मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस चौथा) २८.१०.२०१९ संकेश्वर ते धारवाड

Primary tabs

सतीश विष्णू जाधव's picture
सतीश विष्णू जाधव in भटकंती
15 May 2020 - 4:03 pm

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस चौथा) संकेश्वर ते धारवाड

संकेश्वरमधील राजधानी हॉटेलच्या टेरेसवरून सायकल खाली घेऊन सामानाची बांधाबांध करून सायकलिंग सुरू करायला सकाळचे सहा वाजले.

प्रभातीच्या सुवर्णछटांनी आसमंत दरवळून निघाला होता.

.

तुरळक काळे मेघ क्षितिजावरील सुवर्णप्रभांमध्ये गहिरे रंग भरत होते. शांत धुंद गुलाबी हवा ढगांच्या रथावर आरूढ होऊन, सुवर्ण किरणांचे आगमन भूतलावर प्रशस्त करीत होती.

सकाळी सर्वांनी स्प्रिंट मारायचे ठरविले. 22 किमी अंतर एका तासात पार केले आणि हत्तरगी टोल प्लाझाला पोहोचलो.
.

तेथे चहा, बिस्कीट खाऊन तडक सायकलिंग सुरू केले.

सकाळचे वातावरण अतिशय आल्हाददायक होते. थोड्या वेळातच आसमंत सोनेरी रंगाने प्रकाशमान झाला.
.

दारमानकी गावाजवळ, सायकलवर एक वयस्क गृहस्थ चालले होते. त्यांच्या जवळून सायकल चालवायला लागलो आणि नाव विचारले, 'बाळाप्पा शिवाप्पा पवार' वय वर्ष ७०,
.

वयाच्या १५ वर्षांपासून सायकल चालवितो, आता दररोज १० किमी राईड करतो', पवार आजोबांनी, त्यांचा सायकल प्रवास सांगितला. खूप आनंद झाला पवार आजोबांना भेटून. अजूनही धडधाकट आणि तुकतुकीत चेहऱ्याचे आजोबा खूप भावले. आम्ही कन्याकुमारीला सायकलवरून "प्रदूषणमुक्त भारत" हा संदेश घेऊन निघालोय, हे सांगितल्यावर, त्यांनाही आनंद झाला. त्यांच्यासह फोटो काढून, त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघालो.

मध्ये एक छोटा घाट लागला . घाट चढण्याअगोदर दोन केळी खाल्ली, त्यामुळे मस्त एनर्जी आली होती. माथ्यावर पोहोचलो, पलीकडून येणाऱ्या वाऱ्यावर पाण्याचे दोन घोट मारले.

आता भन्नाट उतार सुरू झाला, वाऱ्यावर आम्ही सर्व विहरत होतो. सोपान, विकास आणि नामदेव सुसाटत पुढे निघाले होते. त्यांच्या मागे अभिजित आणि दिपक अगोदर केलेल्या सायकलिंगच्या गप्पा मारत चालले होते. लक्ष्मण आणि मी निसर्गभ्रमणचा आनंद घेत आणि फोटो काढत पेडलिंग करत होतो.

नऊ वाजेपर्यंत जबरदस्त राईड झाली ४५ किमी अंतर सहज पार केले होते. हा प्रदेश कर्नाटकमध्ये असून सुद्धा खूप मराठी माणसे भेटत होती.

ककती गावात नास्ता घेण्यासाठी थांबलो. प्रशांतचा सायकालिस्ट मित्र निखिल आम्हाला भेटायला आला होता. प्रशांतला खूप आनंद झाला. त्याने आमच्यासह १० किमी सायकलिंग केले. त्याच्या शुभेच्छा घेऊन पुढील राईड सुरू झाली.

रस्त्त्यात ७२ वर्षाचे 'कृष्णाप्पा बोंगाळे' काका भेटले. सायकलिंग करत शेतावर निघाले होते. आम्ही कन्याकुमारीला प्रदूषणमुक्तीचा संदेश घेऊन चाललोय याचे खूप अप्रूप वाटले त्यांना. काकांनी, सर्वांच्या खाऊसाठी वीस रुपये बक्षीस दिले आणि योग जागृतीचा सुद्धा प्रसार करा हा संदेश दिला. काकांकडून उस्फूर्तपणे मिळालेले बक्षीस आमच्या प्रदूषण मुक्तीच्या प्रयत्नांना मिळालेले सर्वात मोठे प्रशस्तीपत्र होते.

आता दुपारचे बारा वाजले होते. वरमुंटी घाट चढायला सुरुवात केली. माझ्या सोबत लक्ष्मण सायकलिंग करत होता. घाटात सोपान, विकास, नामदेव, अभिजित आणि दीपक आमच्या पुढे गेले.

घाटाच्या माथ्यावर गेल्यावर तेथे असलेला ऊसाचा रसवाला धावत आला आणि तुमच्या माणसाने रसाचे २० रुपये दिले नाही म्हणून सांगितले. प्रत्यक्षात आम्हाला रस पाजावा, म्हणून अभिजीतने त्याला २० रुपये आगाऊ दिले होते. अशी पण माणसे जीवनप्रवासात भेटतात आणि शिकवून जातात.

पुढे सायकलिंग करताना 'भीमा संताजी' आजोबा भेटले. ते म्हणाले, 'सायकलिंग करतच, मी तालुक्याच्या बाजारात नियमित जात असतो. त्यामुळे गावातील सहकाऱ्यांची खूपशी कामे पटापट होतात'. काटक पण धडधाकट भीमा आजोबांना नमस्कार करून पुढे निघालो.

दरम्यात 'इरेबागेवाडी' येथे चहा प्यायला थांबलो. तेथे तरुण 'संगू गायकवाड' भेटला. आमची आस्थेने चौकशी केली, "हुबळीला काय मदत हवी असेल तर सांगा" हे त्याचे बोल, जवळच्या परिचितासारखे वाटले. गम्मत म्हणजे, तू काय करतो हे विचारल्यावर, "पॉलिटिक्स माझा व्यवसाय आहे आणि सर्व पक्षांना माणसे पुरविण्याचे काम करतो", हसत हसत 'संगू' म्हणाला.

नवनवीन माणसे त्याचे स्वभाव, आस्था, आपुलकी, बोलण्याची कला यामुळे ज्ञानात प्रचंड भर पडली होती. ही माणसे आता जवळची वाटू लागली होती. एका गोष्टीची जाणीव प्रकर्षाने झाली, ती म्हणजे, 'चांगलं काम करायला निघालो की सर्व माणसे आणि निसर्गसुद्धा भरभरून मदत करतो'.

राजस्थान धाब्यावर दुपारी दोन वाजता पोहोचलो ८७ किमी राईड झाली होती. अतिशय सुमार धाबा होता हा. दुपारीच तेथील भाजी संपली होती. दालराईस खावा लागला. राजस्थानातील तरुण मुले कर्नाटकात धाबा चालवितात. परंतु महाराष्ट्रातील तरुण, अशी खाद्य चळवळ परप्रांतात चालविताना तुरळक दिसतो.

जवळच पाण्याचा मस्त हौद होता, त्यामध्ये फ्रेश झालो. आमच्या आधी सोपान, नामदेव, अभिजित, दीपक आणि विकास यांचे जेवण झाले होते. आम्ही आलो आणि ते पुढे निघाले.

दुपारचे ऊन होते, पण वारा छान सुटला होता. लक्ष्मण म्हणाला, ' निसर्ग संगीताच्या तालावर माझ्या सायकलवरील तिरंगा लयबद्ध फडकत आहे'. लक्ष्मणसुद्धा निसर्गावर भाळला होता.

.

नुसती सायकल दामटण्यापेक्षा, लक्ष्मणने निसर्गाबरोबर धरलेला फेर, मन उल्हसित करत होता.

हायवेच्या मध्ये रंगीबेरंगी फुलांचे ताटवे फुलले होते. पिवळी, गुलाबी, निळी, केसरी रंगाची ती रानफुले वाऱ्यावर छानपैकी डोलत होती.

.

या फुलांच्या ताटव्यावर रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत होती. आणि हे काय !, काही फुलपाखरे त्या डांबरी रस्त्यावर धडपडत गतप्राण झाली होती. एवढ्या सुंदर वातावरणात, मस्त हवेवर बागडणाऱ्या फुलपाखरांची अशी अवस्था का बरे व्हावी? एक वोव्हो बस माझ्या बाजूने सुसाटत गेली. त्या बसच्या प्रचंड झोताबरोबर, हायवेच्या मधोमध असलेल्या फुलांच्या ताटव्यातून मधूकण भक्षून रानाकडे परतणारी आणखी दोन फुलपाखरे गतप्राण होऊन माझ्या सायकल जवळ पडली. कोमल हाताने त्यांना उचलून एका झुडपाच्या पानावर ठेवले. खूप चटका लावून गेला तो प्रसंग. मनोमन ठरविले, कर्नाटक सरकारला पत्र लिहायचे, 'हायवेच्या मधे फुलझाडे लावू नका म्हणून'.

त्यानंतर थोडा वेळ आम्ही सर्व्हिस रस्त्यावरून सायकली चालविल्या.

.

पुढे टोल नाका आला, तेथे चहा आणि नानखटाई खाल्ली. आमचे पाच स्प्रिंटर खूप पुढे गेले होते.

वाटेत बेळगाव शहराच्या थोडे पुढे हलगा गावाजवळ कर्नाटक सरकारचे सुवर्ण विधान भवन लागले.
.

निसर्ग रम्य परिसरात अतिशय भव्य आणि विलोभनीय राजवाडा सदृश्य इमारतीचे बांधकाम होते. जवळचे जलमंदिर सुदधा निसर्गाचे सौंदर्य वाढवत होते.

त्यानंतर लक्ष्मण आणि मी, जोरदार पेडलिंग केल्यावर धारवाड जवळच्या टोल नाक्यावर, पुढे गेलेले आमचे पाच साथीदार भेटले. आणखी पुढे जायचे होते. पण दिपकचा मित्र, संजय भाटियाने आमची धारवाड कृषी विद्यापीठात, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती.

येथेच संजय बरोबर संतोषची पण ओळख झाली. संतोष धारवाड मध्ये अक्षयपात्र अन्नदान योजना चालवितो. अक्षयपात्र ही आशियातील सर्वात मोठी किचन आहे. तिचे नाव लिम्का रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाले आहे.

खरच दिपकच्या अफाट जनसंग्रहामुळे आमची ही सायकल सफर अतिशय मजेत आणि कमी खर्चात चालली होती. आपल्याला सहलीत-सफरीत खूप माणसे भेटतात. पण भेटलेल्या माणसांशी संपर्क ठेऊन, वेळप्रसंगी त्यांना मदत करण्याचे काम किती जण करतात. ही हातोटी जपलीय दिपकने, त्यामुळेच प्रत्येक ठिकाणी अशी मैत्री जपलेली माणसे लोहचुंबकासारखी खेचत येतात. मैत्री वाढविण्याची आणि जपण्याची अतिशय मस्त कला आहे दिपककडे.

धारावाडच्या कृषी विद्यापीठातील VIP हॉस्टेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था होती. अतिशय आलिशान होते हॉस्टेल. जेवणसुद्धा सात्विक होते.

धारवाड कृषी विद्यापीठामध्ये सेंद्रिय (ऑरगॅनिक) खते वापरून तयार झालेल्या धान्यातून बनविलेले अन्नपदार्थ रात्रीच्या जेवणात चाखता आले. हा एक वेगळा आणि आनंंददायी अनुभव होता. त्यामुळे १३० किमी सायकल चालविल्याचा शीण कुठल्याकुठे पळून गेला होता.

कृषी विद्यापीठाचे केअर टेकर राजशेखर सायंटिस्ट आहेत आणि स्वतः ऑरगॅनिक शेती करतात. त्यांनी आमचे यथोचीत आदरातिथ्य केले. प्रदुषण मुक्तीच्या आमच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांच्या शेतीच्या प्रोजेक्ट्ची माहिती दिली.
.

आजची संकेश्वर ते धारवाड सायकल सफर रंगीबेरंगी होती. परंतु फुलपाखरांचा प्रसंग चटका लावून गेला होता. या प्रवासात भेटलेले गावकरी पर्यावरण रक्षणाबाबत खूपच सजग आहेत, याचा प्रत्यय आला. वयस्क गावकरी सायकलिंगमुळे अतिशय सुदृढ आणि कार्यक्षम होते. तसेच धारवाडला भेटलेल्या मित्रांमुळे या सायकल सफारीचा आनंद इंद्रधनुष्यी झाला होता.

त्यामुळे रात्रीच्या गप्पा जबरदस्त रंगल्या. स्वप्नात आलेल्या फुलपाखरांना मी अभय दिले होते.

सतीश विष्णू जाधव

प्रतिक्रिया

तुरळक काळे मेघ क्षितिजावरील सुवर्णप्रभांमध्ये गहिरे रंग भरत होते. शांत धुंद गुलाबी हवा ढगांच्या रथावर आरूढ होऊन, सुवर्ण किरणांचे आगमन भूतलावर प्रशस्त करीत होती.

भारी लिहिले आहे.

भेटणारी माणसे म्हणजे खरेच खुप छान वाटते

सतीश विष्णू जाधव's picture

16 May 2020 - 7:07 pm | सतीश विष्णू जाधव

निसर्ग म्हणजे प्रसन्नतेचा जिवंत झरा आहे. प्रत्येक क्षणाला नवनवीन आनंद देणारा...

असेच प्रेम राहो...

सतीश

सिरुसेरि's picture

16 May 2020 - 2:19 pm | सिरुसेरि

सुरेख वर्णन . पुप्रशु.

सतीश विष्णू जाधव's picture

16 May 2020 - 7:07 pm | सतीश विष्णू जाधव

छान वाटले....