संचारबंदीमुळं सध्या घरून-काम (WFH) सुरू आहे. त्यानिमित्ताने ऑफिसचं काम करत करत पाकगृहात अन्नपूर्णेची आराधना करत आहे.
आज पत्नीने नाश्त्याला दही वडे केले होते. अनेक दिवसांपासून मी बांगला बसंती पुलाव करण्याचा बेत ठरवला होता; रामनवमीच्या निमित्ताने आज तो तडीस नेला. त्याची पाककृती इथे देत आहे. प्रभू श्रीरामाचा नेवेद्य समजून मिपाकरांनी गोड मानून घ्यावा ही विनंती.
।। जय श्रीराम ||
बसंती पुलाव (पारंपारिक बांगला पाककृती)
साहित्य:
गोविंदभोग तांदूळ - दोन वाट्या
काजू, बदाम, मनुका, चारोळी - आवडीप्रमाणे
लवंगा - पाच
विलायची - चार
दालचिनी - एक इंच
जायपत्री - चार पाने
चक्रफुल - तीन फुले
साखर - दोन चमचे*
मीठ - अर्धा चमचा*
हळद - पाव चमचा
केशर - पाच काड्या
तूप - दोन चमचे
पाणी - चार वाट्या
पाककृती:
तांदूळ स्वच्छ धुऊन हळद घालून भिजत ठेवा. अर्ध्या तासाने उपसून ठेवा. एकीकडे पाणी गरम करायला ठेवा.
जाड बुडाच्या पातेल्यात चमचाभर तूप घाला. गरम झाल्यावर काजू, बदाम, मनुका आणि चारोळी किंचित परतून घ्या व बाजूला काढून ठेवा.
अजून चमचाभर तूप घालून लवंग, विलायची, दालचिनी, जायपत्री, चक्रफुल घालून परता. भिजवलेले तांदूळ घालून अर्धा मिनिट परता. मीठ आणि साखर घाला (*इथे टीपा ५ व ६ वाचा). गरम पाणी घालून ढवळून घ्या. पाच मिनिटानंतर, परतलेले काजू, बदाम, मनुका व चारोळी घाला. झाकण ठेऊन मंद आचेवर दहा मिनिटे शिजू द्या. आता ह्यात केशराच्या काड्या घाला. दोन मिनिटे झाकण ठेवून वाफ दबू द्या.
गरमगरम खायला वाढा.
टीपा:
१. पुलाव चांगला शिजण्यासाठी एकूण पंधरा मिनिटे पुरतील.
२. गोविंदभोग तांदूळ हा अगदी बारीक, आखूड असा असतो आणि त्याला छान सुगंध असतो.
३. हा तांदूळ हा शिजण्यासाठी थोडासा नखरा करतो - पहिल्याच प्रयत्नात चांगला शिजवण्यासाठी नशीब लागतं!
४. या तांदळासाठी पाण्याचे प्रमाण एकाच दोन एवढेच हवे, कमी नको आणि जास्तही नको.
५. बसंती पुलाव हा गोड आणि तिखट दोन्ही प्रकारात करता येतो. गोड करायचा असेल तर मीठ घालण्याची गरज नाही.
६. तथापि, बंगाली लोकांचा स्वभावाप्रमाणेच, तिखटमिठाचे बंगाली पदार्थही किंचीत गोडसरच असतात. म्हणून मूळ बंगाली चव हवी असेल तर तिखट मिठाच्या प्रकारातही चमचाभर साखर घालावी.
तळटीपा:
अ. माझ्या घरी ऐनवेळी केशर सापडलं नाही, म्हणून घातलं नाही.
आ. साहित्याच्या फोटोतील पदार्थ पाककृतीच्या प्रमाणात नाहीत.
प्रतिक्रिया
2 Apr 2020 - 12:52 pm | धर्मराजमुटके
खरं तर आजचा उपवास आमच्यासाठी निर्जळी असतो मात्र सध्याची परिस्थिती पाहता तो द्रव पदार्थ / उपवासाचे पदार्थ खाऊन साजरा करायचे ठरविले आहे.
पाककृती आवडली असे नोंदवितो.
2 Apr 2020 - 1:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुसरा फोटो आवडला. मस्तय.
-दिलीप बिरुटे
2 Apr 2020 - 3:26 pm | चौकस२१२
नेहमीच्या पुलावा बरोबर तुलना केली तर "गोविंदभोग" तांदळाचा जो काय वेगळा स्वाद आणि पोत असेल त्याशियाय काही वेगळे असे लागते का? असा प्रश्न मनी आला
बंगाली जेवणात साधारण पणे मोहरी चे काही तरी असते ना? तूप असते का? कि तो मराठी भाग ..?.
7 Apr 2020 - 12:15 pm | वामन देशमुख
@धर्मराजमुटके
धन्यवाद! करून पहा, नक्की आवडेल.
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद. आता पहिला फोटो दिसतोय का?
BTW, गूगल फोटोज मला अनेकदा दगा देते राव. :(
इथे झटपट धागे काढून त्यात फोटो चढवणाऱ्यांचा हेवा वाटतो! बाकी टंकाळा वगैरे आहेच!
@चौकस२१२
तसं म्हटलं तर नेहमीच्या पुलावाच्या तुलनेत वेगळं फार काही नाही.
बांगला पदार्थांत भाज्यांना ग्रेव्ही करण्यासाठी मोहरीचा वापर होतो, पण भातमय पदार्थांत (माझ्या माहितीत तरी) मोहरी वापरत नाहीत.
पाककृतीत तूप मुळचेच आहे.