लॉकडाऊन झाले तेंव्हा आपल्या अनेकांच्या मनीही नसेल की आपण पुढे पुढे काय काय करू? आमचेही तसेच जाहले. आधी महिन्यातून एखादवेळा आवडत्या हाटीलात सकुटुंब खादाडीला जाणे. पंजाबि डिश,नन्तर आईस्क्रीम पानबीन यथासांग करून घरी येणे हे अनुष्ठान असायचे. कधीमधी मटकीभेळ ,चायनीज,वडापाव असे अनंत चराळ खाद्य खाणे. हे ही होतेच. पण या कोविडा--नाईनटीना (हे लक्ष्मीरमणा गोSssविंदा! च्या चालीवर वाचावे.) च्या अवतारानी सगळी खाद्य अनुष्ठाने बंद पाडली. पहिला महिना दीड महिना कोविडा नाईनटिनाच्या भयावह छायेत गेला, आणि नन्तर मग बाहेर चरणे एकंदरीतच परवडणारे नाही हे लक्षात आल्यावर आमच्यात लहानपणापासून दडलेला बल्लव हळूहळू डोकं वर काढू लागला. आणि मग सुरू झाली आमची कधीतरी बल्लवगिरी!
आणि आम्हा हौशी नवरबल्लवांना लॉक डाऊन म्हणजे खरतर ओपनअप झाल्यासारखं वाटू लागलं.(नवरबल्लव आणि सुवरबल्लव अश्या हौशी बल्लवांच्या अर्थात गेले लॉकडाऊनभर लोकांनी पाककृतींच्या टाकलेल्या फेसबुकी जिलब्या पाहता पाहता यु ट्यूब वर काही अप्रतिम पाककुशल पाक(कला)कृतीही पहाण्यात आल्या आणि आमच्या मनाने मग असेच काहीतरी *छाण करायचे घेतलेच!
(*पांडुचा शब्द! ;) )
मग काय क्रावे ब्रे!? असा इचार करता करता जरा बायडीला खुश करावे असे मनात ठरवून श्री(पनिर)गणेशा करायचे ठरविले. तश्या पूर्वीपासूनच पनिरच्या अनेक पाककृती कधीमधी अन्यत्र पहात होतोच त्याचे एक प्राथमिक मिश्रण मनात झालेले होतेच. म्हटलं तेच हाताशी घेऊ आणि करू पहिला खेळ!
तश्यातच फेसबुकवर लोकांचे खादाडीचे नित्य नूतन पोस्टिंग फायरिंग केल्यासारखे सुरू होतेच.
त्यात ही पनीरची पहिली पाककृती पाहिली, आणि ती ही एका बाप्यानेच केलेली सापडली. मी तर त्यानि टाकलेल्या व्हिडीओनीच एव्हढा घायाळ झालो हुतो,की कदि येकदा करू आणि तिला प्वाटात भरू,अस झालतं!
पनीरही विकतचे नको,(कोविडा नाईनटीनाच्या भीतीने!!!) घरीच करू,असे ठरले
मग चांगले पनीर घरी कसे करावे इथून संशोधन सुरू झाले. कोविड लॉक डाऊन पूर्वकाळात पनीर करायचा फस(फस)लेला प्रयोग व त्यावर होममिनिस्टरी कडून पडलेले दणके मनात ताजे होतेच. मग म्हटलं आता खरंच कम्बर कसून लढाईला उतरायला हवे.
म्हणून मग सवयीमुळे युट्यूब सर्च दिला आणि एका पठ्ठ्यानि दाखवलेलं पनीरचं तंत्र मला असं आवडलं की त्यामुळेच पुढच्या सगळ्या पंजाबि भाज्या पनीरवाल्याच केल्या गेल्या,इतकं त्यांनी केलेलं पनीर
जबऱ्या होतं. मग ते तंत्र व मन्त्र शुद्ध पनीर बनाने की विधी प्रमाणे अगदी तंतोतंत नियम पाळून काहीश्या पोथीनिष्ठेने 2लिटर दुधाचे छान अगदी माऊ माऊ पनीर तयार केले.
मग घरात बाकी लागणाऱ्या भाज्या,मसाले व इतर जिन्नस अपडेट केले.चला...मनात म्हटलं आता दारुगोळा तयार झाला,प्रत्यक्ष रणमैदान उद्या सकाळी(च) ताब्यात मिळणार असलेने त्याची तयारी करावी,म्हणून मग पुन्हा दुपारी व रात्री निद्रासमयात परत युट्यूब व अन्यत्र थोडा गृहपाठ केला. त्याचा फायदा इतकाच झाला कि आम्ही ब्याचलरी जिंदगीत स्वयं-पाकात ज्या महान व लहान चुका करत होतो त्या मनात बर्याचश्या उजळून निघाल्या.
आता प्रत्यक्ष रणमैदान:- तर .. सक्काळी सक्काळी लवकर उठून (म्हणजे आमचे दिव्य बालक उठायच्या आत! ) पूर्वतयारी करायला घेतली. धने पावडर,कांदालसून मसाला,काश्मिरी लाल तिखट,आल्ल+लसूण पेस्ट२चमचे ,३ तमालपत्र,२बोटं-दालचिनी,लावंगा४,काळिमिरी७/८, कडीपत्ता,3कांद्याची पेस्ट,2टमॅटोची प्युरी, आणि पनीर.. हुररररररर ...
कांदा लसुणाची पेस्ट, करून टमाटो मिक्सरला लावी पर्यंत आमचं दिव्य बालक उठलं! मग त्याचे प्रथम खान-पानापासून ते स्नानापर्यंत सर्व 'आवरणे' आवरणेचे झाले. पाऊण एक तास त्या धामधुमीत गेल्यावर आम्ही मग होमकुंडाकडे वळलो. ब्याचलरी लाईफ मध्ये इंडक्शन श्टो नामक होमकुंडाचा स्वयं पाकी अंदाज आलेला असल्यामुळे त्याचा वापर करायचा ठरवला. (आता खरी बात मंजे हिला मी गॅसवर पोळ्या चालू असताना 'सारखा मधे मधे' होतो,म्हणून मी महाभारतातल्या अ-ज्ञात-वासात बल्लव झालेल्या भिमाचं स्मरण क्रूण "आता दाखवतोच विंडक्शनवर करून पनीर भाजी,माझी ताजी ताजी!" असा पण केला. ;) हर हर महादेव!)
प्रथम इंडक्शनवर कढई चढवली आणि 400/600* च्या धिमाग्नीवर तेल तापवणे सुरू केले. (* सदर नंबरच्या तंबाखूचे पान आठवलेच लिहिल्या लिहिल्या! 22वर्षांची पुण्याई,दुसरे काय!? =)) ) मग तेल तापल्यावर जिरं टाकून तडतडल्यावर सगळे खडे मसाले परतायला घेतले.
मधेच आमचे छळू बालक "बाबा गणपतीबाप्पाचा लाडू दे लाडू दे!" करत भुणभुणू लागले. मग त्याला एका डिशमधे शेंगदाण्याच्या लाडूचे तुक्के तुक्के करून दिल्यावर पुन्हा गाडी मेन लाईन वर घेतली.
परतलेल्या खड्या मसाल्यावर कांद्याची पेस्ट टाकली व चांगली लाल होईपर्यंत परतली
ढोबळी मिरचीचे तुकडे जे मूळ कृतीत शेवट टाकले होते ते आम्ही जादा फ्राय व्हावे व चव मसाल्यात उतरावी म्हणून आधीच एड केले. आणि पुढे 5मिनीटं झाकण मारून आमच्या दिव्य बालकानी लाडूचे बाहेरच्या हॉलमधे केलेले वाटप शोधून शोधून एकत्र केले व त्यास खिडकीत हुबा क्रुण कोकिळा काऊ आणि त्याचे भाऊ दाखवत दोन मिनिटात खायला लावले.. त्यांनी निम्मा लाडू स्वतःला व निम्म्याचे तुकडे- डेस्कटॉप, शिलाई मशीन,त्याचा टेडी,आणि लाल भगव्या झेंड्याची काडी एव्हढ्याना धमकी देऊन म्हणजे दाबून चिकटवून खायला लावले होते..हे लफडं निस्त्रे पर्यंत आतून 'आहो ते जळेल!' असा एक कडकडीत इशारा पडला.
मग पुन्हा तिकडे वळायचा होतो ते वळलो.झाकण काढलं आणि मसाले टाकण्याऐवजी टोमॅटो प्युरी टाकली.
मग मनात स्वतःला दोन आणि परिस्थितीला तीन अश्या एकंदर पाच श्या दिल्या आणि डोकं थंड करून बाकीचे वरचे मसाले टाकून तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतली, पाणी घातले, पुन्हा परतली असे सर्व पुढील सोपस्कार केले.
आणि मग पनीर टाकले
नन्तर जरा वेळ ग्रेव्ही उकळू दिली आणि मग ताजी साय टाकली..
यानी खडे मसाले व टोमॅटो यांसह ग्रेव्हीला एक झोमेटो चव प्राप्त होते हे मधेच चव घेऊन पाहिल्यावर कळले! मग हे सर्व 5मिनिटे झाकण मारून एकत्र पकू दिले. आणि झाकण काढल्यावर पाहिले तर ग्रेव्हीचा आधीचा आस्मानी रंग जाऊन सुलतानी प्राप्त झाला होता.
मग मनात म्हटलं जमलं असावं आपल्याला बरंच. घाईघाईत केलाय खेळ, काय माहीत चिवडा होतो की भेळ!?
पण मग जेंव्हा ताट भरून पहिला घास माझ्या बायडीला दिला तेंव्हा कळलं नेमकं काय झालंय ह्या खेळाचं. पहिली काही सेकंद तिचा चेहेरा शांत झाला!
.
.
मी मनात म्हटलं, फसला खेळ! :( (दुत्त दुत्त!!!)
..
.
पण नन्तरच्या एका क्षणात तिनी एकच शब्द उच्चारला "व्वाह! हॉटेलच्या पेक्षा भाSssरी!!!"
म्या बी मंग मनात म्हनलं , "चला बायडी सुखावली,लॉक डाऊन सार्थकी लागलं!"
आता समारोपाला थोडं चवीबद्दल सांगतो. ही तिखट-थोडी आंबट-तेज चवीची भाजी आहे. टाईट तिखट हवं असेल तर क्रीम टाकू नये. पण तरीही सांगतो, ही भाजी तिखटवाली नाही. ही चिलिमिलीच!
तर मग भेटु पुन्हा अश्याच एखाद्या पनीर कृतीसह. जय कोरोना! जय लॉकडाऊन! जय ओपनअप!
प्रतिक्रिया
15 Jul 2020 - 10:04 pm | Gk
छान
15 Jul 2020 - 10:27 pm | चांदणे संदीप
मस्त चाललेय ओपनअप. येऊद्या असेच मजेदार लज्जतदार.
सं - दी - प
15 Jul 2020 - 11:34 pm | श्वेता२४
पाककृती चे मस्त वर्णन! फोटोही बेस्ट! आता करुन पाहायला हवं.
16 Jul 2020 - 12:26 am | Prajakta२१
छान
धन्यवाद
एकादशीचा उपास मोडू देऊ नका
हे बघून महत्प्रयासाने मन (नंतर करून खाऊ या भावनेने )आवरले आहे
16 Jul 2020 - 8:25 am | mrcoolguynice
मस्त, एक नंबर .....
16 Jul 2020 - 9:20 am | गवि
बुवा, मस्त जमलंय हो.
16 Jul 2020 - 12:43 pm | झेन
पनीर बनण्यापासून पूर्ण रेसीपी व्हाया लाडूचे तक्के तूक्के फक्कड जमले आहे. फोटो पण प्रेरणादायी आहेत.
16 Jul 2020 - 3:09 pm | प्रचेतस
खायला बोलवा अता घरी.
16 Jul 2020 - 3:48 pm | एस
ते लाख बोलावतील पण तुम्ही जाणार कसे टाळेबंदीत???
16 Jul 2020 - 4:02 pm | प्रचेतस
टाळेबंदी संपल्यावर जाऊ, हाकानाका :)
16 Jul 2020 - 4:47 pm | अत्रुप्त आत्मा
@खायला बोलवा अता घरी. >>>> आहाहाहाहाहाहा! पहा हे बोलते कोण? या आगोबाला बाजारू पावभाजी आवडत नै, म्हणून घरी केली आणि 4वेळा बोलाविले..एकदा बी आला नाही हा दुत्त दुत्त माणूस!!! फष्ट टाईमला ढणाजीराव मनजी हल्लीचे सगा आलते तवा पासून दिली टांग असा आगोबा हाये महान!
दु दु दु दु ... ल्लूल्लूल्लू..
16 Jul 2020 - 5:25 pm | प्रचेतस
=))
16 Jul 2020 - 5:52 pm | अत्रुप्त आत्मा
16 Jul 2020 - 3:49 pm | एस
अहाहा. पनीर अजिबात आवडत नाही. तेव्हा चिकन चिलीमिली बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.
16 Jul 2020 - 4:03 pm | प्रचेतस
पनीर हेच आमचे चिकन ;)
16 Jul 2020 - 3:59 pm | मूकवाचक
एकदम साग्रसंगीत जमलेला लेख!
16 Jul 2020 - 5:02 pm | कंजूस
बुवांचे तोंड आणि हात धरणाराही कुणी नाही हे पक्के झाले. पण ही पनीर चिलिमिली नसून
चिलिमिली पनीर
असावे एवढे पनीर घातले आहे.
16 Jul 2020 - 5:09 pm | अत्रुप्त आत्मा
17 Jul 2020 - 3:44 pm | अनिंद्य
पनीर झकास, कृती सांगण्याची स्टाईल त्याहून खास !
18 Jul 2020 - 1:43 pm | अत्रुप्त आत्मा
Gk, चांदणेसंदीप, श्वेता24 ,प्राजक्ता 21, मिस्टरकुलजिनियस, गवि, झेन ,एस ,मूकवाचक,कंजूस काका, अनिंद्य >>>