समूह प्रबोधन

Primary tabs

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
7 May 2020 - 11:24 am
गाभा: 

बर्‍याचदा आपण व्यक्त होतान उस्फूर्तपणे होत असतो. सोशल मिडियाही त्याला अपवाद नाही. त्या त्या वेळी उठणारे मानसिक, वैचारिक तरंग हा तात्कालिक घटक प्रभावी ठरत असतो.कधी तो स्कोअर सेटलिंगचा भाग असतो. वैचारिक उन्माद व्यक्त करणार्‍यात बुद्धीदांडग्यांना प्रतिक्रिया देताना संयत असणे आपण विवेकी मानतो.परंतु उन्मादाचा प्रभाव असणार्या् व्यक्तिच्या मेंदुपर्यंत ती पोहोचते का? हा प्रश्न आपल्याला पडतो.मग प्रतिउन्मादी अथवा माज उतरवणारी प्रतिक्रिया दिली जाते.मग त्यात द्वेष, उपहास,कीव,तुच्छता यांच्या छटा उमटतात.योग्य अयोग्य या गोष्टी मग सापेक्ष बनत जातात.प्रत्येकाची काही श्रद्धा किंवा अश्रद्धा स्थाने असतात.त्या त्या श्रद्धा किंवा अश्रद्धांचे वाहक असणारे काही महापुरुष असतात. त्यांना या खेळात वेठीस धरले जाते.पुतळ्यांच्या किंवा प्रतिकांच्या विटंबना यातूनच घडत असतात.
सोशल मिडिया व मानसिक आरोग्य हा विषय ही तितकाच महत्वाचा आहे. मनकल्लोळ या पुस्तकात नीलांबरी जोशी व अच्युत गोडबोले यांनी तो विषय मांडला आहे. जेव्हा सोशल मिडिया नव्हता त्यावेळी उपलब्ध असलेल्या मिडियात पण याच गोष्टी घडत होत्या. काळानुसार माध्यम बदलत जातात.. वास्तव जगात परिचित असणार्यात माणसांना जेव्हा मी सोशल मिडियावर पहातो तेव्हा या आभासी जगात त्यांचे व्यक्तिमत्व बदलेले असते. चक्क स्प्लिट पर्सनॅलिटी झालेली वाटते. अटेन्शन स्पॆन ही इतका कमी झालेला असतो की पुर्ण आकलन व्हायची वाट न पहाता प्रतिक्रिया फेकल्या जातात. पुरेसा वेळ दिला जात नाही कारण माहितीचा लोंढा प्रचंड वेगाने आपल्यावर आदळत असतो.आपण अस जरी ठरवली की नको असलेली माहिती गुगल फिल्टर वापरुन बाजुला करायची तरी हवी असलेल्या माहितीच लोंढाही प्रचंड असतो. तो वाचून मग प्रतिक्रिया द्यायची अस ठरवल तर आपल्या फक्त वाचनमात्र राहावे लागेल. मग व्यक्त होण्याची स्पर्धा, सबसे तेज कौन? माहिती तपासून घ्या म्हणणे सोप आहे पण त्या माहितीची खातरजमा करणे सोप नाही. त्याला अनेक पदर असतात. मग माहीती तपासणीच्या चक्रजालात अडकून जाता.अशा या सुष्ट किंवा दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यासाठी काही लोक जालसंन्यास घेण्याचा प्रयत्न करतात. त्या संन्यासाश्रमात त्यांचे मन काही काळानंतर रमत नाही मग परत जालसंसारात येतात. धरल तर चावतय सोडल तर पळतय अशी अवस्था होते. सोशल मिडियावर सेलिब्रेटीज, महापुरुष यांच्या नावावर आपापला अजेंडा खपवला जातो. त्यासाठी त्यांच्या तोंडी आपापल्या अजेंडाच्या सोयीच्या कविता, कोटेशन्स,साहित्य खपवले जाते. या गोष्टी इतक्या वेगाने व मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात की वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण देण्याचा वेग व प्रमाण अत्यंत नगण्य होते. मग ते समज तसेच राहतात. मागे एकदा नरेंद्र दाभोलकरांची निर्भिड कविता असे म्हणुन एक विद्रोही कविता अशीच फिरत होती.अंनिस वार्तापत्र ने त्यात काहीही तथ्य नसल्याचा खुलासा केला होता. आपल्या समोर चुकीच्या गोष्टी व्हायरल होत आहेत म्हणल्यावर वस्तुस्थितीचा खुलासा करण्यासाठी अनेक संवेदनशील जालवीर पुढे येतात. पण किती व्यक्तींच्या शंकेच निराकरण करणार त्यालाही मर्यादा आहेत. समाजमन ढवळल जात, घडत बिघडत जात. बातमी व अफवा या सत्य असत्य, अर्धसत्य या चक्रात अडकत जातात. समूहमानसिकतेचा एक मोठा परिणाम तुमच्या आकलनावर होत असतो. एखाद समाज चित्र उभ करताना त्या चित्रामागचा कॆनव्हास बदलला की चित्राचे आकलन बदलत जाते. चित्र तेच असते. शिवाय व्यक्तिच्या भावनांक व बुध्यांकानुसार बदलणारे आकलन वेगळेच.अशा प्रश्नचिन्हांकित आकलनाच्या गर्तेत आपल मन अस्थिर होत जात. काय योग्य व काय अयोग्य हे ठरवण एक निरंतर प्रकिया बनत जाते. त्या प्रक्रियेत आपली मत बदलतही जातात.आपल्या विचारांचा वेळोवेळी आढावा घेउन त्यात काही बदल करावासा वाटला तर तो करणे हे विवेकी आहे. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जी तुमची मते असतील तीच पन्नासाव्या वर्षी असतील तर तुमचे आकलन तेवढेच स्तिमित झाले असे म्हणावे लागेल. माणसाच्या अनुभव विश्वातून त्याच्या मतात, विचारात बदल होतच असतात. वेदा सारखं अपौरुषेय. अपरिवर्तनीय मानणे म्हणजेच तत्वनिष्ठा आणी परिवर्तनवाद म्हणजे तत्वचुती?
समूहाच्या सामुहिक प्रतिमेला छेद देणारे जर समूहातील एखादी व्यक्ती बोलली तर ती समूहाच्या बाहेर फेकली जाऊ शकते. कम्युनिस्टांमधे जर एखादा जरा काही वेगळ बोलला की त्याला म्हणॆ बूर्झ्वा बुर्झ्वा म्हणून बाहेर फेकतात. कुठल्याही सामाजिक, राजकीय संघटनांमधे कमी अधिक फरकाने हीच परिस्थिती असते. मग त्या पुरोगामी असोत वा प्रतिगामी असोत. समूहात माणसाला सुरक्षित वाटत. मग तो समूहमताच्या विरोधात जाण्याचा धोका पत्करत नाही. त्याच्या अस्तित्वाचा तो प्रश्न असतो. अनेकदा समाजसुधारक, विद्वान, प्रतिष्ठीत, सन्मान्य, अभ्यासक, राजकारणी या लोकांची एक गोची होते. समाजमनाचा कल पाहून भाष्य करावे लागते. नाहीतर ज्या समाजाने आपल्याला डोक्यावर घेतल आहे तोच समाज आपल्याला पायद्ळी तुडवल्या शिवाय राहणार नाही याची त्यांना भीती असते. यद्यपि शुद्धं लोक विरुद्धं॥ ना चरणीयं ना करणीयं।। मग पॉलिटिकली,इंटलेक्च्युअली करेक्ट राहण्यासाठी अनेक शाब्दिक कसरती कराव्या लागतात. कोलांट्या उड्या माराव्या लागतात.प्रथितयश विद्वान हे तेल लावलेल्या पहिलवानासारखे असतात. तुम्ही शब्दात पकडायला गेलात तर ते सापडत नाहीत. राजकारणी लोकांना पक्षाच मत व वैयक्तिक मत, संघटना प्रमुखांना संघटनेच मत व वैयक्तिक मत अशी बचावात्मक विभागणी करावी लागते. आपला देश हा एकाच वेळी किमान तीन शतकात वावरतो. १६ व्या शतकातील मानसिकतेत वावरणारे आहेत व २१ व्या शतकात वावरणारे ही आहेत. मग सगळ्यांना एकाच वेळी खूश ठेवणे हे कुणालाच जमणार नाही. मग संख्याबळ,उपयुक्तता,व्यवहार्यता अशा गणितांची चाचपणी करावी लागते. काहींची गणित चुकतात तर काहींची बरोबर येतात. विज्ञान व तंत्रज्ञान ही शतकांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतच पण मानसिकतेच काय? ते प्रबोधनाचच काम आहे.अशा मानसिकतेत प्रबोधन व कायदा एकाच वेळी वापरणे हा एकच मार्ग उरतो.नुसत्या प्रबोधनाने होणार नाही व नुसत्या कायद्याने ही होणार नाही. व्यक्ति तितक्या प्रकृती असल्याने तफावत ही राहणार आहे. ती कमी करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर आपापल्या परीने होत असतात. आपल्याला जे माध्यम मानवेल, रुचेल, पचेल ते हाती घ्याव आणि पुढे चालाव. काळ अनंत आहे.

प्रतिक्रिया

>>>> तुम्ही शब्दात पकडायला गेलात तर ते सापडत नाहीत. राजकारणी लोकांना पक्षाच मत व वैयक्तिक मत, संघटना प्रमुखांना संघटनेच मत व वैयक्तिक मत अशी बचावात्मक विभागणी करावी लागते. >>>>

ते करतातच. त्यांची साक्ष काढायला कोण जाणार? त्यांचे बोलणे बरोबरच आहे हे सांगणारे सैन्य असते त्याच्याकडे.

चौथा कोनाडा's picture

7 May 2020 - 8:12 pm | चौथा कोनाडा

समूहाच्या सामुहिक प्रतिमेला छेद देणारे जर समूहातील एखादी व्यक्ती बोलली तर ती समूहाच्या बाहेर फेकली जाऊ शकते. कम्युनिस्टांमधे जर एखादा जरा काही वेगळ बोलला की त्याला म्हणॆ बूर्झ्वा बुर्झ्वा म्हणून बाहेर फेकतात. कुठल्याही सामाजिक, राजकीय संघटनांमधे कमी अधिक फरकाने हीच परिस्थिती असते. मग त्या पुरोगामी असोत वा प्रतिगामी असोत. समूहात माणसाला सुरक्षित वाटत. मग तो समूहमताच्या विरोधात जाण्याचा धोका पत्करत नाही. त्याच्या अस्तित्वाचा तो प्रश्न असतो.

यातच सर्वकाही आले, आजकाल प्रत्येकाचा वेगवेगळ्या पातळीवर जगण्यासाठीच नाही तर अस्तिस्त्व टिकवण्यासाठीचा लढा सुरु आहे !

सध्या लॉकडाऊन मध्ये मोबाईल मध्ये फार वेळ जातो. तेव्हा हे फार जाणवले. आपण फार व्यवस्थित मांडले. धन्यवाद.

सचिन's picture

9 May 2020 - 8:41 pm | सचिन

हा अतिशय महत्त्वाच विषय उत्तम रीतीने मांडला आहे आपण.
"अटेन्शन स्पॆन ही इतका कमी झालेला असतो की पूर्ण आकलन व्हायची वाट न पहाता प्रतिक्रिया फेकल्या जातात." हे तंतोतंत पटले आहे.
आपण आपले निरीक्षण आणि एकूणच हा प्रॉब्लेम समोर ठेवला आहे... पण उपाय काय ?
प्रत्येकाने आपापला विवेक जागृत ठेवणे ... माझ्या मते अत्यावश्यक आहे ... अन्यथा आपण मेंढरे होऊन जाऊ.
झालो आहोतच का ?

प्रकाश घाटपांडे's picture

10 May 2020 - 7:17 am | प्रकाश घाटपांडे

स्वतःला संतुलित ठेवण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करणे हाच एक शक्य असलेला पर्याय आहे.कष्टप्रद आहे पण शक्य आहे