जेंव्हा केंव्हा आपलं नशीब जोरदार असतं त्या वेळी अतिशय सुंदर योग येतात !
असाच एक सुंदर योग मी बंगळुरूला असताना आला !
"चित्रसंते" येत्या रविवारीच भरणार असल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली अन लगेच ठरवून टाकलं हा योग अजिबात चुकवायचा नाही !
रविवारी सकाळी लवकरच उठलो, पीजी हॉस्टेलवरून पासून गोविंद शेट्टी पाळळ्या रोडच्या शॉर्टकटने हायवेचं इ.सी. सर्कल गाठलं. कॉर्नरच्या रूचीसागरला नेहमी प्रमाणे नाश्ता आणि एक झकास फिल्टर कॉफी मारली. बीएमटीसीनं मॅजेस्टिक गाठलं. चित्रसंते जिथं भरणार होतं तो कुमार कृपा रोड मॅजेस्टिकपासून ३-३.५ किमीवर असल्यामुळं सरळ रिक्षा पकडली ! १५-२० मिनिटात रिक्षावाल्यानं एका क्रॉसरोडला "हाच कुमार कृपा रोड" असं म्हणून तिथं सोडलं.
दुतर्फा वृक्षराजीने नटलेला रोड पाहताना छान वाटलं. थोडं अंतर चालून गेल्यावर चित्रसंतेच्या स्वागताचे बोर्ड दिसू लागले. थोडं पुढं बॅरिकेइड्स लावून वाहनांना प्रवेश-मनाई केली होती, इथून पुढं वॉकिंग प्लाझा ! रस्त्यावरचे चित्रांचे स्टॉल्स दिसू लागले. चित्रं पाहत रेंगाळायला आपोआप सुरुवात झाली. पुढं आल्यावर मात्र स्टॉल्सची संख्या वाढू लागली. पुढेपुढे तर शेजारी शेजारी दाटीवाटीनं लावले होते ! प्रत्येक बंगल्याच्या कंपाऊंड तारेला जेव्हढी मावतील तेव्हढी पेंटिंग्स अडकवली होती ! पुटपाथवरसुद्धा तसंच ! आजूबाजूला आता बरीच गर्दी जाणवत होती.
कुमार कृपा रोड :
"कर्नाटक चित्रकला परिषद" तर्फे "चित्रसंते" ही चित्रकलेची भव्य महाजत्रा दरवर्षी आयोजित केली जाते.
साधारणपणे वर्षाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी. याला महाजत्रा म्हणण्यापेक्षा कुंभमेळाच म्हणा की !
या "चित्रसंते" बाजारात हजारो चित्रकार आपल्या कलाकृती विकण्यासाठी स्टॉल लावून सहभागी होत असतात !
ही स्टॉल्सची संख्या हजार-दोन हजाराहून जास्त असते म्हणजे याच्या व्याप्तीची आणि भव्यपणाची कल्पना यावी !
अन या उत्सवाला दोनतीन लाखांपेक्षाही जास्त कलारसिक भेट देत असतात आणि कलाकृतींची मोठी उलाढाल होत असते !
पेंटिंग / कलाकृतींची किंमत १०० रू पासून ४-५ लाखपर्यंत देखील असते.
हा चित्रमेळा बंगळुरूच्या शहराच्या मध्यवर्ती भागात कुमार कृपा रोडच्या परिसरात दरवर्षी भरत असतो.
कुमार कृपा रोड म्हणजे उच्चभ्रू सधन लोकांची वस्ती ! राजकीय नेते, शासकीय अधिकारी, उद्योगपती, व्यापारी, विविध क्षेत्रातले नामवंत दिग्गज इ. यांची कॉलनी, साधारणपणे पुण्यातल्या कोरेगाव पार्क सारखी ! (या परिसराला कुमार कृपा हे नांव का पडलं याची कहाणीही रोचक आहे)
जिकडं बघावं तिकडं चित्रंच चित्रं आणि स्टॉल्सच स्टॉल !
कमी गर्दी असलेल्या स्टॉलचा मग मी व्हिडीओ शूट केला.
एक आकर्षक चित्रकला स्टॉल :
पावसाळी पर्यटनाला डोंगरघाटात जावं, आणि सभोवताली पाऊसाच्या टप्पोरे थेंबांचा वर्षाव, घळीतून वाहणारे पाणी, छोटे ओहोळ, नदीनाले धबधबे, ढगांचे धुके इत्यादि पाहत हरकून जायला होतं तसं आजूबाजूचा चित्रमाहोल पाहून मला हरकून जायला झालं !
रंगीबेरंगी पेंटिंग्ज, स्केचेस, फोटोग्राफ्स, म्युरल्स, मांडणीशिल्पं (इन्स्टालेशन्स) आणि बरंच बरंच काही !
स्टॉल्सवरील गर्दी :
फोटोग्राफर्स, व्हिडीओग्राफर्स, सिनेमॅटोग्राफर्स शूटिंग करण्यात अतिशय रंगून गेले होते !
परदेशी लोक मोठ्या उत्सुकतेनं हा महामेळा पाहत हिंडत होते !
(नेहमीपणाने) काही स्थानिक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, अन त्यांच्या बरोबर फोटोही काढून घेत होते !
अर्कचित्रात गर्क :
तिथंच कॅरिकेचर्स (अर्कचित्रं) करणारे कलाकार जागोजागी होते, रसिकांची अर्कचित्रं लीलया काढून पाहणाऱ्यांना थक्क करत होते, काही कुटुंबं, ग्रुप्स हिरीरीने अर्कचित्रं काढून घेत होते, कलाकार चांगली कमाई देखील करत होते.
घासाघीस :
आवडलेल्या पेंटिंग्जच्या किंमतीसाठी रसिक बारगेनिंग करत होते.
फिरते कॉफी विक्रेते "काफी, फिल्टर काफी" अश्या हळ्या देत घिरट्या मारत होते. हवेत कॉफीचा झकास सुवास दरवळत होता, माझ्या सारख्या फिल्टर कॉफी शौकीनाला पर्वणीच होती ! नाही तरी ११ वाजलेले, "ऑफिशियल" कॉफीब्रेक होताच, कागदी कपात कॉफी घेऊन एका स्टॉलच्या वळचणीला आस्वाद घेत बसलो. परिसराचा उत्सवी माहोल अनुभवणं पुरेपूर अनुभवला !
हा उत्सव अनुभवत पुढे निघालो, आता माइकवरूनवरून दिलेल्या घोषणा ऐकू येऊ लागेल्या. गर्दीच्या नियंत्रणासाठी या पोलिसांच्या घोषणा होत्या. स्वयंसेवक स्वतः गर्दीतून फिरत लोकांना मदत करत होते, स्टॉल, विक्रेते, आणि लोकांच्या अडचणी सोडवताना दिसत होते, बाईकवरील पोलीस गर्दीप्रवाह सुरळीत करत होते. मी कर्नाटक चित्रकला परिषदेच्या प्रवेशद्वाराशी पोहचत आहे हे लक्ष्यात आले. थोड्यावेळापूर्वीच उदघाटनाचा औपचारिक समारंभ आटपला होता,समारंभला मंत्रीगण आणि इतर मान्यवर यांची बाहेर निघायची लगबग सुरु होती. १०-१५ मिनिटांत हे सोपस्कार पार पडले अन पुन्हा स्पीकरवरून स्वागताच्या विविध घोषणा द्यायला सुरुवात झाली ! प्रचंड उत्सवी माहोल आता टिपेला पोहोचला होता!
यावर्षी परिषदेचा सुवर्ण महोत्सव होता त्यानिमित्त परिषदेच्या प्रवेशद्वारापाशीच " 50 " या अंकाचे त्रिमिती आकारातील भले मोठे शिल्प उभे होते, या सुवर्ण महोत्सवाच्या वर्षीच मी चित्रसंते बघायला यायचं हा खरंच सुवर्णयोग होता !
सुवर्ण महोत्सवानिमित्त परिषदेने तयार केलेले लाकडी कोरीव चौकटीतील परिषदेचे सुरेख बोधचिन्ह :
या वर्षीच्या चित्रसंतेचा शुभंकर म्हणून २० फुटी हत्तीचे अभिनव पुतळा उभा केला होता, तारेचा सांगाडा आणि त्यावर कॉटनवेस्टचा पृष्ठभाग, आणि त्यावर विविध दागिने, हे सर्व चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनविले होते ! या दोन्हीभोवती फोटो आणि सेल्फी काढणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती !
परिषदेची मुख्य इमारत वरून सोडलेल्या विविधरंगी पताका ल्यालामुळे नववधूसारखी भासत होती !
आतली प्रचंड गर्दी पाहून मी इथं नंतर यायचे ठरविले. बाजूच्या रस्त्यांवर भटकंती करायला घेतली !
शेकडो विषयावरची पेंटिंग्ज होती, चित्रकारांची क्रिएटिव्हिटी पाहून थक्क व्हायला होत होते ! एकेका स्टॉलवर बराच वेळ जात होता.
कलाविषयक ऍक्टिव्हिटी सुरु होत्या, उदा. बॉडी पेंटिंग केलेली माणसे लक्ष वेधून घेत होती, बॉडी पेंटिंग करणाऱ्या कलाकारांभोवती गर्दी होती, लोक कुतूहलाने "कोणते रंग वापरतात, वाळायला किती वेळ लागतो, काही होत तर नाही ना" वै, वै. कुठं फूट बॉडी पेंटिंग सुरु होते, रंगांच्या टबमध्ये तळपाय बुडवायचे अन अंथरलेल्या कागदावर चालायचं अन विविध डिझाइन्स तयार करायची, रस्त्यावर कॅनवास अंथरून आणखी वेगळे सामूहिक पेंटिंग करण्याचे प्रयोग चालले होते, कुठे कंपन्यांचे स्टेशनरी प्रचारासाठीचे स्टॉल्स होते, लोकांना मोफत रंग, ब्रश आणि कागद देऊन त्यांना चित्रं काढण्यासाठी उद्युक्त केले जात होते. फिरत्या खाद्यविक्रेत्यांची संख्या चिकार होती ! चहा, कॉफी, बिस्किटे, वडे, चिवडा शेंगदाणे वै.
खुप मजा येत होती, लहान पोरासारखे जत्रेत हरवायला झाले होते. आता दीड-दोन वाजत आलेले, भुकेची वेळ झालेली, चालून थोडा थकलो पण होतो, ब्रेकची गरज होती. इकडंतिकडं खाण्यापेक्षा सरळ परिषदेच्या कँटीनमध्ये जाऊन म्हणून परिषदेत शिरलो, गर्दी थोडी कमी झाली होती, लगेचच कॅफे होता "कामत कला-रुची कॅफे, भारी नांव दिलं होत. थोड्याच प्रतीक्षेनंतर एकटा असल्यामुळं कोपऱ्यात जागा मिळाली, (एकटेपणाचे फायदे :-) ) झकास जेवण झालं, कडेला येऊन झाडाखाली कट्टयावर थोडी विश्रांती घेतली.
परिषदेचा परिसर सुंदरच होता, आत देखील बरेच स्टॉल्स लागले होते, त्यात लोककला, कपडे, भांडी, फर्निचर आयटेम्स वै होते. देखील विविध डेमो चालू होते, एका वेगळ्या जागेत मुलांसाठी वेगळा विभाग केलेला होता, त्यात मुलं चित्रं काढणं आणि रंगवणं यात रंगून गेली होती ! बघता बघता साडेतीन वाजायला आले, परिषद बघायला पुन्हा यायचं नक्की केलं, आणि परिषदेचा परिसराचा निरोप घेतला !
बाहेर येऊन पाहतोय तर ही गर्दी ! .... रस्ते खचाखच भरलेले, आता या तोबा गर्दी, अक्षरश: वाट काढत बाहेर यायला लागणार !
या फोटो वरून गर्दीची कल्पना यावी !
जनांचा प्रवाहो चालिला :
मी ही या जनसागरात स्वतःला लोटून दिले ! न पाहिलेल्या रस्त्याला लागून उरलेले स्टॉल्स पाहायला सुरुवात केली. पुन्हा सकाळ सारखं स्टॉलपुढं रेंगाळणं, माणसं, गर्दी, कलाकृती निरखण, काही चित्रकार / स्टॉलवाल्यांशी गप्पा मारणं यात एकदिड तास कसा निघून गेला कळलंच नाही !
आता सहा वाजत आलेले, चित्रसंतेला बंद व्हायचे वेध लागले, काही स्टॉल्सची आवराआवर देखील सुरु झाली होती. मी आता कुमार कृपार रोडच्या टोकाशी परतलो होतो. हा पूर्ण दिवस असा सुंदर आणि समृद्ध केल्याबद्दल कर्नाटक चित्रकला परिषद आणि चित्रसंतेला निरोप दिला तो परिषदेच्या आवराला पुनः भेट द्यायचची ठरवूनच.
________________________________________________________________________________________________________________________________
चित्रसंतेच्या दोनच आठवडयांनी म्हणजे रविवारीच पुनः कुमार कृपाला पोहोचलो, आता वृक्षराजीतला निवांत रस्ता आणखी सुंदर भासत होता, सुट्टीच्या दिवशीची सकाळ, वाहनांनी फारशी वर्दळ नसल्यामुळं झाडाखालच्या सावलीतून रमतगमत परिषदेच्या आवारात प्रवेश केला ! झाडांच्या महिरपीत परिषदची इमारत खूपच छान दिसत होती. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर हिरवळ आणि वृक्षराजी लक्ष वेधून गेट होती. सुट्टीमुळे सर्वत्र शांतता होती.
प्रवेशद्वारातून दिसणारी परिषदेची मुख्य इमारत :
परिषदेची मुख्य इमारत, जवळून :
परिषदेची इमारत उभ्या पताका चित्रसंतेच्या आल्हाददायक खुणा अजून मिरवत होती. पोर्चमध्ये बसायला छानशी बाकडी होती.
लाकडी फ्रेम वरील कर्नाटक चित्रकला परिषदेचे बोधचिन्ह आणि वेगवेगळ्या आर्ट गॅलरींच्या नावाचा फलक :
इथं एकूण १७ आर्ट गॅलरीज आहेत, त्यापैकी १३ कायमस्वरूपी आहेत (या फलकात १३ च नमूद केल्या आहेत)
उदा. म्हैसूर पारंपरिक चित्रकला संग्रहालय , लोककलासंग्रहालय , आंतरराष्ट्रीय चित्रकला संग्रहालय , चर्मबाहुल्या कला संग्रहालय इ.
कर्नाटक चित्रकला परिषदेची स्थापना १९६० साली एम. आर्य मूर्ती आणि प्रा. एम. एस. नंजुंदा राव यांनी केली.
नंतर काही वर्षातच कर्नाटक शासनाने दिलेल्या अडीच एकर बंगळुरू शहराच्या मध्यवर्ती भागात परिषदेची वास्तू उभी राहिली.
फलकावर नमूद केलेल्या पैकी कलाप्रेमी, उद्योजक हर किशोर केजरीवाल यांचा देखील स्थापनेच्या वेळी मोठा सहभाग होता.
त्यांनी त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक कला संग्रहातील हजारो कलाकृती परिषदेकडे सुपूर्द केल्यात आणि फलकात नमूद केल्यानुसार याचे कायमस्वरूपी संग्रहालय आहे हर किशोर केजरीवाल यांच्या नावाने दिले जाणारे यंग आर्टिस्ट्स अवॉर्ड मानाचे समजले जातात.
रशियन वास्तूशिल्पकार आणि चित्रकार स्टेलोस्लाव्ह रोएरीच यांनी देखील परिषदेच्या कामात मोठा सहभाग दिला. चित्रकार स्टेलोस्लाव्ह हे उत्तर आयुष्यात ते भारतात बेंगळुरूमध्ये स्थायिक झाले, याच शहरात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी गतकाळातील प्रख्यात अभिनेत्री देविकाराणी (ज्यांना "फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा" या नावाने गौरविले जाते) यांच्याशी विवाह केला. बेंगळूर शहर आणि उपनगरात वृक्षराजी लावणे या कार्यात त्यांनी मोठं योगदान दिले ! भारत शासनाने त्यांना १९६१ साली पदमभूषण पुरस्काराने गौरवले होते ! त्यांनी केलेली पं. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांची सुंदर पोर्ट्रेट्स यांना दिल्लीच्या संसद भवनात माँनाचे स्थान आहे. चित्रकार स्टेलोस्लाव्ह रोएरीच आणि त्यांचे वडील चित्रकार निकोलस रोएरीच यांच्या कलाकृतींच्या फलकात नमूद केल्यानुसार वेगवेगळ्या कायमस्वरूपी गॅलरीज आहेत.
स्टेलोस्लाव्ह रोएरीच यांनी केलेले पं. जवाहरलाल नेहरू यांचे एक सुंदर पोर्ट्रेट :
परिषदेचे बोधचिन्ह हे "अंकित केलेला व्याघ्र" अर्थात वाघ हा होयसाळ साम्राज्याच्या बोधचिन्हांवरून प्रेरित आहे. (निधड्या छातीच्या शूरवीर अश्या होयसाळ राजाने वाघावर हल्ला करून त्याच्या गुरुचा जीव वाचवला होता. वाघाशी लढाई करणारा साळराजा हे होयसाळ साम्राज्याचे बोधचिन्ह आहे)
परिषदेच्या या सर्व गॅलरीज मधून फिरताना विविध कलाकृती पाहत वेळ कसा गेला ते समजले नाही. चित्रसंते पाहताना जशी मुग्धअवस्था झाली तशीच याही वेळी झाली. माझा भरपूर वेळ गेला तो म्हैसूरशैली आर्ट गॅलरीत. अतिशय आकर्षक असणारी म्हैसूरशैली पेंटिंग्जमध्ये अजूनही पारंपरिक पद्धतीने तयार केलेले रंग आणि ब्रश वापरले जातात. चित्रकार भास्कर यांनी मला तपशीलवार माहिती सांगितली आणि त्यांच्या म्हैसूरच्या आर्ट गॅलरीला आणि वर्कशॉपला भेट देण्याचे आमंत्रण दिले.
बाजूच्या फलकावर नविन प्रदर्शनाच्या पोस्टर " मिलिंद मुळीक, प्रफुल्ल सावंत" हे माझे मराठमोळे कलाकारांचे नाव मिरवित हे बघून सुखावलो. दोघांचीही जलरंगातील प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहण्याच्या योग दोन-चार वेळा आलेला ! पुढच्या आठवड्यात पुन्हा इथं यावे कि काय प्रदर्शन पाहायला असा विचार मनात डोकावून गेला !
आवारातील मन प्रफुल्लित करणारी वृक्षराजी आणि सुंदर मंदिर:
झाडांच्या सावलीत परिसरातले स्टॉल्स, इथं कायम कलाविषयक विविध स्टॉल्स लावलेले असतात. विकांताला भेट देणाऱ्यांची इथं गर्दी असते.
मी ही या प्रदर्शनात जनरल फेरी मारली.
हे आहे आर्ट ऍक्टिव्हिटी सेंटर:
पोर्ट्रेट आणि फिगरेटीव्ह पेंटिंग स्टुडिओ:
शिल्पकला विभागाच्या अंगणाची झलक:
मग मी आर्ट ऍक्टिव्हिटी सेंटरला ही भेट दिली. दुपारचा दीड वाजत आलेला होता. आवारातील चित्रकला महाविद्यालयातले सत्र संपलेले होते, कुलूप लावतच होते, पण मी लांबून बघायला आलोय म्हटल्यावर तेथील सर मला पोर्ट्रेट आणि फिगरेटीव्ह पेंटिंग स्टुडिओ, शिल्पकला विभाग स्वतः घेऊन गेले आणि माहिती दिली. (कन्नडिगा माणसे लाघवी असतात याचा मला वेळोवेळी अनुभव आला) अर्ध्या तासाच्या या सफर नंतर मी कॅफेटेरियाकडे मोर्चा वळवला.
कॅफे इमारत:
जेवण करून मला पुढे काडू-मल्लेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मल्लेश्वरम या उपनगराला भेट द्यायची होती कारण हे मंदिर व्यंकोजीराजे भोसले (छ. शिवाजी महाराज यांचे सावत्र भाऊ, तंजावूर साम्राज्याचे राजे) यांनी १७ व्य शतकात बांधले होते !
चित्रसंते या चित्रांच्या महाजत्रेला आणि कर्नाटक चित्रकला परिषदेला दिलेली भेट मला अविस्मरणीय अनुभव देऊन गेली, खुप श्रीमंत करून गेली !
प्रतिक्रिया
23 Jul 2020 - 2:35 pm | अभ्या..
शाही मेजवानीच जणू
मस्त लिहिलेत चौको सर.
23 Jul 2020 - 2:49 pm | संजय क्षीरसागर
मस्त झालीये पोस्ट > चित्रसंतेमधे फिरुन आल्यासारखं वाटलं !
23 Jul 2020 - 4:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
अरे वा!! तुमचा रविवार मस्तच गेलेला दिसतोय, पण मलाही चित्रसंते फिरुन आल्याचा फिल आला. पुढच्या बंगलोर ट्रिपमध्ये मंदिरे वगैरे फिरण्यापेक्षा इथे भेट देइन.
अवांतर- सध्याच्या लॉकडाउनच्या काळात एव्हढ्या गर्दीची चित्रे बघुनही सुखावह वाटतेय. कधी हे संकट दुर होईल आणि जीवन मुळपदावर येईल तो दिवस भाग्याचा.
23 Jul 2020 - 5:54 pm | गणेशा
छान.. आवडले ही चित्र जत्रा
23 Jul 2020 - 6:27 pm | सिरुसेरि
सुरेख माहिती .
23 Jul 2020 - 8:31 pm | कंजूस
सुरेख. वर्षाचा पहिला रविवार म्हणजे हे जानेवारीत ना? का कन्नड पंचांगाचे नववर्ष?
बाकी हा आइटम लक्षात ठेवेन बेंगळुरू भेटीसाठी। १५ -१६-१७ आगस्टला लालबागेत फुलांचे प्रदर्शन असते ते खूप वर्षांपूर्वी पाहिले आहे. ( असा काचमहाल बागलकोट नगरपानेही नुकताच बांधून घेतला आहे. )
बाकी बेंगळुरुची हजार मिटरस उंचीही वातावरणात गारवा आणते त्यात लोकांचे अगत्य भर घालते.
24 Jul 2020 - 11:59 am | रातराणी
मस्त!! तुमच्यामुळे आम्हीही अनुभवली चित्रमय सफर!
24 Jul 2020 - 12:32 pm | अनिंद्य
चित्रमय सफरीचे चित्रदर्शी वर्णन !
कलाप्रेम बहरत राहो हीच शुभेच्छा तुम्हाला !
24 Jul 2020 - 12:34 pm | अनिंद्य
मुंबईत कालाघोडा फेस्टिवल साधारण असाच रंगीबेरंगी असतो.
24 Jul 2020 - 1:49 pm | श्वेता२४
सफर घडवून आणली
24 Jul 2020 - 3:07 pm | कंजूस
>>कालाघोडा फेस्टिवल साधारण असाच रंगीबेरंगी असतो. . >>
पण तिथल्या छोट्याशा गल्लीत जे असतं त्याच्या दहापट गोष्टी प्रायोजक मंडळी मुलांसाठी घडवून आणतात.
--------
संते = बाजार.
24 Jul 2020 - 10:37 pm | अनिंद्य
चित्रसंते आयोजक कलांचा थोडाबहुत परिचय सर्वसामान्यांना करुन देतात, लहान मुलांना विशेष सहभागी करुन घेतात हे उत्तमच आहे.
24 Jul 2020 - 8:13 pm | मदनबाण
काही वर्षांपूर्वी जहांगीर आर्ट गॅलरीत गेलो होतो त्याची आठवण आली !
जाहिरात [ हल्ली जाहिरात करायची बरीच संधी मिळु लागली आहे ! ;) ] :- पेटिंग्स बाय विजयराज बोधनकर अँड अरविंद वाघ (भाग १)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ari Ari Ari... :- Bombay Rockers
25 Jul 2020 - 9:25 am | Jayant Naik
हि अशी निसर्गाची आणि गर्दीची चित्रे बघून आता समाधान मानायचे दिवस आले आहेत. मस्त सफर.
25 Jul 2020 - 10:08 am | प्रचेतस
एकदम वेगळ्या विषयावरचा लेख.
ही चित्रसफर खूप आवडली.
25 Jul 2020 - 11:07 am | सुमो
आवडली चित्रमय सफर.
25 Jul 2020 - 12:29 pm | तुषार काळभोर
भव्य कार्यक्रम दिसतोय. गर्दी ने भरलेला रस्ता बघून भरून आलं.
माझा अन कलेचा दूरगामी , अगदी आस्वाद घेण्यापुरता सुद्धा, संबंध नसला, तरी सर्व कलाकारांविषयी (विशेषतः गायन अन चित्रकला) मनात अपार आदर आहे.
25 Jul 2020 - 10:49 pm | बबन ताम्बे
धन्यवाद चौको. तुमच्या बरोबरच आम्हालाही चित्रसंतेची सफर घडवून आणलीत. एव्हढी तुफान गर्दी होते म्हणजे हा कलामहोत्सव फारच पॉप्युलर असणार. फोटो आणि ओघवत्या लिखाण शैलीमुळे लेख वाचनीय आहेच, पण महाराष्ट्राबाहेरील एका मोठ्या कला महोत्सवाची तुमच्यामुळे ओळख झाली.
असेंच उत्तमोत्तम लेख येऊद्यात.
28 Jul 2020 - 5:31 am | विजुभाऊ
अरे वा किती मस्त.
धन्यवाद. एका वेगळ्या जगाची सफर घडवून आणलीत
28 Jul 2020 - 10:55 pm | अत्रुप्त आत्मा
तुमच्याबरोबर आम्हालाही मस्त सफर घडवलीत. धन्यवाद.