लॉकडाऊन : तेरावा दिवस

गुल्लू दादा's picture
गुल्लू दादा in काथ्याकूट
6 Apr 2020 - 8:26 am
गाभा: 

नमस्कार माझ्या तमाम पिझ्झा, बर्गर, वडापाव शिवाय जिवंत असणाऱ्या मिपाकरांनो.

'लॉक डाऊनमुळे बसलोत रिकामे घरी
मिळत नाहीये साधी चाखायला पाणीपुरी
घ्यावी का थोडी रिस्क आणायला श्रीखंड
भीती वाटते उगाच सुजवतील भुखंड.'

माझ्या अश्या गुणी मित्रांना दाबेली शिवाय रहावं लागतंय त्या मूर्ख विषाणूपायी. त्याचं नाव पण घेणार नाही मी मूर्ख कुठला. इतका त्रास देतात का राव? तो चीनच्या बाहेर यायचा नाही म्हणून आमचे मित्र गाफील राहिले. सांगून तर यायचं. आम्ही पहिलेच नसतं का हातं धुवायला चालू केलं मग. चिटर कुठला. समोर दिसायला पाहिजे तो फक्त........ चौपाटीची आठवण येतंच असेल म्हणा पण काय करणार? नाही म्हंटल तरी आपल्या आवडीचं अन्न घरपोच आणून देणारे झोमॅटो, स्वीगीची तर येतच असेल. घरचं तर आपल्याला आवडतच नाही. घरच्या अन्नाला चव थोडी असते. हात धुवून स्वयंपाक केल्यास चव थोडीच येणार त्या अन्नाला. बरोबर आहे तुमचं एकदा का लॉकडाऊन संपलं की मग लागेल ते चविष्ट खायला आपण मोकळे. पण सध्या तरी नाईलाजाने घरचंच खावं लागणार. थोडक्यात काय मजबुरी का दुसरा नाम कोविड-१९.

या जगात अशी कुठलीही गोष्ट नसेल जी १००% लाभदायक किंवा हानिकारक असेल अगदी विषाणूसुद्धा (हे माझे वायफळ मत असू शकते). हल्ली ड्युटी सुरू असली तरी कामाचा ताण बराच कमी झालाय. फावला वेळ बराच मिळतोय. अश्या वेळेत माणसाची निरीक्षण शक्ती जोरदार काम करायला लागते. आता हेच बघा ना मी जो पेला पाणी प्यायला वापरतो तो पहिल्यांदा 360 अंशात निरखून पाहिला. मला खूप मादक वाटला तो. इतक्या दिवस याचं सौंदर्य आपल्यापासून लपून कसं राहील याचं आश्चर्य मला वाटलं. कॅलेंडरच पान प्रत्येक महिन्याला घरातील कोणीतरी बदलते हाही साक्षात्कार याच दरम्यानचा. नजरेसमोरील रोजच्या गोष्टींमधला हा बदल मला नवा वाटला. हाच तर फायदा करून दिलाय ना माझा या छोट्या दुश्मनाने. मला खात्री आहे तुम्हाला पण असा साक्षात्कार नक्की झाला असणार हो ना.

सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत मी ड्युटीवर असतो. रविवारी आलटून पालटून. तुम्हाला मी काय बोलतोय हे नीट कळत नसेल ना. एक मिनिट. ही घडी नीट विस्कटून सांगतो. मी व्यवसायाने डॉ. असून एका प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देतोय. तेथे आम्ही २ डॉ. आहोत म्हणून रविवारी आलटून पालटून.

एके दिवशी सकाळीच बिरुटे सरांचा विनंती कमी आदेश जास्त निरोप आला धागा लिहिण्याबद्दल. आम्हाला विषाणूपेक्षा त्यांचा भीतीयुक्त आदर जास्त असल्याने तातडीने कागद आणि पेन घेणे आलेच. पण काही सुचेचना काय लिहावं तर. मिपाकरांनी सगळे विषय कोळून प्यालेले. आधीच्या धाग्यांमध्ये विरंगुळा, घरकामातील विविधता, घरून हापिस काम, भाजीचे लोणचे तर कोणी प्रतिबंधात्मक उपाय सांगितलेलेच आहेत. मग म्हंटल हे झालं घराच्या आतील. मी तुम्हाला थोडं घराच्या बाहेरील जग दाखवतो. थोडक्यात माझं दैनंदिन. चला तर मग !

मी मामांकडे राहतो. तेथून दवाखाना १०कि.मी. अंतरावर आहे. रोज येणं-जाणं करतो. लॉक डाऊनच्या सुरुवातीच्या काळात पोलीस काका अडवत. तेव्हा ओळखपत्र दाखवावं लागे. आता आमची ओळख झालीये, तर ओळखपत्राच्या ऐवजी हात दाखवतो(रामराम करतो):) बाहेर बऱ्यापैकी मार्केट बंद दिसत असलं तरी सोशल डिस्टन्स हा प्रकार सर्वांना नवीन आहे. खेड्यात यात शिथिलता बघायला मिळू शकते.

दवाखान्याचा परिसर मोठा आहे. शासकीय असल्याने तो आमच्या बापाचा आहे असा अविर्भाव येथील गावकऱ्यांचा आहे. आवारातील पडीक जागेचा वापर धूम्रपान आणि इतर व्यसनाकरिता नियमित होतो. आता लॉक डाऊनमध्ये पुरवठा कमी असल्याने जो साठा आहे तो जास्ती लोकांमध्ये शेयर केल्या जातोय. उदा.१ सिगारेट ४ लोकांमध्ये पिणे. मी डॉ.या नात्याने त्यांना काहीच बोलू शकत नाही कारण दवाखाना त्यांच्या बापाचा आहे. गमतीचा भाग बाजूला ठेवता त्यांना याआधी हटकून बघितलंय पण ते विषाणू सारखा न दिसणारा हमला करतात आणि न दिसणारा हमला परतवून लावण्यात भरपूर वेळ जाऊन मानसिक त्रास होतो तो वेगळाच.

गावच्या सरपंचांचा मुलगा माझा चांगला मित्र झालाय. पुण्यात इंजिनिअरिंगला आहे. तो सध्या गावात आल्याने दवाखान्यात नियमित चक्कर असते साहेबांची. तक्रार एकच हे गाववाले लोक बोलताना काहीच अंतर ठेवत नाहीत. स्वच्छता नाही. बाजूची आजी तर कानाजवळ येऊन बोलते. पण या सगळ्यात मी काहीच करू शकत नसल्याने विषय हलक्या स्माईलने संपतो.

दवाखान्यात बऱ्यापैकी बदल या काळात आम्ही केलेत. सर्व प्रथम कर्मचारी वर्गाला या आजाराची नीट माहिती देण्यात आली. जगभराचे थैमान घालत असलेले आकडे दाखवण्यात आले. रुग्णांची बैठक व्यवस्था बदलवण्यात आली. बाकड्यांची जागा सुरक्षित अंतरावर ठेवलेल्या खुर्च्यांनी घेतली. ज्या रुग्णांकडे मास्क वा रुमाल नाही त्यांना केबिन मध्ये पाठवताना मास्क घालून पाठविण्यात येते. प्रत्येक रुग्ण तपासल्यावर मी हात सॅनिटायझरने धुतो. यामुळे पुढच्या येणाऱ्या रुग्णाबरोबर माझं आणि माझ्या परिवाराचे देखील संरक्षण होते.

माझा रुग्णांशी संबंध येतो म्हणून मामाच्या घरी मला विचित्र वागणूक मिळत नाही. हा विषाणू आल्यापासून मला स्वतंत्र खोली देण्यात आलीये. म्हणजे मीच मागून घेतली आहे. घरी आल्यावर रोज माझे कपडे मी धुवून टाकतो. मला मामा सोबत जेवणाचा आग्रह करतात पण मीच ताट मागून घेतो. थोडक्यात मी स्वतःला अलिप्त करून घेतलंय त्या न दिसणाऱ्या मूर्खामुळे.

गावात जि.प. सभापती राहतात. त्यांच्या बायकोने दवाखान्यातील नर्सकडून मास्कचा एक मोठा बॉक्स काढून नेला. लक्षात येताच लगेच मिटिंग भरवली. बॉक्स कोणी दिला असेल याची पूर्वकल्पना होतीच. संशयीतावर नजर रोखून सर्व कर्मचाऱ्यांची निरमा टाकून धुलाई केली. गेलेला बॉक्स तर परत येणार नव्हता पण मिटिंग झाल्यावर संशयीतेने आपला गुन्हा कबूल केला हेही नसे थोडके. असे भरपूर किस्से घडलेत पण विस्तार भयास्तव येथे देत नाही. आरोग्य केंद्राशी निगडित वेगळा धागा काढून लिहेन.

बाकी मामांची लेकरं त्यांच्या आजी-आजोबा, काका-काकूंकडे शेतात पाठवून दिलेत. दवाखान्यातून घरी येताना लागणारे सामान मीच आणतो. बाकी कोणाला बाहेर पडू देत नाही. तुम्ही सुद्धा घरात जो धष्टपुष्ट आहे त्यालाच पाठवत जा. ते सुद्धा अगदी काम पडलं तरच. बाकी या आजाराची बऱ्यापैकी माहिती आपणा सर्वांना आहेच. सर्वांनी काळजी करू नका, काळजी घ्या. आता चांगल्या सवयी अंगीकारल्या असतील त्या कायम ठेवा. आपल्या दुश्मनाला मी 'पुन्हा येईन....मी पुन्हा येईन' म्हणण्याची संधी देऊ नका.

प्रतिक्रिया

फार आवडली फर्स्ट हँड माहिती. कधीमधी इतर लेखही लिहा.

तमाम महाराष्ट्र 'यांच्या' आदेशाला टरकून असतो.

----------
बाकी आमच्या उपनगरात काही इमारतींमध्ये रुग्ण सापडल्याने त्यामधील रहिवाशांच्यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 11:01 am | गुल्लू दादा

नाविन्यपूर्ण लिहिण्याचा नक्की प्रयत्न असेल. त्यात अजिबात 'कंजूस'पणा करणार नाही.

एकनाथ जाधव's picture

6 Apr 2020 - 3:40 pm | एकनाथ जाधव

धन्यवाद

चांगला लेख. एका इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये लढणाऱ्या सैनिकाचं थेट निवेदन, तेही अभिनिवेश विरहीत.

धन्यवाद.

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 11:04 am | गुल्लू दादा

आभारी आहे गवि. मी फक्त माझे कर्तव्य पार पाडतोय आणि कर्तव्य अभिनिवेश विरहीतच असावं नाही का. छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2020 - 8:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुल्लुदादा, आपण डॉक्टर आहात तेव्हा सध्याच्या काळात आपलं काय सुरु असेल म्हणुन उत्सुकता होती. आपण नेहमीच उत्तम ललित लेखन मिपावर केलं आहे. म्हणून तुम्ही या सगळ्या परिस्थितीतला आपला अनुभव अगदी खुसखुशीत लिहिला आहे. आवडला. आरोग्य विभागातल्या वेगवेगळ्या गोष्टी इथे समजल्या. संकटसमयी सुद्धा माणूस कसा वागतो त्याचं प्रत्यंतर देणारा अनुभव. कुटूंबातील मामा आपणास चांगली वागणूक देत आहेत. आपण आपली काळजी घ्या रुग्णांचीही घेत आहात. जमेल तसे आपले अनुभव नक्की लिहा. वाचायला आवडेलच.

काल एका आरोग्यसेवेत काम करणार्‍या नर्सचा अनुभव वाचण्यात आला. बातमीत म्हटलेलं होतं की ती दवाखान्यात जाते म्हणून तिच्यापासून आपणास धोका होऊ शकतो म्हणून सोसायटीमधील लोकांनी तिला त्रास दिला आणि तीला ते भाड्याचं घर सोडावे लागले अशी बातमी वाचनात आली होती. समाजाकडून असा अनुभव वाचायला मिळतो तेव्हा वाईट वाटतं. उगाच कृतज्ञता व्यक्त करणार्‍यांच्या नाटकीपणाची चीड येते.

मुंबैत एक परिचित खासगी दवाखान्यात डॉक्टर आहेत, त्यांचं कुटुंब माझ्याशी परिचित आहेत. सतत काळजीत असतात. रुग्णांची संख्या वाढत आहेत आणि त्यांची काळजी तितकीच वाढतांना दिसली. कुटुंबातील प्रमुख म्हणून जेव्हा ते काम करतात तेव्हा त्यांच्या मनाची घालमेल आपणास कल्पना करता येणार नाही अशी असते. गुल्लुदादा आणि आपण सर्व डॉक्टरांच्या कार्याला आपलं सॅल्युट आहे. मनापासून आभार.

सकाळची आवराआवर करुन पुन्हा धाग्यावर असेनच.

-दिलीप बिरुटे

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 11:11 am | गुल्लू दादा

तुमच्यामुळे हे आकाराला आलंय सर. चुका माझ्या श्रेय तुमचं. असंच माझ्यासारख्या आळशी लोकांना पेटवत रहा;) वर आपण उल्लेख केला त्याप्रमाणे काही आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. त्यांनी जर स्वतःला अलिप्त करून घेतलं तर त्यांच्यापासून कोणाला काहीच अपाय होईल असे वाटत नाही. बाकी या काळात त्यांना एकटं वाटू न देणं समाजाचं कर्तव्य आहे. देव ना करो पण जे लोक त्यांना आज नीट वागणूक देत नाहीयेत त्यांना दवाखान्यात त्याच कर्मचाऱ्यांच्या हातून औषधपाणी घ्यावे लागले तर. कोणावर पण दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ शकते. गाफील न रहाता काळजी घेणे उत्तम.

ऋतुराज चित्रे's picture

6 Apr 2020 - 9:47 am | ऋतुराज चित्रे

छान लेख.
घरातील कॅलेंडरचे पान आणि सिनेमाचे पोस्टर हे कधी बदलताना मीही बघितले नाही.

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 11:13 am | गुल्लू दादा

बऱ्याच गोष्टी नव्याने निदर्शास येत असतात. माणूस रोज मोठा होत असतो;)

कुमार१'s picture

6 Apr 2020 - 10:01 am | कुमार१

चांगला लेख.
रोजच्या सेवाकार्यास शुभेच्छा !
................................................

आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वात मोठी आपत्ती सध्याची आहे. या खालोखाल कुठली असा विचार करता १९७२ चा भीषण दुष्काळ आठवला. तेव्हा नेहमीच्या धान्यांची टंचाई होती. ‘मिलो’ नामक निकृष्ट धान्य आयात केले गेले होते. ते खावे लागले होते.

अजून एक आठवतंय. कापड सुद्धा रेशनच्या दुकानात रांग लावून घेतले होते. त्यापासून शिवलेले सदरे अजून आठवतात. तेव्हा रेशनकार्डे सर्वांनाच समान होती. एरवी त्या दुकानांतील धान्य हे कमी दर्जाचे म्हणून गरीब लोक घेत. पण, मध्यमवर्गीयांची एक खासियत होती. ती म्हणजे आपल्या कार्डावरून फक्त साखर रेशनची घेणे. ती ‘चालायची’ !

या दुष्काळात कापड घेण्यासाठी पांढरपेशा वर्ग रेशनच्या रांगेत उभा होता हे एक अविस्मरणीय दृश्य होते.

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 11:19 am | गुल्लू दादा

माझा जन्म 92 चा असल्याने माझ्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी सार्वजनिक आपत्ती. आता मरेपर्यंत दुसरी कुठलीच आपत्ती येऊ नये असे वाटते. यावर सुद्धा आपणा सर्वांच्या मेहनतीने आपण जरूर विजय मिळवू. जे घरात बसलेत त्यांचं यात सर्वाधिक श्रेय. ते बाहेर आले तर आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल. सुविधेअभावी ज्यांना वाचविता आले असते ते पण प्राण गमावून बसतील.

धर्मराजमुटके's picture

6 Apr 2020 - 11:24 am | धर्मराजमुटके

चांगले कथन ! स्वतःस सांभाळून राहणे. बाकी हा देश थुक्या आणि फुक्यांचा आहे. त्यांना कितीही सांगीतले तरी ते सुधरत नाही तेव्हा अशा लोकांपासून चार हात दुरच राहणे.

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 1:19 pm | गुल्लू दादा

ज्यांना स्वतःच्या जीवाची काळजी नाही त्यांची काळजी आपण तरी कुठवर करणार:) प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अभिजीत अवलिया's picture

6 Apr 2020 - 11:49 am | अभिजीत अवलिया

अनुभव कथन आवडले.

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 1:20 pm | गुल्लू दादा

धन्यवाद.

सध्याच्या कठीण परिस्थितीत खूप मोलाचे कार्य करत आपण. आपल्या कार्यास शुभेच्छा. योग्य ती काळजी घेत आहातच, सोपे नाही हे.

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 1:24 pm | गुल्लू दादा

कर्तव्य बजावत असताना थोडी जरी कौतुकाची थाप पाठीवर पडली तरी हुरूप येतो. तू फक्त लढ बाकी आम्ही बघून घेऊ म्हणणारे असले की शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत लढणारे या मातीने बघितलेत. तेच अपुले प्रेरणास्थान. धन्यवाद.

सुबोध खरे's picture

6 Apr 2020 - 12:10 pm | सुबोध खरे

गुल्लू दादा
एक वरिष्ठ डॉक्टर म्हणून एक अनाहूत सल्ला देतो आहे.
जपून राहा.
आपल्याकडे सरकारी नोकर म्हणजे आपले खाजगी सेवक असा समज असणारे स्थानिक नेते आणि मतांसाठी त्यांचीच री ओढणारे राजकारणी पोलीस आणि नोकरशहा यांची साखळी सर्वत्र दिसून येते.

यात आपल्या अतिशय जवळचे मित्र सुद्धा ऐन वेळेस "गर्दी"चीच बाजू घेताना आढळतील.

शेवटी हे रुग्णालय/ आरोग्य केंद्र चालवणे हि केवळ आपली जबाबदारी नाही. वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन/ प्रमुख जिल्हा चिकित्सक स्वतः डॉक्टर असूनसुद्धा बहुसंख्य वेळेस डॉक्टरांची बाजू (न्याय्य असली तरीही) घेण्याच्या ऐवजी आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांचीच तळी उचलताना दिसतील.
हाच अनुभव कॉर्पोरेट रुग्णालयात सुद्धा येतो.

ज्या गरिबांसाठी आपण स्वतःचा जीव धोक्यात घालाल, ते लोक सुद्धा उद्या उलटून आपल्याला दोष देताना आढळतील.

कुणी आपली स्तुती केली तर फार खुश व्हायचे कारण नाही उद्या याच माणसाला तुम्ही एखादे मेडिकल सर्टिफिकेट नाकारले तर हाच माणूस तुम्हाला तोंडावर शिव्या द्यायला आणि मागे निंदा करायला कमी करणार नाही.

असे अनेक अनुभव गाठीला धरून मी आपल्याला हे सांगतो आहे.

मग "हेच फळ काय मम तपाला" असाच अनुभव आपल्याला येईल.

माझ्या वैद्यकीय प्रवासात फार सुरुवातीला (१९८८) मला एक अतिशय उमदे असे वरिष्ठ मार्गदर्शक डॉक्टर भेटले हे माझे सुदैव .

आजही त्यांचे शब्द मला आठवत राहतात. unless you are comfortable you cant make your patients comfortable.

तेंव्हा सर्वात प्रथम स्वतःची काळजी घ्या मग इतरांची. आपली आपल्या कुटुंबाप्रती जबाबदारी आहे हेही लक्षात ठेवा.

परमेश्वर आपल्यावर कृपादृष्टी ठेवो

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 1:27 pm | गुल्लू दादा

आपला सल्ला कधीही खाली जाऊ द्यायचो नाही सर. आपला अनुभव आणि ज्ञान नेहमी मार्गदर्शक राहील. मेडिकल फिटनेस चा खराब अनुभव आलेला आहे. नक्कीच आधी स्वतःची काळजी मग इतरांची. सुंदर आणि सखोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सरनौबत's picture

6 Apr 2020 - 12:18 pm | सरनौबत

नेहेमीच्या धाग्यांपेक्षा छान वेगळा धागा. एक डॉक्टर म्हणून तुमचे अनुभव ऐकायला मस्त वाटलं. तुम्हांला अनेक शुभेच्छा!

अत्रुप्त आत्मा's picture

6 Apr 2020 - 12:33 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 1:28 pm | गुल्लू दादा

धन्यवाद सरनौबत आणि अतृप्त आत्मा. :)

चांदणे संदीप's picture

6 Apr 2020 - 12:36 pm | चांदणे संदीप

लॉकडाऊनचा तेरावा छान. त्या मूर्खाच्या तेराव्याला पण अशीच रंगत येऊद्या.

सं - दी - प

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 1:29 pm | गुल्लू दादा

काळजी घ्या. धन्यवाद.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

6 Apr 2020 - 2:53 pm | सौ मृदुला धनंजय...

डॉक्टर अप्रतिम लेख .तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा.

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 5:00 pm | गुल्लू दादा

आपल्या सदिच्छाची सर्व जगाला गरज आहे. धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2020 - 4:17 pm | संजय क्षीरसागर

या शुभकार्यास मनःपूर्वक शुभेच्छा.

सकारात्मक आणि उमदं मन कोणत्याही आपत्तीवर विजय मिळवतं आणि या परिस्थितीत सर्वजण तुमच्या बाजूनं उभे राहातील याबद्दल निश्चिंत रहा !

गुल्लू दादा's picture

6 Apr 2020 - 5:02 pm | गुल्लू दादा

आपल्या सारख्या सकारात्मक लोकांमुळेच कदाचित मेरा भारत महान म्हणत असतील. धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2020 - 5:14 pm | चौथा कोनाडा

लेख वाचून सकारात्माक भावना तयार झाली. आपण आणि आप्ल्या सारखे कित्येक तळाची लडाई लढता आहेत म्हणून आमच्या सारखे निश्चिन्त राहू शकतात.
आपल्या सेवा-कार्याला सलाम !
हा तेराव्याचा लेख आवडला, हे वेगळे सांगायला नको !

(नेट्मेडस वरून लॉक-डाऊन पुर्वी मागवलेली औषधे आजच पोहोचली. लगेच त्यांना त्यांंच्या टिमचे आभार मानणारा इ-मेल लिहून टाकला)

गुल्लू दादा's picture

7 Apr 2020 - 10:17 am | गुल्लू दादा

माझ्या तुटपुंज्या लेखनाने जर कोणाला सकात्मक भावना तयार होतं असेल तर अजून काय हवे. धन्यवाद छान प्रतिसादाबद्दल.

कुमार१'s picture

6 Apr 2020 - 6:03 pm | कुमार१

पंतप्रधान असताना करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी बनले डॉक्टर

बातमी :
https://www.loksatta.com/trending-news/coronavirus-leo-varadkar-to-work-...

गुल्लू दादा's picture

7 Apr 2020 - 10:18 am | गुल्लू दादा

धाडसी काम करताहेत लिओ सर...त्यांना सलाम.

माझ्या शेजाऱ्याला तो आरोग्य खात्यात कारकून असूनही " करोना" होस्पिटल ड्युटी आली आहे . त्याला लांबून विचारले ,तो म्हणाला फ्लू प्रमाणे करोना मध्ये लगेच व्हेंटिलेटर हटत नाहीये त्यामुळे दिवसेंदिवस व्हेंटिलेटर वरचे खास करून म्हातारे रुग्ण वाढताहेत. सबबी बरे झाल्याची संख्या कमी दिसतेय ! आपला हा लेख " त्या" अँगल मधून असल्याने मला भिडला. त्यात गावाकडे काय हालहवाल आहे हे आम्हाला इथे शहरात बसून कसे कळणार ? त्यासाठी आभारी आहे. ते खरे साहेबांचे मात्र ध्यानात असू द्या. काळजी घ्या सोत्ताची ! माझ्या थोड्याफार वैद्यकीय वाचनाने इतके तर नक्की समजले आहे की निसर्ग इतका निष्ठुर नाही की याही युगात प्रभावी लस सापडणार नाही. शिवाय साथी रोगांचा इतिहास हे सांगतो की सर्व मानव जात नष्ट होणे केवळ अशक्य आहे. लस लवकर मिळेल अशी आशा करू !

गुल्लू दादा's picture

7 Apr 2020 - 10:19 am | गुल्लू दादा

हो लवकर खात्रीपूर्वक इलाज किंवा लस सापडेल अशी आशा करूयात. धन्यवाद.

कंजूस's picture

6 Apr 2020 - 8:27 pm | कंजूस

आताचे उपचार काय आहेत?

गुल्लू दादा's picture

7 Apr 2020 - 10:22 am | गुल्लू दादा

सध्या खात्रीलायक कुठलेच उपचार नसून लक्षणांवर अवलंबून असणारे उपचार सुरू आहेत.

वोक्हार्ड हॉस्पिटल,( मुंबई).
३००+ ३० स्टाफ ना करोना?
बंद??

गुल्लू दादा's picture

7 Apr 2020 - 10:25 am | गुल्लू दादा

बघण्यात आली ही बातमी काल. आरोग्य कर्मचारी या विळख्यात अडकले तर कठीण होईल. भारतात कर्मचाऱ्यांचे पुरेसे संरक्षण होईल असे कपडे वा मास्क नाहीयेत सध्या या वेळी तरी. आरोग्य विभागावर आधी पासून सरकार किती दुर्लक्ष करत आलंय हे करोनामुळे सर्वांसमोर आलंय.

मीअपर्णा's picture

7 Apr 2020 - 7:49 am | मीअपर्णा

लेखाची सुरूवातही रोचक आहे. ही सिरीज आता चाळली आणि यगळ्यांना मिळून हा प्रतिसाद समजा.
माझ्याकडे सोशल/फिजीकल डिस्टंसिंग आहे पण लाॅकडाऊन नाही. त्यामुळे माझ्याशी अर्थाचत तुला वगैरे करत नाही. फक्त दोनवेळा, एकदा कोरोना झालेल्या टीममेट बरोबर (डिटेक्ट आणि वफह मिळण्याआधी) आणि एक कोरोनाबाधीतशी संपर्क झालेल्याशी संपर्क होऊन क्वारंटाइन टाइमपिरडमध्ये तरी नीट राहिलो असा निसटता विजय (?) मिळाला आहे म्हणून सर्वांनीच काळजी घ्या हेच म्हणेन. शत्रू कुठून वार करेल हे कळेनासे झाले आहे.

मुंबईतल्या नातेवाईकांशी बोलताना तिथली परिस्थिती समजतेय. त्याच ज्यांची घरं लगान तिथे तर फारच अडकल्यासारखं होत असणार. हे धागे वाचून वेगवेगळ्या परिस्थिती समजतात. काही करू शकत नसलो तरी निदान कळतं आणि काही फु.स. आमच्या तिथल्या कुणाचच न ऐकणार्या (ज्ये) नातेवाईकांना देऊ शकतो. :)

डाॅ.ना ते एन ९५ मास्क् आहेत नं गावात देखील? माझ्या शेजारी नर्स जोडपं राहातं. तो इकडच्या हेल्थ केअर वर्कर नीड्स बद्दल फार काही आशावादी नाही. त्याच्या मते
we have already been exposed. It’s just cause we are young I hope we should be fine if it shows up. It’s the question as to when ? :(

दुनियाभऱच्या बातम्या न वाचणे, संध्याकाळी मुलांबरोबर वेळ घालवणे आणि इतर काही पुर्वी ठरवलेले पण केलेले कला प्रांतात मोडणारे उद्योग करणे अशा बारीक सारीत गोष्टी करतो. काम १००% घरून आहे त्यामुळे प्रवासाचाच काय तो वेळ वाचतो. मला ताम आहे हेच माझं यातून तरून जायचं साधन असेल असं वाटतं.

लिहिते राहा.

गुल्लू दादा's picture

7 Apr 2020 - 10:26 am | गुल्लू दादा

काळजी घ्या. धन्यवाद.

उग्रसेन's picture

7 Apr 2020 - 10:44 am | उग्रसेन

डाक्टर चांगलं लिव्हलय. येत राव्हा.

तुमच्या द्वाखान्यात पेशेंट कमी असतेत काय.
काल धरुन तुम्ही इकडंच दिसू राह्यले. :)

गुल्लू दादा's picture

7 Apr 2020 - 11:18 am | गुल्लू दादा

प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी असते रुग्णसंख्या. त्यात करोनामुळे फालतू चक्कर मारणारे घटलेत. फक्त खोकला ची बाटली जमा करणारे कमी झालेत. 2 रुग्णांच्या मध्ये जो वेळ मिळतो त्यात प्रतिसाद देणे चालू असते.

Nitin Palkar's picture

7 Apr 2020 - 1:11 pm | Nitin Palkar

रुग्णांनइतकेच राजकारण्यांपासून सांभाळून रहा. स्वतःची योग्य ती काळजी घ्या. वर अनेकांनी म्हटल्या प्रमाणेच तुमच्या सारखे आरोग्य सेवक, पोलीस आणि सफाई कामगार यांच्यामुळेच आमच्यासारखे सामान्य जन घरांमध्ये सुरक्षित राहू शकतात .

गुल्लू दादा's picture

7 Apr 2020 - 4:11 pm | गुल्लू दादा

हा देश आपला आहे. आपण सगळे मिळून काळजी त्याची सुरुवात आपल्यापासून करूया. धन्यवाद.

परीक्षित's picture

8 Apr 2020 - 6:47 pm | परीक्षित

उत्तम लेख

अतिशय सुंदर लेख.. वाचताना मज्जा आली..
त्याच बरोबर पेल्याचे, कॅलेंडर ची उदा. भारीच..
दवाखान्याच्या आवारातील गावकऱ्यांची मानसिकता कळते आहे..

मार्च मध्ये, शिरूर तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाण्याचा योग आला होता.. त्यावरून परिस्थिती लवकर relate झाली..
नेमका आम्ही गेलो तेंव्हा गावात जपान वरून एक जण आला होता..
तसेच आधी जो अमेरिके वरून आला होता त्याच्या घरच्यांनी तो लगेच पुन्हा गेला असे खोटे सांगितले हे तेथील मित्रानं सांगितले..

त्यानंतर ओतूर मधली प्राथमिक केंद्रातली बातमी आली..
करोना बाहेरच्या देशातून आलेल्या व्यक्तीने, त्याच्या प्रायव्हेट डॉ. चा सल्ला न ऐकता प्राथमिक केंद्रात चेकिंग ला आला होता.. आणि या हलगर्जी पणा मुळे तेथील आरोग्य सेविके ला पुण्यात corantine करण्यात आले. बिचारी ला 18 months चे बाळ होते. आणि तिने आधीच सांगितले होते तुम्ही पुण्यात नायडू ला जा.. पण पेशंट ऐकत नव्हता, त्याच्या म्हणण्याने तुम्ही उगाच घाबरता

शेवटचे वाक्य भारीच

चांगला लेख आणि चांगली चर्चा

आजकाल मिसळपाव वर आले तरी सारखे ह्या विषयाशी संबंधित लेखच वाचावेसे वाटतात
न्यूज नाही बघितल्या तरी इथे पण त्याच विषयाकडे लक्ष जाते
लॉकडाऊन परिणाम