कोरोना मुळे खरच काय बदललं?

स्मिता दत्ता's picture
स्मिता दत्ता in काथ्याकूट
10 Apr 2020 - 8:17 pm
गाभा: 

कोरोना मुळे खरच काय बदललं?

जेव्हा २१ दिवसाचा लोकडाऊन जाहीर झाला आणि तसं नाही म्हटलं तरी धडकी भरलीच. असा प्रसंग कधीच कुणी अनुभवला नाही. त्यामुळं त्याचा काही अनुभव नाही. सगळं बंद ,चार भिंतीच्या आत सगळं जग कोंडून घ्यायचं !! कल्पनाच करवत नव्हती तेही असंच २१ दिवस राहायचं आहे कदाचित जास्तच या जाणिवेनं आणखीनच उदासी येत होती. भाज्या ,फळं,वाण सामान मिळेल कि नाही याचीहि चिंता होतीच. त्यात दिवसभर चालणाऱ्या बातम्यांच्या रतिबाने भीतीत भरच पडत होती!पण आता पाण्यात पडल्यावर पोहावं लागणारच होत. न करून सांगता कोणाला? एक बरं होतं सगळे सोबत होते.. जवळ नाही तरी !!! प्रेत्येकालाच या परिस्थितीत राहायचं आहे त्यामुळे नाही म्हटलं तरी एक धीर,आधार वाटत होताच. अनुभव शेयर करता येणार होते.

पहिल्याच दिवशी कामात दिवस कसा गेला कळलंच नाही. कामवाली नसल्यामुळं नेहेमीची कामं केल्यावर जरा जास्तीची पण साफसफाई करण्यात वेळ गेला. पण दोन तीन दिवसातच हि जास्तीची कामं अंमळ जास्तच होतायत हे लक्षात आलं आणि मग त्याला रामराम ठोकला. आता रोजचीच कामं फक्त करायची असं ठरवलं. आणि पुढच्या दोन तीन दिवसातच छान रुटीन बसलं. बाई नसली तरी चालतं असं उगीचच वाटलं. अर्थात हे काही दिवसांसाठी आहे म्हणून ठीक हेही तितकंच खरं!!!

आता दिवसभर घरातच म्हणजे अगदी उंबरठ्याच्या आतच म्हटल्यावर मोकळ्या वेळेत करणार काय हा प्रश्न होताच अशा वेळी व्हाट्सअप आणि टीव्ही यांनी खूपच मदत झाली नसता काय केलं असतं अस वाटतं. !!! आणि दुसरं अर्थातच खाणं!!! माणसाला रिकामपण आलं कि खाणं सुचतं हेच खरं. मग रोज नवनवे पदार्थ खायला करायचा सपाटाच सुरु झाला. त्यात रोज ग्रुप वर वेगवेगळ्या रिसिपीज मैत्रिणी टाकत ते बघून अजून चेव येतो आणि काही नवंनवं करायचं सुचतं!! तसंच भांड्याचं कामही वाढतंच पण इलाज नाही. असो !!!!!!!

तसंच जी मुलंमुली बाहेर राहतायत त्यांना आणि एकूणच सगळ्यांना घरातही खूप काम असतं आणि तेही किती महत्वाचं असतं हेही पटलंय हेही नसे थोडके, कारण सगळी हॉटेल्स ,रेस्टारंटस सारंच बंद असल्यामुळं बाहेरून काही खायला मागवायचाही पर्याय तसा फारसा शिल्लक नाही. त्यामुळं काहीतरी स्वतःलाच बनवून खावं लागणार हे बहुतांशी मुला मुलींना कळलंय. तसं गेल्या २ पिढयांना तरी घरातली कामं करायची, झाडू, फारशी ई स्वच्छता करायची फारशी सवयच लागली नाही. आधी अभ्यास आणि नंतर नोकरी धंदा यामुळं स्वयंपाक, साफसफाई वगैरे non productive गोष्टींकडे दुर्लक्षच झालेलं, पण आता तेच किती गरजेचं आहे हे कळतंय सगळ्यांनाच. तिथे पैसा वगैरे काहीच कामाला येत नाहीये स्वतःलाच सगळं करण्याची वेळ आलीये. या निमित्ताने स्वावलंबन शिकायला लागलं हेही खूप झालं. रोजच्या जीवनात या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे कळलं. पैसे कमावता येण्याबरोबरच पोटाला जे लागतं तेही बनवायला यायला हवं ही शिकवण मिळाली.

तसंच घरातच राहायचं आहे आणि आपल्याच कुटुंबात २४ तास राहायचंय यामुळं कौटुंबिक बंधही घट्ट झाले. आपल्या माणसांबरोबर वेळ घालवण्याचा आनंदही मिळालाच पण तसं राहणं फार अवघड नाही हेही लक्षात आलंय. असो.

तसं हा काळ सगळ्यांच्याच मानसिक ताकतीची परीक्षा घेणाराच आहे. सगळीकडं भीतीचं वातावरण आहे. जणू टाईमबॉम्ब ठेवलाय कुठेतरी असं वाटतंय. ते जगभरातली भयानक दृश्य पाहून उदासी अजून गहिरी होतेय. काय होणार पुढे काहीच कळत नाही. पण तरीही भारताची स्थिती खूपच चांगली वाटतीये हीच दिलासादायक गोष्ट.

दुसरं निसर्गात होणारे बदल हि या सर्वातली जास्त आनंददायी गोष्ट आहे असं वाटतं. कारण माणसाचा वावर कमी झाल्यानं निसर्ग फुलू लागलाय. स्वच्छ सुंदर व्हायला लागलाय. प्राणी पक्षी यांनाही तो आपलापण आहे याची जाणीव झालीये. हे चित्र जास्त आल्हाद दायक आहे असं वाटतं. कारण आता जगावर आलेलं संकट काही दिवसांनी निश्चित जाईल. नव्हे त्यावर माणूस नक्कीच मात करेल यात अजिबात शंका नाही. पण त्याच वेळी सगळं जग ठप्प झाल्यामुळं कमी झालेलं प्रदूषण मग ते हवेचं असेल, पाण्याचं असेल किंवा आवाजाचं असेल त्याचा निसर्गावर होणारा सकारात्मक परिणाम हा आपल्या सर्वांसाठीच खूप चांगला असेल. कोणी सांगावं कदाचित नित्य नेमानं येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती कमीही होतील येणाऱ्या काही काळात. कारण ओझोनचा थर घट्ट होतोय. त्याला पडलेलं भोक बुजतंय असे संकेत मिळताहेत. म्हणजे मानवाने ठरवूनही जे शक्य नव्हतं ते या करोनने करून दाखवलं असं म्हणावं लागेल आणि तेच या विषातून निघालेलं अमृत असेल !!!!!!!!!!!!

प्रतिक्रिया

नक्कीच आपण नमुद केलेल्या गोष्टी खरच मनास सुखावह आहे. जगाने असा काळ यापुर्वी कधीही पाहिला नव्हता. शहाण्याने एकाच अनुभवातुन शिकावे.

धर्मराजमुटके's picture

10 Apr 2020 - 9:40 pm | धर्मराजमुटके

ओझोनचा थर घट्ट होतोय. त्याला पडलेलं भोक बुजतंय असे संकेत मिळताहेत.
हा केवळ तात्पुरता दिलासा आहे. एकदा लॉकडाऊन संपला की माणूस ते भोक मोठं करण्याचा पुर्ण ताकतीनिशी प्रयत्न करणार आहे.

चौकटराजा's picture

11 Apr 2020 - 9:24 am | चौकटराजा

निसर्गाचा कायदा देव, देश समाज , संस्क्रुति या पेक्षा मोठा असतो हे सिद्ध झाले. चंगळवादी व भावनाप्रधान लोक ते स्वीकरणार नाहीतच ! जर आरोग्य हे माणसाला निसर्गाशी जोडणारा दुवा आहे असे माणसाला समजले तर आठवड्यातून घराचे एकदा तरी फेशियल करावे ही समज स्त्री मधे येईल व माझा खिसा फुगत गेला तरी मी फुगता कामा नये याची समज पुरूषाला येईल .साखर कापूस यापेक्क्षा फळे कडधान्ये डाळी ,औषधी वनस्पती यांचे उत्पादन करू याची सद्बुद्धी शेतकर्याला होईल. 24 तासात आठ तासच नोकरी योग्य आहे. हे उत्पादकाना कळून येईल . आपल्या देशात नोकरी शक्य आहे तरी पगार डॉलर मधे मिळतो म्हणून अमेरिकेला जा हा हव्यास कमी होईल. ( चीन चा तर पुरता धसका घेतला जाईल ).

चौकस२१२'s picture

11 Apr 2020 - 3:57 pm | चौकस२१२

दुसरे असे कि जो प्रत्येक जण अमेरिकेत ( किंवा इतर तत्सम पाश्चिमात्य देशात ) जातो तो केवळ पैसे मकमवण्यासाठी म्हणून नव्हे
इतर हि कारणे असतात
- कोणी खूप हुशार असतो आणि त्याला ज्या क्षेत्रात काम कार्याचे ते कदाचित भारतात कमी प्रमाणात चालू असते किंवा तिथे शिरकाव मिल्ने अवघड असते
- कामाचे तास आणि कौटंबिक जीवन यात समतोल साधने हा सुद्धा एक हेतू असू शकतो फक्त झटपट पैसे कमवणे हाच केवळ उद्देश असेल तर मग अरबस्तानात बचत टक्केवारी प्रमाणे जास्त होते कि , शिवाय २-३ तासात भारतात सुट्टीला येता येते ! मग कशाला तो माणूस जाईल दूर अम्रीकेत

चौकटराजा's picture

13 Apr 2020 - 8:46 am | चौकटराजा

खरेच बरेचसे भारतीय काय परदेशी नागरिक तिथे " हुशार" म्हणून जातात....? अशा किती टक्के भारतीयानी तिथे उच्च प्रतीचे संशोधन केल्याची उदाहरणे आहेत ? मला व्यवस्थापन मधील उदाहरण नको. तेथील ब्युरोक्रसी तील उदाहरण नको. त्याचा फायदा जगाला नाही फक्त तेथील देशाला. माझ्या नातेवाईकात परिचितात तिथे गेलेला मला असा एकही आढळला नाही ज्याला जिनियस म्हणावे ! बर्याच जणाना आपली जॉब प्रोफाईल काय याचेही उत्तर देता आले नाही !

चौकस२१२'s picture

11 Apr 2020 - 3:33 pm | चौकस२१२

आपल्या देशात नोकरी शक्य आहे तरी पगार डॉलर मधे मिळतो म्हणून अमेरिकेला जा हा हव्यास कमी होईल.

पूर्वी सारखी आता परिस्थिती राहिली नाही...तफावत खूप कमी झाली आहे...अर्थात स्पर्धा आहे म्हणा पण तश्या संध्या पण वाढल्या भारतातल्या आणि त्या फक्त आय टी तील नव्हे तर अनेक सॉफ्ट सर्विसेस .. आणि उपटदान क्षेत्रात सुद्धा
दुसरे असे कि "डॉलर कमवायला अमेरिकेत गेला" हे पालुपद आता कालबाह्य होतंय.. कित्येक दशके लोक आखाती देशात (जिथे कदाचित बचतीचे प्रमाण अमेरिके पेक्षा जास्त असावे ) जात आहेत कि दिनार कमवायला त्यावर कोणी काही बोलत नाही .. शेवटी पैश्याचं मागे काय जगात कुठेही लागता येते आणि त्यापायी "वर्क लाईफ बॅलन्स " कडे दुर्लक्ष होऊ शकते.. उलट भारतात तर हे जास्तच होते ..

चौकस२१२'s picture

11 Apr 2020 - 3:51 pm | चौकस२१२

" आधी अभ्यास आणि नंतर नोकरी धंदा यामुळं स्वयंपाक, साफसफाई वगैरे non productive गोष्टींकडे दुर्लक्षच झालेलं, पण आता तेच किती गरजेचं आहे हे कळतंय सगळ्यांनाच. "
हे अगदी बरोबर
प्रत्येक पिढीने जरा "आई बाबांच्या चौकोनी घरकुल "पासून थोडं काळ बाहेर राहून बघावे
स्वतःचे स्वतः करण्यात स्वावलंबन आले तर जगात कुठंही जा आपण अडचणीत येत नाही ... हे खात्रीलायक सांगतो ( मग अरबस्तातनात घरगुती वाईन बनवणे असो किंवा न्यूझीलंड मध्ये फार्म वर मारलेली बकरी चे पुढे मित्रात वाटून घेरण्यासाठी छोटे वाटे करणे असो किंवा घरातील संडास साफ करणे असो
एकदा एकाला जरा आलं कापून दे रे असे सोप्पे काम सांगितले तर " ये हमसे नही होगा " असे उत्तर आले.. सोकाजी ला कोंबडी मात्र खायची होती

स्मिता दत्ता's picture

11 Apr 2020 - 5:52 pm | स्मिता दत्ता

तरीही यातून सरकारं हि काही शिकतील आणि त्यानुसार काही उपाय योजना करतील तर बरे होईल अन्यथा ये रे माझ्या मागल्या हे होईलच ...!!!