भैरवगड (शेरपुंजे) ते रतनगड ट्रेक २८-२९ डिसेंबर २०१९ (B2R Trek)

Primary tabs

Vivek Phatak's picture
Vivek Phatak in भटकंती
15 May 2020 - 6:30 pm

मागचा ७५ किमीचा लोणावळा-भीमाशंकर रेंज ट्रेक करून तीन महिने झाले. त्यामुळे परत एक रेंज ट्रेक करण्याची इच्छा होती. रेंज ट्रेक ची मजा काही औरच असते. एक तर अशा ट्रेक ला येणाऱ्यांची संख्या कमी असते त्यामुळे एकमेकांची ओळख पटकन होते आणि ती टिकून राहते. तर ह्या वेळचा ट्रेक होता अकोले तालुक्यातला भैरवगड (शिरपुंजे) ते रतनगड असा जवळपास ५५ किमी चा. ह्या ट्रेक चा मार्ग होता, शिरपुंजे गाव- भैरवगड-घनचक्कर टॉप-गवलदेव टॉप-मुडा टॉप-कुमशेत गाव-कात्राबाई टॉप- रतनगड. ट्रेक साठी एकूण १२ शिलेदार जमले. २७ डिसेंबर ला रात्री साधारण १२ वाजता शिवाजीनगर पुणे येथून खाजगी बस ने प्रस्थान केले. पुण्याहून निघून राजगुरूनगर, आळेफाटा , राजूर असे करत सकाळी ५/५.30 वाजता आम्ही शिरपुंजे ह्या गावात पोचलो तेव्हा गाव अजून जागे व्हायचे होते.

(भैरवगड शेरपुंजे गाव)


(समोर भैरवगड )
एका मंदिरात आम्ही बस्तान बसवले. सकाळच्या न्याहारी साठी न्युडल्सचा बेत होता. त्यासाठी लागणारी गाजरे ,मटार वगैरे आम्ही विशालला (आमचा ट्रेक लीडर) कापून/सोलून दिली. त्याने मस्त गरम गरम न्युडल्स बनवली आणि वर मस्त गुळाचा चहा. मस्त बेत जमला. आता ट्रेक ला सुरवात करायची होती. पण हा पायलट ट्रेक असल्यामुळे आणि ट्रेकचा मार्ग आम्हालाच शोधायचा असल्यामुळे गावातल्याच सुरेश भाऊला बरोबर घेतले. तो आम्हाला मुडा टॉप पर्यंत मार्ग दाखवणार होता आणि कुमशेत गावात उतरण्याची वाट दाखवून परत फिरणार होता.

साधारण ८ वाजता आम्ही भैरवगड (११४५ मीटर्स) चढायला सुरवात केली. वाट मस्त चढीची पण अधून मधून अर्धवट पायऱ्यांची होती. तासाभरात आम्ही एका खिंडीत पोचलो. तेथून वर चढायला व्यवस्थित पायऱ्या आहेत. वरचा परिसर बऱ्यापैकी मोठा आहे. भैरोबाचं मंदिर आहे. घोड्यावर स्वार असलेली भैरोबांची मूर्ती आहे. गडावर पाण्याची ३-४ टाकी आहेत. गडावरून दिसणाऱ्या भोवतालच्या परिसराचा आस्वाद घेऊन, भैरोबांचे दर्शन घेऊन १०/१०.३० ला आम्ही गड उतरायला सुरवात केली.


(भैरवगड चढाई )

आता लक्ष होते घनचक्करचे. घनचक्कर हे महाराष्ट्रातील सह्याद्री रांगेतले तिसर्या क्रमांकाचे उंच शिखर (१५०९ मीटर्स) आहे. भैरवगड वरून उतरताना लगेचच डावीकडे एक अगदी निमुळती वाट जाते. एकच पाउल मावेल इतकी निमुळती वाट होती. त्यामुले फारच जपुन जावे लागत होते. जरा जरी तुमचे लक्ष विचलीत झाले तर तुम्ही खाली घसरणार हे नक्की. तर अशा एका मोठ्या लांबलचक ट्रॅव्हर्स वरून मार्गक्रमण करत आपण एका मोठ्या पठारावर येतो. येथून आपल्याला घनचक्कर चे प्रथम दर्शन होते. ह्या पठारावर आम्ही एक छोटा खादाडी ब्रेक घेतला. यथेच्छ फोटो काढले आणि पुढे मार्गस्थ झालो. साधारण १ वाजता आम्ही घनचक्कर टॉप वर पोचलो. वरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा अप्रतिम होता त्यामुळे इथेही मस्त फोटो सेशन झाले. वर पाण्याची किंवा थांबण्याची काहीही सोय नाही त्यामुळे ट्रेकर्स कडून हा भाग दुर्लक्षित आहे.


(ब्रेक)

(घनचक्कर कडे जाताना)

(घनचक्कर कडे जाताना)


(घनचक्कर वरुन)
आता आमचे पुढचे लक्ष होते गवलदेव टॉप (१५२२ मीटर्स), महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर. घनचक्कर वरून उतरताना आम्ही एका मोठ्या पठारावर आलो. गुराख्यावीना गुरांचे खूप कळप इथे चरत होते. पुढे जाऊन पाहिले तर खाली खोल दरी. उतरायला जागाच नाही. आमचा सुरेशभाऊ पण गोंधळला. दरीच्या पुढे विशाल गवलदेव पर्वत दिसत होता पण वाट सापडत नव्हती. थोडे डावीकडे चालत असताना घनचक्कर आणि गवलदेव मध्ये एक खिंड लपलेली दिसली. अजून थोडे पुढे गेलो आणि खाली उतरणारी, वाळलेल्या झुडपांमधून जाणारी वाट दिसली. त्या वाटेने, जवळपास अर्धा तास वेडीवाकडी वळणे घेत आम्हाला खिंडीत आणून सोडले.


(गवलदेव पर्वत)

(घनचक्कर उतरताना)

एव्हाना १.३०/२ वाजले होते. पोटात आता कावळ्यांनी ओरडायला सुरवात केली होती. आम्हाला वर चढणारी वाट दिसत होती, पण कुठे मस्त सावली दिसत नव्हती जेवायला. शेवटी पुढे गेल्यावर दोन मोठ्या खडकां मध्ये सावलीची जागा मिळाली. मग काय ! सगळ्यांनी आपापले डबे उघडले आणि मस्त अंगतपंगत केली. जेऊन थोडी विश्रांती घेऊन पुन्हा सुरवात केली. पुन्हा मोठा ट्रॅव्हर्स घेत, वाट दाट झाडीतून गवलदेव डोंगराच्या पुढच्या बाजूला आली. आता ऊन चांगलेच तापले होते.दुपारचे साधारण ३ वाजले होते. सावलीसाठी एकही झाड नव्हते. आम्ही तसेच भर उन्हात वर चढत होतो. एक मोठा रॉक patch लागला. तोही पार केला तरीहि अजून टॉप दिसत नव्हता फक्त अजून चढच दिसत होता. शेवटी एकदाचे ४ वाजता वर पोचलो. इथेही वर काहीही नाही. फक्त एका छोट्याशा चौथऱ्यावर गवलदेवाची स्थापना केलेली दिसत होती. इथे दर्शन घेऊन, थोडी फोटोग्राफी करून आम्ही लगेच उतरायला सुरवात केली कारण इथून आमचा वाटाड्या परत फिरणार होता आणि आम्हाला कुमशेतचा लांबचा पल्ला गाठायचा होता. काही लोक वर गुरं चारत होती त्यांनी सांगितले कि तीन साडेतीन तास लागतील खाली कुमशेतला उतरायला. उतारायचेच असल्यामुळे खूप हायसे वाटले. पण २ तासात सूर्य मावळणार होता आणि आम्हाला अंधारात डोंगरवाटा उतरायच्या होत्या. त्यामुळे लगेच उतरायला सुरवात केली.


(सर्वात शेवटी आजोबा पर्वत)

(भंडारदराचे पाणी)


पाच साडे पाच पर्यंत सूर्य मावळतीला लागला आणि वातावरणात सुखद गारवा यायला लागला. आजूबाजूची सहयाद्रीची शिखरे सुद्धा मावळतीच्या उन्हात चमकत होती. आजोबा, कात्राबाईचा डोंगर आणि रतनगड मधूनच डोकावत होते. खाली अथांग पसरलेले भंडारदराचे पाणी दिसत होते. अंधार पडल्यावर सगळ्यांनी विजेर्या काढल्या आणि त्याप्रकाशात आम्ही कात्राबाईची डोंगरवाट उतरायला सुरुवात केली. उतरताना आम्ही दोन गटात विभागलो गेलो. एक गट पुढे गेला. आम्ही थोडे मागे राहिलो. पुढे गेलेल्यापैकी एक मित्र रस्ता चुकला. तो पर्यन्त अन्धार पडला होता. आम्ही मागुन येत होतो. तो जोरजोरात आमच्या नावाने आवाज देत होता. आम्ही त्याचा आवाज ऐकला. त्याच्या साठी थोडा वेळ थांबलो. तो आल्यावर एकदम हायसे वाटले. नाहीतर रात्रीच्या वेळी जंगलात वाट सापडणे फार अवघड असते. पुढे संपूर्ण उतरण असल्यामुळे तास सव्वा तासात आम्ही कुमशेत मध्ये दाखल झालो. विठ्ठल रखुमाई चे छोटेसे मंदिर होते आणि समोर प्रशस्त आवार होते. तिथे आम्ही भराभर तंबू उभारले. जवळच्या नदी वरून पाणी आणले. रात्री मस्त पुलाव आणि अननसाचा शिरा बनवला विशालने. आम्ही त्याला थोडी थोडी मदत केली. काही मंडळींनी तोवर शेकोटी पेटवली. मस्त जेऊन, रात्री ११/११.३० पर्यंत शेकोटी जवळ गप्पा मारत बसलो. गाव तर ७/७.३० लाच चिडीचूप झालं होतं. ११/११.३० ला तंबूत slipping बॅग्स मध्ये झोपलो त्यामुळे थंडी अजिबात वाजली नाही.


(कुमशेत गाव)

सकाळी ६ वाजता उठून रेडी झालो. आज मस्त उपमा बनवला होता विशालने आणि चहा तर काय फक्कडच बनवला होता. तंबू पॅकिंग करून झाले, गावातल्या छोट्या मुलांबरोबर फोटो सेशन झाले. ८.३० ला निघालो. आजही ८-९ तासांचा पल्ला गाठायचा होता. सर्व प्रथम काल उतरलेली कात्राबाईची घाटवाट चढायची होती. सकाळची ताजी हवा आणि रात्री झालेली झोप, यामुळे ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे ती वाट आम्ही २ तासात चढून गेलो आणि कात्राबाईच्या मंदिराजवळ पोचलो. बॅकपॅक तिथेच ठेऊन कात्राबाई टॉपसाठी निघालो. वर थोडेसे चढल्यावर लांबच लांब गवताली पठार होते. दूरवर कोणाचाही मागमूस नव्हता आणि वाऱ्याचा सोडून कसलाही आवाज नव्हता. फक्त निशब्द शांतता. थोडेसे ढगाळ वातावरण आणि थंड गार हवा, त्यामुळे घामाचा त्रास जाणवत नव्हता. कात्राबाई खिंडी मधला नजारा तर औरच होता. खिंडीच्या त्या बाजूला रतनगड उभा होता. काही कसलेले ट्रेकर्स हि खिंड उतरून रतनगड सर करतात. त्या खिंडीच्या टोकावर बसून बराच वेळ निसर्ग निर्मित रौद्र कड्याचे निरीक्षण करत त्याचा आनंद घेत बसलो.


(कुमशेतहुन दुसर्या दिवशी सुरवात)


(कुमशेतचा कोम्बडा)

(कात्राबाई टॉप चढाई)

(कात्राबाई खिंड)


दुपारी एक वाजता उतरायला सुरवात केली, कात्राबाई देवळात दर्शन घेतले, आधी ठेवलेल्या sacks घेतल्या आणि रतनगडाची वाट धरली. ईथुन पुढे संपूर्ण जंगल ट्रेक होता. कुठे विरळ तर कुठे दाट झाडीचा. साधारण ३.३० ला रतनगड-हरिश्चंद्रगड जंकशनला पोचलो. आम्ही चौघे मी, विशाल, वैभव आणि अनुपजी तिथेच थांबलो आणि थोडी पोटपूजा केली बाकीचे लोक रतन गडावरून येईपर्यंत. आम्ही रतनगड आधी पाहीलेला होता त्यामुळे आम्ही वर गेलो नाही. तिथून पुढे अर्ध्या पाऊण तासाची वाट होती रतनवाडी पर्यंत जिथे आमची बस थांबली होती. भराभर पाय उचलत सहा वाजेपर्यंत आम्ही रतनवाडी गाठली, फ्रेश झालो आणि अमृतेश्वराचे दर्शन घेतले. एवढा मोठा रेंज ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या आनंदातच सात वाजता पुण्याकडे मार्गस्थ झालो. वाटेत रात्री दहा वाजता मस्तपैकी जेवण करून १ वाजता पुण्यात पोचलो.


(कात्राबाई मन्दिर)

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

26 May 2020 - 11:35 am | Nitin Palkar

सुरेख वर्णन, सुंदर प्रकाशचित्रे. थोडे अधिक विस्तारपूर्वक लिहावयास हवे होते.....

Vivek Phatak's picture

26 May 2020 - 5:15 pm | Vivek Phatak

धन्यवाद..

अवघड भटकंती आहे. फोटो छान.

Vivek Phatak's picture

26 May 2020 - 5:15 pm | Vivek Phatak

धन्यवाद..

गणेशा's picture

26 May 2020 - 2:01 pm | गणेशा

अप्रतिम भावा...
खुप मनापासून आवडली भटकंती...

मागच्या वर्षी लोणावळा - राजमाची आणि
कर्जत - भीमाशंकर केलेली भटकंती आठवली..
आणि रतनगड पण आठवला...

Vivek Phatak's picture

26 May 2020 - 5:16 pm | Vivek Phatak

धन्यवाद मित्रा..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2020 - 4:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम छायाचित्रे आणि वर्णन. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

Vivek Phatak's picture

29 May 2020 - 7:32 pm | Vivek Phatak

धन्यवाद सर..