रतनगड ते हरिश्चंद्रगड

नमिता श्रीकांत दामले's picture
नमिता श्रीकांत दामले in भटकंती
25 Apr 2020 - 4:57 pm

रतनगड ते हरिश्चंद्रगड (१/११/२०१९ ते २/११/२०१९)

फोटोसहित लेख या लिंकवर बघा -
https://www.blogger.com/blogger.g?blogID=6920222328094762649#editor/targ...
ठाण्याच्या फलाट क्र.५ वर मी आणि केतकी ११.३४ ची कसारा गाडी पकडायला उभ्या होतो. मन मात्र सामरदला जाऊन पोहोचले होते. सामरदहून पहाटे उठून सांधण दऱ्याला जाताना बघितलेल्या डोंगररांगा खुणावत होत्या. रतगडावरुन त्रिंबक दरवाज्याकडून पायऱ्या उतरुन गेल्यावर दिसणारी अपार खोली आठवत होती. तुटलेल्या पायऱ्या बघून ही वाट कशी असेल अशी दाटून आलेली भीतीमय उत्सुकताही अजून चेपली नव्हती आणि श्रीकांतबरोबर पहिल्यांदा रतनगडाला जाताना मोकळवनात कात्राबाईच्या दिशेनी बाण दाखवणारी

हरिश्चंद्रगडाकडे ही पाटी बघत या वाटेनी कधीतरी जाऊ या, अशी मनाशी बांधलेली खूणगाठ स्मरत होती. सोनकीनी फुललेले सोनेरी डोंगर बघायला मिळतील का खरंच? मागच्या डिसेंबरमध्ये आलो होतो तेंव्हा थंडीची आणि कॅम्पिंगची गंमत होती.

पाऊस आता गेला असे वाटत असतानाच शुक्रवारी रात्री स्टेशनला जाताना भुरुभुरु पाऊस पडत होता. ठाण्याला गाडीत बरीच गर्दी होती. खरं तर गाडीत मस्त झोप काढू या असे ठरवले होते. पण केतकी पहिल्यांदच आमच्याबरोबर ट्रेकला येत होती त्यामुळे आमच्या गप्पांमध्ये एक - एक स्टेशन कधी मागे पडले ते कळलेच नाही. गाडी भराभर मोकळी होत गेली. आणि आमच्या डब्यात आसनगांवनंतर

आम्ही दोघी आणि दोन पोलीस फक्त उरलो. २२ वर्षांची केतकी सीए होऊन आता युपीएस्सीची तयारी करत होती. तिची ट्रेकिंगची आवड मात्र खास आहे, म्हणूनच अभ्यासातून मुद्दाम वेळ काढून, सॕक भरुन ट्रेकला निघाली होती. कसाऱ्याला मधु आणि शेखर भेटले. सांधणला जाताना कसारा स्टेशनमधून बाहेर पडून, यार्डात उभ्या असलेल्या ३-४ गाड्या उड्या मारत ओलांडून रस्त्यावर जाऊन जीप पकडली होती.आज मात्र खाली उतरुन जिन्यानी गेलो. आम्हाला घ्यायला इंडिगो गाडी आली होती. ती बघून चक्र हातात घ्यावेसे वाटत होते. पण मुकाटयाने मागच्या सीटवर जाऊन बसले. कसारा घाटातल्या शेवटच्या बाबा दा ढाब्यावर गाडी थांबली. गाडी चालवायची नसल्यामुळे झोप काढायची होती. म्हणून आल्याचा कडक चहा पिण्याचा मोह टाळला. गाडीत इंधन आणि चौघांचा सेल्फी झाल्यावर सुसाट निघालेली गाडी इगतपुरीच्या टोलनाक्यानंतरच्या भावली धरणाच्या रस्त्याला उजवीकडे वळली. बाबा दा ढाबा, हा रस्ता, हा रात्रीचा प्रवास एका वेगळ्या जगात माझ्या जिवाभावाच्या संवंगड्यांसोबत घेऊन जातो डोळे मिटून शांत बसावे तर कधी मध्येच काही बोलावे. रस्ता खूपच चांगला होता. गडद काळोख, धुके, पाऊस.... रस्त्यावर अगदी अंधुक दिसत होते.

पहाटे पाचच्या सुमारास सामरद आले. मारुतीच्या मंदिरात पथा-‌‌‌‌‌या पसरुन दोन तास आराम केला. साडेसातला लख्ख उजाडले होते. डोंगररांगा ढगांशी पाठशिवणीचा खेळ ख़ेळत होत्या. हातपंपावरुन पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या. एका घरात जाग दिसत होती. त्यांनी आम्हाला फक्कड चहाही करुन दिला. वाटेत एका दगडावर बसून न्याहरी केली आणि साडेआठला स्वाऱ्या रतनगडाकडे रवाना झाल्या .

नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही थंडीमुळे नाही तर ढगाळ हवेमुळे वातावरणात थंडावा होता. आज लांबचा पल्ला गाठायचा होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगाने वाटचाल करत एक-एक टप्पा पार केला. हळुहळू आकाश स्वच्छ होऊन अलंग-कुलंग-मदन , अजापर्वत, औंढा, पट्टा, पाबरगड, कळसूबाई सारे सचैल स्नान झाल्याने प्रसन्न दिसू लागले. डोंगरांमध्ये कुठे तरी जलधाराही अजून कोसळत होत्या. रतनगडाचा खुटा आमची सोबत करत होता. वाटेत मागे वळून बघितले तर आयतासारख्या आकाराचा बाणचा सुळका खोलातून मान

उंचावून उभा होता. हल्लीच झालेल्या पावसामुळे वाटेत बरेच दगड घरंगळून आले होते. अवघड ठिकाणी लावलेल्या शिड्याही धरणीवर शांत पहुडल्या होत्या. चकली, लाडू, मोहनथाळ, सुकमेवा, खजूर असा खाऊ खात साधारण तीन तासात किल्ल्याच्या नेढ्याला पोहोचलो. नेढ्याकडून माहुली, नवरा-नवरी- वराडे हेही स्वच्छ दिसत होते. खुट्याला जवळून न्याहळत उंच वाढलेल्या गवतातून वाट काढत प्रवरेच्या उगमाच्या कुंडाकडे गेलो. कुंडातील थंड आणि गोड पाणी पिऊन तृप्त झालो. बुरुजावरुन टेहळणी करुन गणेशाचे दर्शन

घेऊन मुख्य दरवाजातून प्रवेश करुन रत्नाई देवीला हात जोडले. गुहेकडे नातूझडे मामा भेटले. किशोरीची आठवण काढत लिंबू सरबताचा मोह टाळला. आता किल्ला उतरु लागलो. या वाटेकडच्या शिड्या मात्र सुस्थितीत आहेत. त्या मोकळवनात पोहचायला अंमळ उशीरच झाला. भूकही लागली होती. एका चौथऱ्यावर शिवराममामांनी छोटेसे दुकान थाटले आहे. तिथे बसून कोबी पराठे. तिखटमिठाच्या पोळ्या, मेथी ठेपले, जॕम, काकडी असा सगळ्या

पदार्थांवर ताव मारला. कात्राबाईची खिंड पार करुन कुमशेत आणि जमलं तर पलीकडे पाचनई गाठण्याचा आमचा मानस होता. शिवराममामा खिंडीपर्यंत सोडायला यायला तयार झाले. यांना शंभू महादेवानी स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला म्हणून ते चपला घालत नाहीत. हातात एक काठी घेऊन मामा सज्ज झाले. डोंगर रांगेला घट्ट धरुन सरळ जायचे इतके सोपे होते. पण वाटेत सगळीकडे कारव्ही उंच वाढली होती.सुरुवातीलाच दोन वाटा लागतात. डावीकडची रतनवाडीकडे जाणारी वाट स्पष्ट दिसत होती. पण उजवीकडे कात्राबाईकडे चढणारी पायवाट मात्र कारवीनी पूर्ण झाकलेली होती. इथे वाट चुकण्याची दाट शक्यता होती. सव्वा दोन वाजता चालायला सुरुवात केली तेंव्हा डोळ्यावर प्रचंड झापड येत होती. पण मामांच्या मागे पटापट पावले टाकत झपाझप चाललो होतो. कात्राबाईच्या खिंडीत पोहोचलो. हात जोडून देवीचे दर्शन घेतले. मामांना निरोप देऊन कुमशेतकडे चालू लागलो. वाटेत डोंगरातून येणारे थंडगार पाण्याचे झरे लागले. हे पाणी पिऊन व तोंडावर मारुन तजेला आला.

मग दगडावर बसून थोडा फराळ केला आणि अंधार पडायच्या आत पुढे निघालो. संध्याकाळचे पावणे सात वाजले होते. कुमशेतपर्यंत जायला चांगली मळलेली पायवाट होती, हे मधूला माहीत होते. त्यामुळे आम्ही बिनधास्त होतो.अंधार झाल्यावर विजेऱ्या सुरु केल्या आणि एकमेकांच्या वेगाशी जुळवून घेत एकत्रच जावे असा ठराव झाला. वाटेवरच्या शेतातली माणसे काम संपवून खोपटाकडे परतत होती. अशाच एकुटवाण्या खोपटातले दादा आता अंधारात एवढे पुढे जाऊ नका, आजची इथेच रहा असा प्रेमळ आग्रह करत होते. नेटवर्क नसल्यामुळे पाचनईतल्या भास्करचा फोन लागत नव्हता. त्यामुळे उद्या पाचनईवरुन परतीची सोय कशी होईल ते कळत नव्हते. वाडी संपून कुमशेत आले. साडेसात वाजले होते तरी अजून पुढे जाऊन नऊपर्यंत पेठाची वाडी गाठता येईल असे वाटत होते. कारण त्यामुळे उद्याचा वेळ वाचणार होता. पेठाच्या वाडीपुढे डांबरी रस्ता नसल्यामुळे वाहनाची सोय नव्हती. पुढची वाटही अवघड होती. नदी, ओढा पार करायचा होता. पुढे मजल मारायचा प्रयत्न करत, वाट शोधत काहीशा द्विधा मनःस्थितीत आठ-साडेआठ पर्यंत चालणे सुरु ठेवले. पण असे लक्षात आले कीअंधारात वाट शोधत चाचपडण्यापेक्षा आज कुमशेतलाच राहावे. कुमशेतमध्येही १-२ जणांनी तसेच सुचविले होते. मग कुमशेतला एका घरी मुक्काम केला. त्यांनी बैठकीच्या खोलीत आम्हाला चटया घालून दिल्या आणि वाफाळता चहा दिला. त्या बिनदुधाच्या चहानीही थोडी तरतरी आली. मग थोडे स्ट्रेचिंग केले आणि स्वयंपाक होईपर्यंत आराम केला. मग गरमागरम जेवून गुडुप्प झोपलो. रविवारी पहाटे साडेपाचला उठून पटापट आटपले आणि सहाला चालायला सुरुवात केली. आमचे घरमालकही न रेंगाळता रस्ता दाखवायला निघाले. १५-२० मिनिटात त्यांनी आम्हाला वाटेला लावून दिले आणि पुढच्या वाटेच्या, वळणांच्या खाणा-खुणा सांगितल्या. पाइपलाइनला धरुन जा म्हणजे गावात जाल हे आम्ही लक्षात ठेवले.

सोनपिवळी भातशेते डोलत होती. मागच्या वर्षीच्या कुंजर-कलाड- भैरव ट्रेकच्या आठवणी येत होत्या. शेताच्या बांधा-बांधानी चालताना स्वच्छ हवेत श्वास भरुन घेत मजेत चाललो होतो. दवबिंदूंनी शेते न्हायली होती. अस्वलखिंडीच्या ट्रेकमध्येही सकाळी गवतावर चमचमणारे दवबिंदू मनावर अनोखी जादू करत होते. वाऱ्यावर डोलणाऱ्या शेतांच्या लहरीमध्ये आपणही गुंग होऊन जावे अशी मनाला भुरळ पडत होती. हवेत सुखद गारवा होता. या सगळ्या गमती-जमतीमध्ये आम्ही वाट सोडून पुढे गेलो. मग थोडे मागे फिरल्यावर मधुला ओढ्याच्या पलीकडचा खुणेचा पाइप दिसला. आणि पुन्हा ओढा पार करुन आम्ही पेठाच्या वाडीकडे झपाझप निघालो. आठ वाजून दहा मिनिटे झाली होती पण आठला सुटणारी जीप अजून उभी असलेली बघून हायसे वाटले. जीपवाल्या दादांना हुडकून काढले. ते आम्हाला आत्ता पाचनईला आणि दुपारी पाचनईहून राजूरला सोडायलाही तयार झाले.आम्ही मुकाट्याने सीटवर जाऊन बसलो होतो. मधुला मागे शिडी लावलेली बघून टपावर जाऊन बसायची लहर आली. मधु व केतकी शिडीवरून टपावर जाऊन बसले. ती गाडीच्या टपावरून प्रवास करण्याची मजा मी पावनखिंडीला मनसोक्त अनुभवली आहे. पण आज मला सौरकुंडी पासचा ट्रेक झाल्यावर आम्ही दहा - पंधरा जण फिरायला गेलो होतो आणि त्यावेळी कंडक्टरकडे लहान मुलांसारखा हट्ट करून उन्हामध्ये टपावर जाऊन बसलो होतो; त्याची मजा आठवली. हिमाचल परिवहन ची मोठी बस वळणा-वळणाच्या रस्त्यावर वाट काढत चालली होती. आमची टपावर धमाल चालली होती. आणि १५-२० मिनिटात बस कंडक्टरनी आम्हाला मुकाट्यानी खाली यायला लावले होते. कारणआम्ही खाली आलो नसतो तर ट्रॕफिक पोलिसांनी बस अडवली असती.

पेठाची वाडी ते पाचनई रस्ता मागच्या वेळपेक्षा जरा ठीक वाटला. सियाझला ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळे या रस्त्यावर गाडीतल्या सगळ्यांना खाली उतरून चालावे लागले होते . पाचनईमध्ये भास्करच्या अंगणात गाडी थांबली. पाण्याच्या बाटल्या, खाऊ इत्यादी बरोबर घेऊन भास्करकडे फक्कड चहा घेतला; आजच्या दिवसातला पहिला चहा. चटकदार लिंबू-मिरची, पराठे, ठेपले, मोहनथाळ इ. खाऊन घेतले. पहाटेपासून लवकर उठल्यामुळे भूकही सडकून लागली होती. दुपारी तीन - चार वाजता येतो असे सांगून भास्करचे अंगण सोडले आणि गडाच्या दिशेने आगेकूच सुरू केले. नळीची वाट आणि टोलार खिंडीची वाट; हरिश्चंद्रगडाकडे जातानाच्या अनेक आठवणी होत्या. महाशिवरात्रीची गर्दी, नळीच्या वाटेवरचा थरार, बेल पाड्यातील ती रात्र, पहाटे उगवलेली शुक्राची चांदणी, कोकणकड्याचे रौद्र रूप, कोकण कड्यावरचा झंजावाती वारा आणि काय - काय ... पाचनईकडची वाट तुलनेने सोपी होती. सौम्य चढ माफक, सावली आणि हवा तर कमाल होती. डोंगरात धबधबे पडत होते. लोक त्यात मौज करत होते. कोणी नविन ट्रेकर्स अनुभवी लोकांच्या मदतीने कठीण वाटणारे टप्पे पार करत होते.अधून-मधून लिमलेटच्या गोळ्या तोंडात टाकत आम्ही हळूहळू वर पोहोचलो.

वरच्या ओढ्यावर बागेत असतो तसला एक छोटासा पूल झालेला दिसला. मग त्या पुलावर थोडे फोटो काढले. धबधब्याकडे पाय वळत होते पण तिकडे परतताना जाऊ असा विचार केला. पुलावरून पटापट देवळाकडे पोहोचलो. देवळासमोरच्या पठारावर कॅम्पिंग केले होते. देवळासमोर मोठी पुष्करणी आहे त्या पुष्करणीच्या बाजूच्या भिंतीमध्ये अनेक कोनाडे आहेत. त्या प्रत्येक कोनाड्यात विष्णूची एक - एक मूर्ती होती. त्या मूर्ती आता देवळासमोरच्या आवारात नेऊन ठेवल्या आहेत, अशी माहिती मधुनी दिली. केदारेश्वराचे आठव्या शतकामधील हे मंदिर, अमृतेश्वराचे मंदिर आणि जळगावच्या पुढचे झोडगे मधील शंकराचे मंदिर यांच्या बांधणी मध्ये खूपच साम्य आहे. हरिश्चंद्रगडाला फार प्राचीन इतिहास आहे. वाघावर बसून ज्ञानदेवांना भेटायला आलेल्या चांगदेवांचे गडावर वास्तव्य होते. तसेच राजा हरिश्चंद्रही तपाचरण करण्यासाठी गडावर वास्तव्यास होता. एक राक्षस होता त्याच्या तपश्चर्येनी शंकर प्रसन्न झाले. आणि त्यांनी त्याला वर दिला की तो काहीही खाऊ शकतो; तो काहीही म्हणजे काही वेळा स्वतःच्या शरीराचे भागही खात असे. या राक्षसाच्या शिराच्या मूर्ती मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आहेत. बहुतेक शंकरांच्या मंदिरांमध्ये या राक्षसाच्या मूर्ती असतात. गडावर बरीच गर्दी होती. मंदिरातही काही मंडळी राहिलेली होती.देवाला मनोभावे हात जोडले. विठ्ठल - रखुमाईचेही दर्शन घेतले. मंदिराच्या आतल्या टाक्यांमधले पाणी भरपूर पिऊन बाटल्यांमध्ये भरून घेतले आणि तिथून कोकणकड्याकडे जायला निघालो. वाटेत मधुनी त्याचा कोकणकडा रॕपलिंगचा अनुभव सांगितला. त्यांनी तीन टप्प्यात कोकणकडा रॕपलिंग केले होते. एक टप्पा संपला की ट्रॅव्हर्स मारुन पुढचा टप्पा गाठण्यासाठी जायचे, मग पुढच्या टप्प्यावरही असेच. हा रॅपलिंग चा अनुभव खरंच आवर्जून घ्यावा असाच आहे, कधी योग येतो बघू. वसंत वसंत लिमये यांनी या कोकणकड्यावर सर्वप्रथम प्रस्तरारोहण केले. केतकीला मी सांगत होते, कोकण कड्यावरून नाणं टाकलं तर वाऱ्यानी ते परत वर येतं, असा भन्नाट वारा असतो. वाऱ्यामुळे आपण तिथे उभे राहू शकत नाही, त्यामुळे आडवे झोपूनच कडा बघता येतो. पण आज तो

वारा नव्हता. मात्र हवा स्वच्छ असल्यामुळे माहुली, नवरा- नवरी- वराडे, चंदेरी, मलंगगड हे आपल्या ठाणे जिल्ह्यातील किल्ले दिसत होते. आम्ही थोडे फोटो काढून ते विलोभनीय अप्रूप अनुभवून, वारा पिऊन घेतला. मधुनी सांगितले की भास्करकडे कढी - भात तयार आहे. दुपारचा सव्वा वाजला होता. पिठलं-भाकरी मिळत असेल तर इथेच जेवावे असे ठरले. मधु सांगायला गेला. तेवढयात आम्ही रेलिंगच्या पलीकडे पोहोचलो. डोंगरातून पडणाऱ्या धारांच्या तुषारांनी सुंदर खेळ मांडला होता. पण खूप दूर असल्यामुळे क्लिप खास आली नाही. हे अद्भुत अनुभवल्यावर मग पुन्हा फोटो झाले, नंतर फलाहार - सफरचंद सुकामेवा इत्यादी; सफरचंद फारच गोड लागत होते. हात-पाय-तोंड धुवून भास्करकडे जेवायला बसलो. झणझणीत पिठलं, खरपूस भाकरी आणि चटकदार ठेचा तर आमच्या समोरच मिरच्या भाजून कुटला; असा जेवणाचा थाट होता. जेवणावर यथेच्छ ताव मारला. वर कढी -भात खाऊन आत्माराम तृप्त झाला. कोकण कड्यावरच्या या चुलीवरच्या जेवणाची सर दुसऱ्या कशालाच येणार नाही. मुखशुद्धी खाऊन बूट घातले आणि वाटेला लागलो. वाटेत धबधब्यापाशी पाच मिनिटे शांत बसून उतरणीला लागलो. उतारही फार तीव्र नसल्यामुळे उतरताना खासच मजा येत होती. हे सारे पहाड मागे ठेवून जायला जीवावर येत होतं. केतकी हरिश्चंद्रगडावर येऊन राहण्याचे मनसुबे रचत होती. मला पण शनिवार - रविवार सोडून इतर दिवशी सुट्टी काढून एथे शांत येऊन राहायला आवडेल. हरिश्चंद्र, तारामती सगळ्या शिखरांवरही जाता येईल. मधुच्या, माझ्या, शेखरच्या हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकच्या आठवणींमध्ये हरवत आणि आजूबाजूचे डोंगर निरखत आम्ही कधी खाली पोहोचलो ते समजलेच नाही. भरपूर डुलक्या येत असल्या तरी रस्ता मात्र संपूर्ण खडखडाट होता. पाच वाजता राजूराला पोहोचल्यावर समजले की आता कसाऱ्याला जायला बस-जीप कोणतेच वाहन नाही. मग दहा जणांच्या एका ग्रुपनी जीप ठरवली होती त्या ग्रुपमध्ये आम्हीही गेलो. ट्रकचे ब्रेक नादुरुस्त होऊन सतरा वाहने उलटून अपघात झाल्यामुळे घाटामध्ये ट्रॅफिक जाम झाला आहे, अशी माहिती आमचा चालक देत होता. इगतपुरीला डिझेल भरताना त्यानी भाड्याचे पूर्ण पैसे मागून घेतले. आता इगतपुरीला सोडतो, नाहीतर घाटामध्ये कुठेतरी ढाब्यावर गाडी थांबवतो तिथे जेवा, मी दोन तास आराम करुन मग कसाऱ्याला सोडीन अशी भाषा त्यानी सुरु केली. इगतपुरीला सुदैवानी एक एक्सप्रेस मिळाली. गाडीतच जेवण मागवले आणि पावणेबाराच्या सुमारास गाडीनी ठाण्याला सोडले, अनुभव व आनंद यांच्या जाणिवा अधिक समृद्ध करुन...

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

25 Apr 2020 - 7:02 pm | गामा पैलवान

नमिता श्रीकांत दामले,

वर्णन ऐकून मन लालचावले. :-) हा ही लांबलचक ट्रेक आहे. हरिश्चंद्रगड म्हंटला की लांबच्या मजली आल्याच.

परततांना तुम्ही खिरेश्वरमार्गे खुबीफाट्यावर का नाही आलात? काही कारण होतं का? माझ्या अंदाजाप्रमाणे कल्याणमार्गे ठाणं गाठणं सोयीचं पडलं असतं. नवल वाटलं म्हणून विचारतोय.

आ.न.,
-गा.पै.

नमिता श्रीकांत दामले's picture

25 Apr 2020 - 7:40 pm | नमिता श्रीकांत दामले

राजूरहून नियमित जीपसेवा व बससेवा आहे अशी माहिती होती आणि पाचनईचा रस्ता जवळचा पडतो. खुबी फाट्याला पोहोचायला वेळ लागतो आणि पुढे धरणाच्या भिंतीवरुन चालत येण्यातही बराच वेळ मोडतो.

गामा पैलवान's picture

26 Apr 2020 - 2:07 am | गामा पैलवान

नमिता श्रीकांत दामले,

माहितीबद्दल धन्यवाद! हल्ली बऱ्याच सुविधा झाल्यात. हरिश्चंद्रगडावरून कल्याणला न येत उलटं इगतपुरीस जाण्याचं मी स्वप्नातही पाहू शकलो नसतो. :-)

आ.न.,
-गा.पै.

हृषीकेश पालोदकर's picture

11 May 2020 - 1:08 pm | हृषीकेश पालोदकर

ट्रेक आणि लेख दोन्ही मस्त.
रतनगड ते कात्रुबाई खिंड कारवीतून चालत जाणे या सारखा अनुभव नाही.
आम्ही खिंडीतूनच परत फिरलो होतो. जानेवारीत गेलो होतो. त्यादिवसात खिंडीतून पुढचा प्रवास म्हणजे केवळ तंगडतोड आहे अस एकाने सांगितले आणि ते देवळापासून वाटलेही.
भात शेताचे वर्णन विशेष आवडले.
पुढील प्रवासाला शुभेच्छा.

सतीश विष्णू जाधव's picture

11 May 2020 - 5:16 pm | सतीश विष्णू जाधव

नमिता,

रतनगड ते हरिश्चंद्रगड भटकंती अप्रतिम.

आज मिसळपाव वर लॉग इन् केले आणि तुझा लेख वाचला.
या साईट वर तुला पाहून आनंद झाला.

भटकंतीच्या आणखी लेखांची प्रतीक्षा आहे.