मध्यंतरी माझ्या मंगलोरी बन च्या पाककृतीमध्ये कंजूसकाकांनी बिस्कीट अंबाडेची पाककृती विचारली होती. त्याला त्या धाग्यावर प्रतिसाद देण्यापेक्षा इथेच पाककृती लिहीतेय. जेणेकरुन सर्वांना एक नवी पाककृती कळेल. बिस्कीट अंबाडे म्हणजेे आपल्या सोप्या भाषेत उडीद डाळीची भजी. याला बिस्कीट अंबाडे नाव का ? तर या भजीचे वरचे आवरण चावतावा अगदी बिस्कीटासारखा कुरकुर आवाज येतो व अंबाडे म्हणजे गोल आकार. म्हणून याचे नाव बिस्कीट अंबाडे असे पडले. याचा उच्चार मात्र ते बिस्कूट अम्बडै असा काहीसा करतात. बिस्कीट अंबाडे हा पदार्थ माझ्यासाठीही नवीन होता पण सोपा होता. त्यामुळे लगेच करुनही बघितला. याचे पीठ आपल्या मेदूवड्याचेच . पण चवीला अतीशय चविष्ट लागतात, शिवाय पटकन होतात.
साहित्य - दीड वाडी उडीद डाळ, 5-6 कडीपत्त्याची पाने, पाव चमचा हींग,1 चमचा किसलेले आले/बारीक कापलेले आले , दोन-तीन बारीक मिरची चिरुन,1 चमचा ओल्या नारळाचे बारीक तुकडे (वैकल्पिक), चवीनुसार मीठ
कृती - उडीद डाळ 2 तास भिजवावी. नंतर पाणी न घालता मिक्सवर बारीक वाटून घ्यावी. मिक्सर चालू बंद-चालू बंद करत डाळ वाटावी म्हणजे मिक्सरवर लोड येत नाही. अगदीच वाटले तर किंचीत पाणी घालावे. आता या वाटलेल्या डाळीत बारीक चिरलेली कडीपत्त्याची पाने, मिरची,आले,हिंग,खोबरे व मीठ घालून एकसारखे करावे. कढईत तेल तापत ठेवावे व पाण्याचा हात लावून गोल आकाराच्या भजी हातात वळवून तळाव्यात किंवा पीठ थोडे पातळ असेल तर चमच्याने भजी सोड्याव्यात. थोड्याच वेळात टम्म फुगुन येतात.
मी हाताला पाणी लावून पीठ हातात घेतले व मेदूवड्याला जसे पहिला गोल आकार वळवतो तसा छोटा आकाराचा गोल तयार करुन तेलात सोडला. गॅसची ज्योत मध्यम ठेवावी नाहीतर भजी आतून कच्ची राहू शकते. भजी तळत आली की गॅसची ज्योत वाढवून तांबूस रंगावर तळून घ्यावेत. थक्यतो गरमगरम खावेत. हा पदार्थ चटणी,सांबार यांसोबत खाण्याची पद्धत आहे.पण नुसतेही चवीष्ट लागतात.
प्रतिक्रिया
21 Jul 2020 - 1:37 pm | यश राज
फोटो मस्त आलाय. अगदी ऊचलुन लगेच खावेसे वाटतेय.
21 Jul 2020 - 1:48 pm | अत्रुप्त आत्मा
.......................................
21 Jul 2020 - 2:17 pm | Gk
महाराष्ट्रात हा श्राद्धाचा राखीव पदार्थ आहे ना ?
21 Jul 2020 - 2:28 pm | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. @जीके - महाराष्ट्रात असे उडीदाची भजी श्राद्धाला करतात असं माझ्या माहितीत तरी नाही.
21 Jul 2020 - 3:31 pm | प्रचेतस
हिंजवडीत आंध्रा मेसला अशी भजी मिळत, मस्त लागतात एकदम.
21 Jul 2020 - 5:37 pm | कंजूस
धन्यवाद हो इतक्या ताबडतोब विचारून करून दिलेत.
एका मंगलोरी मुंजीत हे नाश्त्याला होते. खरोखरच बिस्किटासारखे वरून कुरकुरीत होते. मंगलोरी असावा शेजारी.
21 Jul 2020 - 6:21 pm | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! कंजुसकाका धन्यवाद तर तुम्हालाच द्यायला पाहिजे. कारण तुमच्यामुळे हा चविष्ट पदार्थ कळला. आता वरचेवर करत जाईन.
21 Jul 2020 - 6:55 pm | अनिंद्य
झकास - हाय प्रोटीन नाश्ता आयटेम !
यालाच चेन्नईचं पब्लिक बोन्डा किंवा मैसूर बोन्डा म्हणतं बहुतेक, चटणीऐवजी रस्सम सोबत देतात.
21 Jul 2020 - 7:04 pm | गवि
छान.
एस के पकोडा म्हणजे हेच का? साऊथ कॅनरा यावरून मूळ नाव आलं म्हणतात.
तो किंचित गोडसर असतो. किंवा कधीकधी आत कांदाही असतो.
21 Jul 2020 - 7:57 pm | श्वेता२४
@अनिंद्य- बरोबर आहे हा पदार्थ वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. याला उदीन बोंडा किंवा मैसूर बोंडा पण म्हणतात.
@गवि - एस के पक्षाचे बद्दल ठावूक नाही पण तुम्ही म्हणताय त्यापेक्षा हा पदार्थ वेगळा आहे. चव साधारण मेदूवड्यासारखी लागते. यात कांदा घालत नाहीत
21 Jul 2020 - 8:12 pm | जेम्स वांड
थोडेसे "सिझन्ड" दहिवडे वाटतात, पण प्रकार नक्कीच वेगळा आहे, मजेशीर नाव अन इतिहास
21 Jul 2020 - 8:27 pm | चौथा कोनाडा
भारी पाकृ ! फोटो किलर !
काहीवेळा खाण्यात आलेत, पण बिस्कीट अंबाडे हे नांव पहिल्यांदाच ऐकले !
21 Jul 2020 - 10:49 pm | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@जेम्सभाऊ - सिझन्ड दहिवडे म्हणजे काय ते नेमकं कळलं नाही. दहीवडा, मेदुवडा साठी डाळ किमान ४ तास भिजवून मग वाटतात व पीठ भेटतात त्वयामुळे त्यांचे आवरण कुरकुरीत व आतुन स्पॉंन्जी लागतो. बिस्कीट आंबडे मात्र केवळ १-२ तास डाळ भिजवून करता येतात. वरचे आवरण कडक व आतुन मऊ असते. खरोखरच खाताना बिस्कीट सारखा कुरकुर आवाज येतो. हा मुख्य फरक आहे.
21 Jul 2020 - 10:50 pm | श्वेता२४
*पीठ फेटतात असे वाचावे
24 Jul 2020 - 12:11 pm | रातराणी
मस्त!! पाकृ आणि तिचे नाव दोन्ही आवडले!
24 Jul 2020 - 12:24 pm | श्वेता२४
:)
24 Jul 2020 - 8:26 pm | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ari Ari Ari... :- Bombay Rockers
24 Jul 2020 - 8:44 pm | रुपी
मस्तच. खूप आवडता पदार्थ. खरं तर मेदूवड्याला आकार देत बसण्याऐवजी मी हेच वडे आणि सांबर करते. असेच खायलाही आवडतात आणि कमी वेळ भिजवावे लागतात म्हणून लहर आली की बनवले जातात :)
मैसूर बोंडामधे मैदा असतो ना?
24 Jul 2020 - 9:18 pm | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@रुपी - मला नक्की कल्पना नाही. विचारावं लागेल
24 Jul 2020 - 9:23 pm | गणेशा
उडीत वडे च म्हणतो आम्ही याला..
बिस्कीट अंबाडे पाहिल्यान्दा ऐकले नाव..
24 Jul 2020 - 9:27 pm | श्वेता२४
कंजुसकाकांकडून :))
5 Aug 2020 - 3:54 am | जुइ
पाकृ आणि फोटो आवडले!