'फुप्फुस प्रयोगशाळा'

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
11 May 2020 - 12:01 am
गाभा: 

अभिषेक त्र्यंबक, एक उत्साही हार्मोन्सचा भरपूर साठा असलेला उमदा इंजिनीअर, आणि त्याचे कुटुंब - म्हणजे पत्नी अनिला आणि एक मुलगा चिंटू वय वर्षे ११ - चारेक वर्षापुर्वी नाशिकहून पुण्याला शिफ्ट झाले. आधी वकील नगर मध्ये होते पण दोन वर्षापुर्वी संगमप्रेस रोडवरच्या एका नव्या अपार्टमेंट मध्ये शिफ्ट झाले. नाशिक ते पुणे वकील नगर ते संगमप्रेस रोड असा स्थलांतरा मागे एक उद्देश्य जसा चिंटूसाठी एरंडवण्यातील प्रतिष्ठीत शाळेत प्रवेश मिळवून पुण्यात उत्तम शिक्षण देणे तसाच दुसरा उद्देश्य कर्वे सोसायटीतील प्रसिद्ध आयुर्वेदीक डॉक्टर पंडीत सुवासकरांचे उपचार घेणे सोपे जावे.

म्हणजे त्याचे असे झाले की चारेक वर्षांपुर्वी नाशिकला असताना अभिषेकच्या तब्येतीचा एकदा झोल म्हणजे आयसीयूत पोहोचवणारा न्युमोनिया झाला त्यातनं अभिषेक कसा बसा बाहेर आला पण काही अंगी लागेनासे झाले काहीतरी बारीक सारीक शारिरीक कुरबुरी चालू राहील्या त्याला अ‍ॅलोपथीच्या औषधांच्या साईड इफेक्ट्सचा संशय येऊ लागला, प्रत्येकाला अभिषेक आपला संशय बोलवून दाखवे.

अभिषेकचा स्वभाव तसा लाघवी बोल घेवडा , अती आत्मविश्वास नेहमीच त्याला सातव्या आसमानात ठेवतो, त्याच्या विचार करण्यात बोलण्यात काही उणीवा दिसल्यातरी त्याच्या स्वभावातील इतर गुणांना बघुन आणि त्याचा आत्मविश्वास पडला तर अगदीच उलट्या दिशेने जाऊ नये म्हणून त्याला कुणि दुखावत नाही. त्याने जे काही म्हटले त्यात हो ला हो म्हणण्या शिवाय फारसा पर्याय नाही असेच सगळ्यांना वाटते. एकुण काय तर सगळ्यांनी त्याच्या औषधांवरील संशयाला सुद्धा हो ला हो लावला. योगायोगाने त्याला पुण्यातील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य पंडीत सुवासकरांचा पत्ता लागला आणि पंडीतरावांवर देवावर विश्वास लागलीच बसावा तसा अभिषेकचा विश्वास बसला कारण आयुर्वेदाचार्य पंडीतराव कसे अभिषेकच्या मनातले ओळखून बोलण्यात आणि त्याला वस्तुस्थितीचे फारसे धक्के न देता एखादी गोष्ट गळी उतरवण्यात पटाईत आहेत.

आयुर्वेदाचार्य पंडीत सुवासकरांच्या कह्यात गेल्या पासून अभिषेक म्हणजे इम्युनिटी ची प्रयोगशाळा म्हणजे एक्सपिरीमेंट लॅब झालाय. अर्थात आयुर्वेदाचार्य पंडीत सुवासकरांच्या प्रत्येक प्रयोगाला म्हणजे परफेक्ट (अभिषेकच्या शब्दात) आयुर्वेदीक औषधोपचाराला प्रत्यक्षात यश येतेच असे नाही म्हणजे सगळेच जिवाणू वीषाणू पंडीतरावांच्या औषधाला जुमानतात असे नाही . मग त्यावेळी पंडीतराव अभिषेकला तू आज टमाटीतर खाल्ली नव्हतीस ना अशा स्वरुपाचे उत्तर देतो कधी त्याने कधी खरेच टमाट्याची भाजी खाल्लेली असते तर कधी तोंडल्यांची भाजी खाल्लेली असते पण औषध लागू न होण्याचे कारण कधी टमाटे कधी संत्री कधी दूध तर कधी तूप काहीच नाही तर हवा कशावरतरी खापर फोडून नव्या औषध उपाय योजनेला चालू करतो. एकुण काय अभिषेकने गेली चार एक वर्षात अनेक पदार्थ आपल्या अन्नसेवनातून हद्दपार केले आहेत एवढे सगळे पदार्थ हद्दपार करुन पोषक अन्नद्रव्यांचा समतोल कसा राखला जाईल अशी शंका अनिला तसेच अभिषेकच्या मित्र परिवाराच्या डोक्यात क्वचित डोकावून जाते पण अभिषेकला स्पष्टपणे कोणी काही म्हणत नाही.

तर २०१९च्या पावसाळ्यात अभिषेकचा अस्थमा अचानक पुन्हा बळावला -अचानक म्हणजे खरेतर अचानक नव्हे , अभिषेकला बरेच दिवस कफाचा त्रास होत होता तो केवळ पंडीतरावांच्या औषधांवर काढत होता आणि जिवाणू का वीषाणू जुमानेसे झाले होते, कोणत्या तरी जिवाणू वा वीषाणूंनी जोरदार हल्ला केला असावा, शेजार्‍यांच्या मदतीने अनिलाने अभिषेकला पुन्हा एकदा आयसीयूत अ‍ॅडमिट केले अ‍ॅलोपथिक डॉक्टर जीवन दाते आणि व्हेंटीलिअटरने अभिषेकला पुन्हा एकदा वाचवले. अनिलाने डॉ जीवन दातेंना अभिषेकच्या अ‍ॅलोपॅथीच्या तिटकार्‍या बद्दल पुर्वकल्पना दिलेली होती त्यामूळे डॉ. जीवन दातेंनी अभिषेकला चालू असलेला कोर्स पूर्ण करण्याबद्दल सांगितलेच शिवाय पुन्हा फुप्फुसांवरील ताण इतक्या लेव्हलपर्यंत जावयास नको अशी गोड शब्दातली समजही दिली.

अभिषेकचा बरे झाल्यावर पुन्हा फोन आल्यावर पंडीतरावांनी आपली नेहमीचीच स्ट्रॅटेजी वापरली, अभिषेकचा फोन आला तेव्हा ' काय रे अभिषेक असे का झाले असेल असे वाटते तुला ?' खरेतर आयुर्वेदाचार्य पंडीतराव आता अभिषेक आपल्याला काय म्हणेल या चिंतेत असावेत, पण अभिषेकने स्वतःच पंडितरावांची चिंता हलकी केली, 'काही नाही या वर्षी पावसाळा दोन महिने लांबला ना त्यामुळेच अस्थमाचा त्रास झाला असावा.'

पेशंट अजून आपल्यावरच विश्वास ठेऊन आहे हे पाहून आयुर्वेदाचार्य पंडीतरावांचा जीव भांड्यात पडला. पण आपली औषधी रुग्णाला आयसियूपर्यंत जाण्यापासून थांबवू शकली नाही शकत नाही हे आयुर्वेदाचार्यांना स्वतःचे स्वतःला समजत होते. त्यांनी अभिषेकला त्याची इम्युनिटी निश्चितपणे वाढवण्याचे आश्वासन दिले आणि अभिषेकचा विश्वास आणि आत्मविश्वास पुन्हा एकदा दुणावला.

ऑफीसात परत रुजू झाल्यावर डॉ. जीवन दातेंनी दिलेली समज ते पंडितरावांकडे केलेली कारणमिमांसा याचे इत्यंभूत वर्णन अभिषेकने बॉस आणि कलिग्सना ऐकवले. बॉस आणि कलिग्सनी पंडीतरावांवरचा विश्वास आणि पंडितरावाच्या मर्यादा जाणून अभिषेकला न दुखावता पंडितरावांच्या उपचारांबद्द्ल सेकंड ओपीनीयन घेण्याचा सल्ला देऊन पाहीला शेजारच्या प्रमिलाने कफाचा त्रास पुन्हा झाल्यास दहा दिवसांच्यापुढे गेल्यास आयुर्वेदाच्या भरवश्यावर न काढता अ‍ॅलोपथिक डॉक्टर गाठण्याचा सल्ला दिला. अँटी बायोटीक्सचे स्वतःचे महत्व आणि आयुर्वेदाच्या मर्यादा समजावण्यासाठी प्रमिलाने तिला जमेल तसे कष्ट घेऊन पाहीले पण अभिषेकचे पंडितरावांच्या आयुर्वेदीय इम्युनिटीचे अमृत बोल काही थांबलेच नाही.

अमित आणि प्रमिला शेंडगेंनी अभिषेकला हॉस्पीटलायझेशनच्या काळात मदत केल्यामुळे अभिषेक आणि कुटूंब भारावले होते त्यांनी शेजारच्या शेंडगे परिवाराशी गट्टी वाढवली. मध्ये काही महिने जाताच नॉव्हेल करोनाचे संकट पुढे येऊन उभे राहीले. चिंटूच्या शाळेला सुट्टी तर मिळाली पण सोसायटीत इतर समवयस्क मुलांसोबतही खेळण्यावर बंधने आली त्यामुळे चिंटू शेंडग्यांच्या साहील आणि प्रणव वयाने मोठे असूनही खेळण्यासाठी अधिकच येऊ लागला. चिंटूही स्वभावाने गोडच आहे त्यामुळे शेंडगे कुटूंबीयांनाही चिंटूची उठबस तेवढाच विरंगुळा देऊन जाते. अमितही घरुन काम करु लागलाय तसा अभिषेकचा त्याच्या सोबतची रोजची उठबसही वाढली आहे. त्र्यंबक कुटूंबीयांचा प्रमिलाला तसा दुसरा कोणताही त्रास नाही पण प्रमिलाचे वृद्ध वडील तिला भेटायला आले आणि लॉकडाऊन मध्ये नेमके अडकून पडले आहेत. आणि दुसरीकडे त्र्यंबक कुटूंबीय पंडीतरावांच्या इम्युनिटीवर आणि सल्ल्यावर भरवसा ठेऊन मास्क आणि मिनीमम डिस्टन्सची बंधने पाळत नाहीत, कारण पंडितरावांनी एकदा आजार येऊन गेला की इम्युनिटी आपोआपच येते मग कशाला हवाय मास्क आणि कशाला मिनीमम डिस्टन्सींग असा फंडा अभिषेकला दिला आणि सतत चार चौघात बसणार्‍या अभिषेकला लॉकडाऊन मास्क आणि मिनीमम डिस्टन्स अडाणी लोकांचा बावळटपणा वाटू लागला आहे.

प्रमिलाला तिच्या वडीलांपर्यंत कोरोना व्हाया अभिषेक आणि चिंटू पोहोचू नये याची काळजी पडली आहे, सोसायटीत लॉकडाऊन शिथील पडून चिंटू बाकी पोरा टोरांसोबत डब्बा ऐसपैस खेळून येऊ लागलाय आणखी मोकळीक मिळाली की अभिषेक सेल्फ डिस्टन्स आणि मास्क न पाळता किती ठिकाणी गप्पा ठोकुन येईल आणि कुणा कुणा सोबत जिवाणू वीषाणूंची देवाण घेवाण करेल याचा भरवसा नाही; सोसायटीत प्रत्येकाला आणि फोनवर अनेकांना वीषाणूला घाबरु नका बिनधास्त रहा असा सल्ला पंडितरावाच्या भरवश्यावर अभिषेक प्रत्येकाला देत सुटला आहे आणि प्रत्येकाला त्याच्या बोलण्याने धीर येऊन वीषाणूची सोसायटीतली भीड चेपु लागली आहे. अनिलाचा सोसायटीच्या मंदिरापाशी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग विरहीत महिला कट्टा जमू लागला आहे.

प्रमिलाच्या डॉक्टर मैत्रिणीने तिला फेसबुकवरून चड्डी घालण्यापेक्षा नाकाला मास्क बांधणे अधिक महत्वाचे आहे असे सांगितले आहे. प्रमिलाचे अमितला त्याने अभिषेक आणि फॅमिली सोबत सेफ डिस्टन्सिंग पाळावे म्हणून टुमणे चालू आहे. उद्या अभिषेकची म्हातारी आई किंवा अनिलाचे वडील नाशिकच्या सोसायटील लोकांनी इम्युनिटीच्या नावा खाली मास्क आणि सुरक्षीत अंतर ठेवण्यात केलेल्या टाळाटाळीमुळे वीषाणूबाधा होऊन गचकले तर अभिषेकला चालणार आहे का असा रोखठोक सवाल अभिषेकच्या माघारी प्रमिला अमितला करते आहे, अभिषेक सारख्यांचा चॉईस त्यांचा स्वतःचा आहे पण जे वीषाणूपासून अधिक सुरक्षीत राहू इच्छितात त्यांना स्वसुरक्षेचा चॉईस हवा की नको ? लॉकडाऊन उठले की अभिषेक आणि फॅमिली सारखे किती लोक त्यांच्या न कळत वीषाणूंचे स्वतःच्या शरीर आणि फुफ्फुसाची जैवीक लाईव्ह बाँब प्रयोगशाळा करून फिरण्यासाठी सज्ज आहेत ? पण अमितला, अभिषेक आणि फॅमिलीला स्पष्ट बोलण्याची भीड वाटते आहे. आणि प्रमिला वडीलांपर्यंत वीषाणू पोहोचण्यात अप्रत्यक्षपणे पंडित सुवासकर आणि प्रत्य़क्ष अभिषेक आणि फॅमिली कारणीभूत होणार नाहीत ना या काळजीत बुडाली आहे.

वाचक हो अभिषेक आणि फॅमिलीला प्रमिला आणि फॅमिलीने मास्क आणि सेल्फ डिस्टंन्सिंगचे महत्व कसे पटवावे असे तुम्हाला वाटते ?

*डिसक्लेमर लागू: कथेतील सर्व पात्रे प्रसंग स्थळे काल्पनिक समजावीत
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आभार

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

11 May 2020 - 8:14 am | प्राची अश्विनी

मर्यादा ओळखता येणे, हे सर्वच ठिकाणी महत्त्वाचे आहे.

बाजीगर's picture

11 May 2020 - 7:18 pm | बाजीगर

अभीषेकशी खुल्ला पंगा घेऊन सांगा.
मास्क वापरा, सो. डिस्टंट ठेवा हे सांगणारे तज्ज्ञ आणि सरकार वेडे नाहीत, आणि महाराज आपण आय सी यू पर्यंत जाऊन आलात,
त्यामूळे जास्त शाणा बनू नकोस.

तुझ्या हेल्थ चं तू काहीही कर,आम्हाला काही पडलेलं नाहीये,पण तुझ्या बेजबाबदार वागण्यानं इतरांचे आयुष्य धोक्यात येत असल्यानं,तू सुधर नाहीतर सोसायटी तुझ्यावर बहीष्कार टाकेल, पोलीस कंप्लेंट करु.

Prajakta२१'s picture

12 May 2020 - 9:59 pm | Prajakta२१

घरी यायला बंदी करावी
वाईटपणा घेण्याची हिम्मत घेऊन सरळ घरी यायला बंदी करावी घरी ज्ये ना असल्याचे सबळ कारण द्यावे

पण जे वीषाणूपासून अधिक सुरक्षीत राहू इच्छितात त्यांना स्वसुरक्षेचा चॉईस हवा की नको ? >>>>>>बऱ्याच ठिकाणी नाहीये
माझे शेजारी मला त्रास होतो हे बघून मुद्दाम खोकतात ,शिंकतात त्यांच्या आवाजावरून ते रुमाल /हात ठेवत नसतील ह्याची खात्रीये
त्यांना karona नसू दे एवढीच प्रार्थना करून जीव मुठीत धरून घरी बसायचे
जाऊदे जे होईल ते होईल शेवटी मरणारा कसाही मारतो आणि वाचणारा कसाही वाचतो
कुठपर्यंत पुरे पडणार?

माहितगार's picture

13 May 2020 - 4:23 pm | माहितगार

प्राची अश्विनी , बाजीगर आणि प्राजक्ता (२१) आपल्या मनमोकळ्या अभिप्रायांसाठी अनेक आभार.

उपरोक्त सत्यकथेतील अनुभव इतरही बर्‍याच जणांना येत असावा -त्यामुळेच जागो जागी किमान शारीरीक अंतर तत्व आणि मास्क तत्व धाब्यावर बसवणे होताना दिसते आहे - तेव्हा अजून मते आणि अनुभव या निमीत्ताने वाचावयास मिळून अधिक चर्चा झाल्यास सर्वांनाच फायदा होईल असे वाटते.

चर्चा सहभागासाठी अनेक आभार