चंगळवादी लोणावळा-खंडाळ्यापासुन निबिड अरण्यातील भीमाशंकरचा प्रवास म्हणजे सह्याद्रीच्या दर्याखोर्यातून पायपीट करत जाणे. एकप्रकारे हा मोहमाया त्यागून खडतर साधनेची निवड केल्याचाच अनुभव आहे. म्हणजे असे म्हणा की ट्रेकिंग धर्मियांसाठी लोणावळा ते भिमाशंकर ही पंढरपूरची वारी आहे. कॉलेजच्या दिवसात पायाला भिंगरी लागली की अनेक छोट्या मोठ्या ट्रेक नंतर लो-भी करायचे आपसूकच घडून येते. यातल्या अनेक सहली सुखवून जातात तर काही मोचक्या सहली खडतर परीक्षा घेऊन शिकवून जातात.
तसं पहायला गेल्यास काय नाहीये लोणावळा खंडाळ्यामध्ये. सुखाचैनीच्या अनेक साधनाची रेलचेल, मोठमोठी हॉटेल्स, महागडी फार्म हाउसेस, पिठलं भाकरी पासुन इटालियन वगैरे आणि खूप काही. पण भटका कशाला ढुंकून बघतोय ह्या सगळ्या चोचल्ल्यांना. कारण त्याचा मार्ग जातो डोंगर वाटांनी, मुक्कामाला त्याला छोट मंदिर, शाळेचा व्हरांडा, गुरांचा गोठा किंवा गड किल्ल्यावरची गुफा पुरे होते. खायला जे मिळेल ते खातो. जास्तीत जास्त पायपीट हीच त्याची खरी चैन असते.
लोणावळ्यावरून तुंगार्ली धरणामार्गे राजमाची आणि ढाक किल्ल्याला जाणारा मार्ग पकडल्यास दिवसभरात आपण जांबवली या गावी पोहोचतो. इथला मुक्काम घेतल्यावर परत दिवसभर चालून आपण मेटलवाडी किंवा सावळे या गावी मुक्कामास थांबतो. येथून दिवसभराची पायपीट आपल्याला भिमाशंकरला पोहोचवते. एकूण दोन रात्र तीन दिवसांच हे प्याकेज एकदा तरी करायलाच हवं. पण ह्या सहलीची खरी मजा आहे ती पावसाळ्यात. पावसाचा सामना करायची तयारी असल्यास यासारखी धमाल नाही. रिस्क असतेच पण “नो रिस्क नो रिवार्ड “ या थिअरीने ही सहल करायलाच हवी. ह्याच हिशोबाने आम्ही पाच जणांनी २००३मध्ये ही सहल आखली. पहिल्या श्रावण सोमवारी भीमाशंकर गाठायचे असे आम्ही कॉलेजच्या मित्रांनी ठरवले होते.
त्याच्या मागल्या वर्षी मी हा ट्रेक केला असल्याने त्यातल्या त्यात मी थोडा माहितगार होतो. शेवटचा टप्प्यात धुक्याने वाट चुकते त्यामुळे गरज पडली तर वाटाड्या घ्यावा लागेल हे सांगून मी तसे बजेट आखले होते. बजेट हा विषय आम्हाला डोंगरांपेक्षा कठीण होता. जुलै महिन्याचा धो धो पाऊस अंगावर घेत प्रवासाला सुरुवात केली. २३ जुलै २००३ ला शिवाजीनगरवरून लोणावळा लोकलने आमचा प्रवास सुरु झाला. सकाळी घरातून बाहेर पडतानाच वरुण राज्याने आम्हाला श्रावण आगमनाचा ट्रेलर दाखवला. पहिल्या दिवसाचा पायी प्रवास सुरु करण्या अगोदरच सगळे मित्र ओले झालो होतो. पावसापासून बचाव करणारे आमचे रेनकोट किती साथ देतील याची कल्पना पण आली.
लोणावळ्यावरून अर्धा तास चालल्यानंतर जंगलास सुरुवात झाली. डोंगरदऱ्यात पावसाचं सौंदर्य काय असू शकत ते माझ्यासारख्या मराठवाडा विदर्भात राहणाऱ्याला माहिती नव्हत. हिरवीगार वनराई, पावसाच्या धारा, आजूबाजूला वाहणारे पाणी, निसरडा रस्ता, ओसंडून वाहणारे ओढे, वारेमाप वाढलेलं गवत आणि धुक्यात लपलेली वाट...अहाहा. धुक्यातून चालताना बालपणीचे ढगातून चालण्याचे स्वप्न पूर्णत्वास आल्याने होणारा आनंद पण वेगळाच होता. रमत गमत धबधबे, डोंगरकडे पाहत जांबवलीच्या शिवमंदिरात संध्याकाळी पोहोचलो, गावात पोहोचे पर्यंत चांगला अंधार पडला होता. डोंगरात भटकणारे या गाववाल्यांना नवे नाही, त्यांना चीड असते ती चाळे करणाऱ्या पोरा-पोरींची आणि दारू पिणार्यांची. आम्ही त्यातले नाहीत हे ओळखून एका स्थानिक राजकारणी सज्जनाने ग्राम देवतेच्या देवळात आमचा राहण्याचा बंदोबस्त केला. प्लास्टिक मधील कोरडे कपडे चढवून आधी चहा बिस्कीट मग लोणचे भात असा कमीतकमी साधनात आणि पुरेपूर अंधारात भरपेट जेवणाचा आस्वाद घेतला.
जेवण उरकून ग्रामस्त मंडळींशी चालू राजकारणाच्या आणि आमच्या पुढीलवाटेचा माहितीपर संवाद झाला. मेणबत्ती विझवली आणि आम्ही निद्रादेवतेच्या उपासनेत गडप झालो. मातीने जेमतेम सारवलेल्या मंदिरात आधीपासूनच वस्तीस असलेले मूषकराज्याचे भलेमोठे बिर्हाड संचार करायला लागले, बराचवेळ खर्च करून सर्व स्याक दोर्यांना बांधून लटकवले आणि त्या मूळ निवास्यांना त्यांची जागा मोकळी करून दिली. डोळा लागतो न लागतो गावकरी मंदिरात सकाळच्या दर्शनाला हजर. थंडीने, थकव्याने पांघरून सोडावे वाटत नव्हते. तेवड्यात एका लहान पोराने चांगला पातीलभर चहा आणि डेचकभरून दुध आणून दिल. अजून काय हवं. त्यालाच दुपारच्या भाकऱ्या पिठलं सांगून आम्ही पुढच्या प्रवासाची तयारी सुरु केली. एक मोठा डोंगर आणि दिशेचा अंदाज चुकावणार फसवं पठार पार करायचं की धरणाच्या बाजू बाजूने खांडी गावापुढच्या मेटलवाडीत मुक्कामास पोहोचणे, असा दिवसभराचा अजेंडा होता. पठारावरची वाट सापडल्यास संध्याकाळी सहज पोहोचता येते.
परत अंगावर ओले कपडे,सॉक्स, बूट आणि स्याक घेऊन आम्ही पाच जण डोंगराच्या दिशेने निघालो. कोरडे कपडे नीट गुंडाळून न भिजता ठेवणे हे कौशल्याचे काम. रात्री घालायचे कपडे आणि अंथरून पांघरून ओले झाल्यास वाट लागते. स्टो सोबत लागतो कारण इतक्या पावसात सरपण लवकर मिळत नाही. स्टो ज्याच्यापाठीवर त्याचं गाढवं होण पक्क.
गावातून निघताना एकदा दिशा समजवून घेतली आणि छत्रपतींचा जयघोष करून जांबवलीतून चालायला सुरुवात केली. जसं जसं पुढे जाउ लागलो तस तशी झाडांची दाटी वाढायला लागली आणि मग एकमेकांशी अंतर ठेऊन चालायला लागलो. अश्या वेळी चालता चालता एक गंमत होत असते. आपण सर्वासोबत असूनही कुठे तरी एकट्यात हरवून जातो. असंख्य विचार डोक्यात यायला लागतात. डोक्यात चालणारे विचार, सभोवतालचा हिरवागार निसर्ग, धुक्यात उलगडत जाणारी वाट ह्याचा काहीतरी आपसात संदर्भ असतो. ते अलगद एकमेकात मिसळून जातात आणि कायमचे मनात कोरले जातात. या ठिकाणाच्या क्यान्व्हासवर आपण स्वतःलापण वेगळ्याच भूमिकेतून व स्वरुपात बघायला लागतो. कधी निसर्गासमोर एकदम खुजे तर कधी इथल्या लोकांपेक्षा खूप खूप सुखी.
स्वतःवर झालेल्या बिबट्याच्या हल्लाच्या खोल जखमा आणि पुढची वाट दाखवणाऱ्या गुराख्याला भेटून बराच वेळ उलटून गेला. आम्ही पठारावर वाट धरून चालत होतो धुक्याने दिशा लवकर उलगडत नाही. वाटेत एक घर वजा झोपडी लागली.ही आपण बरोबर जातोय याची खूण होती. अश्या दुर्गम जागी कुणी कशाला राहील असा प्रश्न पडतो. वरईच पीक घेऊन राहणाऱ्या या कुटुंबाला मीठ जरी लागलं तर दोन तीन तासाची पायपीट केल्याशिवाय जवळपास दुकान नाही. शेजारी म्हणजे पठाराच्या दुसर्या टोकावरचा. या घरात शेक घेत नवरा बायको बसलेले होते. “यादिसात काही काम नसत पठारावर. दाराबाहीर बी पोरासोरास्नी सोडाची सोय नै, जनावर फिरतंय. पायटेच डोळे चामाकले ”. मदत म्हणून आमच्या जवळचा वजनदार किराणा त्यांना देऊन त्यांची आणि ओझं उचलानार्याने स्वतःची सोय करून घेतली. गम्मत म्हणजे एक शाळा मास्तर रोज घरी येऊन पठारावरील आसपासच्या अश्या घरातील मुलांना एकत्र करतो आणि शिकवतो असं समजल. अश्या मास्तरांना सलाम.
हे पठार मात्र जितके रमणीय तितकेच भुलवणारे आहे, त्यामुळे इथेच अनेक मंडळी वाट चुकतात आणि भलत्याच ठिकाणी पोहोचतात. संध्याकाळपर्यंत मेटलवाडीची गावाबाहेरची शाळा सहज गाठली. या गावात पण बस येते. किराणा दुकानातून रिकामा झालेला माल भरून घेतला. या गावांमध्ये इथेच पिकवलेला तांदूळ मिळतो, तो खायची मजाच वेगळी. आज सुरुवातीचा जोरदार पाऊस सोडल्यास तसा पाऊस कमी लागल्याने सर्व ओले जरी असलो तरी तसे ताजेतवाने होतो. शाळेत स्वयंपाक व जेवण उरकून लगेच व्हरांडा गप्पागोष्टीसाठी सज्ज झाला. वस्तीला असलेले शिक्षक आणि चारदोन गावकरी मंडळी सोबत गप्पा रंगल्या. अश्या बैठकीत एकतरी गोष्ट अशी बाहेर पडते. म्हणे शेजारी गावात एक मुंबईचा करोडपती होता. तो त्याचा हेलिकॉप्टर इकडे आणून उडवायचा. हेलिकॉप्टर चे पाते उडत उडत शेजारील धरणाच्या पाण्याला चाटवून आणायचे अश्या अवलिया छंदात त्याचा अपघाती मृत्यू झाला म्हणे, खरेखोटे देव जाणो. शाळा गळकी होती. त्यातल्या त्यात चांगला वर्ग मास्तरांनी दिला खरा पण तुटक्या खिडकीने रात्री चांगलेच काकडवले.
सकाळी उठून वाटाड्या शोधला. तो भीमाशंकर डोंगरापाशी आम्हाला सोडणार होता आणि पुढचा थोडा प्रवास आम्हालाच करायचा होता. इथून पुढे लागणारे जंगल खूप घनदाट तर आहेच पण पूर्णपणे निर्मनुष्य आहे. त्यात पावसाचा या भागात विशेष तडाखा असतो. हा टप्पा पण थकवणारा असल्याने कमीत कमी समान सोबत होते. अगदी बिस्कीट पुडे पण मर्यादित होते. हळूहळू चालत निघालो. ग्रामस्थांच्या मुख्य वाटेसोबत अनेक जवळच्या वाटा असतात, त्या समजायला कठीण असतात. जागोजागी रानडूकरांनी उकरून ठेवलेले होते त्यावरून याभागात त्यांचा मोठा संचार असावा. एका ठिकाणाहून पेठचा कोथळीगड दिसला. गप्पाटप्पा करत भोरी विहिरीपाशी पोहोचलो. वेळेचा काही अंदाज नव्हता आणि पुढच्या वाटेचा तर अजिबातच नाही. मात्र वातावरण एकदम साफ होते. वाटाडी माघारी जाण्यासाठी कुरबुर करीत होता. तू नागफणी दाखव आणि माघारी फिर असे त्याला सांगितले होते. थोडे अंतर गेल्यावर “नागफणी नाय न दिसाची धुक्याने, तुमी जावा आता निवांत.डावी सोडायची नाय. फूडे वाट सांगायला गुराखी आहेत की” या त्याच्या आश्वासनावर त्याला राम-राम करून आम्ही पुढची वाट धरली. वाटही तशी चांगली मळलेली होती.
काही वेळाने जंगलाच्या हृदयात प्रवेश केल्यासारखा वाटायला लागले. दाट झाडीमुळे आजूबाजूला काय आहे हे समजतच नव्हते. एका जागी आलो आणि थबकलो. सारख्याच दिसणाऱ्या तीन पायवाटा तीन दिशेला फुटत होत्या. डावी सोडायची नाही हे माहित होत पण डावीकडची वाट डोक्याहूनही मोठ्या गवतात जाऊन नाहीशी होत होती.आता काय करावे समजत नव्हते कारण चुकीच्या वाटेने पुढे गेलो आणि धुक्यात हरवलो तर काय करायचे ? धुक्याने दऱ्यापण दिसत नाहीत. मागे थोडे अंतर जाऊ, एखादा गुराखी भेटेलच, मग त्याला विचारू आणि पुढे जाऊ असं ठरवलं. तास दोन तास झाले तरी कुणीचीच ये जा झाली नाही. आम्ही पण मागे फिरायचे सोडून तिथेच रमलो. इथे जवळ एक वस्ती आहे हे माहित होते आणि त्यातला एकतरी गुराखी आपल्याला भेटेल याची खात्री होती. त्या वस्तीत मुक्काम करून सकाळी जाता येईल असा पण एक विचार होता. जंगलात शेकडो वाटा असतात, कोण कोणती वाट धरेल हे त्यांनाच ठाऊक. आम्ही परतीचा ठोस निर्णय न घेता स्वतःला एका चक्रव्युहात फसवून घेत होतो. काही वेळातच पक्ष्याच्या आवाजांमुळे संध्याकाळ जवळ आली आहे याची चाहूल झाली आणि छातीत धडधडायला लागले ....
क्रमशः
प्रतिक्रिया
3 May 2020 - 3:15 pm | Prajakta२१
पु भा प्र
3 May 2020 - 8:13 pm | Nitin Palkar
रोचक वर्णन.
3 May 2020 - 10:09 pm | कंजूस
खडतर आहे हा ट्रेक. पठार फार फसवे असते. तिथल्या तिथे फिरत राहतो. या लो-भि ला गेलो नाही पण कालच विडिओ पाहिला. -
Lobhi trek Lonavala to Bhimashankar 60 km,
By Sanjay Mayekar, 13:51