कन्याकुमारी सायकलिंग... एक ध्येयपूर्ती.
०६.११.२०१९
मुंबई ते कन्याकुमारी सायकलवारी करायचा प्रस्ताव आला. परंतु दिवाळीच्या दिवसात सायकलिंगसाठी मुंबई बाहेर जायचे, याला मन तयार होईना. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी एव्हढी मोठी सायकल सफर करावी का हा सुद्धा विचार आला. आतापर्यंतच्या आयुष्यात कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली होती. ह्या वर्षी निसर्गसोबत साजरी करायची. तसेच वय शरीराला असते, मनाला नाही. सारे काही शक्य आहे, हे मनाने ठरविले. कुटुंबाला सर्व विचार सांगून परवानगी मिळविली.
कन्याकुमारीचा सायकल कार्यक्रम हातात आला तेव्हा लक्षात आले, दररोज साधारण 150 किमी सायकलिंग करायचे होते. तसेच मध्ये खंडाळा, कात्रज आणि खंबाटकी घाट सुद्धा लागणार होते. पुढील रस्ता सुद्धा चढउताराचा आणि कठीण होता.
मनाची तयारी झाली होती, आता शारीरिक तयारीसाठी जोरदार सायकलिंग सराव सुरू केला. दोन वेळा खंडाळा घाट चढलो. एका दिवसात शिर्डी आणि वज्रेश्वरीपर्यंत सायकलिंग केले. मुंबई ते अलिबाग राईड केली. परंतु या वेळी कन्याकुमारीला समानसह सायकलिंग करायचे होते, ते सुद्धा कोणतीही सपोर्ट व्हेईकल न घेता. ध्येय खडतर होते, त्या साठी कठोर परिश्रम करावे लागणार होते.
मुबंई ते पुणे सायकलिंग करताना, खंडाळा घाटात सायकलच्या मागील चाकाची एक तार तुटली. सायकल तशीच चालवत पुण्यापर्यंत आलो. तेथे सायकल दुरुस्त करून पुण्यापासून सायकलिंग करायला तयार झालो. सोबत असलेले समान खूपच जास्त आहे, याची कल्पना आल्यावर, काही समान पुण्यात काढून ठेवले.
पुण्याहून निघताना, सकाळी दोनदा सायकल पंचर झाली. त्यामुळे सकाळी पाच ऐवजी, सायकल सफर सुरू करायला सहा वाजले.
कात्रज आणि खंबाटकी घाट ओलांडताना सायकलिंगचा कस लागला होता.
पहिल्याच दिवशी १४६ किमी राईड झाली होती. दोन घाट ओलांडून एव्हढी राईड करणे फक्त दोस्तांच्या सहकार्यानेच शक्य झाले होते.
त्यानंतर संकेश्वर, धारवाड, दावनगिरी, सिरा, बंगलोर ,सेलम, दिंडीगुल, कोवीलपट्टी आणि कन्याकुमारी असा एकूण १७६० किमी चा खडतर प्रवास ११ दिवसात सायकलने पूर्ण केला होता.
प्रवासात सायकल पंक्चर होणं, तार तुटणे, कडक ऊन, विरुद्ध दिशेने वाहणारे जोरदार वारे, मधून मधून कोसळणारा धुवाधार पाऊस, हवामान खात्याने सूचित केलेले वादळ आणि हायवेला असलेली वाहनांची प्रचंड वर्दळ, रस्त्याची कामे, चढउताराच्या घाट्या यामुळे आम्हा सर्वांच्या ताकदीची कसोटी लागली होती. या सफरीत शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक कणखरपणा जास्त महत्वाचा ठरला.
"प्रदूषणमुक्तीचा" संदेश घेऊन सायकलिंग करत कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देणे हे आमचे स्वप्न होते. ते विक्रमी वेळेत पूर्ण केल्याचे यश स्वामी विवेकानंदाना अर्पण केले. इप्सित ध्येय साध्य झाल्याचा आनंद सर्वांच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता. आप्तस्वकीय कुटुंब, मित्रमंडळी, हितचिंतक यांच्या सदिच्छे मुळेच हे यश मिळाले होते.
आता पुढील शंभर वयाच्या आयुष्यात सायकलने भारत भ्रमण, नर्मदा परिक्रमा, युरोप सायकलिंग टूर, अंटार्टीक सफर, चद्दर ट्रेक, स्काय डायव्हिंग.... असं बरंच काही उराशी बाळगून आहे.... या साठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेरणा सतत मिळणार आहे, याची खात्री आहे.
मुंबईच्या सकाळ वृत्तपत्राने सुद्धा आमच्या उपक्रमाची दखल घेतली.
आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
श्री सतीश विष्णू जाधव
प्रतिक्रिया
22 Jul 2020 - 1:24 pm | चौथा कोनाडा
ध्येयपूर्ती साठी हार्दिक अभिनंदन !!!
पुर्ण लेखमाला सुंदर होती, फोटो क्लासिक होते !
तुम्हाला आणि तुमच्या सहकार्यांना पुढील महत्वाकांक्षी सायकल भारत भ्रमण मोहिमेस हर्दिक शुभेच्छा !
22 Jul 2020 - 1:32 pm | गणेशा
पूर्ण सिरीज आवडली..
Same नावाचे दोन धागे आहेत काय? कारण मी रिप्लाय दिला होता आधी..
22 Jul 2020 - 5:21 pm | चौथा कोनाडा
तो वेगळा धागा होता, "कन्याकुमारी दर्शन आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश ०५.११.२०१९" या नावाचा.
नामसाधर्म्यामुळे मलाही गडबडायला झालं, या धाग्यावर कुणाचाच प्रतिसाद नव्ह्ता म्हणुन उत्सुकतेने पाहिला अन वाचला,
(बर्याच जणांचं झालं असणार, कारण ७ जुलैच्या धाग्यावर पहिली प्रतिक्रिया म्हणजे माझी २२ जुलै ला आली)
https://www.misalpav.com/comment/1073434#comment-1073434
हा तुमचा प्रतिसाद, गणेशा. !