा शिरा खाताना पाहिले नाही.
अवांतर:
मला वाटते मी पण आता पुन्हा किचन मध्ये प्रवेश करावा..
सुरुवात चहा पासून करावी असे वाटते.. :-))
19 Aug 2020 - 1:20 pm | Bhakti
मी कायम, रस्सा आणि शिरा एकत्र खातो, खुप आवडतो..
काहीही :)
19 Aug 2020 - 5:57 pm | Gk
कांदापोहे आणि शिरा देखील मिळतो कॉलेज केंटिनात
19 Aug 2020 - 2:48 pm | पियुशा
मला फ़ोटो नाई दिसते माझा "गणेशा "झालाय ;)
19 Aug 2020 - 7:04 pm | मृगतृष्णा
मला फोटो दिसत आहेत , तुम्हाला का नाही दिसत आहेत ? यासाठी काय करावे ? शक्य झाल्यास कृपया सांगावे ..
20 Aug 2020 - 8:32 pm | तुषार काळभोर
फोटोंना पब्लिक अॅक्सेस दिला तर सर्व फोटो लेखात दिसायला लागतात अन वाच्कांच्या मनोकामना पूर्ण होतात!
20 Aug 2020 - 10:07 pm | मृगतृष्णा
पुन्हा प्रयत्न केला आहे .. आता फोटो दिसत असेल अशी अपेक्षा , त्वरित सहाय्य केल्याबद्दल धन्यवाद !!
20 Aug 2020 - 10:19 pm | Bhakti
वाह .. मस्तच दिसतायत! दोन्ही अननस आणि आंबा शिरा सुंदर!!
21 Aug 2020 - 4:41 am | सुमो
21 Aug 2020 - 4:44 am | सुमो
अनावधानाने प्रकाशित झाला आहे.
संपादकांना विनन्तीः कृपया काढून टाकावा. धन्यवाद.
22 Aug 2020 - 12:32 am | श्वेता२४
नक्की करुन बघणार. तुमचा मॅंगो शिरा पण चांगला जमलेला दिसतोय. शिरा आवडतो. शिर्यासोबत लिंबाचे लोणचे खायला आवडते आमच्या घरात.
22 Aug 2020 - 8:11 pm | मृगतृष्णा
धन्यवाद , शिरा आणि लिंबाचे गोड लोणचे झक्कास कॉम्बिनेशन आहे .. अगदी आवडीचे