लॉकडाऊन धागे मालिका एकवीस दिवस पूर्ण झाले की संपेल असं सुरुवातीला वाटलं होतं. लॉकडाऊन वाढल्याने आणि उत्स्फूर्तपणे लेख येत गेल्याने ती चालू राहिली आणि तशी राहण्यात एक महत्वाचा फायदा म्हणजे.. आता यात "फायदा" कसला हेही खरंच, पण तरी.. जसेजसे दिवस वाढताहेत तसा तसा एक ताण म्हणा किंवा परिणामांची तीव्रता म्हणा, बदलत चालली आहे. अगोदर करोना आणि लॉकडाऊनबद्दल हलकं फुलकं लिहिता येत होतं. ते दिवसेंदिवस अवघड होत चाललंय.. आणि ही छटाही कदाचित मालिका वाढेल तशी तशी नोंदवली जात जाईल हा फायदा.
"करोना हा विषय अजिबात न काढता आजचा दिवस बोलूया" किंवा "अति झालं सगळीकडे करोना करोना.. दुसरं काहीतरी बोला आता' असे विचार लोकांच्या मनात आणि संदेश सर्व गप्पांत येऊनसुद्धा प्रत्यक्षात "तो" विषय पूर्ण सोडून काही बोलणं जवळपास अशक्य झालं आहे इतका तो सर्वस्पर्शी बनला आहे.
वेगवेगळे पदार्थ, त्यांच्या रेसिपी देऊन घेऊन झाल्या, की गाडी पुन्हा करोनाकडे वळते. त्या पदार्थासाठी लागणारा एखादा घटक उपलब्ध नसल्याने पुन्हा लॉकडाऊनच्या वळचणीला पाणी जातं. किंवा हा पदार्थ सहज उपलब्ध असलेल्या घटकांपासून बनवता येतो अशी पार्श्वभूमी असते, कारण पुन्हा एकदा लॉकडाऊन..
व्यायाम प्रकार.. कारण आता तुम्ही घरी आहात.. लॉकडाऊन
रामरक्षा, शुभंकरोती यांची आठवण आणि रेग्युलर उजळणी अनेकांनी सुरू केली आहे. हाही करोना इफेक्ट.
जे एरवी करत नाही किंवा विसरून गेलेले असतो ते आवर्जून करायला लागणं म्हणजेच लॉकडाऊन.
मधल्या काळात आकडे झपाट्याने वाढताहेत. काही अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी दिसतात. जनता हळूहळू तापायला लागली आहे. रिकामपणा, कंटाळा ही समस्या सुखवस्तू लोक उपरोक्त प्रकारांनी सोडवू पाहात असले तरी ज्या बहुसंख्य लोकांना "कंटाळा" याहून खूप मोठ्या वेगळ्याच समस्या पडल्या आहेत ते आता हळूहळू आक्रमक होत चाललेत, नसतील ते होण्याची शक्यता आहे.
अजून संपूर्ण वस्तीला किंवा मोठ्या प्रमाणावर संशयित रुग्णांना उचलून गावाबाहेर किंवा अन्यत्र तात्पुरत्या कॅम्पमध्ये सक्तीने घेऊन जाणं इथपर्यंत वेळ आलेली नाही. त्याचीही झलक तुरळकपणे आलीच आहे म्हणा.
आणखी काय काय होतंय?
एक.. पगार कपात सुरू झाली आहे. खुद्द स्वतः धरून अनेक क्षेत्रातले मित्र एकेक करून ही वस्तुस्थिती पचवते होत आहोत. जे जे दूर होतं, असं भासत होतं ते अगदी स्वतःच्या गळ्याशी आल्याची ही जाणीव आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आता दुसऱ्या देशाऐवजी किंवा दुसऱ्या शहराऐवजी स्वतःच्या शहरात, इतकंच नव्हे तर अगदी गल्लीत, शेजारच्या सोसायटीत, नातेवाईक किंवा पलीकडच्या मित्राच्या कंपनीत आढळताहेत. पुन्हा एकदा.. इनव्हलनरेबिलिटी हा स्वभावदोष ("संकटे येतात ती इतरांवर, माझ्यावर? कब्बी नय") ढासळून पडला आहे, फॉर गुड..
दोन.. वर्क फ्रॉम होम आणि स्कूल फ्रॉम होम या गोष्टी, ज्या भारतीय पद्धतीत कधीच बसत नव्हत्या त्या सुरू झाल्या आहेतच पण त्याउपर जाऊन आता अनेक कंपन्यांमध्ये तो कायमचा प्रकार होतो आहे. अगदी करोना संकट टळलं तरी पुढे घरूनच काम होईल हे पुष्कळ कंपन्यांनी जाहीर केलं आहे. आपल्या देशात यापूर्वी असे प्रयोग करायला कोणी धजतच नव्हते. वर्क फ्रॉम होम म्हणजे कामचोरीच, वर्क फ्रॉम होम म्हणजे सुट्टीच अशी घट्ट समजूत होती. ढुंगणावर सदैव हंटर असल्याशिवाय आपले लोक कामच करणार नाहीत या समजुतीतून हे कामगार - मुकादम कल्चर शेकडो वर्षं बहरलं होतं. आता बळेच लोकांना घरून काम करू द्यावं लागलं आणि नव्याने साक्षात्कार झाला.. आता कंपन्या मोठी मोठी फ्लोअर स्पेस असणारी ऑफिसेस "सरेंडर" करून भक्कम भाडं वाचवून मोठं "ओपेक्स" सेव्हिंग करु जाताहेत.
तीन.. लॉकडाऊन हा आपली मेडिकल सिस्टीम सज्ज करण्यासाठी वेळ मिळवण्याचा (बाईंग टाईम) उपाय आहे. त्यामुळे करोना फैलाव तेवढा काळ मंदावेल पण त्यामुळे पुढे करोना टळेल आणि आपल्याला होणारच नाही अशी एक समजूत अनेकांची आहे. श्रीमंत वस्त्यांतले सुखवस्तू लोक "अरे रहा ना घरात, कशाला मरायला बाहेर पडताय, यांना गोळ्या घालायला हव्यात" वगैरे म्हणत छंद जोपासत, ऑनलाइन पोस्ट टाकत, व्हाट्सएप गप्पा मारत दिवस काढताहेत. पण ज्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे ते लोक कधी ना कधी रस्त्यावर येणार हे त्यांना समजत नाहीये. लॉकडाऊन अधिकाधिक वाढत गेला तर अधिकाधिक बेरोजगारी आणि अधिकाधिक नॉन-करोना मृत्यू होणार हे कटु सत्य आहे.
चार.. प्रत्येक नवीन केसची ब्रेकिंग न्यूज. इन्फेक्शन होणे या अतिशय शक्य आणि अपेक्षित घटनेशी वेदनादायक स्टिग्मा जोडला जाणं.. लस निघून सर्वांना मिळेपर्यंत कधी ना कधी आपल्याला, म्हणजे बहुतांश लोकांना करोना होण्याची शक्यता न होण्यापेक्षा खूपच जास्त आहे. केवळ रुटीन सुरू होण्यानेही हे होणारच आहे. दीर्घकालीन लॉकडाऊन नक्कीच जास्त जीवघेणा आहे. तेव्हा रोग झालेले आणि न झालेले असे दोन मोठ्ठे सामाजिक वर्ण तयार होताहेत हे भयंकर आहे.
वृत्तनिवेदक किंवा निवेदिका फसफसत्या उत्साहाने चीत्कारत असतात: "बुलढाण्यातून (किंवा यवतमाळमधून किंवा औरंगाबादहून) आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज येतेय.. आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. आपल्यासोबत आमचे वार्ताहर... काय परिस्थिती आहे तिथे?"
गावोगावची रुग्णसंख्या सांगताना "तब्बल","कहर","थैमान" असे शब्द सर्रास येत आहेत. काल आठशे नवीन सापडले होते, आज चारशे सापडले तर नवीन रुग्णसंख्या कालच्यापेक्षा चारशेने कमी आहे असं न म्हणता "तब्बल चारशे" असा उत्तेजित उल्लेखच होतोय. सगळे चॅनेल्स लालभडक पार्श्वभूमीवर ब्रेकिंग ब्रेकिंग करत आहेत. एखाद्या नवीन गावात, शहरात, वस्तीत, सोसायटीत या बातम्या पाहणारे जे रहिवासी असतील त्यांना धडकी भरतेय की मला ताप खोकला झाला तरी मी घरात मरणं परवडेल पण आपल्या गावात आपण ही "ब्रेकिंग न्यूज" बनायला नको. सगळ्या वस्तीचा रोष नको. सर्व निरोगी वातावरणाला आपण नासवलं ही अपराधी भावना मरणाहून वाईट.
लोक नक्कीच लक्षणे लपवत असू शकतील. अंगावर दुखणं काढून अधिकच फैलाव करत असू शकतील. हे मत अनेक तज्ञ लोकांनीही व्यक्त केलंय. मीडियातून होणारं प्रेझेंटेशन पूर्ण बदलून उलट लोकांना तपासणी करून घ्यायला धीर येईल अशी मांडणी यायला हवी आहे. तुम्हाला हा रोग झाला तर याचा अर्थ तुम्ही आसपासची सोसायटी किंवा समाजाचा घात केलात, किंवा तुम्ही अढीतला नासका आंबा निघालात अशी भावना होऊ देऊ नका. हा आजार नवीन आहे म्हणून अधिक खबरदारी आवश्यक आहे, पण ते इन्फेक्शन आपल्या सर्वांपासून वाटतं तेवढं दूर नाही आणि मोअर प्रॉबेबल दॅन नॉट, आपल्याला ते होणार आहे.. आणि इट्स ऑलराईट.. अपराधी होऊ नका.. हे मनावर ठसवणारं वार्तांकन गरजेचं आहे.
सर्वांची मतं आणि तुम्ही निरीक्षण करत असलेल्या घडामोडी इथे नक्की नोंदवा. पुढे या जिवंत, त्या त्या क्षणी केलेल्या नोंदी कोणालातरी खूप मौल्यवान वाटू शकतील.
काळजी घेऊया, धीर धरूया, समजून घेऊया, शांत होऊया.. जमेल तितकं, जमेल तसं.. फॉर धिस टू शाल पास.
प्रतिक्रिया
29 Apr 2020 - 10:51 am | कंजूस
नाहीतरी अलोपथी मेडिकल सिस्टमकडे औषध नाहीच आहे तर लोकांनी खोकला, ताप यासाठींची आयुर्वैदिक औषधे घेऊन पाहायला सुरुवात केली पाहिजे. कोणी सांगावे ती परिणामकारक ठरूही शकतील. कुणी वैद्य हे इलाज करण्याची जोखीम उचलणार नाही.
त्रिकटु चूर्ण ( सुंठ -मिरी -पिंपळी चे चूर्ण);
तीनवेळा मिठाच्या गरम/कोमट पाण्याच्या गुळण्या सुरू केल्या आहेत.
29 Apr 2020 - 3:26 pm | खिलजि
एक नंबर इलाज चालू केला आहे असे मी म्हणेन .. जेव्हा हे सर्व सुरु झालं तेव्हापासूनच मी घरी सर्वाना रात्री झोपताना चूर्णाचे चाटण मधातून घ्यायला सुरु केले होते .. सर्दी होऊच द्यायची नाही , हा एकमेव उद्देश ..
29 Apr 2020 - 11:11 am | चौथा कोनाडा
परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे अन लेखात म्हटल्याप्रमाणे टीव्हीवाले "ब्रेकिंग-ब्रेकिंग" चा आगडोंब उठवत आहेत.
म्हणून बातम्याच पाहणं बंद केलंय ! थोडंफार वाचन आणि टीव्हीवर निवडक सिनेमे, वेबसिरीज पाहणं सुरु आहे सध्या.
खुप मजा येतेय ! नुकताच बार्ड ऑफ ब्लड पाहून ग्वादर आणि चबहार बंदर यांचा भौमितिक संदर्भ अभ्यासणं झालं.
कधी पासून पाहायचा होता तो "एक हजाराची नोट" हा सुंदर सिनेमा काल पहिला !
29 Apr 2020 - 11:41 am | प्रचेतस
अगदी हेच,
बातम्या बघणे पूर्णतः बंद. सकाळी मात्र सकाळचा इपेपर वाचतो.
बाकी द वॉकिंग डेड सीजन तिसरा सुरु आहे, पंचायत सुरू केलीय, अधूनमधून सिनेमे आणि रोजचे रामायण महाभारत बघणे होतेच. पुस्तक वाचनही सुरू आहे आणि मिपावरचे उत्तमोत्तम लेख.
29 Apr 2020 - 4:19 pm | खिलजि
सुदैवानं मी सुरुवातीपासूनच बातम्यांपासून लांब हाय ... कारण आमचा छोटा मुलगा .. त्याला छोटा भीम , शिंच्यान , डोरेमॉन हे सर्व सतत बघायचं असत आणि नकळत आम्हालाही सवय लागलीय आता .. मला वाटत हेच कारण असेल कि आम्ही नाकारत्मकतेपासून दूर आहोत ..
29 Apr 2020 - 5:09 pm | Prajakta२१
shinchan एक उत्तम स्ट्रेसबस्टर आहे
29 Apr 2020 - 11:25 am | गणेशा
माझे एक मत असे आहे कि, आता तरी भारताने आरोग्य आणि शिक्षण यावर जास्त लक्ष देऊन, बजेटचा बराचसा हिस्सा ह्या क्षेत्राला देण्याची खूप गरज आहे हे ओळखावे...
बाकी तुम्ही बऱ्यापैकी लिहिले आहेच..
कंपन्यांचा attitude बदलेल ही पण indian मॅनेजर चा attitude बदलायला अजून बराच टाइम लागेल असे दिसते
29 Apr 2020 - 11:56 am | चौकटराजा
खरेतर " लॉकडाउन" ही थीम दिल्यावर इथे "करोना" ची चर्चा कराय्चीच कशाला या विचाराने बहुतेकानी सर्व लेखन केले आहे.एक बाजूने ते बरोबरच आहे. कारण जिथे सूर्यमलिकेबाहेर यान पाठवणारा मानवी समाजच स्तम्भित झाला आहे ,तिथे आपण इथे जीवसृष्टी, होस्ट पेशी , जीनोम सिक्वेन्स , आर एन ए ,डी एन ए , रिस्कफॅक्टर्स ,इम्युनिटी यांची चर्चाच करून होणार तरी काय ? त्याने ना विषाणू आपली चाल बदलणार आहे ना लस मिळण्यात काही मोलाची भर पडणार आहे. म्हणून मग रेसिपी,चेस , सिनेमे वगरे विषयाचा प्रवेश झाला .
सर्व साधारण अंदाज शास्त्रद्न्यांचा असा आहे की ... हे प्रकरण जागतिक पातळीवर २०२० च्य शेवटापर्यंत मानवी समाजाला पुरून उरणार आहे. व तो पर्यत काही लाख लोकांची आहुती या मृत्यू यज्ञात पडू शकते .आर्थिक पातळीवर काय होईल हा मुद्दा वैज्ञानिक नसल्यामुळे त्याची चर्चाच गौण ठरणार आहे सध्या तरी. आमच्या सारख्या ६५ चे वर , पुरुष ,२० वर्षांचा मधुमेह , बी पी या सगळ्या गुणवतत्ता प्राप्त केलेल्याना तर येते ६ महिने दिवाभीता सारखे राहावे लागणार आहे. त्यातून जे वाचतील त्यांना २०२१ उजाडताचा दिवस पाहिला तर विस्मय वाटायला नको.
मानवाचे विषाणू , जीवाणू , परजीवी. बुरशी हे बाहेरचे तर , अवरोध ( ऑब्स्टरकशन ),असात्म्यता ( अलर्जी ) अंतर्गत शत्रू त्याला मरण देऊ शकतात हे मूलभूत विज्ञान आहे. बाकी मार्केट , इझम्स , अर्थव्यवस्था, रोजगार , लाईफ स्टाईल, सेट्स सिमबॉल ह्यात तेंव्हाच अर्थ आहे जेंव्हा वरील शत्रूचा सामना एखादा समर्थपणे करू शकतो. त्यासाठी आहार, विहार , विचार, व्यायाम याचा ऋतू परत्वे व आपली नैसर्गिक ठेवण यांच्या संदर्भात विचार करून वागणे ही खरी लाईफ स्टाईल आहे. बॉडी स्प्रे ,आफटर शेव्ह लोशन ही नाही !
29 Apr 2020 - 3:16 pm | प्रचेतस
अगदी खरे आहे.
29 Apr 2020 - 7:27 pm | सुबोध खरे
आमच्या सारख्या ६५ चे वर , पुरुष ,२० वर्षांचा मधुमेह , बी पी या सगळ्या गुणवतत्ता प्राप्त केलेल्याना तर येते ६ महिने दिवाभीता सारखे राहावे लागणार आहे.
चौरा साहेब
भारतात आज दिनांक २९ एप्रिल संध्याकाळ पर्यंत एकंदर ३१ ३३२ हजार रुग्ण आहेत त्यापैकी १००८ लोकांचा मृत्यू झालेला आहे.
म्हणजेच मृत्यू दर ३ टक्के आहे
यातील ८० % रुग्ण साठीच्या वरचे आहेत हे गृहीत धरले तर साठीच्या वर हा मृत्यू दर २.४ % आहे.
याचा अर्थ साठीच्या वर इतर मधुमेह हृदयविकार सारखे आजार असलेल्या वृद्ध लोकांची या आजारातून सुखरूप राहण्याची शक्यता थोडी थोडकी नव्हे तर ९७.६ % आहे.
आणि तीच शक्यता तरुण माणसांची ९९. ४ % आहे.
ग्लास रिकामा आहे म्हणण्यापेक्षा ग्लास रिकामा आहे म्हणूनच त्यात काही भरता येऊ शकते हे लक्षात ठेवावे.
मग त्यात तब्येतीप्रमाणे आपण दूध, चहा, आंब्याचे पन्हे किंवा मद्य भरून त्याचा आस्वाद घेऊ शकता.
29 Apr 2020 - 9:39 pm | चौकटराजा
भारतासारख्या देशात आज ही आकडेवारी जरी आशादायक असली. तरी भारताची प्रचंड लोकसंख्या, आर्थिक विषमता व लोकशाही पद्धत पहाता अत्यन्त आवश्यक असा लॉक्डाऊन भारतातील नाहीरे लोकसंख्या फार काळ सहन करू शकणार नाहीत. उपासमारीपेक्शा करोनाने मरतो अशी मागणी देखील आता वेग धरू लागली आहे. अशा वेळी जो उद्रेक या देशात होउ शकतो याची भीती जाणकाराना नक्कीच आहे. स्थलान्तर हे भारत देशाने केलेल्याअति शहरीकरणातून जन्माला आलेले पाप आहे व तेच आपला मोठा शत्रू आहे. आज युरोपात भारत देशाइतके स्थलान्तर नक्कीच नाही. तरी तेथील स्थिती चिन्ताजनक आहे . खरे तर १९२० मधे आलेली साथ भारत देशात स्पेन मधून येऊन इथे दीड कोटी लोकाना ( जगात ५ कोटी पैकी ) मारू शकली. आज तर मला चांगला पगार मिळतो म्हणून भारत देशातून , चीन मधून कितीतरी लोक स्थलान्तरीत झाले आहेत व यातूनच हा उद्रेक झाला आहे. आता आशा फक्त लस येण्याची आहे पण आपण जाणताच की विषाणू हा सर्वात जलद म्युटेट होउ शकतो . तिथे लस संशोधनातील गुतवणूक पार डुबू शकते. हे एकूण ११ प्रकरचे विषाणू आहेत व सर्व विषाणूत कॉमन काय आहे हे तपासून लस शोधावी लागणार आहे ! आता आपली रोग प्रसार स्थीती क्लस्टर या स्वरूपात आहे . हे ४० कोटी लोक कधीही तिचे रूपान्तर महाभयानक कम्युनिटी प्रसारात करू शकतात. परवा जरा किराणा आणण्यासाठी बाहेर पडलो व पाहिले तर " या" नाहीरे लोकानी ९५ टक्के कोणतेही मास्क रूमाल वगरे फाट्यावर मारलेले दिसले.
29 Apr 2020 - 3:16 pm | ज्योति अळवणी
ज्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे ते लोक कधी ना कधी रस्त्यावर येणार हे त्यांना समजत नाहीये.
माझा अनुभव थोडा वेगळा आहे. झोपडपट्टी मध्ये राहणारे देखील याविषयी जागरूक आहेत. मला वेळी- अवेळी फोन करून त्यांच्या इथली परिस्थिती सांगतात. जर कोणी नवीन पेशन्ट्स आढळले तर स्वतः त्यांच्या चाळीच्या गल्ल्यांपुरत स्वतःला घरात अडकवून घेतात. जान हें तो जहान हें... यावर त्यांचा विश्वास आहे. इमारतींमध्ये राहणाऱ्यांपेक्षा हे लोक जास्त समंजस आहेत आणि सांभाळत आहेत.
बाकी लेख उत्तम आणि बराचसा खरा
29 Apr 2020 - 3:23 pm | गवि
रस्त्यावर येणार म्हणजे निष्काळजीपणे रस्त्यावर उतरणार अशा अर्थाने म्हणायचं नसून रोजगाराच्या / रिसोर्सेसच्या अभावी किंवा त्याच्या शोधात / मजबुरीखातर कधी ना कधी घर सोडून बाहेर येणार (यावं लागणार) अशा अर्थाने.
दुसरी बाजू निरीक्षण नोंदवल्याबद्दल धन्यवाद. हाच लेखमालेचा उद्देश आहे.
29 Apr 2020 - 3:23 pm | वामन देशमुख
लेखाचं सार या वाक्यात आहे!
कोरोनाच्या साथीच्या आल्यावर ही जाणीव होणं हे महत्वाचं आहे. लेख आणि त्यामागचे विचार आवडले हेवेसांन.
29 Apr 2020 - 3:48 pm | Prajakta२१
लसीपेक्षा औषध सापडण्याचीच जास्त गरज निर्माण झालीये लवकरात लवकर एखादे cure मेडिसिन सापडावे आणि हे सगळे नष्टचर्य संपावे हीच प्रार्थना
आयुर्वेदाचा विषय निघालाच आहे तर कडुनिंब किंवा त्याच्या कॉन्सन्ट्रेटेड गोळ्या ह्या रोगावर कितपत उपयुक्त ठरतील?
29 Apr 2020 - 5:00 pm | प्रशांत
उत्तम लेख
29 Apr 2020 - 5:09 pm | तुषार काळभोर
लस काही कोटी लोकांना द्यावी लागेल, औषधोपचार हजारात किंवा लाखात करावा लागेल. त्यामुळे औषध उपचार लवकर उपलब्ध होवो
बाकी वृत्त वाहिन्यांबद्दल बोलणे म्हणजे उगाच आपलीच dokedukhi वाढवणे. रोज सकाळी ' पेपर वाचणे ' हा उत्तम पर्याय आहे.
29 Apr 2020 - 5:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गविशेठ, उत्तम विचार उत्तम लेखन. आता आपणही लॉकडाऊनच्या व्यवस्थेत मॅच्युअर होत गेलो आहोत. आपण म्हणालात तसे अनेकविध प्रश्न आता समोर आले आहेत. वर्कफ्रॉम होममुळे ऑफिसेसचा खर्च करायचा कशाला असा एक फंडा भविष्यात येऊ शकतो. दूर राहूनही मूकरदम तुम्हाला उत्तम प्रेशर मधे ठेवतो आणि काम करवून घेतो तर भविष्यात असेच असेल. वेतन तर नक्की कमी करणार यात काही वाद नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि उत्पादन क्षमता आणि व्यापार कमी झाल्यामुळे आता यापुढे आपणास इतके वेतन देणे पुरणार नाही असे मेसेज यायला सुरुवात होईल. आपण सर्वांनी याचीही मानसिकता पूर्ण केली पाहिजेच. कायम काहीच नाही.
सालं ब्रेकींग न्युजही भयंकर डोकेदुखी झाली आहे. महत्वाची बातमी, एक मोठी बातमी येत आहे. अशा वेळी त्यावृत्तनिवेद्कांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आपल्याला टीव्हीवर बसवून ठेवण्यासाठी पूर्ण कसब वापरतत असतात. अत्यंत महत्वाची बातमी म्हणून सकाळची कोणती तरी एक बातमी आपल्याला रिपीट मारत असतात. आपणही आता हे सर्वबेफिकिरपणे बघायलाच हवे, नाही केलं तर आपण आपले आजार वाढवून घेऊ असे वाटते. बाकी, अखेर लॉकडाऊन किती दिवस ? एकदिवस ही जगरहाटी आपल्याला सुरुच करावी लागणार आहे. अचानक आज रात आठबजहसे लॉकडाऊन अब नही रहेगा असे म्हणून चालणार नाही. एक नियोजन आवश्यक आहे, जगरहाटी तुम्हाला हळूहळू पूर्ववत करावी लागणारच आहे .एकदम सुरु झालं तर असंख्य रुग्ण वाढणारच आहेत आणि जनजीवन सुरळीत होईल तेव्हाही रुग्णसंख्या वाढणारच आहेत. एक नियोजन जिथे रुग्णसंख्या कमी आहे, तिथे दक्षता घेऊन तुम्हाला नियमित कामकाजाला सुरुवात करावीच लागणार आहे, तसे न केल्यास भविष्यात अनागोंदी होणार आहे. नोक-या वेतन यावर गदा आली की नियमित आयुष्याची नौका डगमगायला लागते. आणि अशी काही चित्रं दिसायला लागली आहेत.
बाकी, आपण म्हणता तसे कोणी संशयीत रुग्ण असेल, सोसायटीत कोणी आढळलं की त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा सकारात्मक हवा. आपण त्याच्याकडे कोणी दहशतवादी आपल्याकडे आलाय असे पाहात आहोत, हे बदलायलाच हवं. आज एक डॉक्टर की परिचारिकेचा व्हीडीयो पाहण्यात आला. बर्याच दिवसानंतर ती दवाखान्यात सेवा करुन आल्यानंतर घराच्या दरवाजात पोहचली तेव्हा सोसायटीचे लोक स्वागतासाठी गेटवर जमले. सोसायटीच्या लोकांनी कुटुंबानी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला, टाळ्या वाजवून स्वागत केलं ते दृष्य पाहून डोळ्यात पाणी आलं. आज मिपावर यायचाही मूड नव्हता. गलपटलेली फिलिंग यायला लागली आहे. उगाचाच 'आज उदास उदास गं पांगल्या सावल्या' असे वाटायला लागते. च्यायला, आयुष्यातली कंपलसरी विश्रांती इतकी भयानक असे वाटले नव्हते. पण यह भी दिन बदल जायेंगे यावर विश्वास आहे, दिवस बदलत असतात. गविंच्या धाग्यामुळे पुन्हा लिहावेच वाटले. धन्स. -दिलीप बिरुटे
29 Apr 2020 - 5:57 pm | कंजूस
हीच ती वेळ आयुर्वेदातील खरंच काही परिणामकारक आहे का तपासण्याची. बिब्बा हा सुद्धा एक विषनाषक औषधी आहे. भल्लातकासव.
29 Apr 2020 - 6:19 pm | चौकटराजा
मी काही मेडिकलच्या मांडवाखालून गेलेली व्यक्ती नव्हे.पण माझया माहितीनुसार विषाणू म्हणजे विषारी असे समीकरण बरोबर होणार नाही.विष याचा अर्थ शरीराला पचविता न येणारे व शरीरातील घटकाशी संयोग पावणारे काही बाह्य वा शरीरातील गुंतागुंतीच्या रासायनिक प्रकियेतून बाहेर येणारे घटक. पचविता न आलेला वाटाणा हा काही विष म्हणता येणार नाही. पण जो पचविता तर आलेला नाही पण शरीरातील रासायनिक द्रव्याशी संयोग पावून भलत्याच रासायनिक क्रियांना उद्युक्त करणारा पदार्थ . हा विषाणू म्हणे फुफुसामध्ये फायब्रोसिस निर्माण करून ते बंद पाडतो असे वाचल्याचे आठवत आहे ! सध्या जे फवारे ,मारले जातात त्यामुळे फक्त बुरशी व जीवाणू यांना प्रतीकारशक्तीच्या " या" कठीण काळात शरीरावर हल्ला करायाला आयतीच संधी येऊ नये असा हेतू असावा .त्याने प्रत्यक्ष विषाणूंचे फारसे काही नुकसान होते असे वाटत नाही. अर्थात यावर डॉ लोक अधिक प्रकाश टाकू शकतील !
1 May 2020 - 10:00 pm | आनंद
माझे आजोबा पंढरपुर जवळ्च्या खेडेगावात ६० वर्षा पुर्वी उपचार करत असत तेंव्हा घटसर्प (Diphtheria) या रोगाचा उपचार करताना ते केवडा ( Pandanus odoratissimus) Male flower चिलमित ओढायला सांगत असत. ( धुम्र चिकिस्ता ) व ह्या मुळे अगदी गंभीर असलेले रुग्ण ही २ दिवसात पुर्ण बरे होत असत.
आता घटसर्प पुर्ण पणे DPT vaccination मुळे नाहीसा झाला आहे. घटसर्प हा Corney Bacterium Diphtheria या जिवाणु मुळे होतो. पण घटसर्पआणि करोना मध्ये खुपस साम्यही आहे.
केवड्या बद्द्ल नेट वर शोधताना बरीच माहीती हाती लागली ती इथे बघता येइल https://www.hindawi.com/journals/aps/2014/120895/
केवड्या मध्ये Antiviral आणि Antibacterial गुणधर्म आहेत. मी मेडिकल क्षेत्राशी संबधीत नसल्या मुळे ही माहीती योग्य त्या व्यक्ती पर्यंत पोहचवावी म्हणुन हे लिहीत आहे.कदाचीत काही अंशी तरी उपाय मिळु शकेल का ते बघता येवु शकते. लहान मुलांना करोनाची बाधा खुपच कमी प्रमाणात होत असल्याने BCG किंवा DPT लसी मुळे हे होत असावे का संशोधनाचा विषय आहे आणि यात bacterial coinfection चा काही संबध आहे का हे सगळे संशोधनाचे विषय आहेत. जर असे काही असेल तर केवडा धुम्रचिकीस्ता ही तातडीचा उपाय ठरु शकते.
29 Apr 2020 - 10:48 pm | अर्धवटराव
सुरुवातीचे सगळे सोपस्कार आटपुन आपण सामायीक प्रतिकारशक्तीच्या मार्गाने करोनाशी झगडणार, किंबहुना आता झगडा संपवुन सहचर्याच्या मार्गाने जाणार हे एव्हाना उघड झालय. बातम्या, सोशल मिडीयावरील पोस्ट्स, चर्चासत्रे वगैरे आता तशी वळणं घ्यायला लागली आहेत.
लेट्स सी.
30 Apr 2020 - 7:50 pm | चौकटराजा
लस व औषध याचबरोबर सामूहिक प्रतिकारशक्तीत यथावकाश वाढ हा एक आशेचा किरण आहे यू के मध्ये करोना आय सी यू मध्ये काम करणाऱ्या एक डॉक्टर साहेबानी अशी शक्यता व्यक्त केलीय. ज्या अर्थी इतक्या साथी येऊनही मानव जमात टिकली आहे त्याअर्थी अशी काही नैसर्गिक यंत्रणाआहे जसे जीवाणू औषधाला सरावतात त्याप्रमाणे माणूस विषाणूला सरावतो असे असेल तर काही आशा करायला हरकत नाही.
30 Apr 2020 - 9:42 pm | माझीही शॅम्पेन
वाह क्या बात है , एकदम टिपिकल गवि स्टाईल लेख , आवडला , पटला , एकंदर कठीण परिस्थिती आहे न्यूज माध्यमांनी सगळंच ताळतंत्र सोडलं आहे
30 Apr 2020 - 9:57 pm | पिंगू
सध्या लाइव्ह न्यूज चॅनेल बघणे म्हणजे पापच. एकही बातमी योग्य देत नाहीत आणि वरूण ब्रेकिंग न्यूजचा भडिमार.
मलापण मे मध्ये काहीतरी करावेच लागेल कारण लॉकडाऊनमुळे कमाईचे सगळे पर्याय खुंटले आहेत. तेव्हा काहीतरी हात पाय मारावे लागतील. सध्या शेतात काम करून वेगळा अनुभव घेतोय पण तो ठोस कमाईचा मार्ग नाहीये.
1 May 2020 - 4:18 pm | अपश्चिम
तुम्ही मांडलेले मुद्दे आवडले म्हणण्यापेक्षा पटले . परवानगी दिली तर दुसरीकडे शेअर करू इच्छितो .
1 May 2020 - 5:32 pm | गवि
अवश्य करा. कॉपीराईट किंवा श्रेय असं काही नाहीये या लिखाणाबाबत.
कॉपी पेस्टपेक्षा मिपा धागा लिंक द्या शक्यतो. म्हणजे मिपावर लोक व्हिजिट करतील. इन जनरल गुड प्रॅक्टिस.
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
1 May 2020 - 7:39 pm | Nitin Palkar
"लोक नक्कीच लक्षणे लपवत असू शकतील. अंगावर दुखणं काढून अधिकच फैलाव करत असू शकतील. हे मत अनेक तज्ञ लोकांनीही व्यक्त केलंय. मीडियातून होणारं प्रेझेंटेशन पूर्ण बदलून उलट लोकांना तपासणी करून घ्यायला धीर येईल अशी मांडणी यायला हवी आहे. तुम्हाला हा रोग झाला तर याचा अर्थ तुम्ही आसपासची सोसायटी किंवा समाजाचा घात केलात, किंवा तुम्ही अढीतला नासका आंबा निघालात अशी भावना होऊ देऊ नका. हा आजार नवीन आहे म्हणून अधिक खबरदारी आवश्यक आहे, पण ते इन्फेक्शन आपल्या सर्वांपासून वाटतं तेवढं दूर नाही आणि मोअर प्रॉबेबल दॅन नॉट, आपल्याला ते होणार आहे.. आणि इट्स ऑलराईट.. अपराधी होऊ नका.. हे मनावर ठसवणारं वार्तांकन गरजेचं आहे."____ हे वृत्त वाहिन्यांना कसं कळावं?
1 May 2020 - 8:02 pm | फारएन्ड
अगदी चपखल वर्णन!
2 May 2020 - 7:32 am | सौंदाळा
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून स्वतःच स्वत:चा उदो उदो करणाऱ्या या वाहिन्यांवर नियंत्रणासाठी काहीतरी केलेच पाहिजे.
२६/११ असो, कोरोना असो वा गेल्याच वर्षी पार पडलेला महाराष्ट्रातील सत्ता पालटाचा अंक असो जवळ जवळ सर्वच वृत्तवाहिन्यानी अत्यंत बेजबाबदार आणि उथळ बातम्या दाखवल्या.
समाजात नकारात्मक विचार पसरवणे आणि लोकांची सहनशीलता व संयम कमी कमी करण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे.
3 May 2020 - 5:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आताही मद्यांचे दुकाने उघडणार म्हटले की तळीराम यांना दिलासा. सारखं टीव्हीवरही तळीराम तळीराम. अरे काही इज्जत हाय का नै त्यांना. मान्य की मद्यपानाचे काही दुष्परिणाम आहेत पण इतकी तुच्छतादर्शक वृत्तांची आवश्यकता
असते का ? ती काही जीवनावश्यक गोष्ट नाही, पण सरकारचा काही फायदा असेल तेव्हाच ते सुरु करीत आहेत ना ?
-दिलीप बिरुटे
3 May 2020 - 5:04 pm | किसन शिंदे
शब्दाशब्दांशी शमत. तळीरामांचीही स्वतःची अशी डिग्निटी वैगेरे काही आहे कि नाही?
3 May 2020 - 5:51 pm | सुबोध खरे
एकच प्याला नाटकातून--
एक माणूस --दारू पिणार्यांच्या इभ्रतीचं काय?
तळीराम-- सुरुवातीचे काही दिवस आम्ही त्याच्या इभ्रतीची खूप काळजी घेतो. त्यानंतर त्यालाच आपल्या इभ्रतीबद्दल काहीच वाटेनासे होते.))--((
3 May 2020 - 5:47 pm | प्रचेतस
हे असले फॉरवर्ड्स पण सुरू झालेत सर बघा.
जवळ जवळ सर्वच राज्यांनी दारूची दुकाने उघडण्यास अनूकुलता दाखवली आहे, कारण सर्वच राज्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.
आयला म्हणजे आपण ज्यांना बेवडे समजत होतो तेच अर्थव्यवस्थेचा चौथा स्तंभ निघाले.
3 May 2020 - 5:52 pm | सुबोध खरे
अर्थव्यवस्थेचा डळमळीत स्तंभ म्हणा
3 May 2020 - 6:01 pm | प्रचेतस
=))
अगदी अगदी
2 May 2020 - 11:02 pm | मिसळ
गवि, फार महत्वाचा मुद्दा मांडलात ह्या ब्रेकींग न्युज देणार्या वृत्तवाहिन्यांविषयी. संपुर्ण लेखाशी सहमत.
3 May 2020 - 5:32 pm | तुषार काळभोर
वृत्तवाहिन्या कुठं अन् काय चुकतात हे आपल्याला चांगलंच ठाऊक झालंय आता. पण त्या तशा आहेत कारण त्या वाहिन्या बघणारे पब्लिक तसं आहे.
काल ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्काराला मोजके लोक उपस्थित होते. त्याचे काही फोटो समाज माध्यामात फिरले. त्यातील काही फोटोत आलिया भट हातात मोबाईल धरून वापरत असल्याचे दिसत होते. लोकांनी त्या फोटोंवर नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. कुणालाच खरं काय आहे ते जाणून घ्यायचं नव्हतं, तेवढा संयम कुठं असतो आजकाल. ऋषी कपूर यांची मुलगी दिल्लीत असल्याने तिला येता आलं नाही म्हणून आलियाने तिला व्हिडिओ कॉल करून अंत्यसंस्कार दाखवले. पण हे जाणून ना घेता लोकांनी तिला शिव्या घातल्याच.
पब्लिक सुधारलं तर चॅनल सुधारतील.
3 May 2020 - 6:17 pm | चांदणे संदीप
+१
लोकशाहीत लोकांना सुधरवायची काय व्यवस्था नाहिये हाच तो लोकशाहीचा बुडाखालचा अंधार!
सं - दी - प
3 May 2020 - 10:32 pm | अर्धवटराव
कटु वास्तव :(