मेळघाट ३: मचाणावरची एक रात्र

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
14 Apr 2020 - 6:51 pm

मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी
मेळघाट २: नरनाळा किल्ला

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नरनाळा किल्ला पाहून साडेसहाच्या आसपास वनखात्याच्या रेस्टहाऊस वर परत आलो, आता निघायचे होते ते मचाणावर, एक रात्र मुक्कामाला.

मचाणावरील मुक्कामाचे बुकिंग सरकारच्या मॅजिकल मेळघाट ह्याच संस्थळावरुन करता येतं. येथे कच्ची आणि पक्की मचाणं मोठ्या प्रमाणावर आहेत. बुद्धपौर्णिमेच्या आसपास बरीच कच्ची मचाणं मेळघाटातल्या कोअर भागात उभारली जातात. आम्ही मेळघाटात बुद्धपौर्णिमेच्या जवळपास महिनाभर आधी आलेलो असल्याने जंगलाच्या अंतर्भागात बांबूपासून तात्पुरती मचाणं बांधायची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावार चालू होती. अर्थात शहानूर भागात कोअर भागाच्या अगदी थोडक्यात बाहेरील बफर झोनमध्ये काही पक्की मचाणं पर्यटकांसाठी बांधण्यात आलेली आहेत आणि त्यांचे बुकिंग महिन्यातील पौर्णिमांच्या आगेमागे २/३ दिवस उपलब्ध असते. अंतर्भागातील मचाणे मात्र बुद्धपौर्णिमेच्या दिवशीच आणि वनखात्याच्या पूर्वपरवानगीनेच उपलब्ध होतात. मात्र ही बफर झोनमधली मचाणंही जंगलात बर्‍यापैकी आतमध्ये आहेत आणि तिथं वन्यजीवांचं बर्‍यापैकी दर्शन होतं. शेवटी बफर काय किंवा कोअर काय ह्या सीमा फक्त माणसांसाठी आहेत. प्राण्यांना त्यांचं बंधन नसतंच.

एका मचाणावर साधारण तीन लोक मावू शकतात. दोन निरिक्षक आणि एक वनखात्याचा गाईड. हे गाईड मेळघाटातलेच आदिवासी आहेत. कोरकू जमातीचे. अत्यंत काटक जमात आहे ही. ह्यांची भाषा कोरकूच. ही काहीशी हिंदी मराठी अशी मिश्र भाषा आहे. शिवाय अनेक अगम्य शब्द ह्यांच्या भाषेत येत असतात जे पटकन समजणे अवघड जाते. ह्यांचे जंगलाचे ज्ञान मात्र वाखाणण्याजोगे आहेत. वन्यप्राण्यांचा माग घेण्यात हे अगदी पटाइत असतात.

आम्ही निर्धारित केलेले मचाण बर्‍यापैकी मोठे असल्याने आम्ही तिघे मित्र आणि वनखात्याचा मार्गदर्शक असे चौघे मचाणावर जाऊ शकलो. तर, साधारण ६:३० ला आम्ही नरनाळा किल्ला बघून रेस्टहाऊसवर पोहोचलो. आल्या आल्या लगेच चहा घेऊन फ्रेश झालो. तिथल्या खानसाम्याला जेवण लवकर बनवायला सांगितलेच होते, त्याप्रमाणे जेवण तयार होते. लवकरच जेवण करुन सात सव्वासातच्या आसपास मचाणावर जाण्यासाठी तयार झालो. तसा उन्हाळा असल्यामुळे उजेड बर्‍यापैकी होता तरीही जंगलातल्या मचाणावर अंधार होण्याआधी पोहोचणे आवश्यक होते. त्याप्रमाणे वनखात्याची जिप्सी मार्गदर्शकासह बाहेर उभी होतीच. मचाणासाठी एकंदरीत आम्ही तिघांत मिळून १८०० रु. खर्च आला. ८०० रु. मचाणावरील मुक्कामाचे आणि ३०० रु. मार्गदर्शक, ७०० रु. जिप्सी. ही वनखात्याची जिप्सी जंगलात मचाणापाशी सोडून येते आणि परत सकाळी साडेसहा/सातच्या सुमारास आपल्याला त्याच जागेवर परत आणायला येते.

मचाणावर बसण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे अगदी जरुरीचे आहे.

-माफक जेवण करणे अत्यंत आवश्यक कारण वासामुळे प्राणी विचलित होत असल्याने मचाणावर अन्न नेण्याची परवानगी नाही. मात्र जेवणही हलकेच घ्यावे अन्यथा भरपेट खाल्यामुळे पोटाला रात्री त्रास होऊ शकतो.
-रात्रभर जागे राहून प्राण्यांचे निरिक्षण करायचे असल्याने आपल्याजवळ पाण्याचा साठा भरपूर असावा.
-नैसर्गिक विधींसाठी अगदी अपवादात्मक परिस्थितीशिवाय मचाणावरुन खाली उतरता येत नसल्यामुळे स्वतःवर मानसिक ताबा असावा आणि स्थानापन्न होण्याआधीच त्यांची काळजी घेतलेली असावी.
-अंगावर, कपड्यांवर डिओ, परफ्युम वगैरे मारुन जाऊ नये. वन्यप्राण्यांची घाणेंद्रिये अत्यंत तीक्ष्ण असल्याने प्राणी जवळपास येत नाहीत.
-मचाणावरुन प्राणी बघताना नोंदी करण्याआधी लहानश्या टॉर्चला लाल रंगाचा जिलेटीन कागद गुंडाळावा व त्याच्या प्रकाशात नोंदवहीवर नोंदी टिपाव्यात.
-मोबाईल, कॅमेरा आदी वस्तू जवळपास बाळगू नयेत किंवा असल्याच तर त्यांचा वापर अजिबात करु नये.
-मचाणावर बसताना अगदी शांत बसावे लागते. अगदी कुजबुजही करता येत नाही. प्राणी पाणी आलाच तर हलकेच साथीदाराचे लक्ष त्याकडे वेधावे.

मचाण

a

तर आम्ही साधारण सव्वासातच्या आधी शहानूरमधून निघालो आणि १५/२० मिनिटातच मचाणापाशी आलो. मेळघाटात अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. ह्या पाणवठ्यांना पाण्याचा पुरवठा नरनाळा किल्ल्यावरील तलावांतून होतो. प्रत्येक पाणवठ्यापाशी अजून एक लहान खड्डा असतो आणि तो चिखलयुक्त पाण्याने भरलेला असतो ह्याचे कारण पुढे येईलच. पाणवठ्याशेजारीच मातीचा एक लहानसा उंचवटा असतो आणि त्यावर मीठ पेरलेले असते. हे म्हणजे सॉल्ट लिक अथवा मिनरल लिक(Salt lick/Mineral lick). वन्यप्राण्यांना त्यातही हरणे, चितळ, सांबार, गवा, रानडुकरे इत्यादी शाकाहारी पशूंना पोषणासाठी खनिजे, मीठ, कॅल्शियम आदी अत्यावश्यक असतात. मांसाहारी प्राण्यांना ही भक्ष्याच्या शरीरातून मिळतच असतात मात्र शाकाहारी प्राण्यांना ही मुख्यतः मातीपासून मिळवावी लागतात. प्राण्यांचे पोषण व्हावे म्हणून प्रत्येक जंगलांत असे मातीचे लहान ढिगारे करुन त्यावर मीठ शिंपडलेले असतात. हे प्राणी ते ढिगारे चाटून पोषणमुल्ये मिळवत असतात.

पाणवठा आणि त्याजवळील सॉल्ट लिक

a

आमचे मचाण म्हणजे लोखंडाच्या भक्कम सांध्यावर उंचावर उभारलेले एक लहानसे खोपट होते. गवताच्या गंज्यांनी ते चारी बाजूंनी बंदिस्त केलेले होते. मचाणावर जाण्यासाठी एक लोखंडी शिडी होती. ही मचाणं पाणवठ्याच्या बाजूलाच असतात जेणेकरुन पाण्यावर येणार्‍या प्राण्यांचे विनासायास निरिक्षण करता यावे. तर आम्ही साडेसातच्या सुमारास मचाणावर स्थानापन्न झालो. सोबतीला गाईड होताच. तो शिडीच्या बाजूला बसला, संरक्षणासाठी त्याच्या हाती फक्त एक बांबूचा लहानसा सोटा होता. मचाणावर बसताना आपल्याला दोनच प्राण्यांची भीती सर्वात जास्त असते ती म्हणजे अस्वल आणि बिबट्या कारण हे दोघेच मचाणावर चढू शकतात.

a

a

लवकरच फिकुटसा उजेड जाऊन काळाकुट्ट अंधार हळूहळू पसरु लागला. जंगलात रात्र खूपच लवकर होते. अगदी दूरवर कुठेतरी नाईट सफारीच्या जिप्सीचा आवाज येत होता आणि मधूनच तिचे दिवे अंधारात लुकलुकत होते. नंतर नंतर तो ही विरुन जाऊन एक भयाण शांतता पसरत गेली. आम्ही अगदी स्तब्ध बसून पाणवठ्याचे निरीक्षण करत होतो. हळूहळू अंधाराला डोळे सरावू लागले आणि आसपासच्या झाडांच्या अस्पष्ट आकृत्या नजरेला जाणवू लागल्या. पूर्ण निरव शांतता, कुठलाही आवाज नाही, वारं पूर्ण पडलेलं होतं. मध्येच एका झाडाचे पान झाडावरुन गळून पडले तर त्याचा आवाजही अत्यंत सुस्पष्टरित्या ऐकू आला. खरेच जंगलातली रात्र अतिशय वेगळी असते. आता हळूहळू जंगलातले आवाज ऐकू येऊ लागले. दूरवर कुठेतरी रातपक्ष्यांची किचकिच, मधूनच एखाद्या भेकराचे भुंकणे, पानांची सळसळ अगदी स्पष्ट ऐकू येत होती. खरंच जंगलातली रात्र शहरातल्या रात्रीपेक्षा कितीतरी वेगळी असते. आपल्याकडे ह्यावेळी अगदी गजबजलेले असतं पण इथं अगदी निरव, गडद अंधार. जेमतेम सव्वाआठ वाजले होते फक्त पण असे वाटत होते की मध्यरात्र उलटून गेलीय. आता हळूहळू चंद्र वर येऊ लागला होता. एक दुधाळ प्रकाश आजूबाजूला पसरु लागला, झाडाझाडांतून झिरपू लागला. आता हळूहळू जंगलातल्या पायवाटा, आजूबाजूची झाडे, झाडांच्या फांद्या आणि समोरील पाणवठा स्पष्ट दिसू लागला.

रात्री ८:३५

मचाणाच्या उजवीकडील बाजूने एक काळसर आकृती चार पायांवर चालत पाण्याकडे येताना दिसली. आमच्या हृदयाची धडधड हळूहळू वाढू लागली. ती आकृती जवळ आल्यावर अगदी स्पष्ट दिसू लागली, ती होती अस्वलाची. ते अस्वल बिचकत बिचकत पाण्याला येताना दिसले. आम्ही आता अगदी स्तब्ध बसलो होतो. गाईड हलकेच कानात कुजबुजला 'बाना'. कोरकू भाषेत बाना म्हणजे अस्वल. अस्वल पाण्यानजीक आले, पाण्याला तोंड लावणार इतक्यात ते थबकले, त्याने अंदाज घेतला. आणि पाणी न पिताच त्याने पाणवठ्याभोवती एक फेरी मारली. आणि ते थेट आमच्या मचाणाच्या खालच्या बाजूला आले. तिथून ते मागच्या बाजूस गेले आणि मग ते डावीकडच्या झाडीत शिरले. त्याला नेमकी कसली चाहूल लागली कुणास ठाउक, आमची तर नक्कीच नसावी अन्यथा ते मचाणाच्या खालते येते ना. वास्तविक मचाणावर बसलेल्या आपल्यासारख्या लोकांना वाटत असतं की अस्वल, बिबटे मचाणावर चढतील पण प्रत्यक्षात तेच अधिक भेदरलेले असतात. कुठलाही वन्य प्राणी (वाघ सोडून, तो तर जंगलाचा राजाच)पाणी पिताना अगदी सावध असतो कारण पाणी पिताना कधीही त्याच्यावर इतर श्वापदाचा हल्ला होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी प्यायला येण्याआधी लांबूनच अंदाज घ्यायचा, मग पाणवठ्यानजीक आल्यावर काही काळ थांबून इकडे तिकडे बघायचे, धोका वाटलाच तर पाणी न पिताच निघून जायचे, धोका नसल्यास पाणी प्यायचे आणि नंतर न रेंगाळताच लगोलग निघून जायचे ही कोणत्याही वन्य पशूची सहजप्रवृत्ती आहे. हे अस्वल थोड्याच वेळात दूरवर निघून गेले. त्याच्या पायरवाचा आवाजही हळूहळू नाहीसा होत गेला.

रात्री ९:३०

पाठीमागच्या झाडीत काहीतरी खुसपुसल्यासारखा आवाज ऐकू येऊ लागला. हळूहळू ह्या आवाजाची तीव्रता वाढत गेली आणि रानडुकरांची एक भलीथोरली टोळीच अवतीर्ण झाली. ह्याआधी रात्री तापोळ्याला जाताना गाडीसमोर अचानक दोन रानडुकरे रस्ता ओलांडताना सामोरी आली होती तर हंपीला दारोजी अभयारण्यात एक भला प्रचंड डुक्कर पाहीला होता पण इथे एकाच टोळीत इतक्या जास्त संख्येने रानडुकरे मी प्रथमच पाहत होतो. जवळपास १० ते १२ डुकरे होती ती. त्यांचे सुळे चंद्रप्रकाशात अगदी चमचमत होती. वर मी मुख्य पाणवठ्याच्या बाजूला असलेल्या एका चिखलयुक्त खड्ड्याविषयी लिहिलं होतं तो खड्डा रानडुकरांसाठी असतो आणो तो डुकरांनीच सुळ्यांनी माती उकरुन उकरुन केलेला असतो. रानडुकरे सहसा पाणवठ्यातील स्वच्छ पाणी पीत नाहीत. त्यांना चिखलात लोळायला आणि चिखलातीलच पाणी प्यायला अतिशय आवडते. टोळी हेच सामर्थ्य असल्याने ही रानडुकरे काहीशी धीट होती. घुसपुस करत, एकमेकांना ढुशा देत हे खड्ड्यातले पाणी भराभर पीत होते. सर्वांचे पाणी पिऊन झाले आणि आले तशीच धुडगुस घालत ही डुकरे वेगाने निघून गेली.

रात्री ९.४७

समोरील बाजूस एक लहानसा प्राणी पाण्याला आला. त्याचे लांब कान पाणवठ्याच्या कठड्यापाशी दृगोचर झाले आणि नंतर संपूर्ण प्राणी दिसू लागला, तो म्हणजे जंगली ससा (hair). हा रानससा आपल्या नेहमीच्या गोंडस सशापेक्षा (rabbit) खूप वेगळा असतो. ह्याचे कान मोठे आणि उभट असतात, आकाराने हा मोठा असतो आणि ह्याचा वर्ण तपकिरी रंगाचा असतो. एका उडीत हा बरेच अंतर कापू शकतो. पाणी पिऊन हा रानससा लगेच आपल्या वाटे परतून गेला.

नंतर बराच वेळ एकही प्राणी आला नाही, डोळे ताणून ताणून आता पेंग येऊ लागली होती. इतक्यात एक काळासर लहानशी आकृती पाण्यावर येताना दिसली.

रात्री १०:५०

हे होते सायाळ अर्थात साळिंदर (Indian crested porcupine). अंगावर काटे असलेला हा उंदीरवर्गीय (rodent) लहानसा प्राणी शाकाहारी असतो. गवत ह्याचे आवडते खाद्य. तर साळिंदर हे वाघाचे आवडते खाद्य. मात्र साळिंदराचे काटे अतिशय तीक्ष्ण असतात. हे काटे लागून वाघाचा पाय निकामी होऊन नैसर्गिक शिकार करण्याची क्षमता संपल्यामुळे वाघ नरभक्षक झाल्याची काही उदाहरणे जिम कॉर्बेट, केनेथ अँडरसन ह्यांसारख्या दिग्गजांनी लिहून ठेवली आहेत. इथं पाण्यावर आलेल्या साळिंदराला बघणे त्याच्या लहान आकारामुळे, काळ्या वर्णामुळे अतिशय कठीण होते. मात्र त्याच्या अंगाला येणारा उग्र वास आसमंतात भरुन राहिला होता. बिबट्या आणि सायाळ ह्या दोन प्राण्यांच्या अंगाला अतिशय उग्र वास येत असतो.

आता जशीजशी रात्र वाढू लागली तसेतसे प्राणी दिसण्याची शक्यता कमी होऊ लागली, तसेही गाईडच्या म्हणण्यानुसार रात्री ११ नंतर क्वचितच वन्य प्राणी पाणवठ्यावर येतात. दूरवर झाडीत काही वेळा प्राण्यांचे चमकणारे डोळे दिसू लागत ती बहुधा सांबरे असावीत. इकडे मेळघाटात त्यातही शहानूर भागात पाण्याचे विपुल साठे असल्याने प्राणी विभागले जाऊन ते एकाच ठिकाणी पाणी पिण्यासाठी येण्याची शक्यता खूपच कमी होती. जंगलात आतापर्यंत वारं पूर्णतः पडलं होतं आता मात्र वावटळ उठू लागली आणि वार्‍याचा घोंघावणारा आवाज ऐकू येऊ लागला. वार्‍याची तीव्रता इतकी वाढली की मचाण झाकण्यासाठी लावलेल्या गवताच्या गंज्या उडून जातील की काय असे वाटू लागले. प्रचंड झोपही येऊ लागल्याने एकेकजण हळूहळू गंज्यांवरच आडवा होऊ लागला. अर्थात गाईड आणि तिघापैकी एकाने जागेच राहून निरीक्षण करावे असा अलिखित संकेत ठरला होताच.

रात्री २:३०

डावीकडच्या झाडीत एक मोठी खुसपुस आणि पाठोपाठ डुरकण्याचा एक आवाज आला. कोणीतरी मोठा वन्यपशू जवळपासच असावा. तो नेमका कोण हे कळले नही कारण तो पाण्याला आलाच नाही. त्याचा आवाज नंतर विरत विरत नाहीसा होऊन गेला. तो बिबट्या असावा असे मला अजूनही वाटते. काही वेळाने आम्ही सर्वच हळूहळू मचाणावरुन खाली उतरलो आणि मोकळे झालो व दोन तीन मिनिटातच परत मचाणावर येऊन बसलो. निरीक्षण चालूच होते पण एकही प्राणी आता येईना. गाईडही म्हणाला आता कुणी येण्याची शक्यता नाहीच तुम्ही थोडे झोपलात तरी चालेल, प्राणी जर आलाच तर मी उठवेनच.

जशीजशी उत्तररात्र चढत गेली तशीतशी हळूहळू सर्वांनाच झोप लागली. गाईड मात्र जागाच होता. मध्येच पहाटे ४ ला जाग आली, चाहूलीने मित्रही उठले. पाणी पिऊन परत सर्वजण आजूबाजूला बघू लागले. जशीजशी पहाट होत गेली तसातसा रातपक्ष्यांचा आवाज कमी कमी होत जाऊन पाखरांची किलबिल सुरु झाली. दयाळ शीळ घालू लागला, बुलबुल गाऊ लागले, मधूनच एखादा तांबट किटिर्र् कुर्र अशी साद घालू लागला. आता उजाडायला लागले होते. साधारण पावणेसहाच्या सुमारास आम्ही मचाणावरुन खाली उतरलो. पाणवठ्यानजीकच्या पायाच्या ठशांचे निरीक्षण केले. बाजूलाच एक लहानशी चक्कर मारुन आलो. आता परतीच्या जिप्सीची वाट बघू लागलो. साडेसहाला जिप्सी आलीच. जाताना झाडीत एक मोर पिसारा फुलवताना दिसला. १५/२० मिनिटातच मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. चहा वगैरे पिवून ताजेतवाने झालो आणि रात्रभर जागरण झाल्यामुळे सर्वजण झोपून गेलो. अरण्यातल्या रात्रीचा एक अविस्मरणीय आणि अवर्णनीय असा अनुभव घेतला होता. आता दुपारी जेवल्यानंतर निघायचे होते ते सातपुडा पर्वतरांग ओलांडून पलीकडच्या भागातील अरण्यात जाण्यासाठी, कोळकासला जाण्यासाठी. त्या विषयी पुढच्या भागात.

क्रमशः

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

14 Apr 2020 - 8:08 pm | सौंदाळा

आधीप्रमाणेच अप्रतिम भाग
सॉल्ट लिकची नवीनच माहिती समजली, रात्री ११ नंतर क्वचितच वन्य प्राणी पाणवठ्यावर येतात हे पण नवीन.
बरोबर दुर्बीण होती का? नाईट व्हिजन दुर्बीण आता सामान्य नागरिकाला उपलब्ध आहे का?

प्रचेतस's picture

14 Apr 2020 - 10:21 pm | प्रचेतस

धन्यवाद.

आमच्याकडे nikonची दुर्बिण होती, पण नाईट व्हिजन नव्हती त्यामुळे फक्त डोळ्यांवरच भरवसा होता. नाईट व्हिजन मिळते वाटते आता. मध्यंतरी ऍमेझॉनवर पाहिल्याचे आठवतेय.

वास्तविक मचाणावर बसलेल्या आपल्यासारख्या लोकांना वाटत असतं की अस्वल, बिबटे मचाणावर चढतील पण प्रत्यक्षात तेच अधिक भेदरलेले असतात.

कोईमतूरला असताना चहाच्या बागातून टायगर स्लिपवर आम्हाला बोलावणे आले होते... ती रात्र जागून काढली होती...हत्तींच्या झुंडी, पाणवठ्याला आलेले जनावरांचे घोळके... आपापला जीव बचावत पाणी पिताना पाहून आपण किती लीलया तोटी फिरवून पाणी मिळवतो याचा हेवा वाटला...
राजस्तानातील सूरतगढला नीलगाईच्या शिकारीची मजा और होती... चिकनपेक्षा करकरीत लागणारे ते बारबेक्यूतील तंगडे तंदूरी भाजून त्याला खाताना वेस्टर्न सिनेमातील आठवणी जाग्या झाल्या...

अनिंद्य's picture

14 Apr 2020 - 8:50 pm | अनिंद्य

बढिया !

चांदणे संदीप's picture

14 Apr 2020 - 9:07 pm | चांदणे संदीप

जंगलात संपूर्ण रात्र काढणे हा एक रोमांचक अनुभव असतो. दोन तीन नाईट ट्रेक आणि इतर काही ठिकाणी जंगलात रात्र काढल्याचा अनुभव असल्याने वाचत असताना पदोपदी ते प्रत्यक्षात अनुभवतोय असंच वाटत होतं.

सं - दी - प

MipaPremiYogesh's picture

14 Apr 2020 - 10:36 pm | MipaPremiYogesh

वाह खुपच मस्त अनुभव.

जव्हेरगंज's picture

14 Apr 2020 - 11:07 pm | जव्हेरगंज

मस्त!! असं काहीतरी करायला पाहिजे!!

उत्तम थरारक अनुभव असणार. लेखमाला रंगत आहे प्रत्येक भागासोबत.

जेम्स वांड's picture

15 Apr 2020 - 8:46 am | जेम्स वांड

आम्हाला वाचायलाच इतकं थरारक वाटलं, त्या मचाणावर रात्रभर तुम्हाला कितीच थरारक वाटलं असेल ह्याची फक्त कल्पना करू शकतो, मला वाटलं काय इन्फ्रारेड फोटो वगैरेपण देताय का काय पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांचे पण जितके दिलेत तितके भारी आहेत, एक गूढरम्य भाव दाटून आला वाचताना.

चौकस२१२'s picture

15 Apr 2020 - 11:26 am | चौकस२१२

याच "मूड" मध्ये असताना माडगूळकरांच्या कथा वाचा.. मज्जा येईल
https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5598588922422135270

मारुती चितमपल्ली यांचं काही ऑनलाइन मिळेल का वाचायला?
त्यांच्या पण जंगल कथा, वर्णनं अप्रतिम असतात

जेम्स वांड's picture

15 Apr 2020 - 2:52 pm | जेम्स वांड

चौकस२१२ जी, नक्की प्रयत्न करतो मिळवायचा

चौकटराजा's picture

15 Apr 2020 - 9:39 am | चौकटराजा

आयुष्यात खरी श्रीमंती लाईफ्स्टईलची नव्हे तर ती अनुभवांची असे माझे मत झाले आहे. जसे आजकालच्या पिढीला आकाशगंगा माहीतच नाही ! कशी असणार ?
मी आमच्याघरातील पुढच्या पिढीला लाईफस्टाईलचे फारसे सुख लाभू दिले नाही पण अनुभवाने मात्र सम्रुद्ध केले आहे. आपल्याला आलेला हा अनुभव हा अशा वेगळ्या श्रीमन्तीचा भाग आहे. माझ्या एकेकाळच्या साहेबानी वयाच्या ७५ व्या वर्शी २०००० फुटावरून अर्थात स्काय डायव्हर सह विमानातून उडी मारली. आपण एकवार भुवनेश्वर करावे. पुरी लिन्गराज मन्दिर व कोनार्क सह नन्दनकानन ही करता येते .

'मचाणावरची रात्र' असं काही लिहिलं की वाचक अगदी जीवाचं रान करून वाचतात. मग त्यांना उगाच निराश करायचं नाही म्हणून रसभरीत ललित वर्णन करायचं.

असलं इथे काहीही केलं नाही. आवडलं. जे घडलं किंवा अपेक्षित घडलंच नाही तसं दिलं.

>>>नाईट व्हिजन मिळते वाटते आता. >>
आणली तर एरपोर्टला जप्त करतात.

प्रमोद देर्देकर's picture

15 Apr 2020 - 2:47 pm | प्रमोद देर्देकर

मस्त पु.भा.प्र.

मोदक's picture

15 Apr 2020 - 3:49 pm | मोदक

झकास भाग जमला आहे.

भारी अनुभव..!!

अनुप ढेरे's picture

15 Apr 2020 - 5:16 pm | अनुप ढेरे

मस्त लिहिलय!

किल्लेदार's picture

15 Apr 2020 - 11:27 pm | किल्लेदार

छान...पुभाप्र !!!

जालिम लोशन's picture

15 Apr 2020 - 11:59 pm | जालिम लोशन

सुरेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2020 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली, हा भाग चित्रदर्शी झालाय. आम्हीही तुमच्या सोबत त्या मचानावर बसेलेलो आहोत इतका हुबेहुब.
इतका वेळ बसून राहणे याला संयम लागतो. एक दोन प्राण्यांचे फोटो पाहिजे होते या भागात असे वाटले.

आवडला हा भाग पुलेशु.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

17 Apr 2020 - 12:09 pm | चौथा कोनाडा

मचाणाच्या उजवीकडील बाजूने एक काळसर आकृती चार पायांवर चालत पाण्याकडे येताना दिसली. आमच्या हृदयाची धडधड हळूहळू वाढू लागली. ती आकृती जवळ आल्यावर अगदी स्पष्ट दिसू लागली, ती होती अस्वलाची. ते अस्वल बिचकत बिचकत पाण्याला येताना दिसले. आम्ही आता अगदी स्तब्ध बसलो होतो.

वाह, किती चित्रदर्शी ! आपण तिथंच आहोत आणि अस्वल येईलच असं वाटायला लागलं !
क्या बात हैं, मजा येतेय तुमच्या बरोबर सफर करायला !
आता .... पुभाप्र !

आजच पेपेरला ही बातमी वाचली:
BAHCN23

प्रचेतस's picture

17 Apr 2020 - 7:38 pm | प्रचेतस

सर्वांचे खूप सारे धन्यवाद.

Nitin Palkar's picture

17 Apr 2020 - 8:19 pm | Nitin Palkar

चित्रदर्शी वर्णन. पु भा प्र.
_/\_

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2020 - 3:43 am | अत्रुप्त आत्मा

+++१११
प्राणी वर्णन 1नंबर.. पहाट होतानाच वर्णन तर अत्यन्त प्रत्यक्षदर्शी!
=============
णवीण नाव:- आगोबा कॉर्बेट! ;)

वाचतोय. फारच छान सुरू आहे लेखमाला.

सवांतर: मारुती चितमपल्ली आणि व्यंकटेश माडगूळकर, दोन्ही फार आवडते लेखक. चितमपल्ली यांच्या कन्या छाया चितमपल्ली ह्यांचेही लेखन वेगळ्याच धाटणीचे.