लॉकडाऊनः तेहेतिसावा दिवस

गणेशा's picture
गणेशा in काथ्याकूट
26 Apr 2020 - 8:00 am
गाभा: 

प्रस्तावना : लॉकडाऊन चे धागे वाचलेही नव्हते, कारण मला वाटले होते लॉकडाऊन मध्ये रोज काय करायला पाहिजे, कसे सकाळी उठल्यावर व्यायाम केला पाहिजे, काय आहार ठेवला पाहिजे असले प्रबोधन पर धागे असतील आणि कोणी रोज काय काय केले हे ते रोज प्रतिसादात सांगत असतील, मी हे खाल्ले आणि मी असा योगा केला , मी असा सुर्यनमस्कार केला, मग कोणी म्हणात असेल असे नाही काय असे करावे. असे फलाना बोलत असतील असे वाटले. आपल्याला हे प्रबोधन करणार्‍या गोष्टींचा काय माहित पण आजकाल थोडा राग येतो.
आज पैजार बुवा आणि माझी शँपेन यांचे धागे वरती होते, पळवत वाचले... चांगले होते एकदम.. मस्त, आवडले. आणि आपल्याला आधी वाटलेले चुक होते, असे न वाचताच आपले मत नाही बनवले पाहिजे असे वाटले. आणि मी माझा नविन धागा लिहिण्याचे ठरवले.. इतर ळोकडाऊन चे धागे वाचले नाहीत, उगाच असे वेगळे काय लिहिणार आणि मग त्या धाग्यांचीच येथे कॉपी व्हायची (नंतर वाचणार नक्की).. सो हे दोन धागे सोडल्यास मी इतर धागे न वाचताच माझ्या लॉकडाऊन च्या कथेला सुरुवात करतो... काय लिहिणार आहे हे ठरवले नाही, त्यामुळे जे घडले ते लिहिणार, जे वाटले ते लिहिणार ..फक्त माझ्या पासुन ..माझ्याच पर्यंत, बघु जे होईल ते होईल....साधे सरळ आपलेच ...
-------------------------------------------------------------------------------------
थोडीशी पार्श्वभुमी -

ऑर्कुट च्या लफड्या नंतर, मिपा आपले प्रेम होते, मनापासुन ... मनापर्यंत. तसे मिपावर मी चाचपडतच आलो होतो... आपल्याला रिप्लाय द्यायला तेंव्हा आवडायचे आणि आताही... पण तेंव्हा कविता लिहायचो, त्या पण येथे द्यायला लागलो.. वन लायनर फलाना लिहिले होते ते पहिले येथे दिले. येथे पहिल्या धाग्यांना चांगले रिप्लाय कोणाला आले असतील तर ते भाग्यवान, आपले नशिब इतर सर्वांसारखेच होते... वनलायनर च्या पहिल्या धाग्यालाच गपुर्झा, वनलायनर वाक्यांभोवती कथा लिहा झाला तुमचा वपु, त्रीशतकवीर, ग ची बाधा अजुन झाली नाही पुढे बघु काय ते , असले रिप्लाय आले आणि हळु हळु मज्जेने या सर्वांचाच मी भाग बनत गेलो...
मिपा वर आपले प्रेम असले तरी लग्न झाल्यापासुन आपण इमानदार झालो आणि मिपावर येणे कमी झाले.. हळु हळु माझाच श्रीगणेशा झाला मिपावरुन.. अधे मधे आलो ..पण नियमित पणा नव्हताच.. पण मिपावर आलो की मी पुन्हा दिलखुलास प्रेम करायचो, लिहायचो आणि भरपुर रिप्लाय द्यायचो, ओळखीचे नओळखीचे असले भेद मी करत नव्हतोच आणि नाही... आपले प्रेम मनापासुन ..मनापर्यंत...

सुरुवात -

लॉकडाऊन चालु झाला आणि स्वताला घरात डांबून घ्याव लागलं.. आणि मग अश्या वेळेला आपल्या मिपाची आठवण आल्या शिवाय राहिली नाही, पण मिपावर जाताना यावेळेस वेळ आहे तर काही तरी आपण लिहायला पाहिजे असे वाटत होते.. आणि काय लिहावं , कश्यावर लिहावं यातच काही दिवस गेले.
तिकडे फेसबुक आणि व्हाट्सप वर मंडळी पेटलेली होती.. मोदी..कॉग्रेस..उद्धव..थाळ्या..दिवे..हिंदु.. करोना ..चीन..इटली .. हेच कसे बरोबर , तेच कसे बरोबर.. आधी बरे वाटले हे सारे पण मग नंतर वीट आला.. आणि मग एकसुरी ओरडणार्‍या लोकांना पहिले आपण फेसबुक वरुन अन्फ्रेंड केले किंवा अनफॉल्लो केले, व्हाट्सअप चे गृप जे आधीच कमी होते त्यातलेही बरेचसे अनजॉइन केले.. अगदी शाळेचा गृप पण अनजॉईन केला.. जाताना त्यावर लिहिलेले आपल्याला चांगले आठवते.. "अजुनही गावाकडे आलो की एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन आपण बोलायचो, एकत्र जेवायचो, तोच टाईमपास, तेच तेच विषय चघळायचो, तेंव्हा ही आपली मते वेगळी होती, पोरी.. राजकारण यात आपल्याकडे ही वेगवेगळी टोके होती.. पण म्हणुन आपण आपल्यात कायमचा दूरावा करत नव्हतो.. दुसर्‍याच्या मताचा आदर नाही पण निदान तिरस्कार करत नव्हतो ... पण आता एक तर हे टोक नाही तर ते टोक .. दुसर्‍याचे विचार म्हणजे अक्कल नसलेला मुर्ख माणुस असेच सगळे वाटते आहे"...
तसा आपण, काय कोणी मोठा नाही, पण त्यामुळे आपण निघुन गेलो काय किंवा बोललो नाय तर कोणाला कश्याचा फरक पडत नाही हे आपल्याला माहीती आहे.
पण फेसबुक आणि व्हॉट्सअप चे असले अतरंगी लोक बंद केल्याने आपला काही टाईमपास व्ह्यायना.. तिकडे काही आवडले नाही की त्याकडे दुर्लक्ष करता येत नव्हते सहसा, आपले मत तेथे मी ठेवायचोच .. आता ते सगळे गेले.. कोणाच्या पोस्ट नाही की काय नाही.. ना व्हाट्सअप ना आपले रिप्लाय.

शेअर मार्केट ची सुरुवात -

मग पुन्हा आपल्याला मिपा ची आठवण आली.. पण तोपर्यंत टीव्ही वरती न्युज मध्ये मार्केट आणि अर्थव्यवस्थेच्या कश्या चिंधड्या उडतायेत हे दिसायला लागले.. आणि शेअर मार्केट म्हणजे जुगार असे जे मी आपल्या मनात कीतीही कोरुन ठेवले होते तरी त्याकडेच वळण्याचा आपण निर्णय घेतला .. गेले वर्ष दोन वर्ष आपण एखादा बिझीनेस साईड बाय साईड करता येतोय का हे पाहत होतो, पण भांडवल नसले की तुमची स्वप्ने, स्वप्नातच झोपतात असे मला वाटायला लागले होते. अर्थशास्त्र, फायनान्स, शेअर मार्केट आणि त्याचे ज्ञान असल्या गोष्टींचे आपल्याला काय पण कळत नव्हते.. पण याकाळात आपण याचा खुप अभ्यास करण्याचे ठरवले आणि हाच आपला साईड बिझीनेस हे पण ठरवले. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जेंव्हा कधी रीटायर होईल तेंव्हा हा टाईमपास आपल्याला मस्त जमेल असे वाटायला लागले. ऑनलाईन कोर्स पण लावला, फंडामेंटल आणि टेक्निकल याचा चिक्कार अभ्यास केला.. आणि करतो आहे.. फंडामेंटली श्ट्राँग असलेल्या शेअर मध्ये पैसे गुंतवले, एका महिण्यात बरेच % वाढले तरी त्यातच लाँग टर्म टप्प्या ट्प्प्याने इन्वेस्टमेंट करायची हेच मनात ठरवले. पोझिशनल साठी वेगळे पैसे आणि टेक्निकल ग्राफ यांचा अभ्यास पण अलिकडे सुरु केला, शेअर मार्केट बद्दल लिहायला वेगळा धागाच लागेल त्यामुळे त्याच्याबद्दल बोलायचे थांबवतो, पण त्यामुळे रोज बिझीनेस न्युज , मार्केट इ. पाहणे , आपले ज्ञान वाढवणे चालुच होते आणि आहे....

आराध्या आणि आजोळ -

तरी कुठे तरी टाईम जात नव्हता.. लॉकडाऊन होण्या अगोदर ही पिंपरी चिंचवड ची परिस्थीती काही चांगली नव्हती, त्यात आमच्या घरातले गुडनाईट संपले आणि नविन गुडनाईट आणले तर घश्यात थोडे तोडू लागले.. एकतर करोना आणि ही काय ब्याद.. म्हणुन सरळ टेरेस वर मच्छरदानीमध्ये झोपण्याचा विचार केला(मच्छर कमी आहेत, पण आहेत).. मध्यमवर्गीय माणुस लय घाबरट असतो .. आणि असले रोग आले की त्याला आपल्याला पण तशीच तीच लक्षणे दिसतायेत काय असे उगाच वाटत राहते. करोना जवळपास नसला तरी घश्यात तोडण्याच्या ह्या कारणाने आणि घरात डांबून ठेवावे लागणार या मुळे मी आराध्याला ( माझी ६ वर्षांची मुलगी) तीच्या मामा च्या गावी सोडण्याचा निर्णय घेतला.. कारण आराध्या ला घरात अजिबात करमत नाही जास्त... बापावर गेली आहे दूसरे काही नाही.. काही नाही तर सायकल काढुन ती कॉलनीत चक्कर मारायची.. आणि शेवट पर्यंत जावून तिकडेच खेळत बसायची... लॉकडाउन होऊ शकते असे दिसत होते आणि म्हणुन, माझ्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न असला असता, आराध्या... कारण तीला मोबाईल आणि टीव्ही ची आवड नाही... सांगितले आहे ना बापावर गेली आहे :), तेव्हड्यात उरुळीचा आरोग्य खात्यातला आपल्या लहानपणीचा मित्र कामा निमित्त पुण्यात आला होता, सरळ आराध्याला घेवून मी उरळी कांचन मार्गे आलेगाव ला जावून आराध्या ला सोडवून आलो.
आराध्याचे आजोळ हे एकदम माझ्या आजोळ सारखेच आहे, शेताजवळ थोडीशी वस्ती, त्यांचीच थोडी घरे.. आणि तेथेच त्यांच्यातलीच खेळणारी मुले.. आराध्याला मस्त करमते तेथे.. सकाळी खेळायला गेल्यावर तीला बर्याचदा दुपारी जेवणासाठी ओढून आणावे लागते घरात, बर्याचदा ती कोणाकडे पण जेवते आणि तिकडेच खेळत बसते.. मागच्या वर्षीच घराचे कलरचे काम काढले होते तेंव्हा तीला तिकडे पहिल्यांदा एकटे ठेवले होते, आणि चक्क तीला आमच्याशी बोलायचे पण नसायचे, आम्ही इकडे बोलावू म्हणुन ती आमच्याशी फोनवर ही बोलत नसे.. मागच्या वेळेस तर ती तीच्या चुलत आज्जीकडे रात्री जेवायची, तिकडेच खेळायची आणी त्यांच्याच पोरांबाळांबरोबर त्यांच्याच शाळेत तिकडुनच परस्पर जायची ..
आपल्याला सासरी जाणे जास्त आवडत नाही.. वर्षात एकदा यात्रेला आणि कदाचीत एखादा दिवस दिवाळीच्या दरम्यान येव्हडेच काय ते जाणे, तरी मागच्या वेळेस दिवाळीला गेल्यावर मी चुलत असलेल्या त्यांच्या बाहुबंधांकडुन ऐकलेच, आम्ही जावईबापुंचा पाहुणचार नाही करु शकलो कधी पण त्यांच्या मुलीमुळे मात्र आम्हाला तो आनंद मिळाला... गाव ते गाव असते, मग ते कोकणातले असुद्या, पश्चिम महराष्ट्रातले असुद्या, मराठवाड्यातले असुद्या नाही तर विधर्भातले असुद्या, गाव आणि तेथील माणसे प्रेमळच असतात असा माझा अनुभव आहे.
त्यामुळे आराध्याला तिकडे न्हेले पाहिजे यासाठीच माझे प्राधान्य होते. नाही तर माझ्या लाडक्या मुलीने माझा खुप मार खाल्ला असता काय असेच वाटते.. आठवण येते पण पर्याय नाही.. त्यात कोणाचे, मुली बरोबर चित्रकला, डान्स असले पाहिले की मला आराध्याची आठवण येतेच .. पण तरीही त्या पेक्शा ती तिकडे मस्त खेळू शकते.. मोकळ्या हवेत बागडू शकते हे मला जास्त योग्य वाटते...

नेटफ्लिक्स, प्राइम आणि ट्रेक बद्दल -

आराध्या पण येथे नाही, शेअर मार्केट चा फंडामेंटल चा पण बराच सा अभ्यास झालेला आणि मग मला वाटले आपण त्याबरोबर नेटवरुन इतर काही तरी पहावे. आपल्याला टीव्ही आणि मोबाईलचे जास्त वेड नाही.. सिनेमे आवडतात पण ते थेटरला जाउन , टीव्हीवर आणि लॅपटॉप वर सिनेमे पाहणे आपल्याला कधीच आवडले नव्हते.. पण या कारणाने काही सिनेमे मी पहायचे राहिलो होतो, सीरीज बद्दल तर दुष्काळ होता, आपल्या त्याबद्दल काहीच माहीत नव्हते .
कंपणीत आजकाल नविन एक फॅड आलेले आहे, कँटीनला बसले टेबलावर, की कोणी तरी कुठल्यातरी पिक्चर चे किंवा कुठल्याश्या सिरीज चे बोलणे चालु करायचे आणि मग सगळी डोकी ते कसे ते पाहतात, आणि त्यात कसे हे दाखवले आहे, हे कसले भारी आहे, आणि हे असे पाहिजे होते असे आपले ज्ञान दाखवण्यात व्यस्त असतात.. आणि मग सहाजीकच ज्याला नेटफ्लिक्स म्हणजे नक्की काय ? अ‍ॅप आहे काय ? हा प्रश्न पडलेला असतो तो माझ्या सारखा माणुस त्यांच्यात मायनॉरीटी होतो.. काळाच्या बरोबर चालावे मान्य पण ते जे जे करतात ते ते च योग्य असे काही नसते, पण आपण त्या टेबलावरती तरी मागासलेलो असतो हे खरे आहे.
त्यात आपण कधीच game of thrones , FRIENDS, sacred games, big boss, kapil sharma show असले काही पाहिलेले नाही.. त्यामुळे तर या चर्चेतुन आपण बाद झालेलो असायचो. आपल्याला काय आवडायचे तर मनसोक्त क्रिकेट, राजकारण , हिस्टरी आणि अर्थातच ट्रेकिंग , सायकलींग आणि फिरणे.
सच्या बद्दल तर आपल्याला येव्हडे माहिती की सच्याच्या पिक्चर ला त्या मॅच मध्ये त्याने कीती रन केले होते, कसा शॉर्ट मारुन शतक केले होते हे सुद्धा आधीच आठवायचे. फिरण्याबद्दल, ट्रेकिंग बद्दल तर मी तासन तास बोलु शकतो, पण आजकाल आमच्या आयटीत कुठे तरी जावून आपण आपल्याला टॅग केले आहे ह्यालाच फिरणे म्हणतात, पावसाळ्यात तोकडे कपडे घालून सेल्फीच्या नादात मिरवणे, शांत वातावरणात मोठ्याने गाणी लावून कुठे तरी जाणे आणि रात्री ढोसत बसणे ह्यला यांचे सो कॉल्ड outing म्हणतात, आणि येथेही आपल्याला हे पटत नाही, पण ह्या बाबतीत आपल्याला ते मागासलेले वाटतात, त्यामुळे असे ट्रेकिंगचे , फिरण्याचे बोलताना ही आमचा संवाद निट नसतोच .. कारण ट्रेकींग ची मजा खर्‍या ट्रेकर्स लाच कळु शकते असल्या फोटोसाठी आणि फेसबुक वर स्टेट्स ठेवण्यासाठी जाणार्‍या लोकांना त्या मजेचा आनंद कधी माहीतच नसतो.
हा तर मुळ मुद्द्यावर येतो, आपण असल्या सिरीज , सिनेमे जास्त पाहिले नव्हते आणि आता वेळ होता, लॅपटॉप तर लॅपटॉप काय करणार आता असे म्हणुन वळालो. आणि लॅपटॉप टीव्हीला जोडला.अंधाधुन ह्या सिनेमाच्या अनेकदा चर्चा आपण टेबलावर ऐकल्या होत्या, आणि आपण तो सिनेमा थेटर्ला पाहिलेला नव्हता.. मग सर्च केले त्या बद्दल तर तो नेटफ्लिक्स ला होता.. आपल्याला तोपर्यंत नेतफ्लिक्स म्हणजे गाना.कॉम कसे आहे तसेच वाटत होते.

आणि मग सुरुवात झाली आपल्या नेटफ्लिक्स च्या दुनियेला ... नविन युजर साठी नेटफ्लिक्स ने ५ रुपये पहिला महिना दिला होता, आणि ५ रुपयेच असल्याने मी एक महिन्या साठी सब्सस्क्राईब केले नेट्फ्लिक्स , दिनांक होती २३ मार्च .. आणि म्हणतात ना अधाश्यासारखे पाहणे तसे आपण एका नंतर एक सिरीज आणि सिनेमे पाहतच गेलो .. त्या सर्वांबद्दल येथे लिहिल्यास एक नविन धागाच लिहायला लागेल त्यामुळे जास्त लिहित नाही.. पण एक महिन्या नंतर आता एक महिना फुकट प्राइम घेतले आहे. ज्यात जास्त आवड नाही त्यात पैसे कशाला घायलावयचे असे आपल्याला वाटले होते.. पुढे बघु काय होते ते..
पण काही चांगले सिनेमे आणि सिरीज ची येथे नावे देतो जी आपल्याला आवडली.. परिक्षण नाही देणार..
आपल्याला हिस्टरी आवडते, बायोपिक पण आवडतात, आणि सस्पेंस थ्रीलर पण आणि मध्ये मध्ये हलकीशी कॉमेडी त्यामुळे तश्याच गोष्टी आपण पाहिल्या.. त्यात दुसरी गोष्ट होती की आपल्याला इंग्रजी जास्त कळत नाही, कळत असली तरी लक्ष देवून ऐकुन निम्मे वरतीच जाते, हे असले थेर नको म्हणुन हिंदी मध्ये किंवा हिंदी डब असल्याच गोष्टी आपण पाहिल्या. फ्रेंड्स पाहिले तर तुझे इंग्रजी सुधारु शकते असे माझ्या एका मैत्रीणेने मला सांगितले होते , त्यामुळे तसा विचार आला मनात , पण माझे ठीक आहे माझ्या बायकोचे इंग्रजी सुधरवण्याची मोठी रिस्क किंवा जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेवू शकत नव्हतो म्हणुन मी इंग्रजी सुधरवण्याच्या नादाला लागलो नाही.

आपल्याला पाब्लो एस्कोबार ची NARCOS तर लय आवडली.. इतकी की तीचीच रिंगटोन मी मोबाईल ला ठेवली आहे, आपल्याला फोन वाजल्यावर कोलंबियात असल्याचाच फिल येतो .. भारी..
तर काही आवडलेल्या सिनेमे आणि सिरीज ची नावे देतो - NARCOS, Sacred games, The CROWN, SUITS, अंधाधुन, queen, cast away, dolemite, Out of africa, forrest gump, american beauty, पान सिंग तोमर , Parasite, The family man, दम लगाके हैश्या.. बाकी चालु आहेत अजुन..

आमरस आणि चहा बद्दल

आता वरच्या सगळ्या घटना चालू असल्या तरी सगळ्यांचे घरातले वातावरण कसे आहे हे वेगळे सांगायची काही गरज नाही.. आपले ही तसेच आहे. पण आमरस आपल्याला किती आवडतो हे तुम्हाला माहीती नाही. वल्ली सारखे जुने मिपा मित्र ते चांगले जाणुन आहेत.. ( हा त्याला वल्लीच बोलणार, प्रचतेस हे नाव आपल्याला ना कधी आवडले होते ना कधी आवडणार, आपलेपणा नाही त्या नावात ) घरात १०-१२ हापुस अंब्यांचा रस आपण एकटाच हाणतो .. दुर्वांकुर ला अनलिमिटेड आमरस मिळतो म्हणुन मार्च ला आमरस सुरु झाला का हो ? हा पहिला फोन कदाचीत आपलाच जात असेल त्यांना.
ह्या दुर्वांकुरची एक घटना आठवते , जाता जाता सांगतो, आमचे लग्न झाल्यावर दुर्वांकुर ला आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो, तिला एक वाटी रस बास झाला, आणि मी ४०. अशी माझ्याकडे पाहत होती की राक्षस आहेत की काय,पण खाताना लाजणे आपल्याला जमत नाही.. पुरणपोळीचा ही एक किस्सा आहे, पण विषयांतर थांबवतो.
कोकणातुन कोण कोण येणार आहे आणि आंबे कसे आणणार आहेत , का आपण जायचे कोकणात हे आधीच ठरले जायचे.
तर असा हा आमरस या वेळेस आपल्या नशिबात नाहीच काय असे वाटत आहे.. जीव व्याकुळ झालाय आमरस साठी.. आमरस खाल्ल्याने वजन वाढते असे ऐकले आहे म्हणुन डिसेंबर पासुनच आपण व्यायाम करायला लागायचो, या ही वेळेस करतोय, खास आमरस साठी, तेव्हडा तो प्रिय ...

चहा बद्दल तर काय बोलायचे ... जस एका तंबाखु खाणार्‍याला दुसर्‍या तंबाखु खाणार्‍याची गरज कळते, तसे अस्सल चहाप्रेमींना माझी काय अवस्था असेल हे वेगळे सांगावे लागु नये.. आता तुम्ही म्हणताल घ्यायचा करुन घरीच.. पण जी चव बाहेरच्या पिंपरीतल्या चहावाल्याची किंवा येवले चहाची आहे (कोणाला आवडत नाही, नसुद्या काही हरकत नाही. पण आपल्याला आवडतो ) ती चव आमच्या घरात शोधुन पण सापडत नाही.. बर ते जावुद्या.. रोज एक प्रकारे चहा व्हावा ना, प्रत्येक वेळेस वेगळी चव.. आज काय गोड, उद्या काय पांचट , परवा काय वेगळाच..
उरुळी ला होतो तेंव्हा आपण मस्त चहा करायचो, शिरुर ला पण, एक वर्षे स्वयंपाक पण केला आहे, आपला स्वयंपाक आणि चहा म्हणजे तोडच नव्हती.. शेवटी उठलो एकदा, बायकोला म्हणालो बास झाले आता मी दाखवतो तुला चहा कसा करायचा.. आणि किती पाणी ठेवायचे, ते उकळताना कीती चहा पावडर टाकायची किती उकळुन द्यायचे, किती साखर आणि किती दुध.. हे प्रमाण दाखवले .. असे दोन दिवस सेम चहा करुन दाखवल्या नंतर असाच- निदान सेम टेस्ट असावी अशी माफक अपेक्षा केली.. पण अपेक्षाभंग करणे हा बायकांचा जन्मसिद्ध हक्क आहे असे मला नेहमी वाटते.. त्यामुळे आपण आता घरात फक्त दोनच वेळा चहा पितो, लॉकडाऊन आधी तो १०-१२ वेळा तरी (बाहेर) होत असे.

घरातले रुटीन

चहा बद्दल तर झाले, पण इतर अनेक गोष्टी सांगाव्याश्या वाटतात.. आम्ही किती ही म्हंटले आम्ही ट्रेक करतो, सायकल चालवतो, तरी आमच्या देहयष्टी कडे पाहुन लोकांना ते कदाचीत खरे वाटत नाही.. बर असो, पण तरी वजन कमी नाही तर निदान वाढु नये म्हणुन आपण रोज सकाळी सुमारे ९ वाजता एक-दिड तास व्यायाम करतो, डंबेल्स नेमके माझ्याकडे नाहीत, म्हणुन विटाच वापरल्यात.. पण जास्त फरक जानवत नाही हे वेगळे सांगावे लागु नये.
संध्याकाळी जेवणाचे टाळून फक्त ३-४ अंड्यांवरतीच असतो.. दुपारी फुल जेवन असते,असल्या दिवसात डायटींग चे फॅड नको बाबा.. टेरेस असल्याने आणि मागे पुढे उंच घरे नसल्याने टेरेस वरती आपल्याला फिरायला मस्त वाटते, ६:३० ला जुन्या मोजक्याच असलेल्या मित्रांना फोन लावायचा आणि २-३ तास चालायचे मस्त.. वजन कशाला वाढतय मग ? आपलीच आपल्याशी अशी समजुत काढने प्रोत्साहनपर ठरते कधी कधी... रात्री टेरेस वर झोपणे म्हणजे काय मज्जा, मोकळ आकाश, तारे, गार वारे वा.. मज्जा काही ऑरच. तर घरात आपले एकदम रुटीन आहे, ९-१०.३० व्यायाम, ११-१२ ला जेवन , मग काम किंवा सिनेमा , संध्याकाळी फिरणे, रात्री टेरेस वर मच्छरदाणीत झोपणे, ह्या मच्छरदाणी मुळे तर एक शशक कथा आपल्याला जास्त कळाली .. मच्छरदाणीतील मुलीची.
दाढी आणि केस मात्र वाढले आहेत, लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन आपण ते कापलेच नाही.. कालच समोरच्या मावशी म्हणाल्या, आता भगवी कपडे घाल म्हणजे झाले.. एकदम शोभशील.
काही जन उगाच टक्कल करुन फोटो टाकतात आणि आय सपोर्ट लॉकडाऊन असले बोलतात, पण आपल्याला हे हस्यास्पद वाटते... लॉकडाऊन ला सपोर्ट आणि टक्कल करणे किंवा केस वाढवणे हे सांगणे ह्यात कसलाही संबंध वाटत नाही.. असो, पण लहानपणी ऐकले होते टक्कल करु नये.. म्हणुन तेंव्हाचे काही ऐकले असो वा नसो पण हे मात्र आपण कटाक्षाने टाळले आहे. आपला कलर मात्र घरात राहुनही उजाळला नाही, फोनवर उगाच मावस बहिन म्हणत होती आता घरात राहुन तरी जरा गोरा होशील, पण कसले काय आपला पर्मनंट कलर आहे आणि तो जाणार नाही.. उलट आपल्याला तर वाटते त्याला पॉलिश होत असावे तो आनखिनच चमकतो :) ...

घरातल्या भांडणाबद्दल आणखिन भांड्या ला भांडे लागु नये म्हणुन मी बोलण्याचे मुद्दामुन टाळतो, आपण इतके शांतताप्रिय आणि संमजस आहे हे दाखवण्याचा हा ही प्रयत्न येथे ही मी सोडणार नाही म्हणजे नाही.

मिपाबद्दल

तर वरती लिहिल्याप्रमाणे येव्हड्या गोष्टी झाल्या पण मिपावरती येण्याची मनातली इच्छा तशीच उत्कंठ होती.. एखादा फेरा सोडला तर बरेच दिवस मिपावर आलेलो नव्हतो. निवडणुकी अगोदर लिहिलेले काही धागे तसेच मागे होते.. त्यांना ही पुढे लिहायचे आहेच हे मनात होते.. पण ते धागे लिहिण्याचा हा टाईम नाही असे वाटले आणि गप्प झालो. नंतर सायकलच्या ट्रीप बद्दल लिहुच आता असे आपण ठरवले, बस झाले ते नेटफ्लिक्स बस झाल्या त्या न्युज असे म्हणुन मिपावर लॉगईन केले ..
आणि येथे दिसल्या शशक लिहिण्याच्या कथा, आपल्या साठी हे नविन होते.. म्हंटले चला बघु काय काय आहे आणि आपण पण लिहु पण एखादी कथा..

पण आपण कधी कथा लिहिलेल्या नाहीत. कविता लिहायचो कधी काळी, शब्दाला शब्द आता जोडता येत नाही असेच वाटते.. मला माहीती आहे मिपावर आल्यावर शब्दाला शब्द जोडता येत नसला तरी शब्दाला शब्द लावता येऊ शकतो, माझे मागचे धागे, रिप्लाय ही त्याचीच उदाहरणे आहेत.. पण आपल्यात भांडखोर पणा असला तरी आपण दुसर्‍यांच्या मतांचा नेहमी आदर करतो.. मते पटली नाही तरी निट बोलतो.. त्यामुळेच मिपा आपल्याला जवळचे वाटत जाते.. येथे अनेक जन जोडले गेले आहेत.
पण तरी ही प्रश्न उभा राहतो शुद्धलेखनाचा... हे आपले शुद्धलेखन शाळेत मार्क असताना सुधारले नाही तर आता ते सुधरावे अशी अपेक्षा का ठेवली जाते तेच कळत नाही.. गणितात आणि इतिहासात आपण टॉपर होतो पण मराठी,इंग्रजी आणि हिंदी ह्या बाबत न बोललेलेच बरे. बर आपण लिहिलेले ते मुद्दामुन अशुद्ध केलेले नसते , आपली भाषाच अशुद्ध आहे एकदम गावरान मेवा... हे कित्येकदा सांगुन झाले आहे. पण याही बाबतीत आम्ही मागास आहोत हे मान्य करुन पडती बाजु घेतो.

तरीही एक कथा लिहुन पाठवलीच. आणि पाठवल्यावर आपल्यालाच ती आवडली नाही. :) होते असे.. मग मी दुसरी दिलसे लिहिली.. जनु आपल्याच मनातली कथा.. आपल्याला ती लय आवडली.. इतर ही अनेक कथा येथे आहेत आपल्याला मनसोक्त रिप्लाय द्यायला लय आवडतात आपण ते त्यावर दिलेच.. आपण तर आपल्याच दूसर्‍या कथेला पण +१ देवून आलोय.. वरती आणण्या साठी नाही पण आपल्याच कथेतुन आपल्यालाच जास्त आनंद झाला असेल तर काय हरकत आहे ?, तसेही त्या कथेला ही जास्त रिप्लाय नसल्याने, ती काही विजेती होणार नाही हे पाहुन दिला रिप्लाय.. आपल्या कथेला पण त्रयस्थ पणे पाहताना छान वाटले.. आजच लॉकडाऊन या शशक कथेला ही रिप्लाय देवून आपल्याला लय मज्जा आली आहे, जवळ असल्यास त्यांच्याकडुन चहा घ्यावा म्हणतो..(दिला तर :) )

आणि पहिल्या सायकल च्या ट्रीपचे प्रवासवर्णन मी लिहायला घेणार इतक्यात सरपंचांचा मेसेज आल्याने, त्यांनी पुन्हा माझ्या सायकलवारीला आव्हान देत ह्या लॉकडाउन कथेची हाक दिली, आणि आम्ही ती इमाने इतबारे पुर्ण करण्यासाठी आज आपली बोटे किबोर्ड वर फिरवली...

नोट : इतर लॉकडाऊन धागे नक्की वाचेनच, पण येथे मुद्दामुन करोना, वर्क फ्रॉम होम, राजकारण टाळले आहे.. हे पाहिजे असेल तर न्युज चॅनेल आहेच त्यामुळे हे सोडुन जे आहे ते लिहिण्याचा प्रयत्न केला बस्स. आपल्याला जे सुचले ते लिहिले ही आपलीच कथा आहे, अगदी जशीच्या तशीच.. आणि अजुन तरी आपण ह्या लॉकडाऊन ला चहा आणि आमरस सोडुन इतर कशाला ही कंटाळलेलो नाही.. पुस्तकांच्या राज्यात लवकरच जातोय.. नंतर कधी तरी ...

---- गणेशा

प्रतिक्रिया

प्रामाणिकपणे केलेले अनुभवकथन आवडले.
तुला दुर्वांकुरमध्ये ४० वाट्या आमरस पिताना ह्याची देही ह्याची डोळा पाहिलं आहे. एकदा दुर्वांकूरला आमरस सुरू झालाय का नाही ह्याची खात्री नव्हती, तेव्हा फोन करून कसे विचारायचे आमरस आहे का हो म्हणून मनात द्वंद्व सुरू होते, तू मात्र फोन लावून बिनधास्त विचारलंस "ओ, आमरस सुरू झालाय का हो", पलीकडून "हो" असे उत्तर आल्यावर मात्र लगेच फोन ठेवून देऊन आपण तिकडे जाऊन मनसोक्त आमरस खाल्ला होता.

बाकी तुझ्या कथनात एक मात्र राहिलं, तुझी पाण्यात} डुंबण्याची आवड. सांदण दरीतल्या पाण्याच्या दुसऱ्या मोठ्या टप्प्यावर तू आधी घाबरला होतास पण नंतर अगदी मज्जेत कित्येक वेळ डुंबत राहिलास. कोरिगडाच्या पायऱ्यांवरून वेगात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात तू मस्तपैकी लोळत राहिलेला अजूनही डोळ्यासमोर येतो आहे.

बाकी हे लॉकडाऊन उठल्यावर अवश्य भेटूच.

माझे रिप्लाय दिसत नाहीत error येतोय.

तुम्हाला असे error येतात का कोणाला

क्वचित येतो, लिहून कॉपी करून ठेव आणि मग दे, स्मायल्या असतील तर काढून टाक.

सकाळी तुला रिप्लाय लिहिला.. पण error आला मेसेज पण गेला..
पुन्हा लिहिताना मात्र आधीचा रिप्लाय लिहिल असे वाटत नाही..
असो...

प्रिय मित्रा,
पहिल्यांदा एक सांगतो, मिपावर तुझ्या सारखे मित्र आणि ते पण कायम मिळणे हे इतर कश्या पेक्षाही आपल्याला जास्त मोलाचे वाटते... तू आपल्या मिपावरील पहिल्या काही मित्रांपैकी एक..
कोरीगडाचे बोलला म्हणून सांगतो, किसना पण आपला मित्र आहे, आपल्याला तो पण पहिल्या पासून आवडतो..आपल्या सारखाच साधा सरळ... पण आजकाल तो आपल्याला पार विसरून गेला आहे.., त्याची पहिली भेट कोरीगडावरच झाली होती.

पाण्याबद्दल लिहितो, पण ते लॉकडाऊन ला धरून नसल्याने नव्हते लिहिले.. असे असंख्य विषय लिहायला लागल्यावर, हा धागा मॅरॅथॉन ला पण लाजवेल, आणि आपण म्हणजे खुली किताब असा मॅरॅथॉन धागा वाचकाला वाचता वाचताच दम लावेल म्हणून अश्या असंख्य गोष्टी आपण त्यांच्या काळजी पोटी टाळल्या. (तरी आपला धागा मिनी मॅरॅथॉनच झालेला आहे)

पाण्याबद्दल

हो पाणी आपल्याला लय आवडतं, पाण्यात डुंबायला तर लय आवडतं..
कोरीगडावर पायऱ्यांवरुन वाहणाऱ्या पाण्यात आपण लय लोळलो होतो, तो दिवस मी विसरणार नाय, तो दिवस होता 11 जून 2011.
10 जून आपला वाढदिवस, आपला जन्मच पावसातला.. 12 जून ला पहिल्यांदा आपल्याला मुलगी बघायला जायचे होते.. त्यामुळे 11 जून आपल्या लक्षात आहे.
त्या 12 जून पासून ज्या संकटाशी आपण सामना करतोय, त्याच्या आधीचा हा स्वतंत्र असलेला आपला शेवटचा दिवस

सांदण दरी ला गेलो होतो तेंव्हा जमिनीच्या पोटात गेल्यावरच आपल्याला लय भारी वाटले होते.. पहिल्यांदा थोडे घाबरलो, कारण आपल्याला तेंव्हा पोहता येत नव्हतं.. पण नंतर व्वा..
आताच हरिहर किल्ला केला, वरतुनच तळं दिसतंय का पाह्यल आणि सरळ पोहायला..
पोहण्याचं तुला माहितीच नाही.. आपण नंतर पोहायला शिकलो.. त्याची एक नवीनच कहाणी आहे..
सांगेन..

प्रचेतस's picture

30 Apr 2020 - 8:43 am | प्रचेतस

__/\__

कोरीगड ट्रेक हा मिपाकरांचा बहुधा पहिलाच ट्रेक होता. खूप मजा आली होती तेव्हा. परत जाऊच आता ह्या पावसकाळात.

चौथा कोनाडा's picture

26 Apr 2020 - 11:53 am | चौथा कोनाडा

मस्त लिहिलंय !
आराध्या आणि आजोळ बद्दल लिहिलेलं सर्वात जास्त आवडलं.

आराध्याचे आजोळ हे एकदम माझ्या आजोळ सारखेच आहे, शेताजवळ थोडीशी वस्ती, त्यांचीच थोडी घरे.. आणि तेथेच त्यांच्यातलीच खेळणारी मुले.. आराध्याला मस्त करमते तेथे.. सकाळी खेळायला गेल्यावर तीला बर्याचदा दुपारी जेवणासाठी ओढून आणावे लागते घरात, बर्याचदा ती कोणाकडे पण जेवते आणि तिकडेच खेळत बसते.. मागच्या वर्षीच घराचे कलरचे काम काढले होते तेंव्हा तीला तिकडे पहिल्यांदा एकटे ठेवले होते, आणि चक्क तीला आमच्याशी बोलायचे पण नसायचे, आम्ही इकडे बोलावू म्हणुन ती आमच्याशी फोनवर ही बोलत नसे.. मागच्या वेळेस तर ती तीच्या चुलत आज्जीकडे रात्री जेवायची, तिकडेच खेळायची आणी त्यांच्याच पोरांबाळांबरोबर त्यांच्याच शाळेत तिकडुनच परस्पर जायची ..

आयुष्यातील बालपणीच्या सुंदर आठवणींचा ठेवा तुम्ही बहाल केलाय तिला. ती मोठी होऊन स्पर्धा, दगदग यात गुरफटून गेल्यावर या क्षणांच्या आठवणी हा तिचा स्वर्ग असेल नक्कीच !
आमचं बालपण अश्या क्षणांना मुकलं हा सल नेहमी जाणवतो !

सतिश गावडे's picture

26 Apr 2020 - 11:58 am | सतिश गावडे

मनमोकळं प्रकटन आवडलं गणेशा. तू फोटो न टाकल्यामुळे "माझा गणेशा झाला" असं म्हणण्याची संधी हुकली.

शेअर मार्केट ची सुरुवात -

पायथॉन नावाचं शस्त्र वापरुन मार्केटमध्ये पुढे कधीतरी उतरायचं हे स्वप्न आहे.

बाकी हे लॉकडाऊन उठल्यावर अवश्य भेटूच.

हेच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2020 - 2:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वप्रथम पुन्हा एकदा लॉकडाऊन मालिकेतलं आपलंही प्रामाणिक कथन आवडल. मिपावर जसा वेळ मिळेल तसे येत चला. लग्नानंतर आपलं मिपा कमी होणं समजू शकतो पण नंतर आयुष्यात मिपा लागतंच. ते एक व्यसन होऊन जातो, आम्ही काही लोक मिपा व्यसनी झालो आहोत. बाकी ते मिपावरील वल्लीला प्रचेतस म्हणने मलाही जमत नाही.

बाकी शेयरमार्केटचं काही लिहित चला. कशात स्कोप वाटतो वगैरे. फायदा नुकसानीला आम्ही आमचे जवाबदार असू. ;) बाकी, ते इंग्रजी सिनेमे असतील तर अजून सांगा. कुठे तरी अडकले आणि सुटले. अशा टाईपचे असल्यास प्राधान्य. घट्ट मिठ्या आणि चुंबनदृश्य कमी असली पाहिजेत असे सिनेमे सांगा. लहान लेकरांचा आजूबाजूला वावर असतो. आपल्या आवडी निवडींना दूर ठेवावे लागते अशा वेळी.

आत्ताच मा. उद्धव ठा़करें साहेबांचं जनतेशी संवाद पाहात होतो तो माणूस आवडायला लागलाय. अभिनिवेश नसतो. फारच आपला माणूस बोलतोय असे वाटते. बाकी, सरकारी यंत्रणा जे काय काम करायचे ते करेलच. पण एक आश्वासक बोलणं असतं. आवडतं. मा.शेठ सारखं अभिनय नसतो. बाकी येत चला. आम्ही मिपावर पडीक आहोतच.

-दिलीप बिरुटे

गणेशा's picture

26 Apr 2020 - 10:18 pm | गणेशा

धन्यवाद...
Forrest gump नुकताच बघितला, netflix ला आहे.. आवडला..
The crown series चे पहिले 2 season भारी आहेत

शेअर मार्केट चे आधी पण धागे होते ना?
जमल्यास सुरु करतो लवकर, पण खूप लिहायचे राहिले आहे..
2013 नंतर तर खूप फिरलो तेंव्हा पासून लिहायचे राहिले सगळे.
सायकलिंग सुरु केले त्याचे लिहावे म्हनतॊ आहे..

बाकी इतर रिप्लाय ला निवांत रिप्लाय देतो, खास करून वल्ली च्या डुंबण्याचे लिहितो नंतर..

गणेशा's picture

29 Apr 2020 - 1:29 pm | गणेशा

सर,

कालच कारवा सिनेमा पाहिला खूप आवडला, येथे तुम्हाला सांगायला आलो होतो, पण तुम्ही english सिनेमे विचारल्याने लिहिले नव्हते..

पण आज इरफान गेला.. मनापासून वाईट वाटले.. त्यामुळे हा
Kaarvan सिनेमा suggest करायला आलो.. चांगला आहे..

संजय क्षीरसागर's picture

26 Apr 2020 - 2:57 pm | संजय क्षीरसागर

मुलीला आजोळी पाठवायचा निर्णय एकदम योग्य आहे.

चारपाच कथानकं आवडली त्यात तुमचे वाढवले आहे.
प्रांजळ.
बाकी आमरसाची वाटी केवढी (मोठी) असते दुर्वांकुरात?

घरच्या वाटीपेक्षा अंमळ कमी.

मस्त खुशखुशीत लिहिलेय! मजा आली वाचायला!! काही पंचेस तर जबरी &#129315

४० वाट्या &#128563

ज्योति अळवणी's picture

26 Apr 2020 - 5:14 pm | ज्योति अळवणी

तुमचं लेखन आवडलं. आराध्याला आजोळी पोहोचवलत ते बरं झालं.खरंच मुलं कंटाळतात. अर्थात माझ्या लेकी खूपच मोठ्या (23 आणि 21) वर्षांच्या असल्याने त्यांना मी कुठे पाठवणार? पण इतक्या मोठ्या मुलांचं आपलंच असं जग असतंच न. इतकं की आता आम्ही दोघे घरात बऱ्यापैकी असूनही त्यांना आमच्यासाठी वेळ काढावा लागतो.

बाकी गच्चीची मजा काही औरच असते हे नक्की. लॉक डाऊनमध्ये मला whatsapp च status नामक खेळणं मिळालंय. आणि माझ्याच गच्चीवरचे वेगवेगळ्या वेळचे 8/10 सेकंदांचे विडिओ करून मी गच्ची एन्जॉय करते आहे.

गणेशा's picture

27 Apr 2020 - 11:28 am | गणेशा

ज्योती ताई धन्यवाद...
तुम्हाला ज्योती ताई म्हणताना सहज जुन्या पैसा (ज्योती कामत) यांची आठवण झाली..

तर हा, मोठ्या मुलांचे वेगळे विश्व असते.. माझा अजून त्याबद्दल अनुभव शून्य असला.. तरी स्वतःवरून ठरवू शकतो. त्यांचे जग वेगळेच असेल.जुन्याकाळात घरच्यां बद्दल आदर होताच पण आदर युक्त भीती पण..
त्यामुळे आराध्या च्या बाबतीत आपण एकदम प्रत्येक क्षण ण क्षण जगून घेतो, उद्याचे विश्व् कसे असेल ते कोणी सांगितले? आदर युक्त भीती ऐवजी आपली दिलखुलास मैत्री व्हावी तिच्या बरोबर असे वाटते..

मुली बद्दल म्हंटल्यावर थोडेसे अवांतर करतो, वरच्या लेखाच्याच प्रमाणे लिहितो म्हणजे नंतर add करतो स्वतः पुरते...

अवांतर :

Swimming, चित्रकला, running, सायकलिंग या बाबतीत तर आराध्या बरोबर चा आपला प्रत्येक क्षण मस्तच एकदम, जणू तीच आपली सोनेरी क्षणांची शिदोरी..
सोप्पे Trekking ती आणि आपण एकत्र करतो अगदी ती 3 वर्षाची असल्या पासून.. तिकोना, लोहगड, रायगड, राजमाची क्या कहाना..
आपली पुढची ट्रेक पार्टनर तीच आहे.. तिला पण आपल्या बरोबर स्विमिंग आणि trekking खूप आवडते..

आपल्याला तीला वेळ द्यायला खूप आवडतं. आपला शनिवार रविवार मधला एक दिवस खास तिच्यासाठी असतो, मग ते घरात क्रिकेट किंवा इतर खेळ असुद्या किंवा बाहेर trekking किंवा running वा sketting असुद्या..

आपण कदाचीत स्वार्थी विचार करतो कि आज आपण तीला टाइम देऊ उद्या ती मोठी झाल्यावर आपल्याला टाइम देईल.. पण असे असलं तरी यामुळे आपल्याला आपले बालपण पुन्हा जगता येतय.. आणि ह्या बद्दल आपण खूष आहे...

उद्याच्या जग वेगळ असणार आहे... पण आजचं जग तर आपल आहे आणि आपल्याला आज जगण्यात जास्त स्वारस्य आहे.. बस्स

भारी लिहिलं आहे. अगदी मनमोकळं, आवडलं.

चांदणे संदीप's picture

27 Apr 2020 - 1:15 pm | चांदणे संदीप

माझ्या मोठ्या लेकीला तिच्या आजी आजोबांकडे ठेवले आहे. तुमचे लेखन वाचून तिची आठवण आधिक तीव्र झाली.

वल्ली नावाबद्दल बाडीस! :)

ब्रेकिंग बॅड आणि लॉस्ट बघा असे सुचवतो. मला ज्याम आवडतात त्या सिरीज!

लिहित रहा.

सं - दी - प

टर्मीनेटर's picture

28 Apr 2020 - 11:22 am | टर्मीनेटर

लेख आवडला!

दाढी आणि केस मात्र वाढले आहेत, लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन आपण ते कापलेच नाही.. कालच समोरच्या मावशी म्हणाल्या, आता भगवी कपडे घाल म्हणजे झाले.. एकदम शोभशील.

माझेही असेच झालंय .. दाढी कशीतरी घरी करायला जमतंय पण जर हे लॉकडाउन लवकर संपले नाही तर केस कापून घेता नं आल्याने लवकरच खालील फोटो मधल्या तामीळ विनोदी अभिनेता 'योगी बाबू' प्रमाणे हेअर स्टाइल केल्या सारखा दिसायला लगीन 😜

Nitin Palkar's picture

28 Apr 2020 - 12:46 pm | Nitin Palkar

खूपच मनमोकळ नितळ लेखन. आवडलं...

गणेशा's picture

28 Apr 2020 - 3:21 pm | गणेशा

@ टर्मीनेटर ,

हा हा , माझे पण असेच झाले आहे, स्वताचा फोटो देण्याचे टाळतो.

@ ऑल,
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार ..

माझीही शॅम्पेन's picture

28 Apr 2020 - 3:49 pm | माझीही शॅम्पेन

आज पैजार बुवा आणि माझी शँपेन यांचे धागे वरती होते, पळवत वाचले... चांगले होते एकदम.. मस्त, आवडले

कौतुकाबद्दल आभारी आहे गणेशा :)

धागा म्हणजे एकदम मुक्तचिंतन (मुक्तपीठ नाही :) ) ओघवता लेख , ह्या लॉक डाऊनने मानवजातीला बराच काही शिकवलं आहे

मानव जातील खरेच खुप शिकवले हे नक्की..

मला मात्र ह्या लिखाणाच्या दुनियेत पुन्हा आणले..
हाच धागा जो माझा टर्निग पॉईंट ठरला..

धन्यवाद वल्ली आणि सरपंच...

कुमार१'s picture

30 Apr 2020 - 9:41 am | कुमार१

मनमोकळं प्रकटन आवडलं.
शुभेच्छा.