तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत, मसालेदार चिकन रस्सा

Primary tabs

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in पाककृती
15 Apr 2020 - 7:05 pm

तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत, मसालेदार चिकन रस्सा
चिकन १/२ कि
चिकन धुवून त्याला मीठ हळद आणि लिबू किंवा विनेगर १बुच लावून फ्रीज मध्ये ठेवावे. सोया सॉस लावल्यास ही चालते
गरम मसाला बनवण्यासाठी
१. जिरे – १ छोटा चमचा
२. शहाजिरे- १ छोटा चमचा
३. खसखस – २ चमचे ( मध्यम आकाराचा चमचा)
४. लवंगा - ४-५ लवंगा
५. हिरवा वेलदोडा – ७-८
६. काळी मिरी – ४-५ दाणे
७. काळा वेलदोडा- २-३
८. जावित्री – २ कळ्या
९. दगड फुल – चमचाभर
१०. तमाल पत्र – ३-४
११. धणे- ५-६ मोठे चमचे
१२. चक्री फुल – १-१/२ फुलं
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

वर दिलेले सर्व जिन्नस आधी मिक्सर मधून फिरवून त्याची भरभरीत पूड करून घ्या. (वस्त्रगाळ पूड करू नका. मसाल्याची चव लागत नाही.) कढईत ते मोठ्या आचेवर भाजा (तेल टाकू नका) थोडा रंग तपकिरी होऊ लागला आणि सुंदर वास येऊ लागला कि गॅस मंद करून त्यात २ चमचे ज्वारीचे पीठ टाका. ज्वारीचे पीठ लगेच करपते म्हणून मंद आचेवर सतत चमच्याने फिरवत मसाले आणि पीठ चांगले एकजीव होऊदे आता पीठ आणि मसाल्याचा वास येऊ लागेल लगेच गॅस बंद करून सर्व जिन्नस झाकण असलेल्या भांड्यात काढून घ्या अन झाकण लावा. हे महत्वाचे आहे नाहीतर तापलेल्या कढईमुळे ज्वारीचे पीठ करपून मसाला कडसर होतो. अंदाज येत नसेल तर मसाले थोडे कच्चे राहिले तरी चालतात नंतर ते परत व्यवस्थित भाजता येतात पण करपले तर मात्र कडसर लागतात. चव बिघडते. गरम मसाला थंड झाल्यावर परत एकदा मिक्सर मधून काढून वस्त्रगाळ पूड करून घ्या. हा एवढा गरम मसाला आपल्याला आता एका वेळी लागत नाही. अर्धा किले चिकनला २ ते २/५ चमचे पुरतो.हवाबंद झाकणाच्या डब्यात ठेवा. चांगला २-३ महिने टिकतो.

ओले वाटण
साहित्य
१. सुके खोबरे १/४ वाटी
२. कांदे -२ मध्यम आकाराचे
३. लसून -९-१० पाकळ्या
४. लाल मिरच्या – ४-५ देठ काढून ( बेडगी मिरची असल्यास उत्तम, रंग छान येतो.)
५. कोथिंबीर- मुठभर
६. आलं- १ १/२ इंच
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

प्रथम कांदे धुवून त्याला चार काप मारावे. वरची फोलपट काढू नका. गॅसवर हे कांदे आणि सुके खोबरे भाजायचे. डायरेक्ट जाळावर भाजायचे किंवा पापड भाजायची जाळी वापरू शकता. खोबरे लगेच पेटते आणि त्याला तेल सुटते त्याला छान तेल सुटले कि ते बाहेर काढून फुंकर मारून विझवावे आणि निवत ठेवावे. कांदे भाजायला थोडा वेळ लागतो, छान आत पर्यंत धग लागली आणि वरून ते काळे ठिक्कर पडले कि काढून लगेच पाण्याखाली नीववावे. काजळी धुवून काढावी थोडी राहिली तरी चालते काही फरक पडत नाही. घरात पाटा वरवंटा असेल तर उत्तम नसल्यास खलबत्ता असेल तर त्यात वर दिलेले सर्व जिन्नस घालून व्यवस्थित कुटावे एकजीव लगदा करावा. जर खलबत्ता नसेल तर सुरीने बारीक चिरून मिक्सर मधून काढा.(पण काय राव! घरात खलबत्ता ठेवाच त्यात कुटलेल्या वाटणाची लज्जत काही औरच)

आता २ मध्यम आकाराचे टमाटे बारीक चिरून तयार ठेवा

आता आपली सगळी सिद्धता झाली , आता चिकन बनवायला सुरु करू.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
कुकर मध्ये (हे चिकन कुकर मध्ये छान होते ज्यांना कढईत मंद आचेवर आवडते त्यानी तसे करावे पण कुकर मध्ये सगळे मसाले आणि त्यांची चव शाबूत राहते. अर्थात हा माझा अनुभव आहे)
तर कुकर मध्ये ३ चमचे तेल घेऊन ते मस्त गरम झाले कि त्यात २-३ लवंगा, हिंग आणि २ तमाल पत्र टाका. आता त्यात आपण केलेला गरम मसाला २-२/५ चमचे आणि लाल तिखट २-३ मोठे चमचे (किंवा चवीनुसार) टाका.गरम तेलाने मसाला लगेच जळू लागतो म्हणून मसाला जळू लागायच्या आत त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा म्हणजे मसाला जळत नाही. टोमॅटोला पाणी सुटू लागले कि आपले वाटण त्यात टाकून चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या. आत्ताच वरून पाणी अजिबात घालु नका. मसाला छान परतला गेला आणि त्याला तेल सुटू लागले कि त्यात २-३ चमचे साखर घाला. त्यानंतर दोनेक मिनिटांनी चिकन त्यात टाका आणि चमच्याने नीट ढवळून त्याला सगळा मसाला नीट चोपडून. थोडावेळ चिकन तसेच मसाल्यात परतू द्या आणि मग वरून थोडे पाणी घाला. हे पाणी मसाल्याची भांडी, चिकनचे भांडे धुवून घेतलेले असेल तर उत्तम. आपल्याला किती रस्सा हवा त्या प्रमाणात पाणी घाला. कमीत अर्धा लिटर तरी पाणी असावे सर्व मिश्रण एकजीव करून थोडी उकळी आली कि चव घेऊन पहा हवे असेल त्याप्रमाणात मीठ टाका.आता कुकरचे झाकण लाऊन २-३ शिट्ट्या काढा. झाकण पडले कि हा सर्व जिन्नस चांगल्या सर्विंग बाउल मध्ये काढून वर कोथिंबीर आणि पुदिन्याची पखरण करा.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

झणझणीत, मसालेदार चिकन रस्सा तयार आहे. भाकरी आणि इंद्रायणी भातासोबत बेस्ट लागतो. अजून मजा हवी असेल तर कोथिंबीर आणि पुदिन्याबरोबर सवताळलेला कांदा हि टाका आणि घरात कोळसा असेल तर एका वाटीत कोळशाचा निखारा घेऊन त्यावर चमचा भर साजूक तूप टाकून ती वाटी भांड्यात ठेवून वर घट्ट झाकण ठेवा. ५-६ मिनिटे धूर दाबा इतका छान सुवास येतो कि विचाराता सोय नाही.
(टीप वर निरनिराळे जिन्नस जरी चमच्याच्या हिशेबात दिले असले तरी हाताचे माप हे उत्तम तेव्हा अंदाज येण्यासाठी सर्व जिन्नस चमच्या चमच्याने हातात घेऊन मग पुढे वापरायला घ्यावे. मसाले भाजताना कुटताना ठेचताना वाटताना हाताने नाकाने त्याचा फील घ्यावा ह्यातून आपल्याला जो अडर्थ बनवायचा आहे त्याचे चव कशी होणार हे समजू लागते आणि आवश्यक ते बदल करता येऊ लागतात.)
---आदित्य

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

16 Apr 2020 - 3:58 pm | चौकस२१२

कांदा असा भाजून घेतल्यावर तो गोड होतो. आणि त्यामुळे रस्सा गोडुस नाही का होणार?
दुसरे असे कि "सोया सॉस लावल्यास ही चालते" .. हे जरा गोधळात टाकतंय.. कारण बाकी मसाला सगळा भारतीय पारंपरिक झणझणीत करणारा आहे त्यात सोया सॉस ?
व्हिनेगर आणि सोया सोया यांनी सारखेच काम होते असे नाही वाटत

सुबक ठेंगणी's picture

17 Apr 2020 - 6:37 am | सुबक ठेंगणी

सोयासॉस वापरणं मलाही पटत नाहीये.
कांदा असा जाळून मी भरली वांगी करते. मला त्यामुळे भाजी गोडूळ वाट्त नाही. प्ण अर्थात तुंडे तुंडे रुचिर्भिन्ना...
ह्या पाकक्रुतीमधले काही जिन्नस वगळून (हिंग आणि साखर) मी करून पाहणार आहे.

वामन देशमुख's picture

17 Apr 2020 - 9:41 am | वामन देशमुख

छान रेसिपी दिसतेय. शाकाहारी व्हर्जन करून पाहतो.

खोबरं आणि कांदा भाजून रस्सा हा प्रकार आम्ही अनेकदा करतो. पण कांदा नंतर धुऊन घेत नाही. आमच्या वैदर्भीय वहिनी कांदा, खोबरं आणि खसखस हे कॉम्बिनेशन पाटोड्याच्या भाजीसाठी नेहमीच वापरतात.

गवि's picture

17 Apr 2020 - 9:53 am | गवि

भयंकर त्रास आहे. छळ.

चांदणे संदीप's picture

17 Apr 2020 - 10:16 am | चांदणे संदीप

+१
लॉकडाऊन संपेपर्यंत मिपावर चिकन पाकृ बॅन केल्या पाहिजेत.

पाकृ जबरा!

सं - दी - प

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Apr 2020 - 10:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशा त्रासदायक रस्से पीस पाहुन हाल होतात. बॅन करा हे धागे. :)

-दिलीप बिरुटे

जेम्स वांड's picture

21 Apr 2020 - 7:33 pm | जेम्स वांड

टोमॅटो साखर वगैरे जिन्नस ऐकूनच करावासा वाटत नाहीये, पण वेगळा निश्चितच आहे हा प्रकार. इतका टोमॅटो अन साखर घातल्या नंतरही रस्सा आंबटगोड न होता झणझणीत कसा होईल हे मला नवल वाटते, बाकी चवीचा आदर वगैरे आहेच..

मीअपर्णा's picture

21 Apr 2020 - 8:56 pm | मीअपर्णा

आवडली रेसिपी. करुन पण पाहिली कारण आमच्याकडे चिल्लर पार्टी चिकन फार आवडीने खाते त्यामुळे व्हेरिएशन्स हवी असतात. शिवाय चिकन कुकिंगमध्ये मला त्यांच्या बाबाला ब्रेक द्यायचा होता. मी इतरवेळी करत नाही (किंवा मी चिकन केलं तर ती खाणारही नाहीत ;) ) असो. तर मी लाल तिखट न घालता केलं कारण आमचा तिखट खायचा स्टॅमिना कमी आहे. पण वाटणात लाल मिरची घातली होती. वरच्या प्रतिसादामध्ये लिहिलं साखरेबद्द्ल पण मी छोटे दोन चमचे घातली आणि त्याने काही गोडवा वगैरे येत नाही कदाचीत इतर फ्लेव्हर्स एनहान्स होत असावेत. लाल तिखट घालाल तर हवं तसं जहालही होत असेल. आता तो कोरडा गरम मसाला उरला आहे त्यामुळे पुन्हा केव्हातरी करेन पण माझा मोठा मुलगा काहीवेळा मदत करतो त्याने खास फीडबॅक दिला आहे "आई ही रेसिपी पुन्हा कर" त्यामुळे मी खास तुमचे आभार मानते. वेगळीच पद्धत आहे. मी तशी आळशी आहे मसाले वगैरे बनवा आणि मग रेसिप्या करा. म्हणून पहिल्यांदी फक्त कोरडा मसाला बनवून ठेवला आणि दोनेक दिवसांनंतर केली. बरेच महिने (का वर्षांनी) चिकन बनवताना मजा आली. फोटो आणि साग्रसंग्रीत रेसिपी दिल्याबद्द्ल आभार. आणखी अशाच वेगळ्या रेसिपी द्या.

आदित्य कोरडे's picture

23 Apr 2020 - 10:53 am | आदित्य कोरडे

'मीअपर्णा' मन:पूर्वक धन्यवाद

बनवायच्या लिस्ट मध्ये टाकलीय. मी पण कोरडा मसाला एक दिवस बनवेन ओला दुसऱ्या दिवशी आणि चिकन तिसऱ्या दिवशी :D