मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा) ०१.११.२०१९ बंगलोर ते सेलम

Primary tabs

सतीश विष्णू जाधव's picture
सतीश विष्णू जाधव in भटकंती
26 May 2020 - 10:52 pm

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा) ०१.११.२०१९

बंगलोर ते सेलम

बंगलोरच्या सिंदूरी हॉटेल मधून सकाळी सहा वाजता सेलमसाठी सायकल राईड सुरू झाली. कनकपुरा विभागातून मधून बाहेर पडून नाईस हायवे जवळ यायला अर्धा तास लागला.

आज सुद्धा नाईस टोल नाक्यावर आम्हाला अडवले. कालचा सीन पुन्हा रिपीट झाला. दिपकने फोनाफोनी सुरू केली आणि दहा मिनिटात रवी साहेबांनी पाठविलेली पोलीस व्हॅन आमच्या मदतीला हजर झाली. या पोलीस व्हॅनचे एस्कॉर्ट घेऊन आम्ही सर्वजण हायवे वरून रुबाबात निघालो. बंगलोरमध्ये असलेल्या दिपकच्या ओळखीमुळेच बंगलोर शहरातून आम्ही सर्व सहजपणे बाहेर पडलो. ट्रॅफिकमुळे, जुन्या हायवे वरून राईड करत बंगलोर बाहेर जायला आम्हाला तीन तास लागले असते ते नाईस रोड मुळे तासाभरात झाले.

नाईस रोडवरून २५ किमी राईड झाल्यावर बंगलोरच्या उपनगरातील ट्राफिक मध्ये आलो. या ठिकाणी सोपानराव, विकास, नामदेव, अभिजित आणि दीपक पुढे निघाले. मी आणि लक्ष्मण चहा साठी मागे थांबलो.

चहा घेऊन दहा मिनिटात आम्ही सायकलिंग सुरू केली. बंगलोर शहराच्या बाहेर आलो आणि सायकलचा वेग वाढला. आज जवळपास दोनशे किमी रायडिंग होते. बराचसा रस्ता उताराचा होता. तसेच आज वातावरण ढगाळ असल्यामुळे ऊन जाणवत नव्हते

बंगलोर मधून बाहेर पडल्यावर हायवे अतिशय सुस्थितीत होता. त्यामुळे सायकली २५ किमी वेगाने धावत होत्या. अकरा वाजेपर्यंत आम्ही ८० किमी अंतर कापले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची रेलचेल होती. आज सुद्धा ढगांचे वेगवेगळे रंग पाहायला मिळाले. ढगांच्या मागे सूर्याच्या किरणांची होणारी बरसात मन मोहून टाकत होती. निळ्याभोर नभात पांढऱ्या ढगांचे पुंजके फेर धरून नाचत होते.
.

रस्त्यात कन्याकुमारी ६०३ किमी हा माईल स्टोन लागला. कन्याकुमारी आता आवाक्यात आली आहे याची जाणीव झाली. मी आणि लक्ष्मणने आज आघाडी मारली होती. हिरव्यागार झुडपात दिपस्तंभासारखा दिसणाऱ्या माईल स्टोनला पाहून फोटो काढायचा मोह टाळता आला नाही. लक्ष्मणने तर दहा बारा फोटो काढले. मी त्या माईल स्टोनवर स्वार झालो होतो. इच्छित ध्येय्याकडे मनाचा वारू वायुगतीने पोहोचला होता.

.

.

हायवेच्यामध्ये वेगवेगळ्या फुलांची हिरवीगार झाडे मस्त डेरेदार झाली होती. या ठिकाणी सुद्धा रस्त्यावर गतप्राण झालेली फुलपाखरे आणि चतुर दिसले. नभात ढगांची लठ्ठालठ्ठी चालू होती. ते वाऱ्याच्या साथीने लपंडाव खेळत होते. निळ्याभोर गगनाकडे पाहताना "बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात..., भेट आपुली स्मरशी काय तू मनात..." हे भावगीत तरळले.
आकाशाकडे झेपावणारे उंच उंच कल्पतरूंचे वृक्ष, नभाच्या निळ्या पांढऱ्या रंगात हिरवळ पेरत होते. रस्त्याचा राखाडी, झाडांचा हिरवा, ढगांचा पांढरा आणि नभाचा निळा रंग निसर्गाच्या नयनरम्य दर्शनाची रंगत वाढवत होते. भावविभोर करणारे, हे निसर्गाचे रूप पाहणे म्हणजे पर्वणीच होती.
.

छोटीशी घाटी लागली, एका दमात घाटी चढलो आणि काय... त्या घाटाच्या माथ्यावर रसरशीत सीताफळ अवतरली. दोन मोठी सीताफळ फस्त करून नव्या दमान पुढची राईड सुरू झाली.
आता निसर्गाच्या रंगात पहाडी रंग सामील झाला. निसर्गाला कवेत घेऊन पुढची राईड सुरू केली.
.

तामिळनाडूचे हत्ती जंगल लागले. आता उतारावर भन्नाट वेगाने धावत होत्या सायकली. येथेच जपायचे असते. वेगावर नियंत्रण ठेऊन, बाजूने जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष देऊन, एकाग्र चित्ताने सायकल पळवावी लागते. सोबत समान असल्यामुळे उतारावरच सायकल सांभाळायला कसब लागते. उतारावर तातडीने ब्रेक लावणे अतिशय धोक्याचे असते.

उतार संपला आणि आम्ही तामिळनाडू मध्ये शिरलो. अटकूरकी गावात नानखटाई आणि डोसा खाल्ला. सोबत चहा घेतला. दुपारी दोन वाजता कृष्णगिरी टोल प्लाझा येथे पोहोचलो. सतत काहीतरी खात असल्यामुळे जेवणाची इच्छा नव्हती. तसेच आज मोठी राईड होती आणि जेवल्यावर सुस्ती येते. त्यामुळेच मी आणि लक्ष्मण ड्रायफ्रूट चिक्की इत्यादी एनर्जी पदार्थ खात होतो.

बाकीची मंडळी पुढेच होती. उताराचा रस्ता संपून आता सरळ रस्ता होता. रहदारी थोडी कमी झाली होती.

दुपारी तीन वाजता कावेरीपट्टणम पर्यंत मी आणि लक्ष्मण आलो होतो. येथून सेलम 98 किमी आहे.
.
लक्ष्मण चुळबुळ करत होता, थोडीशी पेंग आली होती त्याला. परंतु अंधार पडायच्या अगोदर सेलम गाठायचे होते. म्हणून थोडा वेळ थांबून, फ्रेश होऊन पुढील राईड सुरू केली. आता रस्ता सरळसोट होता आणि हेडविंड सुद्धा नव्हते, त्यामुळे वेगात सायकल धावत होत्या.

रस्त्यावरच्या उन्हामुळे मृगजळाचा भास होत होता. हायवेच्या दोन्ही बाजूला रानवाट फुलांचे ताटवे नेत्रसुख देत होते. खळाळत वाहणारी नदी, छोटे छोटे तलाव, उंच उंच नारळाची झाडे, डेरेदार केळीच्या लागवडी, एका बाजूला दिसणारे हिरवटलेले डोंगर, हे पाहिल्यावर इथेच, या निसर्गात मुक्काम ठोकण्याची मनोमन इच्छा झाली.
.

.

.
आजूबाजूला असणारी कौलारू घरे सुद्धा हिरव्यागर्द झाडांच्या वाड्यांमध्ये वसली होती. किती सुंदर जनजीवन आहे इथले. फुले, फळे, पक्षी, प्राणी यांच्या सहवासात जगणारी माणसे निरामय जीवन जगतात याची जाणीव झाली.
.

.
एक लक्षात आले, एक दिवसात खूप जास्त राईड, या सर्व आनंदापासून लांब ठेवते. फक्त एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी भोज्या करायला पळावे लागते. ज्यांच्याकडे वेळेची वानवा आहे त्यांनी हे करावे. पण निसर्गप्रेमी, अशा सायकलिंग पासून लांब राहील हे नक्की.

सायकलिंगचा उद्देश शरीर स्वास्थ्य तर आहेच पण त्याच बरोबर निसर्ग दर्शन, फोटोग्राफी, जनजीवनाची जवळून ओळख तसेच आपण घेतलेले प्रदूषण मुक्तीचे ध्येय सुसंवादावाटे जनमानसात पोहोचविणे, हा आहे. नक्कीच, पुढील नियोजित सायकल सफारी याच उद्देशानेच होतील.

सायंकाळी साडेसहा वाजता सेलम पासून २० किमी अंतरावर पोहोचलो. आता शेवटचा पॅच मारायचा होता. उरलेसुरले ड्रायफ्रूट खाल्ले. लक्ष्मणने अभिजीतला फोन केला. सर्व मंडळी सेलमच्या अलीकडे १५ किमी वर हॉटेल अन्नामार मध्ये उतरली होती. पेडलिंगला सुरुवात केली आणि १५ मिनिटात अन्नामार हॉटेल गाठले.

अभिजित प्लॅनिंग मास्टर आहे. गुगल वर सर्च करून राईड करता करता, स्वस्त आणि मस्त हॉटेल शोधून काढत होता. आम्ही अंघोळ करून फ्रेश होई पर्यंत हॉटेल खालच्या रेस्टॉरंट मध्ये जेवणाची व्यवस्था दिपकने केली होती.

आज एकूण २०३ किमी राईड झाली होती. माझ्या सायकलिंग करियर मधली सर्वात मोठी राईड होती आजची.

सतीश विष्णू जाधव

प्रतिक्रिया

गणेशा's picture

28 May 2020 - 8:47 pm | गणेशा

Wow, मस्त हा भाग आवडला..

सतीश विष्णू जाधव's picture

5 Jun 2020 - 3:06 pm | सतीश विष्णू जाधव

धन्यवाद गणेश.....

Nitin Palkar's picture

6 Jun 2020 - 8:27 pm | Nitin Palkar

वर्णन सुंदर. फोटो प्रोसेस न करता टाकावेत.
--- वै. म.