श्रीगणेश लेखमाला २०२० - विली वोंका कॅडबरी काँटेस्ट (Willy Wonka Cadbury Contest)

अनुराधा काळे's picture
अनुराधा काळे in लेखमाला
22 Aug 2020 - 8:45 am

1

अहो! मुंबई म्हणजे घड्याळाच्या काट्यांवर आणि लोकलगाड्यांच्या चाकांवर रुळांवरून सतत धावणारी! घड्याळ, किल्ल्या, पाकीट, रुमाल, टिफिन सांभाळत जीव मुठीत घेऊन आठवडाभर लोकलमध्ये कसाबसा शिरणारा, बसायला चौथी सीट मिळण्याची अपेक्षा न करणारा तो मुंबईकर! चाकरमान्या! आता तर गर्दी दसपट!

असा हा मुंबईकर लोकलने शनिवारी रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पाठ फिरवूनच. अगदी ३६चा आकडा. पण माझ्या यजमानांची गोष्टच वेगळी. 'सायन, मुंबई'सारख्या मध्यवर्ती ठिकाणी इन्स्टिट्यूटच्या आवारात प्रशस्त घर! कामानिमित्त भरपूर फिरायला लागायचे, पण दिमतीला सरकारी गाडी! वेळच यायची नाही स्टेशनकडे फिरकायची.
त्यामुळेच शनिवारी-रविवारी लोकलने मुंबईला भटकायला जायचा उत्साह दांडगा. ह्या बाबतीतही आमचे ग्रह छान जुळायचे. मुलांना घेऊन मी वेळेवर अगदी तयार!
आणि असाच एक शनिवार घेऊन आला वर्षभर आमच्या जिभेवर गोडी आणि आयुष्याच्या कप्प्यात गोड आठवणी.

गोष्ट १९७५-७६ सालची.

1

Willy Wonka & the Chocolate Factory हा इंग्लिश सिनेमा 'STRAND' ह्या कुलाबा येथील थिएटरमध्ये लागला होता. स्ट्रँडला फक्त इंग्लिश सिनेमे लागत असत. आता स्ट्रँडचे अस्तित्व नाही. आजकाल फोन बुकिंग, ऑनलाइन बुकिंग.. कितीतरी सुविधा आहेत. पण तेव्हा एकतर आधी जाऊन तिकिटे काढून आणा किंवा ऐन वेळी काढा. पण स्ट्रँडला साधारण मिळूनच जायची तिकिटे. थोडे जरा आधी जायचे, अर्धा तास! दोन्ही मुलांना घेऊन आम्ही त्या बेताने स्ट्रँडला पोहोचलो. तिकिटांबरोबरच आम्हाला एक फॉर्म दिला. 'कॅडबरी फ्राय' ह्या त्या वेळेस सुप्रसिद्ध असलेल्या चॉकलेट कंपनीकडून स्पर्धेसाठी होता. १० शब्दांत इंग्लिशमध्ये स्लोगन लिहायचे होते. त्यांचे वाक्य होते - 'I like Cadbury Fry Chocolate because _________________.' हो! स्पर्धेत भाग घेताना आपल्याला आवडणाऱ्या कॅडबरी चॉकलेटचा wrapperही जोडायचा होता स्लोगनबरोबर. पण विजेत्यांना काय बक्षीस मिळेल हे मात्र लिहिले नव्हते. मस्त सिनेमा पाहिल्यावर मुलेही खूश. नंतर गेटवे ऑफ इंडियाला समुद्राच्या लाटा, भन्नाट वारे, चाऊम्याऊ - कंपनी आणखी खूश. असा तो छान छान शनिवार. घरी आल्यावर सगळे कामधाम उरकून स्वस्थपणे तो फॉर्म वाचला. डोक्यात विचारचक्र सुरू झाले. मला अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची आवड. जोडीला यजमानांचे पूर्ण प्रोत्साहन! यापूर्वी मला 'हमाम' ह्या आंघोळीसाठी असलेल्या साबणाच्या जाहिरात स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले होते. त्या वेळी इतर फारसे ब्रँड्स नव्हते. लिक्विड बॉडी वॉश ऐकलाही नव्हता. तर मराठीत स्लोगन लिहायचे होते. माझे स्लोगन होते - 'गोरं गोरं पान फुलासारखं छान|हमामने आंघोळ करून वाटतं किती छान|' हमामच्या ३० वड्यांचा - होय, तीस वड्यांचा बॉक्स बक्षीस म्हणून मिळाला. कितीतरी महिने साबण म्हणून आणला नाही. दुसरे बक्षीस 'लिरिल' बाथ सोप स्पर्धा. इंग्लिशमध्ये स्लोगन दहा शब्दात. वेगळा रंग, गंध, सुंदर जाहिरात. लिरिल हळूहळू जम बसवत होता. माझे स्लोगन होते - 'Beauty In Peril, Saves the Liril.' पहिले बक्षीस लिरिलच्या १० वड्या.
असो. अवधी भरपूर होता स्लोगन पाठवायला.

सुट्ट्या पडल्या. माझी मोठी बहीण आणि कंपनी पतियाळा (पंजाब) येथून सुट्टीत आले. मग काय? भटकंतीच भटकंती! एके दिवशी येता येता बहिणीने एक कॅडबरी मोठा बार आणि एक फाइव्ह स्टार घेतले. अरे वा! अनायसे कॅडबरी चॉकलेटचे दोन wrappers आले. मग काय? मुलांची मीटिंग घेऊन त्यांनाच विचारले की फॉर्मला कोणत्या चॉकलेटचा रॅपर जोडायचा? बहिणीची मुले व माझी मुले यांच्या एकमताने मोठ्या कॅडबरीचाच जोडायचा असे ठरले. माझे स्लोगन तयार झाले -
I like Cadbury Chocolate Because
CRUNCH IN A MUNCH
IT IS MY LUNCH'

2
छान पत्र लिहिले. फॉर्मवर स्लोगन लिहिले. फॉर्मला आठवणीने मोठ्या कॅडबरी चॉकलेटचा रॅपर जोडला. साध्या पोस्टाने पत्र रवाना केले. तेव्हा कुरियर वगैरे कुठे होते? सुट्टी संपता संपता बहीण आणि कंपनी परत गेले आणि काही दिवसांतच 'कॅडबरी फ्राय' अशी डौलदार अक्षरे मिरवणाऱ्या कंपनीच्या पेडर रोडवरील ऑफिसमधून अभिनंदनपर पत्र! 'पाच सर्वोत्तम एन्ट्रीजमध्ये तुमच्या स्लोगनची निवड झाली आहे. बक्षीस म्हणून तुम्ही जो कॅडबरी चॉकलेटचा रॅपर जोडला होता, ते चॉकलेट तुम्हाला एक वर्ष घरपोच येईल.' परत परत पत्र वाचले आम्ही. पुढील एक तारखेला कंपनीतर्फे फोन आला की आज आमची व्हॅन येईल अकरा वाजता. अभिनंदन! बरोबर अकरा वाजता व्हॅन आली. परत अभिनंदन करून कंपनीचा माणूस चॉकलेटचा बॉक्स देऊन गेला. आमची कॉलनी तशी लहानच. बातमी पसरली होतीच. व्हॅन बघायला गॅलरीत खिडकीपाशी मैत्रीणी! मुलांचेही मित्रमैत्रिणी. आमचाही उत्साह ओसंडून वाहत होता. शेजारीपाजारी, नातेवाईक, मुलामुलींची मित्रमैत्रिणी सगळ्यांना चॉकलेटच्या आनंदात सहभागी करून घेतले. माझा आतेभाऊ म्हणायचा, "चला, काळ्यांकडे कॅडबरी सीझन चालू आहे.” त्या वेळी साठे बिस्किटे, पार्ले बिस्किटे ह्यांची सिंगल चॉकलेट्स होती. कॅडबरीला कोणी कॉंम्पिटिशन नव्हती. आज आपण अमूल, Toblerone, KitKat, Perk, Ferrero Rocher असे अनेक प्रकार मुलांना घेताना बघतोच. त्या वेळी कॅडबरीची शान वेगळीच.

कोणी आमच्याकडे आले की कॅडबरी देताना कसे आम्ही स्ट्रँड थिएटरला मुलांना घेऊन Willy Wonka & the Chocolate Factory हा इंग्लिश सिनेमा बघायला गेलो, कसा स्पर्धेचा फॉर्म मिळाला, कसे स्लोगन लिहिले, कोणता रॅपर जोडला ही सगळी स्टोरी सांगताना 'लई भारी' वाटायचे. ऐकणाऱ्यालासुद्धा एक वर्ष कॅडबरी मिळणार ऐकून नवल वाटायचे. चॉकलेटची गोडी आणखीन वाढायची!

आमच्या एक लक्षात आले की मुलांचे मित्रमैत्रिणी जास्तच यायला लागले आहेत. हेच ते रम्य बालपण. एक गोष्ट मी कटाक्षाने करायची. चॉकलेट खाल्ल्यावर बेसिनपाशी जाऊन दात स्वच्छ धुवायला लावायची. ती मुलेसुद्धा "Yes Aunty, Yes Aunty” म्हणून ऐकायची. कारण उद्याचे चॉकलेट खुणावत असायचे.

पंजाबच्या बहिणीला छान घट्ट झाकणाच्या थ्रेप्टिन बिस्किटाच्या मोठ्या डब्यात कॅडबरी चॉकलेट्स आपल्या भारतीय पोस्ट आणि टेलिग्राफ ऑफिस - म्हणजे Indian Post And Telegraph Officeतर्फे रजिस्टर्ड पार्सलने पाठवली. त्यांना पार्सल अगदी व्यवस्थित व वेळेत मिळाले. त्यांनीही सगळ्यांनी खूप आनंद घेतला. मी घरी कॅडबरी चॉकलेटचा मिल्कशेक, कस्टर्ड, आइसक्रीम असे प्रकार केले. दर महिन्याला कॅडबरी कंपनीची व्हॅन एक तारखेला सकाळी अकरा वाजता हजर! तत्पूर्वी कंपनीतर्फे अभिनंदनपर फोन आणि गाडी येईल असे सांगायचे. ३० दिवसांचा महिना - ३०चॉकलेट्स; ३१चा महिना - ३१चॉकलेट्स; २८चा महिना - २८! + किंवा - अजिबात नाही! कॅडबरी चॉकलेटने अगदी मन तृप्त झाले.

मला लहानपणी मनसोक्त खाल्लेल्या कोकणच्या राजाची हापूस आंब्याची आठवण आली. दर वर्षी आमच्याकडे रत्नागिरीहून आंबेवाले मामा यायचे एप्रिलच्या सुरुवातीला आंब्याची ऑर्डर घ्यायला. आमच्या वाडीतील २५-३० टोपल्यांची ऑर्डर तर ठरलेली. मामा माळकरी होते. कपाळावर गंधाचा टिळा. पांढरी टोपी, कुडता, धोतर, पायात कोल्हापुरी वहाणा. त्या वेळी आंबे शेंड्यावर असायचे. कोणाचा शेकडा १००+१०, तर कोणाचा १००+२०.. पण ह्या मामांचा शेकडा मात्र १००+३० इतका! एक एक फळ निवडक. थोडा अ‍ॅडव्हान्स घ्यायचे, बाकी विश्वासावर! ते आंबे खाऊन जी तृप्ती यायची, ती दुसरा सीझन येईपर्यंत! इतके छान आंबे!

तर असा हा कॅडबरी चॉकलेटचा गोड 'Nostalgic Experience' तुमच्याबरोबर शेअर करताना मला खूप आनंद होतो आहे, जरी ऑनलाइन असला तरी! सध्याची परिस्थिती नसती ना, तर हा गोड अनुभव प्रत्यक्ष चॉकलेट्स देऊनच सांगितला असता. पण आत्ता असाच घ्या!!!!

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Aug 2020 - 10:37 am | प्रचेतस

व्वा.!
लेख आवडला. भारी आहे हे, वेगळाच विषय आणि वेगळ्याच आठवणी. मस्त.

धर्मराजमुटके's picture

22 Aug 2020 - 11:25 am | धर्मराजमुटके

छान ! स्मरणरंजन आवडले. आज कॅडबरी ला स्पर्धा असली तरी ती जाणवण्याइतपत नाही. आजही मोठ्ठे चॉकलेट म्हणजे कॅडबरी. नेस्ले / अमूल यांचा कॅडबरी ला टक्कर देण्याचा अनेक वर्षे प्रयत्न चालू आहे.

टर्मीनेटर's picture

22 Aug 2020 - 12:21 pm | टर्मीनेटर

मस्त लेख !
स्मरणरंजन खूप आवडले.
हे वाचून माझीही एक जुनी आठवण ताजी झाली.
माझ्या लहानपणी डोंबिवली पूर्वेला स्टेशन जवळ एक नवीन आईस्क्रीम पार्लर सुरु झाले होते तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा ठेवली होती. पांढऱ्या कागदावर एक प्राणी, पक्षी, इमारत किंवा नक्षीदार आकार रेखाटलेले असत ते रंगवून देण्याची.
चित्र कसं रंगवलंय हे महत्वाचे नव्हते त्यामुळे सहभाग घेतलेल्या सगळ्यांनाच बक्षीस म्हणुन एक आईस्क्रीमचा फॅमिली पॅक मिळत होता.

एक महिना सुरु असलेल्या ह्या स्पर्धेत घरापासून दुकान जवळ असल्याने रोजच सहभाग घेऊन रोज एक आईस्क्रीमचा पॅक मिळवला होता.

धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा!

कंजूस's picture

22 Aug 2020 - 12:52 pm | कंजूस

अरे वा मज्जाच.

व्वा खूपच मस्त लेख!

मदनबाण's picture

22 Aug 2020 - 6:59 pm | मदनबाण

Charlie and the Chocolate Factory पाहिल्याने लेख अधिक भावला. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ranjan gavala | Female version | new song | by kartiki

शा वि कु's picture

22 Aug 2020 - 7:23 pm | शा वि कु

मस्त आठवणी.

Bhakti's picture

22 Aug 2020 - 7:32 pm | Bhakti

Charlie and the Chocolate Factory अगदी गोड गोड सिनेमा.. तुमच्या Cadbury आठवणी एकदम खास!!

Nitin Palkar's picture

22 Aug 2020 - 7:47 pm | Nitin Palkar

सुंदर लेख.

सिरुसेरि's picture

22 Aug 2020 - 7:55 pm | सिरुसेरि

सुरेख आठवण आणी फोटो . जॉनी देप चा Willy Wonka चा रोल असलेला Charlie and the Chocolate Factory अधुन मधुन केबलवर लागत असतो .

राघव's picture

23 Aug 2020 - 11:59 am | राघव

मस्त आठवण! कॅडबरीला अजूनही तोड नाही. आता त्यांनी चॉकलेट या शब्दालाच रिप्लेस केलंय यातच सगळं आलं!
बाकी स्ट्रँड सिनेमाचा फोटू बघून एकदम मूड बनला.. भारीच! धन्यू :-)

चौथा कोनाडा's picture

23 Aug 2020 - 12:49 pm | चौथा कोनाडा

व्वा, 'लई भारी' नॉस्टॅलजिक आठवण !
सुपर मस्त लेख !
अश्या गोष्टी नशिबात असायला देखील योग लागतात !
कॅडबरीला ती कॅडबरीच ! कॅडबरी दा जवाब नहीं !
माझा एक नातेवाईक तळेगाव-इंदोरीच्या कॅडबरीत मोठ्या पदावर काम करायचा, काही पॅक्स फुकट आणि काही हजारांचे सवलतीत !
तो तिथं असे पर्यंत कॅडबरीची दिवाळी साजरी केली !

गणेशा's picture

23 Aug 2020 - 6:57 pm | गणेशा

CRUNCH IN A MUNCH
IT IS MY LUNCH

खुपच सुंदर slogan.. आवडले..

लिखान अप्रतिम, सहज.. साधे.. सोप्पे..
वाचुन तुमच्या घरीच ऐकतोय सारे असे वाटले..

म्हणुन ह्या ओळी जास्त आवडल्या..

कोणी आमच्याकडे आले की कॅडबरी देताना कसे आम्ही स्ट्रँड थिएटरला मुलांना घेऊन Willy Wonka & the Chocolate Factory हा इंग्लिश सिनेमा बघायला गेलो, कसा स्पर्धेचा फॉर्म मिळाला, कसे स्लोगन लिहिले, कोणता रॅपर जोडला ही सगळी स्टोरी सांगताना 'लई भारी' वाटायचे

----

आता इतका छान रिप्लाय दिलाय, एक बॉक्स चॉकलेट्स मिळतील काय? :-))

प्रशांत's picture

23 Aug 2020 - 8:22 pm | प्रशांत

छान आठवणी आणि लेख सुद्धा

सुधीर कांदळकर's picture

24 Aug 2020 - 8:05 am | सुधीर कांदळकर

आठवणी. स्लोगन तयार करण्यात आपल हातखंडा जाणवतो आहे. सध्या डिक्शनचाच व्यवसाय असल्यास आश्चर्य वाटणार नाही. मस्त प्रवाही वेगवान भाषा. मजा आली. त्या काळी कॅडबरीला तोडीचा पर्याय नव्हता हे खरेच. वर्षभर दर महिन्याला डबा: ग्रेट! वाचतांना जीभ चाळवलीच.

स्ट्रँड चे चित्र पाहून हरखून गेलो. मुंबईतले सगळ्यात छोटे सिनेमागृह. सर्वात आधुनिक ध्वनीव्यवस्था असलेले. मॅकेनाज गोल्ड इथे दीडदोन वर्षे चालला होता. त्यातल्या उत्कृष्ट स्टीरीओ ध्वनीमुद्रणामुळे घोड्याने दगडावर पाय ठेवल्यावर नालाचा होणारा आवाज पण स्पष्ट ऐकू येई. डावीकडचा आवाज डावीकडून आणि उजवीकडचा आवाज उजवीकडून. एवढेच नव्हे तर एकदा आपल्याकडे पाठ केलेला उभा एकजण काचेची बाटली मागे फेकतो तर बाटली आपटून फुटल्याचा आवाज आपल्या मागून येई. हे तेव्हा नवे, थरारक आणि सुखद धक्का देणारे होते.

माझ्या देखील छान आठवणी जागवल्यात. धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Aug 2020 - 2:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है, मस्त आठवणी. आणि लिहिलंय अगदी खुसखुशीत. स्पर्श केलं की सोनं होणार्‍या वस्तूच्या गोष्टीची आठवण झाली. आपण सहभागी झालात की बक्षीस मिळालं. आपण नशीबवान आहात, लक तुमच्याबाबतीत सतत तुमच्या बाजूने राहीलं हीच गोष्ट मला खुप आवडली. बाकी, आठवणी सुरेखच. लिहिते राहा. मिपावर येत राहा.

-दिलीप बिरुटे

रातराणी's picture

26 Aug 2020 - 11:22 pm | रातराणी

मस्त स्लोगन लिहिले तुम्ही!! सुंदर आठवणी.

चित्रगुप्त's picture

27 Aug 2020 - 1:45 am | चित्रगुप्त

मस्त लिहीले आहे. माझ्यासाठी चॉकलेटचे हे विश्व अगदी अपरिचित आहे, कारण मला अगदी लहानपणापासून आजतागायत कधीच चॉकलेट खावेसेच वाटलेले नाही, का कुणास ठाऊक.

चौकटराजा's picture

27 Aug 2020 - 8:00 pm | चौकटराजा

तर मग निदान Charlie and the Chocolate Factory हा चित्रपट जरूर पहा मालक ! जॉनी डेप या नटाने मध्यवर्ती भूमिका जबरदस्त रंगवलीय !

सुमो's picture

27 Aug 2020 - 4:28 am | सुमो

छान आठवणी. सुरेख लिहिलं आहे.

आता बरेच प्रकार आलेत कॅडबरीचे. पण डेअरी मिल्क हे पर्सनल फेवरिट !

स्मिताके's picture

27 Aug 2020 - 11:04 pm | स्मिताके

अगदी प्रसन्न वाटलं वाचून.

गुल्लू दादा's picture

31 Aug 2020 - 1:51 pm | गुल्लू दादा

अतिशय वेगळा विषय वाचून खूप छान वाटले. मस्त लिहिलंय आवडलं. माझ्या भविष्यातील हॉस्पिटलसाठी एखादी tagline सुचवाल का ;)

विनिता००२'s picture

31 Aug 2020 - 3:01 pm | विनिता००२

विली वोंका व चॉकलेट फॅक्टरी ही गोष्ट लहानपणी वाचली होती. प्रत्यक्षात ती फॅक्टरी कशी असेल असे बरेच स्वप्नरंजन करुन झाले होते. सिनेमा पाहून जाम भारी वाटलेले. :)
खूप छान लेख!

अनिंद्य's picture

2 Sep 2020 - 11:57 am | अनिंद्य

@ अनुराधा काळे,

अनुभव तुमच्याकडून प्रत्यक्ष ऐकायचे सौभाग्य मला लाभले याचा आनंद होताच पण इथे मिपावर लिहून सगळ्यांनाच चॉकलेटच्या आनंदात सहभागी करून घेतले हे फार आवडले.

पुढच्या भेटीत तुम्हाला चॉकलेट नक्की देईन :-))

कॅडबरी च्या अप्रतिम आठवणी आणि मुंबई म्हणजे गोड स्वप्न.

विजुभाऊ's picture

7 Sep 2020 - 11:47 am | विजुभाऊ

समोर बसून ऐकतोय आणि सांगून झाले की एक कॅडबरी मिळेल इतके मस्त वाटले वाचताना.

श्वेता२४'s picture

7 Sep 2020 - 11:56 am | श्वेता२४

अनुभव सांगण्याची पद्धत आवडली. तुम्ही जे स्लोगन दिले तेही आवडले.

प्राची अश्विनी's picture

30 Sep 2020 - 4:51 pm | प्राची अश्विनी

+1