मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस पहिला) 25.10.2019 *मुंबई ते पुणे सायकलिंग*

सतीश विष्णू जाधव's picture
सतीश विष्णू जाधव in भटकंती
11 May 2020 - 8:00 pm

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर

25.10.2019 दिवस पहिला

*मुंबई ते पुणे सायकलिंग*

मुंबई ते कन्याकुमारी राईडचा आजचा पहिला दिवस होता. 1760 किमी सायकलिंग 11 दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय घेऊन, तसेच या संपूर्ण सायकल वारीत "प्रदूषण मुक्त भारत" हा संदेश जनमानसात रुजविण्याचे स्वप्न उराशी बाळगून सुरू झाली सायकलवारी. सोबत माझा सायकलिस्ट मित्र लक्ष्मण नवले होता.
.
पहाटे साडेतीन वाजता मुंबईवरून सायकल राईड सुरू झाली. कन्याकुमारी गाठायचे असल्यामुळे मागील कॅरियरवर बरेच समान होते. चौकपर्यंत सकाळी आठ वाजता पोहोचलो. पुढचा खोपोली पर्यंतचा रस्ता अतिशय खराब होता. त्यात सेल्फ सपोर्ट राईड, म्हणून अशा रस्त्यावर सांभाळून सायकल चालवत होतो. आणखी तासाभरात खोपोलीला पोहोचलो
.
माझी सायकल MTB असल्यामुळे, ही सफर सोपी झाली. खोपोलीत जेवण घेतले. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, 'तुमचे मागील चाक आउट आहे'. जेवल्यावर चाक फिरवून पाहिले. खरेच आउट होते, मागचे चाक.

पुण्याला जाऊन आउट काढायचे ठरले. आता खंडाळा घाट सुरू झाला. आज आम्ही पहिल्यांदा सर्व सामनासह घाटात सायकलिंग करत होतो. पहिला हॉल्ट शिंगरोबा मंदिराजवळ घ्यायचा ठरले.

लक्ष्मण त्याच्या वेगाने हळूहळू पुढे सरकू लागला. शिंगरोबा मंदिराच्या आधी एक अवघड वळण आहे. तेथे सायकल मधून "खाड्खुड" आवाज झाला. झटक्यात सायकल थांबली. सावधगिरीने ताबडतोब सायकल मुख्य रस्त्यावरून बाजूला घेतली आणि आडवी झोपवली. सायकलची चेन गियरमध्ये अडकली होती. तसेच एक तार तुटून पडली होती. खूप प्रयत्न करून चेन सोडवली. तार एका बाजूने तुटून लटकत होती. लक्ष्मणला फोन लावला. त्याने निखळलेली तार बाजूच्या स्पोक मध्ये गुंतवायला सांगितले. लक्ष्मण शिंगरोबा मंदिराकडे सायकल ठेऊन खाली यायला निघाला. मी सायकल ढकलत घाट चढत होतो. रस्त्यात लक्ष्मण भेटला. त्याने सायकल तपासली आणि ढकलण्यापेक्षा सायकलिंग करायला सांगितले. मारली टांग सायकलवर आणि सुरु केली. लक्ष्मण मागून सायकल ढकलत होता. आम्ही आता मंदिराकडे पोहोचलो. घामाने थबथबलो होतो. माठातील गार पाणी पिऊन निवांत झालो. तेवढ्यात लक्ष्मणने पुण्याला सत्यजितला फोन करून पुण्यात सायकल मॅकेनिकची व्यवस्था करण्यास सांगितले.

चाक थोडेसे वेडेवाकडे झालेले, त्यात एक तार तुटलेली. मागील चाकावर सामानाचे ओझे. अशा परिस्थितीत पुणे गाठायचे होते. अमृतांजन पुलावर पुन्हा चेन लॉक झाली. आता लक्ष्मणला फोन न करताच मीच मॅकेनिक झालो. चेन सोडवली आणि अतिशय सावकाश सायकलिंग करत राजमाची पॉईंटकडे पोहोचलो. माझ्या उशिरा येण्याचे कारण लक्ष्मणला समजले होते.

राजमाची पॉइंटवर मस्त थंडगार वारे सुटले होते. समोरील हिरव्यागार डोंगरमाथ्यावरून झकास पांढराशुभ्र धबधबा खालच्या झाडीत लुप्त होत होता. निळेशार आकाश आणि त्यात काळ्याभुऱ्या ढगांची गर्दी, प्रकाशाच्या विविध छटा अनुभवताना, डोळ्याचे पारणे फिटले होते..

दिवाळीतील धनत्रयोदशीचा आजचा दिवस, या निसर्गाच्या समवेत व्यतीत करण्याचे भाग्य माझ्या जीवनात आले होते. सोबत हसतमुख दोस्त लक्ष्मण होताच. जीवनाची "सेकंड इंनिग" नेहमीच अफलातून असावी, अशी मनोमन प्रार्थना केली.

पुढचा लोणावळ्यापर्यंतचा सायकल प्रवास याच आनंदलहरीवर झुलत डोलत पूर्ण झाला. लोणावळ्यात हायड्रेशन ब्रेक घेतला. आता पुण्यापर्यंत साठ किमी राईड करायचे होते. जुना हायवे टकाटक होता. सावधगिरीने आणि सुसाटत निघालो. तळेगावला चहा बिस्कीट खाऊन पुढची राईड सुरू झाली. दोन तासात शिवाजी नगरला पोहोचलो. शिवाजी नगरला आल्यावर आमचा लेह सायकलिस्ट मित्र सत्यजित मदतील आला. त्यानेच कर्वे रोडवरील ट्रॅक अँड ट्रेलचे दुकान दाखवले.
या दुकानातील मॅकेनिक राजू , देवासारखा धावून आला. दुकान बंद होण्याच्या बेतात होते. माझ्या सायकलची अडचण समजताच राजुने भराभर काम सुरू केले आणि अर्ध्या तासात सायकल टकटकीत झाली.

हा राजू सुद्धा सायकलिस्ट आहे. दरवर्षी पुण्याचा एक गृप घेऊन सायकलिंग करत गोव्याला जातो. आम्ही कन्याकुमारीला सायकलिंग करत जाणार, हे कळल्यावर त्याने पेढे दिले. आम्हाला पाहून खूप आनंदाला होता राजू !!.

तेथून आम्ही कोथरूड शिवाजी पुतळ्याजवळ आलो. येथे सत्यजितला निरोप दिला. आजचा मुक्काम कोथरूडला होता. आज 152 किमी सायकलिंग झाले होते.

पहिल्या दिवसाची सायकल सफर खडतर होती पण अश्यक्य नव्हती. कठीण गोष्ट साध्य केली की तीचा आनंद अपरिमित आणि अविस्मरणीय असतो. एक गोष्ट लक्षात आली, जीवनात अशक्य असे काहीही नसते, परंतु ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक असते.

सतीश विष्णू जाधव .

प्रतिक्रिया

गणेशा's picture

12 May 2020 - 12:49 am | गणेशा

वा सुंदर लिहीत आहात..
आवडली सफर..

पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत...

सतीश विष्णू जाधव's picture

12 May 2020 - 1:01 am | सतीश विष्णू जाधव

अभिप्रायाबद्दल आभार... असेच प्रोत्साहन मिळो ! !

पुढचे भाग वाचायला आवडतील..

चामुंडराय's picture

12 May 2020 - 6:59 am | चामुंडराय

मस्त, पुढचे भाग पटपट टाका.

वाचायला उत्सुक आहे.

बाकी सायकलचे असे तुमचे, केडी सरांचे धागे वाचले कि सॉलिड न्यून कि काय म्हणतात तो न्यूनगंड येतो राव.
सायकल वर दहा किलोमीटर झाले तरी हापसणाऱ्यांच्या क्लबचा मेम्बर चामुंडराय

प्रशांत's picture

12 May 2020 - 2:35 pm | प्रशांत

छान सुरुवात..!

या प्रवसासाठी तुम्हि MTB का निवडली?
चैन अडकण्याचे काय कारण?

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..

- प्रशांत

सतीश विष्णू जाधव's picture

12 May 2020 - 3:39 pm | सतीश विष्णू जाधव

MTB निवडण्याचे मुख्य कारण ऑफ रोडींग सायकलिंग करणे. तसेच MTB सायकलची रोड वरची ग्रीप फार उपयुक्त ठरते. मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफारी मध्ये पावसाचा सुद्धा सामना करावा लागला. त्यावेळी न थांबता सायकलिंग केले. तसेच बऱ्याच ठिकाणी ओबडधोबड रस्ते लागले.

मागच्या चाकाची तार तुटल्यामुळे चेन अडकली होती.

दुसऱ्या दिवसाची पोष्ट आज टाकली आहे.

प्रशांत.... छान वाटले.....

कंजूस's picture

12 May 2020 - 6:37 pm | कंजूस

आवडले.