पोस्ट वॉरंटी वाहन दुरूस्ती, रिपेअर सेंटर्स, गॅरेजेस इत्यादी बाबत चर्चा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in तंत्रजगत
11 Jul 2020 - 4:16 am

एका व्हाअ‍ॅ गृपमधील झालेल्या चर्चेचा धाग्याच्या रुपाने गोषवारा घेतला गेला आहे. आपली मते येथे मांडावीत जेणे करून पुन्हा चर्चा होवून मत मतांतरात नवे मुद्दे पुढे येतील.

आपले जे काही वाहन असते भले ते दुचाकी असो, चारचाकी असो, तर ते वाहन वॉरंटी कालावधीत आपण अधिकृत देखभाल केंद्रात त्याची देखभाल करून घेत असतो. वॉरंटी कालावधी संपला की सर्वच कंपन्यांचे वार्षिक देखभाल करार असतात. असा करार केला तर, तिन अथवा चार प्रिव्हेंटिव्ह सर्वीसेस वर लेबर चार्जेस मध्ये सुट, स्पेअर पार्टवर सुट अशी ऑफर असते. तसेच किरकोळ दुरुस्तीचे पैसे ते लावत नाहीत.
आपल्यापैकी बरेच जण असा वार्षिक देखभाल करार आपल्या वाहनासाठी करत असतील.

काही जण असा करार करण्याऐवजी आपल्याला आवडेल त्या खाजगी गॅरेज मध्ये कसलाही करार न करता मनाप्रमाणे प्रिव्हेंटीव सर्वीस करवून घेतात. अनेक जण तर वाहनाकडे दुर्लक्ष करून असली प्रिव्हेंटीव्ह सर्वीसकडे लक्ष न देता वाहन केवळ ब्रेकडाऊन झाल्यावरच गरज असेल तरच दुरुस्ती करवून घेतात किंवा आवश्यक तो स्पेअर जुगाड करून चालवून घेतात.

वॉरंटी संपल्यानंतरच्या कालावधीत वाहनाचा वार्षिक देखभाल करार करावा का? भले तो करार अथोराईज्ड सर्वीस सेंटर मध्ये नसेल पण वार्षिक करार असेल तर आपण तिन चार महिन्यात वाहनाची सर्वीस आपण बळजबरी का होईना करवून घेत असतो.

काही म्हणतील की असल्या देखभाल करार करण्यापेक्षा तो न करवून ते पैसे वाचवून वाहन आपण आपल्या मर्जीच्या सर्वीस स्टेशनला सर्वीस करु शकतो.

तर मंडळी, चर्चेचा मुद्दा हाच आहे. वाहन वॉरंटी कालावधी संपल्यानंतर कसे देखभाल करावे?
पिरिऑडीक देखभाल करार करावा का?
न केल्यास वाहन कसे मेंटेन करावे?

=================================

अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटरमध्ये गाडी दुरूस्त अथवा ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करारामुळे होणारे फायदे:-
- अथोराईज्ड सर्वीस सेंटर मध्ये (किंवा तत्सम ठिकाणी ) ठरावीक कंपनी किंवा मेकच्याच गाड्या येत असतात. ( उदा. टाटा च्या मोठ्या गाड्यांसाठी वेगळे अन लहान गाड्यांसाठी वेगळे सर्वीस सेंटर आहेत.)
- कंपनी प्रशिक्षीत कामगार, मेकॅनीक उपलब्ध असतात. एखादा नवीनच मेकॅनीक जरी असेल तरी तो त्याच त्याच गाड्यांवर काम करून त्याचा हात बसून जातो.
- त्यांच्या कडच्या मेकेनीकला महिन्याचा पगार ठरलेला असल्याने कामे येवोत अथवा कमी येवोत त्यांना पगाराची शास्वती असते.
- काही मोठी अडचण (प्रॉब्लेम) असलेल्या गाड्या त्यातील मेकॅनीकला अनुभवानुसार दुरूस्तीला दिल्या जातात.
- गाडीच्या देखभालीसाठी सर्व टुल्स, स्पेअर्स हे एकाच छताखाली मिळतात. त्यामुळे कामाचा उरक वाढतो. उदा. इंजीनचे काम कराचे असेल तर काही गिअर किंवा पार्ट काढण्यासाठी योग्य तेच टुल लागते.
- तिन अथवा चार प्रिव्हेंटिव्ह सर्वीसेस वर लेबर चार्जेस मध्ये सुट, स्पेअर पार्टवर सुट अशी ऑफर असते. तसेच किरकोळ दुरुस्तीचे पैसे ते लावत नाहीत.
- शक्यतो असे सेंटर स्वच्छ, प्रकाश असलेले, प्रसन्न असतात. जेवणाच्या वेळा, सुटीच्या वेळा, रजा आदी असल्याने त्याचा सुयोग्य परिणाम कामावर होतो.
- स्पेअर हे डुप्लीकेट असण्याचा प्रश्न येत नाही. किंमत ठरलेली असते. त्यामुळे ग्राहकाला फसवले गेल्याचा फील येत नाही.
- ग्राहकाच्या सुविधेतेमध्ये चहा, पाणी, स्वच्छतागृह आदी सर्व असते. ( अर्थात याची किंमत बिलात वसूल होत असणार पण ती सर्व ग्राहकांमध्ये विभागली जाते.)
- जे जे स्पेअर ठरावीक कालावधीत बदलावेच लागतात ते ते बदलल्या जातात किंवा तसा सल्ला तरी दिला जातो.
- वाहन दुरूस्तीचा इतिहास हा नोंद केला जातो. त्याचे किलोमिटर रंनींग, काय दुरूस्ती केली ते ते सारे नोंद असल्यामुळे वाहन खरेदी- विक्रीच्या वेळी हा उतारा पाहील्यास ग्राहकाचा फायदा होतो.
- देखभाल करार हा संपूर्ण भारतातील सर्वीस स्टेशन मध्ये लागू होत असल्याने प्रवासी वाहन भारतात कोठेही मेंटेन होवू शकते.
- रोड साईड असीस्टंट उपलब्ध असल्याने रस्त्यात कोठेही गरज असेल तर त्यांची माणसे वाहन दुरूस्तीला येवू शकतात.
- अपघातग्रस्त वाहनांची देखभाल आणि इंन्शूरंसची कामे अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटरमध्ये केल्यास ग्राहकाला मानसीक त्रास कमी होतो.
- आजकालची वाहने ही कॉम्पूटराईज्ड किंवा सेंसर बेस्ड असल्याने त्याचे सॉप्टवेअर, ब्लॉक डायग्राम ह्या अथोराईज्ड ठिकाणीच उपलब्ध असतात.

----------------------------------------------------
अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटरमध्ये गाडी दुरूस्त अथवा ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करारामुळे होणारे तोटे:-
- अथोराईज्ड सर्वीस सेंटरमध्ये केवळ चालू काम केले जाते असा ग्राहकाचा समज होवू शकतो.
- वाहन आपल्या परोक्ष देखभाल, दुरूस्त केले जाते. वाहनाच्या अगदी जवळ उभे राहू दिले जात नाही. काचेपलीकडून पहावे लागते.
- स्पेअर, ऑईल आदींच्या किंमती बाजारापेक्षा महाग वाटू शकतात. ( परत त्यात टॅक्स पेड बील असते.)
- दुरूस्ती करणारे मेकॅनीक्स पगारी असल्याने ग्राहक पुन्हा आला नाही तरी त्यांचा पगार चालू असतो.
- एखादा स्पेअर किंवा पार्ट गरज असल्यास संपूर्णच बदलावा लागतो. (उदा. वायरींग मध्ये काही प्रश्न असेल तर संपूर्ण वायरींग सेट किंवा वायर हारनेसच बदलावा लागतो. वायर जोडणे, टेप मारून चिकटवणे आदी प्रकार सहसा होत नाहीत. यामुळे दुरूस्तीची किंमत वाढते.)
- देखभाल करण्यासाठी वाहन ठरावीक जागीच (अर्थात शहरात किंवा संपूर्ण देशात त्यांची साखळी-चेन असते) न्यावे लागते. त्यातही वेटींग लिस्ट आदी प्रकार क्वचित होत असतील.
------------------------------------
आपल्या ओळखीच्या किंवा रोड साईडच्या सेंटर/ गॅरेजमध्ये वाहन ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करार न करता दुरुस्तीचे फायदे:

- आपल्या ओळखीचे रिपेअर सेंटर/ गॅरेज असल्यामुळे मित्राच्या नात्याने देखभालीत सल्ला मिळू शकतो.
- आपल्या डोळ्यासमोर वाहन दुरूस्त होते.
- एखादा स्पेअर किंवा पार्ट गरज असल्यास त्यातील काही भागच दुरूस्त करून दिला जातो. त्याने खर्चात बचत होते.
- बाजारभावापेक्षा कमी भावात स्पेअर, पार्टस यांच्या किंमती असू शकतात.
- रोडसाईड गॅरेज कोठेही उपलब्ध असल्याने आपण आपल्या मर्जीनुसार तेथे वाहन नेवू शकतो.
- मेंटेनंस करार केलेला नसल्याने तो करार करण्याची किंमत वाचू शकते.
--------------------------------------------
आपल्या ओळखीच्या किंवा रोड साईडच्या सेंटर/ गॅरेजमध्ये वाहन ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करार न करता दुरुस्तीचे तोटे:

- आपल्या ओळखीच्या किंवा रोड साईडच्या सेंटर/ गॅरेजमध्ये अनेक कंपनी किंवा अनेक मेकच्या गाड्या येत असतात. त्यामुळे तेथे कंपनी प्रशिक्षीत कामगार, मेकॅनीक उपलब्ध असेलच असे नाही. एखादा नवीनच मेकॅनीक असेल तर त्याला एखादे तंत्र किंवा एखादी गाडी नवी वाटू शकते.
- त्यांच्या कडच्या मेकेनीकला महिन्याचा पगार ठरलेला नसल्याने कामे येवोत अथवा कमी येवोत त्यांना पगाराची शास्वती नसू शकते. बहूदा एखादाच मेकॅनीक सगळ्या गॅरेजची मदार सांभाळतो.
- त्यातील मेकॅनीकला देखील काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असल्यास दुसर्‍याची मदत घेण्यावर मर्यादा येतात.
- गाडीच्या देखभालीसाठी सर्व टुल्स, स्पेअर्स हे एकाच छताखाली न मिळाल्याने चालढकल केली जाते. त्यामुळे कामात दिरंगाई, स्पेअरमध्ये चालढकल केली जाते.
- रोडसाईड गॅरेजवाल्यांकडे योग्य ते टुल्स असतातच असे नाही.
- शक्यतो असे सेंटर अस्वच्छ, प्रकाश नसलेले, कळकट असतात. जेवणाच्या वेळा, सुटीच्या वेळा, रजा आदी नसल्याने त्याचा अयोग्य परिणाम कामावर होतो.
- स्पेअर हे डुप्लीकेट असण्याचा संभव होवू शकतो. किंमत ठरलेली नसते. त्यामुळे ग्राहकाला फसवले गेल्याचा फील येवू शकतो.
- ग्राहकाच्या सुविधेतेमध्ये चहा, पाणी, स्वच्छतागृह आदी नसते.
- जे जे स्पेअर ठरावीक कालावधीत बदलावेच लागतात ते ते बदलल्या जातीलच याची खात्री नसते.
- "चलता है", ही प्रवूत्ती या ठिकाणी पहायला मिळते.
- वाहन दुरूस्तीचा इतिहास नोंद केला जात नाही.
- देखभाल करार केल्यास हा फक्त त्याच सर्वीस स्टेशन मध्ये लागू होत असल्याने आपले वाहन इतर ठिकाणी दुरूस्त केल्यास आर्थीक बोजा ग्राहकावर पडतो.
- रोड साईड असीस्टंट उपलब्ध नसल्याने रस्त्यात कोठेही गरज असेल तर त्यांची माणसे वाहन दुरूस्तीला येवू शकत नाहीत.
- अपघातग्रस्त वाहनांची देखभाल आणि इंन्शूरंसची कामे तेथे होत नसल्यास दुसरीकडे नेवून दुरूस्ती करावी लागते.
- आजकालची वाहने ही कॉम्पूटराईज्ड किंवा सेंसर बेस्ड असल्याने त्याचे सॉप्टवेअर, ब्लॉक डायग्राम तेथे उपलब्ध असतीलच असे नाही.

--------------------------------------------
काही सदस्यांचे प्रतिसाद (नामोल्लेख टाळलेला आहे.):

गाडीने आवाज केला की डॉक्टर कडे न्यावं ह्या मताचा मी आहे

कुठल्याही पॅकेज मध्ये ते घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याचा जास्त फायदा असतो.
त्यापेक्षा फायरिंग नीट ऐकावं, चार चाकी असेल तर Malfunction light लागतोच, तो लागला की न्यावं गॅरेजमध्ये ह्या मताचा आहे मी

गाडीचं आयडलिंग, फायरिंग रोज ऐकत असू तर बिनसल्यावर लगेच जाणवतं.

प्रायव्हेट garage वाला आपल्या दोस्ती खात्यात घेतलेला आहे. तो योग्य वेळी योग्य सल्ला देतो

--------------------------------------------
हे झाले ब्रेकडाऊन मेंटेनन्स.

प्रिव्हेंटिव मेंटेनन्स असेल तर वाहन रात्रीतून कधीही बाहेर चालवायला छातीठोक काढता येते.

वेळोवेळी स्पेअर जसे स्पार्क प्लग, टायर रोटेट बॅलसींग, दुचाकीमध्ये कार्बोरेटर साफ करणे, गाडी धुणे आदी कामे होवून जातात.

अन तुम्हाला जसा मित्र गॅरेजवाला मिळाला तसे सगळ्यांनाच मिळेल असे नाही.

--------------------------------------------
>>> गाडीने आवाज केला की डॉक्टर कडे न्यावं ह्या मताचा मी आहे

असहमत

>>> प्रायव्हेट garage वाला आपल्या दोस्ती खात्यात घेतलेला आहे. तो योग्य वेळी योग्य सल्ला देतो

सहमत

वकील, डॉक्टर प्रमाणे विश्वासू गॅरेज वाला पकडायचा... चुकीचा सल्ला देणार नाही इतपत विश्वास त्याने कमावला पाहिजे. आणि आपल्याकडून आळस झाला तर त्याने चार शिव्या दिल्या पाहिजेत इतका अधिकार त्याला दिला पाहिजे.

मित्र आहे, ओळखीचा आहे म्हणून कधीही रेटमध्ये घासाघीस करू नये, हवे तर त्याच्याकडून एखादेवेळी हक्काने पार्टी घ्यायची पण तो सांगेल तितके पैसे द्यायचे आणि वर थोडे पैसे त्याच्याकडे काम करणाऱ्याला न विसरता द्यायचे.
--------------------------------------------
येस, पैशांच्या बाबतीत मी कधीच घासाघीस करत नाही,

म्हणून मी घरी नसेन तर गाडी घरून पिकप आणि ड्रॉप केली जाते

शिवाय
preventive maintenance चं म्हणाल तर मी प्रत्येक मोठ्या ट्रिप पूर्वी गाडी त्याच्याकडे देतो, एक चेकअप होतं, break oil, coolant topup वगैरे.

जोडीला दर 6 महिन्याने मी स्वतःच गाडी नेऊन देतो आणि सांगतो चालवून बघ, जे गरजेचं वाटेल ते कर

झालंच तर तो करतो, काम नाही केलं तर consultation चार्जेस घेतो
त्यामुळे नातं नीट राहिलेलं आहे
--------------------------------------------
गॅरेजवाल्यांचा, वाहन दुरुस्त करणार्यांचा स्वभाव हा सर्वांशी मैत्री करणारा असाच असतो.
तो अनेकांचा मित्र असतो. मग आपल्यालाही तो जवळचा वाटू शकतो.

अन आपण जसा गॅरेजवाल्याचा विचार करतो तसा तो त्याच्या ग्राहकांचाही करतच असेल ना?
मला तर कित्येकदा नायट्रोजन भरण्याचेही पैसे अथोराईज्ड वाल्यांनी अशा देखभाल करारामुळे लावलेले नाहीत.

--------------------------------------------
एकाचा अनुभव:

मारुती स्विफ्ट डिझायर ची फ्री सर्व्हिस संपल्यावर विक्रेत्याने बरीच विनवणी केली की वार्षिक देखभाल चा करार करा, पण माझा विक्रेत्याच्या गॅरेज मधला अनुभव होता तो चांगला नव्हता, खूप गाड्या असल्यामुळे आणि सगळे पगारी नोकर असल्यामुळे गाडीची व्यवस्थित देखभाल आणि सर्व्हिसिंग होत नव्हती,
फक्त बिल वाढवण्याकडे कल होता, मग मी माझ्याच ओळखीच्या मारुती मकेनिक ला घरी बोलावून किंवा त्याच्या गॅरेज मध्ये जाऊन सर्व्हिसिंग करू लागलो, त्यात वेळ वाचत होताच, पैसेही वाचत होते आणि आपल्यादेखत काम होत होते.

बुलेट च्या बाबतीत तीच परिस्थिती होती, एका दिवशी 70 ते 80 गाड्या सर्व्हिसिंग करायचा त्यांचा प्रयत्न असायचा, जो कधीच सफल होत नसे, मग गाडी फक्त धुवून परत करणे वगैरे होऊ लागले,
माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळताच मी माझ्या बुलेट मकेनिक कडे जाण्यास सुरवात केली, आता तो व्यवस्थित काम करतो, माझ्या प्रश्नांची उत्तरे देतो, अनुभवी आहे
--------------------------------------------
एकाचा प्रश्न: अगदीच ब्रेकडाऊन झाली तर गॅरेजमध्ये जाणारे यांचा अनुभव काय?

त्याला आलेले उत्तर: नियमित देखभाल केली तर गाडी ब्रेक डाउन होण्याचे प्रमाण नगण्य असते.

आणखी दुसरे उत्तर: ब्रेक डाउन होई पर्यन्त वाट का म्हणून पहायची? गाड़ी वर बसलात कि तुमचा जीव त्या गाडीच्या भरविष्या वर असतो। 50 रुपये वाचवून हात पाय तुटलेले अनेक पाहिलेत.
250 रुपये खर्च करून गाड़ी नीट ठेवणे चांगले कि ब्रेक डाउन नंतर 25000 खर्च करावे हे चांगले?

आणि हेल्मेट न वापरून हार घालून घेतलेले ...
--------------------------------------------
माझ्या मते,
आपली गाडी म्हणजे
चार चाकी / दुचाकी किती रनिंग झाल्यावर सर्व्हिसिंग करायची गरज आहे , याची माहिती आपल्या विश्वासू माणसाकडून करून घ्यावी.
उगाच रनिंग नाही, पण एक वर्षे झाले म्हणून सर्व्हिसिंग करू नये.
तसेच खाजगी, चांगल्या ओळखीच्या माणसाकडून सल्ला घेणे आणि त्या प्रमाणे योग्य मोबदला देऊन काम करणे, हे ठीक राहील.
--------------------------------------------
प्रिवेंटिव मेंटेनेंस चे शेड्यूल ओनर्स मैन्युअल ला दिलेले असतात. तेव्हड़े जरी पाळले तरी आपले वाहन कुठलाच त्रास देत नाही. स्वानुभव आहे.

निव्वळ प्रीवेंटिव मेंटेनेंस मुळे माझी "यक्षज्ञ" वाहन आज 21 व्या वर्षी ही मस्त चालत आहे. नुकताच (कोरोना लॉक डाउन पूर्वी) 4 दिवसात 1800 किलोमीटर फिरून आलो. नियमित ऑयल चेंज, टायर रोटेशन, रेगुलर सर्विसिंग मुळे हे शक्य झाले.
--------------------------------------------
एकदम बरोबर...
पैशासाठी कटकट केली नाही की मालक आणि कारागीर पण खुष असतात...
आणि अनावश्यक दुरूस्ती सांगत नाहीत आणि आवश्यक टाळत नाहीत....
माझा गेरेज वाला पण सांगतो

ये बदलना पडेगा...
तर कधी अभी चार छे महीना चलाओ फीर देखते है
वेळी अवेळी धाऊन पण येतात.
------------------------------------------- चर्चा समाप्त ---------------------------------------

वाहनाचे मालक आपण जरी असलो तरी वाहन हे एक यंत्र आहे असे समजून त्याची योग्य ती काळजी एका यंत्राप्रमाणे घेतली तर वाहन आपल्याला चांगला अनुभव देवू शकते. ते कोठे दुरूस्त करायचे हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

( सदर लेखाच्या लेखकाचा कोणत्याही वाहन कंपनीशी किंवा अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटर अथवा गॅरेजशी संबंध नाही.)

माझा प्रश्न: भारतात किंवा परदेशात, विकसीत देशात वाहन धारक ग्राहक आणि वाहन विक्रेते, रिपेअर करणारे यांच्या बाबतीत जी काही मानसीकता असते त्याचा पद्धतशीर अभ्यास करवणारी अभ्यास शाखा किंवा अभ्यासक्रम विकसीत झाला आहे काय? किंवा एखादा विषय, किंवा असा अभ्यास लेखन करणारे पुस्तक अभ्यासक्रमात आहे काय?

- पाषाणभेद
११/०७/२०२०

प्रतिक्रिया

कंजूस's picture

11 Jul 2020 - 7:43 am | कंजूस

एकूण लेख आवडला.

पुण्यातील मारुती सुझुकी चे चांगले सर्व्हिसिंग करून देणाऱ्या
ग्यारेजेस ची कृपया माहिती द्या इथे....

सुबोध खरे's picture

11 Jul 2020 - 10:07 am | सुबोध खरे

माझी होंडा युनिकॉर्न पहिल्या सर्व्हिसच्या वेळेस (ठाण्याच्या साई होंडा कडे) गाडी नीट धुतलेलीसुद्धा नव्हती. बरं गाडी मी त्याच्याकडेच विकत घेतली होती
स्पार्कप्लगच्या ठिकाणी लागलेली घाण साफ केली नव्हती. गाडी परत घेताना मला बिलावर सही करायला सांगितले तेंव्हा मी त्यास नकार दिला आणि तेथील अभियंत्याला भेटण्याची मागणी केली तो आल्यावर त्याला स्थिती दाखवली आणि माझ्या बिलावर मी येथे सर्व्हिस करणार नाही पण माझी होंडा कंपनीची तीन वर्षाची वॉरंटी व्हॅलिड राहील असे लिहून देण्यास सांगितले. हे सांगितल्यावर तो टरकला. आणि त्याने माझ्या समोर परत सर्व्हिसिंग करून दिले.

यानंतर मी त्याच्याकडे पाऊ ल ठेवले नाही. असाच अनुभव मला अगोदरच्या हिरो होंडा वर अनेक वेळेस आलेला आहे. केवळ मूळ उत्पादन उच्च दर्जाचे असल्याने यांचे फावते
तेंव्हा अधिकृत विक्रेता किंवा सर्व्हिस स्टेशन चांगले काम करतात हा एक गैरसमज आहे.

तुषार काळभोर's picture

15 Jul 2020 - 10:22 pm | तुषार काळभोर

माझा हिरो होंडा च्या सर्व्हिस सेंटर चा अतिशय वाईट अनुभव आहे. फक्त वॉरांटी बंद व्हायला नको, म्हणून सर्व्हिसिंग करून घेत होतो. जवळ जवळ प्रत्येक वेळी केवळ धुतलेली गाडी परत द्यायचे. शेवटच्या वेळी battery gayab केली होती.
पंधरा वर्षांपासून चांगलं गॅरेज सापडलेलं नाही, जे इमानदारी मध्ये दर्जेदार काम करेल.

सध्या कंपनी शेजारी असा एक मेकानिक सापडलाय. मार्च मध्ये एकदा गियर शिफ्ट पेडल बिघडल्याने त्याच्याकडून करून घेतलं.
माणूस चांगला वाटला. गॅरेज स्वच्छ होतं. मालकासह तीन मुलांच्या अंगावर गणवेश (डांग्री) होती. स्वच्छ. मालकाने नो - नॉनसेन्स गप्पा मारल्या. मग जूनमध्ये त्याच्याकडून सर्व्हिस करून घेतली. 2008 नंतर पहिल्यांदा युनिकॉर्न नव्यासारखी चालते आहे. मालकाचे बोलणं वागणं चांगलं वाटलं. परत नक्की जाणार.
( मला शेल चं ऑईल टाकायला आवडतं. त्यामुळे त्याला सांगितलं की सर्व्हिस करताना ऑईल बदलू नको. मी नंतर टाकेल. तरी त्याने त्याच्याकडे असलेलं कोणतं तरी ऑईल टाकलं. गाडी उत्तम चालत असल्याने, मी तक्रार नाही केली.)

चौथा कोनाडा's picture

12 Jul 2020 - 1:33 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण धागा आणि उत्तम चर्चा,
मी टाटांच्या कारची ४ वर्षांची वा.दे.कं. योजना घेतली होती, ठिकठाक अनुभव. फायदा झाला नसला तरी तोटा झाला नाही असे माझे मत. गाडीचा वापर फार नव्ह्ता
गाडीचा वापर खुप असेल असली कंत्राटं लाभदायक ठरू शकतात असे मला वाटते !

सामान्यनागरिक's picture

22 Jul 2020 - 4:57 pm | सामान्यनागरिक

माझ्याकडे आजवर पाच वेगवेगळ्या दुचाकी तसेच चारचाकी गाड्या वापरण्याचा अनुभव गेल्या तीस वर्षातला.
१. कंपनीचे अधिकृत विक्री, देखभाल करणारे जे लोक असतात त्यांचेकडे कागदी घोडे नचवण्याकडे जास्त कल असतो. हल्ली त्यांना सगळे रिपोर्ट कंपनी ला पाठवावे लागतात त्यामुळे कागदोपत्री सगळं ठीक दिसले पाहिजे या कडे जास्त लक्ष असते.
२. वॉरण्टी संपेपर्यंत ते अगदी गोड बोलतात. नंतर देखभाल करार केला नाहीतर तुटक वागणुक मिळते.
३. हल्ली गाड्य़ांचे सुटे भाग बाहेर चटकन मिळत नाहीत. काही कंपन्या तर फ़क्त अधिकृत लोकांकडुनच सुटे भाग विकतात. त्यामुळे त्यांच्याकडे जाणे भाग असते. त्यांना खात्री असल्याने बेपर्वा वृत्ती असते. जर गोड बोलत असतील तर त्यामुळे आपण कामाचे काही जास्त पैसे लावले तरी ग्राहकाने दुर्लक्ष करावे या साठी.
४. एखादा भाग थोडासा खराब असला तरी तो दुरुस्त करण्या ऐवजी सम्पूर्ण भागच ( पूर्ण असेम्ब्ली) बदलायला भाग पाडतात. कधी कधी र. ५०० ऐवजी ५००० द्यावे लागतात.
५. अधीकृत सेवा देणाऱ्याने १०,००० रुपये खर्च सांगीतला आणी तेच काम बाहेर ५००-७०० रुपयांत झाले अशी अनेक उदाहरणे बघण्यात आहे. माझाही तसा अनुभव आहे.
६. एकुणच मग्रुरी असते कारण सुटे भाग बाहेर मिळणार नाहीत मग हा ग्राहक जातो कुठे ? येईल झक मारत परत !
७. एकाच शहरात दोन /जास्त अधीकृत सेवा देणारे असतील तरी हल्ली सगळे काम ऑनलाईन असल्याने आपण दुसऱ्याकडे गेलो तरी त्यांना कळते की ग्राहक आधी पहिल्याकडे गेला होता आणी तिकडे र. अमुक चे एस्टीमेट देण्यात आले होते. मग तेही तीच री ओढतात.
८. फ़क्त अधीकृत देखभाल कर्त्याकडून सुटे भाग विकणे हे धोरण योग्य नाही. एकुणच जरी विकतांना गाडी सुट देउन विकली तरी नंतर ती सुट दुपटीने वसूल करता येते याची खात्री असते.

मराठी_माणूस's picture

22 Jul 2020 - 7:01 pm | मराठी_माणूस

आजकाल सगळीकडे "सेवा" ह्या शब्दाची व्याख्या बदलली आहे.