नमस्कार मंडळी,
कशी चालली आहे सक्तीची रजा?
काय म्हणता? लाॅकडाऊन लाॅकडाऊन खेळुन कंटाळा आलाय? त्याच त्या बातम्या, सोमिवरची वांझोटी चर्चा, चॅलेंजेसनी डोकं उठलंय? चेंज हवाय? या की मग एक सोप्पा पदार्थ शिकवतो. अगदी कमी जिन्नस वापरून होणारा चमचमीत सिंधी कोकी पराठा करूयात.
तसा हा पदार्थ न्याहरीसाठी खाल्ला जातो. एक प्रकारचं कणकेचं थालीपिठच म्हणाना. मी जरा त्यात बदल केलाय पण सोपी पद्धतही सांगतो की.
सर्व प्रथम लागणारे जिन्नस बघू
चमचा भर जिरं, ओवा
हिंग, बारीक चिरलेला लसुण, हिरवी मिरची, किसुन घेतलेलं पेरभर आलं.
पाव चमचा हळद, स्वादा नुसार मीठ, चमचा भर लाल तिखट, धणे जीरं पूड
दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, वाटीभर बेसन, थोडीशी कसुरी मेथी, चीज (आॅप्शनल), चपातीसाठी मळतो तशीच कणीक किमचीत सैलसर
सर्वप्रथम तेलावर लसुण मिरची आलं परतुन घ्यावं. त्यात हिंग टाकून मग कांदा गुलाबी रंगावर परतुन घ्यावा.
लालतिखट आणि अन्य मसाले, मीठ टाकुन चांगलं परतावं. मग बेसन टाकावं. ते खरपुस भाजुन घ्यावं. अगदी कोरडंच. झाकण ठेऊन एक वाफ काढावी.आणि आच बंद करून गार करावं.
गार झाल्यावर आवडत असल्यास चीज घालावं अगदीच कोरडं वाटत असेल तर पाण्याचा हबका मारावा.
कणकेचे लहान गोळे करून घ्यावे.
पारी करून त्यात सारणाचा गोळा भरावा.
दोन्ही बाजुला सुकं पीठ लावून त्याची पोळी लाटुन घ्यावी.
तापलेल्या तव्यावर तेल सोडून हा पराठा दोन्ही बाजुंनी मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावा.
हे सगळ किचकट वाटत असेल तर कणीक मळतानाच बाकीचे सारे जिन्नस त्यात टाकून मग कणिक तिंबावी. आणि मग त्याचे लहान गोळे करुन ते लाटावे.
लोणचं, दही, बटर/लोणी कुठल्याही
अावडत्या तोंडी लावण्यासोबत हे गरम खरपूस पराठे तुमचा दिवस आनंदी करतील याची खात्री बाळगा.
प्रतिक्रिया
4 Apr 2020 - 5:16 pm | प्रचेतस
किती अत्याचार करतोस रे, खल्लास झालोय.
4 Apr 2020 - 8:00 pm | प्रशांत
एकतर आपल्याला हा प्रकार करता येत नाहि. त्यात लागणारे साहित्य घरात असतेच त्यामुळे लॉकडाऊन चे कारणहि देता येत नाहि.
( गणपा वाईट आहे
प्रा डॉ मोड ऑफ )
4 Apr 2020 - 5:24 pm | चांदणे संदीप
तोंपासु आणि फोटोही खतरा आलेत.
सं - दी - प
4 Apr 2020 - 5:53 pm | गवि
लेख लोड होत नाही
फोटोही दिसले नाहीत
रंगसंगती दिसली नाही
त्रास झाला नाही
इथे आमटी भात उसळ भात चाललंय. त्यात उगीच बघून जळजळ नको.
4 Apr 2020 - 6:00 pm | यश राज
छान फोटो , तों पा सु....
4 Apr 2020 - 7:39 pm | तुषार काळभोर
या साहेबांना कुणीतरी भारतरत्न देण्याची शिफारस करा रे!!
4 Apr 2020 - 8:23 pm | रमेश आठवले
उत्तर भारतात काही मंडळी याला इस्टफ्ड परोठा म्हणतात .
4 Apr 2020 - 10:08 pm | अनिंद्य
सिंधी कोकीचे हे वर्जनही आवडले. रंगसंगती खासच !
कैलास पर्बत कोलाबा आणि सिंगापुर दोन्हीकडे माझी ही फिक्स ऑर्डर. आता घरी करायला पाहिजेलाय.
5 Apr 2020 - 11:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लंबर एक. कसं जमतं तुम्हाला हे असलं भारी भारी.
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
5 Apr 2020 - 11:20 am | सस्नेह
वरील सारणात शेवटी बारीक चिरलेली मेथी घातली. पराठे मस्त झाले आहेत.
5 Apr 2020 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा
6 Apr 2020 - 2:19 pm | सुचिता१
छान आहे पाककृती. धन्यवाद.
7 Apr 2020 - 12:02 pm | वामन देशमुख
एक लंबर, गणपा! फोटोज तर लै भारी!
7 Apr 2020 - 12:58 pm | राघव
भारी! हे करून बघायलाच हवेत. लवकरच टाकतो फोटू! :-)