नमस्कार मंडळी! खूप दिवसांनी लिहिते आहे. माझ्या एका दाक्षिणात्य मैत्रिणीच्या आईकडून कळलेली रेसिपी घरी करून पाहिली आणि वाटलं येथेही लिहावी. मंगलोरी बन म्हणजे कोणताही ब्रेडचा पदार्थ नसून आपल्या सोप्या भाषेत पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या आहेत. फक्त या पुऱ्या जरा जाडसर असतात इतकंच . हा कर्नाटकातील मंगलोर भागातील प्रसिद्ध पदार्थ आहे असं कळालं. त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीने मला खोबऱ्याची आणि टोमॅटोची चटणी ची पाककृती सांगितली ती अगदी इथे कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा मुंबईतले अण्णा लोक इडली चटणी विकतात त्यांच्याकडे ही लाल चटणी सापडते,त्याचीही पाककृती आहे. चला तर मग!
मंगलोरी बन करिता साहित्य- तीन पिकलेली केळी, सहा चमचे साखर, एक -दोन चमचा जीरे, पाव चमचा मीठ, दोन चमचे दही ,पाव चमचा खायचा सोडा, पाच वाटी मैदा किंवा गव्हाचे पीठ, तळण्यासाठी तेल,
खोबर्याच्या चटणी करता साहित्य -
तीन वाटी ताजा खोवलेला नारळ, अर्धा लिंबा एवढी चिंच,फुटाण्याची डाळ दोन चमचे, उडदाची डाळ दोन चमचे ,एक पेर आलं, सुक्या लाल मिरच्या सात-आठ,कढीपत्त्याची पंधरा वीस पाने , एक चमचा मीठ ,एक चमचा साखर ,फोडणीकरता तेल,मोहरी व हिंग .
टोमॅटो चटणी साठी साहित्य -
तीन मध्यम आकाराचे टोमॅटो फोडी करून, एक छोटा कांदा उभा चिरून ,एक पेर आलं ,चार-पाच लसूण पाकळ्या , दहा-बारा कडीपत्त्याची पानं, दोन चमचे तुरीची डाळ, दोन चमचे उडदाची डाळ, चार सुक्या लाल मिरच्या ,किंचित गूळ, वरून फोडणी साठी कढीपत्ता मोहरी व हिंग
मंगलोरी बन ची रेसिपी-
तीन पिकलेले केळे, सहा चमचे साखर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण परातीत घेऊन किंवा खोलगट भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये जीरे, पाव चमचा खाण्याचा सोडा, पाव चमचा मीठ ,दोन चमचे आंबट नसलेले दही,हे घालून हाताने फिरवून एकसारखे करावे. आता या पातळ मिश्रणामध्ये मावेल तेवढा मैदा किंवा गव्हाचे पीठ घालावे. यात साधारण पाच वाटी पीठ मावते .वाटी मध्यम आकाराची असावी. मैदा किंवा गव्हाचे पीठ दोन्ही चालते. पण मैद्याच्या पुऱ्या जास्त चांगल्या होतात. मी दोन वाटी मैदा आणि तीन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे पीठ घेऊ शकता. आता हे पीठ मऊसर मळून घ्यावे आपल्या नेहमीच्या कणकेपेक्षा थोडेसे मऊसर असावे पण फार सैल नको. आता या तयार झालेल्या पिठाच्या गोळ्या वरती तेल लावून साधारण दहा ते बारा तास ठेवावे. सकाळी जर या पुऱ्या कराय च्या असतील तर रात्री तुम्ही हे पीठ भिजवून ठेवू शकता .जर जास्त वेळ नसेल तर साधारण आठ ते दहा तास ही तुम्ही ठेवू शकता. दहा तासानंतर आपण नेहमी पुर्या करतो त्यापेक्षा दुप्पट जाड अशा पुऱ्या लाटाव्यात. तेल मध्यम आचेवर असावे. त्यामध्ये या पुऱ्या सोडाव्यात. वरच्या बाजूने झाऱ्याने गरम तेल टाकत राहावे म्हणजे टम्म फुगून वर येतात. तांबूस रंगावर तळाव्यात .मंगलोरी बन म्हणजेच केळ्याच्या पुऱ्या तयार आहेत!
या पुऱ्या तीन ते चार दिवस टिकतात .
आता चटण्यांची पाककृती सांगते- पहिली चटणी आहे नारळाची. यामध्ये तीन वाट्या ताजा किसलेला नारळ, दोन चमचे फुटाण्याची डाळ अर्ध्या लिंबाचा आकारा एवढे चिंच, चार-पाच कढीपत्त्याची पाने, एक चमचा साखर, चवीपुरते मीठ हे मिक्सरच्या बाऊलमध्ये ठेवावे दोन चमचे उडदाची डाळ तेल घालून किंचित भाजून घ्यावी. तांबूस कलर येऊ देऊ नये. मंद आचेवर साधारण पंधरा ते वीस सेकंद भाजावी व ही डाळ त्या मिक्सरच्या भांड्यात टाकावी. आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवावे. किंचित पाणी घालावे एकदम बारीक वाटून घ्यावे.मिक्सरमधून हे मिश्रण काढून घ्यावे व पाणी घालून आपल्याला हवे तेवढे पातळ करुन घ्यावे. वरून याला सात-आठ लाल मिरच्या, मोहरी ,याची फोडणी करून तडका द्यावा.
आता लाल टोमॅटोची चटणी सांगते -
पॅनमध्ये तेल गरम करावे त्यामध्ये दोन चमचे तुरीची डाळ व दोन चमचे उडदाची डाळ किंचित लालसर परतून घ्यावी व बाजूला काढून घ्यावी. उरलेल्या तेलात दहा-बारा कढीपत्त्याची पाने, एक पेर आलं, तीन-चार लसणाच्या पाकळ्या व एक उभा चिरलेला कांदा टाकावा, कांदा बऱ्यापैकी लालसर परतून झाला की तो भांड्यातच बाजूला करावा व एक दोन चमचे तेल टाकून त्यात तीन ते चार लाल मिरच्या परताव्यात. मग हे कांद्याचे मिश्रण जे आहे ते सगळं एकत्र करावं व पुन्हा थोडसं परतावे. त्यावर तीन चिरलेले लाल टोमॅटो टाकावेत. अर्धा चमचा मीठ टाकावे म्हणजे टोमॅटो मऊ होतो. मंद आचेवरती पाच ते दहा मिनिटे ठेवावे. अधून मधून परतत रहावे. टोमॅटो मऊ व्हायला लागला की आपण आधी परतून घेतलेली उडीद आणि तुरीची डाळ त्यामध्ये टाकावे. आता हे सर्वच मिश्रण मंद आचेवर अजून एक पाच मिनिटे ठेवावे. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घेऊन त्यात थोडासा गूळ घालावा व मिश्रणाची बारीक पेस्ट करावी. आवश्यकतेनुसार पाणी घालावे जास्त पाणी घालू नये. त्यानंतर एका बाऊलमध्ये ही चटणी काढून घ्यावी व यावर तेल गरम करून मोहरी कढीपत्ता व हिंग याची चरचरीत फोडणी द्यावी.
मंगलोरी बन व खोबरे आणि टोमॅटो ची चटणी
फोटो क्र २
प्रतिक्रिया
9 Jul 2020 - 8:20 pm | अनिंद्य
खास मंगलोरची पाककृती असूनही खोबरे फारसे नाही हे फार आवडले :-) फोटू झकास.
केळी + साखर + कणिक / मैदा आणि मग त्यात जिरे + मीठ ! थोडे विसंवादी वाटले.
केळी + कणिक मिश्रणाचा छोट्या गोड उतप्पासदृश पदार्थ मी चेन्नईच्या घरांमध्ये चाखलाय, नाव विसरलो आता.
9 Jul 2020 - 10:07 pm | श्वेता२४
जसे शिर्यातही कधीकधी नावालाच मीठ टाकतात तसेच. तसेच हा पदार्थ फारसा गोड होत नाही. हलकीशी गोडसर चव येते
9 Jul 2020 - 8:50 pm | पलाश
मस्त !! मंगलोर बन्स हा प्रकार कारवार उडुपी भागात एका छोट्या गावातल्या हाॅटेलमधे चटण्या व बटाट्याची मिश्र भाजी यासोबत ब्रेकफास्टच्या वेळी मिळाला होता. अतिशय आवडल्या होत्या. इंटरनेटवर रेसिपी पाहून दोनवेळा घरी करून पाहिल्या पण ठीकच झाल्या होत्या. तुमची डिश एकदम परफेक्ट दिसते आहे. आता या पद्धतीने करून पाहीन.
एक प्रश्न : दुसर्या दिवशी तेलकट झाल्या होत्या की अशाच छान राहिल्या?
9 Jul 2020 - 10:11 pm | श्वेता२४
एरवी साधी पुरी सुद्धा तळून काढल्यावर पेपरला तेल लागते. पण या पद्धतीने केलेल्या पुर्या अजिबात तेलकट वाटल्या नाही. मी कालच या पुर्या केल्या होत्या. आताही त्या मऊ आहेत.
9 Jul 2020 - 10:13 pm | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
10 Jul 2020 - 8:24 am | श्वेता२४
असे वाचावे.
10 Jul 2020 - 6:31 am | तुषार काळभोर
हे पण मालवणी कोंबडी वड्यांसारखं फसवे नाव आहे.
पंधरा वर्षांपूर्वी एकदा (बटाटा ऐवजी बोनलेस चिकन वापरून केलेले वडे असतील) या भाबड्या समजुतीने मुळशी रस्त्यावर कुठं तरी कोंबडी वडे मागवले होते. तेव्हा समोर आलेल्या पुऱ्या बघून जो अपेक्षाभंग झाला त्या तोडीचा आज झाला :D
- ( गोवन, मंगलोरी, उडुपी, मलबारी, चेत्तीनाड सगळ्या सौथेंडियान जेवणाचा जब्रा फॅन )
पैलवान
10 Jul 2020 - 8:29 am | श्वेता२४
पण एकदा गटारी अमावसेला ऑफीसमध्ये जेवण मागवले होते. नॉनव्हेज खाणार् यांनी बरेच वडे शिल्लक राहिल्यामुळे वेज ग्रुप कडे ते वडे खाण्यासाठी विचारले तेव्हा कळाले हे दुसरे तिसरे काही नसुन कोकणी वडे आहेत. प्रतिसादाबद्दल धन्यवाद
10 Jul 2020 - 9:27 pm | अनिंद्य
हे भगवान !
@ पैलवान आणि श्वेता
मला बटाटावडा सारखा चिकन स्टफिंग असलेला तो कोंबडी वडा असेच वाटत होते. :-)))))
10 Jul 2020 - 7:15 am | कंजूस
उत्तम जमली आहे पाककृती. छान दिसतही आहे. थोडेसे घारगे प्रकरण आहे. त्याचा फोटो कालच आत्माने (अतृप्तच तो) खरडफळ्यावर टाकला होता. मंगलोरी लोक समारंभात 'बिस्किट अंबाडा' नावाची भजी ठेवतात. त्याची कृती विचारा मैत्रिणीला.
10 Jul 2020 - 8:32 am | श्वेता२४
हो जर अजून केळे घातले व साखरेऐवजी गूळ जास्त घालून ही पाककृती केली तर नक्कीच घारग्यांसारखीच चव येईल. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
10 Jul 2020 - 8:53 am | शा वि कु
मात्र आमच्याकडे काय पाककौशल्य नाही त्यामुळे फोटो बघून खुश होण्यापर्यंतच मजल :((
10 Jul 2020 - 11:44 am | श्वेता२४
शा. वि. कु.
10 Jul 2020 - 12:15 pm | रातराणी
वाह! मस्त टम्म फुगल्या आहेत पुर्या!
10 Jul 2020 - 5:13 pm | चौकस२१२
हलकीशी गोडसर चव आणि दाक्षिण्यात चटण्या .. कल्पना आवडली
एक शंका, हा बन / पुऱ्या फार जाड झाल्या तर कच्चट वाटत नाहीत का?
10 Jul 2020 - 9:46 pm | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या पुर्या टम्म फुगतात. इतक्या की त्याच्या कडा वाकवून वाकवून तळाव्या लागतात. जाड असल्या तरी अजिबात कच्चट लागत नाहीत. मध्यम आचेवर तांबूस रंगावर तळायला साध्या पुरी पेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे कच्चेपणा जाणवत नाही अजिबात. गरमागरम अप्रतिम लागतात. अगदी ५-६ तासानंतर ही फुगलेल्याच राहतात. नंतर मऊ व्हायला लागतात. दोन दिवस काही वाटले नाही. मात्र मैदा असल्याने तिसरे दिवशी थोड्या चामट व्हायला सुरुवात होतात. ज्यांना प्रवासाला या पुर्या न्यायच्या असतील त्यांनी निव्वळ गव्हाच्या पिठाच्या पुर्या कराव्यात असे माझे मत बनले आहे. पण हा पदार्थ ताजाच खाण्यात सुख आहे.
10 Jul 2020 - 10:53 pm | मोगरा
वाह !
11 Jul 2020 - 10:49 am | श्वेता२४
:))
11 Jul 2020 - 3:38 pm | सविता००१
कसल्या मस्त दिसताहेत...
नक्की करणारच
12 Jul 2020 - 12:02 pm | श्वेता२४
:)
16 Jul 2020 - 3:53 am | जुइ
नक्कीच करण्यात येइल!
16 Jul 2020 - 7:43 pm | श्वेता२४
:)
16 Jul 2020 - 7:55 pm | गणेशा
छान आहे एकदम
आम्ही पण करतो हे, याला बन म्हणतात माहित नव्हते मला..
बायको ला विचारल्यावर ती पण बन म्हणाली..
आराध्या आणि मी पॅन केक म्हणायचो :-))
आवडली पाककृती..
16 Jul 2020 - 7:55 pm | गणेशा
छान आहे एकदम
आम्ही पण करतो हे, याला बन म्हणतात माहित नव्हते मला..
बायको ला विचारल्यावर ती पण बन म्हणाली..
आराध्या आणि मी पॅन केक म्हणायचो :-))
आवडली पाककृती..
16 Jul 2020 - 9:18 pm | पिंगू
मंगलोरच्या चटण्या म्हणजे तोंपासू. एखादी चटणीची मालिका सुरु करा..
17 Jul 2020 - 8:36 am | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चटणी मालिका सुरु करण्याची कल्पना चांगली आहे. आगामी काळात प्रयत्न करेन.