मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा) ०३.११.२०१९ दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग

Primary tabs

सतीश विष्णू जाधव's picture
सतीश विष्णू जाधव in भटकंती
4 Jul 2020 - 12:23 am

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा)

०३.११.२०१९

दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग

सकाळी सहा वाजता स्ट्रेचिंग आणि प्रार्थना करून दिंडीगल वरून कोविलपट्टीकडे प्रस्थान केले. आज जवळपास दीडशे किमी स्ट्रेच होता.

.

सकाळीच सूर्य दर्शन झाले. प्रभात समयी "मित्राच्या" भेटीचा आनंद अपरिमित होता. नवा दिवस, नवीन ऊर्जा आणि ध्येयपूर्तीकडे प्रस्थान करण्याचे प्रशस्त कार्य या आदित्याच्या आगमनाने सहज सोपे झाले होते.

सात वाजता अन्नलक्ष्मी हॉटेलमध्ये नास्त्यासाठी थांबलो. आज खुप दिवसांनी पोंगलचा (तमिळ खिचडी) मस्त आस्वाद घेतला. हॉटेलमध्ये सर्व महिला काम करत होत्या.

.
आता मदुराई जवळ येऊ लागले. अभिजीतला मदुराईच्या मीनाक्षी मंदिराचे दर्शन घ्यायचे होते. हायवे पासून आत २७ किमी वर मीनाक्षी मंदिर होते परंतु कन्याकुमारीचा पल्ला मोठा होता, त्यामुळे मदुराई शहरात जायचे टाळले.

मी स्टेटस अपडेट करत होतो. सकाळीच पुण्याच्या मनोजचा फोन आला. 'कन्याकुमारीला रस्ता संपतो, तेथे डेड एन्डचा फोटो काढा'.

वाटेत सत्यमंगलम टायगर रिजर्व लागले. नऊच्या दरम्यात लक्ष्मणला झोप येऊ लागली. एक डेरेदार झाडाखाली पथारी मांडून लक्ष्मण झोपी गेला. मी सहलीचे निवांत लेखांकन करत बसलो होतो.

.

बाराच्या आसपास ७८ किमी सायकलिंग झाले होते. वाटेत कामधेनू हॉटेल लागले. गरमागरम कांदा भाजी तळली जात होती. भोंडा, केळा भजी आणि गरम कांदाभजी आम्ही हादडली. इथे एक बर होतं, सांबर आणि चटणी हवी तेंव्हाढी घ्या, भरपेट खा. पांढरी आणि लाल चटणी फर्मास होती. त्या नंतर घेतलेला चहा म्हणजे पर्वणी होती.
.

येथील चहा बनवायची पद्धत एकदम निराळी. चहाची पावडर एका कापडी पोटलीत घालून उकळत्या पाण्यातील, छोट्या पाण्याच्या भांड्यात डुंबवून ठेवतात, त्यानंतर काचेच्या छोट्या ग्लासात साखर टाकून त्यावर ती चहाची पोटली धरून चहाचा अर्क ग्लासात मिसळतात. त्यानंतर दुसऱ्या भांड्यातले गरम दूध त्या चहाच्या ग्लासात ओततात. मग एका ग्लासातून दुसऱ्या ग्लासात चहा, साखर, दुधाचे मिश्रण फेसाळत ओतले जाते. वर टॉपिंगला आणखी चहाचा अर्क टाकून, तो ग्लास पाण्यात बुडवून प्यायला देतात. तमिळ चहा बनविण्याची पद्धत अतिशय झकास होती. शेवटी चहाच्या ग्लासाचे बुड पाण्यात बुडवितात कारण कपाच्या बुडाला लागलेला चहा तुमच्या अंगावर सांडू नये. मानले या पद्धतीला...
अजून ८० किमी राईड करायची होती. आम्ही जोर मारला आणि पुढे सर्वांना गाठले. तामिळनाडू मधील रस्ते अतिशय चांगले होते, त्यामुळे जोरदार राईड सहज होत होती. रस्त्याला रहदारी सुद्धा कमी होती.
.

.
दोनच्या सुमारास वाहीकोलम गावातील घरगुती हॉटेल मध्ये गेलो. येथे सर्व महिला काम करत होत्या. मसालेदार तळलेले काणे मासे आणि रस्सम भात खाल्ला वर चिक्की खाल्ली.

दुपारी साडेतीन वाजता टिफिन हॉटेल लागले. चहा साठी थांबलो. येथे सर्व तमिळी... त्यांना दुसरी कोणतीही भाषा येत नाही, त्याच्याशी मुक्याच्या भाषेत हावभावने काय हवे ते सांगितले. माणसे हसतमुख होती. किती पैसे झाले, या साठी नोटा काढून दाखवल्या.

विरदूनगर गावात साडेचारला पोहोचलो. तेथे चहा पीत असलेल्या नागरिकांनी आमची आस्थेने चौकशी केली. पर्यावरणाचा संदेश सर्व भारतात पसरावा, हे सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी चहा आणि गोड बनपाव खायला घातला. त्यांनी आपुलकीने केलेल्या चौकशी आणि स्वागतामुळे आमचा उद्देश साध्य होतोय याची निश्चिती झाली.

याच मंडळींनी तमिळ भाषेमध्ये "तूई मुई इंडिया" म्हणजे पोल्युशन फ्री इंडिया हे सांगितले. एक तमिळ वाक्य शिकलो होतो. मला वाटते... अशा प्रकारे भारत भ्रमण केले तर भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि खानपान याचा आस्वाद नक्कीच घेता येईल.

'तमिलची रेस्टॉरंट' पर्यंत ११५ किमी सायकलिंग झाले होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. अजून ४५ किमी जायचे होते. लक्ष्मणच्या डोक्यात आराम करायचे विचार होते, पण मी त्याला होकार देत नव्हतो. शेवटचे दोन दिवस संपूर्ण सायकलिंग लवकर लवकर करायचे असे मी ठरविले होते. हे लक्ष्मणच्या गळी उतरविण्यासाठी 'मौनं सर्वार्थ साधनं' हा मंत्र अवलंबला.
.

नाऊडूपट्टी गावापर्यंत लक्ष्मणाला रेटले.
शेवटी त्याला सांगितले, 'आता फक्त १३ किमी राहिले आहे सायकलिंग करूया' लक्ष्मण माझ्या मौनाचा अर्थ समजला होता, त्यामुळे तो हसत होता. राईड पूर्ण करायचे ठरले. रात्री साडेआठ वाजता कोविलपट्टीच्या जयलक्ष्मी हॉटेलमध्ये पोहोचलो. 163 किमी राईड झाली होती.

आजची सायकल सफर लांब पल्ल्याची होती, परंतु जनमाणसांच्या भेटीगाठी, त्यांचे आदरतिथ्य आणि नितांत सुंदर परिसर, हवा हवासा वाटणारा निसर्ग यामुळे सहज सोपी वाटली.

या कोविलपट्टीवरून कन्याकुमारी फक्त १३० किमी आहे. "याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा" तुकोबांच्या या अभंगाचा प्रत्यय उद्या येणार होता.
.

सतीश विष्णू जाधव