*#सोअरे_भारतीय_पाककृती_चॅलेंज*
नावात जरी चॅलेंज असलं तरी हे दुसऱ्याला भरीस पाडणारं चॅलेंज नाही, तर तुमच्यातल्याच कलेला वाव देणारं, खुलवणारं चॅलेंज.
'सोप्या अवघड रेसिपीज' या आमच्या एका वाॅट्सप कंपूवर आमच्या याडमिन बै प्राची गरूड यांच्या सुपीक डोक्यातुन कल्पना आली की येत्या रैवारी भारतिय खाद्य संस्कृतीचा जागर करावा. एकसे एक सुगरणी अन बल्लवांचा भरणा असलेल्या या कंपुतल्या प्रत्येकाला वेगववेगळी राज्य, प्रदेश बहाल करण्यात आला. माझ्या वाटेला आलं ते इशान्येचं छोटंसं सिक्किम. सुरूवात झाली ती सिक्किमची खाद्य संस्कृती धुंडाळण्यापासुन. तिथले पदार्थ शोधण्यापासुन. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसं हे खरंच एक प्रकारचं चॅलेंजच वाटू लागलं. कारण एरवी काही सामान लागलं की लगेच बाहेर पडलं आणि आणलं. सद्य परिस्थितीत ही एेश परवडण्यातली नाही. चाैका चाैकावर मामा पोकळ बांबू घेऊन बॅटिंग करायला तयारच आहेत. मग घरात जे काही जिन्नस उपलब्ध आहेत त्यातच काही करणं आलं, आणि मी मोमोज् करायचं ठरवलं.
हा पदार्थ आजवर आयुष्यात केवळ एकदाच चाखलेला, करणं तर फार लांबची बात. नेटवर काही रेसिपीज पाहिल्या. मोमोजना वेगवेगळे आकार देण्याचे व्हिडियो अनेकदा पाहिले. हा प्रकार आपल्याला जमेल असं वाटलं, अन् मग त्या दृष्टीने हातपाय हलवायला सुरवात केली. जिन्नसांची जुळवाजुळव केली.
चटणीसाठी टाॅमेटो उकडून सालं काढुन घेतली. त्यात सोयासाॅस, लसूण, मीठ, व्हिनेगर, चिली फ्लेक्स लाल तिखट आदी पदार्थ टाकून मिक्सरमधून भरड वाटून घेतलं. कच्चटपणा घालवण्यासाठी किंचीत तेलावर ही चटणी परतून घेतली.
स्टफिंगसाठी 1/2 किलो बोनलेस चिकन मिक्सरमधे फिरवून घेतलं. त्यात 2 पाती कांदे बारीक चिरून टाकले. जोडीला लालतिखट, सोया साॅस, बारीक चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकून सगळं एकत्र करून घेतलं.
कपभर मैद्यात चवीनुसार मीठ चमचाभर तेल आणि थंड पाणी टाकून तो बांधुन घेतला.
खरी कसोटी पुढेच होती. उकडीचे मोदक जमतात तर हे डंपलिंग क्या चीज है हा गर्वाचा फुगा पहिल्याच प्रयत्नात फुटला. हे प्रकरण व्हिडीयोत जितकं सोप्प वाटत होतं तितकं खिचितच नाही याची मनोमन खात्री पटली. पण अडथळा नाही ते चॅलेंज कसलं? जिद्दीने पेटून पुन्हा प्रयत्न केला. पारी लाटुन घेतल्या त्यात चमचा दोन चमचे स्टफिंग भरलं आणि मोदक करंजी असे आकर द्यायला सुरवात केली. थोडे वेडे वाकडेच झाले. पण हळू हळू जमायला लागलं. तरी मनासारखे अकार येत नव्हते. मग अर्धांगाला साकडं घातलं. ती ही लगेच हातातलं काम अर्धवट टाकून मदतीला आली. तिच्या मदतीने उरलेल्या मोमोजनी आकार घेतला.
दुसरीकडे एका भांड्यात पाणी उकळत ठेवलं. त्यावर बांबूचं स्टिमर ठेऊन हे मोमो 12-15 मिनीटं वाफवून घेतले.
तर मंडळी हे आहे आजच्या प्रयत्नांचं फळ. जमलेत का ते जरूर कळवा
प्रतिक्रिया
12 Apr 2020 - 4:14 pm | प्रशांत
गणपा भौ
१ लंबर दिसते.
12 Apr 2020 - 4:26 pm | गवि
छान जमलेत
हे तळूनही होतात का खुसखुशीत किंवा कुरकुरीत?
12 Apr 2020 - 4:35 pm | गणपा
फ्राय केलेले मीे ऎकले नाहीत. पण छान क्रिस्पी होतील स्प्रिंग रोल सारखे. करून बघायला हवे.
12 Apr 2020 - 9:09 pm | प्रचेतस
बहुतेक मोमो वाल्यांकडे फ्राईड मोमोज मिळतातच पण वाफेवरचेच मस्त लागतात अगदी. स्टीमरमध्ये वाफवण्यासाठी ठेवलेल्या पाण्याचे सूप काही मोमोजवाले फुकट देतात, ते भारी लागतं.
12 Apr 2020 - 10:55 pm | जेम्स वांड
मोमोज थोड्या सुख्या कॉर्नफ्लोर किंवा मैद्यात घोळून तळतात, तेच झाले फ्राय मोमो. मोमो उत्तम शिजल्याचे एक लक्षण म्हणजे पारी जवळपास अर्ध-पारदर्शक होऊन आतील सारण पुसट दिसू लागणे
(औटघटकेचा बल्लव रूममेट एकेकाळी लाभलेला) वांडो
12 Apr 2020 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लंबर एक. पैकीच्या पैकी मार्क्स.
अजुन येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
12 Apr 2020 - 5:34 pm | वामन देशमुख
एकूणच पाककृती, घटनांचे वर्णन आणि फोटोज अतिशय मस्त जमून आले आहेत!
12 Apr 2020 - 9:07 pm | प्रचेतस
खल्लास मोमोज. चिकनऐवजी पनीर, कोबी वापरून प्रयत्न करण्यात येईल. पण जमेलसे वाटत नाही अजिबात.
13 Apr 2020 - 4:03 pm | चौकस२१२
चिकनऐवजी पनीर,!
ह....म.. नको पनीर नको यात.. त्यपेशखा शाकाहारी साठी अगदी पातळ चिरलेला कोबी, पातीचा कांदा, गाजर आणि लसूण/ सोया सॉस वैगरे सागितल्याप्रमाणे हेच बरे
मुखय यात म्हणजे पिठी.. ती "निबर" नाही झाली पाहिजे मऊ आणि लुसलुशीत .. ते मात्र अवघड काम आहे
बरं आज पासून मास्टरशेफ २०२० चालू झाले ,
13 Apr 2020 - 5:28 pm | प्रचेतस
ते पण चालेल की, तुमची पण मोमोज पाकृ येऊ द्यात.
13 Apr 2020 - 6:26 pm | जेम्स वांड
उत्तम होतात अन चवीलाही उत्तम असतात, असे मोमो इंद्रप्रस्थ नगरीत अतिशय सुप्रसिद्ध असून गल्लोगल्ली मिळतात. पनीर-चीज-व्हेज-नॉनव्हेज सगळेच मोमो बेस्ट असतात.
14 Apr 2020 - 7:25 am | चौकस२१२
ग्योझे म्हणून मध्ये टाकले होत ते म्हणजेच मोमो ... पण त्यात ती पूर्ण पाकृ नव्हती फक्त जुलजुजुळावं .. गणपा यांनी मुळापासून केले आहे त्यामुळे त्यांना जास्त गुण
चिनी "बाओ " नामक मोदक एकदा करून बघायचाय त्याची पिठी अजून वेगळीच असते .. स्पॉंज केक सारखी ... ती मात्र कसोटी , गणपा किंवा केडि किंवा स्वाती यांना जमेल बहुतेक!
https://www.google.com/search?q=chinese+bao&rlz=1C1CAFB_enAU612AU612&tbm...
13 Apr 2020 - 10:56 pm | सौंदाळा
मस्तच पण करायला अवघड वाटते
मग अर्धांगाला साकडं घातलं
गंपा भाऊ तुम्हीच इतके डेंजर पाकृ करता, तुमची अर्धांगिनी पण !!!
शब्द खुंटले.
एक रिकवेष्ट सध्या घरी दुधीभोपळ्याच्या आणि दोडक्याच्या भाजीचा अतिरेक चालला आहे, त्याच्या काही वेगळ्या चटपटीत पाकृ टाका की.
14 Apr 2020 - 7:13 am | चौकस२१२
दुधीभोपळ्याची .. मी मध्ये झुकिनी चा पास्ता केला होता त्याची पाकृ टाकली होती.. दुधीभोपळ्याचे असेच करू शकता... माहित नाही मी कधी केला नाही ...
14 Apr 2020 - 2:10 am | किल्लेदार
कोणी करून खायला घातले तर मजा येईल. :) :) :)