आधीचा धागा: होसूर: एक उनाड रविवार (पुर्वार्ध)
पुर्वसुत्रः
….. तिथून गावात जाण्यासाठी शेअररिक्षा मिळाली. त्यात बसून बाजारपेठेत पोहोचलो. आता भूकची वेळ झाली होती. एक साधं पण छानसं हॉटेल पाहून आत शिरलो ….. पुढे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हॉटेलात मेन्यूकार्ड बघून स्पेशल थाळी ऑर्डर केली. थाळीत रोटी, भाज्या, राईस,पापड असे नेहमीचे पदार्थ होते, पण टेस्ट मस्त होती. स्वस्त, मस्त आणि चविष्ट असं भोजन केल्यावर सुस्तावलो. दुपारचे दोन अडीच वाजलेले. सकाळी चंद्रचुडेश्वर टेकडी अन मंदिर झकास ट्रिप झाली होती. आता परत इ.सी.ला जावं कि हिंडावं असा विचार सुरु होता, नेटवर "होसूर साईटसीईंग" असा सर्च मारला तर इथं जवळच दहाबारा किमीवर पेरंडापल्ली फाट्यावरून पुढे थोरापल्ली या गावी भारतातले थोर स्वातंत्र्यसेनानी राजाजी उर्फ सी. राजगोपालाचारी यांचं स्मारक आहे असं वाचण्यात आलं. शाळेत इतिहास शिकताना त्यांचा ओझरता उल्लेख वाचण्यात आला होता, बाकी त्यांच्या बद्दल फारशी माहिती नव्हती. म्हटलं येस्स, संध्याकाळी पाच पर्यंत हे बघून होईल, मोर्चा रिक्षास्टँडकडे वळवला.
दुपारची सुस्तीची वेळ होती. रिक्षास्टँडही सुस्त झालेले. दोन तीन रिक्षावाल्यांनी जागेवरून हलायची पण उत्सुकता दाखवली नाही. एक दोघांना हे पेरंडापल्ली- थोरापल्ली आणि राजाजी स्मारक हे कुठंय हेच माहित नव्हतं. थोडं पुढं गेलो, त्या रिक्षावाल्याने येण्यास रस दाखवला. शांत समाधानी चेहरा, वाढवलेली दाढी, कपाळावर नाम, अंगात रिक्षावाल्याचा खाकी शर्ट, खिश्याला रिक्षावाल्याचा बॅज असं आश्वासक व्यक्तिमत्व असलेल्या त्या माणसाने नेऊन परत आणायचे ४०० रु सांगितले, फार वाटताहेत म्हणल्यावर म्हणाला, त्या साईडला रस्ता काही ठिकाणी अर्धवट आहे, खड्ड्याखड्ड्यांचा आहे. काही ठिकाणी कच्चा रस्ता आहे, शेतीवाडीच्या भागातून. वैताग येतो रिक्षा चालवायला. बरंच बारगेनिंग केल्यावर ३५० रु. त तयार झाला.
बाजारपेठ सोडून रिक्षा हायवे वरून कृष्णगिरीच्या दिशेने धावू लागली. रिक्षावाल्याला म्हटलं "रस्ता तर चांगला दिसतोय" तर तो उत्तरला “फक्त पाचसात किमीच, नंतर पेरंडापल्ली फाट्याहून उजव्या बाजूला वळलं कि कच्चा रस्ताच आहे, येईलच लवकर" त्याच्याशी अवांतर गप्पा सुरु केल्या "इथं रिक्षानं लोक क्वचितच येतात. बहुतेक लोक बंगलोरहुन कारनेच येतात. मी पण इथं एका टुरिस्टला आणून तीनेक वर्ष झाली असतील" जाताना बऱ्याच कंपन्या लागल्या त्याची माहिती सांगत राहिला.
राजाजी स्मारकाचा स्थान नकाशा:
मला विचारलं, मुंबई कि पुण्याहून? माझ्या बोलण्यावरून त्याला अंदाज आला होता. पुण्याचा समजल्यावर चक्क मराठीत बोलायला लागला. अर्थात ते मराठी म्हणजे तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी असं सरमिसळ होतं. नंतर त्यातले मराठी शब्द वाढत गेले. पण तो हेलवाला अक्सेंट गोड वाटत होता कानाला. (थोडाफार तंजावूर मराठीसारखा) "आम्ही मूळचे मराठी." रिक्षातलं पॅसेंजरसाईडला लावलेलं फोटोवाल्या ड्रायव्हर लायसन कार्डकडे बोट दाखवत म्हणाला. मी नांव वाचलं "सेकर राव" अर्थात शेखर राव असणार. "आम्ही दर वर्षी पंढरपूरला येतो, पांडुरंगाच्या दर्शनासाठी" मी देखील "माझं बालपण पंढरपूरला विठ्ठलाच्या देवळात खेळण्यानेत गेलं" असं सांगितल्यावर माझ्याकडे काही टप्प्यात रस्त्याचं काम सुरु होतं, जमेल तिथं डांबरखडी होती, खड्डे तर पावलापावलावर होते, रस्त्यावर लक्ष केंद्रित करत सेकर राव कसरत कौशल्यानं रिक्षा चालवत होता. आजूबाजूला शेती होती. हा सगळा सधन शेती परिसर. पोन्नईयर नदीच्या सिंचनक्षेत्रात असल्यानं हिरवाई नटलेला. फ्लोरीकल्चरची काही नर्सरीज, ग्रीन हाउसेसही दिसली. मला पवनानदी, नऱ्हे कासारसाई, थुगाव, शिरगाव, काले कॉलनी रस्ता आठवत होता. बऱ्याच कसरतीनंतर रिक्षा थोरापल्ली गावठाणात शिरली, पारावरच्या एका माणसाला विचारून रिक्षा स्मारकाकडे वळली.
हे स्मारक म्हणजे या खेड्यातल्या अरुंद रस्त्यावरचं बैठं कौलारू घर:
सेकर रावनं रिक्षा रस्त्यातच घासून कडेला लावली, गुरं, दुचाक्या जाता येईल असं बघून. तो थोडा पाय मोकळे करायला चावडीकडे वळला. मी खाली उतरून घराची पडवी गाठली, कौलांची सावली अनुभवली. दाराच्या बाजूला तामिळनाडू राज्य शासनाची कोनशिला होती, "हेच ते घर जिथं थिरु चक्रवर्ती राजगोपालाचारी जन्मले. थोरापल्ली." इंग्रजीत. बाजूला आणखी एकदोन फलक, पण ते नक्षीदार तामिळ लिपीत. घरच्या दाराला कुलूप होतं.
राजाजी स्मारकाचा भित्तीफलक:
रिक्षाकडे परतलो. सेकर राव डुलत परतला. विचारलं "झालं बघून स्मारक? निघायचं?
मी हबकलो. म्हणालो "हे जन्मस्थान आहे, तर स्मारक कुठंय? स्मारकात तर त्यांच्या वस्तू जतन केल्यात आणि प्रदर्शन आहे असं वाचलंय"
तो: काही माहित नाही बुवा. मी मागच्या वेळी असंच बाहेरून दाखवलं होतं.
मी: छे .. मी काय नुसतं कुलूप बघयला आलोय का? आपण इथल्या लोकांना विचारून बघू"
त्या घराच्या शेजारी पाजारी काहीच नव्हतं. परत चावडीकडे गेलो, तिथल्या ग्रामसेवकाला शोधून त्याच्याकडून घरची किल्ली आणि सोबत एक संबंधित माणूस घेतला अन स्मारकात प्रवेश केला.
उघडले स्मारकघराचे दार:
स्मारकघरात प्रवेश करताना:
जुन्या चौसोपी वाड्यासारखी सुरेख रचना असलेलं, सारवलेल्या जमिनीचं टुमदार घर. शेण-सारवणाचा वास बऱ्याच दिवसांनी आला. मातीच्या या घरात प्रवेशल्यावर मस्त गार वाटलं. कौलारू छताला आधार देणार दगडी पायावर रोवलेले लाकडी खांब आणि तुळया. मध्यभागी त्यांचा अर्धपुतळा. मुख्य चौकोनाच्या बाजूला पाचसात खोल्या. मागे विहीर, न्हाणीघर, मोरी वै. मागच्या बाजूस काही झाडं देखील. मुख्य हॉलमध्ये लागूनच स्टील फ्रेमवाल्या काचेच्या मांडणीत त्यांच्या जीवनक्रमाचे फोटो क्रमवार लावले होते. काही वस्तू देखील खोल्यांमधून ठेवल्या होत्या. हे सगळं निवांतपणे वाचलं, बघितलं. खालील फोटोंवरून कल्पना येईल.
राजाजी यांचा अर्धपुतळा आणि प्रदर्शन मांडण्या:
इथं धान्य ठेवायची कणगी बऱ्याच वर्षांनी पहिली:
या निमित्तानं राजाजी यांचे जीवन थोडक्यात पाहणे नक्कीच उचित होईल.
चक्रवर्ती राजगोपालाचारी उर्फ (जन्म: इ.स. १८७८ - मृत्यू: इ.स. १९७२), राजाजी या नांवानें लोकप्रिय होते. वकील, लेखन, भारतीय स्वातंत्र्य चळवळ, राजकारण आणि तत्वज्ञान या सर्व क्षेत्रात अतिशय लीलया विहार करणारे राजाजी स्वतंत्र भारताचे दुसरे गवर्नर जनरल आणि भारतीय असणारे पाहिले गवर्नर जनरल होते.
त्यांनी दक्षिण भारतात हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराचं मोठं कार्य देखील केलं.
राजाजी यांच्या मृत्यूनंतर प्रकशित केले गेलेले पोस्ट-पाकीट:
थोरापल्ली, तामिळनाडू इथं तामिळ अय्यंगार (वैष्णव) ब्राम्हण कुटुंबामध्ये जन्म आणि शालेय शिक्षण थोरापल्ली आणि होसूर इथं. खुप बुद्धिमान. अभ्यासात अतिशय हुशार होते. बंगलोर मधून बी.ए. ची पदवी. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज इथून कायद्याची पदवी.
अलामेलू मंगलम्मा यांच्याशी १८९७ मध्ये विवाहबद्ध. नंतर सालेम इथं स्थलांतर आणि इ.स. १९०० पासून वकिली सुरु केली. पुढील काही वर्षे वकिलीत मोठे नाव कमावले. वकिली सुरु असतानाच त्यांचा शैक्षणिक, राजकीय, सामाजिक चळवळीतील सहभाग वाढू लागला. इ.स.१९१७ मध्ये ते सालेमचे नगराध्यक्ष झाले.
राजाजी जिथे जन्मले ती खोली:
(आत सारवलेल्या जमिनी वर रांगोळी आणि भिंतीशी फोटो दिसतात)
या आणि दुसऱ्या दोन खोल्यांमध्ये त्यांनी वापरलेल्या आणखी काही वस्तू ठेवल्यात
याच कालावधीत गांधीजींच्या चळवळीने प्रेरित होऊन अस्पृश्यता निवारणाचे मोठे काम केले. हरिजन मुलांसाठी वसतिगृह सुरु केले.
पुढे म. गांधीजी यांचे अनुयायी होऊन सालेम इथल्या अस्पृश्यता निवारण चळवळीचा चेहरा बनले. याच दरम्यान ते म. गांधी यांचे व्याही झाले. राजाजी यांची एक मुलगी लक्ष्मी हिने म. गांधी यांचा सुपुत्र देविदास गांधी यांच्याशी लग्न केले. (या दाम्पत्याची मुले गोपालकृष्ण गांधी, राजमोहन गांधी, रामचंद्र गांधी अर्थात म. गांधी यांचे नातू) पुढे राजाजी यांनी काँग्रेसमध्ये विविध महत्वाची पदे भूषवली, दक्षिण भारतातील स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेता झाले.
म. गांधी समवेत राजाजी:
१९३७ मध्ये कौन्सिल निवडणुकीत राजाजी यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसने मद्रास प्रांतात मोठा विजय मिळवला.
ते मद्रासचे मुख्यमंत्री झाले. १९४० पर्यंत ते मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री होते.
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना पाठींबा द्यायचा, या मुद्द्यावरून त्यांचे गांधीजींशी मोठे मतभेद झाले. त्यांनी काँग्रेसाचा राजीनामा दिला.
१९४२ मधील चलेजाव चळवळीपासून ते दूर राहिले तरी विविध प्रकारे त्यांचा चळवळीत सहभाग होताच. नंतर पाकिस्तानच्या मागणीला त्यांच्या अभ्यासानुरूप त्यांनी ठाम पाठिंबा दिला. यामुळे त्यांना देशातून प्रचंड विरोध झाला. पण त्यांची बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणा यामुळे त्यांच्या नेतृत्वाला स्वीकारले गेले. १९४३ ते १९४७ या कालावधीत ते महत्वाचे नेते बनून राहिले होते.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर ब्रिटिशांचे शेवटचे व्हाईसराय असलेले लॉर्ड माऊंटबॅटन हे ओघाने भारताचे गव्हर्नर जनरल झाले,
त्या पाठोपाठ १९४८ ते १९५० या काळात राजाजी गव्हर्नर जनरल झाले. भारतीय असणारे पाहिले गवर्नर जनरल होते.
त्यापूर्वी ते वर्षभर पश्चिम बंगालचे राज्यपाल होतेच.
राजाजी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर:
दलितांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक वाटचालीत अतिशय महत्वाचा ठरलेला असा "पुणे करार" हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांमध्ये वीस वर्षांपूर्वीच (इ.स. १९३२ मध्ये) झाला होता. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. करारावर सह्या करणाऱ्यांमध्ये राजाजी हे समितीतील एक महत्वाचे नेते होते.
पुढे राजाजी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा दलितांच्या विविध समस्यांविषयी वेळोवेळी विचारविमर्श होत असे.
देशाचे केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांच्या निधनानंतर हे पद राजाजी यांच्याकडे आले. चीनचा आक्रमक साम्राजवाद, तिबेट प्रश्न, स्वतंत्र तेलंगण राज्यातील आंदोलकांना मृत्युदंडाची शिक्षा अश्या विविध कारणांमुळे पंतप्रधान नेहरू आणि राजाजी यांच्यातले मतभेद विकोपाला गेले. काही मुद्द्यांवर ठाम राहून त्यांनी नेहरूंना कडाडून विरोध केला. शेवटी नेहरूंच्या धोरणांना कंटाळून राजजींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
१९५२ उजाडले. आता राजजींनी सत्तरी गाठली होती. त्यांना आता राजकारणातून निवृत्त व्हायचे होते, पण राजकारणात त्यांची गरज संपली नव्हती.
१९५२ मध्ये कम्युनिस्ट पार्टीबरोबर आघाडी करून सुद्धा मद्रास प्रांतात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. राज्यातील उलथापालथीतुन मुख्यमंत्रीपदाची माळ राजाजी यांच्या गळ्यात पडली. १९५२ ते १९५४ या वादळी कारकिर्दीत त्यांना स्वतंत्र आंध्रप्रदेश चळवळ, अन्नधान्य वितरण व्यवस्था, नवीन शालेय अभ्यासक्रमयोजनांमध्ये प्रचंड विरोध झाला. शासनाविरुद्ध वाढता असंतोष पाहून काँग्रेसचेच एक नेते कामराज यांना सरकारचा पाठींबा काढून घ्यावा लागला त्यामुळे राजाजींना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
भारतीय राजकारणातील चाणक्य हे नामाभिधान प्राप्त झालेल्या राजाजी यांना १९५४ मध्ये अत्युच्य असा भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. भारतरत्न हा सन्मान मिळवणारे ते पहिले व्यक्ति होते.
पहिला भारतरत्न पुरस्कार स्वीकारताना:
प्रचंड व्यासंगामुळे लेखनातही त्यांना मोठी गती होती. तामिळ आणि इंग्लिश साहित्य लेखनात त्यांनी लीलया विहार केला. त्यांनी 'गीता' आणि 'उपनिषद' यांच्यावर लिहिलेले टीकात्मक पुस्तके प्रसिद्ध आहेत. १९५८ मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'चक्रवर्ति तिरुमगन' (तामिळ रामायण) या पुस्तकासाठी तामिळ भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
राजाजी यांच्या विविध भावमुद्रा:
इ.स. १९५९ मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतःची "स्वतंत्र पार्टी" स्थापन केली. हा पक्ष १९६२, ६७, ७१ च्या निवडणुका काँग्रेसच्या विरोधात लढवल्या. १९६७ मध्ये अण्णा दुराई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधी आघाडी स्थापन करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. त्यात झालेल्या मोठ्या विजयाने अण्णा दुराई यांचे एक नवीन नेतृत्वपर्व राजकारणात तळपू लागले.
१९६५ मध्ये दक्षिण भारतात हिंदी भाषा विरोधी आंदोलना पाठिंबा देत स्वतःच्या पूर्वीच्या हिंदी समर्थनाशी विसंगत पूर्ण विरोधी भुमिका घेतली आणि तामिळ या मातृभाषेच्या पारड्यात आपलं वजन टाकलं ! हिंदी ही उत्तर भारत आणि दक्षिण भारत यातील दुवा म्हणून मोठं काम करेल हे जाणवून त्यांनी १९३७ ते १९४० च्या दरम्यान मुख्यमंत्री असताना शालेय स्तरावर हिंदी भाषा सक्तीची करून हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराचं मोठं कार्य केलं होतं.
आता राजाजी यांनी नव्वदी गाठली होती. १९७२ मध्ये अखेरच्या दिवसात त्यांना आजारपणामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे सुपुत्र सी आर नरसिंहन हे शेजारी बसून धार्मिक ग्रंथाचे श्लोक म्हणत असत, अश्याच एका क्षणी त्यांची प्राणज्योत मालवली ! एका वादळी अश्या राजाजी पर्वाने जगाचा निरोप घेतला.
अंतिम यात्रा:
राजाजी यांचे हे जीवन-प्रदर्शन वाचून मी भारावून गेलो. राजाजी यांचे थोरपण मनावर कोरले गेले. मागील तास-दीडतासाने मला वेळ विसरायला लावली होती. ग्रामसेवकाने पाठवलेला संबंधित कर्मचारी कोपऱ्यातला टेबलावर निवांतला होता. मी त्याच्याकडे वळल्यावर " झाले ना प्रदर्शन पाहून समाधान" या अर्थी छानसे स्मित दिले. मी आनंदाने पुढे जाऊन "पाहुण्यांचा अभिप्राय" या वहीत माझी नोंद आणि अभिप्राय आवर्जून लिहिला. माझ्यासाठी तसदी घेतल्याबद्दल मनोमन धन्यवाद दिले.
पाहुण्यांच्या अभिप्रायाची नोंदवही:
बाहेर सेकर राव वाटच पाहत होता. रिक्षात बसल्यावर डाव्या बाजूला हात दाखवत "आपण या साईडने जायचं का ? म्हणजे आमच्या मंदिराकडून जाता येईल. सारखाच वेळ लागेल" मी हो म्हटलं. पूर्ण भाडं तर ठरलं होतं त्यामुळं कुठूनही रिक्षा नेली असती तर मला फरक पडला नसता. रिक्षा ग्रामीण भागातून रायकोट्टाई मेनरोडला (जुना कृष्णगिरी रोड) लागली. चहासाठी एक बऱ्यापैकी ठिकाण पाहून थांबलो. चहा घेता घेता आमच्या गप्पा रंगायला सुरुवात झाली.
सेकर रावची ७-८ पूर्वीची पिढी महाराष्ट्रातून इथं पाटापाण्यासाठी स्थलांतरित झाली होती. त्यावेळी अर्थात बरीच कुटुंबे स्थलांतरित झाली होती. हे सर्व जण पांडुरंगाचे भक्त होते. सुरुवातीची बरीच वर्षे पंढरपूरच्या वर्षातल्या चारही वाऱ्या करायचे. कामधंद्यात व्यग्र झाल्यावर पुढच्या पिढयांचं पंढरपूरला येणं वर्षातुन एकदाच व्हायला लागलं, तरी घरी मराठी बोलणं आणि पांडुरंगाची भक्ती सुरूच राहिली. त्याने आणि इतर भाविक मंडळींनी विठूरुख्माईचं मंदिर बांधून पांडुरंगालाच इथं बोलावले होते. एकत्र जमून एकादशी व इतर उत्सव साजरे करणे, नियमित भजनं करणे हा त्यांच्या जीवनाचाच एक भाग झाला होता.
आता गप्पा एवढ्या रंगल्यावर मी मागे थोडाच राहतोय? मग मी पण माझं बालपण, नदी वाळवंटात खेळणं, नेहमी चंद्रभागेत अंघोळ करणं, देवळातले उत्सव, आषाढी-कार्तिकी वारीचे अनुभव, लहानपण दुकानांत कामं करणं यावर भरभरून बोललो. त्याच्या चेहरा आणखी भाविक होत गेला. साक्षात पांडुरंग भेटला आहे या भाविकनं माझं बोलणं ऐकत राहिला.
"आता रस्त्यात लागेलच आमचं पांडुरंगस्वामी मंदिर, येणार ना दर्शनाला ?" या सहलीत अचानक असा विठ्ठल भेटतोय हा एक खासा योग होता. मी लगेचच " का नाही ? येणारच" असा होकार भरला. थोड्याच वेळात रिक्षा पांडुरंग स्वामी मंदिरासमोर थांबली. मला थांबायला सांगून मागच्या बाजूच्या आतल्या गल्लीतून मंदिराच्या किल्ल्या आणल्या.
पांडुरंग स्वामी मंदिर:
छोटेखानी मंदिरा प्रांगणात प्रवेश केला. समोरच विजयस्तंभ होता, एका कोपऱ्यात आड देखील होता. मंदिराचा पिवळा रंग आकर्षक होता, चौकट आणि इतर नक्षीकाम सोनेरी रंगात चमकत होते.
मंदिर प्रांगणः
दरवाज्याचे कुलूप उघडून मंदिरात प्रवेश केला. आज खूप मोठा व्हीआयपी भेट देत आहे अश्या थाटात मला मान देणं चालू होतं.
मंदिरात प्रवेश केल्यावरः
गाभाऱ्यात दोनअडीच फुट उंच विठ्ठलरुखमाईची मूर्ती होती. त्याने सजावटीचे दिवे लावले. विविध रंगी प्रकाशात विठ्ठलरुखमाई आणखीच दिव्य भासू लागली. हे सगळं चालू असताना "आम्ही भक्त कसे एकत्र आलो, कशी वर्गणी काढली, काही दानशूरांनी भरघोस देणग्या कश्या दिल्या, भूखंड कसा मिळवला, मंदिर कसे बांधले, शैली कशी ठरवली, पंढरपूरला जाऊन मूर्ती कशी ठरवली, प्राणप्रतिष्ठा पूजा कुणा आचार्याच्या हातून कशी केली, सध्या दैनंदिन पूजा-आरती कशी होते इ. इ." अचिव्हमेंट्स अत्यंत भाविकतेने ऐकवत होता. मी पण त्या गोष्टीत रंगून योग्य ती दाद देत होतो. गाभाऱ्यात जाऊन मनोभावे दर्शन घेतले, देवापुढे १०१ रु ठेवले. आणि सभागृहात येऊन बसलो.
विठ्ठलरुखमाई:
तेव्हढयात शेजारी राहणाऱ्या ज्येष्ठ आचार्यांचे आगमन झाले. माझी त्यांच्यांशी "पंढरपूरचे आहेत हे, यांचे मामा तिथं मंदिरात पुजारी असतात" अशी अदबीनं ओळख करून दिली. ते ही बरंच काही सांगत राहिले, पंढरपूरच्या काही अध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तींची नावे घेतली. त्याचे मराठी मला फारसे समजले नाही, पण आज्ञाधारकपणे ऐकत राहिलो, मान हलवत राहिलो.
पत्ते, फोन नं यांची देवाणघेवाण झाली. आचार्यांच्या पत्नीने सर्वांना आग्रहानं चहा पाजला. एवढा मान आणि आदरातिथ्य पाहून भारावून गेलो.
सेकर राव:
आचार्य यांचा निरोप घेऊन बाहेर आल्यावर सेकर रावने अतिशय भाविकते " इथंच बेंगलोर मध्ये असता तर १५ दिवस / महिन्यातून नक्की येत जावा" असं आग्रहाचं आमंत्रण दिलं. त्याच्या सानिध्यात एक वेगळाच अनुभव आला होता. रिक्षानं बाजारपेठेत सोडलं, टूरचे ठरल्यापेक्षा जास्त म्हणजे ५०० रु दिले, ३५० च ठरले होते, जास्त कश्याला म्हणत मी खुप आग्रह केल्यावर ५०० रु घेतले. त्याला निरोप देताना भरून आल्यासारखं झालं होतं.
दिवेलागणीची वेळ असल्यामुळे बाजारपेठ उजळायला लागली होती. तीनचार चौक पार केल्यावर सकाळची चहा-नास्तावाली गल्ली लागली, चहाच्या त्या सुंदर वासानं नाक परत हुळहुळायला लागलं. जुनाट काळपट चहाच्या दुकानात सकाळपेक्षा कमी गर्दी होती. सकाळसारखा कडक चहा मारण्याचा मोह आवरू शकलो नाही. मनसोक्त दोन कप चहा ढोसून तरतरीत झालो. एसटी स्टॅन्ड गाठले. बस पकडून इ.सी.तल्या होस्टेलला परतलो.
आजचा उनाड रविवार म्हणजे होसूर चंद्रचुडेश्वर टेकडी, मंदिर, दुपारी राजाजी स्मारक अन संध्याकाळी पांडुरंग स्वामी मंदिर अशी छोटी चारोधाम यात्रा झाली होती.
बिछान्यावर पडल्यापडल्या झोप अनावर होत असताना भाविक मुद्रेचा, आतिथ्यशील पांडुरंग-भक्त सेकर राव आठवत राहिला !
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(काही प्रचि आंजावरून साभार)
प्रतिक्रिया
12 Apr 2020 - 2:53 pm | कंजूस
छान आहे की स्मारक. विठ्ठलरखमाई फोटो छान.
16 Apr 2020 - 11:39 am | चौथा कोनाडा
धन्यवाद, कंजूससाहेब !
12 Apr 2020 - 4:14 pm | बबन ताम्बे
राजाजींच्या स्मारकाबरोबरच त्यांच्या कार्याची धावती ओळख सुरेख करून दिलीय. सारवलेल्या भिंती, फोटो, कणगी हे सगळे डिटेल्स खूप आवडले.
सेकर राव आणि त्यांचे पांडुरंग मंदिर छान आहे.एकंदर तुमची ट्रिप छानच झाली आणि आम्हालाही एका सुंदर स्थळाची ओळख झाली.
पुढच्या प्रवास वर्णनाची उत्सुकता आहे.
16 Apr 2020 - 11:40 am | चौथा कोनाडा
.
खुप खुप धन्यवाद, बबन ताम्बेसाहेब !
14 Apr 2020 - 2:07 am | किल्लेदार
हाही भाग छान...
17 Apr 2020 - 12:41 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, किल्लेदार !
14 Apr 2020 - 8:15 am | प्रचेतस
मस्त लिहिलंय, तपशीलवार वर्णन. राजाजी स्मारक खूप छान मेंटेन केलंय. मध्यंतरी पालगडला साने गुरुजींचे स्मारक पाहता आले. तुमचा हा लेख पाहून त्याची आठवण आली. त्यांच्या राहत्या घरात असेच जुने फोटो आणि माहिती लावलेली आहे.
16 Apr 2020 - 5:03 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, प्रचेतस.
पालगडला गेल्यावर साने गुरुजींचं स्मारक नक्की पाहीन !
मध्यंतरी गणपतीपुळ्याच्या घाईच्या ट्रिपमध्ये मालगुंड येथील केशवसुतांचं स्मारक देखिल बघायचं राहून गेलं
14 Apr 2020 - 11:53 am | नि३सोलपुरकर
वाह वाह चौथा कोनाडा साहेब ,
खुप आवडली हि तुमची भटकंती . तपशीलवार वर्णन ,राजाजी स्मारक ही आवडले .
भारतरत्न हा सन्मान मिळवणारे आणी भारतीय राजकारणातील चाणक्य यांना शतशः नमन _/\_
पुढच्या प्रवास वर्णनासाठी शुभेच्या .
16 Apr 2020 - 5:05 pm | चौथा कोनाडा
धन्यू, नि३सोलपुरकर साहेब !
14 Apr 2020 - 5:42 pm | अनिंद्य
@ चौथा कोनाडा
तुमचे दक्षिणायन आवडले.
राजाजी - स्वतंत्र पार्टी - तामिळ अस्मितेच्या, अण्णा दुराईच्या उल्लेखांनी एका मोठ्या कालखंडाबद्दल पुन्हा वाचायची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल तुमचे आभार.
त्यातच परमुलुखात विठ्ठल रखुमाईचे अवचित दर्शन _/\_
पुण्य गाठीला तर पांडुरंग पाठीला :-)
16 Apr 2020 - 5:31 pm | चौथा कोनाडा
या मुळंच हा उनाड अनुभव संस्मरणीय झाला !
या लेखाच्या निमित्ताने राजाजी यांच्या इतिहासाबद्दल थोडेफार अवांतर वाचले गेले. मला ही द्रुमुकचा उदय या कालखंडाविषयी उत्सुकता आहेच.
आपण या विषयी लिहालच बहुधा !
अनिंद्य साहेब, धन्यू ! _/\_
14 Apr 2020 - 5:45 pm | अनिंद्य
लेखात लिहिलंय तसे दक्षिणेत पिढ्यानपिढ्या राहिलेल्या मराठीजनांचे मराठी कानाला फार गोड वाटते.
मला चेन्नईत एका नव्वदीच्या आजींनी तामिळ हेलातल्या मराठीत 'तुमचा बायको काय करतो?' तुमचे थोर (वडील या अर्थी) कसे आहे? असे प्रश्न आपुलकीने विचारले होते :-)
20 Jul 2020 - 8:57 pm | चौथा कोनाडा
व्वा, मस्तच !
धन्यवाद, अनिंद्यसाहेब!
14 Apr 2020 - 8:31 pm | सौंदाळा
आधीच्या भागासारखाच अप्रतिम भाग,
आम्ही पण तुमच्या बरोबर फिरून आलो.
प्रसंग फुलवण्याची तुमची प्रतिभा विलक्षण आहे, लिहीत राहा, वाचतोय
19 Apr 2020 - 12:05 pm | चौथा कोनाडा
खुप खुप धन्यवाद, सौंदाळा !
17 Apr 2020 - 7:38 pm | jo_s
अप्रतीम,
उत्तरार्ध जास्तच सुंदर झालाय
छानच वर्णन,
राजाजींच स्मारक आणि त्यांच्या कार्याची ओळख सुरेख करून दिलीय. वर्णनात डिटेल्स खूपच छान मांडलेत. आवडले.
19 Apr 2020 - 12:07 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, jo_s सर !
29 Apr 2020 - 7:57 pm | Sandeep Bagade
प्रिय चौथा कोनाडा
पंधरा दिवसांपूर्वी पूर्वार्ध वाचण्यात आला होता आणि आज उत्तरार्ध वाचला. खरंच आपण खूपच छान प्रवास वर्णन लिहिले आहे. खास करून राजाजी यांची काही नवीन माहिती मिळाली आणि सेकर राव यांचे विठ्ठल मंदिर पण छानच
असेच आपणाकडून लिहिले जाईल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद
16 Jul 2020 - 1:28 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, संदीप बागडे साहेब !
30 Apr 2020 - 4:23 pm | Sanjay Uwach
खुप सुंदर प्रवास वर्णन व त्या बरोबर इतिहास आणि राजकीय माहिती देखील. प्रवास वर्णन वाचताना कुठेही कंटाळवाणे वाटत नाही. खूप सुंदर. लिहीत रहा.
20 Jul 2020 - 11:23 am | चौथा कोनाडा
धन्यवाद, संजय उवाच साहेब !
30 Apr 2020 - 7:43 pm | Nitin Palkar
संपूर्ण रविवार तुमच्या बरोबर फिरल्यासारखे वाटले. राजाजीन्बद्द्ल एवढी सविस्तर माहिती पहिल्यांदाच वाचली. प्रवास वर्णन आणि प्र ची दोन्ही सुंदर.
21 Jul 2020 - 12:48 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, नितिनजी पालकर.
2 May 2020 - 2:08 pm | सिरुसेरि
==== खुप सुंदर प्रवास वर्णन व त्या बरोबर इतिहास आणि राजकीय माहिती देखील. प्रवास वर्णन वाचताना कुठेही कंटाळवाणे वाटत नाही. खूप सुंदर. लिहीत रहा. =====
+१०० . पुलेशु.
21 Jul 2020 - 12:49 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, सिरुसेरिजी.
21 Jul 2020 - 2:54 pm | श्वेता२४
चिकाटीने ग्रामसेवक शोधून हा जुना खजिना शोधून काढलात व त्याचा लाभ आम्हालाही दिला.
21 Jul 2020 - 8:15 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, श्वेता२४जी !